My YouTube Channel

Click here to visit My YouTube Channel

Saturday, 13 January 2024

भारताची लोकशाही आपल्या वर्गखोलीत निर्माण होणार आहे: शिक्षण चिंतन परिषदेत विवेक सावंत यांचे मत

भारताची लोकशाही आपल्या वर्गखोलीत निर्माण होणार आहे: शिक्षण चिंतन परिषदेत विवेक सावंत यांचे मत


प्रतिनिधी,चोपडा 

दि.१२ जानेवारी २०२४

ज्ञान दोन प्रकारचे असते इहलौकिक आणि वैज्ञानिक. आदिमानवापासून ज्ञानाच्या क्रांतीची सुरुवात झाली. शून्याचा शोध लागला त्यामुळे ज्ञानक्रांती झालेली आहे. भारताची लोकशाही ही आपल्या वर्गखोलीत निर्माण होणार आहे. मानवी बुद्धिमत्ता व कृत्रिम बुद्धिमता  या दोन्ही कौशल्यांचा संयोग आपल्याला साधावा लागेल व त्याचा अधिकाधिक वापर करुन प्रगती, नवे शोध लावण्यासाठी प्रत्येकाने आपल्या क्षमता वाढवून समर्पित भावाने प्रयत्न केले तर मानवी जीवन समृद्ध होण्यास   

नक्कीच हातभार लागेल.असे मत श्री.विवेक  सावंत (प्रमुख मार्गदर्शक महाराष्ट्र ज्ञान महामंडळ पुणे MKCL) यांनी विवेकानंद प्रतिष्ठान व संशोधन केंद्र संचलित,

विवेकानंद विद्यालय,चोपडा तर्फे स्वामी विवेकानंद जयंती व संस्थेचा वर्धापन दिन यानिमित्त आयोजित शिक्षण चिंतन परिषदेत व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वामी विवेकानंद यांच्या भव्य मूर्तिस माल्यार्पण व दीप प्रज्वलन करून तसेच स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन श्री विवेक सावंत, विधानसभेचे माजी सभापती श्री.अरुणभाई गुजराथी यांचे हस्ते करण्यात आले.विद्यालयातील अध्यापकांनी 'देश माझा मी देशाचा...'हे गीत सादर केले. 

त्यानंतर माध्यमिक शालांत परीक्षेत (SSC२०२३) विद्यालयातून प्रथम तीन  क्रमांक प्राप्त झालेल्या चि.निखिल ज्ञानेश्वर पाटील (प्रथम), कु.मनस्वी किरण चौधरी (द्वितीय), कु.लीना नितीन सोनवणे (तृतीय) या विद्यार्थ्यांचा त्यांच्या आई-बाबांसह मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

त्यानंतर श्री.अरुणभाई गुजराथी यांनी संस्थेच्या वाटचालीसाठी आपल्या मनोगतातून शुभेच्छा  दिल्या.सावंत यांनी आपले विचार व्यक्त करतांना भारताला ज्ञानयुगात झेप घ्यायची असेल तर कर्मशील ज्ञानाचा सतत परिपोष करावा लागेल ते आम्हाला निर्माण करावे लागेल आणि मग त्यावेळी ज्ञानाधिष्ठित समाज निर्माण होईल. त्या त्या काळात त्या त्या मानवी समूहांनी जे  विलक्षण ज्ञान निर्माण केलं आणि त्या ज्ञानाचे संबंधितांमध्ये वितरण केले आणि वितरण करुन ते थांबले नाहीत तर त्याचे उपयोजन केले म्हणून प्रत्येक क्रांती होत गेली. ज्ञानक्रांती,कृषीक्रांती आणि औद्योगिक क्रांती अशाप्रकारे होत गेल्याचे ते म्हणाले. अध्यात्मामध्ये दोन भ्रांती आहेत त्या म्हणजे भेद भ्रांती आणि अभेद भ्रांती या दोन्ही भ्रांतीतून मुक्ती म्हणजे ज्ञान. हे नमूद करतांना त्यांनी वेगवेगळे संदर्भ दिले व  मनोरंजक गोष्टीही सांगितल्या. निसर्ग विज्ञान समजून घ्यावे लागेल. इतर देशात शिक्षणासाठी देण्यात येणारे महत्त्व त्यासाठी केला जाणारा खर्च तसेच आपल्या भारतात बालशिक्षणाकडे व्यवस्थित लक्ष घातल्यास देशातील समस्या कशा सुटतील व त्याचे किती चांगले दूरगामी परिणाम होतील,लोकशाही किती  सुदृढ होईल याबद्दल त्यांनी आपले विचार मांडले. शिक्षकाच्या एका Smile ने विद्यार्थ्यांच्या भावनिक मेंदूला सुरक्षितता प्राप्त होते. विद्यार्थ्यांना आपल्याला माहितीकडून माहितीकडे घेऊन न जाता एकविसाव्या शतकात माहितीकडून ज्ञानाकडे न्यायचे आहे. त्यांना वेगळा विचार करता यायला हवा. तो त्यांना करु द्यावा. प्रत्येक विद्यार्थी हा त्याच्या इतर सहध्यायी विद्यार्थ्यांच्या मतांबद्दल सहिष्णू असतो. Learning by failure हे लहानपणापासून होत असल्याचे ते म्हणाले. समारोप प्रसंगी भारत या शब्दाचा अर्थ सांगताना ते म्हणाले की 'भाकरीच्या विवंचनेत रत अशी पूर्वी भारत या शब्दाची व्युत्पत्ती होती.परंतु ज्ञानक्रांती झाली आणि विवंचना संपली. उपासमार कमी झाली.विज्ञानाने क्रांती केली. परंतु संस्कृतमध्ये 'ज्ञानाच्या उपासनेत रममाण झालेला' ही भारत या शब्दाची व्युत्पत्ती आहे. असा भारत निर्माण करणे हे शिक्षणाचे उद्दिष्ट आहे. असा भारत निर्माण झाला की तो ज्ञान युगात झेप घेईल. अशा प्रेरक विचारांनी विवेक सावंत यांनी उपस्थितांना एक तास वीस मिनिटे मंत्रमुग्ध केले. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री.पवन लाठी यांनी प्रास्ताविक श्री.नरेंद्र भावे यांनी तर परिचय प्रसाद वैद्य यांनी करुन दिला. राकेश विसपुते यांनी पसायदान सादर केले.

याप्रसंगी विधानसभेचे मा.सभापती अरुणभाई गुजराथी, संस्थेचे अध्यक्ष डाॅ.विजय पोतदार, संस्थापक अध्यक्ष डाॅ.विकास हरताळकर, उपाध्यक्ष श्री. घनश्यामभाई अग्रवाल,सचिव ॲड.रवींद्र जैन, सहसचिव डाॅ. विनीत हरताळकर, विश्वस्त डॉ.जयंत पाटील, श्री.दिव्येश पटेल, विश्वस्त डाॅ.अमित हरताळकर, डाॅ.नीरज पोतदार, डॉ.सौ.नीता हरताळकर व सौ.जोस्ना हरताळकर,श्रीमती आशा चित्ते,सौ.सुरेखा मिस्तरी,सौ.माधवी भावे व संस्थेचे सर्व पदाधिकारी,चोपडा एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या सचिव श्रीमती माधुरीताई मयूर मा. शिक्षक आमदार दिलीपराव सोनवणे गटशिक्षणाधिकारी श्री.अविनाश पाटील, श्री. संतोष बिरारी मंचावर उपस्थित होते. त्याचबरोबर परिसरातील सर्व प्रतिष्ठित मान्यवर,पत्रकार बांधव  व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. 












S महाराष्ट्र 7 न्यूज लिंक-

https://smh7bit.blogspot.com/2024/01/blog-post_13.html

---------------------------------------------------------------------------------

विवेकानंद विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न

प्रतिनिधी, चोपडा 

स्वामी विवेकानंद जयंती व राष्ट्रीय युवा दिनी विवेकानंद विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण रेमन मॅगसेसे पुरस्कारप्राप्त श्रीमती नीलिमा मिश्रा संस्थापक-भगिनी निवेदिता ग्रामीण विज्ञान निकेतन,बहादरपूर) यांच्या शुभहस्ते पार पडला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यालयाचा परिपाठ व समूह गीत विद्यार्थ्यांनी सादर केले. त्यानंतर स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाई यांच्या प्रतिमेचे पूजन श्रीमती नीलिमा मिश्रा व कार्यक्रमाचे अध्यक्ष डाॅ विजय पोतदार (अध्यक्ष-

विवेकानंद प्रतिष्ठान व संशोधन केंद्र चोपडा)व उपस्थित मान्यवर यांचे हस्ते करण्यात आले.

आपले विचार व्यक्त करतांना श्रीमती मिश्रा यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील काही प्रसंग सांगितले. स्वतःचे बचत गट स्थापन करण्यापासूनचे अनुभव, मिळालेले यश त्याबरोबरच कोरोना काळातील संकट याबद्दल त्यांनी आपले अनुभव सांगितले. कोरोना काळात आलेल्या गोधडी विक्रीच्या संकटाला चोपड्यातील अनेकांनी मोलाचा सहयोग दिला त्यामुळे चोपड्याशी एक नातं  निर्माण झाले असल्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.

त्यानंतर इयत्ता पहिली ते दहावीच्या वर्गात,शिष्यवृत्ती परीक्षेत व विविध स्पर्धा व परीक्षेत यशवंत ठरलेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा संस्थेतर्फे व देणगीदार यांचे तर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षीसांचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला.

दुपारच्या सत्रात सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला. पहिल्या दिवशी संपन्न झालेल्या पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे विश्वस्त श्री. गोवर्धनदास पोतदार यांनी केले. दुसऱ्या दिवशी संपन्न झालेल्या

माध्यमिक विभाग व श्रीमती कमलाबाई ओंकारदास अग्रवाल ज्यूनियर कॉलेजच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे विश्वस्त डाॅ. अमित हरताळकर यांनी तर तिसऱ्या दिवशी संपन्न झालेल्या इंग्लिश मिडीअमच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे उपाध्यक्ष श्री.घनश्यामभाई अग्रवाल यांनी केले. 

पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे विश्वस्त व विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. नरेंद्र भावे यांनी केले. सूत्रसंचलन राधेश्याम पाटील यांनी, श्रीमती मिश्रा यांचा परिचय सौ.माधुरी हळपे यांनी, आभार प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती आशा चित्ते यांनी  मानले तर बक्षीसांचे वाचन श्री.अभिषेक शुक्ल व प्रसाद वैद्य यांनी केले. सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.पूनम वैद्य व ज्योती अडावदकर,श्री. प्रसाद वैद्य व श्री.जावेद तडवी 

तसेच सौ. योगिता पाटील व सौ.दीपाली महाजन यांनी केले. 

या सर्व कार्यक्रमप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ.विजय पोतदार, संस्थापक अध्यक्ष डॉ.विकास हरताळकर, उपाध्यक्ष श्री.घनश्यामभाई अग्रवाल, सचिव ॲड.रवींद्र जैन, सहसचिव डॉ.विनीत हरताळकर,विश्वस्त श्री. गोवर्धनदास पोतदार  डाॅ.मनोहर अग्रवाल,डाॅ. जयंत पाटील,डाॅ. अमित हरताळकर, डाॅ. नीरज पोतदार, डाॅ. प्रियंका पोतदार, डाॅ नीता हरताळकर,सौ. जोस्ना हरताळकर, संस्थेचे सर्व विश्वस्त व पदाधिकारी, मुख्याध्यापक श्री.नरेंद्र भावे, श्रीमती आशा चित्ते, सौ.माधवी भावे, सौ.सुरेखा मिस्तरी पालकवृंद, शिक्षकवृंद व सर्व विभागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment