My YouTube Channel

Click here to visit My YouTube Channel

Sunday, 11 December 2022

ओळखपत्र ...मातीआड झालेल्या एका हसऱ्या, समंजस दुःखाचं!

ओळखपत्र ...मातीआड झालेल्या एका हसऱ्या, समंजस दुःखाचं!

"काय देती वो तुमची शाळा?

तुमाला तुमच्या शाळेचंच पडलंय...

इतं भुकेनं आss वासलेली पाच तोंडं हायेत पदरात माझ्या.

वरून नवरा तसला पिदाडा.

पोटापाण्याचं आदी बागावं का तुमची शाळाच बगावी?

नुसती शाळा शिकून पोट भरत नसतंय मॅडम! 

आन पयलीचं वर्ष एवढं काय मह्त्वाचं नसतंय..

कायी फरक पडत न्हाई थोडे दिवस शाळा बुडली तर...

मुकादमाकडून 20,000/- रुपय उचल घेतलीय मी घराचे गळके पत्रे दुरुस्त करायला...ती फेडावी लागल का न्हाई?"


आईच्या पदराआड तोंड लपवत, किलकिल्या डोळ्यांनी हे सारं ऐकत होता माऊली!


संध्या मॅडम आपल्या आईला समजावण्यात अयशस्वी झाल्यात,आता सगळं आपल्या मनाविरुद्ध होणार, हे एव्हाना लक्षात आलं होतं त्या चिमुकल्या जिवाच्या!

मॅडम म्हणत होत्या," शाळेच्या होस्टलवर  सोय होईल त्याची राहण्याची. मी विचारते संस्थेला. हुशार आहे हो माऊली,असं मध्येच नेऊन त्याचं

नुकसान नका करू!"


"नगं.... पाचीच्या पाची लेकरं घेऊन चाललेय मी.चार पोरीच्या पाठीवर झालंय हे पोरगं मला, त्याला इथं ठेऊन तिथं जीव कसा लागल माजा?"


तब्बल आठवडाभराच्या चर्चेअंती संध्या मॅडमला माऊलीच्या आईकडून मिळालेलं हे निराशाजनक अन् काहीसं कटू उत्तर होतं.


पण त्याक्षणी त्या हेही जाणून होत्या की, त्यांना केवळ एक शिक्षणाबद्दल अनास्था असलेला,अशिक्षित पालक बोलत नसून, नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून गेलेली, पाच लेकरांच्या पोटापाण्याचा प्रश्न भेडसावत असलेली हतबल आई बोलत होती.


अखेर परिस्थितीसमोर नाईलाज झाला अन् उद्या प्रथम सत्राचा शेवटचा पेपर देऊन माऊली काही महिन्यांसाठी शाळा सोडून आईसोबत ऊसतोडीसाठी भटकंती करत  गावोगाव फिरणार,यावर शिक्कामोर्तब झालं!


गरिबीचे निकष अन् व्याख्या तिला सोसणाराच सांगू शकतो, इतरांनी त्यावर सांगितलेल्या उपाययोजना केवळ  पुळचट असतात!


दुसरा दिवस...

माऊली मन लावून पेपर सोडवत होता, मॅडम त्याच्याकडे बघत विचार करत होत्या..


'काय भविष्य असेल अशा लेकरांचं? पोटाला दोनवेळचं अन्न मिळवणं हे आणि हेच अंतिम ध्येय असलेल्या अशा कैक लोकांचं?'


मॅडम विचारात असतानाच माऊली त्यांच्यासमोर सोडवलेला पेपर घेऊन उभा राहिला. मॅडम भानावर आल्या.


पेपरसोबत त्याने एक छोटीशी कोरी चिठ्ठी मॅडमकडे सरकवली...

"मॅडम, आमच्यासोबत मावशी पण येणार आहे. मला तुमचा नंबर द्या, मावशीच्या फोनवरून मी कधी मिसकॉल केला तर कराल का मला फोन?

त्या चिमुकल्या जीवाची ती साधीच मागणी किती आर्त वाटली त्याक्षणी!


पेपरवर नजर फिरवली. किती सुवाच्य अक्षर, अचूकता...!


त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे टक लावून बघीतलं मॅडमने.


घंटा वाजली, शाळा सुटली, अन् एक चिमुकला जीव आपल्या मनाविरुद्ध जगण्यासाठी चकारही न काढता निघून गेला.


लखलखता दिवाळसण...

झगमगाट, रोषणाई, नवनवीन खरेदी, उत्साह, गुलाबी थंडी...


एकुणात सुखवस्तू सण..!


पण जगाच्या एका कोपऱ्यात एक कोवळा जीव कुठेतरी हाच सण ऊसाच्या घनदाट

रानात, किर्रर्र अंधाराच्या साक्षीनं केवळ कल्पनेत साजरा करत होता.


त्या किर्रर्रर, कर्कश्श रानात,दिवसभर काम करून दमून निजलेल्या माणसांच्या घामाच्या दुर्गंधात, किरकिऱ्यांच्या आवाजात,अठराविश्व दारिद्र्याच्या ओटीत, शिक्षणाची चटक लागलेला पण परिस्थितीपुढे हतबल झालेला एक जीव त्या भयाण शांततेत  मनातल्या मनात किंचाळायचा.


गावाबाहेर दूर कुठेतरी उसाच्या फडात तंबू ठोकून राहिलेल्या त्याच्या टोळीत त्याला दुरून एखाद्या फटाक्याचा बारीकसा आवाज, लुकलूकणारा एखादा आकाशकंदील दिसायचा अन् त्या कडाक्याच्या थंडीत अंगावरच्या फाटक्या कपड्यानिशी बाहेर येऊन तो हा सण अधाशागत कानाडोळ्यांनी प्यायचा!...

घाटाघटा....!!


दिवसा ऊसाच्या चरबट पानांच्या सळसळीत त्याच्या पुस्तकाच्या पानांचा आवाज विरून जायचा.


भाऊबीजेदिवशी दुपारी मॅडमचा फोन अचानक किंचित चमकला, थरथरला...लगेच बंद झाला..

एखादी किंकाळी दाबावी तसा!


Unknown  number..


मॅडमने त्यावर फोन लावला. रिंग जाते न जाते, तोच फोन उचलला गेला.

एक मृदू, कोवळा,नाजूक, सच्चा पण दबका आवाज...

गुपचूप केला असावा ...


"मॅडम, मी माऊली!"


"बोल बाळा, कसा आहेस? कुठे आहेस? दिवाळीत आलास का इकडे?"


"मॅडम, आम्ही इकडं खूप लांब आलोत,मला ह्या गावाचं नाव माहीत नाही.सारखंच गाव बदलत जातोत आम्ही ऊसतोडीला!

मुकादम खूप कडक आहे."


"बरं..!

अरे, दिवाळी कशी झाली मग तुझी ?

नवा ड्रेस घेतलास ना? आईनं काय काय केलंय फराळाला?"


"न्हाई मॅडम,

मायजवळ पैशे न्हाईत भाजीचं समान आणायला.

चार दिवस झाले,आम्ही रानातली कच्ची पात खायलोत भाकरीसोबत.

कोरडा घास गिळतच न्हाई, पाणी पेत पेत जेवावं  लागतंय.

इथं मित्र पण नाहीत खेळायला.

नयन, अर्णव, रुपेशची खूप आठवण येते."


ओह! पराकोटीचं दारिद्र्य,दुःख बोलत होतं केविलवाण्या स्वरात!


"मॅडम, मला गणितातली वजाबाकी समजत नाहीय, सांगतात का समजून?"


"अरे, तिथं पण अभ्यास करतोयस की काय?"


"हो मॅडम, मी सगळी पुस्तकं आणलीत इथं.

बहिणी, माय कामावर गेल्या की मी अभ्यास करतो.वहीवरच्या तुमच्या सह्या बघून 

खूप आठवण येते तुमची. शाळा किती तारखेला भरणारये मॅडम?

आईला विचारलं तर लई खेकसती माझ्यावर!....

शाळेचं नुसतं नाव जरी काढलं तरी.

सारखं म्हणती..

'काय दिती रं तुझी ती शाळा?'"


आयुष्याचे कैक उत्सव, इच्छा वेळोवेळी वजा केलेल्या त्या शिष्याला गुरूने गणितातली वजाबाकी समजावून सांगितली.

त्याक्षणी ते ज्ञानही आधाशागत प्राशन करत  होते त्याचे कान.


संवाद संपला...


डोळे मिटून मॅडम विचार करू लागल्या...


'जगण्यासाठी आयुष्याच्या काही  अलिखित अटी गुपचूप मान्य केलेल्या असतात प्रत्येकानेच.


अश्वत्थाम्यासारख्या असंख्य जखमा आजन्म मिरवत असतात काही जीव!

पोटातली भुसभुशीत दलदल भुकेच्याही बाहेर एक जग असतं हे विसरून जायला भाग पाडते.


सादळलेल्या परिस्थितीचे ओले पापुद्रे सोलण्यात उभा जन्म जातो...अस्तित्वावर बुरशी चढवत!


अस्तित्वहीन जन्माची ठणकही जाणवू देत नाही ती भूक.


प्रगतीच्या गुरुत्वाकर्षणकक्षेच्या कोसो दूर हुंदडत उभं आयुष्य जातं अन् एक  दिवस अवेळी अंधार पांघरून निपचित निजतं.


खरंच... वास्तवाइतकं परखड, पारदर्शी काहीच नसतं... काहीच!


दीर्घ सुट्टीनंतर ,शाळा भरल्या.

वर्गावर्गात हजेरी सुरू झाली..

१.यश बनसोडे....यस मॅडम...!

२.अथर्व आवड...यस मॅडम...!

.

.

.

.

.

.

९.माऊली बडे   ........शांतता...!


त्याक्षणी त्याच्या डेस्कवरची ती रिकामी जागा खूप काही बोलत होती..!

त्याचा मंजुळ आवाज, उत्तर देण्यासाठीची धडपड..!


शाळा सुटली..

मुले लगबगीनं वर्गाबाहेर पडली..

मॅडम सामानाची आवराआवर करू लागल्या..

पर्स, टाचणवाही, हजेरी,पुस्तके, बॉटल....सगळं दोन हातांत घेणं....केवळ अशक्य!


तिथेही 'त्याची' आठवण आली..


तो नित्याने थांबायचा..

मॅडमला हे सगळं घेऊ लागायचा.

पाण्याची बॉटल हातात घेऊन सर्वांत शेवटी मॅडमसोबत वर्गाबाहेर  पडायचा.


पराकोटीची समज अन् माया असते एखाद्या माणसात!


शाळा सुटल्यावर मॅडम गाडीवर घरी निघाल्या.

तोच मागून कुणीतरी


"मॅडम sss .."


हाक मारली.

गाडी थांबवून मागे पाहिलं तर एक छोटी मुलगी पळत आली अन् म्हणाली,"तुम्हाला माऊली च्या आईनं बोलावलंय."


"त्या इथं कसं काय?

कधी आले ते सगळे इकडे?"

म्हणेपर्यंत तर ती मुलगी पळूनही गेली...

आश्चर्य अन् आनंदही वाटला.

मनोमन  सुखावल्या मॅडम.


तशीच गाडी माऊलीच्या घराकडे वळवली.

रस्त्यावर मुलं खेळत होती..

"मॅडम,मॅडम"..

हाका मारत होती.

पण ह्या सगळ्यांत माऊली कुठेच दिसला नाही.

घरासमोर आल्या.

कुडाचं, पत्र्याचं घर ते!

दुरावस्था झालेलं..

सगळं भकास..ओसाड...


दाराआत डोकावलं तर..

भयाण शांतता....

त्या शांततेत घोंगावणाऱ्या माशांचा आवाज,

जवळच्या नाल्याची दुर्गंधी,

पावसाळ्यात गळणाऱ्या पत्र्यांच्या छिद्रांतून डोकावलेले, जागोजागी दारिद्र्याची लक्षणे दाखवणारे कवडसे..

मागच्या दाराबाहेर खाटेवर दारू पिऊन बेधुंदावस्थेत पसरलेला माऊलीचा बाप..


अन् कुठल्याशा कोपऱ्यात गुडघ्यांत तोंड खुपसून बसलेली माऊलीची आई!


आत जाताच.."माऊली" हाक मारली.


तोच त्या आईने छताकडे बघत मोठ्याने हंबरडा फोडला....."माऊली, तुझ्या मॅडम आल्यात रे! ये की लवकर!"


काळजात चर्रर्र झालं!

शंकेची पाल चुकचुकली,

पण नेमका अंदाज येईना!


तोच मागून आवाज आला,


"काय सांगावं मॅडम, माऊलीचा घात केला हीनं! मारून टाकलं ह्या बाईनं त्याला!"


भोवताली अगणित किंचाळ्या टाहो फोडत घिरट्या घालत असल्यागत झालं एकदम.


घरमालकीण मॅडमजवळ येत म्हणाली," मीच निरोप धाडला होता तुमाला बोलवायला.मॅडम,ही बया एकट्या माऊलीला घरी सोडून, पोरींला घेऊन कामावर गेली, जेवणाच्या सुट्टीत आली तर लेकराच्या तोंडाला फेस,अन् हातपाय खोडत होतं ते!


माऊलीला सर्प डसला वो,

 लेकरू तडपडुन मेलं!


त्याला नगं न्हेऊ म्हणलं होतं मी हिला..मी संबाळते म्हणलं होतं त्याला चार महिने!

पण हिला ईश्वास न्हाई! चार पोरीच्या पाठीवर झाल्यालं नवसाचं पोरगं म्हणून सोबत न्हेलं हीनं, आन काटा निगाला लेकराचा!

लई भांडून गेली होती ना ही तुमाला? मंग नीट संबाळायचं होतं की त्याला! "


तिचे शब्द मॅडमच्या कानात लाव्हा ओतल्यागत शिरत होते.पण मेंदू मात्र थंड पडत होता.

 कोरड्या ठक्क डोळ्यांतून रक्ताचे अश्रू तेवढे बाहेर पडायचे बाकी होते!

तरीही अवंढा गिळून जमिनीकडे खिळलेली नजर विचलित न होऊ देता मॅडमने विचारलं,

"दवाखान्यात नेलं नाही का लवकर?"


"इकडं यायला निगाली होती, पण मुकादमानं  येऊ दिलं न्हाई म्हणं.आधी घेतलेली 20,000 उचल दे म्हणला म्हणं !


तितंच कुण्या जाणत्याला दाखवलं म्हणं.

दोन दिवस तडपडत होतं म्हणं लेकरू.दवाखान्यात दाखवलं असतं तर हाती लागला असता मावल्या ! 


त्याला सदा एकच म्हणायची...

'काय देती रं मावल्या तुझी शाळा??'

त्याच्या वह्या पुस्तकावर राग राग करायची,म्हणून त्यानं जाताना कपड्याच्या घड्यात घालून न्हेली पुस्तकं!

अन् आता रडत बसलीय!"


म्हातारी घरमालकीण पोटतिडकीने बोलत होती.


छताकडं शून्यात नजर लावून ती आई बघत होती!

स्वतःच्या लेकराला वाचवू न शकल्याचा आरोप होत होता तिच्यावर!


त्याच्या शेवट


च्या पेपरमधील त्याचं देखणं अक्षर, आईच्या आडून बघत त्याने डोळ्यांनी केलेली आर्जवे, गुपचूप केलेल्या फोनमधील त्याचा दबका, पण सच्चा आवाज,सारं सारं चित्रफितीसारखं डोळ्यासमोरून जात होतं मॅडमच्या!


त्या माऊलीचं सांत्वन न करताच मॅडम उठून दाराकडे चालू लागल्या.

पाषाण हृदयाने, निःशब्द...!


तोच मागून आवाज आला,


"मॅडम......

पाच भुकेली तोंडं पोसण्यापलीकडं काहीच करू शकले नाही मी उभ्या जन्मात!

मावल्या असा सोडून जाईल,असं स्वप्नात देखील वाटलं नव्हतं!

लेकरानं तडपडत माझ्या डोळ्यात बघत,माझ्या मांडीवर जीव सोडला.


त्याची आठवण आली तर माझ्याकडं त्याचा साधा एक फोटो पण नाही, ह्याचं लै वाईट वाटायचं!


आज त्याचं सामान बघताना एक गोष्ट सापडली...


तुम्हाला मी म्हणलं होतं ना..

'तुमची शाळा काय देती म्हणून?'


माझ्या जन्माला पुरंल आशी, त्याची सगळ्यात मोठी आठवण दिलीय मला तुमच्या शाळेनं!"


असं म्हणत तिनं छातीशी कवटाळलेल्या हाताच्या मुठीतला ऐवज उघडून मॅडमसमोर धरला...


शाळेनं दिलेलं 


ओळखपत्र होतं ते.....!

तिच्या काळजाचं!

मातीआड झालेल्या एका हसऱ्या, समंजस दुःखाचं!


(शिक्षक म्हणून भोगलेला अनुभव आहे हा!

...दुर्दैवाने...😢

पात्रांची नावं  बदलली आहेत.🙏

आजही तितक्याच तीव्रतेने आठवण येते त्याची..!🙏)

 

~©संध्या सोळंके-शिंदे,

     अंबाजोगाई 


~संकलन

Friday, 9 December 2022

गुरुचरित्र काय शिकविते ?

गुरुचरित्र काय शिकविते ?

कितीक सरले कितीक उरले,

आयुष्याला मोजु नका.

मस्त जगूया आनंदाने,

मंत्र मुळी हा सोडू नका.

ॐ श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः !!

नाही पटले काही जरीही

उगाच क्रोधीत होऊ नका.

व्यक्ती तितक्या विचारधारा, 

मंत्र मुळी हा सोडू नका.

 ॐ श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः !!


योग्य अयोग्य चूक बरोबर,

मोजमाप हे लावू नका.

विवेक बुद्धि प्रत्येकाला,

मंत्र मुळी हा सोडू नका.

ॐ श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः !!


सुख दुःख हे पुण्य पाप ते,

दैव भोग हे तोलू नका.

कर्म फळाच्या सिद्धांताचा,

मंत्र मुळी हा सोडू नका.

ॐ श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः !!


खाण्या बाबत हट्टी आग्रही,

कधी कुठेही राहू नका.

खाऊ मोजके राहू निरोगी,

मंत्र मुळी हा सोडू नका.

ॐ श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः !!


संस्कारांचे मोती उधळले,

पैसा शिल्लक ठेवू नका.

पैसा करतो आपले परके,

मंत्र मुळी हा सोडू नका.

ॐ श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः !!


मत आपले,विचार,सल्ला,

विचारल्या विण देऊ नका.

मान आपला आपण राखा,

मंत्र मुळी हा सोडू नका.

ॐ श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः !!


नित्यच पाळा वेळा, 

सर्व वेळी अवेळी जागू नका .

पैश्याहुनही अमूल्य वेळा,

मंत्र मुळी हा सोडू नका.

ॐ श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः !!


नाही बोलले कुणी तरीही,

वाईट वाटुन घेऊ नका.

मौन साधते सर्वार्थाला,

मंत्र मुळी हा सोडू नका.

ॐ श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः !!


जगलो केवळ इतरांसाठी,

कुठेच आता गुंतू नका.

फक्त जगुया आपल्यासाठी,

मंत्र मुळी हा सोडू नका.

ॐ श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः !!


जाणा कारण या जन्माचे,

वेळ व्यर्थ हा घालू नका.

श्वासोश्वासी नामच घ्यावे,

मंत्र मुळी हा सोडू नका.

ॐ श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः !!

🌹🙏जय सदगुरु🙏🌹













~संकलन

Thursday, 17 November 2022

काय असते गिरनार वारी....?

 🌹 " काय असते गिरनार वारी....?"🌹

नेहमी गिरनार जायचे म्हटले की काही जण म्हणतात काय वेड लागले की काय दर 2 महिने झाले की गिरनार ला पळतोस!!!!!...     

हो आमच्या भाषेत वेडच ते आणि आम्ही तेच वेडे आहोत... नाहीतर तुम्ही शहाणे तिथे जालच कश्याला? बरोबर ना?   कारण...(वेळेला वेडेच उपयोगी येतात आणि शहाणे पळून जातात) 

काय मिळतं तिथे सारखं जाऊन?  काम धंदे सोडून पळतात तिकडे ते... 

अस काय आहे गिरनार?

अहो काम धंदे सोडून कोणी जात नाही तर आमच्या गिरनारी साठी वेळ काढून जातो दर्शनासाठी... जिथे प्रत्येक पायरी चढतांना चांगली, वाईट केलेली कर्म आठवतात ना ते आहे गिरनार...


 तिथे गेल्यावर आठवतं व चांगली बुद्धी जागृत होते ते आहे गिरनार... 

       जीवनातली सगळी दुःख विसरून, रोजची घरातली,बाहेरची कटकट विसरून 5 दिवस जो सुखाने जगतो ना, जिथे सुख,समाधान मिळतं ना ते आहे गिरनार... 

भक्तीमय वातावरणात राहून जो आनंद मिळतो ना ते आहे गिरनार...

श्रीमंत,गरीब जिथे एकत्र येतात ना ते आहे गिरनार...

      सगळ्या सुख दुःखांची जिथे बेरीज वजाबाकी करून सुद्धा शिल्लक काही राहत नसेल, तरी सुध्दा काहीतरी मिळतं ते आहे गिरनार....

        आरोग्याच्या तक्रारी, नोकरीत बढती, व्यवसायात वाढ, मुलांची शिक्षणं, लग्न, घरदार सगळं काही मनासारखे होते जिथे गेल्यावर ते म्हणजे गिरनार.... 

       ढोपरं दुखतात,दम लागतो, तरी सुद्धा एक एक पायरी चढून जाण्याची इच्छाशक्ती जिथे वाढते, ते म्हणजे गिरनार...

        जिथे भल्या भल्यांची परीक्षा घेतली जाते, अहंकार जिथे गळून पडतो, व मग अक्कल ठिकाणावर येते अपराधाची केल्याची जिथे जाणीव होते ते गिरनार...

         असे हे आमच्या गिरनारी महाराजांचे गिरनार... आणि तुम्ही म्हणता काय मिळतं तिथे सारखं सारखं जाऊन गिरनार... 

         माहेर वाशीण जशी माहेराला येते व तिला जो आनंद होतो ना आल्यावर व निघतांना पाय निघत नाही, तसच आमचं हे गिरनार...

        हे सर्व वाचून ज्याचे मन म्हणते बरोबर आहे, व ज्याच्या डोळ्यात आपसूक पाणी येते ना ते हे गिरनार...

          हे सर्व तुम्हाला नाही समजणार कारण तुम्ही तर या संसाराच्या मोह-माया पासून सुटुच शकत नाही,आणि महाराजांच्या जवळ जाण्याची बुद्धीच होणार नाही, तो पर्यंत समजणार नाही काय आहे गिरनार... 

  तर अस आहे गिरनार...          

   जय गिरनारी

|| अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त ||


श्रीकांत कापसे पाटील...©✍️









-संकलन

Wednesday, 2 November 2022

सहज वाचलं म्हणून...
















सहज वाचलं म्हणून...
दिवाळी अंक,एखादं मासिक अथवा पुस्तक नजरेस पडेल असं घरात ठेवलेलं असेल तर सहज ते चाळलं जातं अन् ते त्यामुळे वाचलंही जातं. त्यातूनच वाचनाची गोडी वाढतं जाते. प्रत्येक पुस्तकात काही संदर्भ असतात त्या अनुशंगाने वाचू आनंदेची अनुभूती येते. छात्र प्रबोधन हे मासिक वाचतांनाही असंच झालं. वाचता वाचता Flashback मध्ये गेलो. परीक्षेच्या कालावधीत कु.जैनब तडवी (आमच्या विद्यालयातील श्री.जावेद तडवी सर यांची कन्या)अभिवाचन छान करते,अक्षर सुंदर, हुशार अशी अनेक विशेषणं तिला लावावी अशी गुणी विद्यार्थिनी. 
ही मला भेटली. म्हणाली,"सर, तुमच्याकडे जी.ए. कुलकर्णी यांचं 'कुसुमगुंजा' हे पुस्तक आहे का?" माझ्या संग्रही ते पुस्तक नव्हतं पण पुस्तकाबद्दलचं तिचं कुतुहल मला आनंद देऊन गेलं. खरंतर या गोष्टी खूप छोट्या असतात, नित्याच्या असतात मात्र खूप मोठं समाधान आणि आनंद देऊन जातात. जैनब,तुझं वाचन व कुतुहल खूप आनंददायी होतं. साधना मासिकही तू पूर्ण  वाचलंस याचंही मला विशेष कौतुक वाटतं.त्याबद्दल मी तुझं, तुझे बाबा (जे चांगले वाचक आणि वक्ता आहेत),तुझी आई व कुटुंबियांचं अभिनंदन करतो.  अशीच वाचती आणि लिहिती रहा. वाचावी पुस्तके...राखावी अंतरे...समृद्ध व्हावे अंतरंगे...भाग्य येते तदनंतरे...😊👍 शुभेच्छांसह....भेटू या.


📘📚📖📋✍🏻

~ प्रसाद वैद्य



Tuesday, 1 November 2022

मनाचा धनवान "धनाजी जगदाळे"...मला १००० बक्षीस नको फक्त घरी जायला ७ रुपये द्या.

मनाचा धनवान "धनाजी जगदाळे"...मला १००० बक्षीस नको फक्त घरी जायला ७ रुपये द्या.

पिंगळी बु.ता.माण येथील धनाजी यशवंत जगदाळे  

(वय ५४) याचे हातावरचे पोट. 

रोज काम केल तर कुटूंब चालवणारा सर्वसामान्य व्यक्ती.

दहिवडी आठवडा बाजार झालेवर हा उशिरा दहिवडी स्टँडवर आला. समोर घरी जाण्यासाठी बस लागली होती. परंतु तिकिटासाठी ७ रुपये त्याच्याकडे नव्हते. 

गावातील ओळखीचा ही त्या दरम्यान तिथे दिसत नव्हते. एक गाडी सोडली दुसरी सोडली पण ओळखीची व्यक्ती कोणीच दिसेना. जायच कस हा विचार करत दिवसभर कंटाळलेला बिच्चारा धनाजी बसल्या जागेवर झोपून गेला. धनाजीला जाग आली तेव्हा अंधार पडला होता.

दरम्यान जो घरी जाण्यासाठी ७ रूपयांसाठी कोणाची तरी वाट पहात होता त्याच्याजवळ ४० हजार रुपयेचा बंडल पडलेला दिसला. आपण ७ रूपये मिळतायत का बघत होतो पण आतातर ४० हजार रूपये सापडेलत.

 चला निघून जावू ,आता गाडी भाडयाने करून जावू ,दिवाळी चांगली साजरी होईल असा किंचितही विचार धनाजीच्या मनात आला नाही. धनाजीने आजूबाजूच्या सर्वाना तुमचे पैसे पडलेत का अशी विचारणा सुरू केली. कोणच काहीच बोलत नव्हते. शेवटी तो शोधाशोध करून स्टँड पोलीस चौकीजवळ पोलीसांची वाट पहात बसला.

खूप वेळाने एक गृहस्थ स्टँडवर आले व बसलेल्या ठिकाणी आपले पैसे शोधू लागले, तेव्हा काही प्रवाशांनी आताच एक उंचीला कमी असलेला माणूस कुणाचे पैसे पडलेत का विचारत असल्याची त्यांना कल्पना दिली. त्यांनी बसस्टँड पालथे घातले तेव्हा स्टँड पोलीस चौकीजवळ धनाजी पोलिसांची वाट पाहत बसलेला दिसून आले. त्यांनी धनाजीला पैसे हरवल्याचे सांगताच धनाजी बोलला किती रक्कम आहे ,नोटा कशा होत्या असे प्रश्न करीत ज्याचे आहेत त्यालाच पैसे मिळावेत यासाठी सर्व चौकशी करून घेतली. त्यावर ते ४० हजार रूपये आहेत .पत्नीचे ऑपेरशन आहे त्यासाठी पैसे घेऊन निघालो होतो. गाडी न मिळाल्याने बाकावर बसून होतो तेव्हा खिशातून पडले असे त्याने सांगितले.

 धनाजीने ते पैसे काढून देताच हाच आपला पैशांचा बंडल म्हणून त्या व्यक्तीचे डोळे पाणावले. बायकोचे ऑपरेशन कसे करायचे हा त्यांना पडलेला प्रश्न आता सुटणार होता. त्याने बक्षीस म्हणून त्या बंडलातील एक हजार रूपये काढून धनाजीला देवू केले. पण मनाने धनवान असलेला धनाजी ते बक्षीस घेईना. मला काहीही बक्षीस नको तुमचे पैसे तुम्हाला मिळाले. आता तुम्ही तुमच्या बायकोचे ऑपरेशन करू शकता यात मला सर्व काही मिळाले.

तरीही त्या व्यक्तीने खूप आग्रह केल्यावर धनाजीने एकच वाक्य सांगितले की ,ते १ हजार त्याच बंडलात ठेवा. घरी जाण्यासाठी माझ्याकडे ७ रूपये नाहीत म्हणून मी स्टँडवरच पडून राहिलो. मला फक्त घरी जाण्यासाठी  ७ रुपये द्या. धनाजीचा प्रामाणिक आणि भाबडेपणामुळे माणसाच्या डोळ्यातून पाणी आले.

ज्याला ४० हजार रूपये सापडूनही फक्त ७ रुपये प्रवासासाठी बक्षीस रूपाने घेणार हा देवदूतच म्हणावे लागेल ना.

परिस्थिती अनैकांना वाईट मार्गाने जायला लावते. पण चांगले काम करत परिस्थितीचा सामना करणारेही धनाजीसारखे धनवान व्यक्ती दिसून येतात. त्याच्या या कार्यामुळे धनाजी जगदाळेचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

अनेक लोक पैसा संपत्तीने श्रीमंत असतात पण मनाची श्रीमंती असणारा गरीब धनाजी माझ्याच शेजारी बसून ही वस्तुस्तिथी सांगताना माझ्याही डोळ्यात अश्रू आले. विश्वाची निर्मिती करताना परमेश्वर असे ही देवदूत पृथ्वीवर पाठवतो याची प्रचिती आली. 

- राजेंद्र जगदाळे  (सर) पिंगळी बु.ता.माण. 


~संकलन -प्रसाद वैद्य

Friday, 21 October 2022

कु. लीना नितीन सोनवणे (इ.१० वी) हीच बोलकं शुभेच्छापत्र - खरंतर माझ्यासाठी 'रिटर्न गिफ्ट...'


कु. लीना नितीन सोनवणे (इ.१० वी) हीच बोलकं शुभेच्छापत्र - खरंतर माझ्यासाठी 'रिटर्न गिफ्ट...'

आदरणीय सर,               
तुम्हालाही दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏😊 
सर दिवाळीत अनेक गोष्टींचं वाट पहाणं असतं आणि त्यातील एक म्हणजे तुमच्या शुभेच्छा पत्रांचं. सर तुमच्या अनेक उपक्रमांमधील हा एक आगळावेगळा उपक्रम आहे, ज्यात  तुम्ही आम्हांला शुभेच्छांबरोबर मोलाचा संदेशही देतात. गेली दोन वर्षे लॉक डाऊनमुळे तुमची शुभेच्छापत्र प्रत्यक्ष आमच्या पर्यंत पोहोचली नाहीत, त्यामुळे या वर्षी ही उत्सुकता शिगेला पोहोचली होती आणि फाईनली शेवटच्या दिवशी पत्रे मिळाली आणि आम्हांला खुप आनंद झाला कारण हे आमचं शाळेतील शेवटचं वर्ष आहे त्यामुळे हे आमचं शाळेतील शेवटचं दिवाळी शुभेच्छा पत्र म्हणायला हरकत नाही. सर मी ही पत्रे कायम माझ्या संग्रही ठेवेल. आपल्या शाळेतील अश्या उपक्रमांमधून नेहमीचं आम्हांला काहीतरी नवीन करण्याची प्रेरणा मिळत असते. पुन्हा तुम्हांला, पुनम टिचराना आणि माझ्या दोघही लहान बहीणींना ( मनू , निर्मिती) दिवाळीच्या शुभेच्छा 💐🪔🎊 

_________________________________________________________

कु. लीना,😊
"शाश्वत शुभेच्छाच माणसाला या जन्मात तसंच पुढील जन्मातदेखील  उपयोगी पडतात...बाकी सारं नश्वर आहे." या विचारावर माझा अभंग विश्वास आहे.  त्यामुळेच मनात आलेल्या चांगल्या विचाराला पटकन कृतीची जोड देऊन मोकळं होणं मला आवडतं. यामुळेच मला मोठ्या लेखकांची पत्रोत्तरं येण्याचं आणि काहींची भेट घेण्याचं भाग्य लाभलं हे नमूद करतांना विशेष आनंद वाटतो. (मध्यंतरीच्या काळात यात सातत्य नाही राखता आलं याच वाईट वाटतं.)आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचीही  तुझ्यासारखी बोलकी पत्रं आलीयेत जो माझा आनंद द्विगुणीत करतात.  तुझ्या संग्रही ही सारी शुभेच्छापत्रं आहेत या गोष्टीचाही विशेष आनंद वाटला. या संग्रहात तुझे आई-बाबां,मावशी आणि कुटुंबियांचाही तुम्हां दोघींच्या संगोपनातील संस्कार दडलेला आहे हीदेखील जमेची बाजू आहे. याबद्दल मानसी हिच्याही इ.४थीतील काही बोलक्या आठवणी मला ऊर्जा देतात. पुनश्च तुम्हां सर्वांना दीपावलीच्या सस्नेह शुभेच्छा. (तू एक चांगली वाचक,उत्तम वक्ता,दर्दी श्रोता,उत्साही तबलावादक, सुजाण रसिक आहेस म्हणून तुझ्यासाठी यावर्षी शुभेच्छापत्रावर असलेल्या प्रार्थनेच्या अर्थाची लिंक Share करतोय. हा अर्थ अवश्य वाचावा. हीच प्रार्थना आमच्या वर्गात परिपाठाच्यावेळी आम्ही म्हणतो.)


शुभेच्छा भेटू या.
🌺🌸🌺🌸🌺 🏮🪔🪔🪔🪔🪔🪔📘📚📖📋✍🏻
~प्रसाद वैद्य व परिवार

Friday, 14 October 2022

Thanksgiving Day And Apology Day कृतज्ञता दिवस/क्षमायाचना दिवस

Thanksgiving Day And Apology Day 
कृतज्ञता दिवस व क्षमायाचना दिवस

           आमच्या 8वी ब या वर्गात गुरुवार हा दिवस कृतज्ञता दिवस आणि क्षमायाचना दिवस (Thursday As Thanksgiving And Apology Day) म्हणून आम्ही साजरा  करतो. दोन आठवड्यापूर्वी याचा एक छान, बोलका आणि अनपेक्षित अनुभव आला.गेल्या महिन्यात मातृमंदिर विश्वस्त संस्था,निगडी पुणे तर्फे आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचं पत्रक माझ्या WhatsApp Status ला ठेवलं होतं. या स्पर्धेत सहभागी व्हायचं मनात होतं परंतु काही कारणाने ते राहून गेलं. गुरुवारच्या पूर्वसंध्येला, 28 सप्टेंबरला माझे सन्मित्र विजय गोसावी सर (एक उपक्रमशील,रसिक, कार्यमग्न व होतकरु शिक्षक प्र.वि.मं.चोपडा) यांचा मेसेज आला.

"धन्यवाद सर...आपण निबंध स्पर्धेचे स्टेटस ठेवले....मी, माझ्या  विद्यार्थ्यांनी यात  सहभाग घेतला आणि तब्बल तीन बक्षीसं जिंकले." 

    हा अनपेक्षित आलेला संदेश मनाला सुखावून गेला. खरंतर हा संदेश तसा फक्त चार ओळींचा होता परंतु  १००० ते १२०० शब्दांत मी न लिहिलेल्या निबंधाचं समाधान आणि या संदेशाच्या माध्यमातून आपलाच प्रथम क्रमांक आल्याची अनुभूती हा कृतज्ञता

संदेश देऊन गेला. गोसावी सरांनी तृतीय क्रमांक मिळवल्याचा आनंद वाटलाच, पण विशेष म्हणजे तो मिळवल्यानंतर  'त्या' स्टेटसबद्दल आवर्जून धन्यवादचा संदेश पाठवणं याला जो मनाचा मोठेपणा असावा लागतो तो त्यांनी या छानश्या कृतीतून दाखवून दिला या गोष्टींचा विशेष आनंद आणि अभिमान वाटला. याच निमित्तं होता आलं याचं एक वेगळं समाधान लाभलं. It was a Return Gift of Thanksgiving Day. मनःपूर्वक अभिनंदन अन् धन्यवादसुद्धा, गोसावी सर.
~प्रसाद वैद्य 

Tuesday, 4 October 2022

दाद देणे...


  दाद देणे...

      मॆफल कधीच केवळ कलावंताची नसते! ती तितकीच असते रसिकाची! शुद्धमना रसिकाची! जो आपले हुद्दे,स्टेटस,मोठेपणा सगळं सगळं दारातच पादत्राणांसारखं उतरवून प्रेक्षागृहात प्रवेश करतो, एखाद्या चित्रकारानं आपला रंगमाखला कुंचला अलगद पाण्यात बुडवला की जशी रंगांची तरल वलयं पाण्यात मिसळू लागतात तसा तो मिसळू लागतो समोरच्या सुरांत,दृश्यांत,शब्दांत!! हे असं होण्यासाठी रक्तात लाल पांढ-या पेशींइतक्या हिरव्या पेशीही असाव्या लागतात तरच हे समर्पण असं अलगद इतक्या अनायास होतं. 

         माउलींनी म्हटल्याप्रमाणे ' घेणे दिजे एके, ऎसे आम्ही केले.' आनंद देणारा कोण आणि घेणारा कोण हे द्वॆतच संपले. ना देण्यात मोठेपणा ना घेण्यात कमीपणा...देणाराही मीच आणि घेणाराही मीच! इतकं सायुज्य होतं तेव्हा ती मॆफल केवळ मॆफल राहात नाही आनंदाचा एक डोह बनून जाते. अस्तित्वाच्या फक्त अलवार लहरी होऊन जातात आणि त्यावर कलावंत आणि कलासक्त दोघेही झुलत राहतात. कलावंत भरभरून बरसत राहतो आणि कलासक्त होत राहतो चिंब चिंब!! पुढून कला उधळत राहते आणि समोरून कृतज्ञता! 'दाद द्या अन् शुद्ध व्हा' असं त्याला सांगावंच लागत नाही आणि कलावंताला तशी अपेक्षाही करावी लागत नाही. 

 शांताबाई म्हणतात-

' माझे काव्य रसाळ रंजक असे, ठावे जरी मन्मना

द्या हो दाद अशी रसिकहो, का मी करू याचना?' 

जाईची वेल संध्याकाळी उमलते तेव्हा भ्रमरांना का आमंत्रण द्यावे लागते? मी म्हणते-  'दाद तो  नज़राना हॆ ,कोई खॆ़रात नहीं ।'

         मात्र कलावंताच्या हृदयात ही दाद मिसळली की त्याचा किनारा चिंब भिजतो. कष्टांची वाळू जणू विरघळून जाते,साधनेला सुगंध येऊ लागतो. त्याने त्या रंगमंचाच्या टीचभर जागेत किंवा वीतभर कागदावर आपला जीव ओतलेला असतो, झोकून दिलेलं असतं सर्वस्व! समोरच्या ओंजळी जर खुल्या नसतील,पसरलेल्या नसतील तर मग त्याचं हे बलिदान व्यर्थ जातं! तो मिटून जातो ,कुचंबून जातो. 

            असं होऊ नये ही जबाबदारी रसिकाची! गायकाची कणीदार तान संपतानाच आलेली ' क्या बात हॆ' ची दाद असो किंवा नाटक संपल्यावर प्रेक्षकांनी उभे राहून दिलेली मानवंदना असो किंवा आवडत्या कवीच्या ओळीनंतर ' सुंदर' अशी एखाद्या रसिकाने साधलेली सम, सर्कशीतल्या खेळाडूच्या चित्तथरारक कसरतीनंतर झालेला टाळ्यांचा कडकडाट किंवा मॆदानात आल्यावर होणारा ' सचिन.. सचिन' असा आपुलकीच्या नगा-यावर होणारा पुकारा असो.... या कणकण चांदण्यावरच कलावंत जगत असतो,फुलत असतो.

 ' सुंदरतेच्या सुमनांवरचे दव चुंबुनी घ्यावे 'अशी वृत्ती एकदा बनली की मग आयुष्यातल्या छोट्याछोट्या गोष्टीतल्या सुंदरतेचंही भान येतं आणि दाद देऊन कॊतुक करावंसं वाटू लागतं. हे करण्यात आपण समोरच्याला किती आनंद देतो आहोत याची सुतराम जाणीव नसते,तो अहंकारी अभिनिवेश नसतोच. सहजपणे एखाद्या उमलत्या फुलाला कुरवाळावे,एखाद्या गोंडस बालकाच्या गालावरून हात फिरवावा तितकी ही सहजकृती असते पण त्यामुळे समोरच्या व्यक्तीचे चार क्षण घमघमून जातात. कधीकधी अवतीभवतीच्या कुणाकुणाच्या मनावरही सुगंधाचे चार थेंब शिंपडले जातात आणि हा व्यवहार असा होतो, इतक्या सहज होतो,इतक्या अबोभाट होतो की जसे एखादे फूल विनासक्ती उमलावे.

       कधी ही दाद ' अशीच अमुची आई असती सुंदर रूपवती..' अशी खानदानी असते .कधी ' असा बालगंधर्व आता न होणे..' अशी काव्यात्म असते ,कधी ' आपके पाँव देखे, बहुत हसीन हॆं, इन्हें जमींपर मत उतारिए,मॆले हो जाएंगे.' अशी रूमानी असते तर कधी ' इक रात में दो-दो चाँद खिले' अशी अस्मानी असते.

             परवा अमेरिकेत एका मॉलमध्ये लिफ्टची वाट पाहात  थांबलो होतो. लेकीने व मी छान रंगसंगतीचा भारतीय पेहराव केला होता. लिफ्ट उघडली,आतून तीन चार अमेरिकन महिला बाहेर आल्या,एकजण व्हीलचेअर ढकलत होती. एक सुंदर, गोरीपान ,अशक्त मुलगी व्हीलचेअरमध्ये बसली होती.' बिच्चारी' अशी करुणा माझ्या मनात जागी व्हायच्या आतच ,लिफ्टबाहेर पडताना अचानक माझ्याकडे व सोनलकडे पाहात तिने म्हटले," your attire is so beautiful !! I like it! " मला अशी चकित,आनंदित, सुगंधित करून ती दूर निघूनही गेली. पण माझे काही तास खास  करून गेली.

          मला आठवतंय सिंगापूरच्या एका मत्स्यालयात गेलो होतो आम्ही.तिथल्या स्वच्छतागृहात जात असताना माझ्याबरोबर एक अत्यंत सुंदर वृद्धा आत जाताना मी पाहिली. 'कुदरत ने बनाया होगा,फुरसत से तुम्हें मेरी जान' असंच  म्हणावंसं वाटावं अशी सुंदर गुलाबी कांती, आटोपशीर बांधा,पांढरा शुभ्र ,चमकदार दाट बॉबकट आणि चेह-यावरचा समाधानी,प्रेमळ,गोड स्मितभाव!  बाहेर आल्यावर मी तिची वाट पाहात थांबले आणि ती आल्यावर तिला सामोरी होत म्हटलं," excuse me,but I must say you look so gorgeous, just like queen Elizabeth. " तिने माझ्याकडे निमिषभर अतीव आश्चर्याने पाहिले आणि मग ढगाबाहेर येऊन सूर्य उजळावा तसा तिचा चेहरा उजळला. सुंदरसे स्मित करत तिने माझे दोन्ही हात हातात धरले आणि  मला म्हणाली," good gratius! You are so beautifuly sensitive! Thank you dear,Thank you so much! Be like this for ever!!" आणि दिवसभर मलाच सुंदर झाल्यासारखे वाटत राहिलं तिला सुंदर म्हटल्यामुळे!!

           त्या दिवशी कोल्हापूरच्या ' ओपेल' होटेलमध्ये जेवायला गेलो तेव्हा दिवस मावळला होता. भुकेपेक्षा दमल्याची जाणीव सगळ्यांनाच अधिक प्रकर्षाने होत होती.टेबलावरच्या मेन्यूकार्डमध्ये 'दहीबुत्ती' हा पदार्थ वाचून मोगँबो एकदम खुशच हुआ. काही मिनिटातच समोर आलेली, मस्त हिरवीगार  कोथिंबीर पेरलेली,कढीपत्ता,लाल मिरची,जि-याचा तड़का ( वापरावेत कधीकधी अमराठी शब्द,पर्यायच नसतो त्या शब्दाच्या flavor ला  :)  ) मारलेली, दह्याचा अदबशीर आंबटपणा असलेली पांढरीशुभ्र दहीबुत्ती समोर आली आणि क्षुधेचा सुप्त राक्षसच जागा झाल्यासारखा ताव मारला. अहाहा!! अशी दहीबुत्ती मी ताउम्र चाखली नव्हती.अन्नदात्यासाठी पोटातून आलेली दाद ओठापर्यंत आली होती. पण त्याच्यापर्यंत पोहचवणार कशी? वेटरला विचारून पाहिले पण तो म्हणाला की शेफ सर आता फार बिझी आहेत म्हणून! मग काय करावे? त्याने दिलेल्या बिलाच्या पाठीमागेच लिहिले- शेफसाहेब तुम्ही बनवलेली चविष्ट दहीबुत्ती कोणत्याही पक्वान्नांना लाजवेल अशी! 'तेरे हात मुझे  दे दे ठाकुर!' असे म्हणावेसे वाटत आहे. धन्यवाद! ' टेबलावरचेच गुलाबाचे फूल आणि चिठ्ठी वेटरच्या हातात दिली नि म्हटले कृपया तुमच्या शेफसाहेबांना द्याल का? तो मान हलवून निघून गेल्यावर माझा लेक मला म्हणाला," तो खरंच त्यांना देईल तुझी चिठ्ठी असं वाटतंय तुला?" मी म्हटलं," त्याचा विचार मी करतच नाही, मी दाद दिली ,संपलं. पण ती दिली नसती तर मात्र त्या पाककलेवर अन्याय केल्यासारखं वाटत राहिलं असतं.त्या भावनेतून मुक्त झाले.मला छान वाटलं, बस्स्!"

             माझ्या क्लासच्या तपासलेल्या उत्तरपत्रिका वाटून झाल्या तेव्हा समोर बसलेल्या वॆष्णवी पाटीलचा ( तब्बल २० वर्षानंतरही तिचे नाव लक्षात आहे माझ्या,तिच्या असेल का?) पेपर मुलांना दाखवत तिला म्हटलं," वॆष्णवी,असा पेपर तुझ्याएवढी असताना मला लिहिता आला असेल असं नाही वाटत मला. " वॆष्णवी डोळे मोठ्ठे करून बघत राहिली माझ्याकडे,

मला हसूच आलं. क्लास संपला,मी घरात आले आणि फोनची बेल वाजली. डॉ॰ विद्युत पटेल यांचा मुलगा माझा विद्यार्थी होता. त्याच्या आईचा फोन होता. काही तक्रार असेल का अशा विचारात फोन घेतला. त्या म्हणाल्या," मॅडम आज क्लासमधून माझा मुलगा घरी आला आणि त्याने मला घडलेली गोष्ट सांगितली,

वॆष्णवीला तुम्ही जे बोललात ते सांगितलं आणि म्हणाला," एक टीचर असं कसं काय बोलू शकते? स्वतःकडे कमीपणा घेऊन? मी असं कधीच ऎकलं नाही. " त्या पुढे म्हणाल्या," मॅडम ,तुम्ही चांगल्या बिया पेरताय. मुलांची झाडे मजबूत होतील." मी चकित! वॆष्णवीच्या आईचा फोन असता तर मी एकवेळ समजू शकले असते,पण....! मग बरं वाटलं की जाता जाता घातलेलं पाणीही मुळाशी पोचतंय!

        बी.एड. चा पहिला दिवस! एकेक तास होत होता,नव्या नव्या प्राध्यापिकांची तोंड ओळख होत होती. मी वाट पाहात होते माझ्या आवडत्या मानसशास्त्राच्या तासाची. 

कोण प्राध्यापिका असतील,कशा शिकवणा-या असतील अशा विचारातच असतानाच एक प्राध्यापिका व्यासपीठावर येऊन उभ्या राहिल्या आणि स्वत:ची ओळख करून देत म्हणाल्या, "मी---. मी तुम्हाला मानस शास्त्र हा विषय शिकवणार आहे."

          माझा एकदम मूडच गेला. बुटक्याश्या,विरळ केसांचे पोनिटेल बांधलेल्या,खरबरीत चेह-याच्या या बाईंकडे माझा आवडता विषय असणार होता. नाराजीनेच मी थोडीशी मागे टेकून बसले. आणि हळूहळू पहाटेचा लालिमा पसरत पसरत सूर्याचं बिंब उजळत जावं तसा त्यांनी आपला विषय रंगवत नेला. तास संपला तेव्हा मनावर दाट पसरली होती ती त्यांच्या अनुपम अध्यापनकॊशल्याची मोहिनी! भारावल्यासारखी मी बाकाजवळून उठले आणि धावतच, बाहेर पडणा-या त्यांच्याजवळ गेले. माझा गळा भरून आला होता. पश्चात्तापाने की हृदयातल्या अननुभूत आनंदाने? मी लहानग्या मुलीसारखं हरखून म्हटलं," बाई,तुम्ही किती छान शिकवलंत..." आणि मला पुढे बोलवेच ना !  माझ्या भावना कळल्यासारख्या त्या छानशा हसल्या आणि माझ्या डोक्यावर हात ठेवून निघून गेल्या. मी परत वर्गात आले. आपल्याला इतका आनंद कशाचा झाला आहे याचा विचार करीत...!! 

दुस-यावर रंग उधळल्यावर तो आपल्यावरही उडावा आणि आपण त्यात माखून जावं असा प्रत्यय देणारी ही दाद आयुष्यात अनेकदा मला रंगवत राहिली. बघा ना,आज त्या रंगमाखल्या उत्तरीयांच्या घड्या तुमच्यापुढे उलगडतानाही माझी बोटं रंगलीच !!

  -संजीवनी बोकील



~संकलन- प्रसाद वैद्य

Sunday, 2 October 2022

एक वेगळी आरती

  एक वेगळी आरती 
पैंजणाचा नाद आला गोड कानी ग । 

उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग ।। धृ ।। 

पिवळी साडी पिवळी चोळी अंगी लेउनि । 

वैभवाचे सारे साज गळा घालूनी । 

कोल्हापूरची महालक्षुमी दारी आली ग । 

उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग ।। १ ।। 

हिरवा रंग अति खुलवी खुलावी सुंदर । 

हाती चुडा हिरवा भांगी लाल सिंदूर । 

जय भवानी तुळजापूरची दारी आली ग । 

उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग ।। २ ।। 

पाही वळूनी दारातुनी माय माउली । 

भक्तरक्षणा अष्टभुजा केली धरणी । 

सप्तशृंगीची देवी आली आता बाई ग । 

उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग ।। ३ ।। 

रूप हिचे ग लावण्याचे रंगे तांबुल । 

माहुरगडची रेणुका हि शालू हि लाल ।  

लेकिलाही बघण्या आली दारी माझ्या ग। 

उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग ।। ४ ।। 

माय माउली कुलस्वामिनी दारी आली ग। 

पाऊल दिसता लोटांगण दासी झाली ग । 

कालिका देवी अंबाबाई दारी आली ग । 

उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग ।। ५ ।। 

पैंजणाचा नाद आला गोड कानी ग ।

उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग ।। धृ ।।


~संकलन प्रसाद वैद्य 

Saturday, 1 October 2022

दिव्यत्वाची जेथे, प्रचिती तेथे कर माझे जुळती...

 

दिव्यत्वाची जेथे, प्रचिती तेथे कर माझे जुळती...

कुणाचं शिक्षण, पैसा, त्याची तत्कालीन परिस्थिती त्या माणसाची लायकी अथवा कार्यक्षमता ठरवू शकत नाही. 

कारण तुमच्या प्रतिभेला प्रयत्न आणि कार्यनिष्ठेची साथ मिळाली की तुमची किर्ती जगभरात पसरते आणि लोकांच्या करतल ध्वनींचे सूर तुमच्या कानांवर यायला लागतात.

अशाच एका तरूण मुलाने पैस्यांची गरज म्हणून अगदी उदबत्त्या विकण्याचा सुद्धा व्यवसाय करून बघितला. असे अनेक छोटे-मोठे व्यवसाय केले.परंतु तुमच्यात कौशल्य असेल तर ते लपत नाही असं म्हणतात आणि लपवुही नाही, वर सांगितल्याप्रमाणे त्याला प्रयत्नांची जोड द्यावी. 

'तू सिनेमात जा' हे औंधच्या राजांचे शब्द ऐकून, तो तरूण मॅट्रिक पास होत नाही म्हणून सिनेमात गेला. अर्थात तो सिने सृष्टीत आपलं आयुष्य घडवायलाच गेला होता; पण तिकडे जाऊन त्याने स्वतःचं तर सोडाच, अनेकांची आयुष्य घडवली, बदलली सुद्धा. असीम प्रतिभेचा धनी असलेला तो तरुण संपूर्ण भारतात आपला ठसा उमटवून गेला आणि भारत सरकारने त्याच्या योगदानाबद्दल त्याला पद्मश्री पुरस्कार देऊन त्याचा गौरव सुद्धा केला.

अनेक पिढ्या येतील जातील परंतु ग.दि.माडगूळकरांच्या उंचीवर पोहोचेल असा कुणी होईल असं वाटत नाही. गदिमा एकमेवाद्वितीय होते. आज हे लिहिण्याचं कारण असं की, १ ऑक्टोबर म्हणजे गदिमांचा जन्मदिवस. 

गदिमांबद्दल अनेक गोष्टी आपल्याला माहीती असतीलच परंतु आज त्यांचा एक अदभुत प्रचिती देणारा प्रसंग आठवला आणि गदिमा का श्रेष्ठ होते ते परत एकदा डोळ्यासमोरून गेलं. आपण प्रसंग बघू म्हणजे , प्रचिती काय असते त्याचा अनुभव येईल...

'गदिमां'चे एक मित्र त्यांना म्हणाले, (अर्थात ते उपहासात्मक होतं) "का हो , माडगूळकर तुम्ही इतक्या चांगल्या कविता करता, छान छान गाणी लिहिता , पण तुमच्या एकाही गीतामध्ये  "ळ" हा शब्द दिसून येत नाही. मग ह्यालाच का म्हणायचं प्रतिभावान ???" ( "ळ" ह्या शब्दाचे यमक जुळवण किती अवघड असतं हे एखादा कवीच सांगू शकेल )तेव्हा 'गदिमां'नी त्यांच्याकडे एक कागद मागितला आणि केवळ १५ ते २० मिनिटांमधे एक अजरामर गीत लिहून त्यांना दिलं, ह्या गीतामधे एकूण १२ ते १३ वेळेस "ळ" हा शब्द आलेला होता आणि ते गीत होतं -

घननीळा, लडिवाळा, झुलवू नको हिंदोळा,

सुटली वेणी, केस मोकळे,

धूळ उडाली भरले डोळे,

काजळ गाली सहज ओघळे,

या सार्‍याचा उद्या गोकुळी, होईल अर्थ निराळा. 

एखादा मनुष्य किती प्रतिभावंत असावा ? तर तो गदिमांसारखा असावा असं म्हणायला कुणाची हरकत नसावी. कारण हालाकीची आर्थिक परिस्थिती असतांना, शिक्षण कमी असतांना एकूण परिस्थिती कितीही विपरीत असली तरी , आपल्यातल्या "स्व"ची ओळख ज्याला होते, तो आपापल्या क्षेत्रातला गदिमा होतो. ह्याच "स्व" ओखळलेल्या आधुनिक वाल्मिकीचा आज जन्मदिवस. त्यांच्या जन्मदिनी त्यांचे स्मरण करून आपल्याला देखील आपल्या  'स्व'ची ओळख व्हावी ह्यासाठी 'गदिमां'सारखं आपण प्रयत्नशील रहावं हीच प्रभू रामचंद्रांचरणी प्रार्थना आणि गदिमांना विनम्र अभिवादन ...

- अनुप देशपांडे, पुणे

(सभासद, विश्व मराठी परिषद, पुणे)


~संकलन

प्रसाद वैद्य 

Tuesday, 6 September 2022

सुरू झाला त्या कंडक्टर चा शोध त्याला मिळणार आडीच एकर जमीन आणि सोने.

 सुरू झाला त्या कंडक्टर चा शोध त्याला मिळणार आडीच एकर जमीन आणि सोने.

मुंबई : रात्री बराच वेळ झाला होता. देवगडला (Devgad) जाणारी शेवटची बस (Bus) वेळ होऊनही सुटत नव्हती. बस स्थानक तसे संपूर्ण रिकामे झाले होते. दोन चार प्रवाशी ( Passenger ) इकडे तिकडे रेंगाळत होते. बसचे दहा बारा प्रवाशी मात्र तळमळ करीत होते की बस अजून का सुटत नाही.

तेवढयात एकाने निरोप आणला की बसचे एक चाक पंक्चर आहे. तो काढला की गाडी सुटेल. बरोबर दहा वाजता बस निघाली. जवळ जवळ सर्वच प्रवाशी देवगडला जाणारे होते.

एका हातात बोचके धरुन बसलेल्या म्हातारी जवळ मात्र जेव्हा वाहक तिकीट फाडण्यास आला तेव्हा रस्त्यावर कातवन फाटा असलेल्या आणि तेथून तीन चार किलोमीटर दूर असलेल्या गावाचे तिकिट मागू लागली.

बस वाहक विचारात पडला. या म्हातारीचे वय झालेले, एकटीच उतरणारी, पावसाळ्याची गर्द अंधारी रात्र ही म्हातारी घरी कशी पोहचेल?

तो थोडासा म्हातारीवर रागावलाच की, ‘तु एकटी, तुला नीट दिसत नाही, चालता येत नाही, एवढा उशीर का केला ? लवकर उजेडात निघून जायचे ना ?’

म्हातारीला नीट ऐकु पण येत नव्हते. काही तरी उत्तर तीने दिले. वाहकाने तिला त्या गावाचे तिकिट दिले व आपल्या स्थानावर येवुन बसला.

इतर प्रवाशी पेंगुळले होते. चालकाने दिवे बंद केले. वाहक मात्र म्हातारीचा विचार करीत होता. त्या फाट्यावर तर आपण तिला उतरुन देवू पण धड चालता न येणारी, व्यवस्थित रस्ता न दिसणारी ही म्हातारी तीन, चार किलोमीटर या पाणी पावसाच्या दिवसात घरी कशी पोहचेल ?

रस्ता खाचखळग्यांनी व खड्डांनी भरलेला, मध्ये एखादा नाला वाहत असेल तर ? कुत्रे किंवा एखादया प्राण्याने या म्हातारीवर एकटे पाहुन हल्ला केला तर ?

तेवढयात म्हातारी उतरणार होती त्या गावचा फाटा आला. वाहकाने घंटी वाजविली. चालकाने बस थांबविली.

वाहक उठला आजीबाईचे बोचके एका हातात व दुसऱ्या हातात तीचे बखोटे धरून तिला गाडीखाली उतरण्यास मदत केली. थोडा त्रागाही केला.

बाहेर डोळयांना काहीही दिसत नव्हते. त्याने ते बोचके डोक्यावर घेतले आणि म्हातारीचे परत बखोटे धरून चालायला लागला तो एकाच विचाराने की म्हातारीला एकटे न सोडता घरापर्यंत सुरक्षित घरी पोहचविणे.

म्हातारीलाही नवल वाटले. शक्य तेवढे ती ही त्याच्या पाऊलांबरोबर पाऊल टाकू लागली.

इकडे बस चालक व प्रवाशींची ‘दहा पंधरा मिनिटे झाली हा वाहक गेला कुठे ?’ अशी काव काव सुरु झाली. चालकाने बसखाली उतरुन बसला फेरी मारली की चक्कर वगैरे येवून पडला की काय ? नंतर त्याच्या लक्षात आले की तो त्या म्हातारीला सोडायला गेला असेल. संताप झाला त्याचा.

प्रवाशीही संताप करु लागले. अशा निर्जनस्थळी बस सोडुन हा निघून गेला. काही म्हणाले ‘चला हो, त्याला राहु द्या’ वगैरे वगैरे.

इकडे म्हातारीने त्या वाहकाला विचारले, ‘बा तुझे नांव काय रे ?’

तुला काय करायचे आजी माझ्या नांवाशी… मी महादू वेंगुर्लेकर.’

‘कोणत्या डेपोमध्ये आहे?’

वाहक- ‘मालवण.’

आजी – ‘मुलेबाळे?’

वाहक- ‘आहेत दोन.’

तेवढयात आजीचे पडक्या अवस्थेतील जीर्ण घर आले. दोन चार कुत्रे भुंकत पळाले. वाहकाला म्हातारीने कुलुपाची किल्ली दिली. त्याने कुलुप उघडुन दिले व तसाच धावत पळत बसच्या दिशेने माघारी पळाला.

ती म्हातारी त्या घरात व गांवात एकटी राहत होती. तिला जवळचे म्हणुन कोणीच नातेवाईक नव्हते. तिच्यावर प्रेम करणारे चौकशी करणारे काळजी करणारे असे कोणीही तीच्या आजुबाजुला फिरकत नसे.

ती ही फारशी मग कोणाच्या जवळ जात नसे. कोणी जवळ येण्याचा प्रयत्न केला की तीला वाटायचे, हा स्वार्थी आहे. याचा माझ्या इस्टेटवर डोळा आहे. ते वयोमानानुसार तिला वाटणे स्वाभाविक आणि सहजही होते.

गांवा लगतच ज्याला ग्रामीण भाषेत पांढरी म्हणतात तसे चार बिघा शेताचे तुकडे तिच्या मालकीचे होते. ते दरवर्षी कोणास तरी पेरण्यास देऊन त्या मोबदल्यात पैसे घेवुन आपला उदरनिर्वाह करायची.

असेच एक दिवस म्हातारी थोडी जास्तच आजारी पडली. तिने गांवचे सरपंच व ग्रामसेवक यांना बोलाविणे पाठविले. त्यांनाही म्हातारीने असे अचानक का बोलाविले म्हणुन नवल वाटले.

ते घरी आले.

म्हातारी उठून बसली व त्यांना म्हणाली, “दादा कागद काढा. हे दोन अडीच तोळे सोने, माझी पांढरी व हे घर महादू वेंगुर्लेकर, कंडक्टर, याच्या नावावर लिहुन द्या व हे वीस हजार रुपये जमविले आहेत त्यातुन मी मेल्यावर क्रियाकर्म करा. मी जास्त दिवस काही जगणार नाही”


सरपंच व ग्रामसेवक अबोल झाले. काय भानगड आहे, कोण हा महादू वेंगुर्लेकर कंडक्टर ? त्याला सर्व म्हातारी का देतेय ? असेल काही नाते असा विचार करून त्यांनी म्हातारीचा निरोप घेतला.

दोन तीन दिवसात म्हातारी वारली.

सरपंच व ग्रामसेवकाने तिच्या सांगितल्या प्रमाणे सर्व क्रियाकर्म पार पाडले. सर्व आटोपल्यावर मग त्यांनी महादू वेंगुर्लेकर कंडक्टरचा मालवण बस स्थानकावर शोध घेतला. त्याला भेटुन सर्व वृत्तांत सांगितला.

साधारण वर्षभरापूर्वीचाच बस मध्ये घडलेला प्रकार असल्यामुळे त्यालाही ते सारे आठविले. म्हातारीने त्याच्यासाठी केलेले ऐकुन तर त्याला रडूच कोसळले.

त्याने ती सर्व घटना सरपंच व ग्रामसेवकाला सांगितली. त्यांना नवलही व आनंदही वाटला. त्यांनी वाहकाला ठरल्या तारखेला त्या गांवी येण्याचे आमंत्रण दिले.


वाहक महादू वेंगुर्लेकर गावात आले तर शेकडो ग्रामस्थ जमलेले. सरपंचाने त्यांच्या गळ्यात फुलाचा हार घातला. वाजतगाजत त्याला गांवाच्या ग्रामपंचायत कार्यालयात नेले.

तेथे सर्वजन विराजमान झाल्यावर तो शेताचा व घराचा नावावर करण्याचा कागद व म्हातारीने दिलेले अडीच तोळे सोने त्याच्या समोर ठेवले.

महादू वेंगुर्लेकरच्या डोळ्यातुन अश्रुच्या धारा लागल्या.

मी केलेल्या एका छोटयाश्या मदतीची म्हातारी एवढी किंमत देवुन गेली. त्याला काहीच सुचत नव्हते.

बाजुलाच मुलांचा गलका त्याला ऐकु येत होता. त्याने विचारले, ‘येथे शेजारी हायस्कुल भरते का?’

सरपंचाने, ‘हो, शाळेला स्वतःची जागा व इमारत नाही. त्यामुळे कातवन ग्रामपंचायतीच्या मालकीच्या या तोडक्या मोडक्या खोल्यांमध्ये वर्ग भरतात.’ असे सांगितले.

वाहक म्हणाला,’का?गावठाणची जागा किंवा जवळपासच्या एखाद्या शेताचा तुकडा नाही का कोनी देत शाळेसाठी?’

सरपंच म्हणाले, ‘गांवठाणची जागा नाहीच व शेत देण्यास कोणीच तयार होत नाही.’

वाहक महादू वेंगुर्लेकर ताडकन खुर्चीवरुन उठले व टेबलावरील शेताचा कागद सरपंचाला देत म्हणाले, “हे घ्या शाळा बांधण्यासाठी शेत.

हे घर पण विक्री करा. त्यातून येणारे पैसे बांधकामाला वापरा आणि हे सोने हे विकून शाळेला छान दरवाजा बांधा व त्यावर म्हातारीचे सुंदर नांव टाका”

टाळ्यांचा कडकडाट झाला. सरपंच व ग्रामस्थ भारावुन गेले. “दरवाज्यालाच काय हायस्कुलला म्हातारीचे नांव देवू”

वाहक महादू वेंगुर्लेकर यांनी त्यांचे आभार मानुन निरोप घेतला. त्याच्या जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे सारा गाव बघतच राहिला.

झोळी फाटकी असुन सुद्धा गांवाचे सारे काही तो गांवालाच देवुन गेला होता व एक प्रकारे त्या म्हातारीच्या नावाला अमर करून गेला.

एखाद्याला केलेली छोटीमोठी मदत कधीही वाया जात नाही. त्याच्या काळजात ती घर करुन जाते. समोरचा कृतघ्न झाला तरी चालेल पण आपण मदत करण्याचा स्वभाव कधीच सोडू नका.

माणसाने माणसांशी माणुसकीने वागावे हे विस्मृतीत जाऊ नये म्हणून अशा पोस्ट परत परत एक मेकांना पाठवत राहू. पोस्ट आवडली तर पुढं पाठवा.

~अशोक नीळकंठ सोनवणे 

   चोपडा जि. जळगाव 

.

~संकलन -प्रसाद वैद्य 

Monday, 29 August 2022

पण थोडा उशीर झाला ६ वीच्या मराठी पाठावर एका शिक्षकाचा #अभिप्राय

 पण थोडा उशीर झाला ६ वीच्या मराठी पाठावर  एका शिक्षकाचा #अभिप्राय

🟣 पालघर 

................अन् माझा अख्खा वर्ग ढसाढसा रडला !

आदरणीय लेखक, 

श्रीयुत संदीप हरी नाझरे,

      आपणांस सस्नेह सप्रेम नमस्कार.

 पण थोडा उशीर झाला.....  हा तुम्ही लिहिलेला पाठ महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाने इयत्ता  ६ वीच्या मराठी बालभारती या विषयात सहाव्या अनुक्रमांकावर समावेशित केलेला आहे. त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन!

       माझ्या शाळेत मी इयत्ता सहावीचा वर्गशिक्षक आहे. मराठी विषयाचे अध्यापन करतो. दिनांक २५ ऑगस्ट २०२२ रोजी मी नित्याप्रमाणे अध्यापन करण्यासाठी माझ्या वर्गात प्रवेश केला. सगळी मुलं प्रसन्न चेहऱ्याने बसली होती. आज नवीन धडा शिकायला मिळणार म्हणून उत्साहात होती. साऱ्या वर्गावरून मी एक नजर फिरवली. सगळी मुलं-मुली मराठीचे पुस्तक काढून प्रसन्न मुद्रेने कधी माझ्याकडे पाहत होती तर कधी पुस्तकाकडे पाहत होती. नवीन धडा शिकवायचा म्हणून मी ही लगेचच हर्बटच्या पंचपदीने सुरुवात केली. विद्यार्थ्यांचे पूर्वज्ञान जागृत करावे म्हणून प्रस्तावना केली.

 सांगा मुलांनो, " देशाचे संरक्षण कोण करतात?"  एक मुखी उत्तर मिळाले,"  सैनिक!"  मी दुसरा प्रश्न विचारला,  "तुम्हांला शाळेत पाठवण्याची तयारी घरी कोणाकडून केली जाते?"  परत विद्यार्थ्यांनी एक मुखी उत्तर दिले, "आईकडून!" मग मी तिसरा प्रश्न विचारला ,"शाळेत तुम्ही उशिरा आल्यावर शिक्षकांना काय सांगता?" मुलं म्हणाली," सॉरी सर, .....पण आज थोडा उशीर झाला!" 

      .....तर मग आज आपण पण थोडा उशीर झाला हा सहावा पाठ शिकणार आहोत.  असे म्हटल्यावर सर्व मुलांनी सहावा पाठ , पुस्तकाचे पान नंबर २१ काढले. मी फलक लेखन केले.  मी तुमचा लेखक परिचय  वाचून आपल्याविषयी माहिती दिली. पाठाच्या पहिल्या परिच्छेदाचे प्रकट वाचन करून अर्थ स्पष्टीकरण द्यायला सुरुवात केली.

     पाठ संदर्भ: - कारगिल काश्मीर सरहद्दीवरील........ असं हे तिकडचे वर्णन ऐकताना सगळी मुलं भावविभोर झाली. तेथील आल्हाददायक नैसर्गिक वर्णन ऐकताना सगळी मुलं वर्गातच बसून मनाने मात्र  कारगिल सिमारेषेवर आणि कश्मीरला पोहोचली. तिथल्या सीमेवरील धगधगत्या तणावपूर्ण वातावरणाचे वर्णन ऐकताना सारे जण टक लावून माझ्याकडे पाहत होती. उन्हाळ्यातील तेथील अल्हाददायक वातावरण व वसुंधरेचे वर्णन ऐकताना सगळ्यांचे चेहरे सुखावत होती. 

        पाठ संदर्भ:- सैनिकांच्या बटालियनमध्ये पोस्टमन आठ- पंधरा दिवसांनी येत असे. ........ ही ओळ वाचल्यानंतर लगेचच मी खिशातला मोबाईल काढला. आणि youtube वर बॉर्डर चित्रपटातील 'संदेसे आते है' हे व्हिडिओ असलेले गाणे मोबाईलवर लावून मुलांना दाखवू लागलो.  सगळी मुलं हास्य मुद्रेने व आनंदाने गाणे ऐकू व पाहू लागले.  त्यातील व्हिडिओ पाहून त्यांना खूपच आनंद झाला. गाण्यातील भावार्थ आणि पाठातील आशय  समर्पकतेने परफेक्ट जुळला.  मुलांमध्ये हळूहळू जिज्ञासा वाढू लागली; की पाठामध्ये पुढे काय असेल ?  

     पाठ संदर्भ:- बायकोने पाठवलेलं आंतरदेशीय पत्र घेऊन मी बंकरकडे वळलो. पत्रावर तिच्या आसवांच्या सुकलेल्या डागांशिवाय काहीच लिहिलेलं नव्हतं. ...... यावर  स्पष्टीकरण देताना मला खूप अवघडल्यासारखे झाले होते. कारण तुम्ही तिथे म्हणता, " पत्रात तर काहीच लिहिलं नव्हतं. परंतु ते  बोलकं पत्र मी बराच वेळ वाचत बसलो होतो."  या  आपल्या वाक्यांनी सगळया विद्यार्थ्यांचे चेहरे अचंबित  झाले होते.  त्या वाक्यातील भावनांची साद मुलांना समजणे;  हे मात्र त्यांच्या भावनिक वलयाच्या सीमारेषापलीकडचे होते. मग मी सैनिक पत्नीच्या मनात आपल्या पतीबद्दल उचंबळून आलेल्या भावना पत्रात व्यक्त करीत असताना तिचे मन दाटून आले आणि डोळ्यात अश्रू धावून आले. म्हणून पुढे काही पत्रात लिहिता आले नाही. पत्नीच्या मनातील घालमेल....तो विरह...  असे वर्णन सांगताना बऱ्याच मुला- मुलींच्या डोळ्यात पाणी आले. खिन्न मनाने सगळेजण नाराज झाले. " ......पण तिला देशसेवेची जाणीव होती." असे मी मोठ्याने बोलताच सैनिक पत्नीच्या मनाभोवती घुटमळत असलेली सगळी मुलं भानावर आली.

     पाठ संदर्भ:-  सुखदेवने गावाकडचा सांगावा सांगितला. "संदीप, तुझ्या आईचं दुखणं वाढलं रे!" हे ऐकताच लेखकाच्या काळजात चर्रर्र झालं. त्यांच्या मनात भीती निर्माण होऊन धडधड सुरू झाली. लेखकाचा जीव घाबरा -घुबरा झाला. मन सैरभैर झालं. नि लेखकाच्या डोळ्यातून अश्रू होऊ लागले.  हे असे वर्णन करताना माझ्या वर्गातील सगळी मुलं शांत नि:स्तब्ध होऊन स्पष्टीकरण ऐकत होती. 

मी सुद्धा धडा शिकवण्यात रंगून गेलो होतो . एकपात्री अभिनयात घुसलो होतो. कधी लेखक... तर कधी लेखकाचा मित्र... तर कधी लेखकाची आई अशा भूमिकेत पाठातील आशयाचे वर्णन एकपात्रीने सादर करत होतो. पाठातील भावनिक प्रसंग ऐकताना वर्गातील सगळी मुलं -मुली आत्ता मात्र डोळ्याची पापणी देखील न हलवता माझ्या  शिकवण्याकडे टक लावून बघत होती. ऐकत होती.

      तर.... लेखक सैनिक आईच्या भेटीसाठी बॉर्डरवरून निघाला. तेथून त्याचा गावाकडे येण्याचा प्रवास सुरू झाला. प्रवासातील तगमगता..... बैचेनता..... ती अस्वस्थता.....आईची चिंता ......असं हे सगळं मनावर घेत तो मजल दरमजल करीत आपल्या गावच्या वेशीवर आला . पण अगदी काही थोड्या वेळापूर्वीच आपली आई हे जग सोडून गेली. हे लेखक सैनिकाला माहित नव्हते. गावातून पुढे -पुढे चालत असताना गावात स्मशान शांतता दिसत होती. प्रत्येक जण सैनिकाकडे कावराबावरा होऊन बघत होता. घरासमोर येताच ती लोकांची गर्दी पाहून सैनिकाने काहीतरी विपरीत घडल्याचं ताडलं. नि हातातल्या ट्रंका तिथेच सोडल्या. अन्  "आई$$$$$$  म्हणून हंबरडा फोडत  धावत घराकडे........ यातील वर्णनाचे  नाट्यीकरण करताना मी मुलांचे चेहरे वाचत होतो. न्याहाळत होतो. अक्षरक्ष: मुलांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या.  'माझं लेकरू आलं!'  "म्हणून मला बोलशील का गं आई ?" ही वाक्ये तुमच्या भावनिक अतिव दु:ख वेदनेने,  हावभावयुक्त आणि धीरगंभीर, दु:खी आकांत आवाजात मी बोलून दाखवल्यावर मात्र , इतका वेळ हुंदका आवरून बसलेली मुलं-मुली मात्र हुंदके देत- देत ढसाढसा रडू लागली. मुलं अक्षरक्ष: स्वतःलाच  विसरली होती . कसल्याच गोष्टीचे त्यांना भान नव्हते. सर्वजण पूर्णपणे पाठातील नायकाच्या भूमिकेत शिरले होते.  जसजसे वर्णन ऐकत होते ; तसतसे त्यांच्या डोळ्यापुढून ते चित्र हळूहळू सरकत होते. बाकावर बसलेल्या मुलांची  निच्छलता आपल्या आईच्या भेटीसाठी वेग धरू पाहत होती....

            मुलं शरीराने वर्गात बसली होती;  पण मनाने मात्र कारगिल-काश्मीर वरून लेखक सैनिकाच्या गावात आली होती .  गावातील एखाद्याचे निधन झाल्यावर त्या प्रसंगात गढून गेली होती . मुलांची अशी अवस्था झाली होती की,  हातापायाची अजिबात हालचाल होत नव्हती. ती 'आकडी आल्यागत आकडून' गेली होती.  सगळी मुलं मूर्ती-पुतळ्यागत बसून वाहणाऱ्या झर्यासारखं फक्त रडत होती. दाटून येणारा आवंढा गळ्यातल्या गळ्यात गिळत होती. ती पुन्हा- पुन्हा रडत होती.

   " भेटीसाठी आलो होतो गं आई!.... पण थोडा उशीर झाला!"  असे म्हणत लेखक मोठमोठयाने रडू लागली. या वर्णनातील नाट्यीकरणाने अख्या वर्ग हमसून- हमसून ढसाढसा रडू लागला. शिकवता - शिकवता माझ्याही डोळ्यात अश्रू आले. 

 पाठ संपला. म्हणून दोन मिनिटे मान खाली घालून मी शांत उभा होतो. सगळी मुलं रडत होती. थोड्या वेळानंतर एक मुलगी रडत -रडत मला म्हणाली , "सर, सैनिक येईपर्यंत त्यांची आई जिवंत राहायला पाहिजे होती." मी मात्र निशब्द झालो. थोड्या वेळानंतर एक मुलगा रडत- रडतच माझ्याजवळ आला नि मला म्हणाला, " सर, सैनिकाची आई हे जग सोडून गेली. आपण त्यांच्या आईला श्रद्धांजली वाहू या ना !" मलाही त्याचे म्हणणे पटले. मग मी लगेचच मुलांना धीरगंभीर सुरात हळव्या मनाने सूचना दिली. सर्व मुले २ मिनिटे उभे राहून सैनिकांच्या आईला श्रद्धांजली वाहिली. दोन्ही हात जोडून " ओम शांतीशांतीशांती.... म्हणत बाकावर बसली. पण......पण त्यांच्या डोळ्यातून अश्रू मात्र वाहतच राहिले होते .

माननीय संदीप नाझरे सर,

 पाठात सैनिकांच्या मनातील देशप्रेम व आईबद्दलची ओढ यातील भावविभोर करणारा प्रसंग चित्रित करून तुम्ही मुलांमध्ये देशप्रेम आणि आईबद्दलचा आदर द्विगुणित केलात. तशी प्रेमभावना वाढीस लावलात. हा पाठ शिकताना सगळी मुलं हळवी झाली होती. आपल्या पाठाशी समरस झाली होती. ती एकरूप झाली होती. मुलांना शिक्षा केल्यावर ती  रडतातच ...पण धडा शिकताना ती ढसाढसा रडतात. हा अध्ययन-अध्यापनातील जीवंत अनुभव मात्र पाठाची उद्दिष्टे साध्य करणारा ठरला. ६ वीच्या मराठी पाठ्यपुस्तकाच्या प्रारंभी पाठ्यपुस्तक मंडळाचे संचालक माननीय च.रा. बोरकर यांनी प्रस्तावनेत व्यक्त केलेले विचार, अनुभव कथन, क्षमता , उद्दिष्टे साध्य होताना मला प्रत्यक्षात अनुभवता आली. 

        आपली लेखन शैली खुपच सुंदर आहे. मार्मिक आहे. लेखणीच्या माध्यमातून थेट मुलांच्या ह्रदयाला हात घालण्याचे ओघवते कौशल्य खुपच वाखाणण्याजोगे आहे. पाषाण ह्यदयी काळजालाही पाझर फोडण्याची ताकद तुमच्या लेखणीत आहे. मुलांचे भावविश्व तरल व्हावे , ते अनुभवसंपन्न व्हावे. समृद्ध व्हावे. याकरिता तुम्ही केलेल्या लेखनाला मानाचा मुजरा ! 

आपले मनपूर्वक हार्दिक अभिनंदन💐 आणि आभार ! 🙏🏻

© - दर्शन भंडारे, सहाय्यक शिक्षक ,

प्राथमिक विद्यामंदिर भगिनी समाज , पालघर.

दिं २८ ऑगस्ट  २०२२ 

भ्रमणध्वनी: ८०८७१३७२३६.

~संकलन 

~प्रसाद वैद्य 

भ्रमणध्वनी -९४२०११२२१५

Friday, 26 August 2022

शुभेच्छा पत्र- टी.एम.चौधरी सर

वाढदिवसाच्या सस्नेह शुभेच्छा

रुग्णवत्सल चंदन हृदयी माऊली आणि समाजाची माया-ममतेची सावली असलेले आदरणीय डॉ.विकासकाका,

वाढदिवसानिमित्त आपले अगदी मनाच्या गाभाऱ्यातून खूप खूप अभिनंदन... आणि अभीष्टचिंतन...!

श्री.काकासाहेब,

आपण म्हणजे एक चाफ्याचे फूल की जे स्वर्गातून धन्वंतरी देवाच्या खांद्यावरून महाराष्ट्राच्या धुळीत पडले.वैद्यकीय व्यवसातील एक सुंदर अन् गोड स्वप्न आपण आहात.

रूग्णसेवेचे पाईक तुम्ही

परोपकारी आचार

रूग्णांचा आधार तुम्ही

सदा त्यांचाच विचार

मायेच्या स्पर्शात तुमच्या

ईश्वराचा साक्षात्कार

असं आपल्या संदर्भात म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही.

आधार दु:खितांचे होतात हाल ज्यांचे।

सेवेत धर्म आहे सेवेत तीर्थ आपुले।।

वैद्यकीय व्यवसायाला'सेवाधर्म' मानणारी बोटावर मोजता येतील अशी जी मंडळी आहेत.त्यांच्यात आपले स्थान अग्रणी,अव्वल आहे.जगायला संजीवनी देणारे 'देवमाणूस अन् देवदूत' आपण आहात.

"परमेश्वराने आम्हाला जन्म दिला पण काकांनी पुनर्जन्म दिला"

अशा भावपूर्ण शब्दांमध्ये आपल्या दवाखान्यातून औषधोपचार घेऊन पूर्ण बरे झालेले रुग्ण आपल्याप्रती व्यक्त करतात.हीच आपल्या रूग्णसेवेची खरी कमाई आहे.अनेकांना आयुष्यात स्वत:च्या पायावर उभं  राहण्याची असिम शक्ती देणारा'माणूस' म्हणूनही आपल्याला ओळखलं जातं.माणसाच्या मनातील शक्ती जागृत केली की कोणतंही असंभव काम शक्य होऊ शकतं.याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपण आहात.

सदैव प्रसन्न,हासरा चेहरा तसेच उत्साही, चैतन्यदायी,आनंदी,स्वानंदी आणि परमानंदी आपलं व्यक्तिमत्व रुग्ण पाहताच त्याचा अर्धा आजार, वेदना व दु:ख नाहीसं करतं.

स्व.श्रध्देय आदरणीय ज्ञानतपस्वी, शिक्षणतज्ज्ञ नानासाहेबांनी दिलेले संस्कार घेऊन वैद्यकीय व्यवसायात पदार्पण केले आणि ते संस्कार आजही आपण अलंकारासारखे मिरवित आहात.आपल्या सेवादायी विचारातून प्रेरणा घेऊन रूग्ण व समाजसेवेसाठी आपले चिरंजीव डॉ.विनितदादा आणि डॉ.अमितदादा पुढे आलेले आहेत.हा दिलासा आपणास कुठल्याही पुरस्कारापेक्षा अधिक मोलाचा वाटतो.आपल्या जीवनाचं ईप्सित साध्य झाल्याचं समाधान आपल्या चिरंजीवांकडे पाहिल्यावर आपल्याला नक्कीच मिळत असेल.

डॉ‌.विनितदादा आणि डॉ.अमितदादा खऱ्याअर्थाने'कोरोनायोध्दा' ठरले आहेत.त्यांनी कोरोना काळात देवासमान काम केले.आपलं हरताळकर हॉस्पिटल म्हणजे देव्हारा आणि त्या देव्हाऱ्यातले देव म्हणजे डॉ.विनितदादा आणि डॉ.अमितदादा.

कोरोना आटोक्यात आणणं हे मोठं दिव्य होते.अशाही परिस्थितीत हार न मानता जेव्हा जवळचे लोक दूर राहत होते तेव्हा कोरोना रूग्णांना जगविण्यासाठी आपल्या स्वत:च्या जीवाची पर्वा न करता हे आपले डॉक्टर्स बंधूद्वय धडपडत होते.अहोरात्र झटून आपल्या सामाजिक दातृत्वाच्या भावनेचे व माणूसकीचे दर्शन त्यांनी घडविले.रूग्णांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहून रूग्णांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना खचू न देता त्यांना धैर्य, स्थैर्य देण्याचं महान कार्य केले.यांची कामगिरी नक्कीच देवदूतापेक्षा कमी नाही, हे मात्र निर्विवाद...!

आदरणीय श्री.काकासाहेब आपण 'त्रिदेव' खरोखरच आदर्श रूग्ण व समाजसेवेचे प्रतीक आहात.आपल्या सेवामय कार्यास आमचा मानाचा त्रिवार मुजरा अन् कडक सलाम...!

पर्वत असतील अनेक

पण हिमालय ही शान आहे

वृक्ष असतील अनेक

पण चंदनाला मान आहे

खूप भेटले डॉक्टर्स पण...

आमच्या जीवनात, ह्रदयात काकासाहेब, आपणास आणि आपल्या हरताळकर परिवारास आदराचं अढळ स्थान आहे.

आपल्याला सेवामय कार्य करण्यासाठी निरामय उदंड दीर्घायुष्य लाभो.हीच ईश्वर चरणी अत्यंत मनापासून मनापर्यंत मनभरून प्रार्थना...!

प्रकटदिनाच्या अनेकोत्तम अनंत आभाळभर शुभेच्छा...

द्वारा- टी.एम.चौधरी सर

~संकलन-प्रसाद वैद्य