केंगे सर,एक शिक्षणसाधक हरपला...
:- राधेश्याम पाटील (9960068747)
'देखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती'... या बा. भ. बोरकरांच्या पंक्ती ज्यांच्यासाठी समर्पक वाटतात ते सुधाकर काशिनाथ केंगे अर्थातच केंगे सर.आज निवर्तले. यावर अजूनही विश्वास बसत नाही. खानं - पिनं,बोलनं मोजून मापून करणार हे लाघवी व्यक्तिमत्व होतं. मला कोणी प्रताप विद्यामंदिर चे मुख्याध्यापक, राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक, विवेकानंद विद्यालयाचे विश्वस्त यापेक्षा फक्त केंगे सर म्हणून लोक मला ओळखतात हीच माझ्यासाठी आनंदाची बाब आहे, एवढा सहृदयी होता हा माणुस.
श्यामची आई मधला शामच त्यांचा राम होता, म्हणून साने गुरुजींचं त्यांना खूप अप्रूप होतं. लहानपणापासून मातृहृदयी
साने गुरुजींचा संस्कार त्यांच्यावर झाल्याने तेही पुढे मातृहृदयीच झाले. साने
गुरुजींच्या स्फूर्तीदायी गीतांनी त्याच्यात राष्ट्रभक्ती, राष्ट्रनिष्ठा व कर्तव्यनिष्ठा निर्माण केली व ती त्यांनी पुढे जपलीही.
साने गुरुजींचा संस्कार घेऊन मोठं झालेलं हे व्यक्तिमत्व ; साने
गुरुजींचाच वसा घेऊन
शिक्षणगंगेचे वारकरी झाले. त्यांचे मामा स्वर्गीय नानासाहेब य.गो. हरताळकर
यांच्यामुळे ते चोपडा येथे आले आणि प्रताप विद्या मंदिर येथे गणिताचे शिक्षक
म्हणून रुजू झाले. गणित विज्ञान हे त्यांच्या आवडीचे विषय. अध्यापक म्हणून काही
वर्षे काम केल्यानंतर तेही मामांप्रमाणे मुख्याध्यापक झाले. तेव्हाच त्यांना राज्य
शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला. पुरस्कार तसा त्यांनी गुंडाळून ठेवून
दिला. कुठलेही मान-सन्मान मान-अपमान च्या भानगडीत न पडता ते आपलं
सेवानिवृत्तीनंतरच आयुष्य जगले. दरम्यान आपणही एखादं रोपटं लावाव असा विचार
त्यांच्या मनात आला आणि त्याला मूर्त स्वरूप डॉक्टर विकासकाका व डॉक्टर विजयकाका
यांच्या माध्यमातून आलं. तुम्ही समाजकार्य करता मग एखादी शाळा का नाही काढत? या आग्रहाखातर बालसंस्कार वर्ग सुरू झाला आणि
या नविनतम शाळेच्या मंगलाबाई सावित्रीबाई झाल्या आणि
केंगे सर ज्योतिबा
त्यांच्याच अर्घ्यदानाने विवेकानंद विद्यालय ही गुणवत्ता पूर्ण शिक्षण देणारी शाळा
ही ओळख निर्माण झाली. यातच त्यांना खूप आनंद होता. ते या शाळेचे पहिले
मुख्याध्यापक झाले.
कधी एकेकाळी शिक्षक म्हणून काम करत असताना असे
अनेक विद्यार्थी त्यांच्या हाताखालून गेले जे आज मोठ्या पदावर कार्यरत आहेत.
माननीय प्रा.अरुणभाई हे त्यांतले अग्रणी. त्यांच्या घरी चालणाऱ्या शिकवणी वर्गातून
अनेक मुले घडली, ज्यांनी त्यांच्यातला
हाडाच्या शिक्षक बघितला आहे.
सरांचा शिक्षण हा विषय आवडीचा, जिव्हाळ्याचा आणि आनंदाचाही होता. बालक
केंद्रित शिक्षण, आनंददायी शिक्षण, ज्ञानरचनावादी शिक्षण हे त्यांचे शैक्षणिक
विचार होत. विविध विषय घेऊन त्यांचे विचार रेडिओवर वर्तमानपत्रात विविध मासिकात
सदैव प्रकाशित होत राहिले. त्यातून त्यांचं शिक्षणवेड आपल्याला कळतं. लीलाताई, रेणूताई, रमेश पानसे, ज्ञान प्रबोधिनी यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे
संबंध राहिले. शिक्षण क्षेत्रात येऊ घातलेला नवा विचार ते लगेच चोपड्यासारख्या
ग्रामीण भागात पुण्याहून घेऊन येत असत. आणि पुढे असं होणार आहे, अस येणार आहे हे शाळेतल्या शिक्षकांना सांगून ठेवत असत. प्रताप विद्या
मंदिर ही माझी शाळा आहे म्हणून या शाळेवर त्यांचे विशेष प्रेम होतच पण विवेकानंद
वरही त्यांनी निस्सीम प्रेम केलं. वटवृक्षात रूपांतर होण्यासाठी एखाद्याला जमिनीत
गाळून घ्यावे लागतं त्यातले बीज म्हणजे केंगे सर.
आपले मामा नानासाहेब
हरताळकर यांच्या विषयी त्यांना आदर व प्रेम होता. मामांच्या प्रतिमेला कधी कसला
डाग लागता कामा नये याची त्यांनी नितांत काळजी घेतली. जे प्रेम मामांनी
त्यांच्यावर केलं त्या बदल्यात किंबहुना त्याहूनही अधिक प्रेम त्यांनी मामेभाऊ
डॉक्टर विकास काकांवर केलं. त्यांच्या दोन्ही मुलांवर डॉक्टर अमित व डॉक्टर विनीत
यांच्यावरही केलं, तद्वतच नातू नीलवरही खूप प्रेम केलं. आजही
मानस, स्वरा व नील यांची शिकवणी घेत असत.
एखाद्या कुठल्याही
बाबीचा मोह न बाळगता त्यापासून आपल्याला सहज बाजूला होता आलं पाहिजे, अस ते नेहमी सांगत. वाचनाचा त्यांनी ध्यास घेतला होता. पुस्तकासारखा दुसरा
मित्र नाही असं ते नेहमी म्हणत. अलीकडे अध्यात्मिक पुस्तकांचा वाचन त्यांचे सुरू
होतं. समवेत एखाद्याची गोष्ट त्यांना आवडली की लगेच ते त्यांना पत्र लिहून आपल्या
शुभेच्छा कळवित असत. त्यांचे हस्ताक्षर अगदी मोत्यासारखे होते. या वयातही त्यांचा
हात कधी लिहिताना थरथरला नाही. स्मरणशक्ती शाबूत होती. शिक्षण आणि फक्त शिक्षण हा एकच ध्यास
घेऊन केंगे सर शेवटपर्यंत जगले ते शिक्षणासाठीच. शिक्षण चिंतन परिषद ही याचेच
द्योतक होय. विवेकानंद नव्हे किंवा प्रताप नव्हे तर सबंध चोपडाचे शैक्षणिक वातावरण
हे चांगलं राहिलं पाहिजे, चांगलं झालं पाहिजे, अद्यावत झालं पाहिजे; यासाठी आग्रह धरणारा हा एक शिक्षण तपस्वी
होता. जो आज अनंतात विलीन होत आहे. त्यांच्या जाण्याने चोपडेकरांचा शैक्षणिक
मार्गदर्शक हरपला,असे म्हणणेही वावगे
ठरणार नाही. सरस्वतीच्या या उपासकाला स्वर्गात येतांना पाहून बुद्धीची देवता
गणपतीलाही आनंद होत असेल. कारण तेथेही हा माणूस गणिताचा एखादा शिकवणी वर्ग
निश्चितच चालविल यांत कुठलीही शंका नाही.
जेथे दिव्यत्वाची प्रचिती तेथे कर माझे जुळती
***
एका ज्ञानवृद्ध,तपोवृद्ध वयोवृद्ध शिक्षणमहर्षीअसलेल्या श्रद्धेय श्री केंगेसरांच्या दुःखद निधनाची बातमी कळली आणि मन सुन्न झाले. खूप वाईट वाटले. एक चालत्याबोलत्या ध्यासपर्वाचा अस्त झाला.सदैव प्रसन्न, हसतमुख,मनमिळावू अभ्यासु व्यक्तिमत्त्व हरपले. त्यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबीयांवर आणि आप्तेष्टांवर डॉ. हरताळकर कुटुंबावर कोसळलेल्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. सरांना भावपूर्ण श्रद्धांजली!!ईश्वर सरांच्या आत्म्याला चिरशांती देवो.ओम् शांतिःशांतिःशांतिः। प्रा. एस्.टी कुळकर्णी सौ.सुनेत्रा कुळकर्णी.
***
ललित शुक्ल: केंगे नामक ज्ञानपर्व हरपले...!!!
***
[20/02, 11:49 am] A.N.Sonawane Sir :
आदरणीय श्री.केंगे सरांच्या निधनाचे दुःखद वृत्त कळले आणि वाईट वाटले.
सर आम्हाला शिक्षक होते, मुख्याध्यापक होते आणि मार्गदर्शकही होते.
कौटुंबिक आणि शैक्षणिक पातळीवर ते सातत्याने विचारपूस करायचे.
तुमचा सध्याचा दिनक्रम काय? हा प्रश्न आता कोण आस्थेने विचारेल?
अभ्यासू, विचारवंत आणि चिकित्सापूर्ण शैक्षणिक विचारांसाठी स्व.केंगे सर सुपरिचित होते.
परमेश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरःशांती देवो हीच इश्वराला प्रार्थना.
त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ति परमेश्वर देवो!🌺
॥ ॐ शांती शांती शांती: ॥
***
[20/02, 12:57 pm] प्रा संदीप पाटील:
शैक्षणिक क्षेत्राला प्रकाशित करणारा नंदादीप विझला
भावपूर्ण श्रद्धांजली!
***💐💐💐💐
[20/02, 10:26 pm] प्राचार्य राजेंद्र महाजन सर:
आदरणीय केंगे सरांचे निधन वार्धक्याने जरी झाले असले तरी निव्वळ धक्कादायक आहे.
आजच्या काळात चरणस्पर्श व्हावे असे पाय दुर्मिळ झाले आहेत.आपण आपण माझ्यासाठी नेहमीच आदर्शवत होता.आपले कलासक्त बोलणे,कलेची ओढ मला आश्चर्यचकित करायची.आपण ज्ञानाचा सागर होता तितकेच सहृदयी व हळव्या मनाचे होता.अलिकडच्या बदललेल्या शिक्षणव्यवस्थेविषयी आपल्या मनात चीड होती,आपण संयत शब्दात माझ्याजवळ कधीकधी व्यक्त करायचात.
माझ्या सेवानिवृत्तीच्या दिवशी(३१जाने.२०२३) आपण प्रमुख अतिथी होता.तीन तास आपण माझे गुणगान समरसतेने ऐकत होता, तितकेच आपण माझ्या कार्यकर्तृत्वाविषयी भरभरुन बोललात.कार्यक्रम संपल्यावरही खूप वेळ माझा हात धरून जुन्या आठवणींना उजाळा देत होता.
आज सारे आठवतांना डोळे पाणावलेत.आपण प्रताप विद्या मंदिराचा सन्मान जपला आणि वृद्धिंगत केला.सचोटीने अध्यापन केले व उमदे प्रशासन केले.
विवेकानंद विद्यालय तर आपण उभे केले,घडवले, नावारुपाला आणले.अख्खी हयात आपण सुसंस्कृत शिक्षणाला प्राधान्य दिले.
आपला सहवास नेहमीच हवाहवासा राहिला.आज आम्ही गुरुविना पोरके झालो.आपल्याला चिरशांती लाभो ही प्रभुचरणी प्रार्थना
भावपूर्ण आदरांजली,ओम शांती शांती शांती💐💐💐💐💐
***
गौरव महाले सर :
आम्हा धडपड्या लेकरांचे साने गुरुजी!!!
आदरणीय केंगे सर....
शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या मधील शिक्षक आपण जिवंत ठेवलात आणि माझ्यासारख्यान्च्या श्वासात शिक्षकांच्या रूपाने ऑक्सिजन दिलात.....
आणि त्यातून आम्ही मास्तर म्हणून घडलो. गुरुमाऊली साने गुरुजींच्या सहवासातील गोष्टी तुम्ही आम्हाला सांगत गेलात आणि नकळतपणे आमच्यात मास्तरकीचे बीजं पेरत गेलात......
You are every inch teacher
तू हाडाचा शिक्षक आहेस....
हे तुमचे शब्द कौतुकाचे शब्द आणि पाठीवरील शाबासकीची थाप आमच्यातील शिक्षक सोबत चांगला माणूस घडवत गेला. आम्ही आमच्या समोरील विद्यार्थ्यांच्या हृदयात घर करण्यात थोडेफार यशस्वी होत असू..... तर त्या घराच्या बांधकामाचे सर्व मटेरियल मात्र आपणच पुरवलं आहे हे विसरून कसं चालेल?
कारण शिक्षक म्हणून आपणच आम्हास घडवलंय...
आपल्या प्रत्येक भेटीअंती आपण सदैव शिक्षण ,सामाजिक परिस्थिती, विद्यार्थ्यांची काळजी आणि शिक्षण पद्धती यावरच चर्चा केलीत....
कधी-कधी आपल्या बोलण्यात उद्विग्नता जाणवायची.....ती आपणास असह्य झाली म्हणून आपण अखेरचा निरोप घेतलात का?
पण सर काळजी करू नका....आम्ही आमच्यावतीने शक्य त्या प्रयत्नांनी आपला विचार आणि तळमळ जागृत ठेवू....
चांगल्या आणि विधायक गोष्टींचे मनापासून कौतुक करणारी आणि खरंच मनापासून ज्यांचा चरणस्पर्श करावा अशी खूप कमी माणसं या जगात आता शिल्लक राहिलीत.... त्यात आपण अग्रस्थानी होता!!
ती पोकळी मात्र अवश्य जाणवेल.....
आपण एकदा म्हणाला होतात...
" प्रसिध्दीच्या मागे लागलं की कार्याची सिद्धी होत नाही"....
आम्ही हे नेहमी लक्षात ठेवू!!!
विवेकानंद विद्यालयातील आपल्या सोबतच्या सहवासातील सोनेरी क्षण माझ्या आयुष्यातील खूप मोठी शिदोरी आहे ...त्या संस्कारांच्या शिदोरीच्या जोरावरच पुढचं आयुष्य चाललंय !!!
***
साने गुरुजींना बघितलेले केंगे सर गेले....
चोपडा येथील साने गुरुजींचा सहवास लाभलेले माजी प्राचार्य सुधाकर केंगे यांचे काल निधन झाले.
साने गुरुजींच्या आठवणी सांगणारी ही त्यांची ५ महिन्यापूर्वी त्यांच्या घरी मी घेतलेली मुलाखत...
गुरुजींसारखेच केंगे सर अतिशय प्रेमळ होते हे त्यांचे बोलणे ऐकताना लक्षात येते...चोपड्यात त्यांनी मोठे शैक्षणिक कार्य केलं...साने गुरुजींचा परिसस्पर्श झालेले आयुष्य कसे समर्पित होऊन जाते याचे केंगे सर उदाहरण होते....
माणसं निघून जातात...जागा भरून निघत नाहीत..कोरड्याठाक आणि आत्मकेंद्रित होत चाललेल्या समाजात ही प्रेमळ,करुणामय माणसं कुठून आणायची....?
केंगे सरांची ही मुलाखत जरूर ऐका... आपण काय गमावलंय हे बघून डोळ्यात पाणी येतं....
~हेरंब कुलकर्णी
लिंक
***