My YouTube Channel
Tuesday, 16 June 2020
Monday, 15 June 2020
"कोणाचं घरटं मोडू नका."
"कोणाचं घरटं मोडू नका."
🔶सत्य घटनेवर आधारीत🔷
टी.एन्.शेषन् भारताचे मुख्यनिवडणूक आयुक्त होते.त्ंच्या जीवनात घडलेला प्रसंग !
एकदा ते आपली पत्नी जयलक्ष्मी शेषन् यांच्याबरोबर फिरायला बाहेर पडले होते.उत्तरप्रदेशातल्या एका सुंदर रस्त्यावरून गाडी जात होती.रस्त्याच्या दुतर्फा दाट झाडी होती.वर्दळीचा रस्ता नसल्यामुळे की काय ,पक्ष्यांची अनेक ,सुंदर घरटी झाडांची शोभा वाढवत होती.जयलक्ष्मी यांना हे दृष्य खूप आवडलं .त्यांना वाटायला लागलं आपल्या घराच्या बागेसाठी यातली दोन घरटी नेली ,तर बाग किती शोभून दिसेल.त्यांनी आपली इच्छा बोलून दाखवली.
गाड्या थांबल्या.त्यांच्यासाठी जे संरक्षक पोलीस दल होते ,ते इकडे तिकडे शोधायला लागले.तिथे एक मुलगा गुरं चरायला आला होता.त्याला बोलावलं.तो सरकारी इतमाम पाहून कोणीतरी मोठी अधिकारी व्यक्ति आलीय ,हे त्यानी ओळखलंच.त्यांनी मुलाला दोन घरटी काढून आणायला सांगितली ,आणि प्रत्येक घरट्याचे १० रु.देऊ असंही सांगितलं.त्या मुलानं खाली मान घालून नकारार्थी मान हलवली. "दहा रुपये कमी वाटतायंत का ,५०रुपये देऊ प्रत्येक घरट्याचे."
यावर तो मुलगा म्हणाला ,"सरजी,पैशाचा सवालच नाहीए .कितीही पैसे दिलेत तरी ती घरटी मी झाडावरून उतरवणार नाही."
"का रे बाबा?"
"त्यात पक्ष्याची पिल्लं शांतपणे आणि विश्वासानी झोपली आहेत.सायंकाळी त्यांची आई चोचीत दाणे घेऊन पिल्लांच्या ओढीनं येईल ,पिल्लं सापडली नाहीत तर ती सैरभैर होईल ,आक्रोश करेल,ते माझ्याच्यानं पाहवणार नाही.कोणाचं घर मोडायचं पाप आहे ना सर जी."
हे ऐकून शेषन् व त्यांची पत्नी थक्क झाले.
शेषन् म्हणाले ,"कोणीतरी डोळ्यात अंजन घातल्यासारखं वाटलं.माझं पद ,माझी पदवी ,उच्च शिक्षण सार्या सार्याचा अभिमान क्षणार्धात गळून पडला ,वितळून गेला.जे शिक्षण , संस्कृती आणि संस्कार या मुलानं निसर्गाकडून शिकलेत.ते शिक्षण कोणत्याच विद्यापीठात मिळणार नाही.".
~संकलन
Sunday, 14 June 2020
आनंदाची गोड बातमी....
आनंदाची गोड बातमी....
तिसऱ्या फडताळामधील खालच्या कप्प्यातील साखरेवर पहिल्या फडताळामधील वरच्या कप्प्यातील रव्याची नजर होती...रवा सारखा सारखा खाली वाकून वाकून साखरेकडे पहायचा...मधल्या फडताळामधील मधल्या कप्प्यातील साजुक तूपाला ही भानगड़ माहित होती...रव्याचे हे साखरेवर लाइन मारन बघून तूप गालातल्या गालात मिश्किलपणे हसत होते.....
ते तूप रव्याच्या सारखे मागे लागायचे की तू धाडस कर आणि साखरेला मागणी घाल, पण रव्याची काही हिम्मत व्हायची नाही...
साखरेचा खर तर होकार होता पण ती रव्याच्या विचारण्याची वाट पाहत होती..
एक दिवस रवा, तूप आणि साखर खाली किचनपाशी आले...तूप रव्याला चिथावून साखरेला प्रपोज करण्यासाठी मागे लागले होते, पण रवा काही धजावेना..
बाजुलाच कढ़ईची वेदिका तयार होती....अग्निकुंड पेटलेले होतेच....तूपाने रागात त्या अग्निकुंडावरच्या कढ़ई उड़ी घेतली....ते आता रागाने चांगलेच उन उन झाले होते... त्याने रव्याला आपल्या जवळ खेचले आणि त्याची खरड़पट्टी काढायला सुरुवात केली....त्याला असा उभा आडवा करत त्याचा चांगला ब्रेन वॉश केला...आणि त्याला साखरेला मागणी घालण्यास तयार केले...रवा आणि तुप या दोघांच्या झटापटीची वार्ता खमंग वासाने सर्वदूर पसरवली होती...
रव्याने मग जरा हिम्मत करुन कढईतून हलकेच वर डोके बाहेर काढत घाबरत जरा दबक्या आवाजात वाटीतल्या साखरेला मागणी घातली.....रव्याच्या सुवासिक खमंग सुगंधाने साखरेला भुरळ पाडली व वाटीतल्या वाटीत कडेकडेने लाजत साख़रेने होकार दिला....तिचा होकार समजला तसा रवा लाजून लाजुन पार गुलाबी लालसर झाला...
उगाच नंतर विचार बदलायला नको म्हणून रवा आणि साखरेचा लगोलग तिथेच लग्नाचा घाट घातला गेला...पण त्यात पुन्हा विघ्न आले...बाजूलाच का कुणास ठाऊक तापलेले पाणी त्याला विरोध करत खदखदायला लागले....त्याने कढ़ईत उड़ी घेत रव्याशी दोन हात करायला सुरुवात केली....तापलेल्या दुधाने थोड़ी मध्यस्ती करायचा प्रयत्न केला ....पण पाण्याचा फार काळ निभाव लागला नाही...पाचच मिनिटात पाणी धारातीर्थी पडले...
या विजयामुळे रव्याच्या अंगावर मुठभर मांस चढल....विजयाने त्याचा उर भरून आला.
मग साखरेने अलगद कढ़ईत प्रवेश केला.... रव्याचे आणि साखरेचे लग्न लागू लागले....विलायची पावडरच्या अक्षदा टाकण्यात आल्या; या आनंदाच्या भरात कापलेल्या बदामाच्या कापांची, काजूंची, मनुक्यांची मनसोक्त उधळण करण्यात आली....आणि रव्याचे अन साखरेचे लग्न लागले....साखर लाजत मुरडत अलगद रव्यात सामावून गेली... रवा आणि साखर अखेर एकरूप झाले...
पै पाहुणे डबे, चमचे, चिमटे, चाकू ई आपापल्या घरी निघाले...अग्निकुंड ही थंडावले होते...
झाकण नावाचा दरवाजा लावून रवा आणि साखर आपल्या विश्वात एकांतात रममाण झाले....
मिनिटा मागून मिनिटे निघून जात होती...
रवा आणि साखर आपल्या संसारात मस्त होते आणि ....तो क्षण आला....
दरवळणाऱ्या साजुक तुपाने आपल्या सुवासिक सुगंधाने घरभर रवा आणि साखरेकड़े आनंदाची गोड बातमी आहे अशी वर्दी दिली...मग क़ाय घरभर उत्साह पसरला...सर्वत्र आनंदी आनंद झाला... जो तो उत्सुकतेने वाट पाहू लागला.....
आणि बरोबर नऊ मिनिट आणि नऊ सेकंदाला त्यांनी एका गोंडस बाळाला जन्म दिला त्याच नाव....
शिरा.....
शिरा भक्त प्रसाद.
~संकलन
💐🌹🙏🏻🙌🏻🌹😍😀🤑😀😀😀
Friday, 12 June 2020
“दोष हा कुणाचा?”
एका हाॅटेलमध्ये जेवायला गेलो होतो. शेजारच्या टेबलावर चार मुली बसल्या होत्या. त्यांचं जेवण आटोपलं, वेटर ने बडीशेपचा बाऊल समोर ठेवला. चारही मुलींनी टिश्यू पेपरमध्ये बचकभर बडीशेप भरून घेतली आणि ती पुरचुंडी पर्समध्ये टाकली. आजूबाजूच्या १०० माणसांमध्ये असूनही आणि चांगल्या कुटुंबातल्या असूनही असं करताना त्यांना काहीही वाटलं नाही.
अनेक काॅलेजवयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींना मी हाॅटेल्समधून चमचे चोरतानाही पाहिलं आहे. विमानातून प्रवास करताना काही मंडळी अक्षरश: ओंजळी भरभरून चाॅकलेट्स किंवा टाॅफीज् घेतात. काही रेल्वे प्रवासात पाण्याच्या बाटल्या प्रवाशांना दिल्या जातात. अनेकजण दोन-दोन किंवा तीन-तीन बाटल्या सुद्धा घेतात. रेल्वे प्रवासात (केवळ त्या प्रवासापुरतेच मिळणारे) टर्किश नॅपकिन्स सर्रास बॅगेत भरतात. साॅस किंवा साखरेची ट्रॅव्हलिंग पाऊचेस न विचारता उचलणे, टीबॅग्ज उचलणे, टिश्यू पेपर्सचा गठ्ठाच उचलणे हे प्रकार माणसं अगदी बिनधास्त करतात.
एकदा एका ट्रेक ला गेलो होतो आणि एका रिसाॅर्टवर राहिलो. तिथं आलेल्या एकानं शॅम्पूचे सॅशे आणि साबणाच्या छोट्या वड्यांचा बाॅक्सच उचलून नेला. एका सुशिक्षित, जाणत्या बाईंनी लाॅबीमध्ये सहज म्हणून वाचण्याकरिता ठेवलेली दोन मॅगेझिन्स उचलली आणि पर्समध्ये घातली. हा प्रकार आजूबाजूची माणसं, हाॅटेल व्यवस्थापनातले कर्मचारी पाहत होते. पण कुणी काही विरोध केला नाही.
घराजवळच्या हाॅट चिप्स च्या दुकानात गेलो होतो. दोन मुली आल्या. त्यांनी सात-आठ प्रकारचे वेफर्स टेस्ट करून पाहिले आणि काहीही खरेदी न करता निघून गेल्या. दुकानाचा मालक म्हणाला, “ऐसे तो बहोत लोग आतें हैं , सब के सब पढें-लिखे और अच्छे घर के ही होतें हैं । पता नहीं, ऐसा क्यूॅं करतें हैं?”
रस्त्यावरच्या एखाद्या फळविक्रेत्याकडे गेलात आणि फळं खरेदी करायची असतील तर एखादं फळ चवीपुरतं चाखायला देतो. काहीजण स्वत:च हात पुढं करून सात-आठ फळं तर उभ्या-उभ्या सहजच मटकावतात. चणे विक्रेते किंवा चुरमुऱ्यांची भट्टी चालवणाऱ्यांना तर हा अनुभव दररोज शंभरदा येत असेल. माणसं अगदी स्वत:चा हक्क असल्यासारखा हात घालतात.
मंडईत गेलो होतो. कैऱ्या विकणाऱ्या एका वयस्कर विक्रेतीसमोर एक काकू उभ्या राहिल्या. विक्रेतीनं भाव सांगितला आणि कैरीची एक फोड कापून त्यांच्या हातावर ठेवली. कैरीची फोड खात-खात काकू एक अक्षरही न बोलता निघून गेल्या. आम्ही दोघेही शेजारीच उभे होतो. तो प्रसंग पाहून आम्हालाच कसंतरी झालं.
चांगली शिकली-सवरलेली माणसं अशी का वागत असतील? आपण परदेशातल्या लोकांकडून त्यांची भाषा, राहणीमान, कपडे, फॅशन्स हे सगळं घेतलं पण सार्वजनिक आयुष्यात ती माणसं किती संतुलितपणे वागतात,हे आपण नाही स्वीकारत..!
कॅरीबॅगसाठी दुकानदारांशी हुज्जत घालणारी सुशिक्षित जनता मी पाहतो, तेव्हा मला त्यांच्या सुशिक्षितपणाचाच अर्थ लागत नाही. नुसतंच बाह्यरूप पाॅश करून आपण सुशिक्षित असल्याचा आभास निर्माण करत राहण्याच्याच कृत्रिम देखाव्याच्या चक्रात माणसं अडकली आहेत का?
हा बिनबुडाचा सुशिक्षितपणा केवळ अशा चोऱ्या-माऱ्या आणि उचलाउचलीचे उद्योग करून थांबत नाही. उघडपणे सामाजिक नियम मोडण्यातही हा वर्ग आघाडीवर आहे.
पेट्रोलपंपावर मोबाईल फोनवर गप्पा मारणे, एटीएम सेंटरमध्ये गाॅगल्स, स्कार्फ किंवा टोपी घालून जाणे, सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर खुशाल धूम्रपान करणे, सार्वजनिक ठिकाणी भर रस्त्यात बिनदिक्कतपणे थुंकणे, या गोष्टी करून माणसं नक्की काय दाखवण्याचा प्रयत्न करत असतात?
नामवंत काॅलेजेसमध्ये शिकणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी पार्किंग आणि नो पार्किंगमधला फरकही ओळखू शकत नाहीत का? सुशिक्षित माणसं मुद्दामच झेब्रा क्राॅसिंगवरच का थांबतात? शिकली-सवरलेली माणसं बसस्टाॅप सोडून भर रस्त्यावर गर्दी करून बसची वाट का पाहतात? खिशात पैसे असूनही बस कंडक्टर ला फसवून विनातिकीट प्रवास का करतात?
लक्ष्मी रस्ता हा जसा बाजारपेठेचा रस्ता आहे तसं ते माणसांच्या अतरंगीपणाची लक्षणं पाहण्याचंही एक ठिकाण आहे. माणसं रस्त्यातच आपली भलीमोठी चारचाकी गाडी थांबवून दुकानासमोर उतरतात आणि ड्रायव्हर ती गाडी रस्त्यातच उभी करून , काचा वर करून, आतमध्ये एसी लावून बसलेला असतो. बाकीची वाहतूक कोलमडून जाऊन याच्या नावानं शंख करत असते, पण हा एकदम कूल..!
माणसं कुल्फी घेतील आणि काड्या रस्त्यावरच टाकतील. मक्याचं कणीस घेतील, उरलेला भाग रस्त्यावरच टाकतील. प्लास्टिकच्या ग्लासात काॅर्नभेळ घेतील, रिकामा ग्लास रस्त्यावरच टाकून मोकळे.. याच रस्त्यावर मोबाईल फोनवर बोलत रस्ता क्राॅस करणारे अनेकजण दिसतील. नो एण्ट्री तून वाहने चालवणारे अनेकजण दिसतील. ही सगळी मंडळी लौकिकार्थानं किमान ग्रॅज्युएट तरी निश्चित असतात. पण, सार्वजनिक ठिकाणी कसं वागावं आणि कसं वागू नये, असा कुठला पेपर त्यांच्या कोर्समध्ये नसतो, त्यामुळे त्या विषयाचा त्यांना गंध नसतो. त्यामुळे, सार्वजनिक जीवनात सगळे नापास!
अनेक ठिकाणी खाऊगल्ल्या आहेत, तिथले खाद्यपदार्थ विक्रेते संध्याकाळी व्यवसाय संपला की, सांडपाणी थेट रस्त्यावर टाकून देतात. त्यामुळे तो रस्ता अस्वच्छ, चिकट होतो, माशा घोंगावतात. पण सार्वजनिक ठिकाणचं त्यांचं हे वागणं आपण कुणीही मनावर घेत नाही.
भर रात्री बारा वाजता झोपलेल्या जगाला जागं करून वाढदिवस साजरा करणारा एक नवीन वर्ग तयार झाला आहे. ही मंडळीसुद्धा सुशिक्षित असतात. अनेकदा काॅलेजात शिकत असतात. पण, भर रात्री केकच्या दुकानाबाहेरच टोळकं जमवून ज्याचा वाढदिवस आहे अशा उत्सवमूर्तीच्या तोंडाला, डोक्याला येथेच्छ केक फासून, त्याला दारू पाजून लाथाबुक्क्यांनी बदडून काढणे, त्याच्या डोक्यात अंडी फोडणे असे प्रकार करतात. हे सगळं चांगलं वागणं आहे का? आणि एकविसाव्या शतकातल्या समाजाला हे शोभतं का?
ही मंडळी असं का वागतात, याला काहीही उत्तर नसतं.अशी कितीतरी लोकोत्तर व्यक्तिमत्त्वं आपल्याला ठायीठायी दिसतील. ही माणसं उघडपणे चोऱ्या करतात, गरिबांना नाडतात, त्यांना त्रास देतात, स्वत:च्या वागणुकीनं इतरांचं सार्वजनिक आयुष्यही पार खराब करून टाकतात.
आपण यावर कधी आक्षेप घेतला आहे का?
लोकांना दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसेल पण स्वत:च्या ताटातलं मुसळ दिसणार नाही.
गाय दूध देते तेव्हा ते चांगलंच असतं. पण, आपण ते नीट तापवलं नाही तर ते नासणारच. म्हणून, मग आपण गायीला दोष देणार का? तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं दही कळकलं तर दोष दह्याचा नसतो आणि भांड्याचाही नसतो, दोष दही तांब्याच्या भांड्यात ठेवणाऱ्याचा असतो.
आपण नेहमी प्रशासनाकडे, सरकारकडेच बोटं दाखवत राहू, आरोप करत राहू. सरकारकडून आपल्या अपेक्षा फार मोठ्या असतात, पण साध्या साध्या गोष्टी जपण्यातही आपण स्वत: कमी पडतो. स्वत:ला पारखलं आणि स्वत:च्या वागण्यातले दोष दूर करायचं ठरवलं तर प्रगतीला सुरूवात होईल..सगळं मळभ जाऊन आभाळ स्वच्छ होईल..!*
समाजाने स्वत: पुढाकार घेऊन या साध्या साध्या गोष्टी सुधारल्या तरी ‘अच्छे दिन’ नक्कीच येतील...!
।।जय सदगुरु।।
-संकलन
Subscribe to:
Posts (Atom)
-
पुस्तक-बोलगाणी (कविता संग्रह) कवी- मंगेश पाडगावकर प्रकाशन- मौज प्रकाशन प्रकाशक-संजय भागवत पुस्तक परिचय द्वारा -प्रसाद वैद्य नमस्कार दोस्...
-
Click Here to fill this form on the link👇 Admission Form (Live English Activity Std. 10th) SCAN THIS QR CODE FOR THIS FORM Click Here For A...
-
चोपडा सातपुड्याच्या कुशीत पहुडलेले, ऐतिहासिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक, इ. अशी बहु मुखी ओळख असलेले अंकलेश्वर ते बुर्...