My YouTube Channel

Click here to visit My YouTube Channel

Wednesday, 27 April 2022

Background Music

Background Music...

  शाळेत फक्त शिकणं आणि शिकवणं होत नसतं तर दिनविशेष आणि छोट्या-मोठ्या कार्यक्रमातून आपलं जगणं साजरं होतं असतं.याचा एक छान बोलका अनुभव आज आला.  आमच्या शाळेतील सुंदर हस्ताक्षर लाभलेल्या आणि पहिलीच्या विद्यार्थ्यांना जीव ओतून शिकवणाऱ्या श्रीमती वनारसे बाई (अभ्यास न करणारी मुलं जाम टरकतात यांना 😆) यांचा मुलगा कौस्तुभ याचा English मधून छान मेसेज आला. म्हटलं मोजकं लिहिलंय पण काय भारी लिहिलंय यानं! विद्यार्थी शाळेत शिकतांना काय काय निरीक्षणं करतात अन् त्याची नोंद ठेवतात याचा भावस्पर्शी अनुभव म्हणजे हा SMS. अवतीभवतीचं निरीक्षण हा तसा माझाही आवडीचा उद्योग. हा SMS आला अन् मी माझ्या मोबाईल मधील 'सुत्रसंचलन' नावाचं Folder चाचपडायला लागलो. शाळेत काही दिनविशेष,छोटे-मोठे कार्यक्रम असले की, प्रतिमापूजन प्रसंगी Background ला या Folder मधील एक छानसं प्रासंगिक गाणं अथवा धून मोबाईलवर लावायची जेणेकरुन या छोट्याशा कृतीतूनसुद्धा त्या कार्यक्रमाची उंची वाढते. यातील एक झलक-

शिवजयंतीला लता दीदींच्या आवाजातील...

"निश्चयाचा महामेरु |

बहुत जनांसी आधारु ||

अखंड स्थितीचा निर्धारु |

श्रीमंतयोगी ||

या काव्यपंक्ती एक रोमांचित करणारा अनुभव श्रोत्यांना देऊन जातात. 

हाती नाही येणे

हाती नाही जाणे

हसत जगावे 

हसत मरावे 

हे तर माझे गाणे... 

जगदीश खेबूडकर यांनी लिहिलेलं आणि सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेलं हे गीत जीवनातील शाश्वत सत्याची जाणीव करुन देतं.

पद्मजा फेणाणी यांच्या आवाजातील  

दिवे लागले रे दिवे लागले...

हे गाणं प्रसन्नतेची अनुभूती देतं... आणि असं बरंच काही..

सांगायला आनंद वाटतो की असा काही कार्यक्रम असला की Sound Systemवालाही मला विचारतो," सर, आज कोणतं गाणं...लावायचंय." त्यानंही यासाठी काही गाणी माझ्याकडून घेतलीय आणि त्याचा तोही समर्पक वापर करतोय. अशा छान गाण्यांचं वेळ काढून मी वेळोवेळी संकलन केलंय. अशी साद अन् दिलखुलास दाद लाभली की ते Folderही माझ्याशी बोलतं-

एक प्यार का नगमा है, मौजों की रवानी है

ज़िंदगी और कुछ भी नहीं..

तेरी मेरी कहानी है

ला..लाला…लाला..

कुछ पाकर खोना है, कुछ खोकर पाना है

जीवन का मतलब तो, आना और जाना है.....

 खर्‍या अर्थानं संतोष व आनंद देणारं श्रवणीय Background Music सोबतीला असायलाच हवं. 

ठरवलं तर Mobile हे Device इतकं छान Dedicate करु शकत याचं अप्रूप वाटतं. 

मग या गोष्टीसुद्धा आपला  'Status' बनतात. बघा पटतंय का! 

Thank you कौस्तुभ. तुझ्या SMSने मला आज लिहितं केलं. शुभेच्छा. भेटुया  

📘📚📖✍🏻📋

~प्रसाद वैद्य

Tuesday, 19 April 2022

प्राचार्य डॉ.अनिल झोपे व प्रा.डॉ.डी.बी.साळुंखे यांची शाळेस सदिच्छा भेट

     आज आमच्या विवेकानंद विद्यालयात डाएटचे प्राचार्य डॉ.अनिल झोपे सर व प्रा.डॉ.डी.बी.साळुंखे 
सर यांनी शाळेतील उपक्रम यासंदर्भात सदिच्छा भेट दिली. सर्व शिक्षकांसोबत त्यांनी दिलखुलास संवाद  साधला व मार्गदर्शन केले. शाळेचे मुख्याध्यापक श्री. नरेंद्र भावे सर यांनी त्यांचे स्वागत केले व शाळेतील उपक्रमांबद्दल माहिती सांगितली. याप्रसंगी संस्थेचे सचिव रवींद्र जैन काका, श्रीमती चित्ते मॅडम, पंचायत समितीचे पदाधिकारी व शिक्षकवृंद उपस्थित होते. पवन लाठी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले व राधेश्याम पाटील यांनी आभार प्रदर्शन केले. 

प्राचार्य डॉ.अनिल झोपे यांचे संदेश पत्र 
(प्राचार्य- जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,जळगाव)                                                                                     

प्रा.डॉ.डी.बी.साळुंखे यांचे संदेश पत्र
महाराष्ट्र शिक्षण सेवा वर्ग-२अधिकारी 
(जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,जळगाव)


Monday, 18 April 2022

Essay- My School





When we involve in checking answersheets, we find such nice things. Very Good Abhay.

Saturday, 16 April 2022

भिमवंदना

 

हा फोटो मला fb वर दिसला.त्या साऱ्यांचे आभार मानत मी माझ्या चार ओळी सादर करत आहे.

https://www.facebook.com/100048339905142/posts/511517570469569/


                    भिमवंदना

               --------------------

प्रार्थना, वंदना, गिते, पठण 

कसलाच कुठे आवाज नाही

माय न लेकराला पूजण्याचा

कधीच कुठे रिवाज नाही


तरी पण ठेवते भीमा

तूझ्या पायाशी चार फुलं

तुझ्या मुळेच सूर्य शोधतात

आज माझी मुली आणि मुलं


श्रीनिवास गडकरी

रोहा पेण  पुणे

9130861304

केवळ नावासहितच फॉरवर्ड करावे

@ सर्व हक्क सुरक्षित

16.4.2022

~संकलन (प्रसाद वैद्य)

Thursday, 14 April 2022

कु.पर्वणी (इ.४थी) हिने तिचे वर्गशिक्षक श्री. बारेला सर यांना लिहिलेलं हे पत्र.

  माझी मोठी लेक कु.पर्वणी (इ.४ थी) हिने तिचे वर्गशिक्षक श्री. बारेला सर यांना लिहिलेलं हे पत्र. तिच्या आयुष्यातील हे पहिलं पत्र आणि तेही आम्ही दोघंही शाळेत गेलेलो असतांना कुणाच्याही मार्गदर्शनाशिवाय लिहिलंय हे विशेष. शाळेतून घरी आल्यावर तिनं हे पत्र मला दाखवलं. मला खूपच आनंद वाटला. म्हटलं बाळा, माझं जगणं तुझ्यात रुजलंय ग !

(आपल्या प्रतिक्रिया Comment Box मध्ये जरुर नोंदवाव्यात ही नम्र विनंती.)

या पत्राला आदरणीय बारेला सर यांचा प्रतिसाद 
पर्वणी बेटा सर्वप्रथम तुझं मनःपूर्वक खूप खूप कौतुक...!!
कारण एक इ.४ ची ( साधारण दिड वर्ष कोरोनामुळे शाळेपासून दूर राहिलेली) विद्यार्थीनी एवढे सुंदर विचार एवढ्या सुंदर वाक्यरचनेमध्ये लिहु शकते म्हणून तसेच या इंटरनेटच्या युगात कालबाह्य होत चाललेला पत्रलेखनाचा तू छान प्रकारे छंद जोपासत आहे म्हणून ...शाब्बास पर्वणी..!👌👌🏻🍫🍫
आम्ही सर्व शिक्षक तुझ्यासारख्या एक वेगळ्या बुद्धिमत्तेच्या हुशार, समजदार, अष्टपैलू , विविध गुणसंपन्न विद्यार्थिनीला कसं विसरणार.तू जरी आता इ.५ वी ला जाशील पण आपली शाळा एकच आहे आणि आमच्यासारखेच तुम्हाला समजून घेणारे, उपक्रमशील, चांगले शिकवणारे शिक्षक तुला पुढील विभागातही लाभतील.तुम्ही जरी पुढील वर्गात गेलात तरी तुमचं कोणी केलेलं कौतुक, तुम्ही मिळवलेलं यश /बक्षीस याबद्दल तुमच्यापेक्षा जास्त आनंद आम्हाला होतो.
आम्ही नक्कीच पर्वणी तुझ्यासारख्या विद्यार्थिनीला मिस करू.तुझ्या पत्र लेखनातून असे दिसून आले की, तू मिळविलेल्या ज्ञानाचा दैनंदिन जीवनात चांगल्या प्रकारे उपयोग करत आहेस याचा मला अभिमान वाटतोय. छान..  तू खूप मोठी हो बेटा,आईबाबांचं नाव खूप मोठं कर.तू मला लिहलेले वरील पत्र नेहमी मला माझ्या कामात प्रेरणादायी ठरत राहील  तसेच मला अधिक जोमाने, उत्साहाने काम करण्याचे बळ देत राहील वआयुष्यभर माझ्या स्मरणात राहील.
पर्वणी तुला पुढील वाटचालीस अनेकोत्तम शुभेच्छा...!!👍👍🏻🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

श्री. बारेला सर
विवेकानंद विद्यालय, चोपडा.

Friday, 8 April 2022

जातानाचे शब्द...

जातानाचे शब्द...

"मी असा काय गुन्हा केला?"  हे शब्द मा.  प्रमोद महाजन यांनी, मा.गोपीनाथ मुंडे यांच्याजवळ, आपल्या अंत समयी उच्चारले होते. आपल्या सख्ख्या भावानेच गोळ्या घातल्यावर विचारांच्या कल्लोळातून त्यांना असे व्यक्त व्हावेसे वाटले होते. "अरे, अरे हे काय करताय ?" असे इंदिराजींनी अतिशय अविश्वासाने आपल्या मारेक-यांना विचारले होते.  महात्मा गांधीजींचे जातानाचे शब्द होते, "हे राम" तर चाफेकर बंधू किंवा भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी "वंदे मातरम" म्हणत मृत्यूचे स्वागत केले होते. तर "मी या स्वार्थी जगात आता राहू शकत नाही",असे म्हणून साने गुरुजींनी जीवनयात्रा संपवली आणि सात भाऊ असते तरी मातृभूमीसाठी दिले असते. आता माझे काम संपले असे ठामपणे सांगून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी प्रायोपवेशन केले. 

एखाद्याचे जातानाचे शब्द नेमके काय असतात याची  आपल्याला अतिशय उत्सुकता लागून राहिलेली  असते. एखादे वयोवृद्ध वडील गेल्यावर जेव्हा नातेवाईक भेटायला येतात तेव्हा "काय म्हणाले हो ते जाताना ?" असे हमखास विचारले जाते. अगदी बोलायला यायला लागल्यापासून आपण अगणित वाक्ये बोलतो पण आयुष्याच्या अंतकाळी जे बोलतो ते खरेखुरे असते. त्यात खोटेपणाचा, दांभिकपणाचा, "मी"पणाचा लवलेशसुद्धा नसतो. 

ब-याचवेळा आयुष्यातल्या चुकांची किंवा पापांची कबुलीही असू शकते. बालपण संपल्यानंतर इतका मनाचा निरागसपणा यापूर्वी कधीच अनुभवता आलेला नसतो. कदाचित समोर दिसत असलेल्या मृत्यूमुळे ख-याखु-या जीवनाची जाणीव, आयुष्य संपताना होत असावी. 

एक एकांकिका पाहिली होती. लेखकाने कल्पना अशी केली होती की, पराभव दिसायला लागल्यावर अडॉल्फ हिटलरने आपल्या नवपारिणित वधूसह आत्महत्या केली होती. मग ज्या रात्री त्याने आत्महत्या केली त्या रात्री त्याचा त्याच्या बायकोशी नेमका काय संवाद झाला असेल ? अतिशय कल्पकपणे दोघातले द्वंद्व त्यांनी उभे केले होते. पत्नीला जगायचे होते, सर्वसामान्य माणसाप्रमाणे संसार करायचा होता. पण हिटलरला शत्रूच्या हातात सापडायचे नव्हते. त्याला आपला अपमानास्पद मृत्यू नको होता. त्यामुळे आत्महत्येशिवाय त्याला दुसरा मार्ग दिसत नव्हता. आसक्ती आणि विरक्ती यातले नाट्य पाहताना दोघांनीही जीवनाच्या तत्त्वज्ञानावर केलेले भाष्य हा या एकांकिकेचा विषय होता. पत्नीच्या मनात मृत्यूच्या कल्पनेने आलेली थरारकता आणि त्यातून निर्माण झालेली अगतिकता ही मनाला स्पर्शून गेली आणि हे मृत्यू, मी मला हवा तसा जगलो, आता हवा तसा मरणार हा हिटलरच्या मनातील ठामपणा पाहताना थरारून गेलो.

        जगणे आणि मरणे यात फार मोठा वैचारिक खंदक असतो. तो पार करण्याची इच्छा फार कमी जणांची असते. 

आपल्यापैकी जवळजवळ प्रत्येकाला त्या खंदकापर्यंत जाऊच नये असे वाटत असते. कारण जगण्याची आसक्ती प्रत्येकालाच असते. तिथे मृत्यूचे स्वागत कोण आणि कसे करणार ? सगळी कल्पना असते बरं का, की, आयुष्यात मी आणि माझे करत इतकी संपत्ती आणि इतक्या वस्तू गोळा केल्यात पण यातली एकही वस्तू मृत्यूबरोबर घेऊन जाता येणार नाही. वेगवेगळ्या फॅशनचे कितीही महागडे कपडे घातले तरी जन्माला येताना ××××आलोय आणि मरतानाही तसेच जायचंय. येताना दोघांमुळे आलोय आणि मेल्यावर चौघांच्या खांद्यांवरून जायचंय. आपण एकटे काहीच करू शकत नाही पण तरीही प्रत्येक हाव काही सुटत नाही. हे माझे, तेमाझे, माझेहीमाझे आणि त्याचेही माझेच अशी आपली नेहमी भावना असते. ही भावना बोथट होते, जेव्हा मृत्यू समोर दिसायला लागतो. प्रत्येक चर्चमध्ये जशी कन्फेशन बॉक्स असते तशी काल्पनिक बॉक्स मृत्यूच्या जाणिवेने तयार होते. आयुष्यात जे बेफामपणे वागलो, बोललो ते आठवू लागते. आयुष्यावर चढलेली खोटेपणाची आणि दांभिकतेची पुटे ढासळू लागतात. लहान बाळाची निरागसता मनात येऊ लागते. राग-लोभाच्या आहारी जाऊन विस्कटून टाकलेली नाती पुन्हा गोळा करून आणाविशी वाटतात. खरे तर तोपर्यंत फार उशीर झालेला असतो. जेव्हा जगायचे असते तेव्हा आपण जगलेलोच नसतो. आणि जगावेसे वाटू लागते तेव्हा मृत्यू समोर येऊन उभा ठाकलेला असतो. भाऊसाहेब पाटणकर यांचा सुरेख शेर आहे, 

                                                        दोस्तहो, 

दुनियेस धोका, मेलो तरी आम्ही दिला| 

जाऊनी नरकात, पत्ता स्वर्गाचा आम्ही दिला ।।

हाय रे दुर्दैव माझे, सर्वास कळले शेवटी ।

सारे सन्मित्र माझे, तेथेच आले शेवटी ।।

        आपल्यासारख्या सर्व पापी माणसांचा सर्वात शेवटचा मुक्काम नरक आहे हे त्यांनी नर्मविनोदाने मोजक्या शब्दात पटवून दिले आहे. पण काही काही माणसे खरोखरच वेगळी असतात. त्यांना जगण्याचीही आसक्ती नसते आणि मरण्याचीही भीती वाटत नाही. ही माणसे ख-या अर्थाने जीवन जगतात आणि हस-या चेह-याने मृत्यूला सामोरे जातात. सामाजिक कार्यकर्ते ग. प्र. प्रधान यांनी मृत्यू हसत हसत स्वीकारला. आपला काळ जवळ आला आहे हे कळल्यावर त्यांनी आपला पुण्यातील राहता वाडा साधना ट्रस्ट या संस्थेला फुकट देऊन टाकला. आपल्या एका डॉक्टर विद्यार्थ्याच्या हॉस्पिटलच्या सर्वात वरच्या मजल्यावरच्या खोली भाड्याने घेतली आणि स्वतः डाळ भात बनवून मृत्यू येईपर्यंत जगत राहिले. खरे तर तो वाडा विकला असता तर त्यांना करोडो रुपये मिळाले असते. पण आयुष्यभर एक तत्त्वज्ञान उराशी बाळगून जगलेल्या प्रधान मास्तरांनी निस्वार्थीपणे त्यावर पाणी सोडले. पु. लं.नी तर आयुष्यात मिळालेल्या सर्व संपत्तीचा ट्रस्ट केला आणि समाजाकडून मिळालेली सर्व संपत्ती समाजाला परत देऊन टाकली. एक आदर्श जगणे यापेक्षा वेगळे काय असते ?           

        सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहून एकविसाव्या वर्षी जिवंत समाधी घेणारे ज्ञानेश्वर माऊली म्हणजे विरक्तीचे टोक ! त्यांच्या जीवनाचाही सोहळा होता आणि संजीवन समाधीचाही ! जीवनमृत्यूची व्याख्या त्यापलीकडे ती काय करायची? 

अर्थात काही सामान्य माणसेसुद्धा असामान्य पद्धतीने जगतात आणि मृत्यूने आदर्श निर्माण करतात.

  मुंबईत राहणा-या वसंत त्र्यंबक निकुंभ यांनी पंधरा वर्षांपूर्वी दोन्ही हात पसरून मृत्यूचे स्वागत केले होते. आयुर्वेदाचा गाढा अभ्यास असलेले निकुंभ एखाद्या योग्यासारखे ८३ वर्षे जगले. आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे त्यांची रोजची दिनचर्या होती. त्यामुळे त्यांच्या नखात रोग नव्हता. पण एके दिवशी त्यांनी विचार केला की आयुष्यातल्या सर्व जबाबदा-या पूर्ण झाल्या आहेत, लेकी, सुना नातवंडे सारे सुखी आहेत. मग आता जगून काय करायचे ? त्यांनी इच्छामरण घ्यायचे ठरवले. पत्नी जिवंत असताना हा असा निर्णय घेणे म्हणजे आक्रीतच ! व्यवस्थित नियोजन करून एप्रिल महिन्यापासून हळूहळू एकेक खाद्यपदार्थाचा त्याग करत करत चार महिन्यांनी मृत्यूला त्यांनी बोलावून घेतले.या त्यांच्या निर्णयापासून परावृत्त करण्याचा सर्व नातेवाईकांनी खूप प्रयत्न केला पण ते आपल्या विचारांपासून ढळले नाहीत. तोंडी सांगून ऐकत नाहीत हे लक्षात आल्यावर सर्वांनी त्यांना पत्रे लिहिली आणि 'तुम्ही आम्हाला हवे आहात' असे सांगितले तर त्या प्रत्येकाला स्वहस्ताक्षरात त्यांनी लिहिलेली उत्तरे तत्त्वज्ञानाने भरलेली होती. ती आजही वाचायला मिळतात. ज्याने आयुष्य आणि मृत्यू यांच्यातली सीमारेषाच पूर्णपणे पुसून टाकली आहे त्या माणसाचे तत्त्वज्ञान वाचत राहावेसे वाटते. जग हे मिथ्या आहे हे संतांनीच सांगितले पाहिजे असे नव्हे तर आपले आपल्यालाही ते कळू शकते हे वसंत त्र्यंबक निकुंभ यांच्या पत्रावरून आपल्याला कळते. 

        भिवंडीच्या धुंडिराज दीक्षित आणि त्यांच्या पत्नीचा मृत्यूसुद्धा असाच आदर्शवत होता. दोघांनाही कर्करोगाचे निदान झाले आणि त्या दिवसापासून  दोघांनीही औषधोपचार थांबवला. दीक्षितसर सेवानिवृत्त शिक्षक होते. त्यांनी आपल्या  मुलांना सांगितले की कर्करोगावर औषध नाही हे मी मुलांना शिकवायचो. मग मीच  औषधोपचारावर  तुम्हाला खर्च करायला का लावू ? ते पैसे तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी वापरा. आम्ही तृप्त आहोत, आम्हाला जाऊ द्या ! आणि खरोखरच त्या दाम्पत्याने कर्करोगाच्या वेदना शांतपणे सहन करत धीरोदात्तपणे जगाचा निरोप घेतला.

        ज्याला जन्म आहे त्याला मृत्यूसुद्धा आहेच ! जेवढ्या आनंदाने आपण जगण्याचा आनंद घेतो तेवढ्याच आनंदात मृत्यूचेसुद्धा स्वागत करायला हवे आणि आयुष्यभर असे जगायला हवे की मृत्यूसमयी अपराधीपणाची भावना फिरकता कामा नये.

 ~संकलन