दोस्तांनो, १० मार्च हा मराठी सारस्वतातील ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांचा जन्मदिवस. या जगण्यावर शतदा प्रेम करायला शिकवणारे मंगेश पाडगावकर मनाने चिरतरुण होते रसिक वाचकांसाठी ते जगण्याची उमेद बाळगतात. मंगेश पाडगावकरांच्या काव्य आविष्काराला दोन बाजू आहेत. एकीकडे ज्याला अभिजात म्हणता येईल अशी सकस कविता 'जिप्सी','उत्सव' 'सलाम'आणि 'भटके पक्षी' त्यांनी दिलीय .पण त्याचबरोबर सर्वसामान्य काव्यप्रेमी रसिकांशी संवाद साधण्यासाठी 'बोलगाणी' सारखे काव्यसंग्रह दिलेत.बालकांसाठी त्यांनी 'भोलानाथ', 'बबलगम' 'चांदोमामा' यासारखे बालगीत संग्रह प्रसिद्ध केलेत.
'बोलगाणी' हा असाच मनाला मोहिनी घालणारा काव्यसंग्रह. यातली प्रत्येक कविता आपल्या मनाचा ठाव घेते. 'मनमोकळ गाणं' नावाची कविता. या कवितेच्या शीर्षकातच मनमोकळेपणाचा भास आहे.
मनमोकळ गाणं
मन मोकळं अगदी मोकळं करायचं
पाखरु होऊन पाखराशी बोलायचं!
तुमचं दुःख खरं आहे,
कळतं मला,
शपथ सांगतो, तुमच्या इतकंच
छळतं मला;
पण आज माझ्यासाठी
सगळं सगळं विसरायचं,
आपण आपलं चांदणं होऊन
अंगणभर पसरायचं
सूर तर आहेतच: आपण फक्त झुलायचं!
मन मोकळं अगदी मोकळं करायचं
पाखरु होऊन पाखराशी बोलायचं!
असा हा पाखरू होऊन पाखराशी संवाद आपल्याला निसर्गाच्या सानिध्यात घेऊन जातो निसर्गाशी संवाद साधायला लावतो मग आपल्या ओठातून नकळत शब्द निघतात-
" या ओठांनी चुंबून घेईन, हजारदा ही माती
अनंत मरणे झेलून घ्यावी, इथल्या जगण्यासाठी
इथल्या पिंपळ पानावरती
अवघे विश्व तरावे
या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे."
'बोलगाणी' तील प्रत्येक कविता ही पुढे काय ओळ असेल ते वाचण्याची ओढ निर्माण करते. कारण यातल्या प्रत्येक कवितेची शब्दरचना व मांडणी तशाच दर्जाची आहे. 'आपल्या माणसाचं गाणं', 'तरीसुद्धा', 'तू प्रेम केलंस म्हणून', 'जगणं सुंदर आहे', 'चांदणं', या सुरुवातीच्या कविता आपल्या मनाला साद घालतात आणि त्या कविता वाचल्यावर आपण मनापासून त्या कवीला आणि त्या काव्याला भरभरुन दाद देतो. प्रेमात अपयश आलेल्या प्रेमवीराला उद्देशून असलेली कविता-'तू प्रेम केलंस म्हणून'. यात आत्महत्या करणाऱ्या प्रेमवीराला कवी जगण्याची नवी उमेद देतो. एक संजीवनी बहाल करतो.
तू प्रेम केलंस म्हणून
तिचं प्रेम लाभलं नाही? रडू नको,
जीव द्यायला पाण्यामध्ये बुडू नको!
प्रेम केलं म्हणजे
काय केलं?
फुलून आलो!
कुणासाठी आपण जीव टाकला
म्हणजे काय केलं ?
फुलून आलो!
फुलणाऱ्याला फुलावसं वाटलं पाहिजे
फुलणारं प्रत्येक फूल
बघावसं वाटलं पाहिजे
रोग लागल्या झाडासारखा झडू नको!
तिचं प्रेम लाभलं नाही? रडू नको,
जीव द्यायला पाण्यामध्ये बुडू नको!
मंगेश पाडगावकरांच्या 'बोलगाणी' तील कवितांमध्ये निसर्ग आणि प्रेम ओथंबून भरलेलं आहे. व्यक्ती, राष्ट्र आणि समाज यांच्याशी बांधलेली त्यांची कविता केवळ आत्मानुभव मांडत नाही तर निराशेच रूपांतर आशेत करण्याचं प्रचंड सामर्थ्य त्यांच्या 'बोलगाणी' त आहे.
'बोलगाणी'तील कविता या फक्त बोलगाणी नाहीत तर ती जीवनगाणी वाटावी इतकी समरस आहेत. यातील आशावादी, आनंदवादी कविता जीवनात चैतन्य निर्माण करणार्या आहेत.
बालमनालाही वेड लागावं अशाप्रकारच्या काही कविता या 'बोलगाणी' संग्रहात आहेत. त्यात 'चिऊताईसाठी गाणं', 'नसलेल्या आजोबांचं असलेलं गाणं'. 'गोष्ट' या कविता बालकांनाआपल्याकडे आकर्षित करून घेतील अशा आहेत. या कवितांच्या माध्यमातूनच वेगवेगळ्या रुपातील व मांडणीतील भावकवितांनी पाडगावकरांनी रसिकांना, वाचकांना आपलंसं केलंय. 'बोलगाणी' तील कविता दैनंदिन जीवनाशी संबंधित आहेत त्यामुळे काव्यप्रेमी रसिक ज्यावेळी त्या वाचतो त्यावेळी त्याला आपल्या जीवनातील प्रसंगाची आठवण होते.आता 'नसलेल्या आजोबांचं असलेलं गाणं' ही कविताच बघा ना!
नसलेल्या आजोबांचं असलेलं गाणं
जेवताना आजोबा लाडात येत
मला आपल्या ताटातली भाकर देत,
जेवता जेवता मधेच थांबत
आणि एक भला मोठा ढेकर देत!
मी म्हणायची रागावूनः
" आजोबा, बॅड मॅनर्स,
व्हॉट आर यु डुइंग?"
आजोबांचं हसून उत्तर:
" आय एम जस्ट ढेकरिंग!"
आजोबांच्या खोलीत आता
धुकं... धुकं ...धुकं...
आजोबांचं जग सगळं
मुकं... मुकं... मुकं...
या कवितेत एकीकडे काहीअंशी विनोद आहे त्याचबरोबर नसलेल्या आजोबांचं दुःखही आहे. अशाप्रकारचे नित्याचे अनुभव आपल्याला अंतर्मुख करतात आणि आपल्याला भूतकाळातील आठवणीत रमायला लावतात. या शब्दबद्ध मांडणीतील पाडगावकरांची प्रतिभा विलक्षण आहे. मंगेश पाडगावकरांनी अक्षर आणि कागदावर अडकलेली कविता सर्वसामान्य लोकांपर्यंत नेऊन ठेवली. त्यांची एक गझल आहे. त्यात ते म्हणतात-
हे खरे की खूप माझे हाल झाले, ना कधी गाणे परी बेताल झाले.
हे खरे की हा खिसा होता रिकामा, हृदय हे नाही परी कंगाल झाले.
अशा या दिलदार कवीची सदाबहार गाणी आपण 'शुक्रतारा' यातही ऐकलेली आहेत.मित्रांनो, हल्ली आपल्याला जगावं कसं आणि वागावं कस हेच समजत नाही. हे समजून घ्यायचं असेल तर याचं मार्गदर्शन आपल्याला 'बोलगाणी'तूनच मिळेल. 'शहाणपणाच गाणं' या आपल्या कवितेत पाडगावकर म्हणतात-
शहाणपणाच गाणं
माणसाने शहाण्यासारखं वागावं
आणि मग या जगात आनंदाने जगावं!
वाट इथली बिकट असते हे काय मला ठाऊक नाही?
पावलोपावली कटकट असते हे काय मला ठाऊक नाही?
ठाऊक आहे म्हणून तर
लागतं हे सांगावं:
माणसाने शहाण्यासारखं वागावं
आणि मग या जगात आनंदाने जगावं!
अहो एवढेच काय, तर वार्धक्यालाही शब्दांचा आधार देऊन तारुण्य बहाल करणारी कविता पाडगावकरांनी केलीये 'म्हातारपणावरचं तरुण गाणं' या माध्यमातून.
म्हातारपणावरचं तरुण गाणं
येतं म्हटलं की येऊ लागतं म्हातारपण
घेतं म्हटलं की घेऊ लागतं म्हातारपण!
हिरवं पान
कधीतरी पिकणारच,
पिकलं पान
कधीतरी गळणारच,
गळलं पान,
मातीला हे मिळणारच...
झाड कधी कण्हत का?
कधी काही म्हणतात का?
गिरक्या गिरक्या घेत घेत
नाचत जातं पिकलं पान,
कविता पिवळी पिवळी धमक
वाचत जातं पिकलं पान
नेतं म्हटलं की नेऊ लागतं म्हातारपण,
येतं म्हटलं की येऊ लागतं म्हातारपण-
तरुण असलो की तरुण असतं म्हातारपण,
रडत बसलो की करुण असतं म्हातारपण!
येतं म्हटलं की येऊ लागतं म्हातारपण
घेतं म्हटलं की घेऊ लागतं म्हातारपण!
ही कविता म्हातारपणातही आनंदानं, उत्साहानं जगण्याचं तंत्र शिकवते. भावगहिऱ्या, सुरेल व गेय कविता रचणाऱ्या पाडगावकरांनी 'बोलगाणी' च्या रुपाने रसिकांना कविता ऐकायला, गुणगुणायला ही शिकविले. 'ऐकणारे कान'ही तयार केले. नवीन कवींना आत्मसात करण्याचा मोह व्हावा असे अनेक तंत्र-मंत्र त्यांनी यात हाताळले आहेत. रडत रडत जगायचं की, कण्हत कण्हत जगायचं की हसत हसत ...? असं विचारणारा हा आशावादी, आनंदवादी कवी सगळ्यांना भावणारा आहे.
मित्रांनो, अलिकडच्या काळात आपल्या देशाला दहशतवादाने घेरलंय याचीही जाणीव 'आत्ताचा हा क्षण' या कवितेत त्याचप्रमाणे 'अजून तुझा हात आहे' या दोन कवितांमध्ये पाडगावकर यांनी व्यक्त केलीय.
आत्ताचा हा क्षण
अवतीभवती भेटणार्या
हिंस्र दंगली;
ऐटदार पोशाखातली
माणसं जंगली;
कधी हा सूर्य
थंड राख होऊन जाईल;
कधीही पृथ्वी
जळून खाक होऊन जाईल...
आत्ताचा हा क्षण केवळ तुमचा आहे:
तुळशीच्या रोपाला
थोडं पाणी घालून या;
ओल्या मऊ मातीतून
अनवाणी चालून या!
या कवितेच्या माध्यमातून वर्तमानात आपल्या हातात असलेल्या क्षणांची जाणीव पाडगावकरांनी आपल्याला करुन दिलीय. म्हणूनच बोल गाडीतील कविता वाचलेले क्षण आणि त्या क्षणांचे संदर्भ जपण्यासारखे आहेत.
प्रेम हा जीवनातला एक अविष्कार आहे. तो लावण्याचा शृंगार आहे. तो व्यक्त करता येण हा त्या अविष्काराचाच एक भाग आहे. प्रेमाची महती बोलगाणीतील कवितांमध्ये पाडगावकर यांनी पटवून दिलीय. 'प्रेम म्हणजे प्रेम असतं' या कवितेत ते म्हणतात:
प्रेम म्हणजे प्रेम असतं
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेमअसतं
तुमचं आणि आमचं अगदी 'सेम' असतं!
मराठीतून इश्श म्हणून
प्रेम करता येतं;
उर्दूमधे इष्क म्हणून
प्रेम करता येतं;
व्याकरणात चुकलात तरी
प्रेम करता येतं;
कॉन्व्हेंटमधे शिकलात तरी
प्रेम करता येतं!
'लव्ह' हे त्याचंच दुसरं 'नेम' असतं,
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं अगदी 'सेम' असतं
अशा या प्रेमाची महती 'बोलगाणी'तील 'प्रेमात पडलं की...', 'तुमचं काय गेलं?' अशा कवितांमध्ये त्यांनी पटवून दिलीय.
'विदूषकाचं आत्मकथन' ही कवितादेखील जगण्याचं मर्म सांगणारी आहे.
आपल्या आयुष्यात कधीकधी असे क्षण येतात की जे आपल्याला अनपेक्षित असतात.आपल्या मनासारख्या गोष्टी घडत नाही. तेव्हा आपण उदास होतो आणि हताश होतो. अशावेळी परिस्थिती बदलत नसेल तेव्हा आपली मनस्थिती बदला जीवन हे आनंदमय होईल, असा संदेश कवी आपल्या 'सांगा कसं जगायचं?' या कवितेतून रसिकांना देतात. जीवन सकारात्मक विचारांनी जगलो, तर जीवन जगण्यासारखा आनंद नाही आणि रडत बसलो तर जीवन जगण्यासारखे दुःखही नाही. म्हणूनच कसं जगायचं हे आपणच ठरवायचं असतं. यासाठी सदर कवितेत कवीने आपल्यापुढेच आपल्या आनंदासाठी पर्याय ठेवलेले आहेत. जीवन कसं जगायचं याचं उत्तम मार्गदर्शन या कवितेत आहे.
सांगा कसं जगायचं
सांगा कसं जगायचं ?
कण्हत कण्हत
की गाणं म्हणत?
काय काय तुम्हीच ठरवा!
काळ्याकुट्ट काळोखात
जेव्हा काही दिसत नसतं,
तुमच्यासाठी
कोणीतरी
दिवा घेऊन उभं असतं!
काळोखात कुढायचं
की प्रकाशात उडायचं?
तुम्हीच ठरवा!
पेला अर्धा
सरला आहे
असं सुद्धा म्हणता येतं;
पेला अर्धा
भरला आहे
असं सुद्धा म्हणता येतं!
सरला आहे म्हणायचं
की भरला आहे म्हणायचं?
तुम्हीच ठरवा!
सांगा कसं जगायचं ?
कण्हत कण्हत
की गाणं म्हणत?
तुम्हीच ठरवा!
मित्रांनो, हा आशावादी दृष्टिकोन जगणं शिकवतो. कवीचं जगणं आणि लिहिणं ही कधीही वेगळी आणि स्वतंत्र खाती नसतात त्यांच्या जगण्यातून कवितेला आणि कवितेतून जगण्याला कधीही वगळता येत नसते. हे जगणं आणि लिहिणं एकजीव होतं तेव्हाच मंगेश पाडगावकर यांच्यासारखे कवी जन्माला येत असतात. तर मग वाचणार ना या जिंदादिल कवीची सदाबहार बोलगाणी.! शुभेच्छा. भेटूया.
आपला अभिप्राय माझी ऊर्जा
प्रसादजी खूप सुंदर समिक्षा केलीय आपण "बोलगाणी"ची. हा कवितेचाच परीचय नाही तर कविच्या एकूणच शैलीचा घेतलेला समर्पक आढावा आहे. कवितेला घराघरात पोहचविणं आणि लोकांच्या मनात पोहचविणं हे काम आदरणीय पाडगावकरांनी केलं आहे.
ReplyDeleteमी भाग्यवान आहे की मा. पाडगावकरांचा "बोलगाणी" च्या पुणे येथील प्रकाशन कार्यक्रमाला उपस्थित होतो. त्यांनी त्याची स्वाक्षरी केलेली कॅसेट मला भेट दिली होती. आपल्या लेखनाने माझ्या त्या सुवर्णस्मृतींना उजाळा मिळाला. धन्यवाद!
मनःपूर्वक धन्यवाद चौधरी सर. सांगायला आनंद वाटतो की मीही कविवर्य मंगेश पाडगावकर यांची त्यांच्याघरी भेट घेतलीय. त्यांची दोन पत्रोत्तरंही मला आलीयेत. आपली ही प्रतिक्रिया म्हणजे एका सिद्धहस्त लेखकाचा लाखमोलाचा आशीर्वाद आहे माझ्यासाठी आणि खरंतर ही ऊर्जा आहे माझी. या मनमोकळ्या,दिलखुलास प्रतिक्रियेचा खूप आनंद वाटला. शुभेच्छा. भेटुया.🌸🌺🌸👏🙂
Delete📘📚📖🗒️✒️
~प्रसाद वैद्य