My YouTube Channel

Click here to visit My YouTube Channel

Tuesday, 28 May 2024

विवेकानंद विद्यालयातील विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश ; 100% टक्के निकालाची परंपरा कायम

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत (SSC-मार्च 2024) विवेकानंद विद्यालयातील विद्यार्थी सत्यम संजय सोनवणे जळगाव जिल्ह्यात प्रथम...सहर्ष अभिनंदन...शुभेच्छांसह...!
चोपडा ( प्रतिनिधी ) - माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल (SSC मार्च 2024) नुकताच ऑनलाईन जाहीर झाला. यात विवेकानंद प्रतिष्ठान व संशोधन केंद्र संचलित, विवेकानंद विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. परंपरेनुसार याही वर्षाचा विद्यालयाचा  निकाल 100% लागला असून सत्यम संजय सोनवणे याने 99.40 % गुण प्राप्त करत जिल्ह्यात व विद्यालयातून सर्वप्रथम येण्याचा बहुमान प्राप्त केला आहे.

विद्यालयातील यशवंत विद्यार्थी पुढीलप्रमाणे- 
तनिष पवन लाठी 98.20%, (तालुक्यात तृतीय व विद्यालयात द्वितीय
मोईन मुनिर तडवी 97.40% (विद्यालयात तृतीय)
अवनी अजित वानखेडे 96.40% (विद्यालयात चतुर्थ व मुलींमध्ये सर्वप्रथम)  

90 % च्या पेक्षा अधिक गुण मिळवणारे  33 विद्यार्थी 
कृतिका किशोर माळी 95.40% 
पियुष मधुकर माळी 95.20% 
नेहा महेश पाटील 94.60%
लावण्या निलेश पाटील 94.60%
लतिका सतीश निकम 94.40
उन्नती विकास पाटील 94.40 
जैनब जावेद तडवी 94.20
जयंती बाळकृष्ण पाटील 93.80 
राज पंकज चौधरी  93.80 % 
तेजस संजय चौधरी 93.60 %
मयुरेश सुनील नाईक 93.60 % 
पूर्वा मच्छिंद्र पाटील 93.40 %
ओम शरद जगताप 93 % 
यश किरण पाटील 92.80
भूमिका अतुल चौधरी 92.60 %
प्रथमेश गजानन पाटील 92.60 % 
मोहिनी राहुल साळुंखे 92.40 
पूर्वा राजेश महाजन 92.20 
हर्षित अरुण विसावे 91.40 % 
आदिती सतीश चौधरी 91.20% 
तनुजा प्रवीण रघुवंशी 91% (इंग्रजी या विषयात 95/100 गुण मिळवून तालुक्यात प्रथम) 
समर प्रदीप धनगर 91%,
पूनम सिद्धार्थ पालीवाल 90.80%
सुप्रीत अनिल देशमुख 90.80% 
चैतन्य दिनेश पाटील 90.60% 
हितेश हेमंत माळी  90.40% 
प्रणल शरद पाटील  90.20%
श्रुती नरेंद्र देशमुख  90.20%
वैष्णवी चंद्रभान रायसिंग 90.20%

विद्यालयातील एकूण 134 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ठ झाले होते त्यापैकी विशेष योग्यतेत 58 विद्यार्थी, प्रथम श्रेणीत 31 विद्यार्थी, द्वितीय श्रेणीत 08 विद्यार्थी, तर 04 विद्यार्थ्यांना उत्तीर्ण श्रेणी प्राप्त झाली. 
तसेच एकूण 89 विद्यार्थ्यांना कला व संगीत विषयाच्या वाढीव सवलतीच्या गुणांचा लाभ झाला.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या आईबाबांचे, कुटुंबियांचे व सर्व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन व कौतुक संस्थेचे अध्यक्ष डॉ.विकास हरताळकर, संस्थेचे माजी अध्यक्ष डॉ.विजय पोतदार, उपाध्यक्ष घनश्याम अग्रवाल, सचिव ॲड. रवींद्र जैन, सहसचिव डॉ.विनीत हरताळकर, सर्व विश्वस्त, संस्थेचे विश्वस्त व माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक नरेंद्र भावे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती आशा चित्ते, ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य पी.जी.पाटील, इंग्लिश मिडियमच्या प्राचार्या सुरेखा मिस्त्री, बालवाडी विभागाच्या मुख्याध्यापिका माधवी भावे,सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारीवृंद, पालकवृंद, स्नेहीजन यांनी केले.

विविध वर्तमान पत्रात प्रसिद्ध झालेल्या बातम्या (सर्व पत्रकार बांधवांचे मन:पूर्वक आभार)






नवराष्ट्र दि.२८ मे २०२४ नाशिक पान क्र.२

डिजिटल बातम्या लिंक -Lokप्रवाह   S महाराष्ट्र 7 न्यूज



Sunday, 26 May 2024

मधले बेंचर्स

संकलन-प्रसाद वैद्य 

मानवी मूल्यांचा नंदादीप-कस्तुरीगंध

 संकलन- प्रसाद वैद्य

[1:12 pm, 26/05/2024]

Prasad Suresh Vaidya: 

आदरणीय मनीषा ताई,😊👏

सस्नेह नमस्कार.

दैनिक गावकरी आस्वाद (दि.२६ मे २०२४) यातील 'मानवी मूल्यांचा नंदादीप-कस्तुरीगंध' हे प्रा. बी. एन. चौधरी लिखित पुस्तकाचा परिचय करुन देणारं आपलं परीक्षण वाचलं. सांगायला अतिशय आनंद वाटतो की आपण इतक्या छान शब्दांत पुस्तकातील कथांचं वर्णन केलंय की वाचकाला हे पुस्तक वाचण्याची उत्सुकता वाटेलच परंतु हा लेख वाचूनच ते पुस्तक वाचल्याचा अनुभव यावा. मूळात चौधरी सर म्हणजे साहित्याच्या सर्व प्रांतात मुक्त विहार करणारा संवेदनशील आणि चोखंदळ लेखक/ कवी असंच मी म्हणेन. तसा उल्लेख आपणही या लेखाच्या सुरुवातीला केलाय. 

अतिशय सहज आणि समर्पक शब्दात आपण या पुस्तकाचं खूप सुंदररीतीने परीक्षण केलंय. संवेदनशील, काळजाला  भिडणाऱ्या लेखनाला आवर्जून दाद द्यावीशी वाटली. म्हणूनच आपलं सहर्ष अभिनंदन. आपल्या आगामी लेखन कार्याला व उपक्रमांना सस्नेह शुभेच्छा.

📙📚📖📋✍🏻

~प्रसाद वैद्य 

चोपडा जि.जळगाव 

📱९४२०११२२१५

[2:03 pm, 26/05/2024] 

मनीषा कुलकर्णी/आष्टीकर: 

प्रसादजी ,

किती सुंदर अभिप्राय दिलात तुम्ही.मनापासून आभार.खरंतर असे प्रेरणादायी अभिप्राय वाचन आणि लेखनास बळ देतात.

तुम्ही एक उत्तम वाचक आहात याची खात्री पटते.

[7:56 pm, 26/05/2024] 

प्रा. बी. एन. चौधरी:

प्रसादजी शुभ संध्या.

आपला अभिप्राय मनभावन आहे. आपण या समिक्षणाला आपल्या ब्लॉगवर प्रसिध्दी देवून याचे उचित मुल्यमापन केले आहे. धन्यवाद.! 

मनिषाताईंनी केलेलं आस्वादक समिक्षण ही संग्रहाला मिळालेली रसिकतेची पावती आहे. खरतर, यापुर्वी त्यांची आणि माझी ओळखही नव्हती.

खरंतर, लेखक धरणगावचा, प्रकाशक पुण्याचे, समिक्षिका परभणीच्या आणि लेखन प्रकाशित झालं ते दैनिक नाशिकचं. हा निखळ मैत्रीचा चतुष्कोण आहे. हीच आपली श्रीमंती.!\

ब्लॉगवर प्रतिक्रिया नोंदविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे ते शक्य होत नाही. ऋणातच राहतो. 

🌷🌷🌷🙏🌷🌷🌷

देवरुप परिवार, धरणगाव.

Saturday, 11 May 2024

चोपडा

 चोपडा 

सातपुड्याच्या कुशीत पहुडलेले, ऐतिहासिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक, इ. अशी बहु मुखी ओळख असलेले अंकलेश्वर ते बुर्हाणपुर ह्या महामार्गावर व रत्नावती काठी वसलेले ते चोपडा. 

एकेकाळी पाटील गढी, सुंदर गढी, मल्हार पुरा व मोठा देव्हारा अशा चार पाड्यात विभागलेले पण नंतर चार पाडे एकत्र येऊन चौपाडा व अपभ्रंश होऊन चोपडा म्हणून नावारूपाला आले. आज दुर्दैवाने या लेखातील काही गोष्टी अस्तित्वात नसतील ही. पण एके काळी चोपड्यचा इतिहास हा अति वैभवशाली नसला, तरी विविध परंपरांनी भरलेला होता. 

चोपडा तालुका श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेला व त्याची साक्ष म्हणजे चोपड्यापासून ९/१० कि. मी अंतरावर असलेले उनपदेव येथिल उष्ण पाण्याचे झरे. शरभंग ऋषींना रोगमुक्त करण्यासाठी प्रभु श्रीरामांनी आपल्या बाणांनी उष्ण पाण्याचे झरे निर्माण केले. अशी एक आख्यायिका आहे.

अटलबिहारी वाजपेयी, बाळासाहेब ठाकरे, शत्रुघ्न सिन्हा, कांचीपुरमचे शंकराचार्य अशी नामवंत व्यक्तींच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे.

चोपडा शहरात दोन यात्रा प्रामुख्याने प्रसिद्ध एक रथ यात्रा व दुसरी हरेश्र्वरची. परंपरेनुसार रथयात्रा दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी काढली जाते. गोल मंदिर जवळिल मोठ्या बालाजी मंदिरापासून ही यात्रा सुरू होते. रथयात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे रथारुढ श्री बालाजींना केळी प्रसाद रुपाने अर्पण करणे. व केळ्यांचाच प्रसाद जनतेला वितरण करण्यात येतो. यात्रा म्हणजे उत्साह....खाद्यपदार्थांचे स्टॉल... विविध वस्तू
खरेदी.... झोके-पाळणे यात बसून आनंद घेणे. या यात्रेचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही कितीही मौजमजा, खरेदी करा पण जर तुम्ही परत जाताना गोडशेव घेऊन गेला नाही तर यात्रेत सहभागी झाल्याचे समाधान नाही. कारण गोडशेव हे खानदेश मधील एक मिष्टान्न होतं, नाही अजूनही आहे, म्हणून तिचं महत्त्व मात्र नाकारता येणार नाही. 

आणखी एक, यात्रा म्हटली की हरेश्र्वरची. श्रावणाच्या प्रत्येक सोमवारी भरणारी.हवेने भरलेले फुगे वा 'काकडी सदृश्य फुल्यांची नळी' एखादं पदक मिळाले असा आनंदात मिरवला जायचे. या जोडीला कर्कश्श आवाज करणार्याय पिपाण्या परिसर दणाणून सोडत. वेगळीच मजा होती ती! या हरेश्र्वरचे भाग्य वर्षभरात फक्त ह्या चार वा पाच दिवशी उजळायचे. एरवी फक्त सकाळी महादेवाला जलार्पण करणारे अन्यथा कोणी फारसे जात नसत. 

भारतीय स्वातंत्र्योत्तर काळात पहिल्या काही लोकसभा निवडणुकीच्या वेळी चोपड्याचा समावेश धुळे मतदार संघात होता. श्री. चुडामण आनंदा पाटील हे दोन वेळा तात्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरूंच्या पेक्षा जास्त मताधिक्याने विजयी झाले होते. याची दखल घेत या घटनेचा उल्लेख स्वतः पंडितजींनी केला होता. नंतर पुनर्रचनेत एरंडोल लोकसभा मतदार संघात चोपड्याचा समावेश केला गेला. तेथूनच जनता पार्टीच्या झंझावातात सोनु सिंह पाटील निवडुन ही आले व गृहराज्यमंत्री झाले.

सौ.शरद्चंद्रिकाअक्का पाटील यांनी महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात शिक्षण मंत्रालयआणि मा.श्रीअरूणभाई गुजराती यांनी नगर विकास व अर्थ असे महत्वाचे विभाग हाताळले आहेत.तसेच महाराष्ट्र राज्य विधानसभा अध्यक्ष पद ही भुषविले आहे. चोपडा म्हणजे अरुणभाई गुजराथी असं एक अलिखित समीकरणच बनले होते. चोपडा मतदार संघातून सलग चार वेळा निवडून आलेले ते एकमेव आमदार. मी ज्या वेळेस माझी ओळख चोपडेकर म्हणून देताच समोरची व्यक्ती अरुणभाईंच चोपडा का? अशी पृच्छा करतो.
 
१९६७ साली चोपडा विधानसभा मतदार संघाच्या काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी पहिल्यांदाच त्यावेळेसचे मुख्यमंत्री स्वर्गवासी वसंतराव नाईक हेलिकॉप्टरने चोपडयाला आले होते चोपड्याच्या जनतेला हेलिकॉप्टरचे दर्शन त्यावेळेस पहिल्यांदाच झाले. सभेत वसंतराव नाईक काय बोलले यापेक्षा हेलिकॉप्टरने उडालेला धुरळा व हेलिकॉप्टर बघून जनता धन्य धन्य झाली. परंतु काँग्रेसच्या उमेदवाराला त्या हेलिकॉप्टरचा धुरळ्याचा फायदा झाला नाही. अपक्ष उमेदवार मगनलाल नगिनदास गुजराती यांनी बाजी मारली होती.

चोपड्यामध्ये तसे सर्व राजकारणी व चोखंदळ आहेत. तासनतास राजकीय गप्पा झाडणे, आपले मत हिरीरीने मांडणे हा येथील लोकांचा आवडता छंद आहे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. नगरपालिका, खा. शि. मंडळ, पिपल्सअर्बन बँक, पंचायत समिती, जिल्हा परिषद... इ.ची निवडणूक म्हणजे आयते खाद्य! 

चोपडा नगरपालिका ही सुद्धा एक फार जुनी स्थानिक स्वराज्य संस्था आहे. 

चोपडा शहरातील पाटील गढी, सुंदर गढीचे बुरुज हे एक ऐतिहासिक शहर असल्याचं सांगत होते. आज त्याची अवस्था व खाणाखुणा जर्जरीत आहेत. कुणास ठाऊक! लोकांनी त्याच्या विटा पळवून नेल्या असाव्यात. ऐतिहासिक वास्तूंची जपणूक करण्याची आपली मानसिकताच नाही. 

दानशूर, श्रीमंत प्रताप शेठजीं चोपड्याचे. पण चोपड्याला रेल्वे व त्याकाळी तापी नदीवर पुल नसल्याने त्यांनी अमळनेर येथे प्रताप मिल काढली. व पुढे प्रताप शाळा, काॅलेज काढली होती. अन्यथा ह्या सर्व गोष्टी चोपडा येथे असत्या व चोपडा हे जळगाव जिल्ह्यातील एक मोठे शहर म्हणून ओळखलं गेले असते, असो ह्या जर तरच्या गोष्टी. पण एक खरे दळणवळण नसल्याने चोपड्याची आर्थिक प्रगती वेग धरू शकली नाही.

गांधी चौकात असलेले नगर वाचन मंदीर हे साहित्य व वाचन क्षेत्राची आवड असणार्यांोंसाठी फार मोठा आधारस्तंभ आहे. येथेच व्याख्यान माला आयोजित केली जाते. अनेक मोठ्या लेखकांची व्याख्याने मी अमरचंद सभागृहात ऐकली आहेत. साहित्य विषयक जाणीवा समृध्द होण्याचं ते फार मोठे साधन होतं. त्याद्वारे मोठ्या प्रमाणावर मी ज्ञान व विचारधन याची बांधलेली शिदोरी अजून ही पुरत आहे. गांधी चौकात राजकीय सभा अनेक मोठमोठ्या नेत्यांनी गाजवलेल्या बघून अनुभवल्या आहेत. 

चोपडा हे शैक्षणिक क्षेत्रात उशिरा प्रसिद्ध झाले. शरद्चंद्रिका पाटील शिक्षण मंत्री झाल्यावर शिक्षण क्षेत्राला चालना मिळाली. जिल्हा परिषदेच्या ४ व एक खाजगी प्राथमिक शाळा, २ दोन माध्यमिक एवढ्यावर चोपड्याची शैक्षणिक तहान भागवण्यासाठी होती. प्रताप विद्या मंदिर सर्वात मोठी, जुनी शैक्षणिक संस्था. अनेक विद्यार्थ्यांनी येथून शिक्षण पूर्ण करून आपापल्या क्षेत्रात नाव कमावले आहे. पुणे बोर्डाच्या परीक्षेत मेरिट लिस्टमध्ये एखादा तरी विद्यार्थी असायचा व ते ऐकून पुर्ण चोपडा शहर गर्व अनुभव करीत असे. दुसरी म्युनिसिपल हायस्कूल, आपला खारीचा शिक्षण वाटा उचलत असे. 

संपूर्ण महाराष्ट्रात प्रताप विद्या मंदिरचे नाव अजूनही मानाने घेतले जाते. २००२ मध्ये ७ विद्यार्थी मेरीट लिस्ट मध्ये प्रताप विद्या मंदिरचे होते.

चोपडा काॅलेजचा विद्यार्थी म्हणून मिळणारा मान मी स्वतः अनुभवला आहे. चार दिवस भरगच्च कार्यक्रम असलेले गॅदरिंग हे एक इतर काॅलेजपेक्षा वेगळं वैशिष्ट्य असावं. 

चोपडा येथे मोठे सांस्कृतिक कार्यक्रम नाटकं हे प्रताप विद्या मंदिर प्रांगणात आयोजित करण्यात येत असे. सुलोचनाबाई चव्हाणांचा लावण्यांचा बहारदार कार्यक्रम आणि प्रमिला दातार यांचा 'सुनहरी यादे' हा ऑर्केस्ट्रा, झंकार यांची मजा काही औरच होती. 

प्रायोगिक व व्यावसायिक नाटकांचाही सहभाग असे. त्याद्वारे मला येथे बऱ्याच मराठी नाटकांचा आस्वाद घेता आला. प्रभाकर पणशीकर, शरद तळवलकर, दादा कोंडके, निळू फुले, रंगनाथ कुलकर्णी अशा अनेक नामवंत कलाकार ह्या डोळ्यांनी पाहत त्यांची अभिनय कला मनात साठवली आहे.

या व्यतिरिक्त चोपडा शहराची इतर आणखी काही खास वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत. त्यातील आता किती शिल्लक आहेत, हे चोपडा येथील रहिवासी मित्र सांगू शकतील. 

श्रीराम नवमीला दुपारी बारा वाजता गांधी चौक येथील राम मंदिरात अलोट गर्दी व्हायची तर हनुमान जयंतीला तापीचा मारूती येथे हमखास गर्दी होत असे. सकाळी सकाळी सहा सात वाजता सायकल चालवत वाट बसने मारुतीचे दर्शन घेण्यासाठी भक्ती भावाने जाण्याची मजा बरेच जण घेत होती. 

चोपडा शहरातील गांधी चौक जवळ फार जुनें एक मंदिर म्हणजे श्री रोकड बालाजी मंदिर. असं म्हणतात ह्याच मंदिरात चोपड्याचे श्रीमंत व्यक्ती प्रताप शेठ यांना बालाजींचे विशेष आशिर्वाद लाभले. त्यांनी दिलेल्या भरघोस रोकडा देणगीने नावारूपाला आले. असं म्हणतात येथे रोकडा फळ मिळते म्हणून

रोकड बालाजी असे नामकरण झाले. पण मंदिराचे ट्रस्टी श्री मोतीलाल महाराज यांचें अचानक तरुण पणी निधनानंतर पुढे भाऊबंदकी मध्ये अडकले व वाताहत झाली. चोपडा शहरातील पहिली प्रिटींग प्रेस व फोटो ग्राफी काढण्याचे श्रेय त्यांना म्हणजे श्री मोतीलाल महाराज यांना आहे. 

७०/७२ साली ११वीच्या बोर्डाच्या निकालाच्या आदल्या दिवशी वृत्त पत्र विक्रेते २५ पैसे देऊन निकाल पाहण्यासाठी गर्दी करत असु. नंतर ७३ पासून १० वीच्या निकाल एक रुपयात पाहून समाधान घेत. चांगला धंदा त्या एका दिवसात वृत्त पत्र विक्रेते करीत असे. 

आशा व स्वस्तिक थिएटर हे चोपडा येथील चित्रपट करमणूक करणारी केंद्रे. हयांच्या समोरच्या दुकानात गरम भजी व नंतर सोडा पिऊन धन्य धन्य होता यायचं. 

गणेशोत्सव म्हटलं म्हणजे व्यापारी यांचा गणपती त्यांच्या वैशिष्ट्यांनी भरलेल्या डेकोरेशनसाठी प्रसिद्ध होते. बहुतेक वेळा पहिला मान विसर्जनाच्या मिरवणुकीत मिळत असे. चोपडा येथे गणेशोत्सव पाच दिवसांचा. विसर्जनाच्या मिरवणुकीत गुलालाची उधळण पुर्ण रस्ता गुलाबी

करायला पुरेसी होती.  

चोपडा हे जिल्ह्यातील पांचव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. व्यावसायिक व व्यापारी केंद्र आहे. दादर म्हणजे रब्बी ज्वारी हे चोपडा परिसरात पिकणारं अतिशय स्वादिष्ट अन् कसदार धान्य. ज्वारीची भाकरी व कांद्या बरोबर हिरव्या मिरच्या चार ठेचा हा इथल्या शेतकऱ्यांचा शिदोरीचा अभिन्न हिस्सा. कपाशी ह्या पांढऱ्या सोन्याची म्हणजे नगदी पिकांची मोठी

बाजारपेठ आहे. शहरात आणि तालुक्यात दोन सुत गिरण्या आहेत. एकेकाळी २० च्या जवळपास जिनिंग व प्रेसींग तीन पाळ्यांमध्ये धडधडत. 

रविवारच्या आठवडे बाजारात वस्तु विकून चार पैसे गाठीला जोडलेले, सायंकाळी आपल्या खेडेगावी परतणारे शेतकरी, व्यापारी मंडळी तसेच खेडोपाड्यातून आठवड्याभराची खरेदीसाठी आलेली जनता पंजाबी चहा 

पिऊन दिवसभरात आलेला थकवा घालवत असे. त्यातल्या त्यात मालापूर सम सातपुड्याच्या अंर्तगत भागात राहणारी पावरा अन् इतर आदिवासी त्यांच्या विशिष्ट पद्धतीचा , बाट्ट्या, आहडी, हाकूल अशा अलंकारांनी युक्त पेहराव आकर्षण निर्माण करत असे. पावरा नृत्य व संगीत आतातर चोपडा परिसरातील लग्न वा तत्सम कार्यक्रमात अनिवार्य आहे.

आणखी काय काय लिहू? मला हे नक्की माहीत आहे की, चोपड्याची सर्वच वैशिष्ट्ये या लेखात आलेली नाहीतच. अजूनही अशी अनेक खास वैशिष्ट्ये असतील, जी मला माहीत नाहीत किंवा स्मृती पलीकडे गेल्या वाट लेख लिहिण्याच्या ओघात मागे पडली असतील. 

जशी काही जुनी वैशिष्ट्ये नष्ट झाली असतील तशी काही नवीन निर्माणही झाली असतील.  

एक मात्र नक्की, हे शब्द म्हणजे आठवणींच्या ढिगाऱ्यातून उपसून झाल्यावर लिहिलेल्या ओळी आहेत. बऱ्याच आठवणी काळाच्या ओघात नष्ट होऊन वाहून गेल्या असतील. पुन्हा एकदा भेट देउन अशा तीव्र आठवणी भावना मनात जाग्या होतील याची मला खात्री आहे.  

आम्ही चोपडेकर आहोत' असा अभिमान पुणे करांसारखा ज्वाज्वल्य अभिमान बाळगायला हरकत नाही

©ओमप्रकाश शर्मा






~संकलन - प्रसाद वैद्य 

Wednesday, 1 May 2024

विवेकानंद विद्यालय, चोपडा संवाद पत्र २०२४

विवेकानंद विद्यालय, चोपडा संवाद पत्र २०२४
 

रसिकहो,
सस्नेह नमस्कार.
विद्यालयात वर्षभरात संपन्न झालेल्या कार्यक्रमांचा आढावा म्हणजे हे संवाद पत्र हे पत्र वाचताना आपल्याला काय वाटलं याबद्दल आपला अभिप्राय, प्रतिक्रिया. सूचना Comment Box मध्ये नक्की नोंदवाव्यात. आपला अभिप्राय हीच आमची ऊर्जा आहे.