My YouTube Channel

Click here to visit My YouTube Channel

Thursday, 17 November 2022

काय असते गिरनार वारी....?

 🌹 " काय असते गिरनार वारी....?"🌹

नेहमी गिरनार जायचे म्हटले की काही जण म्हणतात काय वेड लागले की काय दर 2 महिने झाले की गिरनार ला पळतोस!!!!!...     

हो आमच्या भाषेत वेडच ते आणि आम्ही तेच वेडे आहोत... नाहीतर तुम्ही शहाणे तिथे जालच कश्याला? बरोबर ना?   कारण...(वेळेला वेडेच उपयोगी येतात आणि शहाणे पळून जातात) 

काय मिळतं तिथे सारखं जाऊन?  काम धंदे सोडून पळतात तिकडे ते... 

अस काय आहे गिरनार?

अहो काम धंदे सोडून कोणी जात नाही तर आमच्या गिरनारी साठी वेळ काढून जातो दर्शनासाठी... जिथे प्रत्येक पायरी चढतांना चांगली, वाईट केलेली कर्म आठवतात ना ते आहे गिरनार...


 तिथे गेल्यावर आठवतं व चांगली बुद्धी जागृत होते ते आहे गिरनार... 

       जीवनातली सगळी दुःख विसरून, रोजची घरातली,बाहेरची कटकट विसरून 5 दिवस जो सुखाने जगतो ना, जिथे सुख,समाधान मिळतं ना ते आहे गिरनार... 

भक्तीमय वातावरणात राहून जो आनंद मिळतो ना ते आहे गिरनार...

श्रीमंत,गरीब जिथे एकत्र येतात ना ते आहे गिरनार...

      सगळ्या सुख दुःखांची जिथे बेरीज वजाबाकी करून सुद्धा शिल्लक काही राहत नसेल, तरी सुध्दा काहीतरी मिळतं ते आहे गिरनार....

        आरोग्याच्या तक्रारी, नोकरीत बढती, व्यवसायात वाढ, मुलांची शिक्षणं, लग्न, घरदार सगळं काही मनासारखे होते जिथे गेल्यावर ते म्हणजे गिरनार.... 

       ढोपरं दुखतात,दम लागतो, तरी सुद्धा एक एक पायरी चढून जाण्याची इच्छाशक्ती जिथे वाढते, ते म्हणजे गिरनार...

        जिथे भल्या भल्यांची परीक्षा घेतली जाते, अहंकार जिथे गळून पडतो, व मग अक्कल ठिकाणावर येते अपराधाची केल्याची जिथे जाणीव होते ते गिरनार...

         असे हे आमच्या गिरनारी महाराजांचे गिरनार... आणि तुम्ही म्हणता काय मिळतं तिथे सारखं सारखं जाऊन गिरनार... 

         माहेर वाशीण जशी माहेराला येते व तिला जो आनंद होतो ना आल्यावर व निघतांना पाय निघत नाही, तसच आमचं हे गिरनार...

        हे सर्व वाचून ज्याचे मन म्हणते बरोबर आहे, व ज्याच्या डोळ्यात आपसूक पाणी येते ना ते हे गिरनार...

          हे सर्व तुम्हाला नाही समजणार कारण तुम्ही तर या संसाराच्या मोह-माया पासून सुटुच शकत नाही,आणि महाराजांच्या जवळ जाण्याची बुद्धीच होणार नाही, तो पर्यंत समजणार नाही काय आहे गिरनार... 

  तर अस आहे गिरनार...          

   जय गिरनारी

|| अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त ||


श्रीकांत कापसे पाटील...©✍️









-संकलन

Wednesday, 2 November 2022

सहज वाचलं म्हणून...
















सहज वाचलं म्हणून...
दिवाळी अंक,एखादं मासिक अथवा पुस्तक नजरेस पडेल असं घरात ठेवलेलं असेल तर सहज ते चाळलं जातं अन् ते त्यामुळे वाचलंही जातं. त्यातूनच वाचनाची गोडी वाढतं जाते. प्रत्येक पुस्तकात काही संदर्भ असतात त्या अनुशंगाने वाचू आनंदेची अनुभूती येते. छात्र प्रबोधन हे मासिक वाचतांनाही असंच झालं. वाचता वाचता Flashback मध्ये गेलो. परीक्षेच्या कालावधीत कु.जैनब तडवी (आमच्या विद्यालयातील श्री.जावेद तडवी सर यांची कन्या)अभिवाचन छान करते,अक्षर सुंदर, हुशार अशी अनेक विशेषणं तिला लावावी अशी गुणी विद्यार्थिनी. 
ही मला भेटली. म्हणाली,"सर, तुमच्याकडे जी.ए. कुलकर्णी यांचं 'कुसुमगुंजा' हे पुस्तक आहे का?" माझ्या संग्रही ते पुस्तक नव्हतं पण पुस्तकाबद्दलचं तिचं कुतुहल मला आनंद देऊन गेलं. खरंतर या गोष्टी खूप छोट्या असतात, नित्याच्या असतात मात्र खूप मोठं समाधान आणि आनंद देऊन जातात. जैनब,तुझं वाचन व कुतुहल खूप आनंददायी होतं. साधना मासिकही तू पूर्ण  वाचलंस याचंही मला विशेष कौतुक वाटतं.त्याबद्दल मी तुझं, तुझे बाबा (जे चांगले वाचक आणि वक्ता आहेत),तुझी आई व कुटुंबियांचं अभिनंदन करतो.  अशीच वाचती आणि लिहिती रहा. वाचावी पुस्तके...राखावी अंतरे...समृद्ध व्हावे अंतरंगे...भाग्य येते तदनंतरे...😊👍 शुभेच्छांसह....भेटू या.


📘📚📖📋✍🏻

~ प्रसाद वैद्य



Tuesday, 1 November 2022

मनाचा धनवान "धनाजी जगदाळे"...मला १००० बक्षीस नको फक्त घरी जायला ७ रुपये द्या.

मनाचा धनवान "धनाजी जगदाळे"...मला १००० बक्षीस नको फक्त घरी जायला ७ रुपये द्या.

पिंगळी बु.ता.माण येथील धनाजी यशवंत जगदाळे  

(वय ५४) याचे हातावरचे पोट. 

रोज काम केल तर कुटूंब चालवणारा सर्वसामान्य व्यक्ती.

दहिवडी आठवडा बाजार झालेवर हा उशिरा दहिवडी स्टँडवर आला. समोर घरी जाण्यासाठी बस लागली होती. परंतु तिकिटासाठी ७ रुपये त्याच्याकडे नव्हते. 

गावातील ओळखीचा ही त्या दरम्यान तिथे दिसत नव्हते. एक गाडी सोडली दुसरी सोडली पण ओळखीची व्यक्ती कोणीच दिसेना. जायच कस हा विचार करत दिवसभर कंटाळलेला बिच्चारा धनाजी बसल्या जागेवर झोपून गेला. धनाजीला जाग आली तेव्हा अंधार पडला होता.

दरम्यान जो घरी जाण्यासाठी ७ रूपयांसाठी कोणाची तरी वाट पहात होता त्याच्याजवळ ४० हजार रुपयेचा बंडल पडलेला दिसला. आपण ७ रूपये मिळतायत का बघत होतो पण आतातर ४० हजार रूपये सापडेलत.

 चला निघून जावू ,आता गाडी भाडयाने करून जावू ,दिवाळी चांगली साजरी होईल असा किंचितही विचार धनाजीच्या मनात आला नाही. धनाजीने आजूबाजूच्या सर्वाना तुमचे पैसे पडलेत का अशी विचारणा सुरू केली. कोणच काहीच बोलत नव्हते. शेवटी तो शोधाशोध करून स्टँड पोलीस चौकीजवळ पोलीसांची वाट पहात बसला.

खूप वेळाने एक गृहस्थ स्टँडवर आले व बसलेल्या ठिकाणी आपले पैसे शोधू लागले, तेव्हा काही प्रवाशांनी आताच एक उंचीला कमी असलेला माणूस कुणाचे पैसे पडलेत का विचारत असल्याची त्यांना कल्पना दिली. त्यांनी बसस्टँड पालथे घातले तेव्हा स्टँड पोलीस चौकीजवळ धनाजी पोलिसांची वाट पाहत बसलेला दिसून आले. त्यांनी धनाजीला पैसे हरवल्याचे सांगताच धनाजी बोलला किती रक्कम आहे ,नोटा कशा होत्या असे प्रश्न करीत ज्याचे आहेत त्यालाच पैसे मिळावेत यासाठी सर्व चौकशी करून घेतली. त्यावर ते ४० हजार रूपये आहेत .पत्नीचे ऑपेरशन आहे त्यासाठी पैसे घेऊन निघालो होतो. गाडी न मिळाल्याने बाकावर बसून होतो तेव्हा खिशातून पडले असे त्याने सांगितले.

 धनाजीने ते पैसे काढून देताच हाच आपला पैशांचा बंडल म्हणून त्या व्यक्तीचे डोळे पाणावले. बायकोचे ऑपरेशन कसे करायचे हा त्यांना पडलेला प्रश्न आता सुटणार होता. त्याने बक्षीस म्हणून त्या बंडलातील एक हजार रूपये काढून धनाजीला देवू केले. पण मनाने धनवान असलेला धनाजी ते बक्षीस घेईना. मला काहीही बक्षीस नको तुमचे पैसे तुम्हाला मिळाले. आता तुम्ही तुमच्या बायकोचे ऑपरेशन करू शकता यात मला सर्व काही मिळाले.

तरीही त्या व्यक्तीने खूप आग्रह केल्यावर धनाजीने एकच वाक्य सांगितले की ,ते १ हजार त्याच बंडलात ठेवा. घरी जाण्यासाठी माझ्याकडे ७ रूपये नाहीत म्हणून मी स्टँडवरच पडून राहिलो. मला फक्त घरी जाण्यासाठी  ७ रुपये द्या. धनाजीचा प्रामाणिक आणि भाबडेपणामुळे माणसाच्या डोळ्यातून पाणी आले.

ज्याला ४० हजार रूपये सापडूनही फक्त ७ रुपये प्रवासासाठी बक्षीस रूपाने घेणार हा देवदूतच म्हणावे लागेल ना.

परिस्थिती अनैकांना वाईट मार्गाने जायला लावते. पण चांगले काम करत परिस्थितीचा सामना करणारेही धनाजीसारखे धनवान व्यक्ती दिसून येतात. त्याच्या या कार्यामुळे धनाजी जगदाळेचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

अनेक लोक पैसा संपत्तीने श्रीमंत असतात पण मनाची श्रीमंती असणारा गरीब धनाजी माझ्याच शेजारी बसून ही वस्तुस्तिथी सांगताना माझ्याही डोळ्यात अश्रू आले. विश्वाची निर्मिती करताना परमेश्वर असे ही देवदूत पृथ्वीवर पाठवतो याची प्रचिती आली. 

- राजेंद्र जगदाळे  (सर) पिंगळी बु.ता.माण. 


~संकलन -प्रसाद वैद्य