My YouTube Channel

Click here to visit My YouTube Channel

Thursday, 25 November 2021

🔸 मानवतेचे दुकान.🔸

अनघा ठोंबरे यांच्या 'कॅशलेस' दुकानाविषयी मी यापूर्वी वाचलं होतं. त्या पुण्यात राहतात. या टिपणीच्या खाली त्यांचा पत्ता आणि दूरध्वनी क्र. दिला आहे. पुण्यातले कोणी त्यांच्या घरी जाऊन आले आहेत का? त्यांनी आपले अनुभव शेअर करावे. मदत योग्य व्यक्तीच्या हातातून गरजू व्यक्तींपर्यंत पोचते असं लक्षात आलं तर माणसं अधिक प्रमाणात मदत करू शकतात. असे अधिकाधिक उपक्रम सुरू व्हावे आणि ते गरजू आणि दानशूर व्यक्ती दोहोंपर्यंत पोचावे हीच इच्छा..

                                                                🔸 मानवतेचे दुकान.🔸

अनघा ठोंबरे यांचं पुण्याला आपल्या राहत्या घरीच एक अनोखं ‘दुकान’ आहे, गेली पंधरा वर्षे सुरू असलेलं. हे दुकान आहे कॅशलेस. कारण तिथल्या वस्तू फुकट दिल्या जातात. दिवाळीला कपडे, नवरात्रीत नऊ साडय़ा, ईदसाठी ओढण्या, वारीसाठी टोप्या, अनवाणी लोकांना चप्पल, भुकेल्यांना अन्न, लहान मुलांना खेळणी, कष्टकरी बाईला तवा, कुकर, इतकंच नाही तर ‘स्थळ दाखवायला’ नवीन कपडेही.. सारं काही इथे मिळतं.. समाजातल्या गरीब बांधवांसाठी सुरू असलेल्या या अनोख्या ‘दुकाना’साठी हजारो लोकांची मदत झाली..  होते आहे.. ‘पिंपळाला पार बांधण्यासाठी’ असंख्य हात पुढे येत आहेत..

यशाच्या एका क्षणी माझ्या आईने मला सांगितलं, ‘‘आपलं आयुष्य, आरोग्य, यश, समृद्धी, शिक्षण यांच्यामागे कितीतरी राबणारे, कष्ट करणारे हात असतात, मग ते हात शेतात राबणारा शेतकरी, ओझी उचलणारा हमाल, सफाई कामगार, बांधकाम कामगार, शेतकरी, मोलकरणी, सीमेचे रक्षण करणारा जवान असे अगणित असतात. आपण त्यांच्याविषयी कृतज्ञ असलं पाहिजे, ते सगळे यशाचे, श्रेयाचे वाटेकरी आहेत. आपण सण, उत्सव साजरे करतो, छंद, मनोरंजनाने आनंदी होतो, नोकरी करतो, वृद्ध रुग्णांची सेवा करतो, घर सजवतो, प्रत्येक वेळी त्यांचे स्मरण केले पाहिजे. त्यांच्यासाठी काहीतरी करायला हवे. पिंपळाला पार बांधत राहावं.’’ माझ्या आईच्या शब्दाला ‘अमर’ करण्यासाठी एका क्षणी मी भरपूर पगार, सुविधा असणारी केंद्र सरकारची सन्मानाची नोकरी सोडली आणि गरिबांसाठी ‘समाजप्रस्थाश्रम’ स्वीकारला.

घेणाऱ्यांचे हात हजारो आहेत हे माहीत होतंच, पण देणाऱ्यांचेही हात हजारो आहेत, याचा साक्षात्कार झाला, त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. या देण्या-घेण्यातून असंख्य आठवणी माझ्या पदरात पडत गेल्या.. समाधानाचं कटोरं शिगोशिग भरत गेलं.. आजही जातंय..

अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर मला फक्त फिल्मी गरिबी माहिती होती, खरी गरिबी कधी अनुभवली नव्हती वा त्यांच्या जगण्याशी माझा थेट सामना कधीच झाला नव्हता. पण आजूबाजूला गरिबी होती. लांब अंतरावर असली तरी दिसत होती. झोपडपट्टीतलं जगण्याची मी कल्पना करू शकत होते. उपाशी असणं, जे हवं ते न मिळणं यातली कुचंबणा मला जाणवत होती. आणि गरिबीसाठी माझ्या दृष्टीने कारणीभूत होता, शिक्षणाचा अभाव. मग त्यांच्यासाठी काही करायचं तर सुरुवात त्यांच्या शिक्षणापासून करायचं ठरवलं, गरीब वस्तीतल्या लोकांना साक्षर करायचं ठरवलं. पण मला लवकरच उमजलं शिकवण्यापेक्षा त्यांच्याकडूनच शिकण्यासारखं खूप आहे. त्यांचं स्वत:चं एक तत्त्वज्ञान आहे, एक संस्कृती आहे आणि ते त्यांना जगण्याचा अर्थ देत आहेत. जे आहे ते स्वीकारण्याची, गोड मानून घेण्याची त्यांच्यात एक उपजत समज आहे, हे लक्षात येत गेलं.

सणावाराला नवी साडी नेसून, बेंटेक्सचे दागिने घालून, डोक्यात गजरा माळून दहा घरची भांडी घासणारी बाई, तिची हौस, डोळ्यातला आनंद, उत्साह, रोज जीवनमरणाचा, दोन वेळच्या जेवणाचा संघर्ष असूनही तिला असणारी जीवनाची ओढ पाहून सकारात्मक जगण्याचा अर्थ मीच त्यांच्याकडून शिकले, जगण्याच्या विद्यापीठात! त्या माझ्या कितीतरी पुढे होत्या, त्यांनी माझी दु:खं छोटी केली, माझं मन मोठं केलं. मी त्यांची श्रोता झाले, एवढय़ा छोटय़ा गोष्टीनेही त्यांनी मला खूप प्रेम दिलं, निरपेक्षपणे. मग त्यांच्यासाठी मी ‘आस’ हे महिला मंडळ स्थापन केले.त्यांच्या अपेक्षा अगदी छोटय़ा होत्या, पण त्यांची हौस खूप मोठी होती.. आणि ती पूर्ण करण्याची संधी मला लवकरच मिळाली.

एका गरीब मुलीची ब्रेन टय़ुमरची शस्त्रक्रिया करायची होती. ती गुणी मुलगी कविता करत असे, या कवितांचे पुस्तक प्रसिद्ध करायची तिची शेवटची इच्छा होती. उपचार, तपासण्यांसाठीही पैसे नव्हते, तिच्याविषयी एका वृत्तपत्रात लेख लिहिला आणि मदतीचा ओघ सुरू झाला. लोकांनी भरभरून मदत केली, सर्व तपासण्या, उपचार, शस्त्रक्रियेसाठी पैसे मिळाले. मुख्य म्हणजे या शस्त्रक्रियेनंतर ती वाचली, ती आता दोन मुलांची आई आहे. मग तिच्या वस्तीतल्या अनेक गरीब स्त्रिया आल्या. त्यांनाही मदत हवी होती. मग वृत्तपत्रे मासिकातून अनेक लेख प्रसिद्ध झाले, त्याच्याशिवाय सगळं अशक्यच होतं, त्यांचे उपकार विसरू शकत नाही, कधीच नाही.  और कारवाँ बनता गया.. अशा पद्धतीने असंख्य लोक जोडले गेले.

अनेक जण काही ना काही आणून देऊ लागले. चांगल्या अवस्थेतील वस्तू, तर काही वेळा न वापरल्या गेलेल्या वस्तू, अगदी भांडीसुद्धा. काही तर अगदी कोरी करकरीत. काहींनी त्यांचे संपर्क क्रमांक दिले. काहीही लागलं तरी फोन करा, असं आवर्जून सांगितलं. अशा तऱ्हेनं माझं गरिबांसाठीचं ‘कॅशलेस दुकान’ सुरू झालं. इथे सगळं काही मिळतं. एकही पैसा न घेता.

प्रथम कपडय़ांचं दुकान सुरू झालं. अनेक लोक जुने पण चांगल्या अवस्थेतले कपडे आणून देतात. मग ते गरिबांना, कष्टकऱ्यांना दिले जातात. एकदा एक माहिती समजली, नवीन जन्मलेल्या बाळांना झबली नसतात. एका रुग्णालयामध्ये ही दीडदोनशे बाळे उघडीच असतात, असं कळलं. अनेकांनी मला जे फोन नंबर दिले होते, त्यांच्याशी संपर्क साधला. मग ब्लाऊजपीस, कटपीसेस लोकांनी आणून दिली, एका मैत्रिणीने तीनशे झबली मोफत शिवून दिली, माझ्या दुकानात झबली आली. ज्यांना ती हवी होती त्या गरीब स्त्रिया माझ्या या दुकानात आल्या आणि आवडीची झबली घेऊन गेल्या. बाळांना झबली मिळाली, त्यांचे गोजिरवाणे चेहरे डोळ्यासमोर आले नि मी खूप श्रीमंत झाले. मी माझी राहिलेच नाही..

मग माझे कपडय़ांचे दुकान प्रसिद्ध होत गेले, इकडे देणाऱ्यांचे हातही हजारो झाले. एकाने रेडिमेड कपडय़ांचे दुकान बंद केले, मुलांचे चारशे ड्रेसेस मला फुकटात आणून दिले. ते सारे आदिवासी, ग्रामीण भागात पाठवले. आदिवासी भागातली मुले तर चार दिवस अंगावरचे कपडे धुण्यासाठी द्यायला देखील तयार नव्हती, नुसतं ऐकूनच अंगावर रोमांच उभे राहिले. माझा प्रत्येक सण वेगळ्या अर्थाने आता साजरा होतो. रमजान ईदला मुलींना, बायकांना नमाज पढायला नव्या ओढण्या हव्या असतात. पण त्याचबरोबरीने त्यांना हवी असलेली खजूर, दुधाची पाकिटं तीसुद्धा या दुकानात मिळायला लागली. असंख्य अनामिक देणाऱ्यांची एक मोठीच्या मोठी यादीच आहे माझ्याकडे. एक फोन करायचा अवकाश माझ्या या दुकानात सगळं काही येऊन पडतं. अगदी भरभरून. मग मी गरजूंना मानाने बोलावते, कुणी बोहारणी, कुणी कासारणी, कुणी मोलकरणी, कुणी गावाकडच्या. सगळ्या जणी तृप्त होऊन जातात आणि मग माझ्यासाठी मशिदीत मन्नत मागितली जाते, माझ्यासाठी ‘रोजे’ धरले जातात. मोराचे पीस पायाला आणून बांधलेही जातात. अतीव प्रेमाने माझी ईद आनंदमय होते.

पांडुरंगाच्या वारीच्या वेळी टोप्या, पायजमे, शर्ट, धोतर हवे असतात अनेकांना. दोन-तीन महिने आधीपासून मी ते जमवायला सुरुवात करते. मग साबण, टूथपेस्ट, पाण्याच्या बाटल्याही जमवते सगळ्यांना वाटायला. आजपर्यंत कधी काही कमी पडले नाही की अपुरे पडले नाही. मी वारीला न जाताही प्रसाद आणून दिला जातो, प्रत्येकात विठुराया दिसतो. घरबसल्या पुण्य कमवते.

नवरात्रातल्या नऊ दिवसांत उपवासाला दाणे, साबुदाणे, राजगिरा वडय़ा आणून दिल्या जातात आणि मागितल्याही जातात. सगळ्या सणांना काही ना काही दिलं- घेतलं जातंच. सगळे देव माझ्यावर प्रसन्न आहेत. इतकंच कशाला अनेकांच्या लग्नपत्रिकेवर माझं नाव असतं. कुणी पाया पडायला येतात, कुणी कानावर बोटे मोडतात, कुणी मलाच खाऊ आणून देतात. खूप काही घडत असतं या देण्या-घेण्यात!

इतकंच कशाला एखाद्या गरीब मुलीचा ‘दाखवण्याचा’ कार्यक्रम असतो. कधी तर तो माझ्या घरातच होतो, मी चहा बिस्किटे आणते, तिला चांगला ड्रेस लागतो, तो मी आधीच मिळवलेला असतोच. तो मग अशा मुलींच्या अंगावर चढतो. लाजणारी ती मुलगी जेव्हा लग्नाच्या बोहल्यावर चढते तेव्हा मी भरून पावते. माझ्याकडे येणाऱ्या मुलींमध्ये अंध मुलीही आहेत. त्यांना अंगभर कपडा लागतो, त्यांच्यासाठी पूर्ण बाह्य़ांचे ड्रेस लोक मला आणून देतात. गरीब शेतकऱ्यांना शहरात उपचाराला, कुणाला भेटायला यायचे तर धड कपडे नसतात अंगावर, काही जण मग शेजाऱ्यांचे बिनमापाचे कपडे घालून येतात. कुणी असे लोक दिसले की माझ्या दुकानातले कपडे त्या खेडय़ापाडय़ात जातात. महालक्ष्मीला नेसवायला साडय़ा, घराला दार नसते, मग लावायला पडदे, असा पडद्यांचा स्टॉकही माझ्या दुकानात असतो. पावसात पॉलिएस्टर साडय़ा लागतात, थंडीत स्वेटर्स, बाळांना गुंडाळायला सुती साडय़ा लागतात. पेटिकोट्सची तर कायम डिमांड. अधिक महिन्यात गरीब स्त्रियांना पेटिकोट्स वाटते. माझ्या दुकानात सर्व व्हरायटीज मिळतात. साठ सत्तर आज्या आहेत, त्या नऊवारीच नेसतात. आता नऊवारी जुने मिळतच नाही मग नवीन नऊवारी साडय़ा माझ्या दुकानात दिवाळीत येऊन पडतात. मोठे दुकानदारही भरपूर डिस्काऊंट देतात. रिक्षावाले ओझी उचलायला मदत करतात. ‘आमचाही हात लागू दे’ म्हणतात. माझे ‘दुकान’ सजते. नवरात्रीच्या नऊ दिवसांत अनेकींना नऊ रंगांच्या साडय़ा हव्या असतात. मग माझे फोन अनेकींना जातात. नातेवाईक, मैत्रिणी, मंडळे, कट्टे, सोसायटय़ा.. त्यांच्याकडून भरपूर साडय़ा येतात. माझाही खारीचा वाटा असतो. संक्रांतीला काळी साडी पाहिजेच असते. मग त्या जमा करायच्या.

१५ ऑगस्ट, २६ जानेवारीला पांढरी साडी हवी असते, दिवाळीत जरीच्या साडय़ा पाहिजेत, असा चक्क आग्रह असतो. मग दिवाळीआधीच त्या माझ्याकडे न्यायला येतात आणि दिवाळीत मॅचिंग ब्लाऊज शिवून छान नेसून येतात. एकीला गोंडय़ाच्या साडय़ांची हौस, मला हळूच कानात सांगून गेलेली असते. मग ती साडी दिसली की मलाच खूप आनंद होतो. तिला देते तेव्हा तिच्या चेहऱ्यावरची चमक मला तृप्त करते. एकदा एका गावी एक टेम्पो भरून कपडे पाठवले, त्यात काही नवेही कपडे होते. ते लोक कपडे घालून नाचले, अक्षरश: रडले. अत्यानंदाने तो दिवस त्यांनी सणासारखा साजरा केला. मला फोन येत होते, तो दिवस माझ्यासाठी दिवाळी दसराच होता. त्यांचा आनंद मला ‘जीनेका बहाना’ देतो.

कपडय़ांबरोबर सर्वाधिक मागणी असते ती वस्तूंना, भांडय़ांना. या लोकांना मी त्यांना देणारच हे इतकं पक्कं माहीत असतं की चक्क हक्काने मागूनच घेतात. ‘आम्ही कधी कान असलेल्या कपातून चहा प्यायलो नाही. आम्हाला कपबशा द्या,’ मागणी येते. मग मी माझ्या ओळखीतल्यांना फोन करते. ते लोक स्वत:साठी नवे कप आणतात आणि जुने माझ्या गरिबांसाठी देतात. अशा देण्यातून मला हजारो लेकी मिळाल्या आहेत. चकलीसाठी कुणाला सोऱ्या हवा असतो, कुणाचा कुकर नवरा दारू पिण्यासाठी विकतो, तिला कुकर, एकदा रस्त्यावर तीन दगडांची चूल मांडणारीने मला तवा मागितला, भाकरी नाही मागितली, हे मला विशेष वाटलं. मग लोकांकडून मला जुनी भांडी मिळू लागली, जुनी कसली नवीनच. दुष्काळी भागातल्या लोकांना पाण्याचे कॅन्स, भांडी लागतात, मग लोकांनी बादल्या, कळशा आणून दिल्या. गेल्या पंधरा वर्षांत काय हवे तेही समजले. मला आणि देणाऱ्यांनाही! सगळं आपसूक माझ्या या दुकानात येऊन पडतं किंवा पैसे येतात त्यातून विकत घेतलं जातं.

देणाऱ्यांना फक्त निमित्त लागतं. कुणी मग स्वत:चे, मुलाचे वाढदिवस, कुणाचे स्मृतिदिन तर कुणी दिवाळी, दसरा, नवरात्र या सणाच्या निमित्ताने अनेक वस्तू आणून देतात अगदी नवीन. माझी ही मुलं गोटय़ा, दगडांनी खेळतात.. मला वाटतं त्यांनाही मिळावी खेळणी. मग काय मनात यायचा अवकाश खूप खेळणी आणून देतात लोक! मी त्यांचं छोटं प्रदर्शन भरवते. या सगळ्या मुलांना बोलावते. ज्याला जे हवे ते खेळणे निवडायचे. तो बालआनंद मला माझ्या बालपणात नेतो. मी छोटी मुलगी होते, बाहुलीचे लाड करते.. खऱ्या आणि खेळण्यातल्याही.

उन्हात पाय भाजतात, चटके खात खात लोक माझ्याकडे येतात. चप्पल, बूट मागायला. माझ्या या दुकानात ते असतातच. मग आपल्या मापाचे, आवडीचे चप्पल, बूट घेऊन जातात. एकदा एका गरीब, गुणी मुलीने कळवलं, तिला शिवण मशीन पाहिजे होते. ती त्याचा नक्कीच चरितार्थासाठी उपयोग करणार याची मला खात्री होती. सहज म्हणून, पाहू या तर खरं म्हणून फोन केले तर एकाने एक छान मशीन नवी मोटर बसवून आणून दिली. मोठी माणसं तर मदत करतातच पण त्यांचं पाहून लहान मुलंही त्यांच्या या मित्रांसाठी मदतीचा हात पुढे करतात. काही शाळांचे विद्यार्थी मदत करतात. ‘मोती साबण, पेन्स, टूथपेस्ट, खेळणी, हौसेने आणतात.

एका रोजगार हमीवर काम करून इंजिनीअरिंग करणाऱ्या तरुणाला कॉम्प्युटर हवा होता. तोही प्रिंटरसकट एकाने आणून दिला. सायकल हव्या होत्या तर मोठय़ा सोसायटीतल्या पार्किंगमधल्या वीस सायकली दुरुस्त करून आणून दिल्या. गरजेच्या वस्तू दिल्या घेतल्या जातातच पण गंमत म्हणजे हौसेच्या वस्तू पर्सेस, पावडरचे डबे, बेडशीट्स, तोरणे हेही सगळं मिळत राहतं.

माझ्या या दुकानात धान्य बँकही आहे, काही भुकेल्या घरांसाठी! डाळ, तांदूळ, चहा, साखर, कडधान्येही लोक आणून देतात, बिस्किटांचे पुडे, कांदा लसूण मसाला, अगदी दूध पावडरही! दुष्काळी भागातले लोक येतात, त्यांना देवाच्या नैवेद्याला डाळ, गूळ, कणीक हवी असते, बाळंतिणीला दलिया, वरणभात हवा असतो. तो तिला इथेच मिळतो. मुख्य म्हणजे काही तरी द्यायचं हा भाव नाही. चांगल्या गुणवत्तेच्या, खाण्यासाठी योग्य वस्तू या लोकांकडून मिळत जातात. या सगळ्याचा उपयोग आजूबाजूच्या लोकांमध्येही होतो.  केवढे माझे भाग्य. गंभीर शस्त्रक्रियाही डॉक्टर मोफत करतात. उपचार करतात. त्यांच्या औषधांचे पैसेही मिळत राहतात.

आता तर मला फार करावं लागतच नाही. लोकांनी आपणहून गट तयार केले आहेत. तरुण मुले आहेत, आय.टी. इंजिनीअर्स आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, गरिबांना मदत करणारे गरीबही आहेतच. असे मानवतेचे दुकान. मला मिळालाय आनंदाचा ठेवा. मोक्ष कशाला? मी पुनर्जन्म मागते आहे.. मला आणखी आनंद हवा आहे! तुम्हीही त्यात सहभागी व्हाल?

अनघा ठोंबरे, 1/13 सहजानंद सोसायटी, कोथरुड, पुणे-34, फोन 020-25382633

~संकलन


Tuesday, 2 November 2021

दिवाळीस पत्र...

 छायाचित्र सौजन्य- सौ.जयश्री पुणतांबेकर मॅडम

दिवाळीस पत्र...

प्रिय दिवाळी,

सस्नेह नमस्कार.  

        तू अनादी काळापासून टिकवून ठेवलेलं तुझं चैतन्य नेहमीच उत्साह प्रदान करतं गं! कसं जमतं हे तुला! तुझं येणं हे रावाचा आणि रंकाचाही आनंद द्विगुणीत करतं. कदाचित काही वेळा रंकाला तुझं येणं परवडत नसतं; पण 'झाकली मूठ सव्वा लाखाची' ठेवून तो तुझं येणं साजरं करतोच करतो, ते तो तुलाही कळू देत नाही.

तुझं उजळणं आणि उजळवणं हे आमच्यासाठी आनंदाची 'पर्वणी'असतं. 

तुझं येणं आबालवृद्धांसाठी 'निर्मिती'चा आविष्कार असतं...

तुझं येणं म्हणजे स्वच्छ आकाश...

तुझं येणं म्हणजे लख्ख प्रकाश...

तुझं येणं म्हणजे  बच्चे कंपनीची दंगल...

तुझं येणं म्हणजे नात्यांसाठी मंगल...  

तुझं येणं म्हणजे अंगण सजणं असतं... 

तुझं येणं म्हणजे आसमंत उजळणं असतं...

तुझं येणं म्हणजे गोडधोड पदार्थांची रास...

तुझं येणं म्हणजे दिव्यांची आरास... 

तुझं येणं म्हणजे सुगंध दरवळणं...

तुझं येणं म्हणजे आईने लेकरांना कुरवाळणं...

तुझं येणं म्हणजे सुगंधी उटणं...

तुझं येणं म्हणजे मिठाई वाटणं...

तुझं येणं म्हणजे काहींचं 'जमणं'...

तुझं येणं म्हणजे काहींचं रमणं...

तुझं येणं म्हणजे राजस...

तुझं येणं म्हणजे वसुबारस...

तुझं येणं म्हणजे 'मोती स्नानाची' वेळ होणं...

तुझं येणं म्हणजे पाडव्याची सांगितिक पहाट होणं...

तुझं येणं म्हणजे भाऊबीजेची ओवाळणी...

तुझं येणं म्हणजे 'होम मिनिस्टरची' पाडव्याला पैठणी...

तुझं येणं म्हणजे अभ्यंगस्नान...

तुझं येणं म्हणजे झुकून थोरांचा सन्मान...

तुझं येणं म्हणजे Leisure...

तुझं येणं म्हणजे Pleasure...

तुझं येणं म्हणजे अनेकांचं आश्वासन...

तुझं येणं म्हणजे सुयोग्य प्रशासन...

तुझं येणं म्हणजे नाटकाचा पहिला प्रयोग..

तुझं येणं म्हणजे विविधरंगी,वेचक-वेधक दिवाळी अंकांचा योग...

तुझं येणं म्हणजे तरुणांचा कट्टा...

तुझं येणं म्हणजे महिला मंडळाच्या गप्पा...

तुझं येणं म्हणजे कुटुंबाची लगबग...

तुझं येणं म्हणजे लाईटिंगची झगमग...

तुझं येणं म्हणजे तरुणाईची हुल्लडबाजी...

तुझं येणं म्हणजे फटाक्यांची आतषबाजी...

तुझं येणं म्हणजे नवीन गाडी घेणं...

तुझं येणं म्हणजे स्वप्नातील नवीन घर होणं...

तुझं येणं म्हणजे शक्ती...तुझं येणं म्हणजे भक्ती...

तुझं येणं म्हणजे 'रिश्तों में प्यार बाँटना'...

तुझं येणं म्हणजे  'हम साथ साथ है' कहना...

तुझं येणं म्हणजे कमाल...

तुझं येणं म्हणजे धमाल...

तुझं येणं म्हणजे विलास... 

तुझं येणं म्हणजे विकास...

तुझं येणं म्हणजे दिवेही आनंदी अन् पणत्याही उत्साही... 

तुझं येणं म्हणजे आनंदी आनंद गडे  जिकडे तिकडे चोहीकडे....

        शेवटी काय आयुष्य आणि वर्तमान कितीही ठणकत असलं तरीही तू ये. कारण तुझ्या उजेडाचा उत्सव हा संस्कृतीच्या शृंगाराचाच एक भाग आहे. त्यामुळेच तुझं 'येणं' म्हणजे संस्कृतीचं 'लेणं' असतं म्हणूनच आम्ही तुझं 'देणं'लागतो. 

        तुझ्या लेकरांना  सदैव जगण्याचं बळ अन् निरामय आरोग्य आणि चैतन्य लाभू दे तुझ्यासारखंच. तुझी आम्हां सर्वांवर कृपा राहू दे....तू आहेसच अशी शुभदायिनी  'शुभ दीपावली' !!!

तुझाच स्नेह प्रार्थी,

~प्रसाद वैद्य 

(शिक्षक,पत्र-मित्र,शुभेच्छापत्र संग्राहक)

विवेकानंद विद्यालय, चोपडा जि. जळगाव 

मोबाईल-९४२०११२२१५

Friday, 17 September 2021

तुमची Salary किती आहे? 

तुम्ही त्या Salary वर समाधानी आहात ?


मी 31 वर्षाचा आहे. माझी Salary 12 लाख वार्षिक आहे. 


मी सध्या चेन्नई मध्ये राहतो आणि मी या salary वर पूर्णपणे समाधानी आहे. त्याची खालील करणे आहे. ते पाहू –


1 . मी कधी 70 -80 लाखाचं मोठ घर घेतल नाही. मोठं घर घेवून गाजावाजा करण्यात मला मुळीच INTEREST नाही. मोठ्या घराच्या प्रशंसेसाठी 35 हजाराचा महिन्याचा EMI भरून कर्जाच tension घेवून रोजचा जगण्याचा आनंद गमवला नाही.


2. त्यापेक्षा 70-80 लाखाचं घर 10,000/- Rent ने घेतलं. जे माझ्या ऑफिसच्या जवळच्या अंतरावर आहे. ज्यामुळे माझा traffic चा त्रास, पाठदुखी होत नाही. मी जेंव्हा जेंव्हा ऑफिस बदलतो तेंव्हा तेंव्हा मी माझं घर सुद्धा बदलतो. माझा स्वतःच घर असतं तर हे शक्य नव्हतं. माझे काही colleagues 2-2 तास सकाळी आणि संध्याकाळी 40kms प्रवास करून ऑफिस ला येतात. हा प्रवास चेन्नई च्या ट्राफिक मध्ये आणि गरम वातावरणात किती त्रासदायक आणि irritating असतो सांगतात.


3. माझे colleagues जे 90 मिनिटांचा प्रवास करून आल्यानंतर कामावर योग्य प्रकारे focuse करता येत नाही. त्यामुळे चांगले प्रोजेक्ट त्यांच्या हातून जातात. इच्छा नसतानाही साध्या प्रोजेक्ट वर काम करावे लागते.  जर rent वर घर घेतले तर आपल्या वेळेत Flexibility येते. त्यांमुळे मी माझा Quality Time माझ्या परिवारासोबत घालवतो.


4. माझी 20,000/- Mutual Funds मधील गुंतवणूक हि Appartment खरेदी करून येणारे Rental Income पेक्षा जास्त Returns (परतावा) देते.


5. 25,000/- घरखर्च- Petrol,  Electricity Bill, Milk, TV, Internet, Grocery, Vegetable, Maid, Meat ETC.


6. दर महिना 6000 रुपयांची एका Gold Scheme मध्ये गुंतवणूक माझ्या Wife च्या इच्छेमुळे.


7. 2000/- माझ्या आज्जी ला देतो जी एकटी गावी राहते.


8. 3000/- माझ्या मुलीच्या  शाळेच्या शिक्षणासाठी.


9.14,000/- eating out, shopping, outing साठी.


10. शिल्लक राहिलेले 15,000/- अचानक येणारा खर्च, हॉस्पिटल चा खर्च, घरगुती कार्यक्रमासाठी राखीव.


11. मी क्रेडीट कार्ड वापरत नाही. मी EMI वर कोणतीच गोष्ट खरेदी करत नाही. माझ्यावर अजून कसलेच कर्ज नाही. मला महिना अखेरीस पैश्याच्या तंगीचा प्रोब्लेम येत नाही. महिना अखेरीस सुद्धा मी एखादी urgent गोष्ट घेण्यासाठी salary जमा होण्याची वाट पहावी लागत नाही. मागील महिन्याच्या savings मधून मी ती गोष्ट खरेदी करू शकतो.


12.माझ्याकडे 125cc ची bike आहे. जी पाच वर्ष जुनी आहे तरीही मी त्यात आनंदी आहे. मला दोन लाखाची Royal Enfield Continental GT खूप आवडते जी मी माझ्या savings मधून एका single payment मध्ये  सुद्धा घेवू शकतो. पण मी घेत नाही. कारण तिची मला सध्या गरज नाही. आणि सोबत तिचा maintenance इतर खर्च जो माझ्या खिशातून अधिक पैसे काढून घेतो. जर 125cc bike वर सुद्धा तितकाच सुखकर प्रवास होत असेल तर मी ती  खर्चिक bike का घेवू.


13. माझ्याकडे 1000cc ची Hatchback car आहे जी मी आणि माझ्या परिवारासाठी sufficient आहे.


14. मी Restaurants/Shopping मध्ये जास्त खर्च करत नाही. ते पैसे मी सहलीसाठी वापरतो. शक्य तितक्या नव्या ठिकाणी सहलीसाठी जाऊन येतो ((beaches, temples, amusement parks , new cities). सहलीसाठी माझी साधी कार असते सोबत घरून घेतलेले food असते. यात परिवारासोबत वेळ घालवतो.


15. साधी आणि simple जगण्याची पद्धती जास्त कमावणाऱ्यापेक्षाही जास्त सुखी ठेवते. 


 या सर्व गोष्टी मी माझ्या वडिलांकडून शिकलो जे आरोग्यदायी जीवन आणि जे हातात आहे त्याच्या आपल्या चांगला आयुष्य बनवण्यासाठी कसा वापर करायचा सांगणारे माझे Role Model हि आहेत.


त्यांच्याकडे credit card नाही. कसले हि कर्ज डोक्यावर नाही. त्यांच्याकडे 4BHK आणि 3 जमिनीचे तुकडे गावी आहेत.या वयात सुद्धा ते कमावतात आणि आरोग्यदायी जगतात.


ते 58 वर्षाचे आहे. त्यांना sugar, BP, Back Pain असा कसलाच आजार नाही. ते शेवटचे 12 वर्षाखाली हॉस्पिटल  मध्ये गेले होते ते हि एका छोट्या bike च्या अपघातामुळे.


त्यांचा दिनक्रम-

सकाळी 5 वाजता उठून योग, 3kms walk करतात. सकाळचा newspaper आणि मित्रांशी गप्पा मारून झाल्यावर. माझ्या लहान बहिणीला College पर्यंत सोडून येतात. दुपारी जेवायला घरी येतात. जेवणानंतर ऑफिस ला जातात. तिथून माझ्या बहिणीला घेण्यासाठी college ला जाऊन येतात. घरी काय गरजेच आहे ते पाहतात, काही कमी असेल तर मार्केट मधून घेवून येतात.त्यांना gardening आवडते. संध्याकाळी मंदिरात, Library मध्ये जावून येतात. जवळच्या नातेवाईकांच्या आयुष्यातील अडचणी ऐकतात सोडवण्याच्या प्रयत्न करतात. माझ्या आई सोबत terrace वर गप्पा मारण्यात वेळ घालवतात. महिन्यातून एकदा ते चेन्नई ला आम्हाला भेटण्यासाठी येतात. आयुष्यातील चांगल्या उद्दिष्ठांसाठी कसा प्लान करता येईल त्यात मदत करतात. माझ्या मुलीसोबत खेळायला त्यांना खूप आवडत. नातेविकांचे घरगुती कार्यक्रमात सहभागी होतात. जगायचं कसं सांगणारे एक मूर्तिमंत उदाहरण. He is a perfect example of how to live.


आज असे किती लोक आहे जे दुपारचे जेवण घरी family सोबत करतात?  फार कमी जण  करतात. मी आठवड्यातून दोनदा घरी दुपारच्या जेवणासाठी जातो जेंव्हा काम कमी असते. माझे वडील (30 वर्षापासून) दररोज घर येतात दुपारच्या जेवणासाठी. माझ्या आईला 10 मिनिटाची मदत करतात. जेवण करता करता बातम्या पाहतात. ते लखपती नाहीत पण त्यांना माहिती आहे without pressure कस जगायचं. त्यांना  माहिती आहे कामाचा आणि आयुष्याचा समतोल कसा साधायचा.


माझ्या वडिलांचे चुलतभाऊ त्याच्यापेक्षा जास्त कमावतात. त्यांची family भारतात असते ते Gulf Countries मध्ये काम करतात. पण माझ्या आईला चिंता लागलेली असते कि मी केंव्हा चेन्नई मध्ये एक घर घेईल. माझे काका आमच्या  पूर्ण family मध्ये सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहेत जे मीठ आणि साखर असलेलं जेवण करून शकत नाहीत. त्यांना रोज insulin घ्यावा लागत. इतका रात्रंदिवस काम करण्याचा काय उपयोग.


मी तरीही मानतो कि माझे वडीलच माझ्या family मध्ये सर्वात श्रीमंत आहेत. ज्यांना चांगले मुलं, चांगले नातू, positive मित्र, खरे मित्र, चांगले वातावरण, चांगले नातेवाईक, आरोग्य जे एक परिपूर्ण आयुष्याची निशाणी आहे.

साभार....

~संकलन

Monday, 19 July 2021

सर्वात मोठा सत्कार.....

मुख्याध्यापक म्हणुन माझ्या हातुन झालेला सर्वश्रेष्ठ सत्कार

सर्वात मोठा सत्कार.....
आपल्या कै.आप्पासाहेब दौलत धना माळी माध्यमिक  विद्यालयातील भिल्ल   देविदास अंकुश हा विद्यार्थी अतिशय स्वभावाने गरीब, सोज्वळ, सामंजस्याने वागणारा,घरातील गरीबी पण शिक्षणाबद्दलची प्रचंड ओढ,स्वतः खडतर कष्ट करून शिक्षण घेण्याची तयारी ठेवणारा....आजचा प्रसंग असाच काहीसा...मी माझ्या विचारांत कामानिमित्त चाळीसगाव शहरात रस्त्याने जात असताना अचानक आवाज आला ...सर ..सर...मी वळुन बघितले तर ..लक्षात आले..अरे हा तर आपल्या विद्यालयातील विद्यार्थी ... देविदास भिल्ल ...घामाने चिंब झालेला....जणु काही पावसात उभा आहे... संपुर्ण शरीर कपड्यांसहीत घामाने  ओलेचिंब भिजलेले.....बाजुला  घर बांधणीचे साहित्य पडलेले....स्लॅब टाकण्यासाठी असलेले मशिन धाडधाड आवाजाने सुरू आहे....मी गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली...विचारले...
काय रे इकडं कुठे...मी थांबुन त्याची विचारपूस करु लागलो....मी भेटल्यावर त्याला प्रचंड आनंद झाला ...भराभरा माझ्याशी बोलायला लागला(कदाचित त्याचे ठेकेदार मालक समोर असल्याने त्याला काम जास्त वेळ थांबवायच नसावं)...सर एक प्राब्लेम आहे....मी म्हटलं बोल काय झालं....तो म्हणाला...सर कालपासून प्रयत्न करतोय माझा दहावीचा रिझल्ट दिसत नाहीए सर...काय झालं असेल सर ....काहीतरी करा. सर ...निकाल नाही सर ..... खुप चिंतेत होता....दोन दिवसांपासून देविदास निकाल पाहण्यासाठी तळमळ करीत होता....मला फार वाईट वाटले ..कष्ट करून शिक्षणाची जिद्द असणारा मुलगा माझ्या समोर उभा होता.....मी म्हटलं काळजी करू नकोस....मी पाहतो....रस्त्याने जातांना विचारांचे काहूर डोक्यात सुरू होते....शहरात सर्व सोयी सुविधा उपलब्ध असणारे विद्यार्थी आणि आमच्या ग्रामीण भागातील स्वतः काबाडकष्ट करून शिक्षणाची जिद्द असणारा आमचा विद्यार्थी....तुलना  सुरू झाली होती..... इंटरनेट कॅफे वर गेलो...मलाही आता उत्सुकता लागली होती..... निकाल चेक केला ....आणि.....
सुटकेचा निःश्वास टाकला..... देविदास ७५.४० टक्के घेऊन चांगल्या मार्कांनी पास झाला होता.... खुप आनंद झाला... कधी  जातो आणि देविदास चे अभिनंदन करतो असं झालं....निकालाची प्रिंट घेतली.....सोबत पेढे घेतले....आणि....
गाडी देविदास काम करत होता तिकडे वळली...... देविदास सिमेंट,वाळु,रेती यांच्याशी मस्ती करून नशिब अजमावत होता... सुरेख भविष्याची स्वप्ने पाहत होता..... मी गेलो होतो त्या रस्त्याकडे काम  करता करता अधुन मधुन पाहत होता... देविदास च्या मनात होणारी घालमेल स्पष्ट जाणवत होती....मला त्याच्याकडे येताना बघुन देविदास आनंदी झाला.... माझ्याकडे न पाहता देविदास ची नजर माझ्या हातात असणा-या कागदाकडे जास्त होती.... चेहऱ्यावर अनेक भाव स्पष्ट उमटत होते....गाडी लावतो न लावतो तोच आवाज आला.....सर काय झाले....सांगा ना..निकाल...सांगा ना....
मी म्हटलं अरे देविदास तु चांगल्या मार्कांनी  पास झाला....... क्षणात देविदास च्या चेह-यावरील भाव बदलले.... प्रचंड आनंद ..एखादे मोठं यश मिळवल्याचा आनंद  त्याच्या चेहऱ्यावर जाणवत होता.... मी हे सर्व अनुभवत होतो.....माझ्या पंधरा वर्षांच्या नोकरीत असा प्रसंग माझ्या समोर पहिल्यांदाच आला होता....मी पिशवीतून पेढे चा बाॅक्स काढला ....देविदास ला पेढा भरविला..... देविदास च्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या.....
म्हणाला...सर आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात संस्मरणीय दिवस राहील.....नकळत देविदास चे शब्द काळजाला चिरत हृदयाच्या कप्प्यात बंद झाले.....देविदास चा निरोप घेतला...पुढील जिवनातील येणाऱ्या परिक्षांसाठी शुभेच्छा दिल्या.... 
विचारचक्र सुरू झाले... एखाद्या विद्यार्थी ला शिक्षण घेण्यासाठी इतके कष्ट करावे लागतात....माझ्या आतापर्यंतच्या  आयुष्यातील, नोकरीतील मुख्याध्यापक म्हणुन आज देविदास चा मी केलेला सत्कार हा  सर्वात मोठा सत्कार होता.....
देविदास ला परमेश्वर पांडुरंग प्रचंड बळ देवो...त्याच्या मेहनतीला...कष्टाला नक्कीच फळ मिळो हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना....🌹🌹

सुरेश सु.देवरे
मुख्याध्यापक
कै आप्पासाहेब दौलत धना माळी माध्यमिक विद्यालय पिंपळवाड म्हाळसा ता.चाळीसगाव
जि.जळगाव

~संकलन

Thursday, 1 July 2021

डॉक्टर्स डे ... एका डॉक्टरचा!

 डॉक्टर्स डे ... एका डॉक्टरचा!

माझं लहानपण वैद्यकीय क्षेत्राच्या गप्पा ऐकत गेलं. वडील प्रथितयश डॉक्टर, त्यामुळे लहानपणापासूनच वैद्यकीय क्षेत्राची ओळख झाली. आणि ह्या क्षेत्राचं आकर्षण कधी जाणवू लागलं ते कळलं सुद्धा नाही. त्या काळात डॉक्टर होणं म्हणजे माझं एक अल्लड स्वप्न होतं. शालेय जीवन संपलं आणि करियर निवडण्याची वेळ आली, ह्या काळात मेडिकल ची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करणं म्हणजे माझ्यासाठी डॉक्टर होणं झालं. प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झालो आणि खऱ्या अर्थाने डॉक्टर होण्याची वाटचाल सुरु झाली. MBBS चा अवाढव्य अभ्यास! महाविद्यालयीन आयुष्याची मजा लुटत जाडजूड पुस्तकांची कायमची मैत्री जडली. वैद्यकीय शास्त्रातले प्राथमिक विषय एक एक करत अभ्यासून संपवले जात होते आणि मजल दरमजल करत MBBS चा अभ्यासक्रम पूर्ण करणं म्हणजेच त्या काळात माझासाठी डॉक्टर होणं होतं. MBBS पूर्ण होऊन पद्व्युत्तर शिक्षण सुरु झालं. दिवसरात्र काम! सोबत प्रचंड कठीण अभ्यासक्रमाचा डोंगर! डॉक्टर व्हायचं म्हणजे हा मेरू पर्वत उचलायचा अशी झिंगच असते त्या काळात डोक्यात! हे दिव्य
पार पडलं आणि माझं लहानपणीचं अल्लड स्वप्न खरं झालं. असं वाटलं की ती प्रवेश परीक्षा, तो MBBS चा अभ्यास, ती पद्व्युत्तर शिक्षणासाठी केलेली जीवघेणी मेहेनत ... हेच सगळं म्हणजे डॉक्टर होणं!

शिक्षण संपलं आणि वैद्यकीय ‘व्यवसाय’ सुरु झाला. आज जरी याला ‘व्यवसाय’ म्हणावं लागत असलं तरी खरं तर रोज कोणाशी तरी वेदनेचं नातं जुळवत होतो. बाह्यरुग्ण कक्षात जमलेले रुग्ण तपासणं, मधेच येणारा एखादा अत्यवस्थ रुग्ण हाताळणं, निदान करायला कठीण असणारे रुग्ण ऍडमिट करणं आणि त्यांचा इलाज व तपासण्या सुरु करणं असं आयुष्य सुरु झालं आणि हेच सगळं म्हणजे डॉक्टर होणं असं वाटू लागलं.

आणि मग लाट आली... करोना विषाणूची लाट! प्रचंड प्रमाणात रुग्ण! ICU, आंतररुग्ण विभाग कुठेच रुग्ण ठेवायला जागा नाही! सगळीकडे नुसता हाहाकार! अनेक जवळचे लोक, ज्यांच्यासमोर मी लहानाचा मोठा झालो, माझे शालेय शिक्षक, लहानपणीचे सवंगडी, असे सगळेच करोना बाधित म्हणून उपचारासाठी दाखल झालेले. सुरवातीच्या काही दिवसातच लक्षात आलं की ह्यावेळी लाट थोडी वेगळी आहे. करोना विषाणूवर अजूनही रामबाण औषध नाही. आणि जो काही उपचार उपलब्ध आहे त्याला म्हणावा तास प्रतिसाद नाही अशी सगळी परिस्थिती. या सगळ्या लोकांना मी बरा नाही करू शकलो तर? राऊंड सुरु केला की पोटात गोळा येई. भावनिक जवळीक असल्याने जास्तीचाच तणाव. मनातलं वादळ लपवून प्रत्येक रुग्णाला धीर देत, त्याच्या तब्येतीचा आढावा घेत निर्णय घेणं सुरु झालं. परीक्षेत पूर्णपणे अभ्यासक्रमाबाहेरचे प्रश्न यावेत तशी आमची अवस्था. ह्या आजाराची खूप कमी माहिती उपलब्ध. कुठलाच प्रोटोकॉल नाही. मग आज पर्यंत केलेला अभ्यास, मिळवलेला अनुभव पणाला लावणं सुरु झालं. डॉक्टर होणं म्हणजे आपल्या रुग्णांसाठी चाकोरीबाहेर जाणं आणि त्यासाठी आपल्या ज्ञानाची पराकाष्टा गाठणं ह्याची जाणीव व्हायला लागली. सगळं काही करूनही काही रुग्णांकडून जराही प्रतिसाद मिळत नसे. मग अश्या रुग्णांसाठी वरिष्ठांना फोन करणं, सहकाऱ्यांशी चर्चा करणं हे रोजचंच होतं. मग जाणीव झाली की डॉक्टर होणं म्हणजे सर्वच रुग्णांसाठी कुठलाही आपभाव न ठेवता आपलं ज्ञान सर्वांसोबत वाटणं आणि एकत्रित प्रयत्न करणं! बऱ्याचदा अशीही वेळ आली की सगळेच उपाय थकले व रुग्ण गमवावा लागला. १०-१५ दिवस ह्या रुग्णांशी व त्यांच्या नातेवाईकांशी जुळलेली नाती! त्यांच्या त्या अश्रुधारा, दुःख बघवत नसे. अंत्यसंस्कार त्यांच्या मनाप्रमाणे करू देण्याची सुद्धा परवानगी नाकारताना मन पाणीपाणी होऊन जाई. बऱ्याचवेळा केबिन आतून लावून घेऊन मी पण माझ्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली आहे. मग जाणीव झाली की डॉक्टर होणं म्हणजे ह्या भावनांना खंबीरपणे आवर घालून पुढच्या रुग्णांसाठी आपलं सर्वस्व पणाला लावणं. असे एक नव्हे तर हजारो अनुभव! ह्या करोनाच्या महामारीने डॉक्टर होणं म्हणजे काय याचा एक वेगळा आयाम अनुभवायला मिळाला.

आज जगातले सगळेच डॉक्टर आपलं  सर्वस्व पणाला लावून आहेत. प्रचंड प्रमाणात काम, तेवढाच तणाव, कुटुंबापासूनची दूरी ...अशा अनेक वैयक्तिक समस्या बाजूला ठेवून लढणारे हे सैनिकच! इटली स्पेन सारख्या देशात अगदी सुरुवातीला लढलेले डॉक्टर्स, ज्यांच्या प्रयत्नाने व अनुभवाने ह्या आजाराची थोडी तरी माहिती उपलब्ध होऊ शकली त्या आमच्या सहकाऱ्यांना सलाम! कोव्हीड सेंटर मध्ये PPE कीट घालून दिवस रात्र झपाटून जाऊन गेली एक वर्ष तेवढ्याच उमेदीनं काम करणाऱ्या सहकाऱ्यांना सलाम! ह्या विषाणूवर कुठलं औषध लागू होईल ह्याचं वेगवान संशोधन करणाऱ्या सहकाऱ्यांना सलाम! इतिहासात पहिल्यांदाच एक वर्षापेक्षा कमी कालावधीत प्रभावी व सुरक्षित अशी लस उपलब्ध करून देणाऱ्या या अभूतपूर्व सहकाऱ्यांना सलाम! आणि सगळ्यात शेवटी सलाम आपण सर्वांना ...आम्ही प्रयत्न करत होतो पण बऱ्याचदा ते  कमी पडत होते, आमच्या सुविधा कमी पडत होत्या, काही लोकांसाठी आम्ही उपलब्ध होऊ शकत नव्हतो... हे सगळं नाईलाजास्तव होतं! हे समजून घेऊन आमच्यावर ठेवलेल्या विश्वासासाठी, आमच्यामागे खंबीरपणे उभं  राहण्यासाठी आपल्याला सलाम!

पुढची लाट नकोच. आम्हाला कळतंय की वारंवार आपण आयुष्य थांबवणं शक्य नाही. पण काळजी घेत जगणं शक्य आहे. वेळेवर लसीकरण घेणं, मास्क वापरणं, social distancing पाळणं हाच यावरचा उपाय. आणि एवढ्यानंतरही संसर्ग झालाच तर पुन्हा आम्ही मागे हटणार नाही. तुमच्या शुभेच्छांची ऊर्जा आमच्या पाठीशी आहेच!

Happy Doctors’ Day!


• डॉ अमित हरताळकर.

~संकलन

Sunday, 23 May 2021

खुश रहिए




आई हॉस्पिटलमध्ये पेशंटला जेवण पुरवते आणि हा चिमुरडा प्रत्येक जेवणाच्या डब्यावर लिहतो.."खुश रहिए"

गोष्ट खूप लहान आहे पण हृदयाला स्पर्श करणारी.

~संकलन 

Saturday, 8 May 2021

गोष्ट खूप छोटी असते हो....

 1} गोष्ट खूप छोटी असते हो....


तुम्ही गाडीतून जातांना, न उतरता रस्त्यावरच्या माणसाला एखादा पत्ता विचारला तर बऱ्याचदा तो मिळतच नाही, पण उतरून जर, दादा पत्ता सांगता का ? असं विचारलं, तर काहीतरी हिंट नक्कीच मिळते....


गोष्ट खूप छोटी असते हो, पण करायची.


स्टेशनवर तुम्हाला सोडायला आलेल्याला, घरी पोचल्यानंतर तुम्ही फोन केला नाही, तर फारसं बिघडत नाही, पण फोन केला, तर नातं नक्कीच जुळतं...


गोष्ट खूप छोटी असते हो, पण करायची.


अंधारात तुम्ही कधी पाय अडखळुन पडलात, तसाच मागचाही पडू शकतो. तिथेच थोडं थांबून मागच्याला सावध केलं, तर अंधारातही त्याचे डोळे बोलतात....


गोष्ट खूप छोटी असते हो, पण करायची.


आपापलं सामान घेऊन तर सगळेच रेल्वेचा दादर चढतात. पण त्याही वेळी एखाद्या आजीचा हात धरून तिला मदत केली तर, तिने घट्ट धरलेला हात आपली आई आठवून देतो....


गोष्ट खूप छोटी असते हो, पण करायची.


घंटागाडीत तुमचा कचरा घेणारा तुम्हाला रोजच भेटतो. कधी त्याला ग्लोव्ह्ज द्यायचे. कधी skin चं मलम देऊन टाकायचं...


गोष्ट खूप छोटी असते हो,पण करायची.


कमी जागेत बाईक पार्क करतांना तिरक्या स्टॅंडवर न लावता, सरळ स्टॅंडवर लावून मागच्यालाही थोडी जागा ठेवली, तर त्याचं thank you ऐकायला मस्त वाटतं....


गोष्ट खूप छोटी असते हो, पण करायची.


किराणा दुकानाच्या गर्दीत, तिने घेतलेल्या सामानाचा ढीग पाहणाऱ्याने त्या ताईची पिशवी आपण धरून ठेवली, तर सामान नीट ठेवणं तिला सोप्पं जातं.

माणसा-माणसांतील निष्कारण असलेली बंधनं गळून पडतात...


गोष्ट खूप छोटी असते हो, पण करायची!


2} होतंअसंकधीकधी...!!

खूप महत्वाच्या मीटिंग मध्ये असतो आपण...

बऱ्याच वर्षांनी अचानक एका जवळच्या मित्राला आठवण येते आपली....

इच्छा असूनही कॉल उचलू शकत नाही आपण...

संध्याकाळी घरी आल्यावर आठवण येते...

परत कॉल करावा तर बोलायला विषय नसतो आपल्याकडे...

टाळतो आपण कॉल करायचा....

त्याचा दोन दिवसानंतर मेसेज येतो...

'तुझ्या ऑफिस बाहेर होतो...

भेटलो असतो...'

जुन्या आठवणी काढत बसतो आणि  मन रमवतो त्यातच..

स्वतःला खोटं खोटं समजावत...!

होतं असं कधी कधी....!!!

🍁🍁🍁

कडक उन्हात सिग्नलला बाईक उभी असते आपली...

रस्त्याच्या कडेला एक वृद्ध जोडपं असतं मागत लोकांना...

माया,कणव दाटून येते मनात आपल्या...

'कसं आपल्या आई वडिलांना लोक असं वाऱ्यावर सोडत असावेत??' 

पाकिटात हात जातो...

शंभराची नोट लागते हाती...

व्यवहार जागा घेतो ममतेची...

समोरचा म्हातारा ओळखतो... बदलतो...

"दहा दिलेस तरी खूप आहेत पोरा..."

तो सुटका करतो आपली पेचातून...

आपल्याच नजरेत आपल्याला छोटं करून...

होतं असं कधी कधी....!!!


🍁🍁🍁

दिवाळीचे पाहुणे असतात जमलेले...

आज कामवाली येणार की नाही याची धाकधूक असते...

तिच्या असण्याने आपण किती निवांत आहोत याची जाणीव होते अशा  वेळी...

दुपारची जेवणे उरकून गप्पा रंगात आलेल्या असतात...

ती येते...

काम आटोपते...

तिच्या मुलांना राहिलेली बासुंदी द्यावी का ह्या संभ्रमात असताना, कामवाली एक डब्बा देते हातात आपल्या...

चिवडा लाडू असतो त्यात...


"तुम्ही दर वेळा देता... आज माझ्याकडून तुम्हाला..."


'कोण श्रीमंत कोण गरीब', हा विचार सोडत नाही पिच्छा आपला...

होतं असं कधी कधी....!!!

🍁🍁🍁

ढाराढूर झोपेत असतो उन्हाळ्याचे गच्चीवर...

आई उठवते उन्हं अंगावर  आल्यावर...

अंगात ताप असतो तिच्या...

आपण सुट्टीचा आलोय घरी म्हणून उसनं बळ आणते अंगात ती...

मेसच्या खाण्याने आबाळ होत असेल म्हणून चार दिवस होईल तेवढे जिन्नस पोटात आणि उरलेले डब्यात भरून येतात आपल्यासोबत...

दिवस उलटतात...

वडिलांचा एके रात्री फोन येतो...

"काम झालं असेल तर आईला एक फोन कर... आज तिचा वाढदिवस होता..."

कोडगेपणा म्हणजे हाच तो काय...!

चडफडत facebook च्या virtual मित्राना केलेले  birthday विश आठवतात.....

लाजत तिला फोन करतो...

"आमचा कसला रे या वयात वाढदिवस? तू जेवलास ना?? तब्येतीला जप बाबा..."

ती बोलते...

कानात गरम तेल ओतल्याचा भास होतो...

अश्रूंचा मुक्त वावर होतो डोळ्यांतून...

काहीतरी खूप खूप दूर जातंय आपल्या पासून असं जाणवत राहतं...!!

खरंच, होतं असं कधी कधी....!!!


~संकलन 

Friday, 23 April 2021

उन्मत्त माणसाला नियतीने मारलेला एक झबरदस्त " फटका " कोरोना........

 उन्मत्त माणसाला नियतीने मारलेला एक झबरदस्त " फटका "

 कोरोना........


माणुसकी , स्वच्छता , निस्वार्थीपणा , कुटुंब व्यवस्था , पैशांचा दुरुपयोग, विलासीपणा , ऐशारामी जीवन, आता ह्या हरामाच्या पैशाचे काय करायचे ???? म्हणून  विनाकारण केले जाणारे प्रवास , देवस्थानांच वाढलेलं प्रस्थ , श्रीमंती , माजमस्ती , उद्धटपणा , सत्तालोलुपता , मग्रुरी , गुंडगिरी , जगण्याचा अर्थ , मरणाची भीती , केलेल्या वाईट कृत्यांची आठवण , समारंभात केलेला पैशांचा अपव्यय, समारंभात जेवणाच्या वेळी पूर्ण पंचपक्वान्न1नी भरलेल्या ताटातील एकदोन घास ख1ऊन, निर्लज्जपणे बाकीचे तसेच ठेऊन ताटावरून उठून जाण्याची वाढती प्रवृत्ती, तसेच निकृष्ठ जीवन शैली , अशा अनेक गोष्टी शिकवायला आलेला हा एक संदेश आहे .

पूर्वीच्या परंपरा विसरून आम्ही आधी तुळशीला घराबाहेर काढलं !

 " त्याला काय होतंय ?

 " हा प्रश्न विचारणाऱ्या नवीन पिढीला हा चांगलाच झटका आहे , 

सकाळी शुचिर्भूत होणे ही संकल्पना हळू हळू लयास चालली होती . 

कधीतरी वाट्टेल तेव्हा अंथरुणातून उठून " शॉवर " खाली दोन मिनिटं उभारणाऱ्या पिढीला , आता दोन दोन मिनिटाला हात धुवावे लागत आहेत . घरात, कापूर , उदबत्ती , देवापुढे दिवा ह्या सगळ्या गोष्टींना अंधश्रद्धेच्या सोईस्कर नावाने फाटा दिला गेला आहे . आता त्याच कापरासाठी मॉल मध्ये लाईन लागलीय .


 संध्याकाळची उदबत्ती लावून म्हटलेली रामरक्षा ही वरदान ठरतेय . घरी आल्यावर आधी पायावर पाणी घेणारी आपली संस्कृती सोडून बुटासकट बेडवर झोपून , मोजे काढून भिरकवणारे आता चांगलेच पोळले आहेत. 

धूप, दीप, नैवेद्य, आरतीमुळे प्रसन्न होणारं घरातलं वातावरण आता कमालीचं गढूळ झालंय .

पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी तर " घरचं जेवण " लोक हळू हळू विसरत चालले होते. आता त्याची नितांत गरज भासतेय. उठलं की सुटलं. प्रत्येक सुट्टीला गाडी घेऊन पर्यटन हेच जीवन असं थोडं वाटायला लागलं होतं, त्यावर पण थोडा आळा बसेल.

अंधश्रद्धेच्या नावाखाली आपणच आपल्या संस्कारांची दिलेली तिलांजली आता आपल्याच बोकांडी बसलीय .

सणासुदीच्या रूपाने पूर्वजांनी केलेली रचना किती वेडगळ पणा आहे हे शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध करणारी पिढी आता त्या मार्गाचा अवलंब नक्की करेल असं वाटायला लागलय . 


       शेवटी निसर्गापुढे सगळे सारखेच . रस्त्यावरच्या भिकाऱ्याला किंवा स्कॉर्पियोमधून फिरणाऱ्या श्रीमंताला " मास्क " बांधून फिरायची वेळ आलीय .

     हे मानवा....... तू कितीही पुढारलास तरी शेवटी तुझ्या जगण्याची गुरू किल्ली फक्त त्या नियंत्याकडेच आहे .

त्यामुळे त्याचं स्मरण कर . जैन मुनींनी तोंडाला फडकं बांधलेलं बघून हसणारे आज तेच करताहेत . 

फक्त त्यांचा उद्देश कीटक मरू नयेत हा होता . पण आज आपला उद्देश बेवारस कुत्त्येकी मौत, रस्त्यात मरून पडलेल्या घुशी किंवा उंदरासारखं मरण नको, तर सुसंस्कृतपणाचं, तारतम्य भाव ठेवुन,  विवेकशील, तत्वशील आणि सत्वशील असं जीवन असावं,हाच खरा त्यामागचा उद्देश आहे.


 पुराण ,ग्रंथ ,उपनिषदे यांच्यावरची धूळ झटका तरच हा झटका पचवण्याची ताकद तुमच्यात येईल. अन्यथा वडापाव, बर्गरच्या पिढीला असे कितीतरी कोरोना दर चार वर्षांनी झेलावे लागतील त्यासाठी........

हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे ,

आरोग्य दे , सर्वांना सुखात ,आनंदात , ऐश्वर्यात ठेव

जगावरील संकट टाळून सर्वांना उदंड आयुष्य दे...

सर्वाचं भलं कर,कल्याण कर,रक्षण कर आणि तुझे  गोड नाम सर्वांचे मुखात अखंड राहून दे ही प्रार्थना.


~संकलन 

Monday, 22 March 2021

पुस्तक परिचय-महाराष्ट्रातील उद्योजक


पुस्तक- महाराष्ट्रातील उद्योजक 
लेखक - जयप्रकाश झेंडे 
प्रकाशन- डायमंड प्रकाशन  
पुस्तक परिचय द्वारा -प्रसाद वैद्य 

दोस्तहो नमस्कार,

दोस्तांनो जीवनाच्या वाटचालीत यशस्वी होण्यासाठी कोणत्या खऱ्या भांडवलाची, शिदोरीची आपल्याला नितांत गरज असते हे चपखल शब्दात सांगायचं झालं तर, 'मने, मनगटे हेच खरे भांडवल' असं आपल्याला म्हणता येईल. बऱ्याच वेळा आपल्याला अनेक गोष्टी ऐकायला, अनुभवायला मिळतात. एखादा निराशेचा सूर कानी येतो: "अहो, धंद्यात जम बसवायला भांडवल हव ना! ते काय ओम भवती भिक्षान देही करायचं! एखादा उपरोधान म्हणतो- " आम्ही फक्त टाटा बिर्ला व्हायची स्वप्न रंगवायची. भांडवलाविना जिथे तिथे गाडी अडतीये आमची."

जीवनात कोणत्याही क्षेत्रात नोकरी, धंदा, उद्योग अन्य सर्व क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी मनाची तयारी आणि मनगटाच्या सामर्थ्याचा साक्षात्कार अनुभवायला हवा. अनंत ध्येयासक्तीने भारावून जाऊन माणसं जीवनाला कलाटणी देतात व यशाचे मानकरी जातात.

जयप्रकाश झेंडे यांचं ' महाराष्ट्रातील उद्योजक' हे पुस्तक अशाच उद्योजक वृत्तीला प्रोत्साहन देणारं आहे. हे पुस्तक म्हणजे महाराष्ट्रातील उद्योजकांना मानाचा मुजरा ठरावं असं आहे. या पुस्तकात भारतीय उद्योगाचे जनक जमशेटजी टाटा, लहान ठेवीदारांचा देवदूत- धीरूभाई अंबानी, जगातील दर्जाचा स्थापत्यशास्त्रज्ञ- बाबुराव(बी.जी.) शिर्के, ग्राहकांच्या समाधानाची शंभर टक्के खात्री देणारे- राजाभाऊ चितळे, नावीन्याचा स्पर्श असणारे- आबासाहेब गरवारे, ध्येयनिष्ठ उद्योगपती- शेठ जमनालाल बजाज, जागतिक किर्तीचा संगणक उद्योजक- अझीम प्रेमजी, व्यवसायाला नवीन उभारी देणारा उद्योजक-आनंद महिंद्रा, मध्यम कुटुंबातील कोट्यधीश- आदी गोदरेज, महाराष्ट्राला उद्योगी करणारे उद्योगी कुटुंब- शंतनुराव किर्लोस्कर, केरळातून येऊन महाराष्ट्रात रमलेला उद्योगपती- चंद्रन मेनन, भांडवलशाही मनाचा पण समाजवादी हृदयाचा उद्योजक- नारायण मूर्ती, उद्योगाला धार्मिकतेची जोड देणारे उद्योजक कुटुंब- बिर्ला कुटुंब आणि इट्स ऑलवेज पॉसिबल म्हणणारे- अनिल मेहता या उद्योजकांच्या चरित्रांचा त्यांनी वेध घेतला आहे आपल्यातील उद्योजक वृत्तीला प्रोत्साहन देतो.

त्याचबरोबर या पुस्तकात जयप्रकाश झेंडे यांनी मुख्य व्यवस्थापक आणि उद्योजकतेविषयी काही महत्त्वाचे मुद्दे सांगितलेले आहेत.

आपल्या या पुस्तकात भारतीय उद्योगाचे जनक- जमशेटजी टाटा यांच्याबद्दल लिहितात-

समाजातील एक गट त्यात कायमस्वरूपी वास्तव्य करण्यासाठी गुजरातमध्ये आला तेव्हाची एक कथा. या गटाच्या प्रमुखाने गुजरातच्या राजाकडे आश्रय देण्याची विनंती केली. त्यावेळी राजाने आमच्याकडे जागा नाही हे सांगण्यासाठी रूपकात्मक असा दुधाने काठोकाठ भरलेला वाडगा पारशांच्या गटप्रमुखाकडे पाठविला. हा प्रमुखही मोठा हुशार होता. त्याने त्या कटोर्‍यात साखर घालून राजाकडे परत पाठवला आणि कळवले, " साखरे सारखीच आम्ही जागा व्यापणार नाही परंतु त्या दुधात मिसळून जाऊ आणि दुधाची गोडी मात्र नक्कीच वाढवू." गुजरातच्या राजाने या समाजाची चतुराई पारखून त्यांना आपल्या राज्यात सामावून घेतले. जवळपास गेल्या दोन शतकांतील टाटा कुटुंबाची दैदिप्यमान कामगिरी पाहता त्यांनी दिलेले हे वचन अक्षरशः खरे करुन दाखविले आहे.

अशाच एका पारशी कुटुंबात जमशेटजींचा जन्म 3 मार्च 1839 रोजी नवसारी या छोट्याशा शहरात झाला. त्यांचे वडील नसुरवानजी हे त्यांच्या पारशी धर्मगुरु कुटुंबातले पहिले व्यावसायिक. त्यांनी व्यवसायासाठी मुंबईला स्थलांतर केले. वयाच्या एकोणतिसाव्या वर्षीच एकवीस हजार रुपये भांडवल घालून त्यांनी आपली स्वतंत्र पेढी सुरु केली. 1 जानेवारी 1877 ला त्यांनी नागपूर येथे 'एम्प्रेस मिल' या नावाने एका कापडगिरणीला प्रारंभ केला. त्यावेळी या गिरणीचे शेअर्स खरेदी करण्याची विनंती जमशेटजींनी एका व्यापारी सावकार मित्राला केली तेव्हा त्यास नकार देताना तो म्हणाला होता, " जमिनीत सोने काढून टाकणारा कंपनीत पैसा कशाला गुंतवायचा?" पुढे योगायोग असा की, या कंपनीची भरभराट पाहण्यासाठी हा गृहस्थ जिवंत होता आणि त्याने प्रांजलपणे कबुलीही दिली, " टाटांनी जमिनीत सोने गाडून ठेवले नव्हते तर त्यांनी ते मातीत पेरले होते आणि आता त्याला भरघोस पीकही येत आहे."

दोस्तांनो, संपत्ती कमवण्याचे दोन उद्देश असू शकतात- स्वतःसाठी आणि इतरांसाठी. ही गोष्ट लक्षात घेऊन जमशेटजींनी राष्ट्रासाठी संपत्ती निर्माण करणाऱ्या एका कार्यक्षम परंपरेला जन्म दिला. त्याची प्रचिती आपण आज घेत आहोत.

आपल्या भारतभूमीला औद्योगिक क्रांतीच्या दिशेने नेण्यासाठी त्यांनी चार महत्त्वाची उद्दिष्टे समोर ठेवली होती.

1) पोलाद निर्मिती- हा उद्योग सर्व जड उद्योगांचा पाया आहे.

2) पाण्यापासून वीजनिर्मिती- सर्वात स्वस्त पर्यावरण संवर्धक

3) संशोधनाशी निगडित शिक्षण- प्रगतीसाठी आवश्यक

4) जागतिक दर्जाचे उत्कृष्ट हॉटेल

आपल्या या स्वप्नांपैकी एकाच स्वप्नाची सत्यता ते पाहू शकले ते म्हणजे 16 डिसेंबर 1903 रोजी झालेली ताज महल हॉटेलची सुरुवात. त्यांची बाकी स्वप्ने त्यांच्या वारसदारांनी मोठ्या निष्ठेने पूर्ण केली.

मित्रांनो, 'महाराष्ट्रातील उद्योजक' या पुस्तकातील भारतीय उद्योगातील हिमालय असं त्यांना म्हणावं उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजे जे.आर.डी. अर्थात जहांगीर रतनजी दादाभाई टाटा. नगाधिराज हिमालय, सरितासम्राज्ञी गंगा आणि सौंदर्यशालीन ताजमहाल ही भारताची भूषणं आम्ही मोठ्या मानाने मिरवावीत असंच निसर्गाचं हे दान मानवालाही लाभलं की, मग त्याला अलौकिकतेचा, अद्भुततेचा स्पर्श होऊन त्याचं व्यक्तिमत्व वेगानं फुलतं, बहरतं. जे. आर. डी. टाटा यांच्या बाबतीतही हेच घडलं. आपल्या अभिजात कार्यकुशलतेच्या व बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी उत्तुंग अशी झेप घेऊन प्रथम आकाश आणि नंतर पृथ्वी गाजवली. त्यांच्या शब्दात त्यांनी स्वतःबद्दल केलेले वर्णन असे- " मी स्वतःला एक जरुरीपुरता, छान, विश्वासपात्र, जो पीत नाही, जुगार खेळत नाही, ज्याला मुलांची आणि प्राण्यांची आवड आहे असा माणूस मानतो. माझ्यात काही दोष आहेतच आणि त्यांची जबाबदारीही माझीच आहे असे मी मानतो." मित्रांनो, याच साधेपणामुळे आणि सच्चेपणामुळे ही माणसं मोठी झाली. अतिप्रचंड कामाचा ताण असतानासुद्धा जे.आर.डी. टाटा यांचं वाचनही भरपूर होतं. त्यांच्या कात्रणे चिकटविण्याच्या वहीत मृत्यू आणि प्रेम यावरही सुंदर परिच्छेद असणारी कात्रणे लावलेली होती तसंच संगीताचीही त्यांना रुची होती.

जे.आर.डी .टाटा म्हणतात, " स्वतः विचार केल्याशिवाय वरवरची अशी कोणतीही गोष्ट स्वीकारू नये. दुर्दैवाने 'बोधवाक्ये' आणि 'घोषवाक्ये' यामुळे आपली माणसं पटकन भावनिक बनतात. उपक्रमशीलता आणि साहस यांचं मूर्तीमंत प्रतीक म्हणजे जे. उपक्रमशीलता आणि साहस यांचं मूर्तीमंत प्रतीक म्हणजे जे.आर. उपक्रमशीलता आणि साहस यांचं मूर्तीमंत प्रतीक म्हणजे जे. उपक्रमशीलता आणि साहस यांचं मूर्तीमंत प्रतीक म्हणजे जे.आर.डी. टाटा.

मित्रांनो, जयप्रकाश झेंडे यांनी या पुस्तकात ज्या उद्योगी विभूतींचा समावेश केला आहे त्यांच्या या बद्दल वाचत असताना पुढचं वाक्य काय आहे याची उत्कंठा कायम राहते. रतन टाटा म्हणतात, " मला पैसा मिळवण्याची तीव्र इच्छा नाही तर जिथे आनंद नाही, तिथे तो निर्माण करण्याची, तो बघण्याची प्रचंड आस आहे." त्यांच्या म्हणण्यानुसार तो आनंद त्यांनी निर्माण केला नॅनो टाटा कारच्या माध्यमातून. मिठापासून मोटारीपर्यंत आणि पोलादापासून मोबाईलपर्यंत टाटा समूहाचा विस्तार विस्मयकारक तर आहेच पण उद्योजकांना पथनिदर्शकदेखील आहे.

दोस्तहो, लहान ठेवीदारांचा देवदूत ज्यांना म्हटलं जातं ते धीरुभाई अंबानी- "आपल्या यशाचे रहस्य काय?" या प्रश्नाला उत्तर देताना म्हणतात, " माणसाला महत्वाकांक्षा हवी आणि त्याला इतर माणसांची मने ओळखता आली पाहिजे." सर्व लोकांना आपल्या बरोबर घेऊन जाण्याची धीरुभाईंची शक्ती अफलातून होती.

रिलायन्समधील एक उच्चपदस्थ अधिकारी म्हणतात, " मी 26 वर्षांचा असताना माझे वडील वारले त्यावेळी माझ्या नातेवाईकांच्या आधी आमच्या अध्यक्षांचा सांत्वन करणारा संदेश मला मिळाला. त्यात लिहिले होते- 'आयुष्यात अशा घटना घडतात. काळजी करू नका आम्ही तुमच्या सोबत आहोत.' अशा प्रसंगी केवढा मोठा आधार वाटतो या शब्दांचा." आपण निश्चयाने आणि अचूकतेने काम केले पाहिजे म्हणजे यश आपोआपच आपल्या मागे येते यावर धीरुभाईंची आढळ श्रद्धा होती.

दोस्तांनो, असं म्हणतात की, पोटात शिरण्याचा मार्ग जिभेवरुनच जातो आणि पोटात शिरलं की मनात घर करणं सहज शक्य होतं. ग्राहकांच्या समाधानाची शंभर टक्के खात्री देणारे चितळे बंधू मिठाईवाले आणि तमाम खवय्ये यांच्यातलं नातं अगदी तसंच आहे.

दर्जेदार महाराष्ट्रीयन मिठाई, दूध आणि खाद्य पदार्थांची निर्मिती करणारे 'चितळे बंधू मिठाईवाले' यांचे नाव महाराष्ट्रातच नाही तर जगाच्या पाठीवर पसरलेल्या सर्व मराठी बांधवांच्या जिभेवर मोठ्यात सविनय विराजमान झालेलं आहे. पुण्याला भेट देणारी तमाम मराठी माणसं परदेशी जातांना बाकरवडी आणि आंबा बर्फी घेऊन जाणारच. चितळे उद्योग समूहाची वार्षिक उलाढाल जवळपास दोनशे कोटीच्या आसपास पोहोचली आहे. या ना. या नामांकित उद्योगाचा नेतृत्व करतात राजाभाऊ चितळे. या नामांकित उद्योगाचा नेतृत्व करतात राजाभाऊ चितळे. त्यांची वाणीही त्यांच्या मिठाईसारखी 'मिठी' आहे. केवळ गुणवत्ता आणि परिश्रम यांच्या जोरावर राजाभाऊंनी आपल्या अद्वितीय दर्जाच्या उत्पादनांची 'ब्रॅंड इमेज' तयार केली आहे.

अशा अनेक उद्योजकांचा जीवन प्रवास या पुस्तकात जयप्रकाश झेंडे यांनी बारकाईने रेखाटलेला आहे. लेखक लिहितात- माझ्या मते 'योजकता' आणि 'उपक्रमशीलता' यांचा संगम म्हणजे उद्योजकता आणि हा संगम ज्या व्यक्तीत दिसतो तो उद्योजक असे म्हणायला हवे.

उद्योजक व्हायची स्वप्ने अनेक तरुण असतात अनेक उदाहरणांवरून हे सिद्ध झालेलं आहे की यश म्हणजे काही अपघात नव्हे. तरुणांना सांगावेसे वाटते की यासाठी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे यशस्वी माणसांच्या चरित्रांचा बारकाईने अभ्यास करावा त्यांच्यातील गुण आत्मसात करावे आणि दुर्गुण टाळावे.

    अनेक यशस्वी उद्योजकांच्या चरित्रांचा अभ्यास केल्यावर त्यांच्यातील काही गुण प्रकर्षाने जाणवले ते म्हणजे मजबूत योजना संधीचा शोध,संधीचा शोध,बांधिलकी,अविचल श्रद्धा,योग्य दिशा,योग्य माणसांची निवड, धोका पत्करण्याची तयारी, प्रयत्नातील सातत्य, कल्पकता आणि चिकाटी हे गुण आपल्या अंगी असतील तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. होय ना!

मित्रांनो, या देशाच्या औद्योगिक प्रगतीत महाराष्ट्रातील उद्योजकांची कामगिरी नेत्रदीपक ठरली आहे आणि जगाच्या औद्योगिक क्षेत्रातही त्यांनी प्रचंड दबदबा निर्माण केला आहे.

मग काय दोस्तांनो, उद्योजक व्हायचंय ना? तर मग जयप्रकाश झेंडे यांचं 'महाराष्ट्रातील उद्योजक' हे पुस्तक नक्की वाचा. कारण साहसे वसते लक्ष्मी:| हेच खरं आहे आणि हो आपले अभिप्राय नक्की नोंदवा. आपले अभिप्राय हीच माझी ऊर्जा आहे. शुभेछा. भेटुया.

~प्रसाद वैद्य

Sunday, 21 March 2021

पुस्तक परिचय -बोलगाणी (कविता संग्रह)

पुस्तक-बोलगाणी (कविता संग्रह)
कवी- मंगेश पाडगावकर
प्रकाशन- मौज प्रकाशन 
प्रकाशक-संजय भागवत  
पुस्तक परिचय द्वारा -प्रसाद वैद्य 

नमस्कार दोस्तांनो,

दोस्तांनो, १० मार्च हा मराठी सारस्वतातील ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांचा जन्मदिवस. या जगण्यावर शतदा प्रेम करायला शिकवणारे मंगेश पाडगावकर मनाने चिरतरुण होते रसिक वाचकांसाठी ते जगण्याची उमेद बाळगतात. मंगेश पाडगावकरांच्या काव्य आविष्काराला दोन बाजू आहेत. एकीकडे ज्याला अभिजात म्हणता येईल अशी सकस कविता 'जिप्सी','उत्सव' 'सलाम'आणि 'भटके पक्षी' त्यांनी दिलीय .पण त्याचबरोबर सर्वसामान्य काव्यप्रेमी रसिकांशी संवाद साधण्यासाठी  'बोलगाणी' सारखे काव्यसंग्रह दिलेत.बालकांसाठी त्यांनी 'भोलानाथ', 'बबलगम' 'चांदोमामा' यासारखे बालगीत संग्रह प्रसिद्ध केलेत.

'बोलगाणी' हा असाच मनाला मोहिनी घालणारा काव्यसंग्रह. यातली प्रत्येक कविता आपल्या मनाचा ठाव घेते. 'मनमोकळ गाणं' नावाची कविता. या कवितेच्या शीर्षकातच मनमोकळेपणाचा भास आहे.

मनमोकळ गाणं

मन मोकळं अगदी मोकळं करायचं

पाखरु होऊन पाखराशी बोलायचं!

तुमचं दुःख खरं आहे,

कळतं मला,

शपथ सांगतो, तुमच्या इतकंच

छळतं मला;

पण आज माझ्यासाठी

सगळं सगळं विसरायचं,

आपण आपलं चांदणं होऊन

अंगणभर पसरायचं

सूर तर आहेतच: आपण फक्त झुलायचं!

मन मोकळं अगदी मोकळं करायचं

पाखरु होऊन पाखराशी बोलायचं!

असा हा पाखरू होऊन पाखराशी संवाद आपल्याला निसर्गाच्या सानिध्यात घेऊन जातो निसर्गाशी संवाद साधायला लावतो मग आपल्या ओठातून नकळत शब्द निघतात-

" या ओठांनी चुंबून घेईन, हजारदा ही माती

अनंत मरणे झेलून घ्यावी, इथल्या जगण्यासाठी

इथल्या पिंपळ पानावरती

अवघे विश्व तरावे

या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे."

'बोलगाणी' तील प्रत्येक कविता ही पुढे काय ओळ असेल ते वाचण्याची ओढ निर्माण करते. कारण यातल्या प्रत्येक कवितेची शब्दरचना व मांडणी तशाच दर्जाची आहे. 'आपल्या माणसाचं गाणं', 'तरीसुद्धा', 'तू प्रेम केलंस म्हणून', 'जगणं सुंदर आहे', 'चांदणं', या सुरुवातीच्या कविता आपल्या मनाला साद घालतात आणि त्या कविता वाचल्यावर आपण मनापासून त्या कवीला आणि त्या काव्याला भरभरुन दाद देतो. प्रेमात अपयश आलेल्या प्रेमवीराला उद्देशून असलेली कविता-'तू प्रेम केलंस म्हणून'. यात आत्महत्या करणाऱ्या प्रेमवीराला कवी जगण्याची नवी उमेद देतो. एक संजीवनी बहाल करतो.

तू प्रेम केलंस म्हणून

तिचं प्रेम लाभलं नाही? रडू नको,

जीव द्यायला पाण्यामध्ये बुडू नको!

प्रेम केलं म्हणजे

काय केलं?

फुलून आलो!

कुणासाठी आपण जीव टाकला

म्हणजे काय केलं ?

फुलून आलो!

फुलणाऱ्याला  फुलावसं वाटलं पाहिजे

फुलणारं प्रत्येक फूल

बघावसं वाटलं पाहिजे

रोग लागल्या झाडासारखा झडू नको!

तिचं प्रेम लाभलं नाही? रडू नको,

जीव द्यायला पाण्यामध्ये बुडू नको!

मंगेश पाडगावकरांच्या 'बोलगाणी' तील कवितांमध्ये निसर्ग आणि प्रेम ओथंबून भरलेलं आहे. व्यक्ती, राष्ट्र आणि समाज यांच्याशी बांधलेली त्यांची कविता केवळ आत्मानुभव मांडत नाही तर निराशेच रूपांतर आशेत करण्याचं प्रचंड सामर्थ्य त्यांच्या 'बोलगाणी' त आहे.

'बोलगाणी'तील कविता या फक्त बोलगाणी नाहीत तर ती जीवनगाणी वाटावी इतकी समरस आहेत. यातील आशावादी, आनंदवादी कविता जीवनात चैतन्य निर्माण करणार्‍या आहेत.

  बालमनालाही वेड लागावं अशाप्रकारच्या काही कविता या 'बोलगाणी' संग्रहात आहेत. त्यात 'चिऊताईसाठी गाणं', 'नसलेल्या आजोबांचं असलेलं गाणं'. 'गोष्ट' या कविता बालकांनाआपल्याकडे आकर्षित करून घेतील अशा आहेत. या कवितांच्या माध्यमातूनच वेगवेगळ्या रुपातील व मांडणीतील भावकवितांनी पाडगावकरांनी रसिकांना, वाचकांना आपलंसं केलंय. 'बोलगाणी' तील कविता दैनंदिन जीवनाशी संबंधित आहेत त्यामुळे काव्यप्रेमी रसिक ज्यावेळी त्या वाचतो त्यावेळी त्याला आपल्या जीवनातील प्रसंगाची आठवण होते.आता 'नसलेल्या आजोबांचं असलेलं गाणं' ही कविताच बघा ना!

नसलेल्या आजोबांचं असलेलं गाणं

जेवताना आजोबा लाडात येत

मला आपल्या ताटातली भाकर देत,

जेवता जेवता मधेच थांबत

आणि एक भला मोठा ढेकर देत!

मी म्हणायची रागावूनः

" आजोबा, बॅड मॅनर्स,

व्हॉट आर यु डुइंग?"

आजोबांचं हसून उत्तर:

" आय एम जस्ट ढेकरिंग!"

आजोबांच्या खोलीत आता

धुकं... धुकं ...धुकं...

आजोबांचं जग सगळं

मुकं... मुकं... मुकं...

  या कवितेत एकीकडे काहीअंशी विनोद आहे त्याचबरोबर नसलेल्या आजोबांचं दुःखही आहे. अशाप्रकारचे नित्याचे अनुभव आपल्याला अंतर्मुख करतात आणि आपल्याला भूतकाळातील आठवणीत रमायला लावतात. या शब्दबद्ध मांडणीतील पाडगावकरांची प्रतिभा विलक्षण आहे. मंगेश पाडगावकरांनी अक्षर आणि कागदावर अडकलेली कविता सर्वसामान्य लोकांपर्यंत नेऊन ठेवली. त्यांची एक गझल आहे. त्यात ते म्हणतात-

  हे खरे की खूप माझे हाल झाले, ना कधी गाणे परी बेताल झाले.

हे खरे की हा खिसा होता रिकामा, हृदय हे नाही परी कंगाल झाले.

अशा या दिलदार कवीची सदाबहार गाणी आपण 'शुक्रतारा' यातही ऐकलेली आहेत.मित्रांनो, हल्ली आपल्याला जगावं कसं आणि वागावं कस हेच समजत नाही. हे समजून घ्यायचं असेल तर याचं मार्गदर्शन आपल्याला 'बोलगाणी'तूनच मिळेल. 'शहाणपणाच गाणं' या आपल्या कवितेत पाडगावकर म्हणतात-

शहाणपणाच गाणं

माणसाने शहाण्यासारखं वागावं

आणि मग या जगात आनंदाने जगावं!

वाट इथली बिकट असते हे काय मला ठाऊक नाही?

पावलोपावली कटकट असते हे काय मला ठाऊक नाही?

ठाऊक आहे म्हणून तर

लागतं हे सांगावं:

माणसाने शहाण्यासारखं वागावं

आणि मग या जगात आनंदाने जगावं!

अहो एवढेच काय, तर वार्धक्यालाही शब्दांचा आधार देऊन तारुण्य बहाल करणारी कविता पाडगावकरांनी केलीये 'म्हातारपणावरचं तरुण गाणं' या माध्यमातून.

म्हातारपणावरचं तरुण गाणं

येतं म्हटलं की येऊ लागतं म्हातारपण

घेतं म्हटलं की घेऊ लागतं म्हातारपण!

हिरवं पान

कधीतरी पिकणारच,

पिकलं पान

कधीतरी गळणारच,

गळलं पान,

मातीला हे मिळणारच...

झाड कधी कण्हत का?

कधी काही म्हणतात का?

गिरक्या गिरक्या घेत घेत

नाचत जातं पिकलं पान,

कविता पिवळी पिवळी धमक

वाचत जातं पिकलं पान

नेतं म्हटलं की नेऊ लागतं म्हातारपण,

येतं म्हटलं की येऊ लागतं म्हातारपण-

तरुण असलो की तरुण असतं म्हातारपण,

रडत बसलो की करुण असतं म्हातारपण!

येतं म्हटलं की येऊ लागतं म्हातारपण

घेतं म्हटलं की घेऊ लागतं म्हातारपण!

ही कविता म्हातारपणातही आनंदानं, उत्साहानं जगण्याचं तंत्र शिकवते. भावगहिऱ्या, सुरेल व गेय कविता रचणाऱ्या पाडगावकरांनी 'बोलगाणी' च्या रुपाने रसिकांना कविता ऐकायला, गुणगुणायला ही शिकविले. 'ऐकणारे कान'ही तयार केले. नवीन कवींना आत्मसात करण्याचा मोह व्हावा असे अनेक तंत्र-मंत्र त्यांनी यात हाताळले आहेत. रडत रडत जगायचं की, कण्हत कण्हत जगायचं की हसत हसत ...? असं विचारणारा हा आशावादी, आनंदवादी कवी सगळ्यांना भावणारा आहे.

मित्रांनो, अलिकडच्या काळात आपल्या देशाला दहशतवादाने घेरलंय याचीही जाणीव 'आत्ताचा हा क्षण' या कवितेत त्याचप्रमाणे 'अजून तुझा हात आहे' या दोन कवितांमध्ये पाडगावकर यांनी व्यक्त केलीय.

आत्ताचा हा क्षण

अवतीभवती भेटणार्‍या

हिंस्र दंगली;

ऐटदार पोशाखातली

माणसं जंगली;

कधी हा सूर्य

थंड राख होऊन जाईल;

कधीही पृथ्वी

जळून खाक होऊन जाईल...

आत्ताचा हा क्षण केवळ तुमचा आहे:

तुळशीच्या रोपाला

थोडं पाणी घालून या;

ओल्या मऊ मातीतून

अनवाणी चालून या!

  या कवितेच्या माध्यमातून वर्तमानात आपल्या हातात असलेल्या क्षणांची जाणीव पाडगावकरांनी आपल्याला करुन दिलीय. म्हणूनच बोल गाडीतील कविता वाचलेले क्षण आणि त्या क्षणांचे संदर्भ जपण्यासारखे आहेत.

  प्रेम हा जीवनातला एक अविष्कार आहे. तो लावण्याचा शृंगार आहे. तो व्यक्त करता येण हा त्या अविष्काराचाच एक भाग आहे. प्रेमाची महती बोलगाणीतील कवितांमध्ये पाडगावकर यांनी पटवून दिलीय. 'प्रेम म्हणजे प्रेम असतं' या कवितेत ते म्हणतात:

प्रेम म्हणजे प्रेम असतं

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेमअसतं

तुमचं आणि आमचं अगदी 'सेम' असतं!

मराठीतून इश्श म्हणून

प्रेम करता येतं;

उर्दूमधे इष्क म्हणून

प्रेम करता येतं;

व्याकरणात चुकलात तरी

प्रेम करता येतं;

कॉन्व्हेंटमधे शिकलात तरी

प्रेम करता येतं!

'लव्ह' हे त्याचंच दुसरं 'नेम' असतं,

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं

तुमचं आणि आमचं अगदी 'सेम' असतं

अशा या प्रेमाची महती 'बोलगाणी'तील 'प्रेमात पडलं की...', 'तुमचं काय गेलं?' अशा कवितांमध्ये त्यांनी पटवून दिलीय.

  'विदूषकाचं आत्मकथन' ही कवितादेखील जगण्याचं मर्म सांगणारी आहे.

आपल्या आयुष्यात कधीकधी असे क्षण येतात की जे आपल्याला अनपेक्षित असतात.आपल्या मनासारख्या गोष्टी घडत नाही. तेव्हा आपण उदास होतो आणि हताश होतो. अशावेळी परिस्थिती बदलत नसेल तेव्हा आपली मनस्थिती बदला जीवन हे आनंदमय होईल, असा संदेश कवी आपल्या 'सांगा कसं जगायचं?' या कवितेतून रसिकांना देतात. जीवन सकारात्मक विचारांनी जगलो, तर जीवन जगण्यासारखा आनंद नाही आणि रडत बसलो तर जीवन जगण्यासारखे दुःखही नाही. म्हणूनच कसं जगायचं हे आपणच ठरवायचं असतं. यासाठी सदर कवितेत कवीने आपल्यापुढेच आपल्या आनंदासाठी पर्याय ठेवलेले आहेत. जीवन कसं जगायचं याचं उत्तम मार्गदर्शन या  कवितेत आहे.

सांगा कसं जगायचं

सांगा कसं जगायचं ?

कण्हत कण्हत

की गाणं म्हणत?

काय काय तुम्‍हीच ठरवा!

काळ्याकुट्ट काळोखात

जेव्हा काही दिसत नसतं,

तुमच्यासाठी

कोणीतरी

दिवा घेऊन उभं असतं!

काळोखात कुढायचं

की प्रकाशात उडायचं?

तुम्‍हीच ठरवा!

पेला अर्धा

सरला आहे

असं सुद्धा म्हणता येतं;

पेला अर्धा

भरला आहे

असं सुद्धा म्हणता येतं!

सरला आहे म्हणायचं

की भरला आहे म्हणायचं?

तुम्‍हीच ठरवा!

सांगा कसं जगायचं ?

कण्हत कण्हत

की गाणं म्हणत?

तुम्‍हीच ठरवा!

                    मित्रांनो, हा आशावादी दृष्टिकोन जगणं शिकवतो. कवीचं जगणं आणि लिहिणं ही कधीही वेगळी आणि स्वतंत्र खाती नसतात त्यांच्या जगण्यातून कवितेला आणि कवितेतून जगण्याला कधीही वगळता येत नसते. हे जगणं आणि लिहिणं एकजीव होतं तेव्हाच मंगेश पाडगावकर यांच्यासारखे कवी जन्माला येत असतात. तर मग वाचणार ना या जिंदादिल कवीची सदाबहार बोलगाणी.! शुभेच्छा. भेटूया.      


आपला अभिप्राय माझी ऊर्जा                          

Thursday, 18 March 2021

वाचलेच पाहिजे असे काही ...

वाचलेच पाहिजे असे काही ...


मी दारात आलो, नेहमीसारखे जोडे काढून हातात घेतले आणि ओपीडीत आलो. 

समोरच एक वृद्ध उभा होता. 

"सर, तुम्ही.?" 

मी त्या वृद्धाचा हात धरत म्हटलं.

"कोण.?"

"मी xxx. तुमचा विद्यार्थी."

मी माझं नाव सांगितलं.

"होय काय.? 

चेहऱ्यात खूप फरक पडलाय रे.! 

तब्बेतीनं पण मोठा झालायस. 

शाळेत होतास तेव्हा केवढा मरतुकडा होतास." 

सरांच्या बोलण्यावर रिसेप्शनिस्ट 

तोंड धरुन हसली.

"चला की सर.! आत चला." मी हातातले चप्पल रिसेप्शनिस्टच्या काऊंटरखाली ठेवत सरांना म्हटलं.

"नको, तू जा. मी येतो माझा नंबर आल्यावर."

"सर, नंबराचं काय घेऊन बसलाय.? तुम्ही माझे गुरु आहात. माझ्याबरोबर चला आत."

"अरे, नंबराचं काय म्हणजे.?" 

सर माझ्याकडं आश्चर्यानं बघत म्हणाले, 

"जगात नंबरालाच सर्वात जास्त महत्त्व आहे. तुझा वर्गात नेहमी पहिला नंबर असायचा. पण प्रगतीपुस्तकावर मी  उत्तीर्ण क्रमांक १ च्या ठिकाणी उत्तीर्ण क्रमांक २ असं लिहलं असतं तर तुला चाललं असतं का.? नाही ना.? माझा साठावा नंबर आहे. म्हणजे माझ्या आधीचे एकोणसाठ जण माझ्या आधी नंबर लावून बसलेत. त्यांचा हक्काचा नंबर डावलून मी आत येणं बरं दिसतं का.?"

"पण सर."

"तू जा. कामाला लाग. तू बोर्डवरल्या टायमिंगच्या आधी आलास त्याबद्दल तुझं कौतुक. शाळेत उशीरा आलास म्हणून मी छड्या मारायचो तेव्हा मारक्या म्हशीसारखा माझ्याकडं बघायचास पण आता त्या छड्यांचं महत्त्व लक्षात आलं असेलच. 

तेव्हा छड्या दिल्या नसत्या तर आता 

आला असतास तासभर उशिरानं."

"सिस्टर, यांचे केसपेपरचे पैसे घेऊ नका." 

मी केबिनमध्ये जाता जाता रिसेप्शनिस्टच्या कानात कुजबुजलो. पण तेही सरांना ऐकू गेलंच.

"काय बोललास.? पैसे घेऊ नको?" सर माझ्यावर ओरडले, "पैसे तर तुला घ्यावेच लागणार. मी तुझा शिक्षक आहे म्हणून मी काही फुकट शिकवलं नाही तुला. वीस हजार रुपये पगार घेत होतो सरकारकडनं. हां, आता तुलाही सरकार पैसे देत असेल 

तर नको घेऊ पैसे."


मी हसत हसत आत आलो आणि पेशंट बघायला सुरुवात केली. पेशंट बघता बघता सीसीटीव्हीमधून माझं सरांकडे लक्ष होतंच. 

तीन तासांत सरांनी बसायच्या किमान तीस जागा बदलल्या असतील.


नंबर आल्यावर सर आत आले. आल्या आल्या त्यांनी माझा हात हातात घेतला. तो आपल्या छातीवर दाबला आणि सर बोलले, "बाळा, मला खूप खूप आनंद झालाय. 

खूप कमावलंस तू."

"एवढंही काही नाही सर.!"


"नाही कसं.? अरे, मघापासून मी तुझ्या सगळ्या नव्या जुन्या पेशंटशी बोलतोय. पण एकही माणूस तुझ्याबद्दल वाईट बोलायला तयार नाही. सगळे गुणगानंच गातायत. 

छाती अभिमानानं भरुन आली माझी." 

बाहेर सर आपल्या बसण्याच्या जागा सारखं का बदलत होते ते आता लक्षात आलं.

"सर, तुम्ही शाळेत शिकवत होतात तेव्हा तरी कुठला विद्यार्थी तुम्हांला नावं ठेवायचा.? समोरच्या माणसाशी प्रेमानं वागायचं, आपलं काम सचोटीनं करायचं 

हे तुम्हीच तर शिकवत होतात ना.! 

आज या वयातही तुम्ही तुमची तत्वं सोडायला तयार नाही आहात. मीही त्याच तत्वानं जगतोय. त्यात मी विशेष काही करतोय असं काहीच नाही. प्रेमानं व्यवहार केला की जगणं सुंदर होतं, हे शिकवतं तेच तर शिक्षण.!"

"तू शाळेत होतास तसाच आहेस. 

खेड्यातला साधा सरळ मुलगा."


"आता आयुष्यभर हा विद्यार्थी असाच राहू दे असा आशीर्वाद द्या.!" 

मी म्हटलं आणि सरांच्या डोळ्यांत पाणी तरळलं.

"आईबाप आणि शिक्षक यांचं असंच असतं बघ. मुलं वाईट निपजली तर त्यांना वाईट वाटतं, आणि मुलं नीतीवंत जन्मली तरी त्यांच्या डोळ्यांत पाणी येतं. पण असे आनंदाश्रू आजकाल दुर्मिळ झालेत रे.!"


सर पुढं बरंच काही काही बोलत होते आणि त्यांचा विद्यार्थी भान हरपून ऐकत होता. वाटत होतं सरांचं हे बोलणं कधी संपूच नये.! असे शिक्षक मिळणं म्हणजे भाग्यच नाही का.? दुसऱ्याच्या मुलासाठी अश्रू गाळणारे शिक्षक आजही असतील का हो.?🌹


लेखक - अनामिक

सर्व हक्क लेखकाला

माझ्या सर्व शिक्षक व स्टाफला समर्पित.


~संकलन 

My Quotes

 
















Wednesday, 10 February 2021

समाधान

समाधान

सहजच... 

बंद पडलेली कार रस्त्यावर लावून मी बस मधे चढलो तर खरं.. 

पण आतली गर्दी बघून जीव घाबरला. बसायला जागा नव्हती. तेवढ्यात एक सीट रिकामी झाली.पुढचा एक जण सहज तेथे बसू शकत होता ....पण त्याने ती सीट मला दिली.  पूढच्या stop. वर पुन्हा तेच घडले. पुन्हा आपली सीट त्याने दुसऱ्याला दिली. आमच्या पूर्ण बस प्रवासात हा प्रकार चारदा घडला,बर हा माणूस अगदी सामान्य दिसत होता,म्हणजे कुठे तरी मजदूरी करून घरी परत जात असावा,आता मात्र शेवटच्या stop. वर आम्ही सर्वच उतरलो. 

तेंव्हा उत्सुकता म्हणून मी त्याच्याशी बोललो.  विचारले की प्रत्त्येक वेळी तुम्ही तुमची सीट दुसऱ्याला का देत होता ??  

तेंव्हा त्याने दिलेले उत्तर हे असे •••••

मी काही जास्त शिकलेला नाही हो..  अशिक्षितच आहे. मी एके ठिकाणी कमी पैशावर काम करतो पण माझ्या जवळ कुणाला देण्यासाठी काहीच नाही. ज्ञान नाही,पैसा नाही.

 तेंव्हा मी हे अस रोजच करतो. आणि मी हे सहज‌ करू शकतो.  


दिवसभर काम केल्यानंतर ‌ अजून थोडा वेळ उभं राहणं मला जमत.

  मी तुम्हाला माझी जागा दिली.तुम्ही मला धन्यवाद म्हणालात ना..त्यातच मला खूप समाधान मिळालं. मी कोणाच्या तरी कामी आलो, कोणाला काही तरी दिल्याच समाधान झालं..

असं मी रोजच करत असतो.   हा माझा नियमच झाला आहे••• 

आणि रोज मी आनंदाने घरी जातो.•••

उत्तर ऐकून मी थक्कच झालो. त्याचे विचार. व समज बघून याला अशिक्षित म्हणायचे का? 

काय समजायचे ?

 कोणाकरिता काही तरी करायची त्याची इच्छा ,

••••ती पण स्वतः ची परिस्थिती अशी असताना . •••मी कशा रीतीने मदत  करू शकतो??

त्यावर शोधलेला उपाय बघून  देव सुध्दा आपल्या या निर्मीतीवर खुष असेल. माझ्या सर्वोत्तम कलाकृती पैकी ही एक कलाकृती . 

असं दिमाखात सांगत असेल .••••••

        त्याने मला खूप गोष्टी शिकवल्या. स्वतःला हुषार शिक्षित समजणारा मी त्याच्या समोर  खाली मान घालून  स्वतःचे परिक्षण करू लागलो. किती सहज त्याने त्याच्या समाधानाची व्याख्या सांगितली. देव त्याला नक्कीच पावला असणार..

मदत ही खूप महाग  गोष्ट आहे  कारण मनाने श्रीमंत असणारे खूप कमी लोक असतात .•••••

सुंदर कपडे, हातात पर्स , मोबाईल , डोळ्यांवर गॉगल, चार इंग्लिशचे शब्द येणे म्हणजेच  सुशिक्षत  का ? हीच माणसाची खरी ओळख का ? मोठं घर , मोठी कार , म्हणजे मिळालेले समाधान का ?

 कोण तुम्हाला केंव्हा काय शिकवून जाईल????? व  तुमची धुंदी उतरवेलं सांगता येत नाही .•••

   या माणसाच्या संगतीने माझे विचार स्वच्छ झाले. 

   म्हणतात ना •••

    " कर्म से  पहचान  होती है  इंसानों  की ।

      वरना महंगे कपड़े तो पुतले भी पहनते हैं दुकानों में "..


~संकलन