मुख्याध्यापक म्हणुन माझ्या हातुन झालेला सर्वश्रेष्ठ सत्कार
सर्वात मोठा सत्कार.....
आपल्या कै.आप्पासाहेब दौलत धना माळी माध्यमिक विद्यालयातील भिल्ल देविदास अंकुश हा विद्यार्थी अतिशय स्वभावाने गरीब, सोज्वळ, सामंजस्याने वागणारा,घरातील गरीबी पण शिक्षणाबद्दलची प्रचंड ओढ,स्वतः खडतर कष्ट करून शिक्षण घेण्याची तयारी ठेवणारा....आजचा प्रसंग असाच काहीसा...मी माझ्या विचारांत कामानिमित्त चाळीसगाव शहरात रस्त्याने जात असताना अचानक आवाज आला ...सर ..सर...मी वळुन बघितले तर ..लक्षात आले..अरे हा तर आपल्या विद्यालयातील विद्यार्थी ... देविदास भिल्ल ...घामाने चिंब झालेला....जणु काही पावसात उभा आहे... संपुर्ण शरीर कपड्यांसहीत घामाने ओलेचिंब भिजलेले.....बाजुला घर बांधणीचे साहित्य पडलेले....स्लॅब टाकण्यासाठी असलेले मशिन धाडधाड आवाजाने सुरू आहे....मी गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली...विचारले...
काय रे इकडं कुठे...मी थांबुन त्याची विचारपूस करु लागलो....मी भेटल्यावर त्याला प्रचंड आनंद झाला ...भराभरा माझ्याशी बोलायला लागला(कदाचित त्याचे ठेकेदार मालक समोर असल्याने त्याला काम जास्त वेळ थांबवायच नसावं)...सर एक प्राब्लेम आहे....मी म्हटलं बोल काय झालं....तो म्हणाला...सर कालपासून प्रयत्न करतोय माझा दहावीचा रिझल्ट दिसत नाहीए सर...काय झालं असेल सर ....काहीतरी करा. सर ...निकाल नाही सर ..... खुप चिंतेत होता....दोन दिवसांपासून देविदास निकाल पाहण्यासाठी तळमळ करीत होता....मला फार वाईट वाटले ..कष्ट करून शिक्षणाची जिद्द असणारा मुलगा माझ्या समोर उभा होता.....मी म्हटलं काळजी करू नकोस....मी पाहतो....रस्त्याने जातांना विचारांचे काहूर डोक्यात सुरू होते....शहरात सर्व सोयी सुविधा उपलब्ध असणारे विद्यार्थी आणि आमच्या ग्रामीण भागातील स्वतः काबाडकष्ट करून शिक्षणाची जिद्द असणारा आमचा विद्यार्थी....तुलना सुरू झाली होती..... इंटरनेट कॅफे वर गेलो...मलाही आता उत्सुकता लागली होती..... निकाल चेक केला ....आणि.....
सुटकेचा निःश्वास टाकला..... देविदास ७५.४० टक्के घेऊन चांगल्या मार्कांनी पास झाला होता.... खुप आनंद झाला... कधी जातो आणि देविदास चे अभिनंदन करतो असं झालं....निकालाची प्रिंट घेतली.....सोबत पेढे घेतले....आणि....
गाडी देविदास काम करत होता तिकडे वळली...... देविदास सिमेंट,वाळु,रेती यांच्याशी मस्ती करून नशिब अजमावत होता... सुरेख भविष्याची स्वप्ने पाहत होता..... मी गेलो होतो त्या रस्त्याकडे काम करता करता अधुन मधुन पाहत होता... देविदास च्या मनात होणारी घालमेल स्पष्ट जाणवत होती....मला त्याच्याकडे येताना बघुन देविदास आनंदी झाला.... माझ्याकडे न पाहता देविदास ची नजर माझ्या हातात असणा-या कागदाकडे जास्त होती.... चेहऱ्यावर अनेक भाव स्पष्ट उमटत होते....गाडी लावतो न लावतो तोच आवाज आला.....सर काय झाले....सांगा ना..निकाल...सांगा ना....
मी म्हटलं अरे देविदास तु चांगल्या मार्कांनी पास झाला....... क्षणात देविदास च्या चेह-यावरील भाव बदलले.... प्रचंड आनंद ..एखादे मोठं यश मिळवल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर जाणवत होता.... मी हे सर्व अनुभवत होतो.....माझ्या पंधरा वर्षांच्या नोकरीत असा प्रसंग माझ्या समोर पहिल्यांदाच आला होता....मी पिशवीतून पेढे चा बाॅक्स काढला ....देविदास ला पेढा भरविला..... देविदास च्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या.....
म्हणाला...सर आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात संस्मरणीय दिवस राहील.....नकळत देविदास चे शब्द काळजाला चिरत हृदयाच्या कप्प्यात बंद झाले.....देविदास चा निरोप घेतला...पुढील जिवनातील येणाऱ्या परिक्षांसाठी शुभेच्छा दिल्या....
विचारचक्र सुरू झाले... एखाद्या विद्यार्थी ला शिक्षण घेण्यासाठी इतके कष्ट करावे लागतात....माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यातील, नोकरीतील मुख्याध्यापक म्हणुन आज देविदास चा मी केलेला सत्कार हा सर्वात मोठा सत्कार होता.....
देविदास ला परमेश्वर पांडुरंग प्रचंड बळ देवो...त्याच्या मेहनतीला...कष्टाला नक्कीच फळ मिळो हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना....🌹🌹
सुरेश सु.देवरे
मुख्याध्यापक
कै आप्पासाहेब दौलत धना माळी माध्यमिक विद्यालय पिंपळवाड म्हाळसा ता.चाळीसगाव
जि.जळगाव
~संकलन
No comments:
Post a Comment