पुस्तक-चरित्रं अशी घडतात
लेखक -प्रा. मिलिंद जोशी
पुस्तक परिचय द्वारा -प्रसाद वैद्य
कर्तृत्वाशिवाय व्यक्तीला मोठेपण प्राप्त होत नाही आणि मोठेपण सहज प्राप्त होते का तर निश्चितच नाही. माणसं मोठी होतात ती कर्तृत्वाने आणि थोड्या मोठ्या व्यक्तींच्या चरित्र वाचनाने. समाजातील काही माणसं अशी असतात ज्यांच्या आचरणातून आपल्याला एक प्रेरणा मिळते आणि ते आपल्याला एक दिशा देतात.
प्रा.मिलिंद जोशी यांचं 'चरित्रं अशी घडतात' हे पुस्तक म्हणजे अशाच प्रेरणादायी चरित्रांचा संग्रह या पुस्तकात इतिहास पुत्र शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, मृत्युंजयकार शिवाजी सावंत,ऋषितुल्य दार्शनिक-प्राचार्य शिवाजीराव भोसले, मतिमंद मुलांची माता-सिंधूताई जोशी, द्रष्टा शास्त्रज्ञ डॉ.रघुनाथ माशेलकर, आनंदवनातील 'अभय साधक' बाबा आमटे, परमसंगणकाचे जनक डॉ. विजय भटकर, संकटावर स्वार होणारे चैतन्य नसीमा हुरजूक, विज्ञानातील ध्रुव जयंत नारळीकर, समाजभूषण अण्णा हजारे,अनाथांची माय सिंधुताई सपकाळ, महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैभव डॉ. विश्वास मेहेंदळे, उद्योजकातील अग्रणी डी.एस.कुलकर्णी आणि भारतीयांच्या हृदयाचे स्पंदन मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर यासारख्या अनेक चरित्रांचा त्यांनी वेध घेतला आहे जो आपल्याला देखील प्रेरित करतो.
प्राध्यापक मिलिंद जोशी यांनी या पुस्तकात ज्या थोर व्यक्तींचा समावेश केला आहे त्या चरित्राबद्दल वाचताना पुढचं वाक्य काय आहे याची उत्सुकता मनाला लागून राहते.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना त्यांनी 'इतिहास पुत्र' असे म्हटले आहे. बाबासाहेबांविषयी ते लिहितात - माणसे इतिहास घडवतात आणि ती गेल्यानंतर इतिहास त्यांची नोंद घेत असतो. इतिहासाला साक्षी ठेवून वर्तमानाचा विचार करीत भविष्याचे वेध घेता येतात.' शिवाजी' हा तीन अक्षरी मंत्र ज्यांनी उभं आयुष्य जपला आणि महाराष्ट्राला शिवचरित्राची मोहिनी घातली ते बळवंत मोरेश्वर तथा बाबासाहेब पुरंदरे हे इतिहासपुत्रच आहेत असे म्हणावे लागेल. मॅट्रिकला बाबासाहेब दोनदा अनुत्तीर्ण झाले. कारण गणित या विषयाशी त्यांच आत्यंतिक वैर होतं. बाबासाहेब गणितात नापास झाले तेव्हा त्यांना वडिलांसमोर जाताना खूप भीती वाटत होती त्यांचे वडील त्यांना म्हणाले "बाबासाहेब बेचैन जगा आणि चैनीत मरा." बाबासाहेबांनी वडिलांचे शब्द ऐकले मात्र आणि ते झपाटल्यासारखे कामाला लागले. पुढच्या परीक्षेत मॅट्रिक पास झाले. या मुलाने पुढे काय केले असेल? आठवल्यांचा Algebra आणि आगाश्यांची Geometry ही दोन पुस्तकं घरी येऊन काढली, पिशवीत घातली, खडकवासल्याला गेले आणि पाण्यात टाकली. या मुलाला एकच भीती वाटत होती- तुकारामांची गाथा जशी वर आली तशी ही पुस्तकं वर येतील की काय? क्रमिक पुस्तकातील धड्यांपेक्षा वडिलांनी शिकवलेला धडा बाबासाहेबांनी गिरवायला सुरुवात केली. शिवचरित्राचे वेध बालवयातच या मुलाला जडले व भिनले. याबाबतीत त्यांचे गुरू होते प्रत्यक्ष त्यांचे वडीलच. कधी पायी, कधी रेल्वेने, कधी जलमार्गाने, कधी विमानाने तर कधी अगदी बैलगाडी पासून ते घोडेस्वारी पर्यंत मिळेल त्या वाहनाने लक्षावधी मैलांचा प्रवास केला. वयाच्या सहाव्या वर्षापासून ऐतिहासिक किल्ले, वाडे, महाल, मंदिरे वगैरे पाहण्यास वडिलांबरोबर प्रारंभ झाला होता. रात्र-रात्र जागरणं करून इतिहासाची दप्तरं चाळली. अवघं आयुष्य शिवचरित्रासाठी वाहून घेतलं आणि 'जाणता राजा' महानाट्य साकारलं.
मित्रांनो शिवमंत्राचा घोष करणाऱ्या या साधकाच्या सहवासात ज्यांनी आयुष्यातले काही क्षण घालविले त्यांच्या भाग्याचा इतरांना हेवा वाटला नाही तर नवलच म्हणावे लागेल.
मित्रांनो 'चरित्रं अशी घडतात' या पुस्तकातील दुसरं महान व्यक्तिमत्व म्हणजे युगंधर साहित्यिक शिवाजी सावंत. विश्वसमृद्धीसाठी कर्तृत्वसंपन्न पुरुषांना जन्माला घालण्याचं भाग्य काही नगरांना लाभते इथल्या मातीत एक वेगळे सत्त्व असते या सत्वामुळे प्रतिभावंतांची प्रतिभा फुलून येते. विचारवंतांच्या विचारांना नवे कोंदण प्राप्त होते. समाजसुधारकांच्या कार्याला निस्पृहतेचा गंध प्राप्त होतो. या मातीतून उदयास आलेली माणसं काल पटलावर स्वतःचा वेगळा ठसा उमटवून जातात. कोल्हापूर जिल्ह्यातील 'आजरा' या गावाने असंच एक प्रतिभासंपन्न लेणं महाराष्ट्राला दिलं त्याचं नाव शिवाजी सावंत. 'मृत्युंजय'कार शिवाजीराव सावंत या नावाने सारं जग त्यांना ओळखतं.
लहानपणापासूनच हा मुलगा लेखक होण्याचं स्वप्न उराशी बाळगून होता. घरातील वातावरण फारसं पोषक नव्हतं पण परिश्रमाच्या बळावरती पुढे जाण्याची ताकद या मुलात होती. कष्ट केल्याशिवाय यश पदरात पडणार नाही हा धडा परिस्थिती समजावून देत होती म्हणून तशी मनस्थिती याने तयार केली.
नववीत शिकत असताना शिवाजीरावांच्या आयुष्यात एक घटना घडली होती. त्यांनी आणि त्यांच्या मित्रांनी शि.म.परांजपे लिखित 'अंगराज कर्ण' ही एकांकिका स्नेहसंमेलनासाठी बसवली होती. राजबिंडं रुप आणि स्पष्ट शब्दोच्चार यामुळे श्रीकृष्णाची भूमिका शिवाजीरावांना मिळाली. त्यांच्या या भूमिकेला विशेष दादही मिळाली, पण श्रीकृष्णापेक्षाही कर्णाने फेकलेले संवाद त्यांना अस्वस्थ, अंतर्मुख करणारे होते. कारण ते तर्कशुद्ध आणि सडेतोड होते. रथचक्र उद्धरणाच्या वेळी कर्णाने फेकलेले प्रत्येक वाक्य त्यांच्या मनात बाणाप्रमाणे रुतले. कर्ण हा त्यांच्या चिंतनाचा विषय झाला आणि 'मृत्युंजय' या अजरामर कादंबरीचे बीज त्यांच्या मनात रूजले. त्यांच्या वाचनात,मनात आणि चिंतनात फक्त आणि फक्त कर्णच होता. 1963 झाली त्यांनी प्रत्यक्ष लेखनाला प्रारंभ केला आणि पुढे गणेश चतुर्थीला ग.दि.मां.च्या हस्ते पूजन झाले आणि 1967 साली अतिशय सुबक व देखण्या स्वरुपात साध्या घरगुती पूजनानंतर 'मृत्युंजय' प्रसिद्ध झाली. बघता बघता लोकांनी'मृत्युंजय' उचलून धरली लोकमान्यता आणि लोकप्रियता या दोन्ही कसोट्यांवर ही कादंबरी उतरली होती. जनमान्यता आणि अफाट लोकप्रियतेचे सर्व विक्रम या कादंबरीने मोडले तेव्हा शिवाजीराव फक्त 26 वर्षांचे होते.
मित्रांनो,अशाप्रकारे प्रत्येक चरित्राचा सांगोपांग विचार या पुस्तकात लेखकाने केला आहे एका महान व्यक्तिमत्त्वाविषयी,एका वक्त्याविषयी लेखक लिहितात-
ऋषितुल्य दार्शनिक, वैखरीचा स्वामी म्हणजे प्राचार्य शिवाजीराव भोसले. आत्मचिंतन करणारा एक प्राध्यापक, योगमय जीवन जगणारा एक साधक आणि उभ्या महाराष्ट्राला प्रबोधनाचा प्रकाश दाखवणारा लोकशिक्षक अशी ज्यांच्या व्यक्तिमत्वाची रुपं आहेत असा एक तत्वनिष्ठ वक्ता या महाराष्ट्राने पाहिला त्यांचं नाव प्राचार्य शिवाजीराव भोसले.
'बंधू-भगिनींनो', हे शब्द ऐकताच सारे सभागृह स्तब्ध होत असे आणि सारे श्रोते जिवाचा कान करून पांढरी पॅंट, पांढरा शर्ट आणि काळा कोट परिधान करणाऱ्या व्यक्तिमत्त्वाकडे एकाग्रतेने पाहत आणि प्राचार्य शब्दसामर्थ्याच्या जोरावर त्यांना एका वेगळ्याच विश्वात घेऊन जात. एका संथ लयीत, आवाजात चढउतार न करता हे व्याख्यान होत असे पण, विचारांचा आणि शब्दांचा अक्षरशः पाऊस पडत असे. हा लोकशिक्षक एका शिक्षकाच्या घरी जन्माला यावा हादेखील योगायोगच म्हणावा लागेल.
मित्रांनो काही माणसांचे जीवन ही आनंदयात्रा असते पण काहीचं जीवन हे संघर्षाची मालिका असते. या संघर्ष मालिकेतही आपल्या कर्तृत्वाचे तेजस्वी दीप तेवत ठेवण्याचे भाग्य काहींना लाभते. स्वतः वैयक्तिक जीवनातला हिशेब न मांडता ज्यांनी आपलं उभं आयुष्य वेचलं त्या सिंधुताई जोशींना 'मतिमंद मुलांची माता' असे म्हणतात. या मातेने या मुलांसाठी एक आधारवड 'कामायनी' या संस्थेच्या रूपाने उभा केला. अनेक मान्यवरांनी सिंधुताईंच्या 'कामायनी' ला भेट देऊन त्यांच्या कार्याची प्रशंसा केली. मदर तेरेसांचे पाय या संस्थेला लागले. ती जगन्माता या मातेला म्हणाली,"God bless you all."
दोस्तांनो, ही चरित्रं घडत असतांना त्यांच्या जीवनातील यातना,वेदना,भावना आणि प्रेरणा ही चतु:सूत्री प्रस्तुत पुस्तकात लेखकानं नोंदलेली आहेत. या पुस्तकातील प्रत्येक बारीकसारीक गोष्टी लेखकाने इतक्या चांगल्या रीतीने लिहिल्या आहेत की प्रत्येक चरित्र वाचताना लेखक जणू काय त्या कुटुंबातील सदस्य आहे की काय असं आपल्याला वाटल्याशिवाय राहत नाही.
द्रष्टा शास्त्रज्ञ डॉ.रघुनाथ माशेलकर यांच्या बद्दल लेखक लिहितात-
डॉ.रघुनाथ माशेलकर, भारतातील शास्त्रज्ञांना विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून, उद्योजक, व्यावसायिकांना संशोधन, उत्पादनासाठी नवी दिशा देऊन, त्याचे फायदे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणारं, भारतीयांमधील बौद्धिक मरगळ झटकून, त्यांना विज्ञान-तंत्रज्ञानासह सर्व क्षेत्रात जागतिक नकाशावर दुर्दम्य आत्मविश्वास देणारं प्रतिभाशाली नेतृत्व आहे.
मित्रांनो,या पुस्तकातील प्रत्येक चरित्र हे त्या-त्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडत जाते. कुष्ठरोग्यांचं अंधारुन आलेलं जीवन प्रकाशमान व्हावं यासाठी ईश्वराने मानव सेवेचे व्रत घेतलेला एक तेजस्वी दीप भारतीयांच्या साम्राज्यात निर्माण केला तो मुरलीधर देविदास आमटे अर्थात बाबा आमटे यांच्या रुपाने.
या पुस्तकात प्रा.मिलिंद जोशी यांनी बाबा आमटे यांना 'आनंदवनातील अभय साधक'असे संबोधले आहे. बाबा म्हणत," आनंदवन हे कुष्ठरोग्यांच्या केंद्र नाही तर माणसाला माणूस म्हणून जगवण्याचे ते केंद्र आहे." आपल्या आयुष्याबद्दल ते लिहितात-
"मी किरणांचीच अपेक्षा धरली होती माझ्या अंगणात सूर्य उगवले...
आज पुन: एक नवे क्षितिज मी ओलांडले आहे
आणि नवे तारे मला खुणावू लागले आहेत."
मित्रांनो कर्तृत्वाचे मोजमाप करताना हिमालयाशी तुलना केली जाते पण हिमालयाचे देखील गर्वहरण व्हावे इतके अफाट काम बाबांनी करून दाखविले. महाराष्ट्र शासनाने त्यांना 'महाराष्ट्रभूषण' हा सन्मान दिला. पण बाबांसारखी माणसं 'विश्वभुषण' असतात असं लेखक लिहितात.
मित्रांनो आपल्याला माहीतच आहे 1988 साली भारताने स्वदेशी बनावटीचा पहिला महासंगणक तयार केला. त्याचे जनक होते
डॉ. विजय भटकर. हा तरुण शास्त्रज्ञ सभा- समारंभातून आवाहन करून सज्जनांना सांगे, "आपल्याकडे क्षमता आहे आपण ती सिद्ध केली पाहिजे. मात्र संपूर्ण देशात ही क्षमता विकसित करण्यासाठी मुलांना योग्य वयात उत्तम शिक्षण मिळाले पाहिजे. संगणकाच्या साहाय्याने साक्षरता मोहीम गतिमान करता येऊ शकते." मित्रांनो संगणकाच्या भाषेत सांगायचे झाले तर-
"मूर्ती किलोबाइटस् पण कीर्ती टेराबाईटस् " असंच या शास्त्रज्ञाबद्दल म्हणावे लागेल.
मित्रांनो ईश्वराने जन्माला येणाऱ्या प्रत्येक माणसाला प्रतिभेचं अलौकिक देणं दिलेलं आहे. कधी ती प्रतिभा कवितेतून प्रकट होते. कधी गायनातून तिचे दर्शन घडते. कधी गृहिणीच्या स्वयंपाकातून ती डोकावते. एखाद्या चित्रकाराच्या रंगरेषातून तिचा साक्षात्कार होतो, नर्तकीच्या पदलालित्यातून तिचे नवे रूप प्रत्ययाला येते, तर कधी खेळाडूच्या अलौकिक खेळातून ती बहरताना दिसते.
इंग्लंड ही क्रिकेटची पंढरी आहे असे म्हटले तर भारत ही क्रिकेटची आळंदी आहे असे म्हणावे लागेल. पंढरीतल्या परब्रम्हालादेखील भक्तांच्यासाठी या आळंदीत प्रकट व्हावे लागते. खेळ म्हणून एखाद्या खेळाकडे पाहणारे खूप प्रेक्षक असतात, पण खेळावर जिवापाड प्रेम आणि भक्ती करणारे प्रेक्षक मात्र क्रिकेटच्या या आळंदीतच सापडतील. लौकिक अर्थाने कोणतीही पदवी नसलेल्या सचिनचा चेंडू गगनाला भिडतो आणि अवघ्या भारत वर्षात आनंदाची, चैतन्याची लाट उसळते. हे घडते कसे? भारतीयांच्या हृदयाचे स्पंदन असलेली ही वामनमूर्ती कशी घडली असेल? त्याची वैशिष्ट्ये कोणती? यासारख्या प्रश्नांची उत्तरे आणि इतर चरित्रांवरील माहिती जाणून घ्यायला तुम्हाला नक्कीच आवडेल. होय ना?
या जगात जी माणसं स्वकर्तृत्वावर मोठी झाली त्यांचा जीवनप्रवास खडतर होता. संघर्षाच्या आणि संकटांच्या मालिका त्यांच्या स्वागतासाठी उभ्या होत्या.नियती त्यांची सत्वपरीक्षा घेत होती तरीही मोडून न पडता ही माणसं संकटांवर स्वार झाली. जीवनाबद्दलची निष्ठा, प्रचंड ध्येयवाद, दुर्दम्य इच्छाशक्ती,अथक परिश्रम आणि सकारात्मक दृष्टिकोनाच्या बळावर त्यांनी मोठी झेप घेतली म्हणून त्यांचा जीवन ग्रंथ समृद्ध आणि संपन्न झाला इतरांसाठी प्रेरणादायी ठरला.
मित्रांनो या पुस्तकाचे वाचन करताना तुमच्याही मनात आकांक्षा निर्माण होतील आणि स्वतःचे एक कर्तृत्वशिखर खुणावू लागेल. तर मग प्रा.मिलिंद जोशी यांचं 'चरित्रं अशी घडतात' हे पुस्तक नक्की वाचा. शुभेच्छा.भेटुया.
No comments:
Post a Comment