My YouTube Channel

Click here to visit My YouTube Channel

Tuesday, 21 July 2020

सुखाचा_शोध -लेखिका- डॉ. विजया वाड.


#सुखाचा_शोध-

लेखिका- डॉ. विजया वाड.

      उदयाचल हायस्कूल, गोदरेज, येथे विज्ञान शिक्षिका म्हणून मी कार्यरत होते. सारा दिवस सासूबाई मुली सांभाळत, त्यामुळे सकाळचा चहा, नाश्ता ही माझी जबाबदारी होती.
      उदयाचलची नोकरी आठ पन्नास ते ५ होती. म्हणजे रोज आठ तास दहा मिनिटे मला आठ सोळाची गाडी मुलुंडहून विक्रोळीस जाण्यासाठी पकडावी लागे. म्हणजे घर आठ पाचला सोडावे लागे.
      सक्काळी मी साडेसातला धांदलीत चहा केला नि गाळणीतला चहाचा चोथा ( जो फार गरम होता) डस्टबिनमध्ये रिकामा करायला धावले.
      माझ्या सासूबाई बेसिनवर दात घाशीत होत्या नि डस्टबिन बेसिनच्या खाली होती. त्या बाजूस होईनात म्हणून मी पायाच्या अंगठ्याने कुंडीचे झाकण दाबून उघडले नि तो चोथा कुंडीत टाकला.
      दुर्दैव  माझे ! तो उकळता चोथा कुंडीत न पडता त्यांच्या पायावर पडला. चुकून हो !
      तुम्हाला पण वाचून पटलं की नाही हो ? पण त्या संतापल्या. ब्रश फेकला. जोरात ओरडल्या, "मुद्दाम उकळत्या चहाचा चोथा माझ्या पायावर टाकला." मी ओशाळी उभी ! "कालचा सूड उगवला !" त्या पुढे ओरडल्या.
       मधल्या खोलीत माझे सासरे पेपर वाचत होते नि यजमान दाढी करीत होते. दोघे धावत आले. "कसला सूड? काय गं? शिकलेल्या मुली अशा वागतात?" सासारे रागावले.
     सासूबाईंचा गोरा गोरा पाय लाल झाला होता नि त्यावर फोड? बाप रे बाप ! "अहो तो चहाचा गरम चोथा खरोखर चुकून पडला होता हो ! कसला सूड?"
        त्याचं असं झालं होतं. मी नि माझे यजमान सासू-सासऱ्यांजवळ राहात होतो. राहाते घर त्यांचे होते. मुली चिमुकल्या होत्या. आई आपल्या मुलांना शिस्त लावायचा प्रयत्न करतेच ना? सांगा पाहू !
       प्राजक्ता-माझी मोठी मुलगी- हिला काही कारणाने मी कुल्यावर चापट मारली. तशा त्या संतप्त झाल्या. इतक्या तापल्या की धुण्याची मोठी काठी त्यांनी मजसमोर धरली, " ही घे, नि मार माझ्या टाळक्यात ! मुलींवर हात उचलते !" त्या कडाडल्या.
       मी सौम्यपणे म्हटलं, "माझ्या मुलींना मी शिस्त लावायचा प्रयत्न करतेय, त्यात कृपा करून तुम्ही मधे पडू नका." चुकलं का हो माझं काही प्रिय वाचकांनो?
     पण त्या ठाशीवपणे म्हणाल्या, "ते 'आपल्या'घरात ! माझ्या घरात हे चालणार नाही !" मी गप्प ! अपमान गिळला. ते तेवढ्यावरच थांबलेले वर्तुळ... ! त्याचा सूड ?
       मी आश्चर्य करीत उभी ! माझे यजमान दाढी करीत होते. अर्ध्या गालावर साबण ! तसेच उठले, मला म्हणाले, "का गं आईच्या पायावर तू  उकळत्या चहाचा चोथा टाकला? किती भाजला तिचा पाय ! फोड आले !"
        सासरे बोलले... मी गप्प बसले. पण नवरा ? त्यालाही असं वाटतं की मी हे मुद्दाम केलं? आपण कुणाच्या जिवावर सासरी येतो हो ? नवरा अगदी 'आपला' असायला हवा ना ! सांगा! त्याला तरी वाटायला हवं नां.... की बायकोनं हे मुद्दाम नाही केलं !
       बरं ! जी 'सूडकथा' सासूबाईंनी रंगविली ती ना ह्यांना ठाऊक होती ना माझ्या सासऱ्यांना !राईचा पर्वत कसा होतो कळलं ना?
       आठ सोळा केव्हाच चुकली होती. नवऱ्यास मी सासूच्या धाकाने अहो जाहो करीत असे. पण त्या क्षणी फ्यूज उडाला होता. रागाचा पारा उसळी मारुन डोक्यापार गेला होता. मी एकेरीवर आले. पर्वा न करता कुणाची !
      "तुलाही असं वाटतं की मी हे मुद्दाम केलं? तुझाही माझ्यावर विश्वास नाही? मग कशाला राहू मी या घरात? चालले मी !" रागाच्या अत्युच्च क्षणी ही अठ्ठावीस वर्षांची विजू घर सोडायला निघाली.
       मी एक बॅग काढली. माझे दिसतील ते कपडे त्या भरले. मग मुलींचे फ्रॉक भरू लागले. नवरा म्हणाला, "त्यांचे फ्रॉक का भरतेयस?"
       आता तर माझ्या रागाने परिसीमा गाठली. मी रागाने त्याला दम भरला "मुलं 'माझ्या ' आहेत. तू पोटातून काढल्यायस का? मग गप्प बस !" यावर तो निरुत्तर ! पुरुष होता ना ! मुली पोटातून कशा काढणार ? माझे सासू-सासरे अवाक्... निशब्द ! काय चाललेय काय हे ?
      माझा दादा आर्थररोड जेलचा सुपरिटेंडेंट होता. माझ्या घरात नवरा डॉक्टर असल्याने फोन होता. १९७३ मध्ये तेव्हा घरात एमटीएनएलचा फोन असणे हेही अप्रूप होते.
        मी दादाला फोन लावला. बापविना लेकरु होते मी ! दादाच वयाच्या अकराव्या वर्षापासून माझा बाप होता. "दादा, असं झालं...." मी रडत रेकॉर्ड लावली. " ज्या घरात विश्वासच नाही उरला, तिथे का राहू मी?"
       दादाने शांतपणे सारे ऐकून घेतले उत्तम श्रोता बनून. "मी येतो तो पर्यंत शांत बस. मी नक्की घेऊन जाईन हं विजू."
       बस. मला आणखी काय हवे होते. मी लगेच डिक्लेअर केले. "दादा माझा येतोय मला न्यायला. मी नि मुली तासाभरात निघू."
       घर चित्रस्तब्ध झाले. मुली तोंड शिवून कोपऱ्यात उभ्या. रोज मी शाळेत असे तेव्हा त्या आजीजवळ असत. पण या क्षणी कोण 'आपलं' ते त्या चिमण्या जीवांना कळत नव्हतं. आईवर लेकरांचा जीव असतोच नं !
      आम्ही तेव्हा मुलुंड पश्चिम येथे रणजित सोसायटीत राहायचो. दादा तासाभरात आला. पूर्ण वेश ! जेलरचा ! एकदम कॅडॅक !... सोसायटीभर गॅलऱ्या भरल्या‌.
       वाडांकडे जेलर आला ! बूट काढून चक्क खाली बसला. सासूबाईंच्या पायाशी. त्यांच्या फोड आलेल्या पायावर मायेने हात फिरविला अलवार. "विजू, बर्नाल लावले का?"
       या भांडणात कुणाच्याही ते लक्षात आले नव्हते. मी धावत बर्नाल आणले मधल्या खोलीतून.     त्याने ते पायाला लावले. मग म्हणाला, "ती मिळवती आहे आणि नसती तरी मला जड नाही. बाप आहे मी तिचा. पण अभिमानाची टोक इतकी ताणावी? मुलींना बाप कुठला मग?"
      माझ्या सासूबाईंनी एकदम हात पसरले. नातींना जोरात म्हणाल्या, "कुठेही जायचं नाही मला सोडून. निघाल्या आईच्या मागे मागे... या गं या... माझ्या कुशीत या दोघी."
      मुली धावल्या. आजीला घट्ट बिलगल्या मग आजी रडायला लागली. तशा त्याही रडू लागल्या. त्यांना किती सवय होती हो एकमेकींची.
       आता धीर एकवटून माझा नवरा पुढे झाला. माझं मनगट धरलं "कुठे चाललीस गं मला एकट्याला सोडून? काही वाटतं का? कुठेही नाही जायचं ! काय समजलीस?"
      मी म्हटलं "बरं !" मला तरी कुठे जायचं होतं हो ? पण हे शब्द त्याच्या तोंडून यायला हवे होते की नाही?
      दादा चहा पिऊन आनंदाने ड्यूटीवर परतला. मुली मला बिलगल्या. माझे मुके घेतले. गळ्यात हात टाकले. मुलांनाही किती समजतं ना !
       त्या रात्री आम्ही चौघं मुली झोपल्यावर एकत्र बसलो. कौटुंबिक सभा. माझे सासरे-बापू म्हणाले, मला. "हे पहा, विजय हा आमचा एकुलता एक मुलगा आहे त्यामुळे आम्ही नि तो, इनसेपरेबल आहोत. वेगळं राहायचा विचार मनातही आणू नकोस तू. तो मातृ-पितृ भक्त आहे.
      आता एकत्र राहायचं तर वाद कधी तरी होणारच. ती 'सूड सूड' काय म्हणत होती ते मला ठाऊक नाही. जाणून घ्यायचीही इच्छा नाही. एकच सांगतो आपण सर्वांनी वाद झाले तर भांडू पण दुसऱ्या दिवशी ते भांडण उकरुन काढायचे नाही. नवा दिवस नवा उजाडला पाहिजे. आलं लक्षात? रात गयी... बात गयी !"
      ते तत्त्व आम्ही चौघांनी आयुष्यभर सांभाळलं. माझं 'पुस्तक' लाज न बाळगता तुमच्यासमोर एवढ्यासाठी उघडलं प्रिय वाचकांनो, की तुमचे संसार टिकावेत. छोटी छोटी बातोंमे इतना दम नही होता की घर टूट जाए ! खरं ना ?

©डॉ. विजया वाड

~संकलन 

No comments:

Post a Comment