परंपरा
दि. ७ ऑक्टोबर २०२४कालचा दिवस अत्यंत आनंदाचा आणि समाधानाचा होता.
लहानपणापासून त्यांना पहात आलो, ज्यांच्याकडून थोडेसेच शिकलो, अशा मा. श्री. मयूर सरांना विद्यापीठात निमंत्रित करणे, हे स्वप्न काल पूर्ण झाले. आपले बालपण आणि वर्तमान यामधले धागे जितके मजबूत तितकाच आनंद जास्त असतो. कलाविश्वातील अनेकांना जवळून पाहील्यावर तर मयूर सरांचा मोठेपणा अधिकच कळायला लागला. "माझे सादरीकरण म्हणजे माझे विद्यार्थी" ही भावना फारच दुर्मिळ. सरांच्या त्यांच्या विद्यार्थ्यांसह निमंत्रित करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आरोग्यशास्त्र व ललित कला केन्द्राच्या सहकारी प्राध्यापक व संशोधक सहकारी यांनीच ही कल्पना प्रत्यक्षात आणली.
मयूर सरांसह सुमारे 30 विद्यार्थी चोपड्याहून येथे येणे, त्यांचा दिवसभर कार्यक्रम निश्चित करणे, उत्कृष्ट अशा सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करणे याकरिता नियोजनाचा कस लागलाच, पण खूप मजाही आली. सर्वात कठीण काम होते ते कलाकारांच्या तयारीचे. दोन आठवड्यात मयूर सरांच्या कठीण परीक्षेस उतरण्यासाठी विद्यार्थी कलाकारांनी खूपच परीश्रम घेतले. इतक्या लांब आपल्या मुलांना दोन तासांच्या कार्यक्रमाकरिता पाठवणे ही पालकांची सुध्दा कठीण परीक्षाच होती. त्यांचेही परीश्रम, निश्चय आणि विश्वास यासाठी खूप महत्त्वाचे होते. कलाकारांच्या मागचे हे खरे आधार!
सादरीकरणाच्या प्रत्यक्ष दिवशी रात्रभर प्रवास करून आलेल्या चमूला दिवसभर व्यस्त कार्यक्रमाची उत्सुकता होती. विद्यापीठाच्या निसर्गरम्य परिसराचा परिचय "वारसा सहलीच्या" माध्यमातून त्यांना करून देण्यात आला. मुख्य इमारतीचा १६० वर्षांच्या इतिहासाचे दृश्यच या सहलीने उभे केले. यातील विद्यार्थी मात्र आपापल्या वेळेत सरांच्या समोर रियाझ करून या कार्यक्रमात सहभागी होत होती. मयूर सरांना अनेकांनी निमंत्रण देऊनही ते केवळ कार्यक्रमाच्या ध्यासाने पूर्ण दिवस कार्यरत होते. रात्रभर झालेले जागरण व श्रम विसरून सर या वयात पूर्ण दिवस आपल्या विद्यार्थ्यांची तयारी करून घेत होते.
विद्यापीठाच्या आकाशवाणी केंद्राने विशेष मुलाखत घेतली.
प्रत्यक्ष कार्यक्रमात विद्यापीठाच्या मा. कुलगुरूंनी मयूर सरांच्या तपस्वी कारकिर्दीचा सन्मान केला.
नवरस या संकल्पनेवर आधारित विविधांगी सादरीकरणात गायन व वादनाची मेजवानीच मिळाली. माध्यमिक शाळा व अकरावी बारावीत असणारी मुलं ज्या तयारीने सादरीकरण करीत होती, त्यावरून काय आणि कसे शिकविले असेल याचा अंदाज येत होता. सरांच्या निवेदनात संस्कृत सुभाषिते ते उर्दू शायरी पर्यंत नवरसांची समृध्दी होती. विविध राग, स्वर, ताल व लयीचा हा जणू छोटासा अभ्यासक्रमच होता. भजन ते कव्वाली, गवळण ते प्रेमगीत अशा भावभावनांचे इंद्रधनूच नामदेव सभागृहात साकारले होते.
"तबला बिना नही, बोलना चाहीए" म्हणजे काय ते श्रोत्यांना अनुभवायला मिळाले. पेटीच्या सुरावटीत जणू गाता गळा अवतरला होता. आणि हे सर्व साकारले होते, ते इयत्ता पाचवी ते बाराव्या यत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थी कलाकारांनी! उच्च शिक्षणाची व्याख्याच या मुलांच्या कठोर रियाज आणि कल्पक कलागुणांनी बदलून टाकली होती. एकातून एक चढत्या क्रमाने रंगत जाणारी ही मैफिल संपूर्ण नये असे वाटत असतानाच "सजल नयन नितधार बरसती" या भैरवीने जेव्हा या कार्यक्रमाची सांगता झाली, तेव्हा
त्या जळी मिसळलेले भावगंध अंतर्मनात खोलवर झिरपले. समाधान, संतृप्ती पण त्यातही अनामिक हुरहुर आणि पुढील अशाच एका अनुभवाची आतुरता हीच अनुभूती सर्वजण घेत होते. या भाव शिखराचा पाया होता, सहा दशकांची अविरत तपश्चर्या व निरपेक्ष भावनेने केलेली स्वरसाधना!
शाबासकी स्वीकारत असलेल्या बालकांचे फुललेले चेहरे हाच जणू त्या संगीत शिक्षकाचा सर्वोच्च सन्मान होता. हा सन्मान स्वीकारतानाच त्या गुरूच्या मनात पुढील धड्यांचा आराखडा तयार होत होता. कदाचित त्या शिष्यांपैकी कुणीतरी घेणारा, आता 'देणारा' होणार होता!
~गिरीश टिल्लू
~संकलन
प्रसाद वैद्य
No comments:
Post a Comment