My YouTube Channel

Click here to visit My YouTube Channel

Monday, 12 February 2024

करिअर निवडतांना प्लॅन बी तयार असू द्यावा: डाॅ.अमित हरताळकर

करिअर निवडतांना प्लॅन बी तयार असू द्यावा: डाॅ.अमित हरताळकर

दि.११ फेब्रुवारी  
चोपडा (प्रतिनिधी)
आपण आपल्याच चूकांतून कधीतरी  शिकतो. 'पुढच्यास ठेच मागचा शहाणा' या उक्तीनुसार इतरांच्या चूकांतून शिकणं यालाच आजच्या काळात Smartness म्हणतात. दहावी-बारावीनंतर आपले करिअर निवडताना आपल्याला हवे ते क्षेत्र निश्चित निवडावे परंतु त्यापूर्वी त्याक्षेत्रात आपल्याला यश मिळाले नाही तर आपला प्लॅन बी तयार असू द्यावा असे मत हरताळकर हाॅस्पिटलचे संचालक  डाॅ.अमित हरताळकर यांनी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना व्यक्त केले. 
चोपडा येथील विवेकानंद विद्यालयात दहावीचा निरोप समारंभ भावनिक वातावरणात संपन्न झाला. 
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन प्रमुख पाहुणे व संस्थेचे विश्वस्त डाॅ.अमित हरताळकर व उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आले. 
विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. नरेंद्र भावे यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर  चैतन्य पाटील,जैनब तडवी, सत्यम सोनवणे, तनीष लाठी, लतिका निकम,अवनी वानखेडे, तेजस्विनी पाटील या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून त्यांच्या बालांगणापासून तर दहावीपर्यंतचे अनुभव व्यक्त करुन आपल्या भावनांना मोकळी वाट करुन दिली. उपस्थित सर्व याप्रसंगी हळवे झाले होते. 
शिक्षकांमधून संदीप कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. 
विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना डाॅ.अमित हरताळकर म्हणाले की मी तुम्हाला मार्गदर्शन वगैरे करायला आलेलो नसून  तुमच्याशी गप्पा मारायला आलोय. मी तुमच्या वयात असताना माझ्याकडून ज्या चूका झाल्या त्या तुमच्याकडून होऊ नये यासाठी तुम्हाला काय करता येईल हे तुम्हाला सीनियर म्हणून सांगायला आलोय. दिलखुलास संवाद साधताना त्यांनी त्यांच्या  आयुष्यातील स्वतःचे व काही मित्र-मैत्रिणींचे अनुभव सांगितले. तसेच योग्यवेळी भावनांचा आदर करावा परंतु भावनांच्या आहारी जाऊ नये. आपला आनंद कशात आहे त्यानुसार आपल्याला करिअर निवडता यायला हवे. समाज काय म्हणेल यापेक्षा आपल्याला स्वतःला काय वाटते व काय साध्य करता येईल याचा विचार करावा. हे नमूद करतांना त्यांनी त्यांच्या एका मित्राचे उदाहरण सांगितले. आपल्या संवादी शैलीने त्यांनी सर्व विद्यार्थ्यांची मने जिंकली. जेव्हा केव्हा अडचणी आल्या आणि गप्पा माराव्याश्या वाटल्या तर नक्कीच माझ्यासोबत गप्पा मारायला यावे असे सांगून सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी व भावी वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप कुलकर्णी यांनी, पाहुण्यांचा परिचय श्री. पवन लाठी यांनी तर आभार श्री. जावेद तडवी यांनी मानले.  
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष  डाॅ.विजय पोतदार, संस्थापक अध्यक्ष डाॅ.विकास हरताळकर, उपाध्यक्ष श्री.घनश्यामभाई अग्रवाल,सचिव ॲड. रवींद्र जैन, मुख्याध्यापक श्री.नरेंद्र भावे,श्रीमती आशा चित्ते,प्राचार्य श्री.पी.जी पाटील,सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व दहावी-बारावीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी व उपस्थितांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला.



बातमीची लिंक Lok प्रवाह

No comments:

Post a Comment