My YouTube Channel

Click here to visit My YouTube Channel

Saturday, 1 October 2022

दिव्यत्वाची जेथे, प्रचिती तेथे कर माझे जुळती...

 

दिव्यत्वाची जेथे, प्रचिती तेथे कर माझे जुळती...

कुणाचं शिक्षण, पैसा, त्याची तत्कालीन परिस्थिती त्या माणसाची लायकी अथवा कार्यक्षमता ठरवू शकत नाही. 

कारण तुमच्या प्रतिभेला प्रयत्न आणि कार्यनिष्ठेची साथ मिळाली की तुमची किर्ती जगभरात पसरते आणि लोकांच्या करतल ध्वनींचे सूर तुमच्या कानांवर यायला लागतात.

अशाच एका तरूण मुलाने पैस्यांची गरज म्हणून अगदी उदबत्त्या विकण्याचा सुद्धा व्यवसाय करून बघितला. असे अनेक छोटे-मोठे व्यवसाय केले.परंतु तुमच्यात कौशल्य असेल तर ते लपत नाही असं म्हणतात आणि लपवुही नाही, वर सांगितल्याप्रमाणे त्याला प्रयत्नांची जोड द्यावी. 

'तू सिनेमात जा' हे औंधच्या राजांचे शब्द ऐकून, तो तरूण मॅट्रिक पास होत नाही म्हणून सिनेमात गेला. अर्थात तो सिने सृष्टीत आपलं आयुष्य घडवायलाच गेला होता; पण तिकडे जाऊन त्याने स्वतःचं तर सोडाच, अनेकांची आयुष्य घडवली, बदलली सुद्धा. असीम प्रतिभेचा धनी असलेला तो तरुण संपूर्ण भारतात आपला ठसा उमटवून गेला आणि भारत सरकारने त्याच्या योगदानाबद्दल त्याला पद्मश्री पुरस्कार देऊन त्याचा गौरव सुद्धा केला.

अनेक पिढ्या येतील जातील परंतु ग.दि.माडगूळकरांच्या उंचीवर पोहोचेल असा कुणी होईल असं वाटत नाही. गदिमा एकमेवाद्वितीय होते. आज हे लिहिण्याचं कारण असं की, १ ऑक्टोबर म्हणजे गदिमांचा जन्मदिवस. 

गदिमांबद्दल अनेक गोष्टी आपल्याला माहीती असतीलच परंतु आज त्यांचा एक अदभुत प्रचिती देणारा प्रसंग आठवला आणि गदिमा का श्रेष्ठ होते ते परत एकदा डोळ्यासमोरून गेलं. आपण प्रसंग बघू म्हणजे , प्रचिती काय असते त्याचा अनुभव येईल...

'गदिमां'चे एक मित्र त्यांना म्हणाले, (अर्थात ते उपहासात्मक होतं) "का हो , माडगूळकर तुम्ही इतक्या चांगल्या कविता करता, छान छान गाणी लिहिता , पण तुमच्या एकाही गीतामध्ये  "ळ" हा शब्द दिसून येत नाही. मग ह्यालाच का म्हणायचं प्रतिभावान ???" ( "ळ" ह्या शब्दाचे यमक जुळवण किती अवघड असतं हे एखादा कवीच सांगू शकेल )तेव्हा 'गदिमां'नी त्यांच्याकडे एक कागद मागितला आणि केवळ १५ ते २० मिनिटांमधे एक अजरामर गीत लिहून त्यांना दिलं, ह्या गीतामधे एकूण १२ ते १३ वेळेस "ळ" हा शब्द आलेला होता आणि ते गीत होतं -

घननीळा, लडिवाळा, झुलवू नको हिंदोळा,

सुटली वेणी, केस मोकळे,

धूळ उडाली भरले डोळे,

काजळ गाली सहज ओघळे,

या सार्‍याचा उद्या गोकुळी, होईल अर्थ निराळा. 

एखादा मनुष्य किती प्रतिभावंत असावा ? तर तो गदिमांसारखा असावा असं म्हणायला कुणाची हरकत नसावी. कारण हालाकीची आर्थिक परिस्थिती असतांना, शिक्षण कमी असतांना एकूण परिस्थिती कितीही विपरीत असली तरी , आपल्यातल्या "स्व"ची ओळख ज्याला होते, तो आपापल्या क्षेत्रातला गदिमा होतो. ह्याच "स्व" ओखळलेल्या आधुनिक वाल्मिकीचा आज जन्मदिवस. त्यांच्या जन्मदिनी त्यांचे स्मरण करून आपल्याला देखील आपल्या  'स्व'ची ओळख व्हावी ह्यासाठी 'गदिमां'सारखं आपण प्रयत्नशील रहावं हीच प्रभू रामचंद्रांचरणी प्रार्थना आणि गदिमांना विनम्र अभिवादन ...

- अनुप देशपांडे, पुणे

(सभासद, विश्व मराठी परिषद, पुणे)


~संकलन

प्रसाद वैद्य 

No comments:

Post a Comment