My YouTube Channel
Friday, 21 October 2022
कु. लीना नितीन सोनवणे (इ.१० वी) हीच बोलकं शुभेच्छापत्र - खरंतर माझ्यासाठी 'रिटर्न गिफ्ट...'
Friday, 14 October 2022
Thanksgiving Day And Apology Day कृतज्ञता दिवस/क्षमायाचना दिवस
संदेश देऊन गेला. गोसावी सरांनी तृतीय क्रमांक मिळवल्याचा आनंद वाटलाच, पण विशेष म्हणजे तो मिळवल्यानंतर 'त्या' स्टेटसबद्दल आवर्जून धन्यवादचा संदेश पाठवणं याला जो मनाचा मोठेपणा असावा लागतो तो त्यांनी या छानश्या कृतीतून दाखवून दिला या गोष्टींचा विशेष आनंद आणि अभिमान वाटला. याच निमित्तं होता आलं याचं एक वेगळं समाधान लाभलं. It was a Return Gift of Thanksgiving Day. मनःपूर्वक अभिनंदन अन् धन्यवादसुद्धा, गोसावी सर.
Tuesday, 4 October 2022
दाद देणे...
मॆफल कधीच केवळ कलावंताची नसते! ती तितकीच असते रसिकाची! शुद्धमना रसिकाची! जो आपले हुद्दे,स्टेटस,मोठेपणा सगळं सगळं दारातच पादत्राणांसारखं उतरवून प्रेक्षागृहात प्रवेश करतो, एखाद्या चित्रकारानं आपला रंगमाखला कुंचला अलगद पाण्यात बुडवला की जशी रंगांची तरल वलयं पाण्यात मिसळू लागतात तसा तो मिसळू लागतो समोरच्या सुरांत,दृश्यांत,शब्दांत!! हे असं होण्यासाठी रक्तात लाल पांढ-या पेशींइतक्या हिरव्या पेशीही असाव्या लागतात तरच हे समर्पण असं अलगद इतक्या अनायास होतं.
माउलींनी म्हटल्याप्रमाणे ' घेणे दिजे एके, ऎसे आम्ही केले.' आनंद देणारा कोण आणि घेणारा कोण हे द्वॆतच संपले. ना देण्यात मोठेपणा ना घेण्यात कमीपणा...देणाराही मीच आणि घेणाराही मीच! इतकं सायुज्य होतं तेव्हा ती मॆफल केवळ मॆफल राहात नाही आनंदाचा एक डोह बनून जाते. अस्तित्वाच्या फक्त अलवार लहरी होऊन जातात आणि त्यावर कलावंत आणि कलासक्त दोघेही झुलत राहतात. कलावंत भरभरून बरसत राहतो आणि कलासक्त होत राहतो चिंब चिंब!! पुढून कला उधळत राहते आणि समोरून कृतज्ञता! 'दाद द्या अन् शुद्ध व्हा' असं त्याला सांगावंच लागत नाही आणि कलावंताला तशी अपेक्षाही करावी लागत नाही.
शांताबाई म्हणतात-' माझे काव्य रसाळ रंजक असे, ठावे जरी मन्मना
द्या हो दाद अशी रसिकहो, का मी करू याचना?'
जाईची वेल संध्याकाळी उमलते तेव्हा भ्रमरांना का आमंत्रण द्यावे लागते? मी म्हणते- 'दाद तो नज़राना हॆ ,कोई खॆ़रात नहीं ।'
मात्र कलावंताच्या हृदयात ही दाद मिसळली की त्याचा किनारा चिंब भिजतो. कष्टांची वाळू जणू विरघळून जाते,साधनेला सुगंध येऊ लागतो. त्याने त्या रंगमंचाच्या टीचभर जागेत किंवा वीतभर कागदावर आपला जीव ओतलेला असतो, झोकून दिलेलं असतं सर्वस्व! समोरच्या ओंजळी जर खुल्या नसतील,पसरलेल्या नसतील तर मग त्याचं हे बलिदान व्यर्थ जातं! तो मिटून जातो ,कुचंबून जातो.
असं होऊ नये ही जबाबदारी रसिकाची! गायकाची कणीदार तान संपतानाच आलेली ' क्या बात हॆ' ची दाद असो किंवा नाटक संपल्यावर प्रेक्षकांनी उभे राहून दिलेली मानवंदना असो किंवा आवडत्या कवीच्या ओळीनंतर ' सुंदर' अशी एखाद्या रसिकाने साधलेली सम, सर्कशीतल्या खेळाडूच्या चित्तथरारक कसरतीनंतर झालेला टाळ्यांचा कडकडाट किंवा मॆदानात आल्यावर होणारा ' सचिन.. सचिन' असा आपुलकीच्या नगा-यावर होणारा पुकारा असो.... या कणकण चांदण्यावरच कलावंत जगत असतो,फुलत असतो.
' सुंदरतेच्या सुमनांवरचे दव चुंबुनी घ्यावे 'अशी वृत्ती एकदा बनली की मग आयुष्यातल्या छोट्याछोट्या गोष्टीतल्या सुंदरतेचंही भान येतं आणि दाद देऊन कॊतुक करावंसं वाटू लागतं. हे करण्यात आपण समोरच्याला किती आनंद देतो आहोत याची सुतराम जाणीव नसते,तो अहंकारी अभिनिवेश नसतोच. सहजपणे एखाद्या उमलत्या फुलाला कुरवाळावे,एखाद्या गोंडस बालकाच्या गालावरून हात फिरवावा तितकी ही सहजकृती असते पण त्यामुळे समोरच्या व्यक्तीचे चार क्षण घमघमून जातात. कधीकधी अवतीभवतीच्या कुणाकुणाच्या मनावरही सुगंधाचे चार थेंब शिंपडले जातात आणि हा व्यवहार असा होतो, इतक्या सहज होतो,इतक्या अबोभाट होतो की जसे एखादे फूल विनासक्ती उमलावे.कधी ही दाद ' अशीच अमुची आई असती सुंदर रूपवती..' अशी खानदानी असते .कधी ' असा बालगंधर्व आता न होणे..' अशी काव्यात्म असते ,कधी ' आपके पाँव देखे, बहुत हसीन हॆं, इन्हें जमींपर मत उतारिए,मॆले हो जाएंगे.' अशी रूमानी असते तर कधी ' इक रात में दो-दो चाँद खिले' अशी अस्मानी असते.
परवा अमेरिकेत एका मॉलमध्ये लिफ्टची वाट पाहात थांबलो होतो. लेकीने व मी छान रंगसंगतीचा भारतीय पेहराव केला होता. लिफ्ट उघडली,आतून तीन चार अमेरिकन महिला बाहेर आल्या,एकजण व्हीलचेअर ढकलत होती. एक सुंदर, गोरीपान ,अशक्त मुलगी व्हीलचेअरमध्ये बसली होती.' बिच्चारी' अशी करुणा माझ्या मनात जागी व्हायच्या आतच ,लिफ्टबाहेर पडताना अचानक माझ्याकडे व सोनलकडे पाहात तिने म्हटले," your attire is so beautiful !! I like it! " मला अशी चकित,आनंदित, सुगंधित करून ती दूर निघूनही गेली. पण माझे काही तास खास करून गेली.
मला आठवतंय सिंगापूरच्या एका मत्स्यालयात गेलो होतो आम्ही.तिथल्या स्वच्छतागृहात जात असताना माझ्याबरोबर एक अत्यंत सुंदर वृद्धा आत जाताना मी पाहिली. 'कुदरत ने बनाया होगा,फुरसत से तुम्हें मेरी जान' असंच म्हणावंसं वाटावं अशी सुंदर गुलाबी कांती, आटोपशीर बांधा,पांढरा शुभ्र ,चमकदार दाट बॉबकट आणि चेह-यावरचा समाधानी,प्रेमळ,गोड स्मितभाव! बाहेर आल्यावर मी तिची वाट पाहात थांबले आणि ती आल्यावर तिला सामोरी होत म्हटलं," excuse me,but I must say you look so gorgeous, just like queen Elizabeth. " तिने माझ्याकडे निमिषभर अतीव आश्चर्याने पाहिले आणि मग ढगाबाहेर येऊन सूर्य उजळावा तसा तिचा चेहरा उजळला. सुंदरसे स्मित करत तिने माझे दोन्ही हात हातात धरले आणि मला म्हणाली," good gratius! You are so beautifuly sensitive! Thank you dear,Thank you so much! Be like this for ever!!" आणि दिवसभर मलाच सुंदर झाल्यासारखे वाटत राहिलं तिला सुंदर म्हटल्यामुळे!!
त्या दिवशी कोल्हापूरच्या ' ओपेल' होटेलमध्ये जेवायला गेलो तेव्हा दिवस मावळला होता. भुकेपेक्षा दमल्याची जाणीव सगळ्यांनाच अधिक प्रकर्षाने होत होती.टेबलावरच्या मेन्यूकार्डमध्ये 'दहीबुत्ती' हा पदार्थ वाचून मोगँबो एकदम खुशच हुआ. काही मिनिटातच समोर आलेली, मस्त हिरवीगार कोथिंबीर पेरलेली,कढीपत्ता,लाल मिरची,जि-याचा तड़का ( वापरावेत कधीकधी अमराठी शब्द,पर्यायच नसतो त्या शब्दाच्या flavor ला :) ) मारलेली, दह्याचा अदबशीर आंबटपणा असलेली पांढरीशुभ्र दहीबुत्ती समोर आली आणि क्षुधेचा सुप्त राक्षसच जागा झाल्यासारखा ताव मारला. अहाहा!! अशी दहीबुत्ती मी ताउम्र चाखली नव्हती.अन्नदात्यासाठी पोटातून आलेली दाद ओठापर्यंत आली होती. पण त्याच्यापर्यंत पोहचवणार कशी? वेटरला विचारून पाहिले पण तो म्हणाला की शेफ सर आता फार बिझी आहेत म्हणून! मग काय करावे? त्याने दिलेल्या बिलाच्या पाठीमागेच लिहिले- शेफसाहेब तुम्ही बनवलेली चविष्ट दहीबुत्ती कोणत्याही पक्वान्नांना लाजवेल अशी! 'तेरे हात मुझे दे दे ठाकुर!' असे म्हणावेसे वाटत आहे. धन्यवाद! ' टेबलावरचेच गुलाबाचे फूल आणि चिठ्ठी वेटरच्या हातात दिली नि म्हटले कृपया तुमच्या शेफसाहेबांना द्याल का? तो मान हलवून निघून गेल्यावर माझा लेक मला म्हणाला," तो खरंच त्यांना देईल तुझी चिठ्ठी असं वाटतंय तुला?" मी म्हटलं," त्याचा विचार मी करतच नाही, मी दाद दिली ,संपलं. पण ती दिली नसती तर मात्र त्या पाककलेवर अन्याय केल्यासारखं वाटत राहिलं असतं.त्या भावनेतून मुक्त झाले.मला छान वाटलं, बस्स्!"
माझ्या क्लासच्या तपासलेल्या उत्तरपत्रिका वाटून झाल्या तेव्हा समोर बसलेल्या वॆष्णवी पाटीलचा ( तब्बल २० वर्षानंतरही तिचे नाव लक्षात आहे माझ्या,तिच्या असेल का?) पेपर मुलांना दाखवत तिला म्हटलं," वॆष्णवी,असा पेपर तुझ्याएवढी असताना मला लिहिता आला असेल असं नाही वाटत मला. " वॆष्णवी डोळे मोठ्ठे करून बघत राहिली माझ्याकडे,
मला हसूच आलं. क्लास संपला,मी घरात आले आणि फोनची बेल वाजली. डॉ॰ विद्युत पटेल यांचा मुलगा माझा विद्यार्थी होता. त्याच्या आईचा फोन होता. काही तक्रार असेल का अशा विचारात फोन घेतला. त्या म्हणाल्या," मॅडम आज क्लासमधून माझा मुलगा घरी आला आणि त्याने मला घडलेली गोष्ट सांगितली,
वॆष्णवीला तुम्ही जे बोललात ते सांगितलं आणि म्हणाला," एक टीचर असं कसं काय बोलू शकते? स्वतःकडे कमीपणा घेऊन? मी असं कधीच ऎकलं नाही. " त्या पुढे म्हणाल्या," मॅडम ,तुम्ही चांगल्या बिया पेरताय. मुलांची झाडे मजबूत होतील." मी चकित! वॆष्णवीच्या आईचा फोन असता तर मी एकवेळ समजू शकले असते,पण....! मग बरं वाटलं की जाता जाता घातलेलं पाणीही मुळाशी पोचतंय!
बी.एड. चा पहिला दिवस! एकेक तास होत होता,नव्या नव्या प्राध्यापिकांची तोंड ओळख होत होती. मी वाट पाहात होते माझ्या आवडत्या मानसशास्त्राच्या तासाची.
कोण प्राध्यापिका असतील,कशा शिकवणा-या असतील अशा विचारातच असतानाच एक प्राध्यापिका व्यासपीठावर येऊन उभ्या राहिल्या आणि स्वत:ची ओळख करून देत म्हणाल्या, "मी---. मी तुम्हाला मानस शास्त्र हा विषय शिकवणार आहे."
माझा एकदम मूडच गेला. बुटक्याश्या,विरळ केसांचे पोनिटेल बांधलेल्या,खरबरीत चेह-याच्या या बाईंकडे माझा आवडता विषय असणार होता. नाराजीनेच मी थोडीशी मागे टेकून बसले. आणि हळूहळू पहाटेचा लालिमा पसरत पसरत सूर्याचं बिंब उजळत जावं तसा त्यांनी आपला विषय रंगवत नेला. तास संपला तेव्हा मनावर दाट पसरली होती ती त्यांच्या अनुपम अध्यापनकॊशल्याची मोहिनी! भारावल्यासारखी मी बाकाजवळून उठले आणि धावतच, बाहेर पडणा-या त्यांच्याजवळ गेले. माझा गळा भरून आला होता. पश्चात्तापाने की हृदयातल्या अननुभूत आनंदाने? मी लहानग्या मुलीसारखं हरखून म्हटलं," बाई,तुम्ही किती छान शिकवलंत..." आणि मला पुढे बोलवेच ना ! माझ्या भावना कळल्यासारख्या त्या छानशा हसल्या आणि माझ्या डोक्यावर हात ठेवून निघून गेल्या. मी परत वर्गात आले. आपल्याला इतका आनंद कशाचा झाला आहे याचा विचार करीत...!!
दुस-यावर रंग उधळल्यावर तो आपल्यावरही उडावा आणि आपण त्यात माखून जावं असा प्रत्यय देणारी ही दाद आयुष्यात अनेकदा मला रंगवत राहिली. बघा ना,आज त्या रंगमाखल्या उत्तरीयांच्या घड्या तुमच्यापुढे उलगडतानाही माझी बोटं रंगलीच !!-संजीवनी बोकील
~संकलन- प्रसाद वैद्य
Sunday, 2 October 2022
एक वेगळी आरती
एक वेगळी आरती
उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग ।। धृ ।।
पिवळी साडी पिवळी चोळी अंगी लेउनि ।
वैभवाचे सारे साज गळा घालूनी ।
कोल्हापूरची महालक्षुमी दारी आली ग ।
उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग ।। १ ।।
हिरवा रंग अति खुलवी खुलावी सुंदर ।हाती चुडा हिरवा भांगी लाल सिंदूर ।
जय भवानी तुळजापूरची दारी आली ग ।
उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग ।। २ ।।
पाही वळूनी दारातुनी माय माउली ।भक्तरक्षणा अष्टभुजा केली धरणी ।
सप्तशृंगीची देवी आली आता बाई ग ।
उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग ।। ३ ।।
रूप हिचे ग लावण्याचे रंगे तांबुल ।माहुरगडची रेणुका हि शालू हि लाल ।
लेकिलाही बघण्या आली दारी माझ्या ग।
उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग ।। ४ ।।
माय माउली कुलस्वामिनी दारी आली ग।
पाऊल दिसता लोटांगण दासी झाली ग ।
कालिका देवी अंबाबाई दारी आली ग ।
उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग ।। ५ ।।
पैंजणाचा नाद आला गोड कानी ग ।
उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग ।। धृ ।।
~संकलन प्रसाद वैद्य
Saturday, 1 October 2022
दिव्यत्वाची जेथे, प्रचिती तेथे कर माझे जुळती...
दिव्यत्वाची जेथे, प्रचिती तेथे कर माझे जुळती...
कुणाचं शिक्षण, पैसा, त्याची तत्कालीन परिस्थिती त्या माणसाची लायकी अथवा कार्यक्षमता ठरवू शकत नाही.
कारण तुमच्या प्रतिभेला प्रयत्न आणि कार्यनिष्ठेची साथ मिळाली की तुमची किर्ती जगभरात पसरते आणि लोकांच्या करतल ध्वनींचे सूर तुमच्या कानांवर यायला लागतात.
अशाच एका तरूण मुलाने पैस्यांची गरज म्हणून अगदी उदबत्त्या विकण्याचा सुद्धा व्यवसाय करून बघितला. असे अनेक छोटे-मोठे व्यवसाय केले.परंतु तुमच्यात कौशल्य असेल तर ते लपत नाही असं म्हणतात आणि लपवुही नाही, वर सांगितल्याप्रमाणे त्याला प्रयत्नांची जोड द्यावी.
'तू सिनेमात जा' हे औंधच्या राजांचे शब्द ऐकून, तो तरूण मॅट्रिक पास होत नाही म्हणून सिनेमात गेला. अर्थात तो सिने सृष्टीत आपलं आयुष्य घडवायलाच गेला होता; पण तिकडे जाऊन त्याने स्वतःचं तर सोडाच, अनेकांची आयुष्य घडवली, बदलली सुद्धा. असीम प्रतिभेचा धनी असलेला तो तरुण संपूर्ण भारतात आपला ठसा उमटवून गेला आणि भारत सरकारने त्याच्या योगदानाबद्दल त्याला पद्मश्री पुरस्कार देऊन त्याचा गौरव सुद्धा केला.
अनेक पिढ्या येतील जातील परंतु ग.दि.माडगूळकरांच्या उंचीवर पोहोचेल असा कुणी होईल असं वाटत नाही. गदिमा एकमेवाद्वितीय होते. आज हे लिहिण्याचं कारण असं की, १ ऑक्टोबर म्हणजे गदिमांचा जन्मदिवस.
गदिमांबद्दल अनेक गोष्टी आपल्याला माहीती असतीलच परंतु आज त्यांचा एक अदभुत प्रचिती देणारा प्रसंग आठवला आणि गदिमा का श्रेष्ठ होते ते परत एकदा डोळ्यासमोरून गेलं. आपण प्रसंग बघू म्हणजे , प्रचिती काय असते त्याचा अनुभव येईल...
'गदिमां'चे एक मित्र त्यांना म्हणाले, (अर्थात ते उपहासात्मक होतं) "का हो , माडगूळकर तुम्ही इतक्या चांगल्या कविता करता, छान छान गाणी लिहिता , पण तुमच्या एकाही गीतामध्ये "ळ" हा शब्द दिसून येत नाही. मग ह्यालाच का म्हणायचं प्रतिभावान ???" ( "ळ" ह्या शब्दाचे यमक जुळवण किती अवघड असतं हे एखादा कवीच सांगू शकेल )तेव्हा 'गदिमां'नी त्यांच्याकडे एक कागद मागितला आणि केवळ १५ ते २० मिनिटांमधे एक अजरामर गीत लिहून त्यांना दिलं, ह्या गीतामधे एकूण १२ ते १३ वेळेस "ळ" हा शब्द आलेला होता आणि ते गीत होतं -
घननीळा, लडिवाळा, झुलवू नको हिंदोळा,
सुटली वेणी, केस मोकळे,
धूळ उडाली भरले डोळे,
काजळ गाली सहज ओघळे,
या सार्याचा उद्या गोकुळी, होईल अर्थ निराळा.
एखादा मनुष्य किती प्रतिभावंत असावा ? तर तो गदिमांसारखा असावा असं म्हणायला कुणाची हरकत नसावी. कारण हालाकीची आर्थिक परिस्थिती असतांना, शिक्षण कमी असतांना एकूण परिस्थिती कितीही विपरीत असली तरी , आपल्यातल्या "स्व"ची ओळख ज्याला होते, तो आपापल्या क्षेत्रातला गदिमा होतो. ह्याच "स्व" ओखळलेल्या आधुनिक वाल्मिकीचा आज जन्मदिवस. त्यांच्या जन्मदिनी त्यांचे स्मरण करून आपल्याला देखील आपल्या 'स्व'ची ओळख व्हावी ह्यासाठी 'गदिमां'सारखं आपण प्रयत्नशील रहावं हीच प्रभू रामचंद्रांचरणी प्रार्थना आणि गदिमांना विनम्र अभिवादन ...
- अनुप देशपांडे, पुणे
(सभासद, विश्व मराठी परिषद, पुणे)
~संकलन
प्रसाद वैद्य
-
पुस्तक-बोलगाणी (कविता संग्रह) कवी- मंगेश पाडगावकर प्रकाशन- मौज प्रकाशन प्रकाशक-संजय भागवत पुस्तक परिचय द्वारा -प्रसाद वैद्य नमस्कार दोस्...
-
Click Here to fill this form on the link👇 Admission Form (Live English Activity Std. 10th) SCAN THIS QR CODE FOR THIS FORM Click Here For A...
-
चोपडा सातपुड्याच्या कुशीत पहुडलेले, ऐतिहासिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक, इ. अशी बहु मुखी ओळख असलेले अंकलेश्वर ते बुर्...