वाचलेच पाहिजे असे काही ...
मी दारात आलो, नेहमीसारखे जोडे काढून हातात घेतले आणि ओपीडीत आलो.
समोरच एक वृद्ध उभा होता.
"सर, तुम्ही.?"
मी त्या वृद्धाचा हात धरत म्हटलं.
"कोण.?"
"मी xxx. तुमचा विद्यार्थी."
मी माझं नाव सांगितलं.
"होय काय.?
चेहऱ्यात खूप फरक पडलाय रे.!
तब्बेतीनं पण मोठा झालायस.
शाळेत होतास तेव्हा केवढा मरतुकडा होतास."
सरांच्या बोलण्यावर रिसेप्शनिस्ट
तोंड धरुन हसली.
"चला की सर.! आत चला." मी हातातले चप्पल रिसेप्शनिस्टच्या काऊंटरखाली ठेवत सरांना म्हटलं.
"नको, तू जा. मी येतो माझा नंबर आल्यावर."
"सर, नंबराचं काय घेऊन बसलाय.? तुम्ही माझे गुरु आहात. माझ्याबरोबर चला आत."
"अरे, नंबराचं काय म्हणजे.?"
सर माझ्याकडं आश्चर्यानं बघत म्हणाले,
"जगात नंबरालाच सर्वात जास्त महत्त्व आहे. तुझा वर्गात नेहमी पहिला नंबर असायचा. पण प्रगतीपुस्तकावर मी उत्तीर्ण क्रमांक १ च्या ठिकाणी उत्तीर्ण क्रमांक २ असं लिहलं असतं तर तुला चाललं असतं का.? नाही ना.? माझा साठावा नंबर आहे. म्हणजे माझ्या आधीचे एकोणसाठ जण माझ्या आधी नंबर लावून बसलेत. त्यांचा हक्काचा नंबर डावलून मी आत येणं बरं दिसतं का.?"
"पण सर."
"तू जा. कामाला लाग. तू बोर्डवरल्या टायमिंगच्या आधी आलास त्याबद्दल तुझं कौतुक. शाळेत उशीरा आलास म्हणून मी छड्या मारायचो तेव्हा मारक्या म्हशीसारखा माझ्याकडं बघायचास पण आता त्या छड्यांचं महत्त्व लक्षात आलं असेलच.
तेव्हा छड्या दिल्या नसत्या तर आता
आला असतास तासभर उशिरानं."
"सिस्टर, यांचे केसपेपरचे पैसे घेऊ नका."
मी केबिनमध्ये जाता जाता रिसेप्शनिस्टच्या कानात कुजबुजलो. पण तेही सरांना ऐकू गेलंच.
"काय बोललास.? पैसे घेऊ नको?" सर माझ्यावर ओरडले, "पैसे तर तुला घ्यावेच लागणार. मी तुझा शिक्षक आहे म्हणून मी काही फुकट शिकवलं नाही तुला. वीस हजार रुपये पगार घेत होतो सरकारकडनं. हां, आता तुलाही सरकार पैसे देत असेल
तर नको घेऊ पैसे."
मी हसत हसत आत आलो आणि पेशंट बघायला सुरुवात केली. पेशंट बघता बघता सीसीटीव्हीमधून माझं सरांकडे लक्ष होतंच.
तीन तासांत सरांनी बसायच्या किमान तीस जागा बदलल्या असतील.
नंबर आल्यावर सर आत आले. आल्या आल्या त्यांनी माझा हात हातात घेतला. तो आपल्या छातीवर दाबला आणि सर बोलले, "बाळा, मला खूप खूप आनंद झालाय.
खूप कमावलंस तू."
"एवढंही काही नाही सर.!"
"नाही कसं.? अरे, मघापासून मी तुझ्या सगळ्या नव्या जुन्या पेशंटशी बोलतोय. पण एकही माणूस तुझ्याबद्दल वाईट बोलायला तयार नाही. सगळे गुणगानंच गातायत.
छाती अभिमानानं भरुन आली माझी."
बाहेर सर आपल्या बसण्याच्या जागा सारखं का बदलत होते ते आता लक्षात आलं.
"सर, तुम्ही शाळेत शिकवत होतात तेव्हा तरी कुठला विद्यार्थी तुम्हांला नावं ठेवायचा.? समोरच्या माणसाशी प्रेमानं वागायचं, आपलं काम सचोटीनं करायचं
हे तुम्हीच तर शिकवत होतात ना.!
आज या वयातही तुम्ही तुमची तत्वं सोडायला तयार नाही आहात. मीही त्याच तत्वानं जगतोय. त्यात मी विशेष काही करतोय असं काहीच नाही. प्रेमानं व्यवहार केला की जगणं सुंदर होतं, हे शिकवतं तेच तर शिक्षण.!"
"तू शाळेत होतास तसाच आहेस.
खेड्यातला साधा सरळ मुलगा."
"आता आयुष्यभर हा विद्यार्थी असाच राहू दे असा आशीर्वाद द्या.!"
मी म्हटलं आणि सरांच्या डोळ्यांत पाणी तरळलं.
"आईबाप आणि शिक्षक यांचं असंच असतं बघ. मुलं वाईट निपजली तर त्यांना वाईट वाटतं, आणि मुलं नीतीवंत जन्मली तरी त्यांच्या डोळ्यांत पाणी येतं. पण असे आनंदाश्रू आजकाल दुर्मिळ झालेत रे.!"
सर पुढं बरंच काही काही बोलत होते आणि त्यांचा विद्यार्थी भान हरपून ऐकत होता. वाटत होतं सरांचं हे बोलणं कधी संपूच नये.! असे शिक्षक मिळणं म्हणजे भाग्यच नाही का.? दुसऱ्याच्या मुलासाठी अश्रू गाळणारे शिक्षक आजही असतील का हो.?🌹
लेखक - अनामिक
सर्व हक्क लेखकाला
माझ्या सर्व शिक्षक व स्टाफला समर्पित.
~संकलन
No comments:
Post a Comment