My YouTube Channel

Click here to visit My YouTube Channel

Monday, 22 March 2021

पुस्तक परिचय-महाराष्ट्रातील उद्योजक


पुस्तक- महाराष्ट्रातील उद्योजक 
लेखक - जयप्रकाश झेंडे 
प्रकाशन- डायमंड प्रकाशन  
पुस्तक परिचय द्वारा -प्रसाद वैद्य 

दोस्तहो नमस्कार,

दोस्तांनो जीवनाच्या वाटचालीत यशस्वी होण्यासाठी कोणत्या खऱ्या भांडवलाची, शिदोरीची आपल्याला नितांत गरज असते हे चपखल शब्दात सांगायचं झालं तर, 'मने, मनगटे हेच खरे भांडवल' असं आपल्याला म्हणता येईल. बऱ्याच वेळा आपल्याला अनेक गोष्टी ऐकायला, अनुभवायला मिळतात. एखादा निराशेचा सूर कानी येतो: "अहो, धंद्यात जम बसवायला भांडवल हव ना! ते काय ओम भवती भिक्षान देही करायचं! एखादा उपरोधान म्हणतो- " आम्ही फक्त टाटा बिर्ला व्हायची स्वप्न रंगवायची. भांडवलाविना जिथे तिथे गाडी अडतीये आमची."

जीवनात कोणत्याही क्षेत्रात नोकरी, धंदा, उद्योग अन्य सर्व क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी मनाची तयारी आणि मनगटाच्या सामर्थ्याचा साक्षात्कार अनुभवायला हवा. अनंत ध्येयासक्तीने भारावून जाऊन माणसं जीवनाला कलाटणी देतात व यशाचे मानकरी जातात.

जयप्रकाश झेंडे यांचं ' महाराष्ट्रातील उद्योजक' हे पुस्तक अशाच उद्योजक वृत्तीला प्रोत्साहन देणारं आहे. हे पुस्तक म्हणजे महाराष्ट्रातील उद्योजकांना मानाचा मुजरा ठरावं असं आहे. या पुस्तकात भारतीय उद्योगाचे जनक जमशेटजी टाटा, लहान ठेवीदारांचा देवदूत- धीरूभाई अंबानी, जगातील दर्जाचा स्थापत्यशास्त्रज्ञ- बाबुराव(बी.जी.) शिर्के, ग्राहकांच्या समाधानाची शंभर टक्के खात्री देणारे- राजाभाऊ चितळे, नावीन्याचा स्पर्श असणारे- आबासाहेब गरवारे, ध्येयनिष्ठ उद्योगपती- शेठ जमनालाल बजाज, जागतिक किर्तीचा संगणक उद्योजक- अझीम प्रेमजी, व्यवसायाला नवीन उभारी देणारा उद्योजक-आनंद महिंद्रा, मध्यम कुटुंबातील कोट्यधीश- आदी गोदरेज, महाराष्ट्राला उद्योगी करणारे उद्योगी कुटुंब- शंतनुराव किर्लोस्कर, केरळातून येऊन महाराष्ट्रात रमलेला उद्योगपती- चंद्रन मेनन, भांडवलशाही मनाचा पण समाजवादी हृदयाचा उद्योजक- नारायण मूर्ती, उद्योगाला धार्मिकतेची जोड देणारे उद्योजक कुटुंब- बिर्ला कुटुंब आणि इट्स ऑलवेज पॉसिबल म्हणणारे- अनिल मेहता या उद्योजकांच्या चरित्रांचा त्यांनी वेध घेतला आहे आपल्यातील उद्योजक वृत्तीला प्रोत्साहन देतो.

त्याचबरोबर या पुस्तकात जयप्रकाश झेंडे यांनी मुख्य व्यवस्थापक आणि उद्योजकतेविषयी काही महत्त्वाचे मुद्दे सांगितलेले आहेत.

आपल्या या पुस्तकात भारतीय उद्योगाचे जनक- जमशेटजी टाटा यांच्याबद्दल लिहितात-

समाजातील एक गट त्यात कायमस्वरूपी वास्तव्य करण्यासाठी गुजरातमध्ये आला तेव्हाची एक कथा. या गटाच्या प्रमुखाने गुजरातच्या राजाकडे आश्रय देण्याची विनंती केली. त्यावेळी राजाने आमच्याकडे जागा नाही हे सांगण्यासाठी रूपकात्मक असा दुधाने काठोकाठ भरलेला वाडगा पारशांच्या गटप्रमुखाकडे पाठविला. हा प्रमुखही मोठा हुशार होता. त्याने त्या कटोर्‍यात साखर घालून राजाकडे परत पाठवला आणि कळवले, " साखरे सारखीच आम्ही जागा व्यापणार नाही परंतु त्या दुधात मिसळून जाऊ आणि दुधाची गोडी मात्र नक्कीच वाढवू." गुजरातच्या राजाने या समाजाची चतुराई पारखून त्यांना आपल्या राज्यात सामावून घेतले. जवळपास गेल्या दोन शतकांतील टाटा कुटुंबाची दैदिप्यमान कामगिरी पाहता त्यांनी दिलेले हे वचन अक्षरशः खरे करुन दाखविले आहे.

अशाच एका पारशी कुटुंबात जमशेटजींचा जन्म 3 मार्च 1839 रोजी नवसारी या छोट्याशा शहरात झाला. त्यांचे वडील नसुरवानजी हे त्यांच्या पारशी धर्मगुरु कुटुंबातले पहिले व्यावसायिक. त्यांनी व्यवसायासाठी मुंबईला स्थलांतर केले. वयाच्या एकोणतिसाव्या वर्षीच एकवीस हजार रुपये भांडवल घालून त्यांनी आपली स्वतंत्र पेढी सुरु केली. 1 जानेवारी 1877 ला त्यांनी नागपूर येथे 'एम्प्रेस मिल' या नावाने एका कापडगिरणीला प्रारंभ केला. त्यावेळी या गिरणीचे शेअर्स खरेदी करण्याची विनंती जमशेटजींनी एका व्यापारी सावकार मित्राला केली तेव्हा त्यास नकार देताना तो म्हणाला होता, " जमिनीत सोने काढून टाकणारा कंपनीत पैसा कशाला गुंतवायचा?" पुढे योगायोग असा की, या कंपनीची भरभराट पाहण्यासाठी हा गृहस्थ जिवंत होता आणि त्याने प्रांजलपणे कबुलीही दिली, " टाटांनी जमिनीत सोने गाडून ठेवले नव्हते तर त्यांनी ते मातीत पेरले होते आणि आता त्याला भरघोस पीकही येत आहे."

दोस्तांनो, संपत्ती कमवण्याचे दोन उद्देश असू शकतात- स्वतःसाठी आणि इतरांसाठी. ही गोष्ट लक्षात घेऊन जमशेटजींनी राष्ट्रासाठी संपत्ती निर्माण करणाऱ्या एका कार्यक्षम परंपरेला जन्म दिला. त्याची प्रचिती आपण आज घेत आहोत.

आपल्या भारतभूमीला औद्योगिक क्रांतीच्या दिशेने नेण्यासाठी त्यांनी चार महत्त्वाची उद्दिष्टे समोर ठेवली होती.

1) पोलाद निर्मिती- हा उद्योग सर्व जड उद्योगांचा पाया आहे.

2) पाण्यापासून वीजनिर्मिती- सर्वात स्वस्त पर्यावरण संवर्धक

3) संशोधनाशी निगडित शिक्षण- प्रगतीसाठी आवश्यक

4) जागतिक दर्जाचे उत्कृष्ट हॉटेल

आपल्या या स्वप्नांपैकी एकाच स्वप्नाची सत्यता ते पाहू शकले ते म्हणजे 16 डिसेंबर 1903 रोजी झालेली ताज महल हॉटेलची सुरुवात. त्यांची बाकी स्वप्ने त्यांच्या वारसदारांनी मोठ्या निष्ठेने पूर्ण केली.

मित्रांनो, 'महाराष्ट्रातील उद्योजक' या पुस्तकातील भारतीय उद्योगातील हिमालय असं त्यांना म्हणावं उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजे जे.आर.डी. अर्थात जहांगीर रतनजी दादाभाई टाटा. नगाधिराज हिमालय, सरितासम्राज्ञी गंगा आणि सौंदर्यशालीन ताजमहाल ही भारताची भूषणं आम्ही मोठ्या मानाने मिरवावीत असंच निसर्गाचं हे दान मानवालाही लाभलं की, मग त्याला अलौकिकतेचा, अद्भुततेचा स्पर्श होऊन त्याचं व्यक्तिमत्व वेगानं फुलतं, बहरतं. जे. आर. डी. टाटा यांच्या बाबतीतही हेच घडलं. आपल्या अभिजात कार्यकुशलतेच्या व बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी उत्तुंग अशी झेप घेऊन प्रथम आकाश आणि नंतर पृथ्वी गाजवली. त्यांच्या शब्दात त्यांनी स्वतःबद्दल केलेले वर्णन असे- " मी स्वतःला एक जरुरीपुरता, छान, विश्वासपात्र, जो पीत नाही, जुगार खेळत नाही, ज्याला मुलांची आणि प्राण्यांची आवड आहे असा माणूस मानतो. माझ्यात काही दोष आहेतच आणि त्यांची जबाबदारीही माझीच आहे असे मी मानतो." मित्रांनो, याच साधेपणामुळे आणि सच्चेपणामुळे ही माणसं मोठी झाली. अतिप्रचंड कामाचा ताण असतानासुद्धा जे.आर.डी. टाटा यांचं वाचनही भरपूर होतं. त्यांच्या कात्रणे चिकटविण्याच्या वहीत मृत्यू आणि प्रेम यावरही सुंदर परिच्छेद असणारी कात्रणे लावलेली होती तसंच संगीताचीही त्यांना रुची होती.

जे.आर.डी .टाटा म्हणतात, " स्वतः विचार केल्याशिवाय वरवरची अशी कोणतीही गोष्ट स्वीकारू नये. दुर्दैवाने 'बोधवाक्ये' आणि 'घोषवाक्ये' यामुळे आपली माणसं पटकन भावनिक बनतात. उपक्रमशीलता आणि साहस यांचं मूर्तीमंत प्रतीक म्हणजे जे. उपक्रमशीलता आणि साहस यांचं मूर्तीमंत प्रतीक म्हणजे जे.आर. उपक्रमशीलता आणि साहस यांचं मूर्तीमंत प्रतीक म्हणजे जे. उपक्रमशीलता आणि साहस यांचं मूर्तीमंत प्रतीक म्हणजे जे.आर.डी. टाटा.

मित्रांनो, जयप्रकाश झेंडे यांनी या पुस्तकात ज्या उद्योगी विभूतींचा समावेश केला आहे त्यांच्या या बद्दल वाचत असताना पुढचं वाक्य काय आहे याची उत्कंठा कायम राहते. रतन टाटा म्हणतात, " मला पैसा मिळवण्याची तीव्र इच्छा नाही तर जिथे आनंद नाही, तिथे तो निर्माण करण्याची, तो बघण्याची प्रचंड आस आहे." त्यांच्या म्हणण्यानुसार तो आनंद त्यांनी निर्माण केला नॅनो टाटा कारच्या माध्यमातून. मिठापासून मोटारीपर्यंत आणि पोलादापासून मोबाईलपर्यंत टाटा समूहाचा विस्तार विस्मयकारक तर आहेच पण उद्योजकांना पथनिदर्शकदेखील आहे.

दोस्तहो, लहान ठेवीदारांचा देवदूत ज्यांना म्हटलं जातं ते धीरुभाई अंबानी- "आपल्या यशाचे रहस्य काय?" या प्रश्नाला उत्तर देताना म्हणतात, " माणसाला महत्वाकांक्षा हवी आणि त्याला इतर माणसांची मने ओळखता आली पाहिजे." सर्व लोकांना आपल्या बरोबर घेऊन जाण्याची धीरुभाईंची शक्ती अफलातून होती.

रिलायन्समधील एक उच्चपदस्थ अधिकारी म्हणतात, " मी 26 वर्षांचा असताना माझे वडील वारले त्यावेळी माझ्या नातेवाईकांच्या आधी आमच्या अध्यक्षांचा सांत्वन करणारा संदेश मला मिळाला. त्यात लिहिले होते- 'आयुष्यात अशा घटना घडतात. काळजी करू नका आम्ही तुमच्या सोबत आहोत.' अशा प्रसंगी केवढा मोठा आधार वाटतो या शब्दांचा." आपण निश्चयाने आणि अचूकतेने काम केले पाहिजे म्हणजे यश आपोआपच आपल्या मागे येते यावर धीरुभाईंची आढळ श्रद्धा होती.

दोस्तांनो, असं म्हणतात की, पोटात शिरण्याचा मार्ग जिभेवरुनच जातो आणि पोटात शिरलं की मनात घर करणं सहज शक्य होतं. ग्राहकांच्या समाधानाची शंभर टक्के खात्री देणारे चितळे बंधू मिठाईवाले आणि तमाम खवय्ये यांच्यातलं नातं अगदी तसंच आहे.

दर्जेदार महाराष्ट्रीयन मिठाई, दूध आणि खाद्य पदार्थांची निर्मिती करणारे 'चितळे बंधू मिठाईवाले' यांचे नाव महाराष्ट्रातच नाही तर जगाच्या पाठीवर पसरलेल्या सर्व मराठी बांधवांच्या जिभेवर मोठ्यात सविनय विराजमान झालेलं आहे. पुण्याला भेट देणारी तमाम मराठी माणसं परदेशी जातांना बाकरवडी आणि आंबा बर्फी घेऊन जाणारच. चितळे उद्योग समूहाची वार्षिक उलाढाल जवळपास दोनशे कोटीच्या आसपास पोहोचली आहे. या ना. या नामांकित उद्योगाचा नेतृत्व करतात राजाभाऊ चितळे. या नामांकित उद्योगाचा नेतृत्व करतात राजाभाऊ चितळे. त्यांची वाणीही त्यांच्या मिठाईसारखी 'मिठी' आहे. केवळ गुणवत्ता आणि परिश्रम यांच्या जोरावर राजाभाऊंनी आपल्या अद्वितीय दर्जाच्या उत्पादनांची 'ब्रॅंड इमेज' तयार केली आहे.

अशा अनेक उद्योजकांचा जीवन प्रवास या पुस्तकात जयप्रकाश झेंडे यांनी बारकाईने रेखाटलेला आहे. लेखक लिहितात- माझ्या मते 'योजकता' आणि 'उपक्रमशीलता' यांचा संगम म्हणजे उद्योजकता आणि हा संगम ज्या व्यक्तीत दिसतो तो उद्योजक असे म्हणायला हवे.

उद्योजक व्हायची स्वप्ने अनेक तरुण असतात अनेक उदाहरणांवरून हे सिद्ध झालेलं आहे की यश म्हणजे काही अपघात नव्हे. तरुणांना सांगावेसे वाटते की यासाठी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे यशस्वी माणसांच्या चरित्रांचा बारकाईने अभ्यास करावा त्यांच्यातील गुण आत्मसात करावे आणि दुर्गुण टाळावे.

    अनेक यशस्वी उद्योजकांच्या चरित्रांचा अभ्यास केल्यावर त्यांच्यातील काही गुण प्रकर्षाने जाणवले ते म्हणजे मजबूत योजना संधीचा शोध,संधीचा शोध,बांधिलकी,अविचल श्रद्धा,योग्य दिशा,योग्य माणसांची निवड, धोका पत्करण्याची तयारी, प्रयत्नातील सातत्य, कल्पकता आणि चिकाटी हे गुण आपल्या अंगी असतील तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. होय ना!

मित्रांनो, या देशाच्या औद्योगिक प्रगतीत महाराष्ट्रातील उद्योजकांची कामगिरी नेत्रदीपक ठरली आहे आणि जगाच्या औद्योगिक क्षेत्रातही त्यांनी प्रचंड दबदबा निर्माण केला आहे.

मग काय दोस्तांनो, उद्योजक व्हायचंय ना? तर मग जयप्रकाश झेंडे यांचं 'महाराष्ट्रातील उद्योजक' हे पुस्तक नक्की वाचा. कारण साहसे वसते लक्ष्मी:| हेच खरं आहे आणि हो आपले अभिप्राय नक्की नोंदवा. आपले अभिप्राय हीच माझी ऊर्जा आहे. शुभेछा. भेटुया.

~प्रसाद वैद्य

No comments:

Post a Comment