My YouTube Channel

Click here to visit My YouTube Channel

Thursday, 17 November 2022

काय असते गिरनार वारी....?

 🌹 " काय असते गिरनार वारी....?"🌹

नेहमी गिरनार जायचे म्हटले की काही जण म्हणतात काय वेड लागले की काय दर 2 महिने झाले की गिरनार ला पळतोस!!!!!...     

हो आमच्या भाषेत वेडच ते आणि आम्ही तेच वेडे आहोत... नाहीतर तुम्ही शहाणे तिथे जालच कश्याला? बरोबर ना?   कारण...(वेळेला वेडेच उपयोगी येतात आणि शहाणे पळून जातात) 

काय मिळतं तिथे सारखं जाऊन?  काम धंदे सोडून पळतात तिकडे ते... 

अस काय आहे गिरनार?

अहो काम धंदे सोडून कोणी जात नाही तर आमच्या गिरनारी साठी वेळ काढून जातो दर्शनासाठी... जिथे प्रत्येक पायरी चढतांना चांगली, वाईट केलेली कर्म आठवतात ना ते आहे गिरनार...


 तिथे गेल्यावर आठवतं व चांगली बुद्धी जागृत होते ते आहे गिरनार... 

       जीवनातली सगळी दुःख विसरून, रोजची घरातली,बाहेरची कटकट विसरून 5 दिवस जो सुखाने जगतो ना, जिथे सुख,समाधान मिळतं ना ते आहे गिरनार... 

भक्तीमय वातावरणात राहून जो आनंद मिळतो ना ते आहे गिरनार...

श्रीमंत,गरीब जिथे एकत्र येतात ना ते आहे गिरनार...

      सगळ्या सुख दुःखांची जिथे बेरीज वजाबाकी करून सुद्धा शिल्लक काही राहत नसेल, तरी सुध्दा काहीतरी मिळतं ते आहे गिरनार....

        आरोग्याच्या तक्रारी, नोकरीत बढती, व्यवसायात वाढ, मुलांची शिक्षणं, लग्न, घरदार सगळं काही मनासारखे होते जिथे गेल्यावर ते म्हणजे गिरनार.... 

       ढोपरं दुखतात,दम लागतो, तरी सुद्धा एक एक पायरी चढून जाण्याची इच्छाशक्ती जिथे वाढते, ते म्हणजे गिरनार...

        जिथे भल्या भल्यांची परीक्षा घेतली जाते, अहंकार जिथे गळून पडतो, व मग अक्कल ठिकाणावर येते अपराधाची केल्याची जिथे जाणीव होते ते गिरनार...

         असे हे आमच्या गिरनारी महाराजांचे गिरनार... आणि तुम्ही म्हणता काय मिळतं तिथे सारखं सारखं जाऊन गिरनार... 

         माहेर वाशीण जशी माहेराला येते व तिला जो आनंद होतो ना आल्यावर व निघतांना पाय निघत नाही, तसच आमचं हे गिरनार...

        हे सर्व वाचून ज्याचे मन म्हणते बरोबर आहे, व ज्याच्या डोळ्यात आपसूक पाणी येते ना ते हे गिरनार...

          हे सर्व तुम्हाला नाही समजणार कारण तुम्ही तर या संसाराच्या मोह-माया पासून सुटुच शकत नाही,आणि महाराजांच्या जवळ जाण्याची बुद्धीच होणार नाही, तो पर्यंत समजणार नाही काय आहे गिरनार... 

  तर अस आहे गिरनार...          

   जय गिरनारी

|| अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त ||


श्रीकांत कापसे पाटील...©✍️









-संकलन

Wednesday, 2 November 2022

सहज वाचलं म्हणून...
















सहज वाचलं म्हणून...
दिवाळी अंक,एखादं मासिक अथवा पुस्तक नजरेस पडेल असं घरात ठेवलेलं असेल तर सहज ते चाळलं जातं अन् ते त्यामुळे वाचलंही जातं. त्यातूनच वाचनाची गोडी वाढतं जाते. प्रत्येक पुस्तकात काही संदर्भ असतात त्या अनुशंगाने वाचू आनंदेची अनुभूती येते. छात्र प्रबोधन हे मासिक वाचतांनाही असंच झालं. वाचता वाचता Flashback मध्ये गेलो. परीक्षेच्या कालावधीत कु.जैनब तडवी (आमच्या विद्यालयातील श्री.जावेद तडवी सर यांची कन्या)अभिवाचन छान करते,अक्षर सुंदर, हुशार अशी अनेक विशेषणं तिला लावावी अशी गुणी विद्यार्थिनी. 
ही मला भेटली. म्हणाली,"सर, तुमच्याकडे जी.ए. कुलकर्णी यांचं 'कुसुमगुंजा' हे पुस्तक आहे का?" माझ्या संग्रही ते पुस्तक नव्हतं पण पुस्तकाबद्दलचं तिचं कुतुहल मला आनंद देऊन गेलं. खरंतर या गोष्टी खूप छोट्या असतात, नित्याच्या असतात मात्र खूप मोठं समाधान आणि आनंद देऊन जातात. जैनब,तुझं वाचन व कुतुहल खूप आनंददायी होतं. साधना मासिकही तू पूर्ण  वाचलंस याचंही मला विशेष कौतुक वाटतं.त्याबद्दल मी तुझं, तुझे बाबा (जे चांगले वाचक आणि वक्ता आहेत),तुझी आई व कुटुंबियांचं अभिनंदन करतो.  अशीच वाचती आणि लिहिती रहा. वाचावी पुस्तके...राखावी अंतरे...समृद्ध व्हावे अंतरंगे...भाग्य येते तदनंतरे...😊👍 शुभेच्छांसह....भेटू या.


📘📚📖📋✍🏻

~ प्रसाद वैद्य



Tuesday, 1 November 2022

मनाचा धनवान "धनाजी जगदाळे"...मला १००० बक्षीस नको फक्त घरी जायला ७ रुपये द्या.

मनाचा धनवान "धनाजी जगदाळे"...मला १००० बक्षीस नको फक्त घरी जायला ७ रुपये द्या.

पिंगळी बु.ता.माण येथील धनाजी यशवंत जगदाळे  

(वय ५४) याचे हातावरचे पोट. 

रोज काम केल तर कुटूंब चालवणारा सर्वसामान्य व्यक्ती.

दहिवडी आठवडा बाजार झालेवर हा उशिरा दहिवडी स्टँडवर आला. समोर घरी जाण्यासाठी बस लागली होती. परंतु तिकिटासाठी ७ रुपये त्याच्याकडे नव्हते. 

गावातील ओळखीचा ही त्या दरम्यान तिथे दिसत नव्हते. एक गाडी सोडली दुसरी सोडली पण ओळखीची व्यक्ती कोणीच दिसेना. जायच कस हा विचार करत दिवसभर कंटाळलेला बिच्चारा धनाजी बसल्या जागेवर झोपून गेला. धनाजीला जाग आली तेव्हा अंधार पडला होता.

दरम्यान जो घरी जाण्यासाठी ७ रूपयांसाठी कोणाची तरी वाट पहात होता त्याच्याजवळ ४० हजार रुपयेचा बंडल पडलेला दिसला. आपण ७ रूपये मिळतायत का बघत होतो पण आतातर ४० हजार रूपये सापडेलत.

 चला निघून जावू ,आता गाडी भाडयाने करून जावू ,दिवाळी चांगली साजरी होईल असा किंचितही विचार धनाजीच्या मनात आला नाही. धनाजीने आजूबाजूच्या सर्वाना तुमचे पैसे पडलेत का अशी विचारणा सुरू केली. कोणच काहीच बोलत नव्हते. शेवटी तो शोधाशोध करून स्टँड पोलीस चौकीजवळ पोलीसांची वाट पहात बसला.

खूप वेळाने एक गृहस्थ स्टँडवर आले व बसलेल्या ठिकाणी आपले पैसे शोधू लागले, तेव्हा काही प्रवाशांनी आताच एक उंचीला कमी असलेला माणूस कुणाचे पैसे पडलेत का विचारत असल्याची त्यांना कल्पना दिली. त्यांनी बसस्टँड पालथे घातले तेव्हा स्टँड पोलीस चौकीजवळ धनाजी पोलिसांची वाट पाहत बसलेला दिसून आले. त्यांनी धनाजीला पैसे हरवल्याचे सांगताच धनाजी बोलला किती रक्कम आहे ,नोटा कशा होत्या असे प्रश्न करीत ज्याचे आहेत त्यालाच पैसे मिळावेत यासाठी सर्व चौकशी करून घेतली. त्यावर ते ४० हजार रूपये आहेत .पत्नीचे ऑपेरशन आहे त्यासाठी पैसे घेऊन निघालो होतो. गाडी न मिळाल्याने बाकावर बसून होतो तेव्हा खिशातून पडले असे त्याने सांगितले.

 धनाजीने ते पैसे काढून देताच हाच आपला पैशांचा बंडल म्हणून त्या व्यक्तीचे डोळे पाणावले. बायकोचे ऑपरेशन कसे करायचे हा त्यांना पडलेला प्रश्न आता सुटणार होता. त्याने बक्षीस म्हणून त्या बंडलातील एक हजार रूपये काढून धनाजीला देवू केले. पण मनाने धनवान असलेला धनाजी ते बक्षीस घेईना. मला काहीही बक्षीस नको तुमचे पैसे तुम्हाला मिळाले. आता तुम्ही तुमच्या बायकोचे ऑपरेशन करू शकता यात मला सर्व काही मिळाले.

तरीही त्या व्यक्तीने खूप आग्रह केल्यावर धनाजीने एकच वाक्य सांगितले की ,ते १ हजार त्याच बंडलात ठेवा. घरी जाण्यासाठी माझ्याकडे ७ रूपये नाहीत म्हणून मी स्टँडवरच पडून राहिलो. मला फक्त घरी जाण्यासाठी  ७ रुपये द्या. धनाजीचा प्रामाणिक आणि भाबडेपणामुळे माणसाच्या डोळ्यातून पाणी आले.

ज्याला ४० हजार रूपये सापडूनही फक्त ७ रुपये प्रवासासाठी बक्षीस रूपाने घेणार हा देवदूतच म्हणावे लागेल ना.

परिस्थिती अनैकांना वाईट मार्गाने जायला लावते. पण चांगले काम करत परिस्थितीचा सामना करणारेही धनाजीसारखे धनवान व्यक्ती दिसून येतात. त्याच्या या कार्यामुळे धनाजी जगदाळेचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

अनेक लोक पैसा संपत्तीने श्रीमंत असतात पण मनाची श्रीमंती असणारा गरीब धनाजी माझ्याच शेजारी बसून ही वस्तुस्तिथी सांगताना माझ्याही डोळ्यात अश्रू आले. विश्वाची निर्मिती करताना परमेश्वर असे ही देवदूत पृथ्वीवर पाठवतो याची प्रचिती आली. 

- राजेंद्र जगदाळे  (सर) पिंगळी बु.ता.माण. 


~संकलन -प्रसाद वैद्य

Friday, 21 October 2022

कु. लीना नितीन सोनवणे (इ.१० वी) हीच बोलकं शुभेच्छापत्र - खरंतर माझ्यासाठी 'रिटर्न गिफ्ट...'


कु. लीना नितीन सोनवणे (इ.१० वी) हीच बोलकं शुभेच्छापत्र - खरंतर माझ्यासाठी 'रिटर्न गिफ्ट...'

आदरणीय सर,               
तुम्हालाही दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏😊 
सर दिवाळीत अनेक गोष्टींचं वाट पहाणं असतं आणि त्यातील एक म्हणजे तुमच्या शुभेच्छा पत्रांचं. सर तुमच्या अनेक उपक्रमांमधील हा एक आगळावेगळा उपक्रम आहे, ज्यात  तुम्ही आम्हांला शुभेच्छांबरोबर मोलाचा संदेशही देतात. गेली दोन वर्षे लॉक डाऊनमुळे तुमची शुभेच्छापत्र प्रत्यक्ष आमच्या पर्यंत पोहोचली नाहीत, त्यामुळे या वर्षी ही उत्सुकता शिगेला पोहोचली होती आणि फाईनली शेवटच्या दिवशी पत्रे मिळाली आणि आम्हांला खुप आनंद झाला कारण हे आमचं शाळेतील शेवटचं वर्ष आहे त्यामुळे हे आमचं शाळेतील शेवटचं दिवाळी शुभेच्छा पत्र म्हणायला हरकत नाही. सर मी ही पत्रे कायम माझ्या संग्रही ठेवेल. आपल्या शाळेतील अश्या उपक्रमांमधून नेहमीचं आम्हांला काहीतरी नवीन करण्याची प्रेरणा मिळत असते. पुन्हा तुम्हांला, पुनम टिचराना आणि माझ्या दोघही लहान बहीणींना ( मनू , निर्मिती) दिवाळीच्या शुभेच्छा 💐🪔🎊 

_________________________________________________________

कु. लीना,😊
"शाश्वत शुभेच्छाच माणसाला या जन्मात तसंच पुढील जन्मातदेखील  उपयोगी पडतात...बाकी सारं नश्वर आहे." या विचारावर माझा अभंग विश्वास आहे.  त्यामुळेच मनात आलेल्या चांगल्या विचाराला पटकन कृतीची जोड देऊन मोकळं होणं मला आवडतं. यामुळेच मला मोठ्या लेखकांची पत्रोत्तरं येण्याचं आणि काहींची भेट घेण्याचं भाग्य लाभलं हे नमूद करतांना विशेष आनंद वाटतो. (मध्यंतरीच्या काळात यात सातत्य नाही राखता आलं याच वाईट वाटतं.)आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचीही  तुझ्यासारखी बोलकी पत्रं आलीयेत जो माझा आनंद द्विगुणीत करतात.  तुझ्या संग्रही ही सारी शुभेच्छापत्रं आहेत या गोष्टीचाही विशेष आनंद वाटला. या संग्रहात तुझे आई-बाबां,मावशी आणि कुटुंबियांचाही तुम्हां दोघींच्या संगोपनातील संस्कार दडलेला आहे हीदेखील जमेची बाजू आहे. याबद्दल मानसी हिच्याही इ.४थीतील काही बोलक्या आठवणी मला ऊर्जा देतात. पुनश्च तुम्हां सर्वांना दीपावलीच्या सस्नेह शुभेच्छा. (तू एक चांगली वाचक,उत्तम वक्ता,दर्दी श्रोता,उत्साही तबलावादक, सुजाण रसिक आहेस म्हणून तुझ्यासाठी यावर्षी शुभेच्छापत्रावर असलेल्या प्रार्थनेच्या अर्थाची लिंक Share करतोय. हा अर्थ अवश्य वाचावा. हीच प्रार्थना आमच्या वर्गात परिपाठाच्यावेळी आम्ही म्हणतो.)


शुभेच्छा भेटू या.
🌺🌸🌺🌸🌺 🏮🪔🪔🪔🪔🪔🪔📘📚📖📋✍🏻
~प्रसाद वैद्य व परिवार

Friday, 14 October 2022

Thanksgiving Day And Apology Day कृतज्ञता दिवस/क्षमायाचना दिवस

Thanksgiving Day And Apology Day 
कृतज्ञता दिवस व क्षमायाचना दिवस

           आमच्या 8वी ब या वर्गात गुरुवार हा दिवस कृतज्ञता दिवस आणि क्षमायाचना दिवस (Thursday As Thanksgiving And Apology Day) म्हणून आम्ही साजरा  करतो. दोन आठवड्यापूर्वी याचा एक छान, बोलका आणि अनपेक्षित अनुभव आला.गेल्या महिन्यात मातृमंदिर विश्वस्त संस्था,निगडी पुणे तर्फे आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचं पत्रक माझ्या WhatsApp Status ला ठेवलं होतं. या स्पर्धेत सहभागी व्हायचं मनात होतं परंतु काही कारणाने ते राहून गेलं. गुरुवारच्या पूर्वसंध्येला, 28 सप्टेंबरला माझे सन्मित्र विजय गोसावी सर (एक उपक्रमशील,रसिक, कार्यमग्न व होतकरु शिक्षक प्र.वि.मं.चोपडा) यांचा मेसेज आला.

"धन्यवाद सर...आपण निबंध स्पर्धेचे स्टेटस ठेवले....मी, माझ्या  विद्यार्थ्यांनी यात  सहभाग घेतला आणि तब्बल तीन बक्षीसं जिंकले." 

    हा अनपेक्षित आलेला संदेश मनाला सुखावून गेला. खरंतर हा संदेश तसा फक्त चार ओळींचा होता परंतु  १००० ते १२०० शब्दांत मी न लिहिलेल्या निबंधाचं समाधान आणि या संदेशाच्या माध्यमातून आपलाच प्रथम क्रमांक आल्याची अनुभूती हा कृतज्ञता

संदेश देऊन गेला. गोसावी सरांनी तृतीय क्रमांक मिळवल्याचा आनंद वाटलाच, पण विशेष म्हणजे तो मिळवल्यानंतर  'त्या' स्टेटसबद्दल आवर्जून धन्यवादचा संदेश पाठवणं याला जो मनाचा मोठेपणा असावा लागतो तो त्यांनी या छानश्या कृतीतून दाखवून दिला या गोष्टींचा विशेष आनंद आणि अभिमान वाटला. याच निमित्तं होता आलं याचं एक वेगळं समाधान लाभलं. It was a Return Gift of Thanksgiving Day. मनःपूर्वक अभिनंदन अन् धन्यवादसुद्धा, गोसावी सर.
~प्रसाद वैद्य 

Tuesday, 4 October 2022

दाद देणे...


  दाद देणे...

      मॆफल कधीच केवळ कलावंताची नसते! ती तितकीच असते रसिकाची! शुद्धमना रसिकाची! जो आपले हुद्दे,स्टेटस,मोठेपणा सगळं सगळं दारातच पादत्राणांसारखं उतरवून प्रेक्षागृहात प्रवेश करतो, एखाद्या चित्रकारानं आपला रंगमाखला कुंचला अलगद पाण्यात बुडवला की जशी रंगांची तरल वलयं पाण्यात मिसळू लागतात तसा तो मिसळू लागतो समोरच्या सुरांत,दृश्यांत,शब्दांत!! हे असं होण्यासाठी रक्तात लाल पांढ-या पेशींइतक्या हिरव्या पेशीही असाव्या लागतात तरच हे समर्पण असं अलगद इतक्या अनायास होतं. 

         माउलींनी म्हटल्याप्रमाणे ' घेणे दिजे एके, ऎसे आम्ही केले.' आनंद देणारा कोण आणि घेणारा कोण हे द्वॆतच संपले. ना देण्यात मोठेपणा ना घेण्यात कमीपणा...देणाराही मीच आणि घेणाराही मीच! इतकं सायुज्य होतं तेव्हा ती मॆफल केवळ मॆफल राहात नाही आनंदाचा एक डोह बनून जाते. अस्तित्वाच्या फक्त अलवार लहरी होऊन जातात आणि त्यावर कलावंत आणि कलासक्त दोघेही झुलत राहतात. कलावंत भरभरून बरसत राहतो आणि कलासक्त होत राहतो चिंब चिंब!! पुढून कला उधळत राहते आणि समोरून कृतज्ञता! 'दाद द्या अन् शुद्ध व्हा' असं त्याला सांगावंच लागत नाही आणि कलावंताला तशी अपेक्षाही करावी लागत नाही. 

 शांताबाई म्हणतात-

' माझे काव्य रसाळ रंजक असे, ठावे जरी मन्मना

द्या हो दाद अशी रसिकहो, का मी करू याचना?' 

जाईची वेल संध्याकाळी उमलते तेव्हा भ्रमरांना का आमंत्रण द्यावे लागते? मी म्हणते-  'दाद तो  नज़राना हॆ ,कोई खॆ़रात नहीं ।'

         मात्र कलावंताच्या हृदयात ही दाद मिसळली की त्याचा किनारा चिंब भिजतो. कष्टांची वाळू जणू विरघळून जाते,साधनेला सुगंध येऊ लागतो. त्याने त्या रंगमंचाच्या टीचभर जागेत किंवा वीतभर कागदावर आपला जीव ओतलेला असतो, झोकून दिलेलं असतं सर्वस्व! समोरच्या ओंजळी जर खुल्या नसतील,पसरलेल्या नसतील तर मग त्याचं हे बलिदान व्यर्थ जातं! तो मिटून जातो ,कुचंबून जातो. 

            असं होऊ नये ही जबाबदारी रसिकाची! गायकाची कणीदार तान संपतानाच आलेली ' क्या बात हॆ' ची दाद असो किंवा नाटक संपल्यावर प्रेक्षकांनी उभे राहून दिलेली मानवंदना असो किंवा आवडत्या कवीच्या ओळीनंतर ' सुंदर' अशी एखाद्या रसिकाने साधलेली सम, सर्कशीतल्या खेळाडूच्या चित्तथरारक कसरतीनंतर झालेला टाळ्यांचा कडकडाट किंवा मॆदानात आल्यावर होणारा ' सचिन.. सचिन' असा आपुलकीच्या नगा-यावर होणारा पुकारा असो.... या कणकण चांदण्यावरच कलावंत जगत असतो,फुलत असतो.

 ' सुंदरतेच्या सुमनांवरचे दव चुंबुनी घ्यावे 'अशी वृत्ती एकदा बनली की मग आयुष्यातल्या छोट्याछोट्या गोष्टीतल्या सुंदरतेचंही भान येतं आणि दाद देऊन कॊतुक करावंसं वाटू लागतं. हे करण्यात आपण समोरच्याला किती आनंद देतो आहोत याची सुतराम जाणीव नसते,तो अहंकारी अभिनिवेश नसतोच. सहजपणे एखाद्या उमलत्या फुलाला कुरवाळावे,एखाद्या गोंडस बालकाच्या गालावरून हात फिरवावा तितकी ही सहजकृती असते पण त्यामुळे समोरच्या व्यक्तीचे चार क्षण घमघमून जातात. कधीकधी अवतीभवतीच्या कुणाकुणाच्या मनावरही सुगंधाचे चार थेंब शिंपडले जातात आणि हा व्यवहार असा होतो, इतक्या सहज होतो,इतक्या अबोभाट होतो की जसे एखादे फूल विनासक्ती उमलावे.

       कधी ही दाद ' अशीच अमुची आई असती सुंदर रूपवती..' अशी खानदानी असते .कधी ' असा बालगंधर्व आता न होणे..' अशी काव्यात्म असते ,कधी ' आपके पाँव देखे, बहुत हसीन हॆं, इन्हें जमींपर मत उतारिए,मॆले हो जाएंगे.' अशी रूमानी असते तर कधी ' इक रात में दो-दो चाँद खिले' अशी अस्मानी असते.

             परवा अमेरिकेत एका मॉलमध्ये लिफ्टची वाट पाहात  थांबलो होतो. लेकीने व मी छान रंगसंगतीचा भारतीय पेहराव केला होता. लिफ्ट उघडली,आतून तीन चार अमेरिकन महिला बाहेर आल्या,एकजण व्हीलचेअर ढकलत होती. एक सुंदर, गोरीपान ,अशक्त मुलगी व्हीलचेअरमध्ये बसली होती.' बिच्चारी' अशी करुणा माझ्या मनात जागी व्हायच्या आतच ,लिफ्टबाहेर पडताना अचानक माझ्याकडे व सोनलकडे पाहात तिने म्हटले," your attire is so beautiful !! I like it! " मला अशी चकित,आनंदित, सुगंधित करून ती दूर निघूनही गेली. पण माझे काही तास खास  करून गेली.

          मला आठवतंय सिंगापूरच्या एका मत्स्यालयात गेलो होतो आम्ही.तिथल्या स्वच्छतागृहात जात असताना माझ्याबरोबर एक अत्यंत सुंदर वृद्धा आत जाताना मी पाहिली. 'कुदरत ने बनाया होगा,फुरसत से तुम्हें मेरी जान' असंच  म्हणावंसं वाटावं अशी सुंदर गुलाबी कांती, आटोपशीर बांधा,पांढरा शुभ्र ,चमकदार दाट बॉबकट आणि चेह-यावरचा समाधानी,प्रेमळ,गोड स्मितभाव!  बाहेर आल्यावर मी तिची वाट पाहात थांबले आणि ती आल्यावर तिला सामोरी होत म्हटलं," excuse me,but I must say you look so gorgeous, just like queen Elizabeth. " तिने माझ्याकडे निमिषभर अतीव आश्चर्याने पाहिले आणि मग ढगाबाहेर येऊन सूर्य उजळावा तसा तिचा चेहरा उजळला. सुंदरसे स्मित करत तिने माझे दोन्ही हात हातात धरले आणि  मला म्हणाली," good gratius! You are so beautifuly sensitive! Thank you dear,Thank you so much! Be like this for ever!!" आणि दिवसभर मलाच सुंदर झाल्यासारखे वाटत राहिलं तिला सुंदर म्हटल्यामुळे!!

           त्या दिवशी कोल्हापूरच्या ' ओपेल' होटेलमध्ये जेवायला गेलो तेव्हा दिवस मावळला होता. भुकेपेक्षा दमल्याची जाणीव सगळ्यांनाच अधिक प्रकर्षाने होत होती.टेबलावरच्या मेन्यूकार्डमध्ये 'दहीबुत्ती' हा पदार्थ वाचून मोगँबो एकदम खुशच हुआ. काही मिनिटातच समोर आलेली, मस्त हिरवीगार  कोथिंबीर पेरलेली,कढीपत्ता,लाल मिरची,जि-याचा तड़का ( वापरावेत कधीकधी अमराठी शब्द,पर्यायच नसतो त्या शब्दाच्या flavor ला  :)  ) मारलेली, दह्याचा अदबशीर आंबटपणा असलेली पांढरीशुभ्र दहीबुत्ती समोर आली आणि क्षुधेचा सुप्त राक्षसच जागा झाल्यासारखा ताव मारला. अहाहा!! अशी दहीबुत्ती मी ताउम्र चाखली नव्हती.अन्नदात्यासाठी पोटातून आलेली दाद ओठापर्यंत आली होती. पण त्याच्यापर्यंत पोहचवणार कशी? वेटरला विचारून पाहिले पण तो म्हणाला की शेफ सर आता फार बिझी आहेत म्हणून! मग काय करावे? त्याने दिलेल्या बिलाच्या पाठीमागेच लिहिले- शेफसाहेब तुम्ही बनवलेली चविष्ट दहीबुत्ती कोणत्याही पक्वान्नांना लाजवेल अशी! 'तेरे हात मुझे  दे दे ठाकुर!' असे म्हणावेसे वाटत आहे. धन्यवाद! ' टेबलावरचेच गुलाबाचे फूल आणि चिठ्ठी वेटरच्या हातात दिली नि म्हटले कृपया तुमच्या शेफसाहेबांना द्याल का? तो मान हलवून निघून गेल्यावर माझा लेक मला म्हणाला," तो खरंच त्यांना देईल तुझी चिठ्ठी असं वाटतंय तुला?" मी म्हटलं," त्याचा विचार मी करतच नाही, मी दाद दिली ,संपलं. पण ती दिली नसती तर मात्र त्या पाककलेवर अन्याय केल्यासारखं वाटत राहिलं असतं.त्या भावनेतून मुक्त झाले.मला छान वाटलं, बस्स्!"

             माझ्या क्लासच्या तपासलेल्या उत्तरपत्रिका वाटून झाल्या तेव्हा समोर बसलेल्या वॆष्णवी पाटीलचा ( तब्बल २० वर्षानंतरही तिचे नाव लक्षात आहे माझ्या,तिच्या असेल का?) पेपर मुलांना दाखवत तिला म्हटलं," वॆष्णवी,असा पेपर तुझ्याएवढी असताना मला लिहिता आला असेल असं नाही वाटत मला. " वॆष्णवी डोळे मोठ्ठे करून बघत राहिली माझ्याकडे,

मला हसूच आलं. क्लास संपला,मी घरात आले आणि फोनची बेल वाजली. डॉ॰ विद्युत पटेल यांचा मुलगा माझा विद्यार्थी होता. त्याच्या आईचा फोन होता. काही तक्रार असेल का अशा विचारात फोन घेतला. त्या म्हणाल्या," मॅडम आज क्लासमधून माझा मुलगा घरी आला आणि त्याने मला घडलेली गोष्ट सांगितली,

वॆष्णवीला तुम्ही जे बोललात ते सांगितलं आणि म्हणाला," एक टीचर असं कसं काय बोलू शकते? स्वतःकडे कमीपणा घेऊन? मी असं कधीच ऎकलं नाही. " त्या पुढे म्हणाल्या," मॅडम ,तुम्ही चांगल्या बिया पेरताय. मुलांची झाडे मजबूत होतील." मी चकित! वॆष्णवीच्या आईचा फोन असता तर मी एकवेळ समजू शकले असते,पण....! मग बरं वाटलं की जाता जाता घातलेलं पाणीही मुळाशी पोचतंय!

        बी.एड. चा पहिला दिवस! एकेक तास होत होता,नव्या नव्या प्राध्यापिकांची तोंड ओळख होत होती. मी वाट पाहात होते माझ्या आवडत्या मानसशास्त्राच्या तासाची. 

कोण प्राध्यापिका असतील,कशा शिकवणा-या असतील अशा विचारातच असतानाच एक प्राध्यापिका व्यासपीठावर येऊन उभ्या राहिल्या आणि स्वत:ची ओळख करून देत म्हणाल्या, "मी---. मी तुम्हाला मानस शास्त्र हा विषय शिकवणार आहे."

          माझा एकदम मूडच गेला. बुटक्याश्या,विरळ केसांचे पोनिटेल बांधलेल्या,खरबरीत चेह-याच्या या बाईंकडे माझा आवडता विषय असणार होता. नाराजीनेच मी थोडीशी मागे टेकून बसले. आणि हळूहळू पहाटेचा लालिमा पसरत पसरत सूर्याचं बिंब उजळत जावं तसा त्यांनी आपला विषय रंगवत नेला. तास संपला तेव्हा मनावर दाट पसरली होती ती त्यांच्या अनुपम अध्यापनकॊशल्याची मोहिनी! भारावल्यासारखी मी बाकाजवळून उठले आणि धावतच, बाहेर पडणा-या त्यांच्याजवळ गेले. माझा गळा भरून आला होता. पश्चात्तापाने की हृदयातल्या अननुभूत आनंदाने? मी लहानग्या मुलीसारखं हरखून म्हटलं," बाई,तुम्ही किती छान शिकवलंत..." आणि मला पुढे बोलवेच ना !  माझ्या भावना कळल्यासारख्या त्या छानशा हसल्या आणि माझ्या डोक्यावर हात ठेवून निघून गेल्या. मी परत वर्गात आले. आपल्याला इतका आनंद कशाचा झाला आहे याचा विचार करीत...!! 

दुस-यावर रंग उधळल्यावर तो आपल्यावरही उडावा आणि आपण त्यात माखून जावं असा प्रत्यय देणारी ही दाद आयुष्यात अनेकदा मला रंगवत राहिली. बघा ना,आज त्या रंगमाखल्या उत्तरीयांच्या घड्या तुमच्यापुढे उलगडतानाही माझी बोटं रंगलीच !!

  -संजीवनी बोकील



~संकलन- प्रसाद वैद्य

Sunday, 2 October 2022

एक वेगळी आरती

  एक वेगळी आरती 
पैंजणाचा नाद आला गोड कानी ग । 

उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग ।। धृ ।। 

पिवळी साडी पिवळी चोळी अंगी लेउनि । 

वैभवाचे सारे साज गळा घालूनी । 

कोल्हापूरची महालक्षुमी दारी आली ग । 

उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग ।। १ ।। 

हिरवा रंग अति खुलवी खुलावी सुंदर । 

हाती चुडा हिरवा भांगी लाल सिंदूर । 

जय भवानी तुळजापूरची दारी आली ग । 

उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग ।। २ ।। 

पाही वळूनी दारातुनी माय माउली । 

भक्तरक्षणा अष्टभुजा केली धरणी । 

सप्तशृंगीची देवी आली आता बाई ग । 

उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग ।। ३ ।। 

रूप हिचे ग लावण्याचे रंगे तांबुल । 

माहुरगडची रेणुका हि शालू हि लाल ।  

लेकिलाही बघण्या आली दारी माझ्या ग। 

उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग ।। ४ ।। 

माय माउली कुलस्वामिनी दारी आली ग। 

पाऊल दिसता लोटांगण दासी झाली ग । 

कालिका देवी अंबाबाई दारी आली ग । 

उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग ।। ५ ।। 

पैंजणाचा नाद आला गोड कानी ग ।

उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग ।। धृ ।।


~संकलन प्रसाद वैद्य