My YouTube Channel

Click here to visit My YouTube Channel

Thursday, 1 July 2021

डॉक्टर्स डे ... एका डॉक्टरचा!

 डॉक्टर्स डे ... एका डॉक्टरचा!

माझं लहानपण वैद्यकीय क्षेत्राच्या गप्पा ऐकत गेलं. वडील प्रथितयश डॉक्टर, त्यामुळे लहानपणापासूनच वैद्यकीय क्षेत्राची ओळख झाली. आणि ह्या क्षेत्राचं आकर्षण कधी जाणवू लागलं ते कळलं सुद्धा नाही. त्या काळात डॉक्टर होणं म्हणजे माझं एक अल्लड स्वप्न होतं. शालेय जीवन संपलं आणि करियर निवडण्याची वेळ आली, ह्या काळात मेडिकल ची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करणं म्हणजे माझ्यासाठी डॉक्टर होणं झालं. प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झालो आणि खऱ्या अर्थाने डॉक्टर होण्याची वाटचाल सुरु झाली. MBBS चा अवाढव्य अभ्यास! महाविद्यालयीन आयुष्याची मजा लुटत जाडजूड पुस्तकांची कायमची मैत्री जडली. वैद्यकीय शास्त्रातले प्राथमिक विषय एक एक करत अभ्यासून संपवले जात होते आणि मजल दरमजल करत MBBS चा अभ्यासक्रम पूर्ण करणं म्हणजेच त्या काळात माझासाठी डॉक्टर होणं होतं. MBBS पूर्ण होऊन पद्व्युत्तर शिक्षण सुरु झालं. दिवसरात्र काम! सोबत प्रचंड कठीण अभ्यासक्रमाचा डोंगर! डॉक्टर व्हायचं म्हणजे हा मेरू पर्वत उचलायचा अशी झिंगच असते त्या काळात डोक्यात! हे दिव्य
पार पडलं आणि माझं लहानपणीचं अल्लड स्वप्न खरं झालं. असं वाटलं की ती प्रवेश परीक्षा, तो MBBS चा अभ्यास, ती पद्व्युत्तर शिक्षणासाठी केलेली जीवघेणी मेहेनत ... हेच सगळं म्हणजे डॉक्टर होणं!

शिक्षण संपलं आणि वैद्यकीय ‘व्यवसाय’ सुरु झाला. आज जरी याला ‘व्यवसाय’ म्हणावं लागत असलं तरी खरं तर रोज कोणाशी तरी वेदनेचं नातं जुळवत होतो. बाह्यरुग्ण कक्षात जमलेले रुग्ण तपासणं, मधेच येणारा एखादा अत्यवस्थ रुग्ण हाताळणं, निदान करायला कठीण असणारे रुग्ण ऍडमिट करणं आणि त्यांचा इलाज व तपासण्या सुरु करणं असं आयुष्य सुरु झालं आणि हेच सगळं म्हणजे डॉक्टर होणं असं वाटू लागलं.

आणि मग लाट आली... करोना विषाणूची लाट! प्रचंड प्रमाणात रुग्ण! ICU, आंतररुग्ण विभाग कुठेच रुग्ण ठेवायला जागा नाही! सगळीकडे नुसता हाहाकार! अनेक जवळचे लोक, ज्यांच्यासमोर मी लहानाचा मोठा झालो, माझे शालेय शिक्षक, लहानपणीचे सवंगडी, असे सगळेच करोना बाधित म्हणून उपचारासाठी दाखल झालेले. सुरवातीच्या काही दिवसातच लक्षात आलं की ह्यावेळी लाट थोडी वेगळी आहे. करोना विषाणूवर अजूनही रामबाण औषध नाही. आणि जो काही उपचार उपलब्ध आहे त्याला म्हणावा तास प्रतिसाद नाही अशी सगळी परिस्थिती. या सगळ्या लोकांना मी बरा नाही करू शकलो तर? राऊंड सुरु केला की पोटात गोळा येई. भावनिक जवळीक असल्याने जास्तीचाच तणाव. मनातलं वादळ लपवून प्रत्येक रुग्णाला धीर देत, त्याच्या तब्येतीचा आढावा घेत निर्णय घेणं सुरु झालं. परीक्षेत पूर्णपणे अभ्यासक्रमाबाहेरचे प्रश्न यावेत तशी आमची अवस्था. ह्या आजाराची खूप कमी माहिती उपलब्ध. कुठलाच प्रोटोकॉल नाही. मग आज पर्यंत केलेला अभ्यास, मिळवलेला अनुभव पणाला लावणं सुरु झालं. डॉक्टर होणं म्हणजे आपल्या रुग्णांसाठी चाकोरीबाहेर जाणं आणि त्यासाठी आपल्या ज्ञानाची पराकाष्टा गाठणं ह्याची जाणीव व्हायला लागली. सगळं काही करूनही काही रुग्णांकडून जराही प्रतिसाद मिळत नसे. मग अश्या रुग्णांसाठी वरिष्ठांना फोन करणं, सहकाऱ्यांशी चर्चा करणं हे रोजचंच होतं. मग जाणीव झाली की डॉक्टर होणं म्हणजे सर्वच रुग्णांसाठी कुठलाही आपभाव न ठेवता आपलं ज्ञान सर्वांसोबत वाटणं आणि एकत्रित प्रयत्न करणं! बऱ्याचदा अशीही वेळ आली की सगळेच उपाय थकले व रुग्ण गमवावा लागला. १०-१५ दिवस ह्या रुग्णांशी व त्यांच्या नातेवाईकांशी जुळलेली नाती! त्यांच्या त्या अश्रुधारा, दुःख बघवत नसे. अंत्यसंस्कार त्यांच्या मनाप्रमाणे करू देण्याची सुद्धा परवानगी नाकारताना मन पाणीपाणी होऊन जाई. बऱ्याचवेळा केबिन आतून लावून घेऊन मी पण माझ्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली आहे. मग जाणीव झाली की डॉक्टर होणं म्हणजे ह्या भावनांना खंबीरपणे आवर घालून पुढच्या रुग्णांसाठी आपलं सर्वस्व पणाला लावणं. असे एक नव्हे तर हजारो अनुभव! ह्या करोनाच्या महामारीने डॉक्टर होणं म्हणजे काय याचा एक वेगळा आयाम अनुभवायला मिळाला.

आज जगातले सगळेच डॉक्टर आपलं  सर्वस्व पणाला लावून आहेत. प्रचंड प्रमाणात काम, तेवढाच तणाव, कुटुंबापासूनची दूरी ...अशा अनेक वैयक्तिक समस्या बाजूला ठेवून लढणारे हे सैनिकच! इटली स्पेन सारख्या देशात अगदी सुरुवातीला लढलेले डॉक्टर्स, ज्यांच्या प्रयत्नाने व अनुभवाने ह्या आजाराची थोडी तरी माहिती उपलब्ध होऊ शकली त्या आमच्या सहकाऱ्यांना सलाम! कोव्हीड सेंटर मध्ये PPE कीट घालून दिवस रात्र झपाटून जाऊन गेली एक वर्ष तेवढ्याच उमेदीनं काम करणाऱ्या सहकाऱ्यांना सलाम! ह्या विषाणूवर कुठलं औषध लागू होईल ह्याचं वेगवान संशोधन करणाऱ्या सहकाऱ्यांना सलाम! इतिहासात पहिल्यांदाच एक वर्षापेक्षा कमी कालावधीत प्रभावी व सुरक्षित अशी लस उपलब्ध करून देणाऱ्या या अभूतपूर्व सहकाऱ्यांना सलाम! आणि सगळ्यात शेवटी सलाम आपण सर्वांना ...आम्ही प्रयत्न करत होतो पण बऱ्याचदा ते  कमी पडत होते, आमच्या सुविधा कमी पडत होत्या, काही लोकांसाठी आम्ही उपलब्ध होऊ शकत नव्हतो... हे सगळं नाईलाजास्तव होतं! हे समजून घेऊन आमच्यावर ठेवलेल्या विश्वासासाठी, आमच्यामागे खंबीरपणे उभं  राहण्यासाठी आपल्याला सलाम!

पुढची लाट नकोच. आम्हाला कळतंय की वारंवार आपण आयुष्य थांबवणं शक्य नाही. पण काळजी घेत जगणं शक्य आहे. वेळेवर लसीकरण घेणं, मास्क वापरणं, social distancing पाळणं हाच यावरचा उपाय. आणि एवढ्यानंतरही संसर्ग झालाच तर पुन्हा आम्ही मागे हटणार नाही. तुमच्या शुभेच्छांची ऊर्जा आमच्या पाठीशी आहेच!

Happy Doctors’ Day!


• डॉ अमित हरताळकर.

~संकलन

Sunday, 23 May 2021

खुश रहिए




आई हॉस्पिटलमध्ये पेशंटला जेवण पुरवते आणि हा चिमुरडा प्रत्येक जेवणाच्या डब्यावर लिहतो.."खुश रहिए"

गोष्ट खूप लहान आहे पण हृदयाला स्पर्श करणारी.

~संकलन 

Saturday, 8 May 2021

गोष्ट खूप छोटी असते हो....

 1} गोष्ट खूप छोटी असते हो....


तुम्ही गाडीतून जातांना, न उतरता रस्त्यावरच्या माणसाला एखादा पत्ता विचारला तर बऱ्याचदा तो मिळतच नाही, पण उतरून जर, दादा पत्ता सांगता का ? असं विचारलं, तर काहीतरी हिंट नक्कीच मिळते....


गोष्ट खूप छोटी असते हो, पण करायची.


स्टेशनवर तुम्हाला सोडायला आलेल्याला, घरी पोचल्यानंतर तुम्ही फोन केला नाही, तर फारसं बिघडत नाही, पण फोन केला, तर नातं नक्कीच जुळतं...


गोष्ट खूप छोटी असते हो, पण करायची.


अंधारात तुम्ही कधी पाय अडखळुन पडलात, तसाच मागचाही पडू शकतो. तिथेच थोडं थांबून मागच्याला सावध केलं, तर अंधारातही त्याचे डोळे बोलतात....


गोष्ट खूप छोटी असते हो, पण करायची.


आपापलं सामान घेऊन तर सगळेच रेल्वेचा दादर चढतात. पण त्याही वेळी एखाद्या आजीचा हात धरून तिला मदत केली तर, तिने घट्ट धरलेला हात आपली आई आठवून देतो....


गोष्ट खूप छोटी असते हो, पण करायची.


घंटागाडीत तुमचा कचरा घेणारा तुम्हाला रोजच भेटतो. कधी त्याला ग्लोव्ह्ज द्यायचे. कधी skin चं मलम देऊन टाकायचं...


गोष्ट खूप छोटी असते हो,पण करायची.


कमी जागेत बाईक पार्क करतांना तिरक्या स्टॅंडवर न लावता, सरळ स्टॅंडवर लावून मागच्यालाही थोडी जागा ठेवली, तर त्याचं thank you ऐकायला मस्त वाटतं....


गोष्ट खूप छोटी असते हो, पण करायची.


किराणा दुकानाच्या गर्दीत, तिने घेतलेल्या सामानाचा ढीग पाहणाऱ्याने त्या ताईची पिशवी आपण धरून ठेवली, तर सामान नीट ठेवणं तिला सोप्पं जातं.

माणसा-माणसांतील निष्कारण असलेली बंधनं गळून पडतात...


गोष्ट खूप छोटी असते हो, पण करायची!


2} होतंअसंकधीकधी...!!

खूप महत्वाच्या मीटिंग मध्ये असतो आपण...

बऱ्याच वर्षांनी अचानक एका जवळच्या मित्राला आठवण येते आपली....

इच्छा असूनही कॉल उचलू शकत नाही आपण...

संध्याकाळी घरी आल्यावर आठवण येते...

परत कॉल करावा तर बोलायला विषय नसतो आपल्याकडे...

टाळतो आपण कॉल करायचा....

त्याचा दोन दिवसानंतर मेसेज येतो...

'तुझ्या ऑफिस बाहेर होतो...

भेटलो असतो...'

जुन्या आठवणी काढत बसतो आणि  मन रमवतो त्यातच..

स्वतःला खोटं खोटं समजावत...!

होतं असं कधी कधी....!!!

🍁🍁🍁

कडक उन्हात सिग्नलला बाईक उभी असते आपली...

रस्त्याच्या कडेला एक वृद्ध जोडपं असतं मागत लोकांना...

माया,कणव दाटून येते मनात आपल्या...

'कसं आपल्या आई वडिलांना लोक असं वाऱ्यावर सोडत असावेत??' 

पाकिटात हात जातो...

शंभराची नोट लागते हाती...

व्यवहार जागा घेतो ममतेची...

समोरचा म्हातारा ओळखतो... बदलतो...

"दहा दिलेस तरी खूप आहेत पोरा..."

तो सुटका करतो आपली पेचातून...

आपल्याच नजरेत आपल्याला छोटं करून...

होतं असं कधी कधी....!!!


🍁🍁🍁

दिवाळीचे पाहुणे असतात जमलेले...

आज कामवाली येणार की नाही याची धाकधूक असते...

तिच्या असण्याने आपण किती निवांत आहोत याची जाणीव होते अशा  वेळी...

दुपारची जेवणे उरकून गप्पा रंगात आलेल्या असतात...

ती येते...

काम आटोपते...

तिच्या मुलांना राहिलेली बासुंदी द्यावी का ह्या संभ्रमात असताना, कामवाली एक डब्बा देते हातात आपल्या...

चिवडा लाडू असतो त्यात...


"तुम्ही दर वेळा देता... आज माझ्याकडून तुम्हाला..."


'कोण श्रीमंत कोण गरीब', हा विचार सोडत नाही पिच्छा आपला...

होतं असं कधी कधी....!!!

🍁🍁🍁

ढाराढूर झोपेत असतो उन्हाळ्याचे गच्चीवर...

आई उठवते उन्हं अंगावर  आल्यावर...

अंगात ताप असतो तिच्या...

आपण सुट्टीचा आलोय घरी म्हणून उसनं बळ आणते अंगात ती...

मेसच्या खाण्याने आबाळ होत असेल म्हणून चार दिवस होईल तेवढे जिन्नस पोटात आणि उरलेले डब्यात भरून येतात आपल्यासोबत...

दिवस उलटतात...

वडिलांचा एके रात्री फोन येतो...

"काम झालं असेल तर आईला एक फोन कर... आज तिचा वाढदिवस होता..."

कोडगेपणा म्हणजे हाच तो काय...!

चडफडत facebook च्या virtual मित्राना केलेले  birthday विश आठवतात.....

लाजत तिला फोन करतो...

"आमचा कसला रे या वयात वाढदिवस? तू जेवलास ना?? तब्येतीला जप बाबा..."

ती बोलते...

कानात गरम तेल ओतल्याचा भास होतो...

अश्रूंचा मुक्त वावर होतो डोळ्यांतून...

काहीतरी खूप खूप दूर जातंय आपल्या पासून असं जाणवत राहतं...!!

खरंच, होतं असं कधी कधी....!!!


~संकलन 

Friday, 23 April 2021

उन्मत्त माणसाला नियतीने मारलेला एक झबरदस्त " फटका " कोरोना........

 उन्मत्त माणसाला नियतीने मारलेला एक झबरदस्त " फटका "

 कोरोना........


माणुसकी , स्वच्छता , निस्वार्थीपणा , कुटुंब व्यवस्था , पैशांचा दुरुपयोग, विलासीपणा , ऐशारामी जीवन, आता ह्या हरामाच्या पैशाचे काय करायचे ???? म्हणून  विनाकारण केले जाणारे प्रवास , देवस्थानांच वाढलेलं प्रस्थ , श्रीमंती , माजमस्ती , उद्धटपणा , सत्तालोलुपता , मग्रुरी , गुंडगिरी , जगण्याचा अर्थ , मरणाची भीती , केलेल्या वाईट कृत्यांची आठवण , समारंभात केलेला पैशांचा अपव्यय, समारंभात जेवणाच्या वेळी पूर्ण पंचपक्वान्न1नी भरलेल्या ताटातील एकदोन घास ख1ऊन, निर्लज्जपणे बाकीचे तसेच ठेऊन ताटावरून उठून जाण्याची वाढती प्रवृत्ती, तसेच निकृष्ठ जीवन शैली , अशा अनेक गोष्टी शिकवायला आलेला हा एक संदेश आहे .

पूर्वीच्या परंपरा विसरून आम्ही आधी तुळशीला घराबाहेर काढलं !

 " त्याला काय होतंय ?

 " हा प्रश्न विचारणाऱ्या नवीन पिढीला हा चांगलाच झटका आहे , 

सकाळी शुचिर्भूत होणे ही संकल्पना हळू हळू लयास चालली होती . 

कधीतरी वाट्टेल तेव्हा अंथरुणातून उठून " शॉवर " खाली दोन मिनिटं उभारणाऱ्या पिढीला , आता दोन दोन मिनिटाला हात धुवावे लागत आहेत . घरात, कापूर , उदबत्ती , देवापुढे दिवा ह्या सगळ्या गोष्टींना अंधश्रद्धेच्या सोईस्कर नावाने फाटा दिला गेला आहे . आता त्याच कापरासाठी मॉल मध्ये लाईन लागलीय .


 संध्याकाळची उदबत्ती लावून म्हटलेली रामरक्षा ही वरदान ठरतेय . घरी आल्यावर आधी पायावर पाणी घेणारी आपली संस्कृती सोडून बुटासकट बेडवर झोपून , मोजे काढून भिरकवणारे आता चांगलेच पोळले आहेत. 

धूप, दीप, नैवेद्य, आरतीमुळे प्रसन्न होणारं घरातलं वातावरण आता कमालीचं गढूळ झालंय .

पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी तर " घरचं जेवण " लोक हळू हळू विसरत चालले होते. आता त्याची नितांत गरज भासतेय. उठलं की सुटलं. प्रत्येक सुट्टीला गाडी घेऊन पर्यटन हेच जीवन असं थोडं वाटायला लागलं होतं, त्यावर पण थोडा आळा बसेल.

अंधश्रद्धेच्या नावाखाली आपणच आपल्या संस्कारांची दिलेली तिलांजली आता आपल्याच बोकांडी बसलीय .

सणासुदीच्या रूपाने पूर्वजांनी केलेली रचना किती वेडगळ पणा आहे हे शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध करणारी पिढी आता त्या मार्गाचा अवलंब नक्की करेल असं वाटायला लागलय . 


       शेवटी निसर्गापुढे सगळे सारखेच . रस्त्यावरच्या भिकाऱ्याला किंवा स्कॉर्पियोमधून फिरणाऱ्या श्रीमंताला " मास्क " बांधून फिरायची वेळ आलीय .

     हे मानवा....... तू कितीही पुढारलास तरी शेवटी तुझ्या जगण्याची गुरू किल्ली फक्त त्या नियंत्याकडेच आहे .

त्यामुळे त्याचं स्मरण कर . जैन मुनींनी तोंडाला फडकं बांधलेलं बघून हसणारे आज तेच करताहेत . 

फक्त त्यांचा उद्देश कीटक मरू नयेत हा होता . पण आज आपला उद्देश बेवारस कुत्त्येकी मौत, रस्त्यात मरून पडलेल्या घुशी किंवा उंदरासारखं मरण नको, तर सुसंस्कृतपणाचं, तारतम्य भाव ठेवुन,  विवेकशील, तत्वशील आणि सत्वशील असं जीवन असावं,हाच खरा त्यामागचा उद्देश आहे.


 पुराण ,ग्रंथ ,उपनिषदे यांच्यावरची धूळ झटका तरच हा झटका पचवण्याची ताकद तुमच्यात येईल. अन्यथा वडापाव, बर्गरच्या पिढीला असे कितीतरी कोरोना दर चार वर्षांनी झेलावे लागतील त्यासाठी........

हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे ,

आरोग्य दे , सर्वांना सुखात ,आनंदात , ऐश्वर्यात ठेव

जगावरील संकट टाळून सर्वांना उदंड आयुष्य दे...

सर्वाचं भलं कर,कल्याण कर,रक्षण कर आणि तुझे  गोड नाम सर्वांचे मुखात अखंड राहून दे ही प्रार्थना.


~संकलन 

Monday, 22 March 2021

पुस्तक परिचय-महाराष्ट्रातील उद्योजक


पुस्तक- महाराष्ट्रातील उद्योजक 
लेखक - जयप्रकाश झेंडे 
प्रकाशन- डायमंड प्रकाशन  
पुस्तक परिचय द्वारा -प्रसाद वैद्य 

दोस्तहो नमस्कार,

दोस्तांनो जीवनाच्या वाटचालीत यशस्वी होण्यासाठी कोणत्या खऱ्या भांडवलाची, शिदोरीची आपल्याला नितांत गरज असते हे चपखल शब्दात सांगायचं झालं तर, 'मने, मनगटे हेच खरे भांडवल' असं आपल्याला म्हणता येईल. बऱ्याच वेळा आपल्याला अनेक गोष्टी ऐकायला, अनुभवायला मिळतात. एखादा निराशेचा सूर कानी येतो: "अहो, धंद्यात जम बसवायला भांडवल हव ना! ते काय ओम भवती भिक्षान देही करायचं! एखादा उपरोधान म्हणतो- " आम्ही फक्त टाटा बिर्ला व्हायची स्वप्न रंगवायची. भांडवलाविना जिथे तिथे गाडी अडतीये आमची."

जीवनात कोणत्याही क्षेत्रात नोकरी, धंदा, उद्योग अन्य सर्व क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी मनाची तयारी आणि मनगटाच्या सामर्थ्याचा साक्षात्कार अनुभवायला हवा. अनंत ध्येयासक्तीने भारावून जाऊन माणसं जीवनाला कलाटणी देतात व यशाचे मानकरी जातात.

जयप्रकाश झेंडे यांचं ' महाराष्ट्रातील उद्योजक' हे पुस्तक अशाच उद्योजक वृत्तीला प्रोत्साहन देणारं आहे. हे पुस्तक म्हणजे महाराष्ट्रातील उद्योजकांना मानाचा मुजरा ठरावं असं आहे. या पुस्तकात भारतीय उद्योगाचे जनक जमशेटजी टाटा, लहान ठेवीदारांचा देवदूत- धीरूभाई अंबानी, जगातील दर्जाचा स्थापत्यशास्त्रज्ञ- बाबुराव(बी.जी.) शिर्के, ग्राहकांच्या समाधानाची शंभर टक्के खात्री देणारे- राजाभाऊ चितळे, नावीन्याचा स्पर्श असणारे- आबासाहेब गरवारे, ध्येयनिष्ठ उद्योगपती- शेठ जमनालाल बजाज, जागतिक किर्तीचा संगणक उद्योजक- अझीम प्रेमजी, व्यवसायाला नवीन उभारी देणारा उद्योजक-आनंद महिंद्रा, मध्यम कुटुंबातील कोट्यधीश- आदी गोदरेज, महाराष्ट्राला उद्योगी करणारे उद्योगी कुटुंब- शंतनुराव किर्लोस्कर, केरळातून येऊन महाराष्ट्रात रमलेला उद्योगपती- चंद्रन मेनन, भांडवलशाही मनाचा पण समाजवादी हृदयाचा उद्योजक- नारायण मूर्ती, उद्योगाला धार्मिकतेची जोड देणारे उद्योजक कुटुंब- बिर्ला कुटुंब आणि इट्स ऑलवेज पॉसिबल म्हणणारे- अनिल मेहता या उद्योजकांच्या चरित्रांचा त्यांनी वेध घेतला आहे आपल्यातील उद्योजक वृत्तीला प्रोत्साहन देतो.

त्याचबरोबर या पुस्तकात जयप्रकाश झेंडे यांनी मुख्य व्यवस्थापक आणि उद्योजकतेविषयी काही महत्त्वाचे मुद्दे सांगितलेले आहेत.

आपल्या या पुस्तकात भारतीय उद्योगाचे जनक- जमशेटजी टाटा यांच्याबद्दल लिहितात-

समाजातील एक गट त्यात कायमस्वरूपी वास्तव्य करण्यासाठी गुजरातमध्ये आला तेव्हाची एक कथा. या गटाच्या प्रमुखाने गुजरातच्या राजाकडे आश्रय देण्याची विनंती केली. त्यावेळी राजाने आमच्याकडे जागा नाही हे सांगण्यासाठी रूपकात्मक असा दुधाने काठोकाठ भरलेला वाडगा पारशांच्या गटप्रमुखाकडे पाठविला. हा प्रमुखही मोठा हुशार होता. त्याने त्या कटोर्‍यात साखर घालून राजाकडे परत पाठवला आणि कळवले, " साखरे सारखीच आम्ही जागा व्यापणार नाही परंतु त्या दुधात मिसळून जाऊ आणि दुधाची गोडी मात्र नक्कीच वाढवू." गुजरातच्या राजाने या समाजाची चतुराई पारखून त्यांना आपल्या राज्यात सामावून घेतले. जवळपास गेल्या दोन शतकांतील टाटा कुटुंबाची दैदिप्यमान कामगिरी पाहता त्यांनी दिलेले हे वचन अक्षरशः खरे करुन दाखविले आहे.

अशाच एका पारशी कुटुंबात जमशेटजींचा जन्म 3 मार्च 1839 रोजी नवसारी या छोट्याशा शहरात झाला. त्यांचे वडील नसुरवानजी हे त्यांच्या पारशी धर्मगुरु कुटुंबातले पहिले व्यावसायिक. त्यांनी व्यवसायासाठी मुंबईला स्थलांतर केले. वयाच्या एकोणतिसाव्या वर्षीच एकवीस हजार रुपये भांडवल घालून त्यांनी आपली स्वतंत्र पेढी सुरु केली. 1 जानेवारी 1877 ला त्यांनी नागपूर येथे 'एम्प्रेस मिल' या नावाने एका कापडगिरणीला प्रारंभ केला. त्यावेळी या गिरणीचे शेअर्स खरेदी करण्याची विनंती जमशेटजींनी एका व्यापारी सावकार मित्राला केली तेव्हा त्यास नकार देताना तो म्हणाला होता, " जमिनीत सोने काढून टाकणारा कंपनीत पैसा कशाला गुंतवायचा?" पुढे योगायोग असा की, या कंपनीची भरभराट पाहण्यासाठी हा गृहस्थ जिवंत होता आणि त्याने प्रांजलपणे कबुलीही दिली, " टाटांनी जमिनीत सोने गाडून ठेवले नव्हते तर त्यांनी ते मातीत पेरले होते आणि आता त्याला भरघोस पीकही येत आहे."

दोस्तांनो, संपत्ती कमवण्याचे दोन उद्देश असू शकतात- स्वतःसाठी आणि इतरांसाठी. ही गोष्ट लक्षात घेऊन जमशेटजींनी राष्ट्रासाठी संपत्ती निर्माण करणाऱ्या एका कार्यक्षम परंपरेला जन्म दिला. त्याची प्रचिती आपण आज घेत आहोत.

आपल्या भारतभूमीला औद्योगिक क्रांतीच्या दिशेने नेण्यासाठी त्यांनी चार महत्त्वाची उद्दिष्टे समोर ठेवली होती.

1) पोलाद निर्मिती- हा उद्योग सर्व जड उद्योगांचा पाया आहे.

2) पाण्यापासून वीजनिर्मिती- सर्वात स्वस्त पर्यावरण संवर्धक

3) संशोधनाशी निगडित शिक्षण- प्रगतीसाठी आवश्यक

4) जागतिक दर्जाचे उत्कृष्ट हॉटेल

आपल्या या स्वप्नांपैकी एकाच स्वप्नाची सत्यता ते पाहू शकले ते म्हणजे 16 डिसेंबर 1903 रोजी झालेली ताज महल हॉटेलची सुरुवात. त्यांची बाकी स्वप्ने त्यांच्या वारसदारांनी मोठ्या निष्ठेने पूर्ण केली.

मित्रांनो, 'महाराष्ट्रातील उद्योजक' या पुस्तकातील भारतीय उद्योगातील हिमालय असं त्यांना म्हणावं उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजे जे.आर.डी. अर्थात जहांगीर रतनजी दादाभाई टाटा. नगाधिराज हिमालय, सरितासम्राज्ञी गंगा आणि सौंदर्यशालीन ताजमहाल ही भारताची भूषणं आम्ही मोठ्या मानाने मिरवावीत असंच निसर्गाचं हे दान मानवालाही लाभलं की, मग त्याला अलौकिकतेचा, अद्भुततेचा स्पर्श होऊन त्याचं व्यक्तिमत्व वेगानं फुलतं, बहरतं. जे. आर. डी. टाटा यांच्या बाबतीतही हेच घडलं. आपल्या अभिजात कार्यकुशलतेच्या व बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी उत्तुंग अशी झेप घेऊन प्रथम आकाश आणि नंतर पृथ्वी गाजवली. त्यांच्या शब्दात त्यांनी स्वतःबद्दल केलेले वर्णन असे- " मी स्वतःला एक जरुरीपुरता, छान, विश्वासपात्र, जो पीत नाही, जुगार खेळत नाही, ज्याला मुलांची आणि प्राण्यांची आवड आहे असा माणूस मानतो. माझ्यात काही दोष आहेतच आणि त्यांची जबाबदारीही माझीच आहे असे मी मानतो." मित्रांनो, याच साधेपणामुळे आणि सच्चेपणामुळे ही माणसं मोठी झाली. अतिप्रचंड कामाचा ताण असतानासुद्धा जे.आर.डी. टाटा यांचं वाचनही भरपूर होतं. त्यांच्या कात्रणे चिकटविण्याच्या वहीत मृत्यू आणि प्रेम यावरही सुंदर परिच्छेद असणारी कात्रणे लावलेली होती तसंच संगीताचीही त्यांना रुची होती.

जे.आर.डी .टाटा म्हणतात, " स्वतः विचार केल्याशिवाय वरवरची अशी कोणतीही गोष्ट स्वीकारू नये. दुर्दैवाने 'बोधवाक्ये' आणि 'घोषवाक्ये' यामुळे आपली माणसं पटकन भावनिक बनतात. उपक्रमशीलता आणि साहस यांचं मूर्तीमंत प्रतीक म्हणजे जे. उपक्रमशीलता आणि साहस यांचं मूर्तीमंत प्रतीक म्हणजे जे.आर. उपक्रमशीलता आणि साहस यांचं मूर्तीमंत प्रतीक म्हणजे जे. उपक्रमशीलता आणि साहस यांचं मूर्तीमंत प्रतीक म्हणजे जे.आर.डी. टाटा.

मित्रांनो, जयप्रकाश झेंडे यांनी या पुस्तकात ज्या उद्योगी विभूतींचा समावेश केला आहे त्यांच्या या बद्दल वाचत असताना पुढचं वाक्य काय आहे याची उत्कंठा कायम राहते. रतन टाटा म्हणतात, " मला पैसा मिळवण्याची तीव्र इच्छा नाही तर जिथे आनंद नाही, तिथे तो निर्माण करण्याची, तो बघण्याची प्रचंड आस आहे." त्यांच्या म्हणण्यानुसार तो आनंद त्यांनी निर्माण केला नॅनो टाटा कारच्या माध्यमातून. मिठापासून मोटारीपर्यंत आणि पोलादापासून मोबाईलपर्यंत टाटा समूहाचा विस्तार विस्मयकारक तर आहेच पण उद्योजकांना पथनिदर्शकदेखील आहे.

दोस्तहो, लहान ठेवीदारांचा देवदूत ज्यांना म्हटलं जातं ते धीरुभाई अंबानी- "आपल्या यशाचे रहस्य काय?" या प्रश्नाला उत्तर देताना म्हणतात, " माणसाला महत्वाकांक्षा हवी आणि त्याला इतर माणसांची मने ओळखता आली पाहिजे." सर्व लोकांना आपल्या बरोबर घेऊन जाण्याची धीरुभाईंची शक्ती अफलातून होती.

रिलायन्समधील एक उच्चपदस्थ अधिकारी म्हणतात, " मी 26 वर्षांचा असताना माझे वडील वारले त्यावेळी माझ्या नातेवाईकांच्या आधी आमच्या अध्यक्षांचा सांत्वन करणारा संदेश मला मिळाला. त्यात लिहिले होते- 'आयुष्यात अशा घटना घडतात. काळजी करू नका आम्ही तुमच्या सोबत आहोत.' अशा प्रसंगी केवढा मोठा आधार वाटतो या शब्दांचा." आपण निश्चयाने आणि अचूकतेने काम केले पाहिजे म्हणजे यश आपोआपच आपल्या मागे येते यावर धीरुभाईंची आढळ श्रद्धा होती.

दोस्तांनो, असं म्हणतात की, पोटात शिरण्याचा मार्ग जिभेवरुनच जातो आणि पोटात शिरलं की मनात घर करणं सहज शक्य होतं. ग्राहकांच्या समाधानाची शंभर टक्के खात्री देणारे चितळे बंधू मिठाईवाले आणि तमाम खवय्ये यांच्यातलं नातं अगदी तसंच आहे.

दर्जेदार महाराष्ट्रीयन मिठाई, दूध आणि खाद्य पदार्थांची निर्मिती करणारे 'चितळे बंधू मिठाईवाले' यांचे नाव महाराष्ट्रातच नाही तर जगाच्या पाठीवर पसरलेल्या सर्व मराठी बांधवांच्या जिभेवर मोठ्यात सविनय विराजमान झालेलं आहे. पुण्याला भेट देणारी तमाम मराठी माणसं परदेशी जातांना बाकरवडी आणि आंबा बर्फी घेऊन जाणारच. चितळे उद्योग समूहाची वार्षिक उलाढाल जवळपास दोनशे कोटीच्या आसपास पोहोचली आहे. या ना. या नामांकित उद्योगाचा नेतृत्व करतात राजाभाऊ चितळे. या नामांकित उद्योगाचा नेतृत्व करतात राजाभाऊ चितळे. त्यांची वाणीही त्यांच्या मिठाईसारखी 'मिठी' आहे. केवळ गुणवत्ता आणि परिश्रम यांच्या जोरावर राजाभाऊंनी आपल्या अद्वितीय दर्जाच्या उत्पादनांची 'ब्रॅंड इमेज' तयार केली आहे.

अशा अनेक उद्योजकांचा जीवन प्रवास या पुस्तकात जयप्रकाश झेंडे यांनी बारकाईने रेखाटलेला आहे. लेखक लिहितात- माझ्या मते 'योजकता' आणि 'उपक्रमशीलता' यांचा संगम म्हणजे उद्योजकता आणि हा संगम ज्या व्यक्तीत दिसतो तो उद्योजक असे म्हणायला हवे.

उद्योजक व्हायची स्वप्ने अनेक तरुण असतात अनेक उदाहरणांवरून हे सिद्ध झालेलं आहे की यश म्हणजे काही अपघात नव्हे. तरुणांना सांगावेसे वाटते की यासाठी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे यशस्वी माणसांच्या चरित्रांचा बारकाईने अभ्यास करावा त्यांच्यातील गुण आत्मसात करावे आणि दुर्गुण टाळावे.

    अनेक यशस्वी उद्योजकांच्या चरित्रांचा अभ्यास केल्यावर त्यांच्यातील काही गुण प्रकर्षाने जाणवले ते म्हणजे मजबूत योजना संधीचा शोध,संधीचा शोध,बांधिलकी,अविचल श्रद्धा,योग्य दिशा,योग्य माणसांची निवड, धोका पत्करण्याची तयारी, प्रयत्नातील सातत्य, कल्पकता आणि चिकाटी हे गुण आपल्या अंगी असतील तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. होय ना!

मित्रांनो, या देशाच्या औद्योगिक प्रगतीत महाराष्ट्रातील उद्योजकांची कामगिरी नेत्रदीपक ठरली आहे आणि जगाच्या औद्योगिक क्षेत्रातही त्यांनी प्रचंड दबदबा निर्माण केला आहे.

मग काय दोस्तांनो, उद्योजक व्हायचंय ना? तर मग जयप्रकाश झेंडे यांचं 'महाराष्ट्रातील उद्योजक' हे पुस्तक नक्की वाचा. कारण साहसे वसते लक्ष्मी:| हेच खरं आहे आणि हो आपले अभिप्राय नक्की नोंदवा. आपले अभिप्राय हीच माझी ऊर्जा आहे. शुभेछा. भेटुया.

~प्रसाद वैद्य