चोपडा (प्रतिनिधी)
विवेकानंद विद्यालयात बाल शिक्षण व प्राथमिक शिक्षणाची कार्यपद्धती यावर आधारित दि.१४ एप्रिल ते १६ एप्रिल २०२४ तीन दिवसीय प्रशिक्षण व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यशाळेत पहिल्या दिवशी संस्थेचे अध्यक्ष मा.डाॅ.विकास हरताळकर, सचिव मा.ॲड. रवींद्र जैन, सहसचिव मा.डाॅ. विनीत हरताळकर हे उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेच्या पूजनाने कार्यशाळेची सुरुवात करण्यात आली.विद्यालयाचे माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. नरेंद्र भावे यांनी 'मेंदू शिक्षण व ज्ञानरचनावाद' या विषयावर शिक्षकांना मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात विद्यालयातील उपशिक्षिका श्रीमती ज्योती अडावदकर यांनी 'प्राथमिक शिक्षणात भाषिक व शारीरिक विकासाची कार्यपद्धती' स्पष्ट केली.
प्रशिक्षणाच्या दुसऱ्या दिवशी बालवाडी विभागाच्या प्रमुख सौ.माधवी भावे यांनी 'जीवन व्यवहार,कला व कार्यानुभवातून बालकाचा विकास कसा साधावा' या संदर्भात शिक्षकांना मार्गदर्शन केले. तसेच दुसऱ्या सत्रात विद्यालयाच्या प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती आशा चित्ते यांनी 'गाणी,गप्पा,गोष्टी यातून विद्यार्थ्यांचा भावनिक व सामाजिक विकास कसा साधावा' या संदर्भात मार्गदर्शन केले
व कृतियुक्त गीत सादर केले. दुसऱ्या सत्रात पदवीधर शिक्षक तसेच अनेक शिक्षक प्रशिक्षणात तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून मोलाची भूमिका पार पाडणारे श्री.देवेंद्र पाटील यांनी 'गणित व विज्ञान विषयांसंदर्भात बुद्धी विकासाची कार्यपद्धती' स्पष्ट केली.
कार्यशाळेच्या तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी विद्यालयातील उपशिक्षक श्री.संजय सोनवणे यांनी 'खेळ व मुक्त खेळ यातून बालकाचा विकास कसा साधावा' या संदर्भात सर्व शिक्षक बंधू-भगिनींकडून कृतियुक्त नाविन्यपूर्ण खेळ खेळून घेतले व त्यातून बालकांचा विकास कसा साधावा आणि बालकाला आनंददायी शिकते कसे करावे? हे त्यांनी स्पष्ट केले.दुसऱ्या सत्रात मा.डॉ.सौ.भावनाताई भोसले (गटशिक्षणाधिकारी (प्रभारी) पंचायत समिती,धरणगाव) यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात पूर्व प्राथमिक व प्राथमिक शिक्षणाची दिशा याविषयी मार्गदर्शन केले.कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मा.डॉ. विकास हरताळकर व संस्थेचे सचिव मा.ॲड.रवींद्र जैन यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच गटशिक्षणाधिकारी मा.श्री. अविनाश पाटील यांनी भेट देऊन सदर प्रशिक्षण व कार्यशाळेच्या आयोजनाबाबत विद्यालयाचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या. विद्यालयातील उपशिक्षक श्री. अभिषेक शुक्ल व उपशिक्षिका श्रीमती मेघा पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

No comments:
Post a Comment