श्री. वसंतभाई मयूर यांना अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयातर्फे पं. विष्णू दिगंबर पलुस्कर संगीत कला गौरव पुरस्कार प्रदान
आमचे सगळ्यांचे गुरु संगीताचार्य श्री. वसंत भाई मयूर यांना अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयातर्फे पंडीत. विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्या 150 व्या जयंती निमित्त "पं. विष्णू दिगंबर पलुस्कर संगीत कला गौरव पुरस्कार" नवी मुंबईत एका दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला.जळगाव जिल्ह्यातील चोपड्या सारख्या, त्या मानाने मोठ्या शहरांपासून दूर, कोपऱ्यात असलेल्या गावात 50-60 वर्षांपूर्वी शास्त्रीय संगीत शिकणे म्हणजे किती कठीण काम होतं ते आजच्या ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कदाचित कळणार नाही. चांगल्या गुरू चा शोध घेणे, खडतर परिस्थितीतही नवीन ज्ञान पदरात पाडून घेण्यासाठी अमळनेर, जळगाव, धुळे, मुंबई इथे जाऊन तबल्याच्या गुरूंचे मार्गदर्शन घेणे, उत्तम संगीत ऐकण्यासाठी धडपड.. सारं काही अवघड. काही वेळा तबला वादक फक्त वाजविण्याचे काम करत, त्यांना एखादा कायदा कसा लिहावा, लिपी, थेअरी वगैरे काहीच भानगड माहीत नसे. तिथे तो बोल किंवा कायदा शिकून, समजून व्यवस्थीत लिपीबध्द करून जतन करून ठेवणे हेही एक जिकिरीचं पण महत्त्वाचं काम त्यांनी केलं. मयूर सरांच्या सुंदर हस्ताक्षरातल्या लिखाणाच्या वह्या, नोट्स हा तर एका पुस्तकाचा चा विषय होईल इतका सुंदर आहे. लाल, हिरव्या, निळ्या रंगात शाईच्या पेनाने लिहिलेल्या वह्या फक्त बघणे हा सुद्धा एक वेगळा आनंद. वर्षानुवर्षे संगीत शास्त्र शिकून, संकलन करून, जतन करून ते पुढच्या पिढीपर्यंत पोचवण्याचं अत्यन्त महत्त्वाचं काम मयूर सरांनी अव्याहत चालू ठेवलं आहे. जितक्या जिद्दीने, पॅशन ने संगीत शिकण्याचा ध्यास मयूर सरांनी घेतला तितक्याच आत्मीयतेने तो सांगीतिक वसा शिष्यांना ते देण्यासाठीची धडपड असते. गेली 50 वर्ष अव्याहतपणे ही परंपरा कायम राहिली आहे. सकाळी 5 वाजेपासून ते रात्री पर्यंत या मंदिरातली पूजा चालूच असते. शाळेतल्या संगीत शिक्षक या पदाची सार्थ सेवा मयूर सरांनी अगदी मनापासून केली. चोपडा परिसरात संगीत शिक्षक म्हणजे मयूर सर हा एक प्रकारचा मानक होऊन गेलाय. संगीतात विद्यार्थ्यांना घडविणे म्हणजे सोपं काम नाही. लहान लहान वयातल्या पोरांना तबला पेटीवर हात कसा ठेवायचा याच्यापासून पासून ते त्यांच्याकडून रियाझ करवून घेणे, पाठांतर, परीक्षेची तयारी या सर्व गोष्टी म्हणजे अत्यन्त अवघड प्रकार. काहींची आर्थिक परिस्थिती नाजूक तर काहींची शैक्षणिक, सगळ्यांना सांभाळून घेणे, जागोजागी मदत करणे हेही त्यांचं एक महत्त्वाचं काम. संगीतात दगड असलेल्या बऱ्याच विद्यार्थ्यांना मयूर सरांनी घडवून त्यांच्या सुंदर मुर्त्या बनवल्या आहेत. तबला, पेटी, गायन यात सरांच्या शेकडो विद्यार्थ्यांनी प्रावीण्य मिळवलंय, मोठमोठ्या संमेलनात वाजवलंय, पुरस्कार प्राप्त केलेत.
काळाच्या ओघात खूप सारी लेबल आपल्याला चिटकतात, पण 'मयूर सरांचे विद्यार्थी' ही ओळख अजूनही मनाच्या खूप जवळची आहे.
आज गांधर्व महाविद्यालया सारख्या भारतीय संगीतातल्या अग्रगण्य संस्थेने दिलेला पं. पलुस्करांच्या 150 व्या जयंतीच्या वर्षीचा पुरस्कार, सरांच्या संगीत क्षेत्रातील सेवेची घेतलेली दखल, केलेला सत्कार ही आम्हा सगळ्या शिष्यांसाठी आनंदाची पर्वणी आहे.शारदा देवीचा आशीर्वाद गुरू- शिष्यांवर असाच कायम राहो अशी प्रार्थना !!
संगीत महर्षी, गुरुवर्य वसंतभाई मयूर यांना खूप खूप शुभेच्छा !!
--स्वप्नील पोतदार आणि सर्व विद्यार्थीगण
Click Here ➤ Zee 24 तास वरील बातमीची लिंक
संकलन~प्रसाद वैद्य
No comments:
Post a Comment