पण थोडा उशीर झाला ६ वीच्या मराठी पाठावर एका शिक्षकाचा #अभिप्राय
🟣 पालघर
................अन् माझा अख्खा वर्ग ढसाढसा रडला !
आदरणीय लेखक,
श्रीयुत संदीप हरी नाझरे,
आपणांस सस्नेह सप्रेम नमस्कार.
पण थोडा उशीर झाला..... हा तुम्ही लिहिलेला पाठ महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाने इयत्ता ६ वीच्या मराठी बालभारती या विषयात सहाव्या अनुक्रमांकावर समावेशित केलेला आहे. त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन!
माझ्या शाळेत मी इयत्ता सहावीचा वर्गशिक्षक आहे. मराठी विषयाचे अध्यापन करतो. दिनांक २५ ऑगस्ट २०२२ रोजी मी नित्याप्रमाणे अध्यापन करण्यासाठी माझ्या वर्गात प्रवेश केला. सगळी मुलं प्रसन्न चेहऱ्याने बसली होती. आज नवीन धडा शिकायला मिळणार म्हणून उत्साहात होती. साऱ्या वर्गावरून मी एक नजर फिरवली. सगळी मुलं-मुली मराठीचे पुस्तक काढून प्रसन्न मुद्रेने कधी माझ्याकडे पाहत होती तर कधी पुस्तकाकडे पाहत होती. नवीन धडा शिकवायचा म्हणून मी ही लगेचच हर्बटच्या पंचपदीने सुरुवात केली. विद्यार्थ्यांचे पूर्वज्ञान जागृत करावे म्हणून प्रस्तावना केली.
सांगा मुलांनो, " देशाचे संरक्षण कोण करतात?" एक मुखी उत्तर मिळाले," सैनिक!" मी दुसरा प्रश्न विचारला, "तुम्हांला शाळेत पाठवण्याची तयारी घरी कोणाकडून केली जाते?" परत विद्यार्थ्यांनी एक मुखी उत्तर दिले, "आईकडून!" मग मी तिसरा प्रश्न विचारला ,"शाळेत तुम्ही उशिरा आल्यावर शिक्षकांना काय सांगता?" मुलं म्हणाली," सॉरी सर, .....पण आज थोडा उशीर झाला!"
.....तर मग आज आपण पण थोडा उशीर झाला हा सहावा पाठ शिकणार आहोत. असे म्हटल्यावर सर्व मुलांनी सहावा पाठ , पुस्तकाचे पान नंबर २१ काढले. मी फलक लेखन केले. मी तुमचा लेखक परिचय वाचून आपल्याविषयी माहिती दिली. पाठाच्या पहिल्या परिच्छेदाचे प्रकट वाचन करून अर्थ स्पष्टीकरण द्यायला सुरुवात केली.
पाठ संदर्भ: - कारगिल काश्मीर सरहद्दीवरील........ असं हे तिकडचे वर्णन ऐकताना सगळी मुलं भावविभोर झाली. तेथील आल्हाददायक नैसर्गिक वर्णन ऐकताना सगळी मुलं वर्गातच बसून मनाने मात्र कारगिल सिमारेषेवर आणि कश्मीरला पोहोचली. तिथल्या सीमेवरील धगधगत्या तणावपूर्ण वातावरणाचे वर्णन ऐकताना सारे जण टक लावून माझ्याकडे पाहत होती. उन्हाळ्यातील तेथील अल्हाददायक वातावरण व वसुंधरेचे वर्णन ऐकताना सगळ्यांचे चेहरे सुखावत होती.
पाठ संदर्भ:- सैनिकांच्या बटालियनमध्ये पोस्टमन आठ- पंधरा दिवसांनी येत असे. ........ ही ओळ वाचल्यानंतर लगेचच मी खिशातला मोबाईल काढला. आणि youtube वर बॉर्डर चित्रपटातील 'संदेसे आते है' हे व्हिडिओ असलेले गाणे मोबाईलवर लावून मुलांना दाखवू लागलो. सगळी मुलं हास्य मुद्रेने व आनंदाने गाणे ऐकू व पाहू लागले. त्यातील व्हिडिओ पाहून त्यांना खूपच आनंद झाला. गाण्यातील भावार्थ आणि पाठातील आशय समर्पकतेने परफेक्ट जुळला. मुलांमध्ये हळूहळू जिज्ञासा वाढू लागली; की पाठामध्ये पुढे काय असेल ?
पाठ संदर्भ:- बायकोने पाठवलेलं आंतरदेशीय पत्र घेऊन मी बंकरकडे वळलो. पत्रावर तिच्या आसवांच्या सुकलेल्या डागांशिवाय काहीच लिहिलेलं नव्हतं. ...... यावर स्पष्टीकरण देताना मला खूप अवघडल्यासारखे झाले होते. कारण तुम्ही तिथे म्हणता, " पत्रात तर काहीच लिहिलं नव्हतं. परंतु ते बोलकं पत्र मी बराच वेळ वाचत बसलो होतो." या आपल्या वाक्यांनी सगळया विद्यार्थ्यांचे चेहरे अचंबित झाले होते. त्या वाक्यातील भावनांची साद मुलांना समजणे; हे मात्र त्यांच्या भावनिक वलयाच्या सीमारेषापलीकडचे होते. मग मी सैनिक पत्नीच्या मनात आपल्या पतीबद्दल उचंबळून आलेल्या भावना पत्रात व्यक्त करीत असताना तिचे मन दाटून आले आणि डोळ्यात अश्रू धावून आले. म्हणून पुढे काही पत्रात लिहिता आले नाही. पत्नीच्या मनातील घालमेल....तो विरह... असे वर्णन सांगताना बऱ्याच मुला- मुलींच्या डोळ्यात पाणी आले. खिन्न मनाने सगळेजण नाराज झाले. " ......पण तिला देशसेवेची जाणीव होती." असे मी मोठ्याने बोलताच सैनिक पत्नीच्या मनाभोवती घुटमळत असलेली सगळी मुलं भानावर आली.
पाठ संदर्भ:- सुखदेवने गावाकडचा सांगावा सांगितला. "संदीप, तुझ्या आईचं दुखणं वाढलं रे!" हे ऐकताच लेखकाच्या काळजात चर्रर्र झालं. त्यांच्या मनात भीती निर्माण होऊन धडधड सुरू झाली. लेखकाचा जीव घाबरा -घुबरा झाला. मन सैरभैर झालं. नि लेखकाच्या डोळ्यातून अश्रू होऊ लागले. हे असे वर्णन करताना माझ्या वर्गातील सगळी मुलं शांत नि:स्तब्ध होऊन स्पष्टीकरण ऐकत होती.
मी सुद्धा धडा शिकवण्यात रंगून गेलो होतो . एकपात्री अभिनयात घुसलो होतो. कधी लेखक... तर कधी लेखकाचा मित्र... तर कधी लेखकाची आई अशा भूमिकेत पाठातील आशयाचे वर्णन एकपात्रीने सादर करत होतो. पाठातील भावनिक प्रसंग ऐकताना वर्गातील सगळी मुलं -मुली आत्ता मात्र डोळ्याची पापणी देखील न हलवता माझ्या शिकवण्याकडे टक लावून बघत होती. ऐकत होती.
तर.... लेखक सैनिक आईच्या भेटीसाठी बॉर्डरवरून निघाला. तेथून त्याचा गावाकडे येण्याचा प्रवास सुरू झाला. प्रवासातील तगमगता..... बैचेनता..... ती अस्वस्थता.....आईची चिंता ......असं हे सगळं मनावर घेत तो मजल दरमजल करीत आपल्या गावच्या वेशीवर आला . पण अगदी काही थोड्या वेळापूर्वीच आपली आई हे जग सोडून गेली. हे लेखक सैनिकाला माहित नव्हते. गावातून पुढे -पुढे चालत असताना गावात स्मशान शांतता दिसत होती. प्रत्येक जण सैनिकाकडे कावराबावरा होऊन बघत होता. घरासमोर येताच ती लोकांची गर्दी पाहून सैनिकाने काहीतरी विपरीत घडल्याचं ताडलं. नि हातातल्या ट्रंका तिथेच सोडल्या. अन् "आई$$$$$$ म्हणून हंबरडा फोडत धावत घराकडे........ यातील वर्णनाचे नाट्यीकरण करताना मी मुलांचे चेहरे वाचत होतो. न्याहाळत होतो. अक्षरक्ष: मुलांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. 'माझं लेकरू आलं!' "म्हणून मला बोलशील का गं आई ?" ही वाक्ये तुमच्या भावनिक अतिव दु:ख वेदनेने, हावभावयुक्त आणि धीरगंभीर, दु:खी आकांत आवाजात मी बोलून दाखवल्यावर मात्र , इतका वेळ हुंदका आवरून बसलेली मुलं-मुली मात्र हुंदके देत- देत ढसाढसा रडू लागली. मुलं अक्षरक्ष: स्वतःलाच विसरली होती . कसल्याच गोष्टीचे त्यांना भान नव्हते. सर्वजण पूर्णपणे पाठातील नायकाच्या भूमिकेत शिरले होते. जसजसे वर्णन ऐकत होते ; तसतसे त्यांच्या डोळ्यापुढून ते चित्र हळूहळू सरकत होते. बाकावर बसलेल्या मुलांची निच्छलता आपल्या आईच्या भेटीसाठी वेग धरू पाहत होती....
मुलं शरीराने वर्गात बसली होती; पण मनाने मात्र कारगिल-काश्मीर वरून लेखक सैनिकाच्या गावात आली होती . गावातील एखाद्याचे निधन झाल्यावर त्या प्रसंगात गढून गेली होती . मुलांची अशी अवस्था झाली होती की, हातापायाची अजिबात हालचाल होत नव्हती. ती 'आकडी आल्यागत आकडून' गेली होती. सगळी मुलं मूर्ती-पुतळ्यागत बसून वाहणाऱ्या झर्यासारखं फक्त रडत होती. दाटून येणारा आवंढा गळ्यातल्या गळ्यात गिळत होती. ती पुन्हा- पुन्हा रडत होती.
" भेटीसाठी आलो होतो गं आई!.... पण थोडा उशीर झाला!" असे म्हणत लेखक मोठमोठयाने रडू लागली. या वर्णनातील नाट्यीकरणाने अख्या वर्ग हमसून- हमसून ढसाढसा रडू लागला. शिकवता - शिकवता माझ्याही डोळ्यात अश्रू आले.
पाठ संपला. म्हणून दोन मिनिटे मान खाली घालून मी शांत उभा होतो. सगळी मुलं रडत होती. थोड्या वेळानंतर एक मुलगी रडत -रडत मला म्हणाली , "सर, सैनिक येईपर्यंत त्यांची आई जिवंत राहायला पाहिजे होती." मी मात्र निशब्द झालो. थोड्या वेळानंतर एक मुलगा रडत- रडतच माझ्याजवळ आला नि मला म्हणाला, " सर, सैनिकाची आई हे जग सोडून गेली. आपण त्यांच्या आईला श्रद्धांजली वाहू या ना !" मलाही त्याचे म्हणणे पटले. मग मी लगेचच मुलांना धीरगंभीर सुरात हळव्या मनाने सूचना दिली. सर्व मुले २ मिनिटे उभे राहून सैनिकांच्या आईला श्रद्धांजली वाहिली. दोन्ही हात जोडून " ओम शांतीशांतीशांती.... म्हणत बाकावर बसली. पण......पण त्यांच्या डोळ्यातून अश्रू मात्र वाहतच राहिले होते .
माननीय संदीप नाझरे सर,
पाठात सैनिकांच्या मनातील देशप्रेम व आईबद्दलची ओढ यातील भावविभोर करणारा प्रसंग चित्रित करून तुम्ही मुलांमध्ये देशप्रेम आणि आईबद्दलचा आदर द्विगुणित केलात. तशी प्रेमभावना वाढीस लावलात. हा पाठ शिकताना सगळी मुलं हळवी झाली होती. आपल्या पाठाशी समरस झाली होती. ती एकरूप झाली होती. मुलांना शिक्षा केल्यावर ती रडतातच ...पण धडा शिकताना ती ढसाढसा रडतात. हा अध्ययन-अध्यापनातील जीवंत अनुभव मात्र पाठाची उद्दिष्टे साध्य करणारा ठरला. ६ वीच्या मराठी पाठ्यपुस्तकाच्या प्रारंभी पाठ्यपुस्तक मंडळाचे संचालक माननीय च.रा. बोरकर यांनी प्रस्तावनेत व्यक्त केलेले विचार, अनुभव कथन, क्षमता , उद्दिष्टे साध्य होताना मला प्रत्यक्षात अनुभवता आली.
आपली लेखन शैली खुपच सुंदर आहे. मार्मिक आहे. लेखणीच्या माध्यमातून थेट मुलांच्या ह्रदयाला हात घालण्याचे ओघवते कौशल्य खुपच वाखाणण्याजोगे आहे. पाषाण ह्यदयी काळजालाही पाझर फोडण्याची ताकद तुमच्या लेखणीत आहे. मुलांचे भावविश्व तरल व्हावे , ते अनुभवसंपन्न व्हावे. समृद्ध व्हावे. याकरिता तुम्ही केलेल्या लेखनाला मानाचा मुजरा !
आपले मनपूर्वक हार्दिक अभिनंदन💐 आणि आभार ! 🙏🏻
© - दर्शन भंडारे, सहाय्यक शिक्षक ,
प्राथमिक विद्यामंदिर भगिनी समाज , पालघर.
दिं २८ ऑगस्ट २०२२
भ्रमणध्वनी: ८०८७१३७२३६.
~संकलन
~प्रसाद वैद्य
भ्रमणध्वनी -९४२०११२२१५