My YouTube Channel

Click here to visit My YouTube Channel

Wednesday, 9 October 2024

नवरात्रीतील देवींची नावे व त्याला अनुसरून असलेली वनौषधी/ जडीबुटी याचा संबंध बघा जो आपल्या कुणाच्याही माहितीत नसेल.

नवरात्रीतील देवींची नावे व त्याला अनुसरून  असलेली वनौषधी/ जडीबुटी  याचा संबंध बघा जो आपल्या कुणाच्याही माहितीत नसेल. 

संकलन : हेमराज पाटील 


🔱 नऊ दुर्गा म्हणजे नऊ प्रकारच्या आयुर्वेदिक  दिव्यौषधी 


 👉 देवींची नावे आणि औषधे याचे संदर्भासह स्पष्टीकरण..

( संदर्भः मार्तंड पुराण )


 🌹 दुर्गा कवच 🌹


प्रथमं शैलपुत्री च द्वितीयं ब्रह्मचारिणी।

तृतीयं चन्द्रघण्टेति कूष्माण्डेति चतुर्थकम् ।। पंचमं स्कन्दमातेति षष्ठं कात्यायनीतिच।

 सप्तमं कालरात्रीति महागौरीति चाष्टमम् ।। नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गा: प्रकीर्तिता:।

उक्तान्येतानि नामानि ब्रह्मणैव महात्मना ।।



हे दुर्गा कवच ब्रह्मदेवाने मार्कंडेय ऋषींना दिलेले होते.मार्कंडेय ॠषी  वैद्यकीय उपचार पद्धतीत ज्या ९ औषधी वनस्पतींना उत्तम स्थान आहे त्या ९ वनस्पतींची नावे या दुर्गा कवचातून आपल्याला पहायला मिळतील ती अशी       

         👇

 👣 प्रथम नवदुर्गा : शैलपुत्री म्हणजे हिरडा.  

हिरडा/हरडा ही एक दिव्य औषधी वनस्पती आहे.

पर्यावरण जनजागरणाचा नक्षत्रवनाच्या दृष्टीने विचार केल्यास कुंभ राशीच्या पूर्वा भाद्रपदा नक्षत्राचा पर्यायी वृक्ष हिरडा आहे.   


नास्ति यस्य गृहे माता तस्य माता हरीतकी ।। 


असे हिरड्याचे महत्त्व आहे.

 हे झाड ५० ते ७५ फुटांपर्यंत वाढते. समुद्रस पाटीपासून पंधराशे मीटर उंचीपर्यंत व दाट वनातील महाबळेश्वर, कोयना तसेच मध्य प्रदेशातील नदीचा किनारा अशा प्रकारच्या ठिकाणी चांगल्या निचरा होणाऱ्या जमिनीत, भरपूर सूर्यप्रकाश मिळणाऱ्या ठिकाणी ४६ सेंटीग्रेड पर्यंतच्या तापमानाच्या प्रदेशात हा वृक्ष चांगला वाढतो. तसेच पाण्याचा ताण असेल तरी हा वृक्ष सहन करू शकतो.

या झाडाची जुनी पाने डिसेंबर ते मार्च काळात गळून पडतात व नवीन पालवी तांबूस रंगाची लव असलेली येते. पाने ७.६ ते १७.८ सेंटीमीटर लांबीची व ३.८ ते ८.९ सेंटीमीटर रुंदीची असतात.हिरड्याची  फुले मार्च-एप्रिलमध्ये येतात. ही उग्र वासाची पांढरी पिवळी असतात.

औषधी म्हणून हिरड्याची फळे उपयुक्त असून नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीत येतात. फळे साधारण २.५ ते ३.३३ सें.मीटर लांब व ३.८ ते ८.९ सें.मिटर रुंदीची मध्यभागी फुगीर व ५ शिरा स्पष्ट दिसणारी  पिवळट तपकिरी रंगाची गोलसर असतात.


 हिरड्याचे प्रमुख तीन प्रकार आहेत 👇

१) हिरड्याचे फळ पक्व होण्यापूर्वी म्हणजेच त्यात बी निर्माण होण्यापूर्वी काही फळे झाडावरून पडतात त्याला बाळहिरडा असे म्हणतात 

२) हिरड्याचे फळ जे मोठे होते पण अपरिपक्व अवस्थेत वाढलेले असते त्याला चांभारी हिरडा असे म्हणतात. यामध्ये टॅनीन असते. याचा उपयोग कातडी रंगवण्यासाठी होतो 

३) जे फळ पूर्ण परिपक्व होते त्याला सुरवारी हिरडा म्हणतात. हे पाण्यात टाकले कि बुडते. वजनाला २० ग्रॅमपर्यंत असते. हे औषधी फळ होय.


हिरड्याचा आकार व रंग यावरून हिरड्याच्या अजून सात जाती आहेत.


 विजया : या जातीची फळे तुंबडी सारखी गोल असतात व सर्व प्रकारच्या रोगावर उत्तम असतात. 

 पूतना : जातीचा हिरडा मोठा व पातळ असून तो लेप देण्यासाठी वापरतात.

 अमृता : यातील बी बारीक,मांसल व भरलेली, रेचन देण्यास उपयुक्त असते.

 रोहिणी : हे साधारण गोल फळ व्रणरोपक म्हणून वापरतात.

 अभया : या हिरड्यावर ठळक पाच उभ्या रेषा असतात. हा हिरडा नेत्र रोगावर वापरतात. 

 जीवंती : याचा रंग सोन्यासारखा पिवळा असतो व सर्व रोगावर उपयुक्त असतो.

 चेतकी : याला पाच धारा असतात व चूर्ण करण्यास उपयुक्त असून हा हिरडा भाजून खातात.

हिरड्याचे औषधी म्हणून दात, हिरड्या, प्लिहा, खोकला ,आवाज बसणे, उचकी ,श्वासनलिका , गर्भाशयासाठी बलदायी तसेच पचनसंस्थेत रेचक असे गुणधर्म आहेत. गर्भवती स्त्रीने हिरडा खाऊ नये. त्रिफळा चूर्ण  हे उपयुक्त औषध बनवण्या साठी ३ भाग हिरडा, ७ भाग बेहडा व १२आवळा  असे प्रमाण असते. हिरड्याच्या फुलांपासून उत्तम मध मिळतो. यामुळे या झाडावर मधमाशांचे प्रमाण खूप असते जे पर्यावरण रक्षणासाठी फारच उपकारक असते.


👣 द्वितीय नवदुर्गा : ब्रह्मचारिणी या नावाने ओळखली जाते. ब्रह्मचारिणी म्हणजेच ब्राह्मी  वनस्पती-

स्मरणशक्ती वाढविणारी ही वनस्पती असल्यामुळे हिला सरस्वती असेही म्हणतात. ब्राह्मीचे तेल प्रसिद्ध आहे. यामुळे शांत झोप लागते व केसांची वाढ उत्तम होते. अर्थातच शांत झोपेमुळे आपले आयुर्मान वाढते.  स्मरणशक्ती वाढते. ब्राह्मी रक्तदोषनाशक, स्वरयंत्राला पोषक असून पचनसंस्था व उत्सर्जन संस्था आरोग्य दायी बनविते. 


 👣 तिसरी नवदुर्गा : चंद्रघंटा म्हणजेच चंद्रशूर, हालीम, चमसूर, - 

हालीम ही शरीरास पोषक अशी अत्यंत दिव्य औषधी असून विटामिन सी, ए, इ, प्रोटीन्स,लोह,फायबर देणारी वनस्पती आहे. पालेभाजी म्हणूनही हिची ओळख आहे. ॲनिमिया, हिमोग्लोबिन, सांधेदुखी, हृदय विकार, रक्तशुद्धी, महिलांच्या मासिक पाळीचे विकार, स्त्रीचे अंगावरील दूध वाढविणे, प्रतिकार शक्ती वाढविणे, अशा विविध गुणधर्मांनियुक्त अशी ही पालेभाजी आहे. जी पौष्टिक, कफनाशक, बलवृद्धी करणारी आहे. ही वनस्पती लठ्ठपणा कमी करते, म्हणून हिला चर्महंती असेही म्हणतात. या वनस्पती च्या बिजास हलीम असे म्हणतात. याचे लाडू बाळंतिणीला देतात. आजारी व्यक्तीला ही दिले जातात.


 👣 चौथी नवदुर्गा : कुष्मांडा :  कोहळा या वनस्पतीचे संस्कृत  नाव कुष्मांडा असे आहे 

 पेठा नावाची मिठाई कोहळ्यापासून करतात. निरोगी आरोग्यासाठी पचन संस्था सक्षम असणे गरजेचे असते. कोहळा आतड्यांस बळ देतो. आतड्यातील अन्नरस शोषून त्याचे रक्तांत रूपांतर होते. या प्रक्रियेत  कोहळ्याची महत्त्वाची भूमिका असते. वीर्यवृद्धी, रक्तशुद्धी, मनोबल वाढवण्यासाठी कोहळा उपकारक आहे. कप, पित्त, वात यांचे संतुलन करणारे कुष्मांडा अर्थात कोहळा हे फळ भोपळ्याच्या आकाराचे असते. याचा रस नियमित घेतल्यास वरील सर्व फायदे मिळतात.


 👣 पाचवी नवदुर्गा : स्कंदमाता. म्हणजेच अळशी / जवस  वनस्पती 

अळशी अर्थात जवस ही वनस्पती महिलांच्या सर्व आजारांवर अत्यंत उपयुक्त अशी दिव्यौषधी आहे. यामध्ये ओमेगा ३, ओमेगा ६, प्रोटीन्स, विटामिन सी, इ, के, बी-कॉम्प्लेक्स, कॉपर, झिंक, मॅंगनीज, मॅंगनेजीयम फॉस्फरस, आयर्न असे अनेक घटक द्रव्य असून यामुळे आपल्या शरीराचे वात, पित्त, कफ संतुलित होतात.

विशेष करून महिलांचे सर्व प्रकारचे विकार उदा. गर्भाशयातील गाठी, मासिक पाळीच्या समस्या, सांधेदुखी, पीसीओडी, चेहऱ्यावरील केस, सुरकुत्या, अशा व्याधींचा नाश जवस/ अळशी करते. अळशीमुळे एंड्रोजन हार्मोन्स कमी होतात. आळशी अँटिऑक्सिडंट, ऍंटीकॅन्सर आहे. नियमितपणे अळशी खाल्ल्यास वरील सर्व विकार नाहीसे होतात.


👣 सहावी नवदुर्गा : कात्यायनी  म्हणजे अंबाडी पालेभाजी - 

अंबाडीची पालेभाजी रक्तदाब नियंत्रित करते. शरीरातील चरबी कमी करते. लो कॅलरीज डायट म्हणून ही भाजी उपयुक्त आहे. यामध्ये विटामिन ई, लोह, झिंक हे डोळ्यांसाठी उपयुक्त असे घटक या मध्ये असतात.भरपूर कॅल्शियम असते त्यामुळे हाडे मजबूत होतात. ऑस्टीओपोरोसीसचा आजार होत नाही. अंबाडीची भाजी डियूरॅटीक द्रव्यांनी युक्त असते त्यामुळे लघवीची जळजळ, उन्हाळे लागणे यांवर उपकारी. 

तथापि अंबाडीची भाजी ऑक्सेलिक ऍसिडयुक्त असल्यामुळे मुतखडा असणाऱ्यांनी, ऍसिडीटीचा त्रास असणाऱ्यांनी ही भाजी खाऊ नये.

.पित्त, कफाचे तसेच गळ्याचे आजारांवर अंबाडीची भाजी उपयुक्त .


👣 सातवी नवदुर्गा : काळरात्री म्हणजेच नागदवणी वनस्पती- 


ही वनस्पती सर्वत्र आढळते. ही अत्यंत थंड वनस्पती आहे. शरीरांतर्गत रक्तस्त्राव, बवासीर, मुळव्याध सारख्या विकारात या झाडाची पाने काळ्यामिरी सोबत खाल्याने रक्तस्त्राव थांबतो. शरीरावर आलेली सूज, अल्सर, आतड्यांचे विकारांवर गुणकारी. लघवीला होणारा त्रास, जळजळ, मुत्र विरोध अशा विकारात गुणकारी. या वनस्पतीची लागवड घराच्या सभोवती केल्यास  सकारात्मक ऊर्जा मिळते.  पानांचा चिक (दुध)  विषनाशक आहे.


 👣 आठवी नवदुर्गा : महागौरी म्हणजेच तुळस 

तुळशीचे धार्मिक आणि पर्यावरण विषयक महात्म्य आपणा सर्वांनाच परिचित आहे. घरामध्ये सातत्याने सकारात्मक उर्जेची निर्मिती व वातावरण शुद्धी करण्याचे काम तुळस करते. तुळस अँटीकॅन्सर आहे. विटामिन सी, झिंक, अँटिबॅक्टेरियल, अँटिव्हायरस,मुत्रवर्धक, अशा विविध गुणांनी युक्त अशी तुळस दिव्यौषधी आहे. शरिरातील वाढलेल्या युरिक ऍसिड वर तुळशीचा रस गुणकारी असतो. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी तुळशीचा काढा प्यावा. सर्दी, पडसे, ताप, त्वचारोग, केसांची गळती, मानसिक आरोग्य अशा सर्व विकारांवर तुळस अत्यंत गुणकारी आहे. रक्तवृद्धी, बलवृद्धी, हृदयाची मजबुती, मज्जा संस्था, स्मरणशक्ती अशा सर्वच बाबतीत तुळस अत्यंत गुणकारी आहे. 

 तुळशीचे विविध प्रकार आहेत तथापि सर्वच प्रकारची तुळस ही औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असते.


👣 नववी नवदुर्गा : सिद्धिदात्री ; शतावरी वनस्पती - 

शतावरी वनस्पती ही दिव्य औषधी आहे. शतावरी या शब्दातच शतावरी चे गुणविशेष आहेत. म्हणजे शेकडो फायदे ज्या वनस्पतीमध्ये आहेत अशी वनस्पती म्हणजे शतावरी !

विशेषतः महिलांच्या बालपणापासून वृद्धावस्थे पर्यंत सर्व विकारांवर शतावरी वरदान आहे.

 शतावरीच्या नियमित सेवनामुळे स्मरणशक्ती वाढते. शतावरी हॅप्पी हार्मोन्स तयार करते, ज्यामुळे चिडचिडेपणा व ताणतणाव दूर होतात. रक्ताभिसरण, दृष्टीदोष, हृदयाची मजबुती, श्वसनाचे विकार, दमा, पचनसंस्था, आतड्यातील कृमींचा नाश, भूक वाढविणे, खाल्लेल्या अन्नाचे रक्तात रूपांतर करणे, बद्धकोष्ठता, अतिसार, बवासीर, मुळव्याध, वजन कमी होणे, चरबी कमी करणे, मधुमेह, कोरडी त्वचा सतेज बनवणे, शरीरावरील फोड, मुरमे यांचा नाश करणे असे असंख्य फायदे शतावरीच्या सेवनाने होतात. अर्थात शतावरी हे शरीराचे कफ, पित्त, वात यांचे संतुलन करून आपली प्रतिकारशक्ती वाढवून बलशाली, वीर्यवान, सुडौल, निरोगी, चिरतारूण असे आरोग्य प्रदान करते. हृदयाला बळ देते.

नवरात्रीचा सण साजरा करीत असताना आपण मार्तंड पुराणातील या दुर्गा कवचाचा सखोल अभ्यास केला की आपल्याला समजते की कोणत्या वनस्पतींमध्ये कोणत्या देवीचा वास आहे. या वनस्पतींची लागवड, संवर्धन, तसेच त्याचा योग्य वापर स्वतःसाठी आणि समाजासाठी करून देणे, वनस्पतीचे औषधी गुणधर्म समाजापर्यंत पोहोचविणे आणि त्यातून निरोगी, बलशाली सदविचारी, समाज निर्मिती करणे यालाच पूजन म्हणावयाचे.


हा संस्कार/ संदेश धार्मिक विधीतून देण्याचा सण म्हणजे नवरात्रौत्सव !! निसर्गाने आपल्याला भरपूर काही फुकट दिलेले आहे,आणि संस्कृतीने प्रत्येक वृक्षवेलीला देवत्व दिलेले आहे. या सर्व गोष्टींचा फायदा आपण आपले जीवन सुखी आणि आनंदी बनविण्यासाठी करू यात का ? 

धन्यवाद !

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

Monday, 7 October 2024

परंपरा

 परंपरा

दि. ७ ऑक्टोबर २०२४

कालचा दिवस अत्यंत आनंदाचा आणि समाधानाचा होता.

लहानपणापासून त्यांना पहात आलो, ज्यांच्याकडून थोडेसेच शिकलो, अशा मा. श्री. मयूर सरांना विद्यापीठात निमंत्रित करणे, हे स्वप्न काल पूर्ण झाले. आपले बालपण आणि वर्तमान यामधले धागे जितके मजबूत तितकाच आनंद जास्त असतो. कलाविश्वातील अनेकांना जवळून पाहील्यावर तर मयूर सरांचा मोठेपणा अधिकच कळायला लागला. "माझे सादरीकरण म्हणजे माझे विद्यार्थी" ही भावना फारच दुर्मिळ. सरांच्या त्यांच्या विद्यार्थ्यांसह निमंत्रित करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आरोग्यशास्त्र व ललित कला केन्द्राच्या सहकारी प्राध्यापक व संशोधक सहकारी यांनीच ही कल्पना प्रत्यक्षात आणली. 

मयूर सरांसह सुमारे 30 विद्यार्थी चोपड्याहून येथे येणे, त्यांचा दिवसभर कार्यक्रम निश्चित करणे, उत्कृष्ट अशा सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करणे याकरिता नियोजनाचा कस लागलाच, पण खूप मजाही आली. सर्वात कठीण काम होते ते कलाकारांच्या तयारीचे. दोन आठवड्यात मयूर सरांच्या कठीण परीक्षेस उतरण्यासाठी विद्यार्थी कलाकारांनी खूपच परीश्रम घेतले. इतक्या लांब आपल्या मुलांना दोन तासांच्या कार्यक्रमाकरिता पाठवणे ही पालकांची सुध्दा कठीण परीक्षाच होती. त्यांचेही परीश्रम, निश्चय आणि विश्वास यासाठी खूप महत्त्वाचे होते. कलाकारांच्या मागचे हे खरे आधार! 

सादरीकरणाच्या प्रत्यक्ष दिवशी रात्रभर प्रवास करून आलेल्या चमूला दिवसभर व्यस्त कार्यक्रमाची उत्सुकता होती. विद्यापीठाच्या निसर्गरम्य परिसराचा परिचय "वारसा सहलीच्या" माध्यमातून त्यांना करून देण्यात आला. मुख्य इमारतीचा १६० वर्षांच्या इतिहासाचे दृश्यच या सहलीने उभे केले. यातील विद्यार्थी मात्र आपापल्या वेळेत सरांच्या समोर रियाझ करून या कार्यक्रमात सहभागी होत होती. मयूर सरांना अनेकांनी निमंत्रण देऊनही ते केवळ कार्यक्रमाच्या ध्यासाने पूर्ण दिवस कार्यरत होते. रात्रभर झालेले जागरण व श्रम विसरून सर या वयात पूर्ण दिवस आपल्या विद्यार्थ्यांची तयारी करून घेत होते. 

विद्यापीठाच्या आकाशवाणी केंद्राने विशेष मुलाखत घेतली. 

प्रत्यक्ष कार्यक्रमात विद्यापीठाच्या मा. कुलगुरूंनी मयूर सरांच्या तपस्वी कारकिर्दीचा सन्मान केला. 

नवरस या संकल्पनेवर आधारित विविधांगी सादरीकरणात गायन व वादनाची मेजवानीच मिळाली. माध्यमिक शाळा व अकरावी बारावीत असणारी मुलं ज्या तयारीने सादरीकरण करीत होती, त्यावरून काय आणि कसे शिकविले असेल याचा अंदाज येत होता. सरांच्या निवेदनात संस्कृत सुभाषिते ते उर्दू शायरी पर्यंत नवरसांची समृध्दी होती. विविध राग, स्वर, ताल व लयीचा हा जणू छोटासा अभ्यासक्रमच होता. भजन ते कव्वाली, गवळण ते प्रेमगीत अशा भावभावनांचे इंद्रधनूच नामदेव सभागृहात साकारले होते. 

"तबला बिना नही, बोलना चाहीए" म्हणजे काय ते श्रोत्यांना अनुभवायला मिळाले. पेटीच्या सुरावटीत जणू गाता गळा अवतरला होता. आणि हे सर्व साकारले होते, ते इयत्ता पाचवी ते बाराव्या यत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थी कलाकारांनी! उच्च शिक्षणाची व्याख्याच या मुलांच्या कठोर रियाज आणि कल्पक कलागुणांनी बदलून टाकली होती. एकातून एक चढत्या क्रमाने रंगत जाणारी ही मैफिल संपूर्ण नये असे वाटत असतानाच "सजल नयन नितधार बरसती" या भैरवीने जेव्हा या कार्यक्रमाची सांगता झाली, तेव्हा 

त्या जळी मिसळलेले भावगंध अंतर्मनात खोलवर झिरपले. समाधान, संतृप्ती पण त्यातही अनामिक हुरहुर आणि पुढील अशाच एका अनुभवाची आतुरता हीच अनुभूती सर्वजण घेत होते. या  भाव शिखराचा पाया होता, सहा दशकांची अविरत तपश्चर्या व निरपेक्ष भावनेने केलेली स्वरसाधना! 

शाबासकी स्वीकारत असलेल्या बालकांचे फुललेले चेहरे हाच जणू त्या संगीत शिक्षकाचा सर्वोच्च सन्मान होता. हा सन्मान स्वीकारतानाच त्या गुरूच्या मनात पुढील धड्यांचा आराखडा तयार होत होता. कदाचित त्या शिष्यांपैकी कुणीतरी घेणारा, आता  'देणारा' होणार होता!

~गिरीश टिल्लू 


~संकलन 

प्रसाद वैद्य

Friday, 13 September 2024

आपल्याला जर देव भेटले तर...

आपल्याला जर देव भेटले तर...

काल रात्री झोपताना मला एक प्रश्न पडला की आपल्याला जर देव भेटले तर? 

तस तर देव कायम आपल्यासोबत असतातच ,पण जर प्रत्येक्षात आपल्या समोर आले तर काय? आपण काय बोलणार त्यांच्याशी ते काय बोलतील आपल्याशी , आपण फक्त आपले problem आणि दुःख त्यांना सांगणार का ?की त्यांनी कायम आपल्यावर आशीर्वाद ठेवला हे बोलणार. 

आणि जर ते आपल्याला भेटले तर नक्की ते कसे दिसतात आपण त्यांना ओळखणार कस? 

खरचं हा प्रश्न आपल्या सर्वांना पडला असेलच. प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करत असतो हा प्रश्न सोडवण्याचा आणि करायला सुध्दा हवे. 

पण जर मला विचारलं की तुला देव भेटले तर तू काय बोलशील? तर मी हे नक्की सांगेन की देवा तू मला दिलेला रस्ता खडतर जरी आहे पण तूच आहेस जो मला शक्ती देतो आहेस ते support देत आहेस. 

आणि मी आभारी आहे की माझा प्रवास हा माझाच आहे तो कठीण जरी असेल तरी तुझ्या रुपात अनेक जण माझ्या सोबत आहेत जे कायम मला प्रेम देतात आणि विश्वास ठेवून मला प्रोत्साहित करत आहेत व माझ्या पाठीशी खंबीर पणे उभे आहेत. 

आणि जर तूम्ही विचारलं की ते सर्व लोक कोण आहेत तर मी सांगतो ते आहेत तुम्ही सर्वे जण,खरचं तुम्ही सर्वे जण जर माझ्या सोबत नसता तर खरचं मी आता काय करत असतो हेच मला माहिती नाही. मी कधी बोललो नाही पण खरचं सर्वांना मना पासून खुप खूप thank you

 💕 आणि मला माहिती आहे की मला अजून खूप काही करायचं आहे आणि मला हे ही माहिती आहे की तूम्ही कायम माझ्या सोबत राहाल. पण वाटल की थोड मन व्यक्त करावं. आणि माझ्यासाठी आपण सर्वेच देव आहात 🙏.बाकी अझून मी खूप लहान आहे. पण खरंच love you all !!

~दुर्गेश शुक्ल


~संकलन

Wednesday, 4 September 2024

○■ In The Recess ■○

○■ In The Recess ■○

I was on the ground. Aarushi, Tanmayi (Std.10th) met me. They returned me books they had borrowed from me. We were talking about reading.
Aarushi gave me one more book and said, "Do read this book. I have read this. It's very nice." Then she told me list of English books she had read.
I felt extremely happy that she read English books.
And while sharing her experience of reading she said," One day I will definitely write a book and put your name in my life story as 'one who always motivated me.' Keep your blessings😊 ."
She was so confident I don't have words to express that. I just said, "I am sure.You will certainly do that. It will be the happiest day for all of us."
Aarushi, Happy READING and Happy WRITING as well.

Friday, 2 August 2024

कुणी चितेजवळ रडत होतं, कुणी राख छातीशी घेत होतं : टिळक गेले त्या वेळची गोष्ट...

 कुणी चितेजवळ रडत होतं, कुणी राख छातीशी घेत होतं : टिळक गेले त्या वेळची गोष्ट...


"आई, या पावसाला आणि गर्दीला घाबरू नकोस! अगं, टिळकांकरिता खुद्द देवसुद्धा रडत आहेत. मा! लुक हिअर, इव्हन गॉड इज वीपिंग फॉर मिस्टर टिलक!"

लेखक : पार्थ बावस्कर

"हजारो लोक मुंबईच्या सरदारगृहापुढे रस्त्यावर उभे होते. अखेर मध्यरात्र उलटली. १२ वाजून गेले. १ ऑगस्ट १९२०चा दिवस सुरु झाला आणि थोड्या वेळानेच लोकमान्यांचे देहावसान झाल्याची बातमी कोणीतरी लोकांना सांगितली. त्या क्षणी त्या प्रचंड जनसमुदायाच्या तोंडून शोकाचे आणि दुःखाचे विदारक उद्गार बाहेर पडले. त्याचे स्मरण झाले की, अजूनही अंगावर कंप उठतो. काही लोक तर धाय मोकलून रडले. ज्यांचे डोळे पाण्याने भरुन आले नाहीत, असा एकही माणूस त्या जनसमुदायात आढळला नसता. लोकमान्यांच्या मृत्यूची बातमी एखाद्या वाऱ्याप्रमाणे मुंबई शहरात ताबडतोब पसरली, मग रात्री झोप कोणाला येणार? लोकमान्यांची आठवण करून सारी मुंबईनगरी त्या रात्री अक्षरशः ढळाढळा रडली, असे म्हटले तर त्यात एका शब्दाचीही अतिशयोक्ती होऊ नये."

टिळक गेल्यानंतरचे हे उद्गार आहेत आचार्य अत्रेचे!

ते स्वतः त्या गर्दीचा एक भाग होते.

टिळक गेल्याचे समजले आणि गर्दी आणखीन वाढली.

त्याच रात्री मुंबईत गडकऱ्यांच्या 'भावबंधन' नाटकाचा प्रयोग सुरु होता. बाराशे रुपयांची तिकीट विक्री होऊन

प्रयोग हाऊसफुल्ल झालेला. चौथा अंक सुरू झाला आणि आत काहीशी गडबड ऐकू आली. मंचावर घनश्यामच्या भूमिकेतले चिंतामणराव कोल्हटकर थांबले. तेवढ्यात तात्यासाहेब परांजपेंनी विंगेत येऊन टिळक गेल्याची वार्ता सगळ्या जनसमुदायाला सांगितली.

खेळ आपसूकच बंद झाला. ज्यांना तिकिटाचे पैसे परत हवे, त्यांना ते मिळतील, अशी सूचना देण्यात आली आणि पैसे परत करण्यासाठी एक माणूस तिकीटबारीवर जाऊन थांबला.

पण, पैसे मागायला कुणी येईचना, सुमारे हजाराचा तो रसिकवर्ग एकाएकी उठला सरदारगृहाच्या दिशेने टिळकांना अखेरचे बघण्यासाठी निघाला. टाचणी पडली तरी भलामोठा आवाज यावा, असा सन्नाटा थिएटरभर पसरला होता.

या प्रसंगाचे साक्षी असलेले चिंतामणराव कोल्हटकर लिहितात,

"पायांचे आवाजसुद्धा ऐकू येऊ नयेत इतक्या शांततेत लोक बाहेर पडले. जमिनीला कान लावून ऐकणाऱ्यालासुद्धा ऐकू आले असते ते फक्त दुःखाचे निश्वास आणि रडण्याचे उसासे!"

रडण्याचे कढ हळूहळू वाढतच चालले होते. लोकमान्यांचे दर्शन घेण्यासाठी सरदारगृहाचे दार तोडण्यापर्यंत गर्दीची मजल गेली होती. शेवटी लोकांच्या दर्शनार्थ पहिल्या मजल्याच्या बाल्कनीत टिळकांचा देह आणून ठेवला, हा प्रसंग जसाच्या तसा लिहून ठेवणारे पुंडलिकजी तिथे उपस्थित होते.

ते सांगतात,

"प्रत्येक माणूस धडपडत टिळकांच्या दर्शनाला येई. टिळकांना बघितल्यावर त्याला भडभडून येत असे. एक माणूस म्हणाला, एका माणसाने त्या शवापुढे येताच आपल्या तोंडावर हातच मारून घेतला. एक म्हातारा मनुष्य म्हणाला, बाबा आता हिंदुस्थानला इंग्रजांच्या तावडीतून कोण सोडवणार रे?"

असे म्हणून मोठ्याने किंकाळी फोडून तो रडूच लागला.

"श्री शिवाजी महाराजांचा मृत्यू, राजारामाचे अकाली मरण, पानिपतचा रणसंग्राम, नारायणराव पेशव्यांचा वध, सवाई माधवरावांची आत्महत्या अथवा नाना फडणवीस यांचा स्वर्गवास, या महाराष्ट्राच्या इतिहासातील ज्या भयंकर विपत्ती, त्यांच्याहून अणूमात्रही कमी नसलेली भयंकर वेळ आज महाराष्ट्रावर आलेली असून, तिने महाराष्ट्रातून आज बाळ गंगाधर टिळक यांना ओढून नेलेले आहे," अशा शब्दांत या महानिर्वाणाचे वर्णन केले अच्युत बळवंत कोल्हटकरांनी।

टिळकांच्या पुण्यात ही बातमी समजली आणि पुणेकरांची मनेच हादरली. रडू आवरत कसेबसे लोक मुंबईला जायला निघाले. नेहमीच्या दोन रेल्वे कमी पडल्या. सरकारला ज्यादा गाड्यांची व्यवस्था करावी लागली.

टिळकांचे अंत्यसंस्कार पुण्यात व्हावे, अशी केळकरांची आणि सगळ्या पुणेकरांची इच्छा होती; इच्छा कसली त्यांचा हट्टच होता, नव्हे नव्हे हक्कही होता त्यांचा. कारण, पुणे ही टिळकांची कर्मभूमी! पण, मुंबईकरही हट्टाला पेटले होते. त्यांचेही म्हणणे बरोबरच होते, टिळकांची कर्मभूमी पुणे असली तरी ते आता एकट्या पुण्याचे राहिले नसून अवघ्या महाराष्ट्राचे 'लोकमान्य' झालेले होते.

तात्यासाहेब केळकर निघाले. पुण्याला आले. त्यांना

केसरी'चा पुढचा अंक काढण्याची खटपट करावी लागणार होती. याच 'केसरी'च्या आधीच्या अंकातून लोकांना सांगण्यात आले होते, लोकमान्यांची प्रकृती मलेरियाच्या तापाने थोडी बिघडली आहे, पण काळजी करण्याचं काही कारण नाही. लोकमान्य लवकरच ठणठणीत होतील..

आधीच्या अंकात ही बातमी वाचणाऱ्या वाचकांना हे कुठे

माहिती होतं की, पुढच्या 'केसरी'च्या अंकात टिळकांच्या

मृत्यूची काळीज करपून सोडणारी बातमी आपल्याला

वाचावी लागणार म्हणून! 'केसरी'चा हा अंक महाराष्ट्रातल्या घराघराला एक अकल्पित वज्राघातच वाटला.

ही बातमी अंदमानात सावरकरांना समजली त्यांनी आणि अंदमानातल्या सगळ्याच्या कैद्यांनी एक दिवस अन्नपाणी घेतले नाही. टिळकांना आदरांजली म्हणून उपवास पाळला.

आणि इकडे मुंबईत, अफाट लोकसमुदायाबरोबर टिळकांची महानिर्वाणयात्रा दुपारी दीड वाजता सुरु झाली. दोन लाखांच्यावर लोकांची गर्दी यापूर्वी एखाद्या

अंत्ययात्रेला कधीही झालेली नव्हती. स्त्रिया, पुरुष, म्हातारे, हजारो गिरणी कामगार, हिंदू, मुसलमान, ख्रिस्ती, पारशी, जैन, हरेक भारतीय टिळकांचा जयजयकार करत चालला होता.

आकाशाची शिवण उसवावी, आभाळ फाटावे असा पाऊस त्यादिवशी पडत होता. टिळकांच्या चितेला अग्नी दिलाच जाऊ नये, अशी त्या वरुणाचीही इच्छा असावी बहुतेक. त्या पावसाच्या घनगंभीर अशा मेघगर्जनेपेक्षा टिळकांच्या महानिर्वाणयात्रेतील लोकगर्जना अवघा महाराष्ट्र हलवून सोडत होती, ती गर्जना होती, 'टिळक महाराज की जय!' लोक घराच्या खिडकीतून अंत्ययात्रा पाहत होते. टिळकांना अखेरचा नमस्कार करत होते. घराच्या गच्चीवरून पुष्पवृष्टी होत होती. माणसांच्या गर्दीत मुंगीलाही उभे राहता येत नव्हते. खापर्डे, गांधी हेही लोकांच्या जथ्थ्यात हेलकावे खात इकडून तिकडे ढकलले जात होते.

या महानिर्वाणयात्रेत ३५-४० वर्षांचा एक ख्रिस्ती तरुण साठीच्या पलीकडे झुकलेल्या आपल्या म्हाताऱ्या आईला घेऊन तेथे आला होता. लोकमान्यांच्या अखेरच्या 

दर्शनासाठी ती ख्रिस्ती म्हातारी हेलकावे खात होती. तिचा जर्जर देह इकडून तिकडे फेकला जातो की काय, अशी अवस्था होती. हे पाहून तिचा मुलगा म्हणाला,

"आई, या पावसाला आणि गर्दीला घाबरू नकोस! अगं, टिळकांकरिता खुद्द देवसुद्धा रडत आहेत. मा! लुक हिअर, इव्हन गॉड इज वीपिंग फॉर मिस्टर टिलक!"

धुवाँधार बरसणाऱ्या पावसामुळे लोक ओलेचिंब झाले होते. रस्त्यावर चिखल झाला होता. माणसांची पांढरी धोतरे चिखलाने माखून काळीठिक्कर पडली होती. मुंबईच्या पारशी व्यापाऱ्यांनी विशेष व्यवस्था म्हणून चंदनाची चिता तयार केली होती. त्यावर टिळकांचे कलेवर ठेवण्यात आले, तोच त्या समुद्रकिनाऱ्यावरील लोकसागराला अचानक भरती आली. साखळ्या तोडून लोक टिळकांच्या चितेकडे धावत सुटले.

लोकमान्यांना अग्निडाग दिला आणि एका मुसलमान तरुणाचा धीरच सुटला. लोकमान्य गेले, आता आपण तरी जगून काय करायचे, असे म्हणून त्याने हंबरडा फोडला आणि त्याने चितेमध्ये उडीच घेतली. तो होरपळला गडगडत बाहेर फेकला गेला. त्याला दवाखान्यात नेले, पण काही दिवसांनी तोही लोकमान्यांच्याच वाटेवर निघून गेला.

संध्याकाळचे ७ वाजले तरीही त्याची शुद्ध कुणाला नव्हती. टिळकांच्या महानिर्वाणाचे हे दृश्य 'याचि डोळा'

अनुभवणारे नाना कुलकर्णी लिहितात, "आम्ही त्या रात्री १० वाजल्यापासून ते दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत पायावर उभेच होतो. अखेर शेवटचा घाला झाला. मन सुन्न झाले. हृदयात काय होत होते, हे सांगताही येईना. पावसाच्या धारा कोणत्या आणि अश्रूच्या धारा कोणत्या, हे समजेना, अग्निसंस्कार झाला, पण चौपाटीवरून पायच निघेना."

जगभरातल्या अनेक वर्तमानपत्रांनी टिळकांना आदरांजली अर्पण केली. मृत्युलेख लिहिले, पण अच्युत बळवंत कोल्हटकर यांनी लिहिलेला अग्रलेख त्यातला सर्वोत्तम. खरे तर टिळक जाण्यापूर्वी त्यांचे आणि टिळकांचे भांडण होते, तरीही टिळकांबद्दल असलेले अपार प्रेम संदेशकारांना अस्वस्थ करत होते. त्यांच्या लेखणीला शब्दांचा महापूर आला होता. या महापुरात ते फक्त टिळकांना शोधत होते आणि म्हणत होते,

"लोकमान्य, तुम्हाला आता कुठे पाहू? तुमची सावळी मूर्ती कुठे अवलोकन करू? तुम्हाला कुठे शोधू? तुम्हाला कुठे धुंडाळू? आमचा जीव तुमच्या जीवाशी गोठलेला होता. आमचा प्राण तुमच्या पंचप्राणांचा भाग होता. आमचे अस्तित्व तुमच्या अस्तित्वात गुरफटून गेले होते. आमचे जीवन तुमच्या जीवनात गुंतलेले होते. लोकमान्य! आता तुम्ही आम्हाला कुठे सापडाल? कुठे दिसाल? तुम्ही जात असताना आमच्या जीवनाला ओढणी लागलेली आहे. आमच्या प्राणांना क्लेष पडत आहेत. काट्याच्या जाळ्यावरून ज्याप्रमाणे रेशमी वस्त्राला फराफरा ओढावे, त्याप्रमाणे आमच्या हृदयाच्या चिरफाळ्या झालेल्या आहेत. लोकमान्य, आमचे प्राण तुमच्या स्वाधीन ! आमचे मन तुमच्या स्वाधीन ! आमचे जीवन तुमच्या स्वाधीन! 

लोकमान्य, आम्ही, तुमचे तुम्ही आमचे आहात ! बोला, काय वाटेल ते सांगा, वाटेल ती आज्ञा करा, वाटेल तो हुकूम फर्मावा, आणि बोला, तुम्हाला कुठे शोधू? लोकमान्य, आम्ही तुम्हाला कुठे शोधू? आमचा वीर, हा आमचा हिरो, हा आमचा प्राण, हा आमचा लोकमान्य ! इतका सर्वव्यापी होता की, त्याने या महाराष्ट्रातील चर आणि अचर, सजीव आणि अजीव, सचेतन आणि अचेतन, इतकेच काय पण या महाराष्ट्रातील मानव, देव, किन्नर, विभूती या महाराष्ट्रातील साधू, संत, योगी, तपस्वी या महाराष्ट्रातील जल, स्थल, पाषाण, तरु, लता, उद्यान, पुरेपूर व्यापून टाकले होते. आमच्या लोकमान्या, लोकांच्या लोकमान्या, महाराष्ट्राच्या लोकमान्या, तुझ्याशिवाय जीवाला ओढणी का रे लागते। लोकमान्या, तुझ्याशिवाय जीव तुटतो रे।

४० वर्षांपर्यंत इथल्या जनतेला वेड लावणाऱ्या जादुगारा, लोकमान्या, यावेळी आम्हाला सोडून चाललास? जनतेच्या जनतानंदा या शोकसागरात आम्हाला लोटलेस? लोकांच्या प्रेमातील लोकमान्या, अश्रूच्या दर्यात आम्हाला टाकून दिलेस? देशबांधवांच्या कैवल्या, आम्हा सर्वांना विलाप करायला ठेवलेस? भारत देशाच्या कुलदीपक तिलका. आम्हास असाहय्य दीन, अनाथ केलेस? बोला, लोकमान्य बोला! राग टाकून बोला, पूर्वप्रेमाच्या सर्व स्मृतींनी बोला की, तुमच्या विरहावस्थेत या तुमच्या महाराष्ट्राने काळ कंठावा तरी कसा?...

कारण लोकमान्या, तू गेलास आज तुझ्याबरोबर महाराष्ट्राचा शिवाजी गेला आहे! तू गेलास, तुझ्याबरोबर महाराष्ट्राचा अर्जुन गेला आहे! लोकमान्य बाळ गंगाधर, तुम्ही गेलात ते तुमच्याबरोबर महाराष्ट्राची ज्ञानेश्वरी, महाराष्ट्राचे महाभारत, महाराष्ट्राचे रामायण, लुप्त होऊन गेलेले आहे! आम्ही हजारो प्राणी तुमच्या जागी नेण्यास योग्य होतो. पण, तुमचीच निवड करताना परमेश्वराने महाराष्ट्राचे कोणते हित पाहिले?"

त्या रात्री गर्दी ओसरल्यावर अनेकजण पुन्हा टिळकांच्या चितेजवळ गेले. त्यापैकी अनेकांनी टिळकांची ती राख एका पुडीत घेतली. ती पुडी हृदयाशी लावली. काहींनी चांदीच्या, सोन्याच्या डबीत तिला जन्मभर जपून ठेवले. टिळकांवर अंत्यसंस्कार जरी मुंबईत झाले, तरीसुद्धा पुढचे क्रियाकर्माचे संस्कार मात्र पुण्यातच पार पडले. १२ जुलै रोजी टिळक पुण्याहून मुंबईला निघाले होते, ते स्वतःच्या पायावर चालत. पण, आता ३ ऑगस्ट रोजी त्यांच्या अस्थी पुण्यात आणल्या जात होत्या स्पेशल ट्रेनने, फुलांच्या माळांनी सजवलेल्या चंदनाच्या पेटीत, एका चारचाकी रथात टिळकांच्या अस्थी पुण्यात आणल्या गेल्या.

केळकर लिहितात,

"जाताना ते आपल्या साडेतीन हात देहाने बाहेर पडले, पण येताना ते अंगुष्ठमात्र देहाने आले. जाताना त्यांनी अंगात नेहमीचा पोशाख घातला होता, येताना त्यांनी चिताभस्माचे रूप धरण केले होते. जाताना ते आपल्या पायांनी गेले, येताना ते एका वितभर चांदीच्या पेटीत निजून आपल्या परिचारकांच्या खांद्यावर बसून आले. जाताना त्यांचा सर्व ऐहिक व्याप त्यांच्या डोक्यात घोळत होता, येताना त्या सर्व व्यापांचा त्यांनी त्याग केलेला होता. जाताना ते वासनापूर्ण होते, येताना त्यांनी सर्व वासना टाकून दिल्या होत्या. जाताना ते लोकांविषयी बोलत होते, येताना त्यांनी स्वतः शाश्वत मौनव्रत स्वीकारले असून सर्व लोक मात्र त्यांच्याविषयी बोलत होते. जाता जाता त्यांनी टिळकपूर्ण असे पुणे सोडले, येताना त्यांनी टिळकशून्य अशा पुण्यात प्रवेश केला."

ज्या दिवशी लोकमान्यांना तिलांजली देण्याचा विधी झाला, त्या दिवशी लोकमान्यांच्या पिंडाला कावळा लवकर स्पर्श करेना. पण, यात वेगळे काहीच नाही, असे म्हणत यावर अच्युत बळवंत लिहितात,

"टिळकांच्या पिंडाला स्पर्श कसा होणार? लोकमान्यांनी केलेल्या एवढ्या मोठ्या संकल्पात कोणकोणत्या इच्छा भरलेल्या होत्या? कोणकोणते बेत गूढ स्वरूपात होते? कोणकोणत्या योजना परत राहिलेल्या होत्या व कोणकोणत्या महत्त्वाकांक्षा अपुऱ्या राहिलेल्या होत्या, त्याचा शोध आता कसा लागणार? असा कोणता पराक्रमी पुरुष आहे की ज्याच्या सगळ्या इच्छा परिपूर्ण झालेल्या असतील? श्री शिवाजी महाराजांच्या सर्व इच्छा परिपूर्ण झालेल्या असतील काय? नर्मदातीरी वारलेल्या बाजीरावांच्या इच्छा परिपूर्ण झाल्या असतील का? सिकंदर किंवा पिटर दि ग्रेट इच्छा परिपूर्ण होऊन मेला असेल काय? आहो, पराक्रमी पुरुषांचे लक्षणच हे आहे की, त्यांच्या इच्छा कधीही पूर्ण झालेल्या नसतात. पराक्रमी लोकांच्या इच्छा भरधाव दौडीने धावत असल्याकारणाने त्या इच्छा परिपूर्ण करणे, हे एका आयुष्याला अशक्यच आहे! एका आयुष्यात इच्छा परिपूर्ण होतील तो कदाचित शहाणा असेल, पण पराक्रमी कधीही असणार नाही. आपल्या राष्ट्राचे अपरिमित वैभव इच्छिणारे जे लोकमान्यांसारखे पराक्रमी पुरुष असतात, त्यांच्या इच्छा अपरिमित असणे हेच त्यांना भूषण! आणि इच्छा अपरिमित असल्या की त्याची तृप्ती कुठून होणार? लोकमान्यांच्या पिंडाला काकस्पर्श लवकर झाला नाही, तो याच कारणामुळे होय."

"टिळकांवर लोकांचे खरे प्रेम असेल तर 'लोकमान्य' ही पदवी त्यांनी अनंत काळापर्यंत अनन्यसामान्यच ठेवली पाहिजे. 'लोकमान्य' या शब्दाने यापुढील हिंदुस्तानच्या इतिहासात कोणाही कितीही मोठ्या व्यक्तीचा उल्लेख होता कामा नये." केळकरांनी ही अपेक्षा व्यक्त करून १०० वर्ष झाले. टिळक जाऊन १०० वर्ष झाले. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी केलेली ती सिंहगर्जना त्यांच्या स्मृतिशताब्दीच्या निमित्ताने पुन्हा एकवार आठवावी, आळवावी या हेतूने केलेले हे टिळकांच्या सिंहगर्जनेचे सिंहावलोकन !

लोकमान्य म्हणजे बाळ गंगाधर टिळक हे समीकरण इथून पुढेही जोवर मराठी भाषा जिवंत असेल, तोवर टिकून राहो, लोकमान्यांच्या विचारांना कृतिशीलतेची पावले लाभोत आणि टिळकांचे विचार चिरंजीव होवोत, या चिमण्या प्रार्थनेसह 'सिंहगर्जनेचे सिंहावलोकन' इथेच पुरे करतो... 


~संकलन

प्रसाद वैद्य 

Wednesday, 31 July 2024

विवेकानंद विद्यालय, चोपडा आयोजित पुस्तक मैत्री शिबीर संपन्न...

विवेकानंद विद्यालय, चोपडा आयोजित पुस्तक मैत्री शिबीर संपन्न...

चोपडा (प्रतिनिधी)

वाचन आहे प्रवास सुंदर नव्या नव्या ज्ञानाचा | इतिहासाचा, साहित्याचा आणिक विज्ञानाचा ||

वाचनाची महती समर्पक शब्दांत सांगणाऱ्या या काव्यपंक्ती. वाचन संस्कार विद्यार्थ्यांमध्ये रुजावा व वृद्धिंगत व्हावा या उद्देशाने  विवेकानंद विद्यालयात इ.सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पुस्तक मैत्री शिबीर संपन्न झाले. आई शारदादेवी, स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे व ग्रंथपूजनाने शिबीराचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष डाॅ. विकास हरताळकर यांच्या हस्ते करण्यात आले.

 याप्रसंगी  उपाध्यक्ष श्री.घनश्यामभाई अग्रवाल, सचिव ॲड.रवींद्र जैन, सहसचिव डाॅ. विनीत हरताळकर, श्री. विलास पाटील खेडीभोकरीकर, मुख्याध्यापक श्री. नरेंद्र भावे, श्री.पवन लाठी, श्रीमती शितल पाटील आदी मान्यवर  उपस्थित होते.शिबिराचे आयोजक  श्री. संजय सोनवणे सर यांनी प्रयोजन स्पष्ट केले. मुख्या. श्री. नरेंद्र भावे यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर डाॅ. विकास हरताळकर यांनी शिबिरासाठी सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना शुभेच्छा देऊन  सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्यातर्फे पुस्तकं भेट दिले. 

सकाळच्या सदरात 'पुस्तक वाचनाचे फायदे' यावर श्री. विलास पाटील (मा. मुख्या. तांदळवाडी हायस्कूल), 'मी वाचलेली पुस्तके' यावर श्री. राधेश्याम पाटील यांनी, तर 'इतिहास माझा ठेवा' यावर श्री. पंकज शिंदे (प्र.वि.मं.चोपडा) यांनी मार्गदर्शन केले. पुस्तकाचे  कवी किंवा लेखक कोण हे  खेळाद्वारे श्री.अभिषेक शुक्ल यांनी घेतले. नंतर सर्व विद्यार्थ्यांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. 

दुपारच्या सत्रात 'चला करुया पुस्तकांशी मैत्री- चला जाऊया पुस्तकांच्या नगरीत ' या खेळातून श्री. संजय सोनवणे यांनी प्रत्येक मुलाच्या हातात पुस्तकं देऊन खेळीमेळीच्या वातावरणात वाचन करून घेतले. कविता गाणी शिकवती आम्हां हा विषय घेऊन आणि मराठीच्या पाठयपुस्तकातील धड्यांचे कवी व लेखक यांना स्मार्ट टी.व्हीच्या पॅनलवर भेटीला आणून प्रसाद वैद्य यांनी मार्गदर्शन केले, माझा जन्म लेखक व कवीच्या हातात हा 'जोडी शोधा' खेळ श्री. मांगीलाल बारेला यांनी घेतला, तर Motivational Song With Dance - मै तैयार हू | या गीतावर श्री.राकेश विसपुते यांनी मुलांच्या हातात पुस्तके देऊन नृत्य घेतले . शिबिराच्या समारोप प्रसंगी विद्यार्थ्यांनी अवांतर वाचनाकडे वळणार असा संकल्प घेऊन आपले मनोगत व्यक्त केले. नव्या वैभवाचीच स्वप्ने सजावी...   ही प्रार्थना विद्यार्थ्यांकडून म्हणवून घेऊन प्रसाद वैद्य यांनी शिबीराचा समारोप केला. याप्रसंगी संस्थेचे विश्वस्त डाॅ. अमित हरताळकर, सौ. ज्योस्ना हरताळकर, श्री. विलास पाटील,श्री नरेंद्र भावे, श्रीमती आशा चित्ते आदी मान्यवर उपस्थित होते. वाचन संस्कृती रुजवण्यासाठी हे शिबीर आयोजित केल्याबद्दल पालकांनी विवेकानंद परिवाराचे अभिनंदन केले,


















Sunday, 21 July 2024

लळा, गोतावळा अन् गुरुपौर्णिमा

 लळा, गोतावळा अन् गुरुपौर्णिमा

[21/07, 2:46 pm] सोनवणे सर: काल न कळत दुपारी माध्यमिक विभागाच्या गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमास योगेश चौधरी सरांना ऐकण्यासाठी गेलो होतो. प्रतिमा पूजनसाठी बोलावले तेव्हा मुलांनी प्रचंड टाळ्यांचाही कडकडाट केला, तसेच  कार्यक्रम संपल्या नंतर श्री. हेमराज पाटील सरांनी न कळतच टिपलेला प्रसंग👇

[21/07, 2:46 pm] सोनवणे सर: माननीय सर सप्रेम नमस्कार ,😊👏

आपले आवडते गुरुवर्य शिक्षक विद्यार्थ्यांना आयुष्यात पुन्हा जेव्हाही भेटतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद , शिक्षकाप्रती मनोभावे आदर , त्या शिक्षकांना खूप भेटावे , खूप गप्पा करून अविस्मरणीय आठवणी गोळा करून घ्याव्या... अशा अनेक भावनांनी विद्यार्थी त्या शिक्षकाभोवती असे गोळा होतात जसे की मधमाशा

फुलांवर , पोळ्यावर असंख्य संख्येने जमतात.

असे चित्र आमच्या विद्यालयात , तसेच आमच्या तालुक्यात अवतीभवती कुठे बघायला मिळत असेल , तर ते म्हणजे ज्येष्ठ बंधू , मार्गदर्शक गुरुवर्य श्री संजय सोनवणे सर यांच्या अवतीभोवती.

आज गुरुपौर्णिमा , त्यानिमित्त काल विद्यालयात गुरु पौर्णिमा कार्यक्रमासाठी उप मुख्याध्यापक श्री संजय सोनवणे सर आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यानंतर , विद्यार्थ्यांच्या झुंडीच्या झुंडी श्री सोनवणे सरांना भेटण्यासाठी , त्यांना चरण स्पर्श करण्यासाठी आपसात स्पर्धा करत होते , सगळ्यात पहिले आम्ही सरांजवळ कसे पोहोचणार , सर्वजण धावत सरांजवळ पोहोचले व सरांना वंदन करू लागले...  यापेक्षा एखाद्या प्रामाणिक , खूप मेहनती , विद्यार्थी दैवत मानणाऱ्या शिक्षकासाठी मोठे सुख   समाधान व पुरस्कार काय असावा...?


हा प्रसंग मी थोड्या दुरून बघत होतो , नकळत माझा हात मोबाईल कडे गेला व मी काही क्षण टिपण्याचा प्रयत्न केला.

मा. श्री सोनवणे सर आपणास गुरु पौर्णिमेनिमित्त माझा , माझे पारिवारिक सदस्य , आर्यदीप व कृष्णप्रिया... आम्हा सर्वांचा साष्टांग नमस्कार.👏👏🌹🌹

गुरु पौर्णिमेच्या खूप खूप मनःपूर्वक शुभेच्छा...!!

😊👏👏🌹🌹🏆📚📖✒️🎊

श्री . हेमराज पाटील

[21/07, 4:51 pm] Prasad Suresh Vaidya: आदरणीय सोनवणे सर,😊👏

तुम्हाला पाहताक्षणी  तुमच्याभोवती जमलेला निरागसतेचा हा घोळका आणि गोतावळा खऱ्या अर्थाने गुरुपौर्णिमेचा क्षण आहे. या घोळक्यामागे आपले प्रेम,अध्यापन अनुभव, उपक्रम आणखी बरंच काही दडलेलं आहे. एका सच्च्या शिक्षकाला यापेक्षा वेगळा पुरस्कार आणि समाधान ते कोणते! हेमराज सरांनीही तुमच्या नकळत हा प्रसंग छान टिपलाय व शब्दबद्ध केलाय. त्याबद्दल सरांचं व तुमचं  सहर्ष अभिनंदन. सस्नेह नमस्कार आणि गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!!!

📙📚📖📋✍🏻

~प्रसाद वैद्य व परिवार