My YouTube Channel

Click here to visit My YouTube Channel

Friday, 2 August 2024

कुणी चितेजवळ रडत होतं, कुणी राख छातीशी घेत होतं : टिळक गेले त्या वेळची गोष्ट...

 कुणी चितेजवळ रडत होतं, कुणी राख छातीशी घेत होतं : टिळक गेले त्या वेळची गोष्ट...


"आई, या पावसाला आणि गर्दीला घाबरू नकोस! अगं, टिळकांकरिता खुद्द देवसुद्धा रडत आहेत. मा! लुक हिअर, इव्हन गॉड इज वीपिंग फॉर मिस्टर टिलक!"

लेखक : पार्थ बावस्कर

"हजारो लोक मुंबईच्या सरदारगृहापुढे रस्त्यावर उभे होते. अखेर मध्यरात्र उलटली. १२ वाजून गेले. १ ऑगस्ट १९२०चा दिवस सुरु झाला आणि थोड्या वेळानेच लोकमान्यांचे देहावसान झाल्याची बातमी कोणीतरी लोकांना सांगितली. त्या क्षणी त्या प्रचंड जनसमुदायाच्या तोंडून शोकाचे आणि दुःखाचे विदारक उद्गार बाहेर पडले. त्याचे स्मरण झाले की, अजूनही अंगावर कंप उठतो. काही लोक तर धाय मोकलून रडले. ज्यांचे डोळे पाण्याने भरुन आले नाहीत, असा एकही माणूस त्या जनसमुदायात आढळला नसता. लोकमान्यांच्या मृत्यूची बातमी एखाद्या वाऱ्याप्रमाणे मुंबई शहरात ताबडतोब पसरली, मग रात्री झोप कोणाला येणार? लोकमान्यांची आठवण करून सारी मुंबईनगरी त्या रात्री अक्षरशः ढळाढळा रडली, असे म्हटले तर त्यात एका शब्दाचीही अतिशयोक्ती होऊ नये."

टिळक गेल्यानंतरचे हे उद्गार आहेत आचार्य अत्रेचे!

ते स्वतः त्या गर्दीचा एक भाग होते.

टिळक गेल्याचे समजले आणि गर्दी आणखीन वाढली.

त्याच रात्री मुंबईत गडकऱ्यांच्या 'भावबंधन' नाटकाचा प्रयोग सुरु होता. बाराशे रुपयांची तिकीट विक्री होऊन

प्रयोग हाऊसफुल्ल झालेला. चौथा अंक सुरू झाला आणि आत काहीशी गडबड ऐकू आली. मंचावर घनश्यामच्या भूमिकेतले चिंतामणराव कोल्हटकर थांबले. तेवढ्यात तात्यासाहेब परांजपेंनी विंगेत येऊन टिळक गेल्याची वार्ता सगळ्या जनसमुदायाला सांगितली.

खेळ आपसूकच बंद झाला. ज्यांना तिकिटाचे पैसे परत हवे, त्यांना ते मिळतील, अशी सूचना देण्यात आली आणि पैसे परत करण्यासाठी एक माणूस तिकीटबारीवर जाऊन थांबला.

पण, पैसे मागायला कुणी येईचना, सुमारे हजाराचा तो रसिकवर्ग एकाएकी उठला सरदारगृहाच्या दिशेने टिळकांना अखेरचे बघण्यासाठी निघाला. टाचणी पडली तरी भलामोठा आवाज यावा, असा सन्नाटा थिएटरभर पसरला होता.

या प्रसंगाचे साक्षी असलेले चिंतामणराव कोल्हटकर लिहितात,

"पायांचे आवाजसुद्धा ऐकू येऊ नयेत इतक्या शांततेत लोक बाहेर पडले. जमिनीला कान लावून ऐकणाऱ्यालासुद्धा ऐकू आले असते ते फक्त दुःखाचे निश्वास आणि रडण्याचे उसासे!"

रडण्याचे कढ हळूहळू वाढतच चालले होते. लोकमान्यांचे दर्शन घेण्यासाठी सरदारगृहाचे दार तोडण्यापर्यंत गर्दीची मजल गेली होती. शेवटी लोकांच्या दर्शनार्थ पहिल्या मजल्याच्या बाल्कनीत टिळकांचा देह आणून ठेवला, हा प्रसंग जसाच्या तसा लिहून ठेवणारे पुंडलिकजी तिथे उपस्थित होते.

ते सांगतात,

"प्रत्येक माणूस धडपडत टिळकांच्या दर्शनाला येई. टिळकांना बघितल्यावर त्याला भडभडून येत असे. एक माणूस म्हणाला, एका माणसाने त्या शवापुढे येताच आपल्या तोंडावर हातच मारून घेतला. एक म्हातारा मनुष्य म्हणाला, बाबा आता हिंदुस्थानला इंग्रजांच्या तावडीतून कोण सोडवणार रे?"

असे म्हणून मोठ्याने किंकाळी फोडून तो रडूच लागला.

"श्री शिवाजी महाराजांचा मृत्यू, राजारामाचे अकाली मरण, पानिपतचा रणसंग्राम, नारायणराव पेशव्यांचा वध, सवाई माधवरावांची आत्महत्या अथवा नाना फडणवीस यांचा स्वर्गवास, या महाराष्ट्राच्या इतिहासातील ज्या भयंकर विपत्ती, त्यांच्याहून अणूमात्रही कमी नसलेली भयंकर वेळ आज महाराष्ट्रावर आलेली असून, तिने महाराष्ट्रातून आज बाळ गंगाधर टिळक यांना ओढून नेलेले आहे," अशा शब्दांत या महानिर्वाणाचे वर्णन केले अच्युत बळवंत कोल्हटकरांनी।

टिळकांच्या पुण्यात ही बातमी समजली आणि पुणेकरांची मनेच हादरली. रडू आवरत कसेबसे लोक मुंबईला जायला निघाले. नेहमीच्या दोन रेल्वे कमी पडल्या. सरकारला ज्यादा गाड्यांची व्यवस्था करावी लागली.

टिळकांचे अंत्यसंस्कार पुण्यात व्हावे, अशी केळकरांची आणि सगळ्या पुणेकरांची इच्छा होती; इच्छा कसली त्यांचा हट्टच होता, नव्हे नव्हे हक्कही होता त्यांचा. कारण, पुणे ही टिळकांची कर्मभूमी! पण, मुंबईकरही हट्टाला पेटले होते. त्यांचेही म्हणणे बरोबरच होते, टिळकांची कर्मभूमी पुणे असली तरी ते आता एकट्या पुण्याचे राहिले नसून अवघ्या महाराष्ट्राचे 'लोकमान्य' झालेले होते.

तात्यासाहेब केळकर निघाले. पुण्याला आले. त्यांना

केसरी'चा पुढचा अंक काढण्याची खटपट करावी लागणार होती. याच 'केसरी'च्या आधीच्या अंकातून लोकांना सांगण्यात आले होते, लोकमान्यांची प्रकृती मलेरियाच्या तापाने थोडी बिघडली आहे, पण काळजी करण्याचं काही कारण नाही. लोकमान्य लवकरच ठणठणीत होतील..

आधीच्या अंकात ही बातमी वाचणाऱ्या वाचकांना हे कुठे

माहिती होतं की, पुढच्या 'केसरी'च्या अंकात टिळकांच्या

मृत्यूची काळीज करपून सोडणारी बातमी आपल्याला

वाचावी लागणार म्हणून! 'केसरी'चा हा अंक महाराष्ट्रातल्या घराघराला एक अकल्पित वज्राघातच वाटला.

ही बातमी अंदमानात सावरकरांना समजली त्यांनी आणि अंदमानातल्या सगळ्याच्या कैद्यांनी एक दिवस अन्नपाणी घेतले नाही. टिळकांना आदरांजली म्हणून उपवास पाळला.

आणि इकडे मुंबईत, अफाट लोकसमुदायाबरोबर टिळकांची महानिर्वाणयात्रा दुपारी दीड वाजता सुरु झाली. दोन लाखांच्यावर लोकांची गर्दी यापूर्वी एखाद्या

अंत्ययात्रेला कधीही झालेली नव्हती. स्त्रिया, पुरुष, म्हातारे, हजारो गिरणी कामगार, हिंदू, मुसलमान, ख्रिस्ती, पारशी, जैन, हरेक भारतीय टिळकांचा जयजयकार करत चालला होता.

आकाशाची शिवण उसवावी, आभाळ फाटावे असा पाऊस त्यादिवशी पडत होता. टिळकांच्या चितेला अग्नी दिलाच जाऊ नये, अशी त्या वरुणाचीही इच्छा असावी बहुतेक. त्या पावसाच्या घनगंभीर अशा मेघगर्जनेपेक्षा टिळकांच्या महानिर्वाणयात्रेतील लोकगर्जना अवघा महाराष्ट्र हलवून सोडत होती, ती गर्जना होती, 'टिळक महाराज की जय!' लोक घराच्या खिडकीतून अंत्ययात्रा पाहत होते. टिळकांना अखेरचा नमस्कार करत होते. घराच्या गच्चीवरून पुष्पवृष्टी होत होती. माणसांच्या गर्दीत मुंगीलाही उभे राहता येत नव्हते. खापर्डे, गांधी हेही लोकांच्या जथ्थ्यात हेलकावे खात इकडून तिकडे ढकलले जात होते.

या महानिर्वाणयात्रेत ३५-४० वर्षांचा एक ख्रिस्ती तरुण साठीच्या पलीकडे झुकलेल्या आपल्या म्हाताऱ्या आईला घेऊन तेथे आला होता. लोकमान्यांच्या अखेरच्या 

दर्शनासाठी ती ख्रिस्ती म्हातारी हेलकावे खात होती. तिचा जर्जर देह इकडून तिकडे फेकला जातो की काय, अशी अवस्था होती. हे पाहून तिचा मुलगा म्हणाला,

"आई, या पावसाला आणि गर्दीला घाबरू नकोस! अगं, टिळकांकरिता खुद्द देवसुद्धा रडत आहेत. मा! लुक हिअर, इव्हन गॉड इज वीपिंग फॉर मिस्टर टिलक!"

धुवाँधार बरसणाऱ्या पावसामुळे लोक ओलेचिंब झाले होते. रस्त्यावर चिखल झाला होता. माणसांची पांढरी धोतरे चिखलाने माखून काळीठिक्कर पडली होती. मुंबईच्या पारशी व्यापाऱ्यांनी विशेष व्यवस्था म्हणून चंदनाची चिता तयार केली होती. त्यावर टिळकांचे कलेवर ठेवण्यात आले, तोच त्या समुद्रकिनाऱ्यावरील लोकसागराला अचानक भरती आली. साखळ्या तोडून लोक टिळकांच्या चितेकडे धावत सुटले.

लोकमान्यांना अग्निडाग दिला आणि एका मुसलमान तरुणाचा धीरच सुटला. लोकमान्य गेले, आता आपण तरी जगून काय करायचे, असे म्हणून त्याने हंबरडा फोडला आणि त्याने चितेमध्ये उडीच घेतली. तो होरपळला गडगडत बाहेर फेकला गेला. त्याला दवाखान्यात नेले, पण काही दिवसांनी तोही लोकमान्यांच्याच वाटेवर निघून गेला.

संध्याकाळचे ७ वाजले तरीही त्याची शुद्ध कुणाला नव्हती. टिळकांच्या महानिर्वाणाचे हे दृश्य 'याचि डोळा'

अनुभवणारे नाना कुलकर्णी लिहितात, "आम्ही त्या रात्री १० वाजल्यापासून ते दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत पायावर उभेच होतो. अखेर शेवटचा घाला झाला. मन सुन्न झाले. हृदयात काय होत होते, हे सांगताही येईना. पावसाच्या धारा कोणत्या आणि अश्रूच्या धारा कोणत्या, हे समजेना, अग्निसंस्कार झाला, पण चौपाटीवरून पायच निघेना."

जगभरातल्या अनेक वर्तमानपत्रांनी टिळकांना आदरांजली अर्पण केली. मृत्युलेख लिहिले, पण अच्युत बळवंत कोल्हटकर यांनी लिहिलेला अग्रलेख त्यातला सर्वोत्तम. खरे तर टिळक जाण्यापूर्वी त्यांचे आणि टिळकांचे भांडण होते, तरीही टिळकांबद्दल असलेले अपार प्रेम संदेशकारांना अस्वस्थ करत होते. त्यांच्या लेखणीला शब्दांचा महापूर आला होता. या महापुरात ते फक्त टिळकांना शोधत होते आणि म्हणत होते,

"लोकमान्य, तुम्हाला आता कुठे पाहू? तुमची सावळी मूर्ती कुठे अवलोकन करू? तुम्हाला कुठे शोधू? तुम्हाला कुठे धुंडाळू? आमचा जीव तुमच्या जीवाशी गोठलेला होता. आमचा प्राण तुमच्या पंचप्राणांचा भाग होता. आमचे अस्तित्व तुमच्या अस्तित्वात गुरफटून गेले होते. आमचे जीवन तुमच्या जीवनात गुंतलेले होते. लोकमान्य! आता तुम्ही आम्हाला कुठे सापडाल? कुठे दिसाल? तुम्ही जात असताना आमच्या जीवनाला ओढणी लागलेली आहे. आमच्या प्राणांना क्लेष पडत आहेत. काट्याच्या जाळ्यावरून ज्याप्रमाणे रेशमी वस्त्राला फराफरा ओढावे, त्याप्रमाणे आमच्या हृदयाच्या चिरफाळ्या झालेल्या आहेत. लोकमान्य, आमचे प्राण तुमच्या स्वाधीन ! आमचे मन तुमच्या स्वाधीन ! आमचे जीवन तुमच्या स्वाधीन! 

लोकमान्य, आम्ही, तुमचे तुम्ही आमचे आहात ! बोला, काय वाटेल ते सांगा, वाटेल ती आज्ञा करा, वाटेल तो हुकूम फर्मावा, आणि बोला, तुम्हाला कुठे शोधू? लोकमान्य, आम्ही तुम्हाला कुठे शोधू? आमचा वीर, हा आमचा हिरो, हा आमचा प्राण, हा आमचा लोकमान्य ! इतका सर्वव्यापी होता की, त्याने या महाराष्ट्रातील चर आणि अचर, सजीव आणि अजीव, सचेतन आणि अचेतन, इतकेच काय पण या महाराष्ट्रातील मानव, देव, किन्नर, विभूती या महाराष्ट्रातील साधू, संत, योगी, तपस्वी या महाराष्ट्रातील जल, स्थल, पाषाण, तरु, लता, उद्यान, पुरेपूर व्यापून टाकले होते. आमच्या लोकमान्या, लोकांच्या लोकमान्या, महाराष्ट्राच्या लोकमान्या, तुझ्याशिवाय जीवाला ओढणी का रे लागते। लोकमान्या, तुझ्याशिवाय जीव तुटतो रे।

४० वर्षांपर्यंत इथल्या जनतेला वेड लावणाऱ्या जादुगारा, लोकमान्या, यावेळी आम्हाला सोडून चाललास? जनतेच्या जनतानंदा या शोकसागरात आम्हाला लोटलेस? लोकांच्या प्रेमातील लोकमान्या, अश्रूच्या दर्यात आम्हाला टाकून दिलेस? देशबांधवांच्या कैवल्या, आम्हा सर्वांना विलाप करायला ठेवलेस? भारत देशाच्या कुलदीपक तिलका. आम्हास असाहय्य दीन, अनाथ केलेस? बोला, लोकमान्य बोला! राग टाकून बोला, पूर्वप्रेमाच्या सर्व स्मृतींनी बोला की, तुमच्या विरहावस्थेत या तुमच्या महाराष्ट्राने काळ कंठावा तरी कसा?...

कारण लोकमान्या, तू गेलास आज तुझ्याबरोबर महाराष्ट्राचा शिवाजी गेला आहे! तू गेलास, तुझ्याबरोबर महाराष्ट्राचा अर्जुन गेला आहे! लोकमान्य बाळ गंगाधर, तुम्ही गेलात ते तुमच्याबरोबर महाराष्ट्राची ज्ञानेश्वरी, महाराष्ट्राचे महाभारत, महाराष्ट्राचे रामायण, लुप्त होऊन गेलेले आहे! आम्ही हजारो प्राणी तुमच्या जागी नेण्यास योग्य होतो. पण, तुमचीच निवड करताना परमेश्वराने महाराष्ट्राचे कोणते हित पाहिले?"

त्या रात्री गर्दी ओसरल्यावर अनेकजण पुन्हा टिळकांच्या चितेजवळ गेले. त्यापैकी अनेकांनी टिळकांची ती राख एका पुडीत घेतली. ती पुडी हृदयाशी लावली. काहींनी चांदीच्या, सोन्याच्या डबीत तिला जन्मभर जपून ठेवले. टिळकांवर अंत्यसंस्कार जरी मुंबईत झाले, तरीसुद्धा पुढचे क्रियाकर्माचे संस्कार मात्र पुण्यातच पार पडले. १२ जुलै रोजी टिळक पुण्याहून मुंबईला निघाले होते, ते स्वतःच्या पायावर चालत. पण, आता ३ ऑगस्ट रोजी त्यांच्या अस्थी पुण्यात आणल्या जात होत्या स्पेशल ट्रेनने, फुलांच्या माळांनी सजवलेल्या चंदनाच्या पेटीत, एका चारचाकी रथात टिळकांच्या अस्थी पुण्यात आणल्या गेल्या.

केळकर लिहितात,

"जाताना ते आपल्या साडेतीन हात देहाने बाहेर पडले, पण येताना ते अंगुष्ठमात्र देहाने आले. जाताना त्यांनी अंगात नेहमीचा पोशाख घातला होता, येताना त्यांनी चिताभस्माचे रूप धरण केले होते. जाताना ते आपल्या पायांनी गेले, येताना ते एका वितभर चांदीच्या पेटीत निजून आपल्या परिचारकांच्या खांद्यावर बसून आले. जाताना त्यांचा सर्व ऐहिक व्याप त्यांच्या डोक्यात घोळत होता, येताना त्या सर्व व्यापांचा त्यांनी त्याग केलेला होता. जाताना ते वासनापूर्ण होते, येताना त्यांनी सर्व वासना टाकून दिल्या होत्या. जाताना ते लोकांविषयी बोलत होते, येताना त्यांनी स्वतः शाश्वत मौनव्रत स्वीकारले असून सर्व लोक मात्र त्यांच्याविषयी बोलत होते. जाता जाता त्यांनी टिळकपूर्ण असे पुणे सोडले, येताना त्यांनी टिळकशून्य अशा पुण्यात प्रवेश केला."

ज्या दिवशी लोकमान्यांना तिलांजली देण्याचा विधी झाला, त्या दिवशी लोकमान्यांच्या पिंडाला कावळा लवकर स्पर्श करेना. पण, यात वेगळे काहीच नाही, असे म्हणत यावर अच्युत बळवंत लिहितात,

"टिळकांच्या पिंडाला स्पर्श कसा होणार? लोकमान्यांनी केलेल्या एवढ्या मोठ्या संकल्पात कोणकोणत्या इच्छा भरलेल्या होत्या? कोणकोणते बेत गूढ स्वरूपात होते? कोणकोणत्या योजना परत राहिलेल्या होत्या व कोणकोणत्या महत्त्वाकांक्षा अपुऱ्या राहिलेल्या होत्या, त्याचा शोध आता कसा लागणार? असा कोणता पराक्रमी पुरुष आहे की ज्याच्या सगळ्या इच्छा परिपूर्ण झालेल्या असतील? श्री शिवाजी महाराजांच्या सर्व इच्छा परिपूर्ण झालेल्या असतील काय? नर्मदातीरी वारलेल्या बाजीरावांच्या इच्छा परिपूर्ण झाल्या असतील का? सिकंदर किंवा पिटर दि ग्रेट इच्छा परिपूर्ण होऊन मेला असेल काय? आहो, पराक्रमी पुरुषांचे लक्षणच हे आहे की, त्यांच्या इच्छा कधीही पूर्ण झालेल्या नसतात. पराक्रमी लोकांच्या इच्छा भरधाव दौडीने धावत असल्याकारणाने त्या इच्छा परिपूर्ण करणे, हे एका आयुष्याला अशक्यच आहे! एका आयुष्यात इच्छा परिपूर्ण होतील तो कदाचित शहाणा असेल, पण पराक्रमी कधीही असणार नाही. आपल्या राष्ट्राचे अपरिमित वैभव इच्छिणारे जे लोकमान्यांसारखे पराक्रमी पुरुष असतात, त्यांच्या इच्छा अपरिमित असणे हेच त्यांना भूषण! आणि इच्छा अपरिमित असल्या की त्याची तृप्ती कुठून होणार? लोकमान्यांच्या पिंडाला काकस्पर्श लवकर झाला नाही, तो याच कारणामुळे होय."

"टिळकांवर लोकांचे खरे प्रेम असेल तर 'लोकमान्य' ही पदवी त्यांनी अनंत काळापर्यंत अनन्यसामान्यच ठेवली पाहिजे. 'लोकमान्य' या शब्दाने यापुढील हिंदुस्तानच्या इतिहासात कोणाही कितीही मोठ्या व्यक्तीचा उल्लेख होता कामा नये." केळकरांनी ही अपेक्षा व्यक्त करून १०० वर्ष झाले. टिळक जाऊन १०० वर्ष झाले. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी केलेली ती सिंहगर्जना त्यांच्या स्मृतिशताब्दीच्या निमित्ताने पुन्हा एकवार आठवावी, आळवावी या हेतूने केलेले हे टिळकांच्या सिंहगर्जनेचे सिंहावलोकन !

लोकमान्य म्हणजे बाळ गंगाधर टिळक हे समीकरण इथून पुढेही जोवर मराठी भाषा जिवंत असेल, तोवर टिकून राहो, लोकमान्यांच्या विचारांना कृतिशीलतेची पावले लाभोत आणि टिळकांचे विचार चिरंजीव होवोत, या चिमण्या प्रार्थनेसह 'सिंहगर्जनेचे सिंहावलोकन' इथेच पुरे करतो... 


~संकलन

प्रसाद वैद्य 

Wednesday, 31 July 2024

विवेकानंद विद्यालय, चोपडा आयोजित पुस्तक मैत्री शिबीर संपन्न...

विवेकानंद विद्यालय, चोपडा आयोजित पुस्तक मैत्री शिबीर संपन्न...

चोपडा (प्रतिनिधी)

वाचन आहे प्रवास सुंदर नव्या नव्या ज्ञानाचा | इतिहासाचा, साहित्याचा आणिक विज्ञानाचा ||

वाचनाची महती समर्पक शब्दांत सांगणाऱ्या या काव्यपंक्ती. वाचन संस्कार विद्यार्थ्यांमध्ये रुजावा व वृद्धिंगत व्हावा या उद्देशाने  विवेकानंद विद्यालयात इ.सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पुस्तक मैत्री शिबीर संपन्न झाले. आई शारदादेवी, स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे व ग्रंथपूजनाने शिबीराचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष डाॅ. विकास हरताळकर यांच्या हस्ते करण्यात आले.

 याप्रसंगी  उपाध्यक्ष श्री.घनश्यामभाई अग्रवाल, सचिव ॲड.रवींद्र जैन, सहसचिव डाॅ. विनीत हरताळकर, श्री. विलास पाटील खेडीभोकरीकर, मुख्याध्यापक श्री. नरेंद्र भावे, श्री.पवन लाठी, श्रीमती शितल पाटील आदी मान्यवर  उपस्थित होते.शिबिराचे आयोजक  श्री. संजय सोनवणे सर यांनी प्रयोजन स्पष्ट केले. मुख्या. श्री. नरेंद्र भावे यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर डाॅ. विकास हरताळकर यांनी शिबिरासाठी सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना शुभेच्छा देऊन  सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्यातर्फे पुस्तकं भेट दिले. 

सकाळच्या सदरात 'पुस्तक वाचनाचे फायदे' यावर श्री. विलास पाटील (मा. मुख्या. तांदळवाडी हायस्कूल), 'मी वाचलेली पुस्तके' यावर श्री. राधेश्याम पाटील यांनी, तर 'इतिहास माझा ठेवा' यावर श्री. पंकज शिंदे (प्र.वि.मं.चोपडा) यांनी मार्गदर्शन केले. पुस्तकाचे  कवी किंवा लेखक कोण हे  खेळाद्वारे श्री.अभिषेक शुक्ल यांनी घेतले. नंतर सर्व विद्यार्थ्यांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. 

दुपारच्या सत्रात 'चला करुया पुस्तकांशी मैत्री- चला जाऊया पुस्तकांच्या नगरीत ' या खेळातून श्री. संजय सोनवणे यांनी प्रत्येक मुलाच्या हातात पुस्तकं देऊन खेळीमेळीच्या वातावरणात वाचन करून घेतले. कविता गाणी शिकवती आम्हां हा विषय घेऊन आणि मराठीच्या पाठयपुस्तकातील धड्यांचे कवी व लेखक यांना स्मार्ट टी.व्हीच्या पॅनलवर भेटीला आणून प्रसाद वैद्य यांनी मार्गदर्शन केले, माझा जन्म लेखक व कवीच्या हातात हा 'जोडी शोधा' खेळ श्री. मांगीलाल बारेला यांनी घेतला, तर Motivational Song With Dance - मै तैयार हू | या गीतावर श्री.राकेश विसपुते यांनी मुलांच्या हातात पुस्तके देऊन नृत्य घेतले . शिबिराच्या समारोप प्रसंगी विद्यार्थ्यांनी अवांतर वाचनाकडे वळणार असा संकल्प घेऊन आपले मनोगत व्यक्त केले. नव्या वैभवाचीच स्वप्ने सजावी...   ही प्रार्थना विद्यार्थ्यांकडून म्हणवून घेऊन प्रसाद वैद्य यांनी शिबीराचा समारोप केला. याप्रसंगी संस्थेचे विश्वस्त डाॅ. अमित हरताळकर, सौ. ज्योस्ना हरताळकर, श्री. विलास पाटील,श्री नरेंद्र भावे, श्रीमती आशा चित्ते आदी मान्यवर उपस्थित होते. वाचन संस्कृती रुजवण्यासाठी हे शिबीर आयोजित केल्याबद्दल पालकांनी विवेकानंद परिवाराचे अभिनंदन केले,


















Sunday, 21 July 2024

लळा, गोतावळा अन् गुरुपौर्णिमा

 लळा, गोतावळा अन् गुरुपौर्णिमा

[21/07, 2:46 pm] सोनवणे सर: काल न कळत दुपारी माध्यमिक विभागाच्या गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमास योगेश चौधरी सरांना ऐकण्यासाठी गेलो होतो. प्रतिमा पूजनसाठी बोलावले तेव्हा मुलांनी प्रचंड टाळ्यांचाही कडकडाट केला, तसेच  कार्यक्रम संपल्या नंतर श्री. हेमराज पाटील सरांनी न कळतच टिपलेला प्रसंग👇

[21/07, 2:46 pm] सोनवणे सर: माननीय सर सप्रेम नमस्कार ,😊👏

आपले आवडते गुरुवर्य शिक्षक विद्यार्थ्यांना आयुष्यात पुन्हा जेव्हाही भेटतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद , शिक्षकाप्रती मनोभावे आदर , त्या शिक्षकांना खूप भेटावे , खूप गप्पा करून अविस्मरणीय आठवणी गोळा करून घ्याव्या... अशा अनेक भावनांनी विद्यार्थी त्या शिक्षकाभोवती असे गोळा होतात जसे की मधमाशा

फुलांवर , पोळ्यावर असंख्य संख्येने जमतात.

असे चित्र आमच्या विद्यालयात , तसेच आमच्या तालुक्यात अवतीभवती कुठे बघायला मिळत असेल , तर ते म्हणजे ज्येष्ठ बंधू , मार्गदर्शक गुरुवर्य श्री संजय सोनवणे सर यांच्या अवतीभोवती.

आज गुरुपौर्णिमा , त्यानिमित्त काल विद्यालयात गुरु पौर्णिमा कार्यक्रमासाठी उप मुख्याध्यापक श्री संजय सोनवणे सर आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यानंतर , विद्यार्थ्यांच्या झुंडीच्या झुंडी श्री सोनवणे सरांना भेटण्यासाठी , त्यांना चरण स्पर्श करण्यासाठी आपसात स्पर्धा करत होते , सगळ्यात पहिले आम्ही सरांजवळ कसे पोहोचणार , सर्वजण धावत सरांजवळ पोहोचले व सरांना वंदन करू लागले...  यापेक्षा एखाद्या प्रामाणिक , खूप मेहनती , विद्यार्थी दैवत मानणाऱ्या शिक्षकासाठी मोठे सुख   समाधान व पुरस्कार काय असावा...?


हा प्रसंग मी थोड्या दुरून बघत होतो , नकळत माझा हात मोबाईल कडे गेला व मी काही क्षण टिपण्याचा प्रयत्न केला.

मा. श्री सोनवणे सर आपणास गुरु पौर्णिमेनिमित्त माझा , माझे पारिवारिक सदस्य , आर्यदीप व कृष्णप्रिया... आम्हा सर्वांचा साष्टांग नमस्कार.👏👏🌹🌹

गुरु पौर्णिमेच्या खूप खूप मनःपूर्वक शुभेच्छा...!!

😊👏👏🌹🌹🏆📚📖✒️🎊

श्री . हेमराज पाटील

[21/07, 4:51 pm] Prasad Suresh Vaidya: आदरणीय सोनवणे सर,😊👏

तुम्हाला पाहताक्षणी  तुमच्याभोवती जमलेला निरागसतेचा हा घोळका आणि गोतावळा खऱ्या अर्थाने गुरुपौर्णिमेचा क्षण आहे. या घोळक्यामागे आपले प्रेम,अध्यापन अनुभव, उपक्रम आणखी बरंच काही दडलेलं आहे. एका सच्च्या शिक्षकाला यापेक्षा वेगळा पुरस्कार आणि समाधान ते कोणते! हेमराज सरांनीही तुमच्या नकळत हा प्रसंग छान टिपलाय व शब्दबद्ध केलाय. त्याबद्दल सरांचं व तुमचं  सहर्ष अभिनंदन. सस्नेह नमस्कार आणि गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!!!

📙📚📖📋✍🏻

~प्रसाद वैद्य व परिवार

Sunday, 23 June 2024

अशी पाखरे येती...!!!

 अशी पाखरे येती...!!!


@doctorforbeggars 

(श्री अजय कटारिया सर यांना सादर समर्पित) 

पुण्यामध्ये आप्पा बळवंत चौकाचं नाक जिथून सुरू होतं, तिथे चॉईस नावाचं पुस्तकाचे दुकान आहे. दुकानाच्या मालकांचे नाव आहे श्री अजय कटारिया. 


बरोबर सहा वर्षांपूर्वी एका स्नेह्यांच्या माध्यमातून यांची आणि माझी ओळख झाली. 


बोलता बोलता ते म्हणाले, 'माझे पुस्तकाचे दुकान आहे, कधी काही लागलं तर या...!'


भीक मागणाऱ्या अनाथ मुलांना आपण दत्तक घेऊन, त्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले आहे. दरवर्षी मला खूप शैक्षणिक साहित्य लागतेच. 


कटारिया साहेबांच्या चॉईस दुकानात गेलो; तर थोडी सूट मिळेल आणि चांगल्या क्वालिटीचे साहित्य मिळेल, हा स्वार्थी विचार करून मी त्यांना चार-पाच वर्षांपूर्वी प्रथमच, सर्व शैक्षणिक साहित्याची लिस्ट दिली. 


त्यानंतर दोन दिवसांनी सर्व साहित्य आले.


बॉक्स उघडून पाहिला, आम्ही दिलेल्या लिस्टपेक्षाही सामान जास्त होते. 


आम्ही एक वही मागितली तिथे पाच वह्या होत्या, एक दप्तर मागितले तेथे पाच दप्तरे होती, पाच कंपास पेट्या मागितल्या तिथे 25 होत्या...


मी त्यांना फोन करून म्हणालो, 'कटारिया साहेब, बहुतेक हा दुसऱ्यांचा बॉक्स आमच्याकडे आला आहे... हि आमची लिस्ट नव्हे ! 


ते हसून म्हणाले, 'असू द्या हो डॉक्टर, अनाथ पोरांना शिकवताय... थोडं इकडे तिकडे चालणारच...  पोरं आहेत... 


घ्या आमच्याकडून डोनेशन समजून...' 


एक्स्ट्रा सामानाची मी त्यांना देणगी म्हणून पावती दिली, त्यांनी ती हसत खिशात ठेवली. 


पुढच्या वर्षी म्हणजे साधारण 2021 ला त्यांना पुन्हा लिस्ट दिली... पुन्हा पाचपट सामान जास्त होते... मी पुन्हा तोच फोन केला... पुन्हा त्यांचे तेच उत्तर आले... एक्स्ट्रा सामानाची मी त्यांना पुन्हा पावती दिली... ही पावती हसत त्यांनी पुन्हा खिशात ठेवली...! 


एकावर एक फ्री... हि बिझनेस स्ट्रॅटेजी मी समजू शकतो, पण एकावर पाच फ्री... ??? 


मग 2022 साल उजाडले... 


यावेळी सामानाची लिस्ट घेऊन मी स्वतः दुकानात गेलो. दुकानात भरपूर कर्मचारी आहेत, परंतु माझ्याकडची लिस्ट घेऊन त्यांनी स्वतः सामान बांधायला सुरुवात केली. 


मी बारकाईने पाहत होतो, माझ्या लिस्ट पेक्षा पाचपटीने जास्त गोष्टी ते स्वतःच्या हाताने बॉक्समध्ये भरत होते. 


मी त्यांना म्हणालो साहेब, आपण आपले नुकसान का करून घेता ? माझ्या लिस्ट प्रमाणेच मला सामान द्या...


यावर ते माझ्याकडे न बघता, स्टूल घेऊन, वरच्या कप्प्यातले सामान काढता काढता म्हणाले, 'डॉक्टर भरगच्च भरलेल्या ताटामधून दोन घास चिमण्यांना टाकले म्हणजे आपलं काही नुकसान होत नाही हो ...! 


ए त्या चौथा कप्प्यातला, नवीन माल काढ... त्यांचं सगळं लक्ष बॉक्स भरण्याकडे....


तरीही मी माझं बोलणं रेटत म्हणालो,  पण हा आपला व्यवसाय आहे साहेब, मला साहित्य देणे म्हणजे आपला तोटा आहे ...! मी आवंढा गिळत म्हणालो. 


तितक्याच उत्स्फूर्तपणे बॉक्समध्ये साहित्य टाकत ते म्हणाले, 'साहेब धंदा म्हणा, व्यवसाय म्हणा, कारभार म्हणा, कारोबार म्हणा.... जे काही करायचं ते नफ्यासाठी... मी पक्का व्यापारी आहे, तोट्यामध्ये कधीच व्यापार नाही केला मी ... 


'आत्ता बी मी तोट्यामंदी नाहीच, नफ्यामंदीच आहे...' चष्म्या मागून डोळे मिचकावत ते बोलले. 


मागितलेल्या गोष्टीपेक्षा, पाचपटीने भरलेल्या बॉक्स कडे बघत ' हे कसं काय बुवा ?' हा प्रश्न मला त्यांना विचारायचा होता...


माझ्या बावळट चेहऱ्यावर त्यांना तो दिसला असावा... ! 


'छोटू, आपल्याकडच्या दुरेघी वह्या संपल्या का रे ?  शेजारच्या दुकानातून दहा डझन मागव आणि घाल या बॉक्समध्ये.... !' हात झटकत ते बोलले. 


माझा बावळट चेहरा अजून तसाच असावा. 


नफा तोट्याचा त्यांनी मग उलगडा केला... 


'डॉक्टर तुमी कितीबी नाय म्हणले तरी जास्तीचा सामान पाहून तुम्हाला आनंद होतो का नाही ? तो माझा नफा.... 


दहा पोरं नाही, आता तुम्ही 50 पोरांना सामान देऊ शकता, त्या पोरांना आनंद होतो की नाही...? तो माझा नफा...


कटारिया काका कोण ? हे पोरांना कधीच कळणार नाही... पण 50 पोरं शिकत आहेत,  याचा मला आनंद होणार का नाही ? तोच माझा नफा... 


जलमाला येऊन आपण कोणाच्या उपयोगी नाही पडलो, हा खरा तोटा... ! 


"तोटा" या शब्दावर जोर देत , डाव्या हाताच्या तळहातावर उजव्या हाताने त्यांनी जोरात टाळी मारली...! 

आपून तोट्यात धंदाच करत नाही सायेब, पक्का व्यापारी आहे मी ...'

काउंटर वरच्या टेबलावर बोटांनी तबला वाजवत ते म्हणाले, 'ए चाय सांगा रे डॉक्टरला...!'  

तोट्याची शेती करून, आनंदाची बाग फुलवत; नफ्याची फुलं वेचणाऱ्या या माणसापुढे मी मनोमन नतमस्तक झालो ! 

चहाचा घोट घेऊन मी त्यांना म्हणालो, 'सर पण हे नुकसान किती आहे तुमचं, यात विनाकारण खर्च खूप आहे...' 


ते पुन्हा हसत म्हणाले, 'डॉक्टर पोरगं तुमचं असो, माझं असो किंवा आणखी कोणाचं असो, पोराच्या शिक्षणावर झालेला खर्च मी खर्च समजतच नाही, पोरांच्या शिक्षणासाठी केलेला खर्च हा भविष्यामध्ये भरभक्कम परतावा देणारी गुंतवणूक असते


गोरगरिबांची पोरं शिकतील तोच माझा परतावा... मंग खर्च झालाच कुठे ? 


आलतू फालतू स्कीम मध्ये अपुन पैसा गुतवतच नाही... सांगितलं ना ? पक्का व्यापारी आहे मी... ! 


मी खर्च केला नाही सायबा... फक्त गुंतवणूक केली... माझ्या पोरांवर गुंतवणूक केली... बघा भरभक्कम परतावा येणारच... 


"येणारच" म्हणताना पुन्हा डाव्या हाताच्या तळहातावर उजव्या हाताने त्यांनी जोरात टाळी मारली...! 


मी भारावून म्हणालो या अनाथ मुलांसाठी तुम्ही किती करत आहात... ? 


अनाथ कशानं हो... पालक म्हणून तुम्ही आहे...  मी आहे.... काय डॉक्टर तुम्ही सुद्धा...! 


'चहा संपवा तो...' म्हणत, टेबलावर पुन्हा त्यांनी हसत तबला वाजवला... 


तो तबला होता ? की माझ्या हृदयाची धडधड ?? माझं मलाच कळलं नाही...!


शर्टाच्या बाहीला डोळे पुसत कटारिया साहेबांची नजर चुकवत मी बाहेर पडलो !  


सर्व साहित्य घेऊन मी आलो... दहा ऐवजी 50 मुलांना ते वाटले... तरीही कुठेतरी अपराधीपणाची भावना होती. 


भावनेच्या भरात हा "वेडा माणूस" स्वतःचं खूप नुकसान करून घेत आहे, याची मला मनोमन जाणीव होती. 


याच प्रेमाच्या भावनेतून, 2023 साली मी यांच्याकडे ऑर्डर दिली नाही, आप्पा बळवंत चौकातील दुसऱ्या एका नामांकित दुकानातून मी साहित्य विकत घेण्यासाठी ऑर्डर दिली. 


लिस्ट नीट लिहून आणायची, अक्षर तुमचं तुम्हाला तरी कळतंय का ? बाजूला थांबा जरा, बाकीची गिऱ्हाईकं बघू देत ... वेळ किती लागेल म्हणून काय विचारता ?  इतकं एकच काम आहे का ? सामान काय आहे ते आत्ताच मोजून घ्या, पुन्हा कटकट करायची नाही... 

ए यांना मराठी भाषा कळत नाही, दुसऱ्या भाषेत सांग रे यांना जरा....  असा स्वतःचा पाणउतारा करून घेतला... 


यानंतर कॅरीबॅगचे सुट्टे पैसे देईपर्यंत आमच्या वस्तूंना त्यांनी आम्हाला हात सुद्धा लावू दिला नाही... ! 


हरकत नाही... जगात सगळेच कटारिया साहेब जन्माला आले तर मग अनुभव कसा मिळणार ? 


असो... हा प्रकार पुढे कटारिया साहेबांना कसा कोण जाणे पण कळला 


एके दिवशी शंकर महाराज मठाजवळ भीक मागणाऱ्या लोकांना मी तपासत असताना ते तावातावाने आले. 


चेहऱ्यावरचा मृदुभाव आणि ओठांवरची मृदू वाणी यावेळी लुप्त झाली होती. 


'डॉक्टर तुम्ही स्वतःला समजता काय ?  सेवा करण्याचा मक्ता काय तुम्हीच घेतला आहात का ?  थोडीफार सेवा आम्ही करत होतो, आमच्या हातून हि सेवा काढून घेण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला ?' 


सेवा करणे हा माझा अधिकार आहे आणि तो तुम्ही माझ्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. 


मी तुम्हाला माफ नाही करणार...


ते रागानं थरथर कापत बोलत होते... 


या जमदग्नीपुढे मी नतमस्तक झालो... पायावर डोकं टेकवलं... आणि त्यांच्या प्रेमाचा राग माझ्या झोळीत मनसोक्त भरून घेतला ! 


तुम्हाला ऑर्डर न देण्यामागे माझी पण काय भावना आहे, हे सर्व मी त्यांना उलगडून सांगितले, क्षणात या जमदग्नीच्या डोळ्यातून अश्रू ओघळले... ! 


स्वतःचे अधिकार मिळवण्यासाठी लोक आंदोलन, उपोषण, रास्ता रोको करतात... सेवा करण्याचा अधिकार मिळवण्यासाठी हा माणूस आज माझ्याशी... माझ्याशी ??? भांडला... !!! 


यानंतर पुढे दोन-तीन वेळा मोघम भेटी झाल्या. 


आता साल उजाडले 2024. 


यावर्षीची शैक्षणिक ऑर्डर "चॉईस" मध्ये देण्याशिवाय मला दुसरा कोणताही "चॉईस" नव्हता...! 


मी 13 जून 2024 ला कटारिया साहेबांच्या फोनवर फोन केला. पलीकडून आवाज आला हॅलो मी चिराग बोलतोय... ! 


चिराग हे कटारिया साहेबांचे सुपुत्र, चार्टर्ड अकाउंटंट आहेत ! 


' हॅलो चिराग सर, कटारिया साहेब कुठे गेले त्यांना फोन द्या ना..' 


'सर बाबा गेले' पलीकडून मंद आवाज आला. 


आमचा हा माणूस कोणालातरी मदत करण्यासाठी, कोणाच्यातरी पाठी धावतच असतो, सतत फिरत असतो, हे मला माहित होतं. त्याच भावनेने मी बोललो... 


'अच्छा गेले का ?  बरं पुन्हा कधी येतील ?' मी हसत बोललो.


'बाबा गेले सर... परत ते पुन्हा कधीही येणार नाहीत ... तुम्हाला माहित नाही ?'  

माझ्या पायाखालची जमीन सरकली... मी सुन्न झालो... मी काय ऐकतोय यावर माझा विश्वास बसेना...

भानावर आलो, तेव्हा मात्र या माणसाची मला भयंकर चीड आली... 

पलीकडच्या चौकात जाताना सुद्धा घरात आपण सांगून जातो... मग इतक्या मोठ्या प्रवासाला जाताना साधं आम्हाला सांगण्याची, निरोप घेण्याची सुद्धा तुम्हाला गरज वाटली नाही ? 

भांडून सेवेचे अधिकार मागता आणि असं बेजबाबदारपणे सोडून जाता ? 

आमच्या पोरांना पोरकं करून जाण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला ? 

हे...हे... असं... काउंटरवर तबला वाजवत आम्हाला आशा का दाखवलीत ? 

कटारिया साहेब, आता मी सुध्दा तुम्हाला माफ नाही करणार...! 

'सर काही काम होतं का ?' फोन अजून चालूच होता, पलीकडून चिराग सरांचा आवाज आला. 


'शैक्षणिक साहित्याची ऑर्डर द्यायची होती...' मी शांतपणे बोललो. 


'ठीक आहे सर, दोन दिवसात पाठवतो.' तितक्याच शांतपणे उत्तर आले. 


दोन दिवसांनी सामान आले, मी बॉक्स खोलले. 


आम्ही एक वही मागितली तिथे पाच वह्या होत्या, एक दप्तर मागितले तेथे पाच दप्तरे होते, पाच कंपास पेट्या मागितल्या तिथे 25 होत्या...

मी चिराग सरांना फोन केला, म्हणालो, 'चिराग सर, बहुतेक हा दुसऱ्यांचा बॉक्स आमच्याकडे आला आहे... हि आमची लिस्ट नव्हे, काहीतरी चूक झाली असावी ! 

चिराग सर म्हणाले, 'सर मी चार्टर्ड अकाउंटंट आहे, आकड्यांच्या खेळात मी चुकत नाही, तुम्ही दिलेले सामान मी अत्यंत काटेकोरपणे मोजून मापून स्वतःच्या हाताने बॉक्समध्ये भरलं आहे, चूक होणार नाही माझी...!' 


'अहो पण, चिराग सर... एका वस्तूच्या बदल्यात पाच पाच वस्तू आल्या आहेत आम्हाला...' 


'अच्छा... हां... हां.... त्या एक्स्ट्रा वस्तू का ?  त्या मी नाही... बाबांनी पाठवल्या असतील कदाचित सर ...'  


फोन कट झाला ...!!! 

इतका वेळ धरून ठेवलेला बांध आता फुटून गेला... ! 

कटारिया साहेब चिरंतन प्रवासाला निघून गेले...  

पण जाताना आपल्या विचारांची एक पणती मागे ठेवून गेले. 

या पणतीला नाव सुद्धा काय दिलं आहे... ?  चिराग... व्वा...!!! 

यानंतर 15 जून 2024 ला सर्व चिल्ल्यापिल्लांना बोलावून शैक्षणिक साहित्य दिले. 

नवीन वही, नवीन पुस्तक, नवीन दप्तर, नवीन कंपास पेटी पाहून या सर्व चिमण्या आनंदाने चिवचिवल्या... ! 

या चिवचिवणाऱ्या चिमण्यांना आता कोणत्या तोंडाने सांगू .... 

बाळांनो, आज खऱ्या अर्थानं तुम्ही पोरके झालात रे.... 

आणि तुमच्या बरोबर मी सुद्धा... !!! 

21 जून 2024


डॉ. अभिजीत सोनवणे 

डॉक्टर फॉर बेगर्स

सोहम ट्रस्ट पुणे 

9822267357

sohamtrust2014@gmail.com

Wednesday, 19 June 2024

प्रसाद हा देवाचा प्रतिसाद

 प्रसाद हा देवाचा प्रतिसाद

एका छोट्याशा गावात गेलो होतो. निवृत्त शिक्षकाचा सत्कार होता. ग्रामस्थांनी छान तयारी केली होती. चहापाणी झाले. हाती थोडा वेळ होता. लोक जमू लागले होते. गावातला तरुण म्हणाला, “थोडा वेळ आहे. भैरीच्या देवळात जाऊन येऊ !’’ माझ्या सोबत आलेल्या मित्राला देवळात जाण्याची गोष्ट फारशी आवडली नाही. त्याच्या चेहऱ्यावर दिसतच होते. मी निघालो तसा तोही निघाला. देऊळ म्हणजे खोपटेच होते. “फार जागृत स्थान आहे, सर ! सगळे गाव मानते.’’  गावातला तरुण म्हणाला. माझा मित्र कसनुसा हसला.

देवळात गेलो. मी नमस्कार केला. गुरवाने प्रसाद दिला. मी पाया पडून प्रसाद तोंडात टाकला. मित्राच्या हातात प्रसाद तसाच होता. त्याने पहिल्यांदा वास घेतला. मग निरखून पाहिले. न खाता त्याने प्रसाद हळूच एका दिवळीत ठेवला. मी प्रदक्षिणा घातली. गुरव म्हणाला, “बरं केलं तुम्ही सत्काराला आला ते! गुरुजी फार भला माणूस. सगळं गाव शानं केलं. कुठं अडू द्या-नडू द्या; देवासारखं गुरुजी पळत येनार. पण नशिबानं त्यांना न्याय दिला नाही !’’ गुरवाच्या या वाक्याने मी कान टवकारले. गुरुजींचे जीवन समजून घेण्यासाठी गुरवाला एक-दोन प्रश्न विचारले. गुरुजींची जीवन कथा ऐकून मी स्तब्ध झालो. तरुण मुलगा अकाली गेला. लग्न झालेल्या मुलीचा संसार मोडला. मुलगी माहेरी आली. बायकोला दोन्ही धक्क्यांनी वेड लागले. तिला सावरून, उभी करून गाडी रुळावर येत होती तेव्हाच मुलीने जीव दिला. एकमेकांच्या आधाराने ते दोघे उभे राहिले. सारे गावच कुटुंब बनवले. गुरुजींनी केलेले कार्य मला माहीत होते, पण ही सारी दु:खभरली कहाणी माहीत नव्हती.

कार्यक्रम छान झाला. निघताना मी आणि माझा मित्र गुरुजींचा निरोप घ्यायला मुद्दाम गेलो. मी निघताना गुरुजींना न राहवून विचारले, “हे सगळे कसे सहन केलेत?’’ गुरुजी म्हणाले, “आयुष्यात जे आपल्याला मिळते तो देवाचा प्रसाद मानला. चिकित्सा नाही. चिरफाड नाही. चिडचिड नाही. प्रसाद हातात आला की चटकन तोंडात टाकतो की नाही आपण? चवीचा विचार नाही करत. ताजे-शिळे म्हणत नाही. त्याला पेढा, मला गूळ का? म्हणत नाही. घेतो. खातो. धन्य होतो. हे कधी विसरलो नाही. प्रसाद देवाचा प्रतिसादच मानला !’’ माझे डोळे भरून आले. मी वाकून नमस्कार केला. छान हसून माझा हात हातात घेतला. स्पर्श आणि हास्याचा जणू मला त्यांनी प्रसादच दिला !

गुरुजींशी झालेल्या संवादातून केवढा हितोपदेश मिळाला;  तोही सहजच ! प्रसाद देवाचा प्रतिसाद असतो हे पटले तर जगणे किती सुंदर बनून जाते हे मला समजले. मंदिरात आपल्याला प्रसाद मिळतो त्याची आपण चिकित्सा राहोच, चर्चाही करत नाही. कुणाला चार शेंगदाणेच मिळतील तर कुणाला बत्तासा ! कुणाला काजूचा तुकडा असलेला शिरा मिळेल तर कुणाला करपलेल्या शिऱ्याचा लाभ होईल ! आपण प्रसाद घेतो, खातो आणि कृतकृत्यतेने हात जोडतो. देवळातल्या प्रसादासारखेच मानावेत आयुष्यातील प्रसंग ! जे वाट्याला आले ते आपल्या इष्टाचा प्रतिसाद  मानले की सारी घालमेलच संपते.. गुरुजींशी झालेल्या मुक्त संवादाने मी आतून उजळून निघालो.

एकदा माझी नाशिकला भागवत कथा झाली. सांगता झाली तेव्हा सर्वांना प्रसादही दिला. सारी आवराआवर झाल्यावर एक वृद्धा आली. म्हणाली, “प्रसाद कधी मिळेल?’’  सारे जिकडचे तिकडे झाल्याचे तिला कळल्यावर ती खट्टू झाली. तेवढ्यात त्या कार्यालयात असणारी एक महिला म्हणाली, “थांब मावशी. एक लाडू आहे. देते तुला !’’ वृद्धेला आनंद झाला. बुंदीचा लाडू हातात घेऊन तिने कपाळाला लावला आणि लाडवाचा एक तुकडा घेऊन उरलेला लाडू परत देत म्हणाली, “पुन्हा कुणी आलं तर यातला कणभर त्यालाही देता येईल. कुणी तसंच जायला नगं ! परसाद जीव निवण्यासाठी पायजे.. पोट भरण्यासाठी नाय् !’’

मला तिचे पाय धरावे वाटले. आध्यात्मिकतेने अनासक्ती येते ती अशी ! मन प्रसन्न असेल ना; तर मणाने नाही, कणानेही समाधान लाभते हे त्या वृद्धेच्या संवादातून उलगडले.

परमार्थ वेगळे काय शिकवतो? आयुष्यातला प्रत्येक क्षण भगवंताचा प्रसाद म्हणून स्वीकारता आला तर सारे तणाव, सारा वैताग संपून जाईल. जगणे ‘प्रासादि’क होईल. बीजात सारा वृक्ष सामावलेला असतो, तसा कणा कणात ब्रह्मांडव्यापी आनंद कोंदटलेला असतो. पण आपल्या हव्यासापोटी आपण ब्रह्मांडच खिशात घालायचे म्हणतो. मग हट्ट सुरू होतो. आणखी मिळवेन, खूप मिळवेन, जास्तीत जास्त मिळवेन… शेवटी ओंजळ रिक्तच राहते. असे निराश होण्यासाठी आपल्याला आयुष्य मिळालेले नाही. खरे तर आयुष्य हाच महाप्रसाद आहे. एकदा ते मिळाले म्हणताना, आणखी काय हवे? आता मिळवायला नव्हे तर वाटायला शिकले पाहिजे. तळहातावर मिळालेला गोपाळकाला, स्वत:साठी थोडा ठेवून कण कण सर्वांना वाटायचा असतो!

देता यायला लागले की आपणही कृष्ण होतो. परमार्थ म्हणजे जवळचे उत्तम सर्वांना देणे. थोड्यातलाही आनंद घेणे. आपले अश्रू रोखून हसण्याचे चांदणे पसरणे. बस्स, हव्यास आणि हट्ट सोडण्याची तयारी करायला पाहिजे.

।। जय श्रीगुरुदेवदत्त ।।

।। जय श्रीकृष्ण ।।

~संकलन

" अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन " विषयावर आधारित विवेकानंद विद्यालयात दोन दिवसीय प्रशिक्षणसंपन्न

" अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन " विषयावर आधारित विवेकानंद विद्यालयात दोन दिवसीय प्रशिक्षण  संपन्न

चोपडा येथील विवेकानंद प्रतिष्ठान व संशोधन केंद्र संचलित, विवेकानंद विद्यालयात प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षकांसाठी दोन दिवसाचे 
प्रशिक्षण  संपन्न झाले. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार होणारे बदल लक्षात घेता शिक्षकही समृद्ध व्हावे यासाठी अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन हा विषय घेऊन शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले. शिबिराचे उद्घाटन देवी सरस्वती व साने गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण संस्थेचे अध्यक्ष डॉ. विकास हरताळकर, उपाध्यक्ष घनशाम अग्रवाल, सचिव ड रवींद्र जैन, सहसचिव डॉ.विनीत हरताळकर, विश्वस्त व मुख्याध्यापक नरेंद्र भावे, मुख्याध्यापिका आशा चित्ते, माधवी भावे यांच्या हस्ते करण्यात आले. शिबिराचे प्रास्ताविक नरेंद्र भावे यांनी केले. डॉ. विकास हरताळकर यांनी सर्व शिक्षकांना शिबिर घेण्याचा उद्देश समजावत शुभेच्छा दिल्या.


पहिल्या दिवशी विद्यालय माझे देवाचे मंदिर हे गीत उपशिक्षिका वंदना वनारसे, माधुरी हळपे, नूतन चौधरी, ज्योती अडावदकर, वैशाली आढाव यांनी सादर केले. शुभांगी बोरसे यांनी शिक्षकांकडून नित्यस्मरण म्हणवून घेतले. पूर्व चाचणी शिक्षकांकडून सोडवून घेण्यात आली. पहिले सत्र राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाची दिशा व अपेक्षा हा विषय घेत नरेंद्र भावे यांनी घेतले. ओमकार घेत दुसरे सत्र अध्ययन स्तर अध्ययन निष्पत्ती व एकविसाव्या शतकातील कौशल्य यावर पवन लाठी यांनी घेतले. तिसरे सत्र 21व्या शतकातील कौशल्यासाठी मुलांना स्वतः शिकण्यास प्रेरित करणे, आव्हान देणे यावर जावेद तडवी यांनी घेतले.
दुसऱ्या दिवशी विद्यापीठ गीत हे उपशिक्षिका ज्योती अडावदकर, वंदना वनारसे, शितल पाटील, राजेश्वरी भालेराव यांनी सादर केले. राधेश्याम पाटील यांनी शिक्षकांकडून नित्यस्मरण म्हणून घेतले. पहिले सत्र विद्यार्थ्यांच्या जिज्ञासू वृत्तीचा सन्मान करणे, शिकण्याची गती वाढवणे व तंत्रज्ञानाचे उपयोग यावर जितेंद्र देवरे यांनी घेतले. दुसरे सत्र वर्ग व्यवस्थापनेतून अध्ययन व्हावे चैतन्यदायी यावर संजय सोनवणे यांनी घेतले. तिसरे सत्र नवोपक्रम व अध्ययन मोकळ्या तासिकेचे नियोजन व शिक्षण यावर नरेंद्र भावे यांनी घेतले.

         समारोपाला झालेल्या प्रशिक्षणावर आधारित सर्व शिक्षकांची चाचणी परीक्षा घेतली. शिबिरासाठी आकर्षक रांगोळी, डिजिटल बॅनर व छायाचित्रण कलाशिक्षक राकेश विसपुते यांनी केले. शिबिरात प्राथमिक व माध्यमिक विभागाचे चाळीस शिक्षक शिक्षिका उपस्थित होते.