My YouTube Channel

Click here to visit My YouTube Channel

Sunday, 11 June 2023

पू. साने गुरुजी : मातृहृदयी समर्पित शिक्षक :

 

पू. साने गुरुजी : 

मातृहृदयी समर्पित शिक्षक :

""""""""""""""""""""""""""""""""""""

पुण्य स्मरण : 

प्रा.बी.एन.चौधरी /९४२३४९२५९३. 

                    पांडुरंग सदाशिव साने, हे साने गुरुजी या नावाने साऱ्या महाराष्ट्राला परिचित झालेले होते. त्याकाळी गुरुजींना ओळखत नाही, असा एकही खान्देशी माणूस शोधून सापडणे मुश्किल होते. गुरुजींनी आपल्या जीवनात अनेक भूमिका प्राण ओतून वठविल्या आणि आपल्या समर्पणाच्या वृत्तीने त्यांना अजरामर करुन ठेवल्या. त्यातली महत्त्वाची आणि भावी पिढीला आकार देणारी भूमिका होती शिक्षकाची. साने गुरुजी हे पदवी प्रमाणपत्र घेऊन नोकरी करणारे, पोटार्थी शिक्षक नव्हते. शिक्षकी पेशा त्यांनी व्रत म्हणून स्वीकारला होता. कोणत्याही प्रकारचे व्यावसायिक शिक्षण नसताना, केवळ आत्म्याच्या उर्मीतून, नवनिर्मितीच्या ध्यासातून गुरुजींमधला शिक्षक तयार झाला होता. ते मातृहृदयी शिक्षक होते. शाळा ही मुलांना कोंडून ठेवण्याच्या कोंडवाडा नसून, विद्यार्थ्यांवर वेगवेगळे संस्कार करून बघण्याची ती एक प्रयोगशाळा आहे, असं गुरुजी मानत. शिक्षकी व्यवसाय, पैसा कमविण्यासाठी अथवा दोन वेळच्या जेवणाची बेगमी होण्यासाठी त्यांनी स्वीकारलेला नव्हता. त्याकाळी पारतंत्र्यात असलेल्या देशाला स्वराज्य, राष्ट्रीय शिक्षण, स्वदेशीचा महामंत्र देण्यासाठीच जणू गुरुजींनी, विद्यादानाचे कार्य हाती घेतले असावे. 

                    गुरुजींनी पुण्याच्या न्यू पुना कॉलेजमधून १९२४ साली एम. ए. साठी ऍडमिशन घेऊन, द्वितीय श्रेणीत एम. ए. पूर्ण केले. १७ जून १९२४ साली अमळनेरच्या खान्देश एज्युकेशन सोसायटीच्या हायस्कूलमध्ये, त्यांनी शिक्षक म्हणून नोकरीला सुरुवात केली. १७ जुलै १९०८ साली स्थापन झालेल्या खानदेश एज्युकेशन सोसायटीने प्रथम विद्यामंदिर शाळा सुरू केली. ती कालांतराने १७ जुलै १९३४ साली प्रताप हायस्कूल म्हणून नावारूपाला आली. स्वातंत्र्याची आणि स्वदेशाची चळवळ या काळात जोरावर होती. त्याच्या परिणाम संस्था चालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांवरही झालेला होता. या शाळेच्या विद्यार्थ्यांनी पुढे फार लौकिक मिळविल्याच्या नोंदी आहेत. साने गुरुजींची धडपडणारी मुले म्हणून ती प्रसिद्ध होती. 

                   गुरुजींना मुलं आणि फुलं फार आवडत. मुलांच्या आणि फुलांच्या सानिध्यात प्रत्यक्ष परमेश्वराचा सहवास लाभतो, असा त्यांचा मानस होता. नवीन काही करावे, हा ध्यास त्यांच्या मनाला सतत पछाडून टाकी. त्या दृष्टीने शिक्षकी व्यवसायात त्यांच्या कर्तुत्वाला नवीन धुमारे फुटले. मुलांच्या निरागसतेतूनच त्यांना जीवनाचे धडे देण्याचे कार्य गुरुजींनी सुरू केले.  प्रताप विद्यामंदिर फक्त शाळा न राहता, कर्मशाळा बनली. गुरुजी प्रताप विद्यामंदिरच्या वसतीगृहातच रहात. जे आजही आनंद भुवन म्हणून ओळखले जाते. प्रताप महाविद्यालयात शिक्षण घेत असतांना, या आनंद भुवन वसतीगृहात राहण्याचे भाग्य मला लाभले आहे. ज्या कर्मभूमीत गुरुजी राहिले, तेथली माती कपाळी लावताना अंगावर रोमांच उभे राहिले होते. जीवन कृतकृत्य झाल्याचे समाधान लाभले होते. पुढे शिक्षण संपल्यावर आयुष्यभर गुरुजींसारखं शिक्षण क्षेत्रात, मलाही ज्ञानदानाचे कार्य करता आले, हे मी माझे संचीत समजतो. 

                 साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हा गुरुजींचा स्थायीभाव होता. तो त्यांच्या वर्तनातून, वागण्या-बोलण्यातून, राहणीमानातून स्पष्टपणे दिसत असे. लांबकोट, काळी टोपी, ठसठशीत मिश्या आणि गळ्याभोवती उपरणे गुंडाळलेल्या गुरुजींची मूर्ती सात्विक वाटे. पायघोळ धोतर नेसलेले गुरुजी पुस्तकाविना सहसा दिसत नसत. अगदी प्रवासात देखील त्यांच्याजवळ पुस्तकं असत. गाडीत, रेल्वेत फार काय वेटिंग रूम मध्ये देखील, ते फावल्या वेळात पुस्तक वाचून, आपली ज्ञानाची तहान भागवीत असत. असा ज्ञानपीपासू व वेळेचे महत्त्व जाणणारा शिक्षक, विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय व्हायला वेळ लागला नाही. गुरुजींनी लवकरच विद्यार्थ्यांची मने जिंकली होती. 

                शिक्षणशास्त्राचे कोणतेही शिक्षण घेतलेले नसताना, गुरुजींचे अध्यापन आदर्श होते. आदर्श शिक्षकांच्या अंगी असावेत, असे सारे गुण त्यांच्या ठाई होते. वर्गात शिकवताना गुरुजी कधीही खुर्चीत बसून शिकवत नसत. शिकवताना त्यांना पाठ्यपुस्तकाचीही  गरज पडत नसे. कारण, विद्यार्थ्यांप्रमाणे ते स्वतः वर्गात शिकवायच्या विषयाचा सखोल अभ्यास घरुन करून येत. विषय शिकवतांना त्यांनी वेळेच्या आणि वेळापत्रकाच्या मर्यादेत स्वतःला मर्यादित करून घेतले नव्हते. एखादा विषय शिकवताना दुसऱ्या विषयाचा संदर्भ आला, तर ते त्या विषयावरही सर्वांकष चर्चा करीत. त्यांची माहिती व शिकवण्याची पद्धत इतकी अद्यावत असे, की विद्यार्थी तासंतास त्यांच्या शिकवण्यात मंत्रमुग्ध होत. पुढे गुरुजींचे अनेक विद्यार्थी मोठ्या पदावर गेले. त्यांनी आपल्या आठवणीत लिहून ठेवलेले आहे की, गुरुजी आम्हाला शिकवत होते हे सांगताना आम्हाला फार अभिमान वाटतो. वर्गात शिकवताना धड्यातील कारुण्य प्रसंगांनी रडलेले गुरुजी त्यांना पाहता आले. गुरुजींनाही आपण शिकवलेल्या कारुण्य रसात साश्रूपूर्ण नेत्रांनी डुंबलेले विद्यार्थी  पाहता आले. संवादाने मनामनाच्या तारा जुळवणारे धन्य ते गुरुजी आणी धन्य ते विद्यार्थी. 

                   साने गुरुजींनी आपल्या व्यवसायात तन-मन धन अर्पण केले.  कर्मज्ञान आणि त्यागाचा वसा घेतला. गांधी विचारांवर नितांत श्रद्धा ठेवली. यातूनच त्यांचे ओजस्वी, तेजस्वी व्यक्तिमत्वाला बहर आला. गुरुजींनी जीवनात संयम ,विवेक ,सेवा, प्रेम आणि सहकार्य यांना फार महत्त्व दिले. स्वच्छता, टापटीप आणि शिस्त त्यांना प्रिय होती. कोणतेही काम करण्यात त्यांनी कमीपणा वाटून घेतला नाही. त्यांनी मुलांवर आई सारखं प्रेम केलं. त्यांना मातृहृदयी शिक्षक ही ओळख मिळाली. यामुळेच विद्यार्थी व सहकार्यांमध्ये ते लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले. 

              शालेय अध्यापनाचे काम करत असतानाच गुरुजींवर छात्रालय प्रमुखांची जबाबदारी येऊन पडली. गुरुजींचा बहुतांशी वेळ विद्यार्थ्यांच्या सानिध्यात जात असे. गुरुजी, छात्रालयात असलेल्या विद्यार्थ्यांचे आई-बाप, भाऊ, मित्र होते. कोणत्याही वयाच्या विद्यार्थ्यांशी ते सहज संवाद साधत. त्यास आपलंस करून टाकत. छात्रालयात विद्यार्थी खऱ्या अर्थाने घडवता येतो, हे गुरुजींनी पटवून दिले. त्यांनी विद्यार्थ्यांना मायेने स्वावलंबन, सचोटी, सहकार्य, स्वाभिमान, देशाभिमान व बंधुभाव या गोष्टी शिकविल्या. शिक्षक म्हणजे वेगळा प्राणी, असे ते समजत नसत. खोटी प्रतिष्ठा कुरवाळत बसण्यापेक्षा, मुलांमध्ये मुलांसारखे होऊन राहण्यात त्यांना आनंद वाटे. त्यामुळे विद्यार्थ्यांनाही त्यांच्याबद्दल उगाच भीती वाटत नसे. त्यांचे कार्यालय विद्यार्थ्यांनी सतत गजबजलेले राही. त्याकाळी शिक्षकांना विद्यार्थी दचकून असत. ती भीती गुरुजींनी सहज दूर केली होती. 

                    छात्रालयात प्रभातसमयी, गुरुजी सर्वांना प्रेमाने उठवीत. त्यांना हवं नको ती चौकशी करीत. आजारी विद्यार्थ्यांची सेवा सुश्रुषा करीत. वेळप्रसंगी त्यांचे मल-मूत्रही आवरीत. मायच्या प्रेमाची पखरण करणाऱ्या शिक्षकांबद्दल विद्यार्थ्यांना प्रेम, आपुलकी, ममता वाटली नाही, तर नवलच नाही का ? मात्र, अशाही परिस्थितीत काही टार्गट, आळशी विद्यार्थीही असत. गुरुजी त्यांना शिक्षा न करता, त्यांची कामे स्वतः करून टाकीत. यातून विद्यार्थी वरमायचे, शरमायचे. मग ते गुरुजींची माफी मागत. अशाप्रकारे गुरुजी दगडातही देवपण आणीत असत. गुरुजी स्वतः कष्ट सोसत. स्वतःहून सर्वांना समजून घेत. समजून सांगत. यातून विद्यार्थ्यांमध्ये आपोआप सुधारणा दिसून येत असे. संयम हा गुरुजींचा महत्त्वाचा गुण. त्यामुळे आपल्या शिकवण्याच्या तात्काळ परिणामांची, त्यांना अपेक्षा नसे. ते वाट पाहायला तयार असत. मात्र, गुरुजी काही वेळा संतापत. संतापले म्हणजे त्यांच्या संताप वरच्या श्रेणीचा असे. अश्यावेळी ते स्वतःला शिक्षा करुन घेत. अबोला धरत. ही शिक्षा मुलांना सहन होत नसे. ते तात्काळ गुरुजींची माफी मागत. 

                 विद्यार्थ्यांशी सर्वार्थाने एकरूप झाला, तोच खरा शिक्षक. असे शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांची मनं वाचू शकतात. त्यांचा आनंद, त्यांचे दुःख, त्यांच्या अडचणी, आशा-अपेक्षा जाणून घेऊ शकतात. त्यावर उपायही करतात. त्यांच्या भविष्याला आकार देतात. साने गुरुजी असेच शिक्षक होते. त्यांनी अनेकांच्या अडचणी ओळखल्या. त्या सोडविल्या. कुणाच्या शाळेचे फी दरमहा भरली. कुणाच्या पुस्तकांचा खर्च उचलला. कित्येकांची जेवणाची सोय केली. अनेकांची प्रत्यक्ष सेवा केली. यासाठी, त्यांनी स्वतःच्या खर्चावर मर्यादा घातल्या. पोटाला चिमटा दिला. मात्र, कुणालाही हिरमुसलं होवू दिलं नाही. यामुळे, त्यांच्या पगारातील फार थोडा भागच त्यांच्या वाट्याला येई. त्यातही ते आनंदी राहत असत. त्यांचा आनंद भौतिक गोष्टींवर अवलंबून नव्हता. तो त्यांच्या स्वतःच्या मनाच्या निर्मळतेवर अवलंबून होता. 

              साने गुरुजी विद्यार्थ्यांवर वेगवेगळे प्रयोग करीत. शाळा आणि छात्रालय हे विद्यार्थ्यांना संस्कार आणि ज्ञानाची दीक्षा देणारी प्रयोगशाळा आहे, असे ते मानत. निसर्ग हा खरा शिक्षक असून, ज्ञानदानाचे कार्य चार भिंतीच्या वर्गात बसून करण्याचे काम नाही, अशीही त्यांची धारणा होती. नव्हे, तसा त्यांना विश्वास होता. म्हणून, वर्गात शिकवीत असतांना एखाद्या वेळी पाऊस सुरू झाला, तर ते शिकवणं थांबवून, मुलांना निसर्गाच्या वर्षाधारांच्या नृत्याविष्कार पाहायला मुक्त सोडू देत. त्यांच्या अशा वागण्यात कामचुकारपणा नव्हता. याची वरिष्ठांनाही कल्पना होती. गुरुजी जे करतील, ते चांगलेच करतील आणि त्यात विद्यार्थ्यांचे हितच दडलेले असेल, असा विश्वास त्यामागे असायचा. 

                 शिकवत असतांनाच, गुरुजी विद्यार्थ्यांना समतेची शिकवण देत. अतिशय छोट्या छोट्या, साध्या साध्या प्रसंगातून महामंत्र देण्याची कला त्यांच्या ठाई होती. एखाद्या विद्यार्थ्याने आणलेला डबा अथवा खाऊ ते इतरांना वाटत. अशावेळी त्या निष्पाप लेकरांना जात-पात, धर्म, पंथ शिवू शकत नसे. आपला खाऊ दुसऱ्याला देण्यासाठी लागणारी मनाची विशालता, अशा प्रसंगातून गुरुजी विद्यार्थ्यांत निर्माण करीत. उच्च-निच्च हा भेदाभेद त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये येवू शकला नाही. जगात फक्त एकच धर्म असून तो फक्त प्रेम करणं शिकवतो, असं गुरुजी म्हणत. या उदात्त विचारातून त्यांच्या, खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. जगी जे दीन पददलीत, तया जावून उठवावे.! या प्रार्थनेचा जन्म झाला. त्यांच्या शाळेतील गड्यासाठी त्यांनी सोसलेले कष्ट, मुलांनी उघड्या डोळ्यांनी पाहिले होते. त्याच्या अंत्यसमयी त्याला बंधू मानून गुरुजींनीच अग्नीडाग दिला. यापेक्षा विशाल बंधुप्रेमाचे उदाहरण मुलांना कुठे दिसणार होते. अशा दीपस्तंभासारख्या शिक्षकांची शिकवण, मुले कशी विसरतील. असे प्रसंग, अशा घटना विद्यार्थ्यांच्या मनःपटलावर प्रकाश टाकत. आणि अनपेक्षित पणे त्यांना दिव्य ज्ञानाचा लाभ होई. कृतीतून विद्यार्थी धडा शिकत. धन्य ते विद्यार्थी. धन्य ते शिक्षक. असा शिक्षक पुन्हा होणे नाही. 

                 तो काळ स्वातंत्र्यसंग्रामाचा काळ होता. गुरुजींसारख्या सहनशील व्यक्तीलाही पारतंत्राची जोखड झुगाराविशी वाटत होती. त्यांना शाळा आणि छात्रालयाचे क्षेत्र मर्यादित व बंदिस्त वाटू लागले होते. स्वातंत्र्यलढ्यात आपणही खऱ्या अर्थाने सहभागी व्हावे, असे त्यांना वाटले. त्यांनी पूज्य बापूजींची आज्ञा आणि दिक्षा घेवून स्वातंत्रसंग्रामात उडी घेतली. २९ एप्रिल १९३० साली गुरुजींनी शाळा सोडली. ते स्वातंत्र्यसैनिक झाले. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. देशात शेतकऱ्यांचे राज्य यावे, असे त्यांना वाटे. देशात स्वातंत्र्याचे वारे वहात होते. सारा देश पेटून उठला होता. गुरुजींनीही आपली शब्दांची मशाल पेटवली. आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान. शेतकऱ्यांच्या राज्यासाठी, लावू पणाला प्राण.! असे सूर गुंजू लागले. विविध ठिकाणी सभा रंगू लागल्या. माणसं पेटू लागली. देशभक्तीने प्रेरित होऊ लागली. स्वातंत्र्यसंग्रामात झोकून देऊ लागली. यामागे उभी होती एक संयमीत, अबोल, अमोघ शक्ती. सेनानी साने गुरुजी. एका आदर्श शिक्षकाचे, एका राष्ट्रप्रेमी स्वातंत्र्यसैनिकात रूपांतर झाले होते. वेळप्रसंगी शिक्षकाला आपली भूमिका बदलवता आली पाहिजे, हेच गुरुजींनी आपल्या कृतीतून जगाला दाखवून दिले.


♦️धन्यवाद : मा. हेमंतजी अलोणे आणि टिम देशदूत♦️


© प्रा.बी.एन.चौधरी.

      देवरुप, नेताजी रोड.

      धरणगाव. जि. जळगाव.


~संकलन 

Saturday, 10 June 2023

आम्ही केलेलं चांगलं काम...

 आम्ही केलेलं चांगलं काम

वर्गातील स्वच्छता दूत
चिन्मय बारी,कृष्णा बाविस्कर,लबिब शेख, हुजेफा खान, मनीष पाटील, रुद्र माळी 
वर्गातील स्वच्छता दूत

          इ.५ वी च्या वर्गातील हे काही विद्यार्थी वर्गात शेवटच्या तासाला वर्गात शिकवतांना लक्षात आले की हे विद्यार्थी शाळा सुटल्यावर नियमितपणे दररोज वर्गातील कागद, कचरा उचलून एका डस्टबिन मध्ये टाकायचे. श्रमेव जयते या उक्तीची प्रचिती या चिमुकल्यांच्या छोट्याश्या कृतीतून आली या गोष्टीचा विशेष आनंद वाटतो. बाळांनो, खर्‍या अर्थाने तुम्ही वर्गातील स्वच्छता दूत आहात.

कारगिल चौकात सापडलेले ३२० रु./- परत केले

     विद्यालयातील दर्शन बडगुजर, सर्वेश जोशी, श्रीकांत चौधरी या विद्यार्थ्यांना द्वितीय सत्र परीक्षेच्या कालावधीत ३२० रु/- सापडले ते त्यांनी प्रामाणिकपणे शिक्षकांकडे जमा केले. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वांनी खूप छान काम केलंत. तुमचं चांगलं काम, सजगता, प्रामाणिकपणा या तुमच्या अंगभूत गुणांचा तुम्हाला नक्कीच खूप फायदा होईल.

     तुमचं भविष्य उज्ज्वल आहे. तुमचं विवेकानंद परिवारातर्फे खूप खूप कौतुक आणि  हा चांगला संस्कार तुमच्यात रुजवणार्‍या तुमच्या आई-बाबांचं व कुटुंबियांच मन:पूर्वक अभिनंदन शुभेच्छांसह. तुमच्यासाठी या काव्यपंक्ती-

काम करण्यात गढून जा | गाणे गात रमून जा |

छोट्या छोट्या गोष्टीत बाळांनो, रस घेऊन जगत रहा|

Saturday, 22 April 2023

नवशिक्या, वाट हरवलेल्या पिलांची... आईशी पुनर्भेट

 

नवशिक्या, वाट हरवलेल्या पिलांची... आईशी पुनर्भेट.

चोपडा - परवा येथील जीवन ज्योती नर्सिंग होम मध्ये
उत्कृष्ट व वाजवी सेवा देणारे अस्थिरोग तज्ञ डॉ .नरेंद्र दादा शिरसाट व भुलतज्ञ डॉ.नरेंद्र पाटील यांना OT तून बाहेर आल्यावर पक्ष्यांची 3 पिले इमारतीतील ओपन व्हेंटिलेशन कडे भरकटलेल्या , भयभीत अवस्थेत आढळून आले.

स्थानिक पक्षी व वन्यजीव अभ्यासक हेमराज पाटील यांना त्यांनी रेस्क्यू कॉल केला. कार्यालयीन कामकाज वेळेत असल्याने मी स्वतः न जाता टीम सदस्य धनंजय यास संपर्क करून माहिती दिली.

लागलीच त्या ठिकाणी पोहोचून पक्षीचे पिल्ले त्याने सुरक्षितपणे ताब्यात घेतली. दिलेल्या सूचनेप्रमाणे
दुपारपर्यंत योग्य पद्धतीने फीडिंग व सांभाळ केला.

दुपारी त्याने ते पिल्लू माझ्या कडे आणून देण्यासाठी फोन केला. मी त्याला सांगितले की पिलांना ,
आपण जोखीम घेऊन सांभाळण्यापेक्षा त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करू.ते अधिक सुरक्षित व सोयीची असेल.

धनंजय , देवेंद्र आणि मी रुग्णालय परिसरात जाऊन
येथील कर्मचाऱ्याकडून ते पिल्लू आढळून आल्याचे लोकेशन घेतले. इमारतीच्या ओपन प्लेस मधून खाली पडलेली पिले घरट्यात रिलोकेट करण्यासाठी , इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर जाऊन आजूबाजूला घरट्याचा शोध घेतला. घरटे कोठेच आढळून आले नाही.

पण पाच - दहा मिनिटात ब्राऊन रॉक चॅट पक्षीच्या दोन मादी आमच्या जवळ येऊन मोठमोठ्याने हाका मारू लागल्या. कदाचित त्यांनी उघड्या खोक्यातील पिलांना बघितले होते.

तिसऱ्या मजल्याच्या मागच्या बाजूला व शेजारील
शाळेच्या बाजूला असलेल्या पत्री शेडच्या गोडावूनवर
दोघं आई जाऊन बसल्या.

तेथे पिलांना पोहोचवणे जरा अवघड होते. काहीतरी जुगाड करणे आवश्यक होते. बंद इमारतीच्या वरच्या मजल्यावर लांब दोरी घर्षण करून कापली.दोरीचे एक टोक खोक्याला बांधले. हळुवार अलगदपणे खोका पत्री शेडवर पोहोचवला. खोक्यातून पिल्ले बाहेर 
पडणार नाही याची यशस्वी काळजी घेतली.

सुरुवातीला दोन पिल्लू बाहेर आले. दोघे सारखे वयाचे व वाढ झालेले. तिसरे वाढ व वयाने लहान होते. खोक्यातून ते बाहेर येत नव्हते. शेवटी त्याला बाहेर काढून आईपर्यंत पोहोचवण्यासाठी , देवेंद्र भिंत उतरून तेथे यशस्वी सुखरूप पोहोचला.

मोठ्या दोन्ही पिल्ला जवळ एक आई व तिसऱ्या लहान पिलाजवळ दुसरी आई घिरट्या घालून आल्या.
हाका मारत , उड्या घेत त्यांच्यातील भीती दूर केली.
एक जायची दुसरी यायची , असे चार पाच वेळा झाले.
त्यांनी त्यांच्या चोचित आणलेले अन्न भराभर पिलांच्या चोचीत कोंबले.

पिलांना पत्री शेडच्या एका टोकापर्यंत हाका मारत , उड्या मारत नेले. दोन्ही इमारतींच्या मध्ये फूट दीड फूट
अंतराच्या मधल्या अरुंद पॅसेज मध्ये कुठेतरी घरटे होते.
जे आम्हाला शेवटपर्यंत दिसले नाही.

दोघं माता पक्षी ने भिंतीवर उड्या घेत , पिलांचा
आत्मविश्वास वाढवत आतल्या घरट्याकडे यशस्वी जबाबदार पालकाप्रमाणे नेले. सोबत असलेले दोघ
टीम मित्र व मी खूप खुश झालो.

इमारतीच्या खाली आल्यावर , तेथील कर्मचाऱ्यांने केलेल्या सहकार्याबद्दल , डॉक्टर साहेबांनी केलेल्या रेस्क्यू कॉल बद्दल आभार मानलेत.

दिवसभर उन्हाच्या तडाख्याने कासावीस व घशाला पडलेल्या कोरड पेक्षा जास्त कासावीस , पिले हरवल्याबद्दल , कुठेतरी निघून गेल्याबद्दल निश्चितच 
त्या आई झाल्या असतील. इकडे तिन्ही पिल्ले 
भीती च्या साम्राज्यात दाखल झाले होते.

विचार करा , आपल पाच-सहा वर्षांच मूल तास - दोन तास हरवले तर आपल्याला कसे वाटते. डोक्यात काय काय विचार येतात. घटनाक्रम फोटोत बघता येईल.

त्या सायंकाळी दोन्ही आई व पिलांची झालेली पुनर्भेट
फक्त ईश्वरीय ईच्छा...

सातपुडा निसर्ग संवर्धन संस्था फक्त निमित्त मात्र.

निसर्गातील प्रत्येक सजीव... गवतापासून वटवृक्षापर्यंत ,
चिमुकल्या फुलपाखरा पासून , जंगलाचा राजा वाघ व महाकाय देवमाशा पर्यंत , सर्वांचे अस्तित्व पर्यावरणात आगळे वेगळे व तितकेच महत्त्वाचे आहेत.

निसर्ग वाचवा...वसुंधरा वाचवा...

जागतिक वसुंधरा दिनाच्या शुभेच्छा..!!

पक्षीमित्र-हेमराज पाटील





























Thursday, 2 March 2023

मैफल तालांची...


 मैफल तालांची...

(एक अल्लड बोल-अभिनय गीत)

असे एकदा     स्वप्नी आले

तबला डग्गा    बोलु लागले 

नवथर बोटें     नाचु लागली 

तालांची मग   मैफल सजली 

               ***


त्रिताल बोले     'धा धिं धिं धा'

जसा चमकतो   रुपया बंदा

टाळी आणिक   'खाली' मधला 

सम-प्रमाणी      शासक खंदा 

              ***

झप-तालाचे    रूप-आगळे 

दोन-तीनचे      छंद-वेगळे  

जणु-संवादे     वंदी-जनांना

धीना-धीधीना  तीना-धीधीना 

               ***

         रूपक   हसे-गाली

         पावलें   सात-चाली

         मारीतो  गोड-ताना

         तिंतिंना धीना-धीना   

                 ***

दादरा करीतो       भलता नखरा 

सहाच मात्रांत      मारीतो चकरा 

लाडीक स्वभाव   मोहक दागीना

धाधीना-धातीना  धाधीना-धातीना

                  ***

केहेरवा म्हणे       मी रंगीला

नर्तनातुनी           करतो लीला

चला नाचुया      एकदोन दोनतिन्

धागेनतिनकधिन् धागेनतिनकधिन् 

                  ***

एकताल मग   हसुन बोलला

राजा मी तर    मैफिलीतला  

मी तर देतो     भक्कम ठेका

चलन देखणे   माझे ऐका 

                ***

ताल-मंडळी   खुशीत सगळी

तबल्यामधुनी  बोलु लागली

समेवरी मग     अचूक येता

स्वप्न संपले      जाग जागली 

स्वप्न संपले      जाग जागली

                ***

~संकलन

Tuesday, 21 February 2023

स्व.केंगे सर,...

केंगे सर,एक शिक्षणसाधक हरपला...

:- राधेश्याम पाटील (9960068747)

     'देखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती'... या बा. भ. बोरकरांच्या पंक्ती ज्यांच्यासाठी समर्पक वाटतात ते सुधाकर काशिनाथ केंगे अर्थातच केंगे सर.आज निवर्तले. यावर अजूनही विश्वास बसत नाही. खानं - पिनं,बोलनं मोजून मापून करणार हे लाघवी व्यक्तिमत्व होतं. मला कोणी प्रताप विद्यामंदिर चे मुख्याध्यापक, राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक, विवेकानंद विद्यालयाचे विश्वस्त यापेक्षा फक्त केंगे सर म्हणून लोक मला ओळखतात हीच माझ्यासाठी आनंदाची बाब आहे, एवढा सहृदयी होता हा माणुस.

         श्यामची आई मधला शामच त्यांचा राम होता, म्हणून साने गुरुजींचं त्यांना खूप अप्रूप होतं. लहानपणापासून मातृहृदयी साने गुरुजींचा संस्कार त्यांच्यावर झाल्याने तेही पुढे मातृहृदयीच झाले. साने गुरुजींच्या स्फूर्तीदायी गीतांनी त्याच्यात राष्ट्रभक्ती, राष्ट्रनिष्ठा व कर्तव्यनिष्ठा निर्माण केली व ती त्यांनी पुढे जपलीही. साने गुरुजींचा संस्कार घेऊन मोठं झालेलं हे व्यक्तिमत्व ; साने

गुरुजींचाच वसा घेऊन शिक्षणगंगेचे वारकरी झाले. त्यांचे मामा स्वर्गीय नानासाहेब य.गो. हरताळकर यांच्यामुळे ते चोपडा येथे आले आणि प्रताप विद्या मंदिर येथे गणिताचे शिक्षक म्हणून रुजू झाले. गणित विज्ञान हे त्यांच्या आवडीचे विषय. अध्यापक म्हणून काही वर्षे काम केल्यानंतर तेही मामांप्रमाणे मुख्याध्यापक झाले. तेव्हाच त्यांना राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला. पुरस्कार तसा त्यांनी गुंडाळून ठेवून दिला. कुठलेही मान-सन्मान मान-अपमान च्या भानगडीत न पडता ते आपलं सेवानिवृत्तीनंतरच आयुष्य जगले. दरम्यान आपणही एखादं रोपटं लावाव असा विचार त्यांच्या मनात आला आणि त्याला मूर्त स्वरूप डॉक्टर विकासकाका व डॉक्टर विजयकाका यांच्या माध्यमातून आलं. तुम्ही समाजकार्य करता मग एखादी शाळा का नाही काढत? या आग्रहाखातर बालसंस्कार वर्ग सुरू झाला आणि या नविनतम शाळेच्या मंगलाबाई सावित्रीबाई झाल्या आणि

केंगे सर ज्योतिबा त्यांच्याच अर्घ्यदानाने विवेकानंद विद्यालय ही गुणवत्ता पूर्ण शिक्षण देणारी शाळा ही ओळख निर्माण झाली. यातच त्यांना खूप आनंद होता. ते या शाळेचे पहिले मुख्याध्यापक झाले.

          कधी एकेकाळी शिक्षक म्हणून काम करत असताना असे अनेक विद्यार्थी त्यांच्या हाताखालून गेले जे आज मोठ्या पदावर कार्यरत आहेत. माननीय प्रा.अरुणभाई हे त्यांतले अग्रणी. त्यांच्या घरी चालणाऱ्या शिकवणी वर्गातून अनेक मुले घडली, ज्यांनी त्यांच्यातला हाडाच्या शिक्षक बघितला आहे.

          सरांचा शिक्षण हा विषय आवडीचा, जिव्हाळ्याचा आणि आनंदाचाही होता. बालक केंद्रित शिक्षण, आनंददायी शिक्षण, ज्ञानरचनावादी शिक्षण हे त्यांचे शैक्षणिक विचार होत. विविध विषय घेऊन त्यांचे विचार रेडिओवर वर्तमानपत्रात विविध मासिकात सदैव प्रकाशित होत राहिले. त्यातून त्यांचं शिक्षणवेड आपल्याला कळतं. लीलाताई, रेणूताई, रमेश पानसे, ज्ञान प्रबोधिनी यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध राहिले. शिक्षण क्षेत्रात येऊ घातलेला नवा विचार ते लगेच चोपड्यासारख्या ग्रामीण भागात पुण्याहून घेऊन येत असत. आणि पुढे असं होणार आहे, अस येणार आहे हे शाळेतल्या शिक्षकांना सांगून ठेवत असत. प्रताप विद्या मंदिर ही माझी शाळा आहे म्हणून या शाळेवर त्यांचे विशेष प्रेम होतच पण विवेकानंद वरही त्यांनी निस्सीम प्रेम केलं. वटवृक्षात रूपांतर होण्यासाठी एखाद्याला जमिनीत गाळून घ्यावे लागतं त्यातले बीज म्हणजे केंगे सर.

आपले मामा नानासाहेब हरताळकर यांच्या विषयी त्यांना आदर व प्रेम होता. मामांच्या प्रतिमेला कधी कसला डाग लागता कामा नये याची त्यांनी नितांत काळजी घेतली. जे प्रेम मामांनी त्यांच्यावर केलं त्या बदल्यात किंबहुना त्याहूनही अधिक प्रेम त्यांनी मामेभाऊ डॉक्टर विकास काकांवर केलं. त्यांच्या दोन्ही मुलांवर डॉक्टर अमित व डॉक्टर विनीत यांच्यावरही केलं, तद्वतच नातू नीलवरही खूप प्रेम केलं. आजही मानस, स्वरा व नील यांची शिकवणी घेत असत.

एखाद्या कुठल्याही बाबीचा मोह न बाळगता त्यापासून आपल्याला सहज बाजूला होता आलं पाहिजे, अस ते नेहमी सांगत. वाचनाचा त्यांनी ध्यास घेतला होता. पुस्तकासारखा दुसरा मित्र नाही असं ते नेहमी म्हणत. अलीकडे अध्यात्मिक पुस्तकांचा वाचन त्यांचे सुरू होतं. समवेत एखाद्याची गोष्ट त्यांना आवडली की लगेच ते त्यांना पत्र लिहून आपल्या शुभेच्छा कळवित असत. त्यांचे हस्ताक्षर अगदी मोत्यासारखे होते. या वयातही त्यांचा हात कधी लिहिताना थरथरला नाही. स्मरणशक्ती शाबूत होती. शिक्षण आणि फक्त शिक्षण हा एकच ध्यास घेऊन केंगे सर शेवटपर्यंत जगले ते शिक्षणासाठीच. शिक्षण चिंतन परिषद ही याचेच द्योतक होय. विवेकानंद नव्हे किंवा प्रताप नव्हे तर सबंध चोपडाचे शैक्षणिक वातावरण हे चांगलं राहिलं पाहिजे, चांगलं झालं पाहिजे, अद्यावत झालं पाहिजे; यासाठी आग्रह धरणारा हा एक शिक्षण तपस्वी होता. जो आज अनंतात विलीन होत आहे. त्यांच्या जाण्याने चोपडेकरांचा शैक्षणिक मार्गदर्शक हरपला,असे म्हणणेही वावगे ठरणार नाही. सरस्वतीच्या या उपासकाला स्वर्गात येतांना पाहून बुद्धीची देवता गणपतीलाही आनंद होत असेल. कारण तेथेही हा माणूस गणिताचा एखादा शिकवणी वर्ग निश्चितच चालविल यांत कुठलीही शंका नाही.

जेथे दिव्यत्वाची प्रचिती तेथे कर माझे जुळती 

***

एका ज्ञानवृद्ध,तपोवृद्ध वयोवृद्ध शिक्षणमहर्षीअसलेल्या श्रद्धेय श्री केंगेसरांच्या दुःखद निधनाची बातमी कळली आणि मन सुन्न झाले. खूप वाईट वाटले. एक चालत्याबोलत्या ध्यासपर्वाचा अस्त झाला.सदैव प्रसन्न, हसतमुख,मनमिळावू अभ्यासु व्यक्तिमत्त्व हरपले. त्यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबीयांवर आणि आप्तेष्टांवर डॉ. हरताळकर  कुटुंबावर कोसळलेल्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. सरांना भावपूर्ण श्रद्धांजली!!ईश्वर सरांच्या आत्म्याला चिरशांती देवो.ओम् शांतिःशांतिःशांतिः। प्रा. एस्.टी कुळकर्णी सौ.सुनेत्रा कुळकर्णी.

***

ललित शुक्ल:   केंगे नामक ज्ञानपर्व हरपले...!!!

***

[20/02, 11:49 am] A.N.Sonawane Sir : 

आदरणीय श्री.केंगे सरांच्या निधनाचे दुःखद वृत्त कळले आणि वाईट वाटले. 

सर आम्हाला शिक्षक होते, मुख्याध्यापक होते आणि मार्गदर्शकही होते. 

कौटुंबिक आणि शैक्षणिक पातळीवर ते सातत्याने विचारपूस करायचे. 

तुमचा सध्याचा दिनक्रम काय? हा प्रश्न आता कोण आस्थेने विचारेल?

अभ्यासू, विचारवंत आणि चिकित्सापूर्ण शैक्षणिक विचारांसाठी स्व.केंगे सर सुपरिचित होते. 

परमेश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरःशांती देवो हीच इश्वराला प्रार्थना. 

त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ति परमेश्वर देवो!🌺

॥ ॐ शांती शांती शांती: ॥

***

[20/02, 12:57 pm] प्रा संदीप पाटील: 

शैक्षणिक क्षेत्राला प्रकाशित करणारा नंदादीप विझला

भावपूर्ण श्रद्धांजली!

***💐💐💐💐

[20/02, 10:26 pm] प्राचार्य राजेंद्र महाजन सर:

आदरणीय केंगे सरांचे निधन वार्धक्याने जरी झाले असले तरी निव्वळ धक्कादायक आहे.

आजच्या काळात चरणस्पर्श व्हावे असे पाय दुर्मिळ झाले आहेत.आपण आपण माझ्यासाठी नेहमीच आदर्शवत होता.आपले कलासक्त बोलणे,कलेची ओढ मला आश्चर्यचकित करायची.आपण ज्ञानाचा सागर होता तितकेच सहृदयी व हळव्या मनाचे होता.अलिकडच्या बदललेल्या शिक्षणव्यवस्थेविषयी आपल्या मनात चीड होती,आपण संयत शब्दात माझ्याजवळ कधीकधी व्यक्त करायचात.


माझ्या सेवानिवृत्तीच्या दिवशी(३१जाने.२०२३) आपण प्रमुख अतिथी होता.तीन तास आपण माझे गुणगान समरसतेने ऐकत होता, तितकेच आपण माझ्या कार्यकर्तृत्वाविषयी भरभरुन बोललात.कार्यक्रम संपल्यावरही खूप वेळ माझा हात धरून जुन्या आठवणींना उजाळा देत होता.

आज सारे आठवतांना डोळे पाणावलेत.आपण प्रताप विद्या मंदिराचा सन्मान जपला आणि वृद्धिंगत केला.सचोटीने अध्यापन केले व उमदे प्रशासन केले.

विवेकानंद विद्यालय तर आपण उभे केले,घडवले, नावारुपाला आणले.अख्खी हयात आपण सुसंस्कृत शिक्षणाला प्राधान्य दिले.

आपला सहवास नेहमीच हवाहवासा राहिला.आज आम्ही गुरुविना पोरके झालो.आपल्याला चिरशांती लाभो ही प्रभुचरणी प्रार्थना 

भावपूर्ण आदरांजली,ओम शांती शांती शांती💐💐💐💐💐

***

गौरव महाले सर :

आम्हा धडपड्या लेकरांचे साने गुरुजी!!!

आदरणीय केंगे सर....

शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या मधील शिक्षक आपण जिवंत ठेवलात आणि माझ्यासारख्यान्च्या श्वासात शिक्षकांच्या रूपाने ऑक्सिजन दिलात.....

 आणि त्यातून  आम्ही मास्तर म्हणून घडलो. गुरुमाऊली साने गुरुजींच्या सहवासातील गोष्टी तुम्ही आम्हाला सांगत गेलात आणि नकळतपणे आमच्यात मास्तरकीचे बीजं पेरत गेलात......

 You are every inch teacher 

तू हाडाचा शिक्षक आहेस....

 हे तुमचे शब्द कौतुकाचे शब्द आणि पाठीवरील शाबासकीची थाप आमच्यातील शिक्षक सोबत चांगला माणूस घडवत गेला. आम्ही आमच्या समोरील विद्यार्थ्यांच्या हृदयात घर करण्यात थोडेफार यशस्वी होत असू..... तर त्या घराच्या बांधकामाचे सर्व मटेरियल मात्र आपणच पुरवलं आहे हे विसरून कसं चालेल?

कारण शिक्षक म्हणून आपणच आम्हास घडवलंय...

आपल्या प्रत्येक भेटीअंती आपण सदैव शिक्षण ,सामाजिक परिस्थिती, विद्यार्थ्यांची काळजी आणि शिक्षण पद्धती यावरच चर्चा केलीत....

कधी-कधी आपल्या बोलण्यात उद्विग्नता जाणवायची.....ती आपणास असह्य झाली म्हणून आपण अखेरचा निरोप घेतलात का?

पण सर काळजी करू नका....आम्ही आमच्यावतीने शक्य त्या प्रयत्नांनी आपला विचार आणि तळमळ जागृत ठेवू....

चांगल्या आणि विधायक गोष्टींचे मनापासून कौतुक करणारी आणि खरंच मनापासून ज्यांचा चरणस्पर्श करावा अशी खूप कमी माणसं या जगात आता शिल्लक राहिलीत.... त्यात आपण अग्रस्थानी होता!!

ती पोकळी मात्र अवश्य जाणवेल.....

आपण एकदा म्हणाला होतात...

" प्रसिध्दीच्या मागे लागलं की कार्याची सिद्धी होत नाही"....

आम्ही हे नेहमी लक्षात ठेवू!!!

विवेकानंद विद्यालयातील आपल्या सोबतच्या सहवासातील सोनेरी क्षण माझ्या आयुष्यातील खूप मोठी शिदोरी आहे ...त्या संस्कारांच्या शिदोरीच्या जोरावरच पुढचं आयुष्य चाललंय !!!

***

साने गुरुजींना बघितलेले केंगे सर गेले.... 

चोपडा येथील साने गुरुजींचा सहवास लाभलेले माजी प्राचार्य सुधाकर केंगे यांचे काल निधन झाले. 

साने गुरुजींच्या आठवणी सांगणारी ही त्यांची ५ महिन्यापूर्वी त्यांच्या घरी मी घेतलेली मुलाखत...

गुरुजींसारखेच केंगे सर अतिशय प्रेमळ होते हे त्यांचे बोलणे ऐकताना लक्षात येते...चोपड्यात त्यांनी मोठे शैक्षणिक कार्य  केलं...साने गुरुजींचा परिसस्पर्श झालेले आयुष्य कसे समर्पित होऊन जाते याचे केंगे सर उदाहरण होते....

माणसं निघून जातात...जागा भरून निघत नाहीत..कोरड्याठाक आणि आत्मकेंद्रित होत चाललेल्या समाजात ही प्रेमळ,करुणामय माणसं कुठून आणायची....? 

केंगे सरांची ही मुलाखत जरूर ऐका... आपण काय गमावलंय हे बघून डोळ्यात पाणी येतं....

~हेरंब कुलकर्णी

लिंक 

https://youtu.be/u90wmOvfPJQ

***

Monday, 20 February 2023

स्व.केंगे सर,...

स्व.केंगे सर,

सस्नेह सा.नमस्कार 

संवादात नेहमी 'शिक्षण,' शिक्षणातील बदल हा विषय, तुमची दिनचर्या कशी असते? आई-बाबा,ताई, मुले कशी आहेत? समाजात काय चाललंय, काय नवीन विशेष? "ॠतु बदलतात. ऋतु बदलण्यावर माणसाचा विश्वास असायला हवा." असं तुम्ही नेहमी म्हणायचे. आस्थेनं होणारी विचारपूस  याची उत्तरं कुणाला द्यावीत हा 'प्रश्न' तुम्ही मागे सोडून गेलात सर. काल तुमचा फोन आला व हाॅस्पिटलला भेट घेतली त्यावेळीही हीच चर्चा- तुमचं काय सुरुय सर? परीक्षा कधी आहेत?आमच्या नीलने आज पोवाडा छान गायला का?  तसंच TET परीक्षा, बदलत्या शिक्षण प्रक्रियेबद्दल चिंता व्यक्त केलीत. जगतांना आणि शेवटच्या श्वासापर्यंत आपण शिक्षण, वाचन व त्यावरील चिंतन हा ध्यास सदैव जपलात.  आयुष्यात तुमच्यासोबत केलेल्या चर्चेत काही क्षण घालविलेला प्रत्येक व्यक्ती तुमच्या विचारांचा पाईक आहे. त्यामुळे शैक्षणिक, सांस्कृतिक,सामाजिक आणि राजकीय या क्षेत्रात होणाऱ्या  बदलांना सामोरे जाण्याची शक्ती,  सकारात्मक दृष्टी आणि दृष्टिकोन आपण देऊन गेला आहात. तुम्ही निर्माण केलेल्या पाऊलवाटेवरुन मार्गक्रमण करण्याचा व समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण पोचवण्याचा आम्हां सर्वांचा प्रामाणिक प्रयत्न राहील. त्याबद्दल तुम्ही निश्चिंत रहावं. भगवंतांने आपल्या पवित्र आत्म्यास शांती प्रदान करावी हीच प्रार्थना.

ॐ शांति शांति शांति 🌸🌺🌸

~प्रसाद वैद्य व परिवार