My YouTube Channel

Click here to visit My YouTube Channel

Wednesday, 10 February 2021

समाधान

समाधान

सहजच... 

बंद पडलेली कार रस्त्यावर लावून मी बस मधे चढलो तर खरं.. 

पण आतली गर्दी बघून जीव घाबरला. बसायला जागा नव्हती. तेवढ्यात एक सीट रिकामी झाली.पुढचा एक जण सहज तेथे बसू शकत होता ....पण त्याने ती सीट मला दिली.  पूढच्या stop. वर पुन्हा तेच घडले. पुन्हा आपली सीट त्याने दुसऱ्याला दिली. आमच्या पूर्ण बस प्रवासात हा प्रकार चारदा घडला,बर हा माणूस अगदी सामान्य दिसत होता,म्हणजे कुठे तरी मजदूरी करून घरी परत जात असावा,आता मात्र शेवटच्या stop. वर आम्ही सर्वच उतरलो. 

तेंव्हा उत्सुकता म्हणून मी त्याच्याशी बोललो.  विचारले की प्रत्त्येक वेळी तुम्ही तुमची सीट दुसऱ्याला का देत होता ??  

तेंव्हा त्याने दिलेले उत्तर हे असे •••••

मी काही जास्त शिकलेला नाही हो..  अशिक्षितच आहे. मी एके ठिकाणी कमी पैशावर काम करतो पण माझ्या जवळ कुणाला देण्यासाठी काहीच नाही. ज्ञान नाही,पैसा नाही.

 तेंव्हा मी हे अस रोजच करतो. आणि मी हे सहज‌ करू शकतो.  


दिवसभर काम केल्यानंतर ‌ अजून थोडा वेळ उभं राहणं मला जमत.

  मी तुम्हाला माझी जागा दिली.तुम्ही मला धन्यवाद म्हणालात ना..त्यातच मला खूप समाधान मिळालं. मी कोणाच्या तरी कामी आलो, कोणाला काही तरी दिल्याच समाधान झालं..

असं मी रोजच करत असतो.   हा माझा नियमच झाला आहे••• 

आणि रोज मी आनंदाने घरी जातो.•••

उत्तर ऐकून मी थक्कच झालो. त्याचे विचार. व समज बघून याला अशिक्षित म्हणायचे का? 

काय समजायचे ?

 कोणाकरिता काही तरी करायची त्याची इच्छा ,

••••ती पण स्वतः ची परिस्थिती अशी असताना . •••मी कशा रीतीने मदत  करू शकतो??

त्यावर शोधलेला उपाय बघून  देव सुध्दा आपल्या या निर्मीतीवर खुष असेल. माझ्या सर्वोत्तम कलाकृती पैकी ही एक कलाकृती . 

असं दिमाखात सांगत असेल .••••••

        त्याने मला खूप गोष्टी शिकवल्या. स्वतःला हुषार शिक्षित समजणारा मी त्याच्या समोर  खाली मान घालून  स्वतःचे परिक्षण करू लागलो. किती सहज त्याने त्याच्या समाधानाची व्याख्या सांगितली. देव त्याला नक्कीच पावला असणार..

मदत ही खूप महाग  गोष्ट आहे  कारण मनाने श्रीमंत असणारे खूप कमी लोक असतात .•••••

सुंदर कपडे, हातात पर्स , मोबाईल , डोळ्यांवर गॉगल, चार इंग्लिशचे शब्द येणे म्हणजेच  सुशिक्षत  का ? हीच माणसाची खरी ओळख का ? मोठं घर , मोठी कार , म्हणजे मिळालेले समाधान का ?

 कोण तुम्हाला केंव्हा काय शिकवून जाईल????? व  तुमची धुंदी उतरवेलं सांगता येत नाही .•••

   या माणसाच्या संगतीने माझे विचार स्वच्छ झाले. 

   म्हणतात ना •••

    " कर्म से  पहचान  होती है  इंसानों  की ।

      वरना महंगे कपड़े तो पुतले भी पहनते हैं दुकानों में "..


~संकलन 

Wednesday, 12 August 2020

कृष्णा,

 

श्रवणानंद देणारे अप्रतिम अभिवाचन....

जन्माष्टमीच्या निमित्ताने वाचलेली, कै. दुर्गा भागवतांनी लिहिलेली ही सर्वोत्तम पोस्ट:

अभिवाचन स्वर अनामिक🙏🏻

🌿

कृष्णा, 

तुला कसलं संबोधन लावायचं? तू आकाशासारखा वाटतोस मला, आकाश कसं सतत माथ्यावर असतं आपण जिथे जाऊ तिथे सोबत करतं पण त्याचा निळा रंग बोटावर नाही घेता येत… 

खरं म्हणजे तुझं नाव घेतल्यावर तू मानवी रूपात डोळ्यासमोर येतच नाहीस.. आधी येते ती आकाशाची गडद निळाई आणि मग त्यामागोमाग लहरत येतं एक मोरपीस… तुझं मोरपीस!

तुझ्याइतका मानवी जीवनात मिसळलेला कुठलाच देव नाही बघ! प्रत्येक नातं तू समरसून जगलास आणि वेळ येताच ते नातं त्यागून मोकळाही झालास! कधी परत वळून बघितलंस का रे मागे? तुझ्यामागे त्या माणसांचं काय झालं असेल तुझ्याशिवाय ?

तुझं सगळंच अतर्क्य! तू प्रचलित नियम मोडलेस. जन्म घेतलास वसुदेव देवकीच्या मथुरेत पण वाढलास नंद यशोदेकडे गोकुळात! दहीदुधाच्या चो-या केल्यास, भलत्या वयात गोपिकांची छेड काढलीस. सुदामा, अर्जुन, उद्धव यांचा मित्र तू होतासच पण द्रौपदीचा सुद्धा 'सखा' झालास. हे सुंदर नातं तू भारतीय स्त्रीला दिलंस. 'बाईचा मित्र' ही संकल्पनाच नव्हती तुझ्याआधी आपल्याकडे, 'तो' स्त्रीचा पिता, पती किंवा पुत्र असावा अशी आपली समाज रीत! विवाहित राधेचा प्रियकर झालास. अगदी प्रेमाचं प्रतिक म्हणून नाव घेताना राधेचं नाव तुझ्याआधी येतं.

 पुढे अष्टनायिकांचा पती झालास तरी जरासंधाच्या तावडीतून सोडवलेल्या सोळा सहस्र स्त्रीयांना अभय दिलंस. तुझ्यानंतरही अनेक वर्षांनी सूरदासांनी तुझं बालपण त्यांच्या पदांतून मांडलं, मीरेने तुला 'नटनागर गिरिधारी' म्हणत साद घातली.

एक सांग, तू अनेक नाती निभावलीस पण जीव जडवलास तो फक्त राधेवर…! खरं ना? गोकूळ सोडल्यावर परत तू बासरी वाजवल्याचे उल्लेख कुठेच आढळत नाहीत.

गीतेत 'यदा यदा हि धर्मस्य...' म्हणत तू परत येण्याचं वचन दिलं आहेस. पण आता युद्धासाठी नको रे येऊस, आम्ही माणसं म्हणजे एक एक बेट झालोय, यावर नात्यांचे पूल बांधायला ये! 

आणि हो, येताना रुक्मिणीला नाही आणलंस तरी चालेल पण राधिकेला सोबत घेऊन ये, म्हणजे तुझी बासरी ऐकायला मिळेल. 

कृष्णा, पुन्हा एकदा बासरीत सूर भरायला ये!


दुर्गा भागवत.🙏 

 श्रवणानंद घेऊ या

~संकलन

Tuesday, 21 July 2020


सुखाचा_शोध -लेखिका- डॉ. विजया वाड.


#सुखाचा_शोध-

लेखिका- डॉ. विजया वाड.

      उदयाचल हायस्कूल, गोदरेज, येथे विज्ञान शिक्षिका म्हणून मी कार्यरत होते. सारा दिवस सासूबाई मुली सांभाळत, त्यामुळे सकाळचा चहा, नाश्ता ही माझी जबाबदारी होती.
      उदयाचलची नोकरी आठ पन्नास ते ५ होती. म्हणजे रोज आठ तास दहा मिनिटे मला आठ सोळाची गाडी मुलुंडहून विक्रोळीस जाण्यासाठी पकडावी लागे. म्हणजे घर आठ पाचला सोडावे लागे.
      सक्काळी मी साडेसातला धांदलीत चहा केला नि गाळणीतला चहाचा चोथा ( जो फार गरम होता) डस्टबिनमध्ये रिकामा करायला धावले.
      माझ्या सासूबाई बेसिनवर दात घाशीत होत्या नि डस्टबिन बेसिनच्या खाली होती. त्या बाजूस होईनात म्हणून मी पायाच्या अंगठ्याने कुंडीचे झाकण दाबून उघडले नि तो चोथा कुंडीत टाकला.
      दुर्दैव  माझे ! तो उकळता चोथा कुंडीत न पडता त्यांच्या पायावर पडला. चुकून हो !
      तुम्हाला पण वाचून पटलं की नाही हो ? पण त्या संतापल्या. ब्रश फेकला. जोरात ओरडल्या, "मुद्दाम उकळत्या चहाचा चोथा माझ्या पायावर टाकला." मी ओशाळी उभी ! "कालचा सूड उगवला !" त्या पुढे ओरडल्या.
       मधल्या खोलीत माझे सासरे पेपर वाचत होते नि यजमान दाढी करीत होते. दोघे धावत आले. "कसला सूड? काय गं? शिकलेल्या मुली अशा वागतात?" सासारे रागावले.
     सासूबाईंचा गोरा गोरा पाय लाल झाला होता नि त्यावर फोड? बाप रे बाप ! "अहो तो चहाचा गरम चोथा खरोखर चुकून पडला होता हो ! कसला सूड?"
        त्याचं असं झालं होतं. मी नि माझे यजमान सासू-सासऱ्यांजवळ राहात होतो. राहाते घर त्यांचे होते. मुली चिमुकल्या होत्या. आई आपल्या मुलांना शिस्त लावायचा प्रयत्न करतेच ना? सांगा पाहू !
       प्राजक्ता-माझी मोठी मुलगी- हिला काही कारणाने मी कुल्यावर चापट मारली. तशा त्या संतप्त झाल्या. इतक्या तापल्या की धुण्याची मोठी काठी त्यांनी मजसमोर धरली, " ही घे, नि मार माझ्या टाळक्यात ! मुलींवर हात उचलते !" त्या कडाडल्या.
       मी सौम्यपणे म्हटलं, "माझ्या मुलींना मी शिस्त लावायचा प्रयत्न करतेय, त्यात कृपा करून तुम्ही मधे पडू नका." चुकलं का हो माझं काही प्रिय वाचकांनो?
     पण त्या ठाशीवपणे म्हणाल्या, "ते 'आपल्या'घरात ! माझ्या घरात हे चालणार नाही !" मी गप्प ! अपमान गिळला. ते तेवढ्यावरच थांबलेले वर्तुळ... ! त्याचा सूड ?
       मी आश्चर्य करीत उभी ! माझे यजमान दाढी करीत होते. अर्ध्या गालावर साबण ! तसेच उठले, मला म्हणाले, "का गं आईच्या पायावर तू  उकळत्या चहाचा चोथा टाकला? किती भाजला तिचा पाय ! फोड आले !"
        सासरे बोलले... मी गप्प बसले. पण नवरा ? त्यालाही असं वाटतं की मी हे मुद्दाम केलं? आपण कुणाच्या जिवावर सासरी येतो हो ? नवरा अगदी 'आपला' असायला हवा ना ! सांगा! त्याला तरी वाटायला हवं नां.... की बायकोनं हे मुद्दाम नाही केलं !
       बरं ! जी 'सूडकथा' सासूबाईंनी रंगविली ती ना ह्यांना ठाऊक होती ना माझ्या सासऱ्यांना !राईचा पर्वत कसा होतो कळलं ना?
       आठ सोळा केव्हाच चुकली होती. नवऱ्यास मी सासूच्या धाकाने अहो जाहो करीत असे. पण त्या क्षणी फ्यूज उडाला होता. रागाचा पारा उसळी मारुन डोक्यापार गेला होता. मी एकेरीवर आले. पर्वा न करता कुणाची !
      "तुलाही असं वाटतं की मी हे मुद्दाम केलं? तुझाही माझ्यावर विश्वास नाही? मग कशाला राहू मी या घरात? चालले मी !" रागाच्या अत्युच्च क्षणी ही अठ्ठावीस वर्षांची विजू घर सोडायला निघाली.
       मी एक बॅग काढली. माझे दिसतील ते कपडे त्या भरले. मग मुलींचे फ्रॉक भरू लागले. नवरा म्हणाला, "त्यांचे फ्रॉक का भरतेयस?"
       आता तर माझ्या रागाने परिसीमा गाठली. मी रागाने त्याला दम भरला "मुलं 'माझ्या ' आहेत. तू पोटातून काढल्यायस का? मग गप्प बस !" यावर तो निरुत्तर ! पुरुष होता ना ! मुली पोटातून कशा काढणार ? माझे सासू-सासरे अवाक्... निशब्द ! काय चाललेय काय हे ?
      माझा दादा आर्थररोड जेलचा सुपरिटेंडेंट होता. माझ्या घरात नवरा डॉक्टर असल्याने फोन होता. १९७३ मध्ये तेव्हा घरात एमटीएनएलचा फोन असणे हेही अप्रूप होते.
        मी दादाला फोन लावला. बापविना लेकरु होते मी ! दादाच वयाच्या अकराव्या वर्षापासून माझा बाप होता. "दादा, असं झालं...." मी रडत रेकॉर्ड लावली. " ज्या घरात विश्वासच नाही उरला, तिथे का राहू मी?"
       दादाने शांतपणे सारे ऐकून घेतले उत्तम श्रोता बनून. "मी येतो तो पर्यंत शांत बस. मी नक्की घेऊन जाईन हं विजू."
       बस. मला आणखी काय हवे होते. मी लगेच डिक्लेअर केले. "दादा माझा येतोय मला न्यायला. मी नि मुली तासाभरात निघू."
       घर चित्रस्तब्ध झाले. मुली तोंड शिवून कोपऱ्यात उभ्या. रोज मी शाळेत असे तेव्हा त्या आजीजवळ असत. पण या क्षणी कोण 'आपलं' ते त्या चिमण्या जीवांना कळत नव्हतं. आईवर लेकरांचा जीव असतोच नं !
      आम्ही तेव्हा मुलुंड पश्चिम येथे रणजित सोसायटीत राहायचो. दादा तासाभरात आला. पूर्ण वेश ! जेलरचा ! एकदम कॅडॅक !... सोसायटीभर गॅलऱ्या भरल्या‌.
       वाडांकडे जेलर आला ! बूट काढून चक्क खाली बसला. सासूबाईंच्या पायाशी. त्यांच्या फोड आलेल्या पायावर मायेने हात फिरविला अलवार. "विजू, बर्नाल लावले का?"
       या भांडणात कुणाच्याही ते लक्षात आले नव्हते. मी धावत बर्नाल आणले मधल्या खोलीतून.     त्याने ते पायाला लावले. मग म्हणाला, "ती मिळवती आहे आणि नसती तरी मला जड नाही. बाप आहे मी तिचा. पण अभिमानाची टोक इतकी ताणावी? मुलींना बाप कुठला मग?"
      माझ्या सासूबाईंनी एकदम हात पसरले. नातींना जोरात म्हणाल्या, "कुठेही जायचं नाही मला सोडून. निघाल्या आईच्या मागे मागे... या गं या... माझ्या कुशीत या दोघी."
      मुली धावल्या. आजीला घट्ट बिलगल्या मग आजी रडायला लागली. तशा त्याही रडू लागल्या. त्यांना किती सवय होती हो एकमेकींची.
       आता धीर एकवटून माझा नवरा पुढे झाला. माझं मनगट धरलं "कुठे चाललीस गं मला एकट्याला सोडून? काही वाटतं का? कुठेही नाही जायचं ! काय समजलीस?"
      मी म्हटलं "बरं !" मला तरी कुठे जायचं होतं हो ? पण हे शब्द त्याच्या तोंडून यायला हवे होते की नाही?
      दादा चहा पिऊन आनंदाने ड्यूटीवर परतला. मुली मला बिलगल्या. माझे मुके घेतले. गळ्यात हात टाकले. मुलांनाही किती समजतं ना !
       त्या रात्री आम्ही चौघं मुली झोपल्यावर एकत्र बसलो. कौटुंबिक सभा. माझे सासरे-बापू म्हणाले, मला. "हे पहा, विजय हा आमचा एकुलता एक मुलगा आहे त्यामुळे आम्ही नि तो, इनसेपरेबल आहोत. वेगळं राहायचा विचार मनातही आणू नकोस तू. तो मातृ-पितृ भक्त आहे.
      आता एकत्र राहायचं तर वाद कधी तरी होणारच. ती 'सूड सूड' काय म्हणत होती ते मला ठाऊक नाही. जाणून घ्यायचीही इच्छा नाही. एकच सांगतो आपण सर्वांनी वाद झाले तर भांडू पण दुसऱ्या दिवशी ते भांडण उकरुन काढायचे नाही. नवा दिवस नवा उजाडला पाहिजे. आलं लक्षात? रात गयी... बात गयी !"
      ते तत्त्व आम्ही चौघांनी आयुष्यभर सांभाळलं. माझं 'पुस्तक' लाज न बाळगता तुमच्यासमोर एवढ्यासाठी उघडलं प्रिय वाचकांनो, की तुमचे संसार टिकावेत. छोटी छोटी बातोंमे इतना दम नही होता की घर टूट जाए ! खरं ना ?

©डॉ. विजया वाड

~संकलन 

संग्रही असावं असं पत्र


हे पत्र प.पू. बाबा बेलस-यांनी साधकांसाठी लिहिलेले शेवटचे पत्र म्हणता येईल. अतिशय उपयोगी ठरेल असे हे पत्र आहे.

||श्रीराम||

आणखी चार महिन्यांनी मी ९० व्या वर्षात पदार्पण करणार आहे. मला माझ्या चौथ्या वर्षापासून स्पष्ट स्मृती आहे. मी या ८५ वर्षात जे शिकलो ते प्रत्येकाला उपयोगी पडेल म्हणून सांगतो.

१) आपल्या जीवनाचा जसा आरंभ होतो, तसा त्याचा शेवट कधीच होत नाही. कारण सगळेच कल्पनेबाहेर बदलते. परिस्थिती पण बदलते. माणसे बदलतात. इतकेच नव्हे तर आपले शरीर आणि मन देखील बदलून जाते.

२) जीवन म्हणजे एक गूढ प्रवास आहे. आपण कोठून या जगात आलो, कोणी पाठवले हे आपल्याला कळत नाही. तसेच हे जग कशा परिस्थितीत सोडायचे, कोठे सोडायचे, कशा अवस्थेत सोडायचे हे आपल्याला ठाऊक नाही. बरे! जग सोडल्यावर आपण कुठे जातो, आपल्याला कोण भेटतात, त्यांच्या सहवासात किती काळ राहायचे हे माहीत नाही. एकूण जीवनाचा आरंभ अज्ञानात होऊन त्याचा अंत देखील अज्ञानात घडून येतो.

३) आपण आपल्या इच्छा तृप्त करण्याचा जन्मभर सतत प्रयत्न करतो; परंतु ते घडवून आणण्याची शक्ती आपल्या अंगात नसते. पुढे जे घडून यावे असे वाटते, त्याची उपाय रचना आपण सतत करतो. पण आपले उपाय दृश्यावर म्हणजे समकालीन माणसांच्यावर आणि घटनांवर अवलंबून असतात, त्यामुळे प्रत्यक्षात जे घडून येते, ते आपल्या मनाच्या उलट किंवा मनासारखे घडलेच तरी त्याने मनाचे समाधान होत नाही.

४) यावरून मी असे शिकलो की मानवी जीवन माणसाने ठरविलेल्या सिद्धांताप्रमाणे चालत नाही. ते आगगाडीच्या रूळाप्रमाणे ठरलेले नाही. ते एखाद्या समुद्राकडे धावणा-या नदीसारखे आहे. कोणाच्या वाट्याला काय प्रसंग येईल हे कोणास सांगता येत नाही.

५) आपल्या मनासारखे व्हावे असे तर वाटते आणि तसे घडेल याची खात्रीही नसते. म्हणून प्रत्यक्ष जीवन जगताना मनाला एक प्रकारची अस्वस्थता, काळजी, भीती आणि असुरक्षितता व्यापून राहते. त्यातून मोकळे होण्यास अज्ञाताची कास धरल्या वाचून गत्यंतर उरत नाही. अज्ञात दोन प्रकारचे आहे. १. विश्वाला चालवणारी प्रचंड शक्ती आणि २. ती शक्ती ज्या व्यक्तीमध्ये प्रत्यक्ष अवतरते त्याचा सहवास.

६) विश्वाला चालविणा-या अज्ञात शक्तीला नियती असे म्हणतात. नियतीला संत प्रारब्ध असे म्हणतात. नियतीवर पूर्ण श्रद्धा ठेवून जीवन जगणे सामान्य माणसाला फार कठीण जाते. नियती आपल्या जीवनात काय उलटापालट करील याचा अंदाज कोणालाच करता येणार नाही.

७) म्हणून ज्या व्यक्तीमध्ये विश्वशक्ती साकार होते, अशा सद्गुरूंना मनात घट्ट धरणे हा जीवनातील काळजी, भीती आणि असुरक्षितता नाहीशी करण्याचा रामबाण उपाय आहे. हे मी जीवनात अत्यंत स्पष्टपणे शिकलो.

८) संताला मनाने घट्ट धरणे म्हणजे त्याला आपल्या जीवनात सर्वात महत्त्वाचे स्थान देणे. मी शरीराने व्यवहारात वागत असताना "मी त्यांचा आहे" असे म्हणून त्याचे सतत स्मरण बाळगणे ही संतांचे झाल्याची खरी खूण आहे. आपल्याला अज्ञाताची इच्छा काय आहे ते कळत नाही, म्हणून आपल्या इच्छेमध्ये आणि त्यांच्या इच्छेमध्ये संघर्ष येतो. तो नाहीसा व्हावा यासाठी आपण आपली इच्छा त्यांच्या इच्छेमध्ये विलीन करण्याचा अभ्यास करावा. या अभ्यासालाच नामस्मरण असे संत म्हणतात. म्हणून नामस्मरणाने माणसाचे जीवन अज्ञाताने भरून जाते. एकदा ते भरले की मग कोणत्याही परिस्थितीत माणसाचे समाधान भंगणार नाही असा अनुभव येतो. यासाठी माझ्या शेवटच्या दिवसात मी सगळे सोडून नामस्मरण करतो.

के. व्ही. बेलसरे
१४/०९/१९९७

~संकलन