My YouTube Channel

Click here to visit My YouTube Channel

Sunday, 30 July 2023

पंडित डॉ. राजा काळे यांचं गायन कला मार्गदर्शन शिबीर

पंडित डॉ. राजा काळे यांचं गायन कला मार्गदर्शन शिबीर 


_________________________________________________________________________________

मित्रांनो, सस्नेह नमस्कार.
लोकमान्य टिळक यांची जयंती (23जुलै) यानिमित्त Online Quiz Competition 2023 याठिकाणी Link Share  करीत आहे; 
तरी सर्वांनी आवर्जून सहभाग नोंदवावा. Test submit केल्यावर आपला ई-मेल चेक करावा. 24 तासात आपल्याला  E-Certificate प्राप्त होईल. ते Certificate प्रत्येकाने आपल्या WhatsApp Status वर (दि.23 जुलै व 1 ऑगस्ट यादिवशी) ठेवावे. शुभेच्छा

Click Here MCQ on Lokmanya Tilak

______________________________________________________

मित्रांनो, 
सस्नेह नमस्कार.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती (1 ऑगस्ट) यानिमित्त ऑनलाइन प्रश्नमंजुषा 2023 याठिकाणी Link Share  करीत आहे; तरी सर्वांनी आवर्जून सहभाग नोंदवावा. Test submit केल्यावर आपला ई-मेल चेक करावा. 24 तासात आपल्याला  E-Certificate प्राप्त होईल. ते Certificate प्रत्येकाने आपल्या WhatsApp Status वर (1 ऑगस्ट यादिवशी) ठेवावे. शुभेच्छा

Click Here►लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती निमित्त ऑनलाइन प्रश्नमंजुषा

______________________________________________________

📘📚📖📋✍🏻

~प्रसाद वैद्य 

9420112215

शिष्यवृत्ती परीक्षेत विवेकानंद विद्यालयाचे पंधरा विद्यार्थी गुणवत्ता यादीत

शिष्यवृत्ती परीक्षेत विवेकानंद विद्यालयाचे पंधरा विद्यार्थी गुणवत्ता यादीत 

चोपडा ( प्रतिनिधी )
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे आयोजित शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल  नुकताच जाहीर झाला.  त्यात विवेकानंद विद्यालयातील पूर्व उच्च प्राथमिक परीक्षेत (इ.पाचवी) सहा व पूर्व माध्यमिक परीक्षेत (इ. आठवी) नऊ असे एकूण पंधरा विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. 
त्यांची नावे पुढील प्रमाणे: 
 इयत्ता ५ वी 
१)पर्वणी प्रसाद वैद्य गुणानुक्रम 50 गुण 212 (तालुक्यात प्रथम) 
२)जान्हवी दीपक सोनवणे गुणानुक्रम 69 गुण 206 (तालुक्यात द्वितीय) 
३)आदित्य महेश पाटील गुणानुक्रम 82 गुण 202   
४)सोहम सुनील पाटील गुणानुक्रम 125 गुण 192 
५)हिमांशू अनिल सोनवणे गुणानुक्रम 181 गुण 180  
६)यज्ञेश भूपेश धनगर गुणानुक्रम 186 गुण180
 इयत्ता ८ वी         
१)अभय चंद्रकांत कोळी गुणानुक्रम 16 गुण 216 ( तालुक्यात प्रथम) 
२)श्रेयस मोनेश बाविस्कर गुणानुक्रम 32 गुण 204 (तालुक्यात तृतीय) 
३)युगल सुखदेव पाटील गुणाक्रम 61 गुण 19O
४)चेतन तुकाराम पाटील गुणानुक्रम 64 गुण 190
५)विनीत प्रकाश पाटील गुणानुक्रम 70 गुण 188
६)निलेश पांडुरंग सूर्यवंशी गुणानुक्रम 76 गुण 186 
७)रोहित रवींद्र महाजन. गुणानुक्रम 77 गुण 186 
८)सोहम संदीप लांडगे गुणानुक्रम 120 गुण 174 
९)वेदांत मंगेश शेळके गुणानुक्रम 122 गुण 174    
या सर्व विद्यार्थ्यांचे, त्यांच्या आईबाबांचे, कुटुंबियांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन व कौतुक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.विकास हरताळकर,अध्यक्ष डॉ.विजय पोतदार,उपाध्यक्ष घनःश्यामभाई अग्रवाल  सचिव ॲड.रवींद्र जैन, सहसचिव डॉ.विनीत हरताळकर, सर्व विश्वस्त, मुख्याध्यापक नरेंद्र भावे, शिक्षकवृंद,   कर्मचारीवृंद व पालकवृंद यांनी केले आहे.

Sunday, 11 June 2023

पू. साने गुरुजी : मातृहृदयी समर्पित शिक्षक :

 

पू. साने गुरुजी : 

मातृहृदयी समर्पित शिक्षक :

""""""""""""""""""""""""""""""""""""

पुण्य स्मरण : 

प्रा.बी.एन.चौधरी /९४२३४९२५९३. 

                    पांडुरंग सदाशिव साने, हे साने गुरुजी या नावाने साऱ्या महाराष्ट्राला परिचित झालेले होते. त्याकाळी गुरुजींना ओळखत नाही, असा एकही खान्देशी माणूस शोधून सापडणे मुश्किल होते. गुरुजींनी आपल्या जीवनात अनेक भूमिका प्राण ओतून वठविल्या आणि आपल्या समर्पणाच्या वृत्तीने त्यांना अजरामर करुन ठेवल्या. त्यातली महत्त्वाची आणि भावी पिढीला आकार देणारी भूमिका होती शिक्षकाची. साने गुरुजी हे पदवी प्रमाणपत्र घेऊन नोकरी करणारे, पोटार्थी शिक्षक नव्हते. शिक्षकी पेशा त्यांनी व्रत म्हणून स्वीकारला होता. कोणत्याही प्रकारचे व्यावसायिक शिक्षण नसताना, केवळ आत्म्याच्या उर्मीतून, नवनिर्मितीच्या ध्यासातून गुरुजींमधला शिक्षक तयार झाला होता. ते मातृहृदयी शिक्षक होते. शाळा ही मुलांना कोंडून ठेवण्याच्या कोंडवाडा नसून, विद्यार्थ्यांवर वेगवेगळे संस्कार करून बघण्याची ती एक प्रयोगशाळा आहे, असं गुरुजी मानत. शिक्षकी व्यवसाय, पैसा कमविण्यासाठी अथवा दोन वेळच्या जेवणाची बेगमी होण्यासाठी त्यांनी स्वीकारलेला नव्हता. त्याकाळी पारतंत्र्यात असलेल्या देशाला स्वराज्य, राष्ट्रीय शिक्षण, स्वदेशीचा महामंत्र देण्यासाठीच जणू गुरुजींनी, विद्यादानाचे कार्य हाती घेतले असावे. 

                    गुरुजींनी पुण्याच्या न्यू पुना कॉलेजमधून १९२४ साली एम. ए. साठी ऍडमिशन घेऊन, द्वितीय श्रेणीत एम. ए. पूर्ण केले. १७ जून १९२४ साली अमळनेरच्या खान्देश एज्युकेशन सोसायटीच्या हायस्कूलमध्ये, त्यांनी शिक्षक म्हणून नोकरीला सुरुवात केली. १७ जुलै १९०८ साली स्थापन झालेल्या खानदेश एज्युकेशन सोसायटीने प्रथम विद्यामंदिर शाळा सुरू केली. ती कालांतराने १७ जुलै १९३४ साली प्रताप हायस्कूल म्हणून नावारूपाला आली. स्वातंत्र्याची आणि स्वदेशाची चळवळ या काळात जोरावर होती. त्याच्या परिणाम संस्था चालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांवरही झालेला होता. या शाळेच्या विद्यार्थ्यांनी पुढे फार लौकिक मिळविल्याच्या नोंदी आहेत. साने गुरुजींची धडपडणारी मुले म्हणून ती प्रसिद्ध होती. 

                   गुरुजींना मुलं आणि फुलं फार आवडत. मुलांच्या आणि फुलांच्या सानिध्यात प्रत्यक्ष परमेश्वराचा सहवास लाभतो, असा त्यांचा मानस होता. नवीन काही करावे, हा ध्यास त्यांच्या मनाला सतत पछाडून टाकी. त्या दृष्टीने शिक्षकी व्यवसायात त्यांच्या कर्तुत्वाला नवीन धुमारे फुटले. मुलांच्या निरागसतेतूनच त्यांना जीवनाचे धडे देण्याचे कार्य गुरुजींनी सुरू केले.  प्रताप विद्यामंदिर फक्त शाळा न राहता, कर्मशाळा बनली. गुरुजी प्रताप विद्यामंदिरच्या वसतीगृहातच रहात. जे आजही आनंद भुवन म्हणून ओळखले जाते. प्रताप महाविद्यालयात शिक्षण घेत असतांना, या आनंद भुवन वसतीगृहात राहण्याचे भाग्य मला लाभले आहे. ज्या कर्मभूमीत गुरुजी राहिले, तेथली माती कपाळी लावताना अंगावर रोमांच उभे राहिले होते. जीवन कृतकृत्य झाल्याचे समाधान लाभले होते. पुढे शिक्षण संपल्यावर आयुष्यभर गुरुजींसारखं शिक्षण क्षेत्रात, मलाही ज्ञानदानाचे कार्य करता आले, हे मी माझे संचीत समजतो. 

                 साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हा गुरुजींचा स्थायीभाव होता. तो त्यांच्या वर्तनातून, वागण्या-बोलण्यातून, राहणीमानातून स्पष्टपणे दिसत असे. लांबकोट, काळी टोपी, ठसठशीत मिश्या आणि गळ्याभोवती उपरणे गुंडाळलेल्या गुरुजींची मूर्ती सात्विक वाटे. पायघोळ धोतर नेसलेले गुरुजी पुस्तकाविना सहसा दिसत नसत. अगदी प्रवासात देखील त्यांच्याजवळ पुस्तकं असत. गाडीत, रेल्वेत फार काय वेटिंग रूम मध्ये देखील, ते फावल्या वेळात पुस्तक वाचून, आपली ज्ञानाची तहान भागवीत असत. असा ज्ञानपीपासू व वेळेचे महत्त्व जाणणारा शिक्षक, विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय व्हायला वेळ लागला नाही. गुरुजींनी लवकरच विद्यार्थ्यांची मने जिंकली होती. 

                शिक्षणशास्त्राचे कोणतेही शिक्षण घेतलेले नसताना, गुरुजींचे अध्यापन आदर्श होते. आदर्श शिक्षकांच्या अंगी असावेत, असे सारे गुण त्यांच्या ठाई होते. वर्गात शिकवताना गुरुजी कधीही खुर्चीत बसून शिकवत नसत. शिकवताना त्यांना पाठ्यपुस्तकाचीही  गरज पडत नसे. कारण, विद्यार्थ्यांप्रमाणे ते स्वतः वर्गात शिकवायच्या विषयाचा सखोल अभ्यास घरुन करून येत. विषय शिकवतांना त्यांनी वेळेच्या आणि वेळापत्रकाच्या मर्यादेत स्वतःला मर्यादित करून घेतले नव्हते. एखादा विषय शिकवताना दुसऱ्या विषयाचा संदर्भ आला, तर ते त्या विषयावरही सर्वांकष चर्चा करीत. त्यांची माहिती व शिकवण्याची पद्धत इतकी अद्यावत असे, की विद्यार्थी तासंतास त्यांच्या शिकवण्यात मंत्रमुग्ध होत. पुढे गुरुजींचे अनेक विद्यार्थी मोठ्या पदावर गेले. त्यांनी आपल्या आठवणीत लिहून ठेवलेले आहे की, गुरुजी आम्हाला शिकवत होते हे सांगताना आम्हाला फार अभिमान वाटतो. वर्गात शिकवताना धड्यातील कारुण्य प्रसंगांनी रडलेले गुरुजी त्यांना पाहता आले. गुरुजींनाही आपण शिकवलेल्या कारुण्य रसात साश्रूपूर्ण नेत्रांनी डुंबलेले विद्यार्थी  पाहता आले. संवादाने मनामनाच्या तारा जुळवणारे धन्य ते गुरुजी आणी धन्य ते विद्यार्थी. 

                   साने गुरुजींनी आपल्या व्यवसायात तन-मन धन अर्पण केले.  कर्मज्ञान आणि त्यागाचा वसा घेतला. गांधी विचारांवर नितांत श्रद्धा ठेवली. यातूनच त्यांचे ओजस्वी, तेजस्वी व्यक्तिमत्वाला बहर आला. गुरुजींनी जीवनात संयम ,विवेक ,सेवा, प्रेम आणि सहकार्य यांना फार महत्त्व दिले. स्वच्छता, टापटीप आणि शिस्त त्यांना प्रिय होती. कोणतेही काम करण्यात त्यांनी कमीपणा वाटून घेतला नाही. त्यांनी मुलांवर आई सारखं प्रेम केलं. त्यांना मातृहृदयी शिक्षक ही ओळख मिळाली. यामुळेच विद्यार्थी व सहकार्यांमध्ये ते लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले. 

              शालेय अध्यापनाचे काम करत असतानाच गुरुजींवर छात्रालय प्रमुखांची जबाबदारी येऊन पडली. गुरुजींचा बहुतांशी वेळ विद्यार्थ्यांच्या सानिध्यात जात असे. गुरुजी, छात्रालयात असलेल्या विद्यार्थ्यांचे आई-बाप, भाऊ, मित्र होते. कोणत्याही वयाच्या विद्यार्थ्यांशी ते सहज संवाद साधत. त्यास आपलंस करून टाकत. छात्रालयात विद्यार्थी खऱ्या अर्थाने घडवता येतो, हे गुरुजींनी पटवून दिले. त्यांनी विद्यार्थ्यांना मायेने स्वावलंबन, सचोटी, सहकार्य, स्वाभिमान, देशाभिमान व बंधुभाव या गोष्टी शिकविल्या. शिक्षक म्हणजे वेगळा प्राणी, असे ते समजत नसत. खोटी प्रतिष्ठा कुरवाळत बसण्यापेक्षा, मुलांमध्ये मुलांसारखे होऊन राहण्यात त्यांना आनंद वाटे. त्यामुळे विद्यार्थ्यांनाही त्यांच्याबद्दल उगाच भीती वाटत नसे. त्यांचे कार्यालय विद्यार्थ्यांनी सतत गजबजलेले राही. त्याकाळी शिक्षकांना विद्यार्थी दचकून असत. ती भीती गुरुजींनी सहज दूर केली होती. 

                    छात्रालयात प्रभातसमयी, गुरुजी सर्वांना प्रेमाने उठवीत. त्यांना हवं नको ती चौकशी करीत. आजारी विद्यार्थ्यांची सेवा सुश्रुषा करीत. वेळप्रसंगी त्यांचे मल-मूत्रही आवरीत. मायच्या प्रेमाची पखरण करणाऱ्या शिक्षकांबद्दल विद्यार्थ्यांना प्रेम, आपुलकी, ममता वाटली नाही, तर नवलच नाही का ? मात्र, अशाही परिस्थितीत काही टार्गट, आळशी विद्यार्थीही असत. गुरुजी त्यांना शिक्षा न करता, त्यांची कामे स्वतः करून टाकीत. यातून विद्यार्थी वरमायचे, शरमायचे. मग ते गुरुजींची माफी मागत. अशाप्रकारे गुरुजी दगडातही देवपण आणीत असत. गुरुजी स्वतः कष्ट सोसत. स्वतःहून सर्वांना समजून घेत. समजून सांगत. यातून विद्यार्थ्यांमध्ये आपोआप सुधारणा दिसून येत असे. संयम हा गुरुजींचा महत्त्वाचा गुण. त्यामुळे आपल्या शिकवण्याच्या तात्काळ परिणामांची, त्यांना अपेक्षा नसे. ते वाट पाहायला तयार असत. मात्र, गुरुजी काही वेळा संतापत. संतापले म्हणजे त्यांच्या संताप वरच्या श्रेणीचा असे. अश्यावेळी ते स्वतःला शिक्षा करुन घेत. अबोला धरत. ही शिक्षा मुलांना सहन होत नसे. ते तात्काळ गुरुजींची माफी मागत. 

                 विद्यार्थ्यांशी सर्वार्थाने एकरूप झाला, तोच खरा शिक्षक. असे शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांची मनं वाचू शकतात. त्यांचा आनंद, त्यांचे दुःख, त्यांच्या अडचणी, आशा-अपेक्षा जाणून घेऊ शकतात. त्यावर उपायही करतात. त्यांच्या भविष्याला आकार देतात. साने गुरुजी असेच शिक्षक होते. त्यांनी अनेकांच्या अडचणी ओळखल्या. त्या सोडविल्या. कुणाच्या शाळेचे फी दरमहा भरली. कुणाच्या पुस्तकांचा खर्च उचलला. कित्येकांची जेवणाची सोय केली. अनेकांची प्रत्यक्ष सेवा केली. यासाठी, त्यांनी स्वतःच्या खर्चावर मर्यादा घातल्या. पोटाला चिमटा दिला. मात्र, कुणालाही हिरमुसलं होवू दिलं नाही. यामुळे, त्यांच्या पगारातील फार थोडा भागच त्यांच्या वाट्याला येई. त्यातही ते आनंदी राहत असत. त्यांचा आनंद भौतिक गोष्टींवर अवलंबून नव्हता. तो त्यांच्या स्वतःच्या मनाच्या निर्मळतेवर अवलंबून होता. 

              साने गुरुजी विद्यार्थ्यांवर वेगवेगळे प्रयोग करीत. शाळा आणि छात्रालय हे विद्यार्थ्यांना संस्कार आणि ज्ञानाची दीक्षा देणारी प्रयोगशाळा आहे, असे ते मानत. निसर्ग हा खरा शिक्षक असून, ज्ञानदानाचे कार्य चार भिंतीच्या वर्गात बसून करण्याचे काम नाही, अशीही त्यांची धारणा होती. नव्हे, तसा त्यांना विश्वास होता. म्हणून, वर्गात शिकवीत असतांना एखाद्या वेळी पाऊस सुरू झाला, तर ते शिकवणं थांबवून, मुलांना निसर्गाच्या वर्षाधारांच्या नृत्याविष्कार पाहायला मुक्त सोडू देत. त्यांच्या अशा वागण्यात कामचुकारपणा नव्हता. याची वरिष्ठांनाही कल्पना होती. गुरुजी जे करतील, ते चांगलेच करतील आणि त्यात विद्यार्थ्यांचे हितच दडलेले असेल, असा विश्वास त्यामागे असायचा. 

                 शिकवत असतांनाच, गुरुजी विद्यार्थ्यांना समतेची शिकवण देत. अतिशय छोट्या छोट्या, साध्या साध्या प्रसंगातून महामंत्र देण्याची कला त्यांच्या ठाई होती. एखाद्या विद्यार्थ्याने आणलेला डबा अथवा खाऊ ते इतरांना वाटत. अशावेळी त्या निष्पाप लेकरांना जात-पात, धर्म, पंथ शिवू शकत नसे. आपला खाऊ दुसऱ्याला देण्यासाठी लागणारी मनाची विशालता, अशा प्रसंगातून गुरुजी विद्यार्थ्यांत निर्माण करीत. उच्च-निच्च हा भेदाभेद त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये येवू शकला नाही. जगात फक्त एकच धर्म असून तो फक्त प्रेम करणं शिकवतो, असं गुरुजी म्हणत. या उदात्त विचारातून त्यांच्या, खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. जगी जे दीन पददलीत, तया जावून उठवावे.! या प्रार्थनेचा जन्म झाला. त्यांच्या शाळेतील गड्यासाठी त्यांनी सोसलेले कष्ट, मुलांनी उघड्या डोळ्यांनी पाहिले होते. त्याच्या अंत्यसमयी त्याला बंधू मानून गुरुजींनीच अग्नीडाग दिला. यापेक्षा विशाल बंधुप्रेमाचे उदाहरण मुलांना कुठे दिसणार होते. अशा दीपस्तंभासारख्या शिक्षकांची शिकवण, मुले कशी विसरतील. असे प्रसंग, अशा घटना विद्यार्थ्यांच्या मनःपटलावर प्रकाश टाकत. आणि अनपेक्षित पणे त्यांना दिव्य ज्ञानाचा लाभ होई. कृतीतून विद्यार्थी धडा शिकत. धन्य ते विद्यार्थी. धन्य ते शिक्षक. असा शिक्षक पुन्हा होणे नाही. 

                 तो काळ स्वातंत्र्यसंग्रामाचा काळ होता. गुरुजींसारख्या सहनशील व्यक्तीलाही पारतंत्राची जोखड झुगाराविशी वाटत होती. त्यांना शाळा आणि छात्रालयाचे क्षेत्र मर्यादित व बंदिस्त वाटू लागले होते. स्वातंत्र्यलढ्यात आपणही खऱ्या अर्थाने सहभागी व्हावे, असे त्यांना वाटले. त्यांनी पूज्य बापूजींची आज्ञा आणि दिक्षा घेवून स्वातंत्रसंग्रामात उडी घेतली. २९ एप्रिल १९३० साली गुरुजींनी शाळा सोडली. ते स्वातंत्र्यसैनिक झाले. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. देशात शेतकऱ्यांचे राज्य यावे, असे त्यांना वाटे. देशात स्वातंत्र्याचे वारे वहात होते. सारा देश पेटून उठला होता. गुरुजींनीही आपली शब्दांची मशाल पेटवली. आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान. शेतकऱ्यांच्या राज्यासाठी, लावू पणाला प्राण.! असे सूर गुंजू लागले. विविध ठिकाणी सभा रंगू लागल्या. माणसं पेटू लागली. देशभक्तीने प्रेरित होऊ लागली. स्वातंत्र्यसंग्रामात झोकून देऊ लागली. यामागे उभी होती एक संयमीत, अबोल, अमोघ शक्ती. सेनानी साने गुरुजी. एका आदर्श शिक्षकाचे, एका राष्ट्रप्रेमी स्वातंत्र्यसैनिकात रूपांतर झाले होते. वेळप्रसंगी शिक्षकाला आपली भूमिका बदलवता आली पाहिजे, हेच गुरुजींनी आपल्या कृतीतून जगाला दाखवून दिले.


♦️धन्यवाद : मा. हेमंतजी अलोणे आणि टिम देशदूत♦️


© प्रा.बी.एन.चौधरी.

      देवरुप, नेताजी रोड.

      धरणगाव. जि. जळगाव.


~संकलन 

Saturday, 10 June 2023

आम्ही केलेलं चांगलं काम...

 आम्ही केलेलं चांगलं काम

वर्गातील स्वच्छता दूत
चिन्मय बारी,कृष्णा बाविस्कर,लबिब शेख, हुजेफा खान, मनीष पाटील, रुद्र माळी 
वर्गातील स्वच्छता दूत

          इ.५ वी च्या वर्गातील हे काही विद्यार्थी वर्गात शेवटच्या तासाला वर्गात शिकवतांना लक्षात आले की हे विद्यार्थी शाळा सुटल्यावर नियमितपणे दररोज वर्गातील कागद, कचरा उचलून एका डस्टबिन मध्ये टाकायचे. श्रमेव जयते या उक्तीची प्रचिती या चिमुकल्यांच्या छोट्याश्या कृतीतून आली या गोष्टीचा विशेष आनंद वाटतो. बाळांनो, खर्‍या अर्थाने तुम्ही वर्गातील स्वच्छता दूत आहात.

कारगिल चौकात सापडलेले ३२० रु./- परत केले

     विद्यालयातील दर्शन बडगुजर, सर्वेश जोशी, श्रीकांत चौधरी या विद्यार्थ्यांना द्वितीय सत्र परीक्षेच्या कालावधीत ३२० रु/- सापडले ते त्यांनी प्रामाणिकपणे शिक्षकांकडे जमा केले. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वांनी खूप छान काम केलंत. तुमचं चांगलं काम, सजगता, प्रामाणिकपणा या तुमच्या अंगभूत गुणांचा तुम्हाला नक्कीच खूप फायदा होईल.

     तुमचं भविष्य उज्ज्वल आहे. तुमचं विवेकानंद परिवारातर्फे खूप खूप कौतुक आणि  हा चांगला संस्कार तुमच्यात रुजवणार्‍या तुमच्या आई-बाबांचं व कुटुंबियांच मन:पूर्वक अभिनंदन शुभेच्छांसह. तुमच्यासाठी या काव्यपंक्ती-

काम करण्यात गढून जा | गाणे गात रमून जा |

छोट्या छोट्या गोष्टीत बाळांनो, रस घेऊन जगत रहा|

Saturday, 22 April 2023

नवशिक्या, वाट हरवलेल्या पिलांची... आईशी पुनर्भेट

 

नवशिक्या, वाट हरवलेल्या पिलांची... आईशी पुनर्भेट.

चोपडा - परवा येथील जीवन ज्योती नर्सिंग होम मध्ये
उत्कृष्ट व वाजवी सेवा देणारे अस्थिरोग तज्ञ डॉ .नरेंद्र दादा शिरसाट व भुलतज्ञ डॉ.नरेंद्र पाटील यांना OT तून बाहेर आल्यावर पक्ष्यांची 3 पिले इमारतीतील ओपन व्हेंटिलेशन कडे भरकटलेल्या , भयभीत अवस्थेत आढळून आले.

स्थानिक पक्षी व वन्यजीव अभ्यासक हेमराज पाटील यांना त्यांनी रेस्क्यू कॉल केला. कार्यालयीन कामकाज वेळेत असल्याने मी स्वतः न जाता टीम सदस्य धनंजय यास संपर्क करून माहिती दिली.

लागलीच त्या ठिकाणी पोहोचून पक्षीचे पिल्ले त्याने सुरक्षितपणे ताब्यात घेतली. दिलेल्या सूचनेप्रमाणे
दुपारपर्यंत योग्य पद्धतीने फीडिंग व सांभाळ केला.

दुपारी त्याने ते पिल्लू माझ्या कडे आणून देण्यासाठी फोन केला. मी त्याला सांगितले की पिलांना ,
आपण जोखीम घेऊन सांभाळण्यापेक्षा त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करू.ते अधिक सुरक्षित व सोयीची असेल.

धनंजय , देवेंद्र आणि मी रुग्णालय परिसरात जाऊन
येथील कर्मचाऱ्याकडून ते पिल्लू आढळून आल्याचे लोकेशन घेतले. इमारतीच्या ओपन प्लेस मधून खाली पडलेली पिले घरट्यात रिलोकेट करण्यासाठी , इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर जाऊन आजूबाजूला घरट्याचा शोध घेतला. घरटे कोठेच आढळून आले नाही.

पण पाच - दहा मिनिटात ब्राऊन रॉक चॅट पक्षीच्या दोन मादी आमच्या जवळ येऊन मोठमोठ्याने हाका मारू लागल्या. कदाचित त्यांनी उघड्या खोक्यातील पिलांना बघितले होते.

तिसऱ्या मजल्याच्या मागच्या बाजूला व शेजारील
शाळेच्या बाजूला असलेल्या पत्री शेडच्या गोडावूनवर
दोघं आई जाऊन बसल्या.

तेथे पिलांना पोहोचवणे जरा अवघड होते. काहीतरी जुगाड करणे आवश्यक होते. बंद इमारतीच्या वरच्या मजल्यावर लांब दोरी घर्षण करून कापली.दोरीचे एक टोक खोक्याला बांधले. हळुवार अलगदपणे खोका पत्री शेडवर पोहोचवला. खोक्यातून पिल्ले बाहेर 
पडणार नाही याची यशस्वी काळजी घेतली.

सुरुवातीला दोन पिल्लू बाहेर आले. दोघे सारखे वयाचे व वाढ झालेले. तिसरे वाढ व वयाने लहान होते. खोक्यातून ते बाहेर येत नव्हते. शेवटी त्याला बाहेर काढून आईपर्यंत पोहोचवण्यासाठी , देवेंद्र भिंत उतरून तेथे यशस्वी सुखरूप पोहोचला.

मोठ्या दोन्ही पिल्ला जवळ एक आई व तिसऱ्या लहान पिलाजवळ दुसरी आई घिरट्या घालून आल्या.
हाका मारत , उड्या घेत त्यांच्यातील भीती दूर केली.
एक जायची दुसरी यायची , असे चार पाच वेळा झाले.
त्यांनी त्यांच्या चोचित आणलेले अन्न भराभर पिलांच्या चोचीत कोंबले.

पिलांना पत्री शेडच्या एका टोकापर्यंत हाका मारत , उड्या मारत नेले. दोन्ही इमारतींच्या मध्ये फूट दीड फूट
अंतराच्या मधल्या अरुंद पॅसेज मध्ये कुठेतरी घरटे होते.
जे आम्हाला शेवटपर्यंत दिसले नाही.

दोघं माता पक्षी ने भिंतीवर उड्या घेत , पिलांचा
आत्मविश्वास वाढवत आतल्या घरट्याकडे यशस्वी जबाबदार पालकाप्रमाणे नेले. सोबत असलेले दोघ
टीम मित्र व मी खूप खुश झालो.

इमारतीच्या खाली आल्यावर , तेथील कर्मचाऱ्यांने केलेल्या सहकार्याबद्दल , डॉक्टर साहेबांनी केलेल्या रेस्क्यू कॉल बद्दल आभार मानलेत.

दिवसभर उन्हाच्या तडाख्याने कासावीस व घशाला पडलेल्या कोरड पेक्षा जास्त कासावीस , पिले हरवल्याबद्दल , कुठेतरी निघून गेल्याबद्दल निश्चितच 
त्या आई झाल्या असतील. इकडे तिन्ही पिल्ले 
भीती च्या साम्राज्यात दाखल झाले होते.

विचार करा , आपल पाच-सहा वर्षांच मूल तास - दोन तास हरवले तर आपल्याला कसे वाटते. डोक्यात काय काय विचार येतात. घटनाक्रम फोटोत बघता येईल.

त्या सायंकाळी दोन्ही आई व पिलांची झालेली पुनर्भेट
फक्त ईश्वरीय ईच्छा...

सातपुडा निसर्ग संवर्धन संस्था फक्त निमित्त मात्र.

निसर्गातील प्रत्येक सजीव... गवतापासून वटवृक्षापर्यंत ,
चिमुकल्या फुलपाखरा पासून , जंगलाचा राजा वाघ व महाकाय देवमाशा पर्यंत , सर्वांचे अस्तित्व पर्यावरणात आगळे वेगळे व तितकेच महत्त्वाचे आहेत.

निसर्ग वाचवा...वसुंधरा वाचवा...

जागतिक वसुंधरा दिनाच्या शुभेच्छा..!!

पक्षीमित्र-हेमराज पाटील