My YouTube Channel

Click here to visit My YouTube Channel

Sunday, 19 June 2022

दुर्दम्य आत्मविश्वास म्हणजे दुर्गेश !शालांत परीक्षेत मिळवले ९१.८०%

 


दुर्दम्य आत्मविश्वास म्हणजे दुर्गेश ! 

शालांत परीक्षेत मिळवले ९१.८०%

 कोलंबस चे गर्व गीत या कवितेत कुसुमाग्रज सागराला उद्देशून कोलंबसच्या मुखी काव्यपंक्ती देतांना लिहितात की अनंत आमची ध्येयशक्ति अनंत अन आशा किनारा तुला पामराला

अर्थात सागराची मर्यादा किनारा आहे परंतु,माणसाच्या ध्येयशक्तिला दाही दिशा मोकळ्या आहेत. 

या उपरोक्त काव्यपंक्ती  महात्मा गांधी शिक्षण मंडळ,चोपडा संचलित कला,शास्र व वाणिज्य महाविद्यालयात विनाअनुदानित तत्वावर शिपाई पदावर कार्यरत श्री.विजय मनोहर शुक्ल यांचा  लाडका सुपुत्र दुर्गेशला अगदी तंतोतंत लागू पडतात.

नियतीने घाला घातला. गणेश विसर्जन मिरवणुकीत पाच वर्षांपूर्वी दुर्गेश च्या हातातील स्टील दांडा असलेला ध्वज उच्च दाबाच्या विद्युत तारांना लागून मोठा अपघात झाला. त्यात त्याचे हात व पाय यांना जबर जखमा झाल्याने शरीरापासून हात पाय विलग करावे लागलेत. 

देवाच्या मूर्तीला विसर्जित करतांना जरी अपघात झाला असला तरी अनेक माणसातील देव त्याच्या मदतीला धावून आलेत.

दुर्गेशने अनेक दिवस मृत्यूशी झुंज दिली आणि तो मृत्युंजय ठरला! त्याचा उत्साह तिळमात्र ढळला नाही  तो निराश हताश झाला नाही.

मी अनेकदा त्याला भेटलो पण त्याच्या चेहऱ्यावर अवयव गमावल्याचे दुःख दिसले नाही. 

त्याचे वडील कार्यरत आहेत तो चोपड्यातील महात्मा गांधी शिक्षण मंडळ परिवार व त्याची आजीने सेवा दिलेला तसेच आई कार्यरत असलेले विवेकानंद विद्यालय व हॉस्पिटल परिवार शुक्ल परिवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेत.

विकासकाका हरताळकर व त्यांच्या पूर्ण परिवाराच्या मार्गदर्शनखाली दुर्गेशवर उपचार झालेत त्याला कृत्रिम अवयव मिळालेत.आणि त्याने नुकत्याच जाहीर झालेल्या शालांत परीक्षेत मानस विनीत हरताळकर याला रायटर घेऊन आभाळव्यापी यश मिळवलं.

विवेकानंद विद्यालयात त्याच्या या यशाचं मुख्याध्यापक श्री.नरेंद्र भावे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी  कौतुक करून आनंद साजरा केला.

दुर्गेशच्या लढ्यात त्याचे आई वडील श्री.विजय शुक्ल व सौ.जया शुक्ल तसेच आजी सरोज शुक्ल यांचा खूप मोठा वाटा आहे.

दोघांनी विनाअनुदानित तत्त्वावरील नौकरी करत बेताची आर्थिक परिस्थिती असतांना जिद्दी व चिकाटी ठेवत स्वतःला व मुलाला एवढ्या मोठ्या अपघातून सावरलं याचं सर्वत्र कौतुक होत आहे.

शुक्ल परिवाराच्या धैर्यशीलतेला व दुर्गेशला मदत करणाऱ्यांना सलाम व दुर्गेशबाळाचे 

लाख लाख अभिनंदन!

 प्रा.संदीप भास्कर पाटील

 आदर्शगाव वडगावकर

***************

आदरणीय संदीप पाटील सर,😊👏

        आपलं चि.दुर्गेशबद्दल हे दुसरं आणि बोलकं लिखाण खरंतर पावती आहे त्याच्या सकारात्मक ऊर्जा आणि जिद्दीची. ही कौतुकाची थाप त्याच्यासह आमच्यासाठीसुद्धा प्रेरणादायी आहे. देणाऱ्याने देत जावे हा भाव जपणारी, संवेदनशील,सहृदय आणि सजग माणसं सोबतीला असली की, संघर्षसुद्धा समृद्धीची अनुभूती देतो. याची प्रचिती श्री. विजयभाऊ व सौ. जयाताई यांनाही आली असावी याची खात्री आहे. शुभेच्छा. भेटुया. 

📘📚📖📋✍🏻

~प्रसाद वैद्य व परिवार

Wednesday, 27 April 2022

Background Music

Background Music...

  शाळेत फक्त शिकणं आणि शिकवणं होत नसतं तर दिनविशेष आणि छोट्या-मोठ्या कार्यक्रमातून आपलं जगणं साजरं होतं असतं.याचा एक छान बोलका अनुभव आज आला.  आमच्या शाळेतील सुंदर हस्ताक्षर लाभलेल्या आणि पहिलीच्या विद्यार्थ्यांना जीव ओतून शिकवणाऱ्या श्रीमती वनारसे बाई (अभ्यास न करणारी मुलं जाम टरकतात यांना 😆) यांचा मुलगा कौस्तुभ याचा English मधून छान मेसेज आला. म्हटलं मोजकं लिहिलंय पण काय भारी लिहिलंय यानं! विद्यार्थी शाळेत शिकतांना काय काय निरीक्षणं करतात अन् त्याची नोंद ठेवतात याचा भावस्पर्शी अनुभव म्हणजे हा SMS. अवतीभवतीचं निरीक्षण हा तसा माझाही आवडीचा उद्योग. हा SMS आला अन् मी माझ्या मोबाईल मधील 'सुत्रसंचलन' नावाचं Folder चाचपडायला लागलो. शाळेत काही दिनविशेष,छोटे-मोठे कार्यक्रम असले की, प्रतिमापूजन प्रसंगी Background ला या Folder मधील एक छानसं प्रासंगिक गाणं अथवा धून मोबाईलवर लावायची जेणेकरुन या छोट्याशा कृतीतूनसुद्धा त्या कार्यक्रमाची उंची वाढते. यातील एक झलक-

शिवजयंतीला लता दीदींच्या आवाजातील...

"निश्चयाचा महामेरु |

बहुत जनांसी आधारु ||

अखंड स्थितीचा निर्धारु |

श्रीमंतयोगी ||

या काव्यपंक्ती एक रोमांचित करणारा अनुभव श्रोत्यांना देऊन जातात. 

हाती नाही येणे

हाती नाही जाणे

हसत जगावे 

हसत मरावे 

हे तर माझे गाणे... 

जगदीश खेबूडकर यांनी लिहिलेलं आणि सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेलं हे गीत जीवनातील शाश्वत सत्याची जाणीव करुन देतं.

पद्मजा फेणाणी यांच्या आवाजातील  

दिवे लागले रे दिवे लागले...

हे गाणं प्रसन्नतेची अनुभूती देतं... आणि असं बरंच काही..

सांगायला आनंद वाटतो की असा काही कार्यक्रम असला की Sound Systemवालाही मला विचारतो," सर, आज कोणतं गाणं...लावायचंय." त्यानंही यासाठी काही गाणी माझ्याकडून घेतलीय आणि त्याचा तोही समर्पक वापर करतोय. अशा छान गाण्यांचं वेळ काढून मी वेळोवेळी संकलन केलंय. अशी साद अन् दिलखुलास दाद लाभली की ते Folderही माझ्याशी बोलतं-

एक प्यार का नगमा है, मौजों की रवानी है

ज़िंदगी और कुछ भी नहीं..

तेरी मेरी कहानी है

ला..लाला…लाला..

कुछ पाकर खोना है, कुछ खोकर पाना है

जीवन का मतलब तो, आना और जाना है.....

 खर्‍या अर्थानं संतोष व आनंद देणारं श्रवणीय Background Music सोबतीला असायलाच हवं. 

ठरवलं तर Mobile हे Device इतकं छान Dedicate करु शकत याचं अप्रूप वाटतं. 

मग या गोष्टीसुद्धा आपला  'Status' बनतात. बघा पटतंय का! 

Thank you कौस्तुभ. तुझ्या SMSने मला आज लिहितं केलं. शुभेच्छा. भेटुया  

📘📚📖✍🏻📋

~प्रसाद वैद्य

Tuesday, 19 April 2022

प्राचार्य डॉ.अनिल झोपे व प्रा.डॉ.डी.बी.साळुंखे यांची शाळेस सदिच्छा भेट

     आज आमच्या विवेकानंद विद्यालयात डाएटचे प्राचार्य डॉ.अनिल झोपे सर व प्रा.डॉ.डी.बी.साळुंखे 
सर यांनी शाळेतील उपक्रम यासंदर्भात सदिच्छा भेट दिली. सर्व शिक्षकांसोबत त्यांनी दिलखुलास संवाद  साधला व मार्गदर्शन केले. शाळेचे मुख्याध्यापक श्री. नरेंद्र भावे सर यांनी त्यांचे स्वागत केले व शाळेतील उपक्रमांबद्दल माहिती सांगितली. याप्रसंगी संस्थेचे सचिव रवींद्र जैन काका, श्रीमती चित्ते मॅडम, पंचायत समितीचे पदाधिकारी व शिक्षकवृंद उपस्थित होते. पवन लाठी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले व राधेश्याम पाटील यांनी आभार प्रदर्शन केले. 

प्राचार्य डॉ.अनिल झोपे यांचे संदेश पत्र 
(प्राचार्य- जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,जळगाव)                                                                                     

प्रा.डॉ.डी.बी.साळुंखे यांचे संदेश पत्र
महाराष्ट्र शिक्षण सेवा वर्ग-२अधिकारी 
(जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,जळगाव)


Monday, 18 April 2022

Essay- My School





When we involve in checking answersheets, we find such nice things. Very Good Abhay.

Saturday, 16 April 2022

भिमवंदना

 

हा फोटो मला fb वर दिसला.त्या साऱ्यांचे आभार मानत मी माझ्या चार ओळी सादर करत आहे.

https://www.facebook.com/100048339905142/posts/511517570469569/


                    भिमवंदना

               --------------------

प्रार्थना, वंदना, गिते, पठण 

कसलाच कुठे आवाज नाही

माय न लेकराला पूजण्याचा

कधीच कुठे रिवाज नाही


तरी पण ठेवते भीमा

तूझ्या पायाशी चार फुलं

तुझ्या मुळेच सूर्य शोधतात

आज माझी मुली आणि मुलं


श्रीनिवास गडकरी

रोहा पेण  पुणे

9130861304

केवळ नावासहितच फॉरवर्ड करावे

@ सर्व हक्क सुरक्षित

16.4.2022

~संकलन (प्रसाद वैद्य)

Thursday, 14 April 2022

कु.पर्वणी (इ.४थी) हिने तिचे वर्गशिक्षक श्री. बारेला सर यांना लिहिलेलं हे पत्र.

  माझी मोठी लेक कु.पर्वणी (इ.४ थी) हिने तिचे वर्गशिक्षक श्री. बारेला सर यांना लिहिलेलं हे पत्र. तिच्या आयुष्यातील हे पहिलं पत्र आणि तेही आम्ही दोघंही शाळेत गेलेलो असतांना कुणाच्याही मार्गदर्शनाशिवाय लिहिलंय हे विशेष. शाळेतून घरी आल्यावर तिनं हे पत्र मला दाखवलं. मला खूपच आनंद वाटला. म्हटलं बाळा, माझं जगणं तुझ्यात रुजलंय ग !

(आपल्या प्रतिक्रिया Comment Box मध्ये जरुर नोंदवाव्यात ही नम्र विनंती.)

या पत्राला आदरणीय बारेला सर यांचा प्रतिसाद 
पर्वणी बेटा सर्वप्रथम तुझं मनःपूर्वक खूप खूप कौतुक...!!
कारण एक इ.४ ची ( साधारण दिड वर्ष कोरोनामुळे शाळेपासून दूर राहिलेली) विद्यार्थीनी एवढे सुंदर विचार एवढ्या सुंदर वाक्यरचनेमध्ये लिहु शकते म्हणून तसेच या इंटरनेटच्या युगात कालबाह्य होत चाललेला पत्रलेखनाचा तू छान प्रकारे छंद जोपासत आहे म्हणून ...शाब्बास पर्वणी..!👌👌🏻🍫🍫
आम्ही सर्व शिक्षक तुझ्यासारख्या एक वेगळ्या बुद्धिमत्तेच्या हुशार, समजदार, अष्टपैलू , विविध गुणसंपन्न विद्यार्थिनीला कसं विसरणार.तू जरी आता इ.५ वी ला जाशील पण आपली शाळा एकच आहे आणि आमच्यासारखेच तुम्हाला समजून घेणारे, उपक्रमशील, चांगले शिकवणारे शिक्षक तुला पुढील विभागातही लाभतील.तुम्ही जरी पुढील वर्गात गेलात तरी तुमचं कोणी केलेलं कौतुक, तुम्ही मिळवलेलं यश /बक्षीस याबद्दल तुमच्यापेक्षा जास्त आनंद आम्हाला होतो.
आम्ही नक्कीच पर्वणी तुझ्यासारख्या विद्यार्थिनीला मिस करू.तुझ्या पत्र लेखनातून असे दिसून आले की, तू मिळविलेल्या ज्ञानाचा दैनंदिन जीवनात चांगल्या प्रकारे उपयोग करत आहेस याचा मला अभिमान वाटतोय. छान..  तू खूप मोठी हो बेटा,आईबाबांचं नाव खूप मोठं कर.तू मला लिहलेले वरील पत्र नेहमी मला माझ्या कामात प्रेरणादायी ठरत राहील  तसेच मला अधिक जोमाने, उत्साहाने काम करण्याचे बळ देत राहील वआयुष्यभर माझ्या स्मरणात राहील.
पर्वणी तुला पुढील वाटचालीस अनेकोत्तम शुभेच्छा...!!👍👍🏻🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

श्री. बारेला सर
विवेकानंद विद्यालय, चोपडा.