My YouTube Channel
Tuesday, 4 January 2022
Thursday, 25 November 2021
🔸 मानवतेचे दुकान.🔸
🔸 मानवतेचे दुकान.🔸
अनघा ठोंबरे यांचं पुण्याला आपल्या राहत्या घरीच एक अनोखं ‘दुकान’ आहे, गेली पंधरा वर्षे सुरू असलेलं. हे दुकान आहे कॅशलेस. कारण तिथल्या वस्तू फुकट दिल्या जातात. दिवाळीला कपडे, नवरात्रीत नऊ साडय़ा, ईदसाठी ओढण्या, वारीसाठी टोप्या, अनवाणी लोकांना चप्पल, भुकेल्यांना अन्न, लहान मुलांना खेळणी, कष्टकरी बाईला तवा, कुकर, इतकंच नाही तर ‘स्थळ दाखवायला’ नवीन कपडेही.. सारं काही इथे मिळतं.. समाजातल्या गरीब बांधवांसाठी सुरू असलेल्या या अनोख्या ‘दुकाना’साठी हजारो लोकांची मदत झाली.. होते आहे.. ‘पिंपळाला पार बांधण्यासाठी’ असंख्य हात पुढे येत आहेत..
यशाच्या एका क्षणी माझ्या आईने मला सांगितलं, ‘‘आपलं आयुष्य, आरोग्य, यश, समृद्धी, शिक्षण यांच्यामागे कितीतरी राबणारे, कष्ट करणारे हात असतात, मग ते हात शेतात राबणारा शेतकरी, ओझी उचलणारा हमाल, सफाई कामगार, बांधकाम कामगार, शेतकरी, मोलकरणी, सीमेचे रक्षण करणारा जवान असे अगणित असतात. आपण त्यांच्याविषयी कृतज्ञ असलं पाहिजे, ते सगळे यशाचे, श्रेयाचे वाटेकरी आहेत. आपण सण, उत्सव साजरे करतो, छंद, मनोरंजनाने आनंदी होतो, नोकरी करतो, वृद्ध रुग्णांची सेवा करतो, घर सजवतो, प्रत्येक वेळी त्यांचे स्मरण केले पाहिजे. त्यांच्यासाठी काहीतरी करायला हवे. पिंपळाला पार बांधत राहावं.’’ माझ्या आईच्या शब्दाला ‘अमर’ करण्यासाठी एका क्षणी मी भरपूर पगार, सुविधा असणारी केंद्र सरकारची सन्मानाची नोकरी सोडली आणि गरिबांसाठी ‘समाजप्रस्थाश्रम’ स्वीकारला.
घेणाऱ्यांचे हात हजारो आहेत हे माहीत होतंच, पण देणाऱ्यांचेही हात हजारो आहेत, याचा साक्षात्कार झाला, त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. या देण्या-घेण्यातून असंख्य आठवणी माझ्या पदरात पडत गेल्या.. समाधानाचं कटोरं शिगोशिग भरत गेलं.. आजही जातंय..
अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर मला फक्त फिल्मी गरिबी माहिती होती, खरी गरिबी कधी अनुभवली नव्हती वा त्यांच्या जगण्याशी माझा थेट सामना कधीच झाला नव्हता. पण आजूबाजूला गरिबी होती. लांब अंतरावर असली तरी दिसत होती. झोपडपट्टीतलं जगण्याची मी कल्पना करू शकत होते. उपाशी असणं, जे हवं ते न मिळणं यातली कुचंबणा मला जाणवत होती. आणि गरिबीसाठी माझ्या दृष्टीने कारणीभूत होता, शिक्षणाचा अभाव. मग त्यांच्यासाठी काही करायचं तर सुरुवात त्यांच्या शिक्षणापासून करायचं ठरवलं, गरीब वस्तीतल्या लोकांना साक्षर करायचं ठरवलं. पण मला लवकरच उमजलं शिकवण्यापेक्षा त्यांच्याकडूनच शिकण्यासारखं खूप आहे. त्यांचं स्वत:चं एक तत्त्वज्ञान आहे, एक संस्कृती आहे आणि ते त्यांना जगण्याचा अर्थ देत आहेत. जे आहे ते स्वीकारण्याची, गोड मानून घेण्याची त्यांच्यात एक उपजत समज आहे, हे लक्षात येत गेलं.
सणावाराला नवी साडी नेसून, बेंटेक्सचे दागिने घालून, डोक्यात गजरा माळून दहा घरची भांडी घासणारी बाई, तिची हौस, डोळ्यातला आनंद, उत्साह, रोज जीवनमरणाचा, दोन वेळच्या जेवणाचा संघर्ष असूनही तिला असणारी जीवनाची ओढ पाहून सकारात्मक जगण्याचा अर्थ मीच त्यांच्याकडून शिकले, जगण्याच्या विद्यापीठात! त्या माझ्या कितीतरी पुढे होत्या, त्यांनी माझी दु:खं छोटी केली, माझं मन मोठं केलं. मी त्यांची श्रोता झाले, एवढय़ा छोटय़ा गोष्टीनेही त्यांनी मला खूप प्रेम दिलं, निरपेक्षपणे. मग त्यांच्यासाठी मी ‘आस’ हे महिला मंडळ स्थापन केले.त्यांच्या अपेक्षा अगदी छोटय़ा होत्या, पण त्यांची हौस खूप मोठी होती.. आणि ती पूर्ण करण्याची संधी मला लवकरच मिळाली.
एका गरीब मुलीची ब्रेन टय़ुमरची शस्त्रक्रिया करायची होती. ती गुणी मुलगी कविता करत असे, या कवितांचे पुस्तक प्रसिद्ध करायची तिची शेवटची इच्छा होती. उपचार, तपासण्यांसाठीही पैसे नव्हते, तिच्याविषयी एका वृत्तपत्रात लेख लिहिला आणि मदतीचा ओघ सुरू झाला. लोकांनी भरभरून मदत केली, सर्व तपासण्या, उपचार, शस्त्रक्रियेसाठी पैसे मिळाले. मुख्य म्हणजे या शस्त्रक्रियेनंतर ती वाचली, ती आता दोन मुलांची आई आहे. मग तिच्या वस्तीतल्या अनेक गरीब स्त्रिया आल्या. त्यांनाही मदत हवी होती. मग वृत्तपत्रे मासिकातून अनेक लेख प्रसिद्ध झाले, त्याच्याशिवाय सगळं अशक्यच होतं, त्यांचे उपकार विसरू शकत नाही, कधीच नाही. और कारवाँ बनता गया.. अशा पद्धतीने असंख्य लोक जोडले गेले.
अनेक जण काही ना काही आणून देऊ लागले. चांगल्या अवस्थेतील वस्तू, तर काही वेळा न वापरल्या गेलेल्या वस्तू, अगदी भांडीसुद्धा. काही तर अगदी कोरी करकरीत. काहींनी त्यांचे संपर्क क्रमांक दिले. काहीही लागलं तरी फोन करा, असं आवर्जून सांगितलं. अशा तऱ्हेनं माझं गरिबांसाठीचं ‘कॅशलेस दुकान’ सुरू झालं. इथे सगळं काही मिळतं. एकही पैसा न घेता.
प्रथम कपडय़ांचं दुकान सुरू झालं. अनेक लोक जुने पण चांगल्या अवस्थेतले कपडे आणून देतात. मग ते गरिबांना, कष्टकऱ्यांना दिले जातात. एकदा एक माहिती समजली, नवीन जन्मलेल्या बाळांना झबली नसतात. एका रुग्णालयामध्ये ही दीडदोनशे बाळे उघडीच असतात, असं कळलं. अनेकांनी मला जे फोन नंबर दिले होते, त्यांच्याशी संपर्क साधला. मग ब्लाऊजपीस, कटपीसेस लोकांनी आणून दिली, एका मैत्रिणीने तीनशे झबली मोफत शिवून दिली, माझ्या दुकानात झबली आली. ज्यांना ती हवी होती त्या गरीब स्त्रिया माझ्या या दुकानात आल्या आणि आवडीची झबली घेऊन गेल्या. बाळांना झबली मिळाली, त्यांचे गोजिरवाणे चेहरे डोळ्यासमोर आले नि मी खूप श्रीमंत झाले. मी माझी राहिलेच नाही..
मग माझे कपडय़ांचे दुकान प्रसिद्ध होत गेले, इकडे देणाऱ्यांचे हातही हजारो झाले. एकाने रेडिमेड कपडय़ांचे दुकान बंद केले, मुलांचे चारशे ड्रेसेस मला फुकटात आणून दिले. ते सारे आदिवासी, ग्रामीण भागात पाठवले. आदिवासी भागातली मुले तर चार दिवस अंगावरचे कपडे धुण्यासाठी द्यायला देखील तयार नव्हती, नुसतं ऐकूनच अंगावर रोमांच उभे राहिले. माझा प्रत्येक सण वेगळ्या अर्थाने आता साजरा होतो. रमजान ईदला मुलींना, बायकांना नमाज पढायला नव्या ओढण्या हव्या असतात. पण त्याचबरोबरीने त्यांना हवी असलेली खजूर, दुधाची पाकिटं तीसुद्धा या दुकानात मिळायला लागली. असंख्य अनामिक देणाऱ्यांची एक मोठीच्या मोठी यादीच आहे माझ्याकडे. एक फोन करायचा अवकाश माझ्या या दुकानात सगळं काही येऊन पडतं. अगदी भरभरून. मग मी गरजूंना मानाने बोलावते, कुणी बोहारणी, कुणी कासारणी, कुणी मोलकरणी, कुणी गावाकडच्या. सगळ्या जणी तृप्त होऊन जातात आणि मग माझ्यासाठी मशिदीत मन्नत मागितली जाते, माझ्यासाठी ‘रोजे’ धरले जातात. मोराचे पीस पायाला आणून बांधलेही जातात. अतीव प्रेमाने माझी ईद आनंदमय होते.
पांडुरंगाच्या वारीच्या वेळी टोप्या, पायजमे, शर्ट, धोतर हवे असतात अनेकांना. दोन-तीन महिने आधीपासून मी ते जमवायला सुरुवात करते. मग साबण, टूथपेस्ट, पाण्याच्या बाटल्याही जमवते सगळ्यांना वाटायला. आजपर्यंत कधी काही कमी पडले नाही की अपुरे पडले नाही. मी वारीला न जाताही प्रसाद आणून दिला जातो, प्रत्येकात विठुराया दिसतो. घरबसल्या पुण्य कमवते.
नवरात्रातल्या नऊ दिवसांत उपवासाला दाणे, साबुदाणे, राजगिरा वडय़ा आणून दिल्या जातात आणि मागितल्याही जातात. सगळ्या सणांना काही ना काही दिलं- घेतलं जातंच. सगळे देव माझ्यावर प्रसन्न आहेत. इतकंच कशाला अनेकांच्या लग्नपत्रिकेवर माझं नाव असतं. कुणी पाया पडायला येतात, कुणी कानावर बोटे मोडतात, कुणी मलाच खाऊ आणून देतात. खूप काही घडत असतं या देण्या-घेण्यात!
इतकंच कशाला एखाद्या गरीब मुलीचा ‘दाखवण्याचा’ कार्यक्रम असतो. कधी तर तो माझ्या घरातच होतो, मी चहा बिस्किटे आणते, तिला चांगला ड्रेस लागतो, तो मी आधीच मिळवलेला असतोच. तो मग अशा मुलींच्या अंगावर चढतो. लाजणारी ती मुलगी जेव्हा लग्नाच्या बोहल्यावर चढते तेव्हा मी भरून पावते. माझ्याकडे येणाऱ्या मुलींमध्ये अंध मुलीही आहेत. त्यांना अंगभर कपडा लागतो, त्यांच्यासाठी पूर्ण बाह्य़ांचे ड्रेस लोक मला आणून देतात. गरीब शेतकऱ्यांना शहरात उपचाराला, कुणाला भेटायला यायचे तर धड कपडे नसतात अंगावर, काही जण मग शेजाऱ्यांचे बिनमापाचे कपडे घालून येतात. कुणी असे लोक दिसले की माझ्या दुकानातले कपडे त्या खेडय़ापाडय़ात जातात. महालक्ष्मीला नेसवायला साडय़ा, घराला दार नसते, मग लावायला पडदे, असा पडद्यांचा स्टॉकही माझ्या दुकानात असतो. पावसात पॉलिएस्टर साडय़ा लागतात, थंडीत स्वेटर्स, बाळांना गुंडाळायला सुती साडय़ा लागतात. पेटिकोट्सची तर कायम डिमांड. अधिक महिन्यात गरीब स्त्रियांना पेटिकोट्स वाटते. माझ्या दुकानात सर्व व्हरायटीज मिळतात. साठ सत्तर आज्या आहेत, त्या नऊवारीच नेसतात. आता नऊवारी जुने मिळतच नाही मग नवीन नऊवारी साडय़ा माझ्या दुकानात दिवाळीत येऊन पडतात. मोठे दुकानदारही भरपूर डिस्काऊंट देतात. रिक्षावाले ओझी उचलायला मदत करतात. ‘आमचाही हात लागू दे’ म्हणतात. माझे ‘दुकान’ सजते. नवरात्रीच्या नऊ दिवसांत अनेकींना नऊ रंगांच्या साडय़ा हव्या असतात. मग माझे फोन अनेकींना जातात. नातेवाईक, मैत्रिणी, मंडळे, कट्टे, सोसायटय़ा.. त्यांच्याकडून भरपूर साडय़ा येतात. माझाही खारीचा वाटा असतो. संक्रांतीला काळी साडी पाहिजेच असते. मग त्या जमा करायच्या.
१५ ऑगस्ट, २६ जानेवारीला पांढरी साडी हवी असते, दिवाळीत जरीच्या साडय़ा पाहिजेत, असा चक्क आग्रह असतो. मग दिवाळीआधीच त्या माझ्याकडे न्यायला येतात आणि दिवाळीत मॅचिंग ब्लाऊज शिवून छान नेसून येतात. एकीला गोंडय़ाच्या साडय़ांची हौस, मला हळूच कानात सांगून गेलेली असते. मग ती साडी दिसली की मलाच खूप आनंद होतो. तिला देते तेव्हा तिच्या चेहऱ्यावरची चमक मला तृप्त करते. एकदा एका गावी एक टेम्पो भरून कपडे पाठवले, त्यात काही नवेही कपडे होते. ते लोक कपडे घालून नाचले, अक्षरश: रडले. अत्यानंदाने तो दिवस त्यांनी सणासारखा साजरा केला. मला फोन येत होते, तो दिवस माझ्यासाठी दिवाळी दसराच होता. त्यांचा आनंद मला ‘जीनेका बहाना’ देतो.
कपडय़ांबरोबर सर्वाधिक मागणी असते ती वस्तूंना, भांडय़ांना. या लोकांना मी त्यांना देणारच हे इतकं पक्कं माहीत असतं की चक्क हक्काने मागूनच घेतात. ‘आम्ही कधी कान असलेल्या कपातून चहा प्यायलो नाही. आम्हाला कपबशा द्या,’ मागणी येते. मग मी माझ्या ओळखीतल्यांना फोन करते. ते लोक स्वत:साठी नवे कप आणतात आणि जुने माझ्या गरिबांसाठी देतात. अशा देण्यातून मला हजारो लेकी मिळाल्या आहेत. चकलीसाठी कुणाला सोऱ्या हवा असतो, कुणाचा कुकर नवरा दारू पिण्यासाठी विकतो, तिला कुकर, एकदा रस्त्यावर तीन दगडांची चूल मांडणारीने मला तवा मागितला, भाकरी नाही मागितली, हे मला विशेष वाटलं. मग लोकांकडून मला जुनी भांडी मिळू लागली, जुनी कसली नवीनच. दुष्काळी भागातल्या लोकांना पाण्याचे कॅन्स, भांडी लागतात, मग लोकांनी बादल्या, कळशा आणून दिल्या. गेल्या पंधरा वर्षांत काय हवे तेही समजले. मला आणि देणाऱ्यांनाही! सगळं आपसूक माझ्या या दुकानात येऊन पडतं किंवा पैसे येतात त्यातून विकत घेतलं जातं.
देणाऱ्यांना फक्त निमित्त लागतं. कुणी मग स्वत:चे, मुलाचे वाढदिवस, कुणाचे स्मृतिदिन तर कुणी दिवाळी, दसरा, नवरात्र या सणाच्या निमित्ताने अनेक वस्तू आणून देतात अगदी नवीन. माझी ही मुलं गोटय़ा, दगडांनी खेळतात.. मला वाटतं त्यांनाही मिळावी खेळणी. मग काय मनात यायचा अवकाश खूप खेळणी आणून देतात लोक! मी त्यांचं छोटं प्रदर्शन भरवते. या सगळ्या मुलांना बोलावते. ज्याला जे हवे ते खेळणे निवडायचे. तो बालआनंद मला माझ्या बालपणात नेतो. मी छोटी मुलगी होते, बाहुलीचे लाड करते.. खऱ्या आणि खेळण्यातल्याही.
उन्हात पाय भाजतात, चटके खात खात लोक माझ्याकडे येतात. चप्पल, बूट मागायला. माझ्या या दुकानात ते असतातच. मग आपल्या मापाचे, आवडीचे चप्पल, बूट घेऊन जातात. एकदा एका गरीब, गुणी मुलीने कळवलं, तिला शिवण मशीन पाहिजे होते. ती त्याचा नक्कीच चरितार्थासाठी उपयोग करणार याची मला खात्री होती. सहज म्हणून, पाहू या तर खरं म्हणून फोन केले तर एकाने एक छान मशीन नवी मोटर बसवून आणून दिली. मोठी माणसं तर मदत करतातच पण त्यांचं पाहून लहान मुलंही त्यांच्या या मित्रांसाठी मदतीचा हात पुढे करतात. काही शाळांचे विद्यार्थी मदत करतात. ‘मोती साबण, पेन्स, टूथपेस्ट, खेळणी, हौसेने आणतात.
एका रोजगार हमीवर काम करून इंजिनीअरिंग करणाऱ्या तरुणाला कॉम्प्युटर हवा होता. तोही प्रिंटरसकट एकाने आणून दिला. सायकल हव्या होत्या तर मोठय़ा सोसायटीतल्या पार्किंगमधल्या वीस सायकली दुरुस्त करून आणून दिल्या. गरजेच्या वस्तू दिल्या घेतल्या जातातच पण गंमत म्हणजे हौसेच्या वस्तू पर्सेस, पावडरचे डबे, बेडशीट्स, तोरणे हेही सगळं मिळत राहतं.
माझ्या या दुकानात धान्य बँकही आहे, काही भुकेल्या घरांसाठी! डाळ, तांदूळ, चहा, साखर, कडधान्येही लोक आणून देतात, बिस्किटांचे पुडे, कांदा लसूण मसाला, अगदी दूध पावडरही! दुष्काळी भागातले लोक येतात, त्यांना देवाच्या नैवेद्याला डाळ, गूळ, कणीक हवी असते, बाळंतिणीला दलिया, वरणभात हवा असतो. तो तिला इथेच मिळतो. मुख्य म्हणजे काही तरी द्यायचं हा भाव नाही. चांगल्या गुणवत्तेच्या, खाण्यासाठी योग्य वस्तू या लोकांकडून मिळत जातात. या सगळ्याचा उपयोग आजूबाजूच्या लोकांमध्येही होतो. केवढे माझे भाग्य. गंभीर शस्त्रक्रियाही डॉक्टर मोफत करतात. उपचार करतात. त्यांच्या औषधांचे पैसेही मिळत राहतात.
आता तर मला फार करावं लागतच नाही. लोकांनी आपणहून गट तयार केले आहेत. तरुण मुले आहेत, आय.टी. इंजिनीअर्स आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, गरिबांना मदत करणारे गरीबही आहेतच. असे मानवतेचे दुकान. मला मिळालाय आनंदाचा ठेवा. मोक्ष कशाला? मी पुनर्जन्म मागते आहे.. मला आणखी आनंद हवा आहे! तुम्हीही त्यात सहभागी व्हाल?
अनघा ठोंबरे, 1/13 सहजानंद सोसायटी, कोथरुड, पुणे-34, फोन 020-25382633
~संकलन
Tuesday, 2 November 2021
दिवाळीस पत्र...
सस्नेह नमस्कार.
तू अनादी काळापासून टिकवून ठेवलेलं तुझं चैतन्य नेहमीच उत्साह प्रदान करतं गं! कसं जमतं हे तुला! तुझं येणं हे रावाचा आणि रंकाचाही आनंद द्विगुणीत करतं. कदाचित काही वेळा रंकाला तुझं येणं परवडत नसतं; पण 'झाकली मूठ सव्वा लाखाची' ठेवून तो तुझं येणं साजरं करतोच करतो, ते तो तुलाही कळू देत नाही.
तुझं उजळणं आणि उजळवणं हे आमच्यासाठी आनंदाची 'पर्वणी'असतं.
तुझं येणं आबालवृद्धांसाठी 'निर्मिती'चा आविष्कार असतं...
तुझं येणं म्हणजे स्वच्छ आकाश...
तुझं येणं म्हणजे लख्ख प्रकाश...
तुझं येणं म्हणजे बच्चे कंपनीची दंगल...
तुझं येणं म्हणजे नात्यांसाठी मंगल...
तुझं येणं म्हणजे अंगण सजणं असतं...
तुझं येणं म्हणजे आसमंत उजळणं असतं...
तुझं येणं म्हणजे गोडधोड पदार्थांची रास...
तुझं येणं म्हणजे दिव्यांची आरास...
तुझं येणं म्हणजे सुगंध दरवळणं...
तुझं येणं म्हणजे आईने लेकरांना कुरवाळणं...
तुझं येणं म्हणजे सुगंधी उटणं...
तुझं येणं म्हणजे मिठाई वाटणं...
तुझं येणं म्हणजे काहींचं 'जमणं'...
तुझं येणं म्हणजे काहींचं रमणं...
तुझं येणं म्हणजे राजस...
तुझं येणं म्हणजे वसुबारस...
तुझं येणं म्हणजे 'मोती स्नानाची' वेळ होणं...
तुझं येणं म्हणजे पाडव्याची सांगितिक पहाट होणं...
तुझं येणं म्हणजे भाऊबीजेची ओवाळणी...
तुझं येणं म्हणजे 'होम मिनिस्टरची' पाडव्याला पैठणी...
तुझं येणं म्हणजे अभ्यंगस्नान...
तुझं येणं म्हणजे झुकून थोरांचा सन्मान...
तुझं येणं म्हणजे Leisure...
तुझं येणं म्हणजे Pleasure...
तुझं येणं म्हणजे अनेकांचं आश्वासन...
तुझं येणं म्हणजे सुयोग्य प्रशासन...
तुझं येणं म्हणजे नाटकाचा पहिला प्रयोग..
तुझं येणं म्हणजे विविधरंगी,वेचक-वेधक दिवाळी अंकांचा योग...
तुझं येणं म्हणजे तरुणांचा कट्टा...
तुझं येणं म्हणजे महिला मंडळाच्या गप्पा...
तुझं येणं म्हणजे कुटुंबाची लगबग...
तुझं येणं म्हणजे लाईटिंगची झगमग...
तुझं येणं म्हणजे तरुणाईची हुल्लडबाजी...
तुझं येणं म्हणजे फटाक्यांची आतषबाजी...
तुझं येणं म्हणजे नवीन गाडी घेणं...
तुझं येणं म्हणजे स्वप्नातील नवीन घर होणं...
तुझं येणं म्हणजे शक्ती...तुझं येणं म्हणजे भक्ती...
तुझं येणं म्हणजे 'रिश्तों में प्यार बाँटना'...
तुझं येणं म्हणजे 'हम साथ साथ है' कहना...
तुझं येणं म्हणजे कमाल...
तुझं येणं म्हणजे धमाल...
तुझं येणं म्हणजे विलास...
तुझं येणं म्हणजे विकास...
तुझं येणं म्हणजे दिवेही आनंदी अन् पणत्याही उत्साही...
तुझं येणं म्हणजे आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे....
शेवटी काय आयुष्य आणि वर्तमान कितीही ठणकत असलं तरीही तू ये. कारण तुझ्या उजेडाचा उत्सव हा संस्कृतीच्या शृंगाराचाच एक भाग आहे. त्यामुळेच तुझं 'येणं' म्हणजे संस्कृतीचं 'लेणं' असतं म्हणूनच आम्ही तुझं 'देणं'लागतो.
तुझ्या लेकरांना सदैव जगण्याचं बळ अन् निरामय आरोग्य आणि चैतन्य लाभू दे तुझ्यासारखंच. तुझी आम्हां सर्वांवर कृपा राहू दे....तू आहेसच अशी शुभदायिनी 'शुभ दीपावली' !!!
तुझाच स्नेह प्रार्थी,
~प्रसाद वैद्य
(शिक्षक,पत्र-मित्र,शुभेच्छापत्र संग्राहक)
विवेकानंद विद्यालय, चोपडा जि. जळगाव
मोबाईल-९४२०११२२१५
Friday, 17 September 2021
तुमची Salary किती आहे?
तुम्ही त्या Salary वर समाधानी आहात ?
मी 31 वर्षाचा आहे. माझी Salary 12 लाख वार्षिक आहे.
मी सध्या चेन्नई मध्ये राहतो आणि मी या salary वर पूर्णपणे समाधानी आहे. त्याची खालील करणे आहे. ते पाहू –
1 . मी कधी 70 -80 लाखाचं मोठ घर घेतल नाही. मोठं घर घेवून गाजावाजा करण्यात मला मुळीच INTEREST नाही. मोठ्या घराच्या प्रशंसेसाठी 35 हजाराचा महिन्याचा EMI भरून कर्जाच tension घेवून रोजचा जगण्याचा आनंद गमवला नाही.
2. त्यापेक्षा 70-80 लाखाचं घर 10,000/- Rent ने घेतलं. जे माझ्या ऑफिसच्या जवळच्या अंतरावर आहे. ज्यामुळे माझा traffic चा त्रास, पाठदुखी होत नाही. मी जेंव्हा जेंव्हा ऑफिस बदलतो तेंव्हा तेंव्हा मी माझं घर सुद्धा बदलतो. माझा स्वतःच घर असतं तर हे शक्य नव्हतं. माझे काही colleagues 2-2 तास सकाळी आणि संध्याकाळी 40kms प्रवास करून ऑफिस ला येतात. हा प्रवास चेन्नई च्या ट्राफिक मध्ये आणि गरम वातावरणात किती त्रासदायक आणि irritating असतो सांगतात.
3. माझे colleagues जे 90 मिनिटांचा प्रवास करून आल्यानंतर कामावर योग्य प्रकारे focuse करता येत नाही. त्यामुळे चांगले प्रोजेक्ट त्यांच्या हातून जातात. इच्छा नसतानाही साध्या प्रोजेक्ट वर काम करावे लागते. जर rent वर घर घेतले तर आपल्या वेळेत Flexibility येते. त्यांमुळे मी माझा Quality Time माझ्या परिवारासोबत घालवतो.
4. माझी 20,000/- Mutual Funds मधील गुंतवणूक हि Appartment खरेदी करून येणारे Rental Income पेक्षा जास्त Returns (परतावा) देते.
5. 25,000/- घरखर्च- Petrol, Electricity Bill, Milk, TV, Internet, Grocery, Vegetable, Maid, Meat ETC.
6. दर महिना 6000 रुपयांची एका Gold Scheme मध्ये गुंतवणूक माझ्या Wife च्या इच्छेमुळे.
7. 2000/- माझ्या आज्जी ला देतो जी एकटी गावी राहते.
8. 3000/- माझ्या मुलीच्या शाळेच्या शिक्षणासाठी.
9.14,000/- eating out, shopping, outing साठी.
10. शिल्लक राहिलेले 15,000/- अचानक येणारा खर्च, हॉस्पिटल चा खर्च, घरगुती कार्यक्रमासाठी राखीव.
11. मी क्रेडीट कार्ड वापरत नाही. मी EMI वर कोणतीच गोष्ट खरेदी करत नाही. माझ्यावर अजून कसलेच कर्ज नाही. मला महिना अखेरीस पैश्याच्या तंगीचा प्रोब्लेम येत नाही. महिना अखेरीस सुद्धा मी एखादी urgent गोष्ट घेण्यासाठी salary जमा होण्याची वाट पहावी लागत नाही. मागील महिन्याच्या savings मधून मी ती गोष्ट खरेदी करू शकतो.
12.माझ्याकडे 125cc ची bike आहे. जी पाच वर्ष जुनी आहे तरीही मी त्यात आनंदी आहे. मला दोन लाखाची Royal Enfield Continental GT खूप आवडते जी मी माझ्या savings मधून एका single payment मध्ये सुद्धा घेवू शकतो. पण मी घेत नाही. कारण तिची मला सध्या गरज नाही. आणि सोबत तिचा maintenance इतर खर्च जो माझ्या खिशातून अधिक पैसे काढून घेतो. जर 125cc bike वर सुद्धा तितकाच सुखकर प्रवास होत असेल तर मी ती खर्चिक bike का घेवू.
13. माझ्याकडे 1000cc ची Hatchback car आहे जी मी आणि माझ्या परिवारासाठी sufficient आहे.
14. मी Restaurants/Shopping मध्ये जास्त खर्च करत नाही. ते पैसे मी सहलीसाठी वापरतो. शक्य तितक्या नव्या ठिकाणी सहलीसाठी जाऊन येतो ((beaches, temples, amusement parks , new cities). सहलीसाठी माझी साधी कार असते सोबत घरून घेतलेले food असते. यात परिवारासोबत वेळ घालवतो.
15. साधी आणि simple जगण्याची पद्धती जास्त कमावणाऱ्यापेक्षाही जास्त सुखी ठेवते.
या सर्व गोष्टी मी माझ्या वडिलांकडून शिकलो जे आरोग्यदायी जीवन आणि जे हातात आहे त्याच्या आपल्या चांगला आयुष्य बनवण्यासाठी कसा वापर करायचा सांगणारे माझे Role Model हि आहेत.
त्यांच्याकडे credit card नाही. कसले हि कर्ज डोक्यावर नाही. त्यांच्याकडे 4BHK आणि 3 जमिनीचे तुकडे गावी आहेत.या वयात सुद्धा ते कमावतात आणि आरोग्यदायी जगतात.
ते 58 वर्षाचे आहे. त्यांना sugar, BP, Back Pain असा कसलाच आजार नाही. ते शेवटचे 12 वर्षाखाली हॉस्पिटल मध्ये गेले होते ते हि एका छोट्या bike च्या अपघातामुळे.
त्यांचा दिनक्रम-
सकाळी 5 वाजता उठून योग, 3kms walk करतात. सकाळचा newspaper आणि मित्रांशी गप्पा मारून झाल्यावर. माझ्या लहान बहिणीला College पर्यंत सोडून येतात. दुपारी जेवायला घरी येतात. जेवणानंतर ऑफिस ला जातात. तिथून माझ्या बहिणीला घेण्यासाठी college ला जाऊन येतात. घरी काय गरजेच आहे ते पाहतात, काही कमी असेल तर मार्केट मधून घेवून येतात.त्यांना gardening आवडते. संध्याकाळी मंदिरात, Library मध्ये जावून येतात. जवळच्या नातेवाईकांच्या आयुष्यातील अडचणी ऐकतात सोडवण्याच्या प्रयत्न करतात. माझ्या आई सोबत terrace वर गप्पा मारण्यात वेळ घालवतात. महिन्यातून एकदा ते चेन्नई ला आम्हाला भेटण्यासाठी येतात. आयुष्यातील चांगल्या उद्दिष्ठांसाठी कसा प्लान करता येईल त्यात मदत करतात. माझ्या मुलीसोबत खेळायला त्यांना खूप आवडत. नातेविकांचे घरगुती कार्यक्रमात सहभागी होतात. जगायचं कसं सांगणारे एक मूर्तिमंत उदाहरण. He is a perfect example of how to live.
आज असे किती लोक आहे जे दुपारचे जेवण घरी family सोबत करतात? फार कमी जण करतात. मी आठवड्यातून दोनदा घरी दुपारच्या जेवणासाठी जातो जेंव्हा काम कमी असते. माझे वडील (30 वर्षापासून) दररोज घर येतात दुपारच्या जेवणासाठी. माझ्या आईला 10 मिनिटाची मदत करतात. जेवण करता करता बातम्या पाहतात. ते लखपती नाहीत पण त्यांना माहिती आहे without pressure कस जगायचं. त्यांना माहिती आहे कामाचा आणि आयुष्याचा समतोल कसा साधायचा.
माझ्या वडिलांचे चुलतभाऊ त्याच्यापेक्षा जास्त कमावतात. त्यांची family भारतात असते ते Gulf Countries मध्ये काम करतात. पण माझ्या आईला चिंता लागलेली असते कि मी केंव्हा चेन्नई मध्ये एक घर घेईल. माझे काका आमच्या पूर्ण family मध्ये सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहेत जे मीठ आणि साखर असलेलं जेवण करून शकत नाहीत. त्यांना रोज insulin घ्यावा लागत. इतका रात्रंदिवस काम करण्याचा काय उपयोग.
मी तरीही मानतो कि माझे वडीलच माझ्या family मध्ये सर्वात श्रीमंत आहेत. ज्यांना चांगले मुलं, चांगले नातू, positive मित्र, खरे मित्र, चांगले वातावरण, चांगले नातेवाईक, आरोग्य जे एक परिपूर्ण आयुष्याची निशाणी आहे.
साभार....
~संकलन
Monday, 19 July 2021
सर्वात मोठा सत्कार.....
Thursday, 1 July 2021
डॉक्टर्स डे ... एका डॉक्टरचा!
डॉक्टर्स डे ... एका डॉक्टरचा!
माझं लहानपण वैद्यकीय क्षेत्राच्या गप्पा ऐकत गेलं. वडील प्रथितयश डॉक्टर, त्यामुळे लहानपणापासूनच वैद्यकीय क्षेत्राची ओळख झाली. आणि ह्या क्षेत्राचं आकर्षण कधी जाणवू लागलं ते कळलं सुद्धा नाही. त्या काळात डॉक्टर होणं म्हणजे माझं एक अल्लड स्वप्न होतं. शालेय जीवन संपलं आणि करियर निवडण्याची वेळ आली, ह्या काळात मेडिकल ची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करणं म्हणजे माझ्यासाठी डॉक्टर होणं झालं. प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झालो आणि खऱ्या अर्थाने डॉक्टर होण्याची वाटचाल सुरु झाली. MBBS चा अवाढव्य अभ्यास! महाविद्यालयीन आयुष्याची मजा लुटत जाडजूड पुस्तकांची कायमची मैत्री जडली. वैद्यकीय शास्त्रातले प्राथमिक विषय एक एक करत अभ्यासून संपवले जात होते आणि मजल दरमजल करत MBBS चा अभ्यासक्रम पूर्ण करणं म्हणजेच त्या काळात माझासाठी डॉक्टर होणं होतं. MBBS पूर्ण होऊन पद्व्युत्तर शिक्षण सुरु झालं. दिवसरात्र काम! सोबत प्रचंड कठीण अभ्यासक्रमाचा डोंगर! डॉक्टर व्हायचं म्हणजे हा मेरू पर्वत उचलायचा अशी झिंगच असते त्या काळात डोक्यात! हे दिव्य
पार पडलं आणि माझं लहानपणीचं अल्लड स्वप्न खरं झालं. असं वाटलं की ती प्रवेश परीक्षा, तो MBBS चा अभ्यास, ती पद्व्युत्तर शिक्षणासाठी केलेली जीवघेणी मेहेनत ... हेच सगळं म्हणजे डॉक्टर होणं!
शिक्षण संपलं आणि वैद्यकीय ‘व्यवसाय’ सुरु झाला. आज जरी याला ‘व्यवसाय’ म्हणावं लागत असलं तरी खरं तर रोज कोणाशी तरी वेदनेचं नातं जुळवत होतो. बाह्यरुग्ण कक्षात जमलेले रुग्ण तपासणं, मधेच येणारा एखादा अत्यवस्थ रुग्ण हाताळणं, निदान करायला कठीण असणारे रुग्ण ऍडमिट करणं आणि त्यांचा इलाज व तपासण्या सुरु करणं असं आयुष्य सुरु झालं आणि हेच सगळं म्हणजे डॉक्टर होणं असं वाटू लागलं.
आणि मग लाट आली... करोना विषाणूची लाट! प्रचंड प्रमाणात रुग्ण! ICU, आंतररुग्ण विभाग कुठेच रुग्ण ठेवायला जागा नाही! सगळीकडे नुसता हाहाकार! अनेक जवळचे लोक, ज्यांच्यासमोर मी लहानाचा मोठा झालो, माझे शालेय शिक्षक, लहानपणीचे सवंगडी, असे सगळेच करोना बाधित म्हणून उपचारासाठी दाखल झालेले. सुरवातीच्या काही दिवसातच लक्षात आलं की ह्यावेळी लाट थोडी वेगळी आहे. करोना विषाणूवर अजूनही रामबाण औषध नाही. आणि जो काही उपचार उपलब्ध आहे त्याला म्हणावा तास प्रतिसाद नाही अशी सगळी परिस्थिती. या सगळ्या लोकांना मी बरा नाही करू शकलो तर? राऊंड सुरु केला की पोटात गोळा येई. भावनिक जवळीक असल्याने जास्तीचाच तणाव. मनातलं वादळ लपवून प्रत्येक रुग्णाला धीर देत, त्याच्या तब्येतीचा आढावा घेत निर्णय घेणं सुरु झालं. परीक्षेत पूर्णपणे अभ्यासक्रमाबाहेरचे प्रश्न यावेत तशी आमची अवस्था. ह्या आजाराची खूप कमी माहिती उपलब्ध. कुठलाच प्रोटोकॉल नाही. मग आज पर्यंत केलेला अभ्यास, मिळवलेला अनुभव पणाला लावणं सुरु झालं. डॉक्टर होणं म्हणजे आपल्या रुग्णांसाठी चाकोरीबाहेर जाणं आणि त्यासाठी आपल्या ज्ञानाची पराकाष्टा गाठणं ह्याची जाणीव व्हायला लागली. सगळं काही करूनही काही रुग्णांकडून जराही प्रतिसाद मिळत नसे. मग अश्या रुग्णांसाठी वरिष्ठांना फोन करणं, सहकाऱ्यांशी चर्चा करणं हे रोजचंच होतं. मग जाणीव झाली की डॉक्टर होणं म्हणजे सर्वच रुग्णांसाठी कुठलाही आपभाव न ठेवता आपलं ज्ञान सर्वांसोबत वाटणं आणि एकत्रित प्रयत्न करणं! बऱ्याचदा अशीही वेळ आली की सगळेच उपाय थकले व रुग्ण गमवावा लागला. १०-१५ दिवस ह्या रुग्णांशी व त्यांच्या नातेवाईकांशी जुळलेली नाती! त्यांच्या त्या अश्रुधारा, दुःख बघवत नसे. अंत्यसंस्कार त्यांच्या मनाप्रमाणे करू देण्याची सुद्धा परवानगी नाकारताना मन पाणीपाणी होऊन जाई. बऱ्याचवेळा केबिन आतून लावून घेऊन मी पण माझ्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली आहे. मग जाणीव झाली की डॉक्टर होणं म्हणजे ह्या भावनांना खंबीरपणे आवर घालून पुढच्या रुग्णांसाठी आपलं सर्वस्व पणाला लावणं. असे एक नव्हे तर हजारो अनुभव! ह्या करोनाच्या महामारीने डॉक्टर होणं म्हणजे काय याचा एक वेगळा आयाम अनुभवायला मिळाला.
आज जगातले सगळेच डॉक्टर आपलं सर्वस्व पणाला लावून आहेत. प्रचंड प्रमाणात काम, तेवढाच तणाव, कुटुंबापासूनची दूरी ...अशा अनेक वैयक्तिक समस्या बाजूला ठेवून लढणारे हे सैनिकच! इटली स्पेन सारख्या देशात अगदी सुरुवातीला लढलेले डॉक्टर्स, ज्यांच्या प्रयत्नाने व अनुभवाने ह्या आजाराची थोडी तरी माहिती उपलब्ध होऊ शकली त्या आमच्या सहकाऱ्यांना सलाम! कोव्हीड सेंटर मध्ये PPE कीट घालून दिवस रात्र झपाटून जाऊन गेली एक वर्ष तेवढ्याच उमेदीनं काम करणाऱ्या सहकाऱ्यांना सलाम! ह्या विषाणूवर कुठलं औषध लागू होईल ह्याचं वेगवान संशोधन करणाऱ्या सहकाऱ्यांना सलाम! इतिहासात पहिल्यांदाच एक वर्षापेक्षा कमी कालावधीत प्रभावी व सुरक्षित अशी लस उपलब्ध करून देणाऱ्या या अभूतपूर्व सहकाऱ्यांना सलाम! आणि सगळ्यात शेवटी सलाम आपण सर्वांना ...आम्ही प्रयत्न करत होतो पण बऱ्याचदा ते कमी पडत होते, आमच्या सुविधा कमी पडत होत्या, काही लोकांसाठी आम्ही उपलब्ध होऊ शकत नव्हतो... हे सगळं नाईलाजास्तव होतं! हे समजून घेऊन आमच्यावर ठेवलेल्या विश्वासासाठी, आमच्यामागे खंबीरपणे उभं राहण्यासाठी आपल्याला सलाम!
पुढची लाट नकोच. आम्हाला कळतंय की वारंवार आपण आयुष्य थांबवणं शक्य नाही. पण काळजी घेत जगणं शक्य आहे. वेळेवर लसीकरण घेणं, मास्क वापरणं, social distancing पाळणं हाच यावरचा उपाय. आणि एवढ्यानंतरही संसर्ग झालाच तर पुन्हा आम्ही मागे हटणार नाही. तुमच्या शुभेच्छांची ऊर्जा आमच्या पाठीशी आहेच!
Happy Doctors’ Day!
• डॉ अमित हरताळकर.
~संकलन
Thursday, 10 June 2021
-
पुस्तक-बोलगाणी (कविता संग्रह) कवी- मंगेश पाडगावकर प्रकाशन- मौज प्रकाशन प्रकाशक-संजय भागवत पुस्तक परिचय द्वारा -प्रसाद वैद्य नमस्कार दोस्...
-
पुस्तक-चरित्रं अशी घडतात लेखक -प्रा. मिलिंद जोशी पुस्तक परिचय द्वारा -प्रसाद वैद्य नमस्कार मित्रांनो, कर्तृत्वाशिवाय व्यक...




