My YouTube Channel

Click here to visit My YouTube Channel

Thursday, 29 February 2024

दिलखुलास अभिप्राय...

प्रिय प्रसाद🙏
प्रथमतः कालच (27 फेबुवारी) साजऱ्या झालेल्या राजभाषा दिनाच्या विवेकानंद परिवारास हार्दिक शुभेच्छा
💐💐💐💐
मी तुझ्या status link वर  संपूर्ण मराठी दिनाचा कार्यक्रम बघितला आणि खरोखरंच मला विवेकानंद विद्यालयाचा अभिमान वाटला .
अगदी मोठमोठ्या व्यासपीठांना देखील लाजवेल या पद्धतीचा कार्यक्रम तुझ्या विद्यार्थ्यांनी तुमच्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाने घडवून आणला.
कार्यक्रमाची रूपरेषा तिची मांडणी आणि त्यासाठीचे नियोजन विद्यालयातील मराठी विभागाचे यश दाखवून गेला .
कथाकथन करणाऱ्या विद्यार्थीनीच्या भाषेतील चढउतार आणि भाषासौंदर्य एक वेगळाच संस्कार करून गेले. 
चिमुकल्यांनी केलेले वक्तृत्व आणि गीतगायन खरोखरंच वाखाणण्याजोगे होते.
जवळच असलेल्या (28 फेब्रुवारी) विज्ञान दिनाचे महत्त्व समजुन घेऊन राजभाषा दिनी पर्यावरणाचा संदेश देणाऱ्या पथनाटकातील कलाकारांचेही कौतुक करावे तेवढे थोडकेच आहे. 
मित्रा, 
अलीकडेच मुख्यमंत्री 'माझी शाळा सुंदर शाळा' 
उपक्रम राज्यभर चालू असुन तुझी शाळा मुल्यांकनात बसली किंवा नाही हे मला माहित नाही परंतू तुझ्या शाळेसारखी सुंदर शाळा असूच शकत नाही याची खात्री वाटते कारण अलिकडे जयंती आणि पुण्यतिथी हे उपक्रम फक्त प्रतिमापुजाना पुरते मर्यादित झालेले अनेक ठिकाणी दिसतात परंतु विवेकानंद विद्यालय याला अपवाद असून या सर्व बाबी घडून येण्यासाठी शाळेचे नेतृत्व अत्यंत महत्वपूर्ण असते आणि तुमच्या मुख्याध्यापकांच्या रूपाने ते बघावयास मिळाले. शाळेचा कारभार मोठा असतांना सुद्धा पुर्णवेळ ते कार्यक्रमासाठी उपस्थित होते ही बाब दाद देण्यासारखी आहे.
श्री भावे सरांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांकडून करून  घेतलेला वाचनाचा संकल्प  आणि त्यांच्या भाषणातून वर्गावर्गातील सरांचे अनुभव अनेक शिक्षकांसाठी मार्गदर्शक ठरेल यात शंका नाही. 
शेवटी विद्यार्थ्यांनी केलेली भेटकार्ड बघुन त्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यातदेखील विद्यालय मागे नसल्याची खात्री पटली . 
राजभाषा दिनाचे महत्व जाणून एकाच कार्यक्रमात भाषणे, पथनाट्य, कविता गायन, कथाकथन , भेटकार्ड तयार करणे, शिक्षक, मुख्याध्यापक मार्गदर्शन इ .बाबी विवेकानंद टिमने घडवून आणून ख़ऱ्या अर्थाने मायबोलीचा प्रचार आणि प्रसार केला व खऱ्या अर्थाने कविवर्य कुसुमाग्रजांना आदरांजली वाहिली याबद्दल सर्वांचे खुप खुप अभिनंदन. 
💐💐💐💐💐💐
या व्हिडीओच्या निमित्ताने तुझी सुंदर शाळा आणि परीसर बघण्याची संधी मिळाली व सांस्कृतिक कार्यक्रम कसा साजरा करावा याबद्दल प्रेरणा मिळाली. 👏👏
तुझ्या सर्व विद्यार्थ्यांना अनेक अनेक आशीर्वाद आणि विद्यालयाच्या चरणी यानिमित्ताने नतमस्तक होतो. 💐💐👏🙏

- श्रीहरी निकम
- उपशिक्षक के बी एच के विद्यालय खालप
- ता . देवळा , जि. नाशिक

Monday, 12 February 2024

करिअर निवडतांना प्लॅन बी तयार असू द्यावा: डाॅ.अमित हरताळकर

करिअर निवडतांना प्लॅन बी तयार असू द्यावा: डाॅ.अमित हरताळकर

दि.११ फेब्रुवारी  
चोपडा (प्रतिनिधी)
आपण आपल्याच चूकांतून कधीतरी  शिकतो. 'पुढच्यास ठेच मागचा शहाणा' या उक्तीनुसार इतरांच्या चूकांतून शिकणं यालाच आजच्या काळात Smartness म्हणतात. दहावी-बारावीनंतर आपले करिअर निवडताना आपल्याला हवे ते क्षेत्र निश्चित निवडावे परंतु त्यापूर्वी त्याक्षेत्रात आपल्याला यश मिळाले नाही तर आपला प्लॅन बी तयार असू द्यावा असे मत हरताळकर हाॅस्पिटलचे संचालक  डाॅ.अमित हरताळकर यांनी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना व्यक्त केले. 
चोपडा येथील विवेकानंद विद्यालयात दहावीचा निरोप समारंभ भावनिक वातावरणात संपन्न झाला. 
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन प्रमुख पाहुणे व संस्थेचे विश्वस्त डाॅ.अमित हरताळकर व उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आले. 
विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. नरेंद्र भावे यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर  चैतन्य पाटील,जैनब तडवी, सत्यम सोनवणे, तनीष लाठी, लतिका निकम,अवनी वानखेडे, तेजस्विनी पाटील या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून त्यांच्या बालांगणापासून तर दहावीपर्यंतचे अनुभव व्यक्त करुन आपल्या भावनांना मोकळी वाट करुन दिली. उपस्थित सर्व याप्रसंगी हळवे झाले होते. 
शिक्षकांमधून संदीप कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. 
विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना डाॅ.अमित हरताळकर म्हणाले की मी तुम्हाला मार्गदर्शन वगैरे करायला आलेलो नसून  तुमच्याशी गप्पा मारायला आलोय. मी तुमच्या वयात असताना माझ्याकडून ज्या चूका झाल्या त्या तुमच्याकडून होऊ नये यासाठी तुम्हाला काय करता येईल हे तुम्हाला सीनियर म्हणून सांगायला आलोय. दिलखुलास संवाद साधताना त्यांनी त्यांच्या  आयुष्यातील स्वतःचे व काही मित्र-मैत्रिणींचे अनुभव सांगितले. तसेच योग्यवेळी भावनांचा आदर करावा परंतु भावनांच्या आहारी जाऊ नये. आपला आनंद कशात आहे त्यानुसार आपल्याला करिअर निवडता यायला हवे. समाज काय म्हणेल यापेक्षा आपल्याला स्वतःला काय वाटते व काय साध्य करता येईल याचा विचार करावा. हे नमूद करतांना त्यांनी त्यांच्या एका मित्राचे उदाहरण सांगितले. आपल्या संवादी शैलीने त्यांनी सर्व विद्यार्थ्यांची मने जिंकली. जेव्हा केव्हा अडचणी आल्या आणि गप्पा माराव्याश्या वाटल्या तर नक्कीच माझ्यासोबत गप्पा मारायला यावे असे सांगून सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी व भावी वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप कुलकर्णी यांनी, पाहुण्यांचा परिचय श्री. पवन लाठी यांनी तर आभार श्री. जावेद तडवी यांनी मानले.  
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष  डाॅ.विजय पोतदार, संस्थापक अध्यक्ष डाॅ.विकास हरताळकर, उपाध्यक्ष श्री.घनश्यामभाई अग्रवाल,सचिव ॲड. रवींद्र जैन, मुख्याध्यापक श्री.नरेंद्र भावे,श्रीमती आशा चित्ते,प्राचार्य श्री.पी.जी पाटील,सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व दहावी-बारावीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी व उपस्थितांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला.



बातमीची लिंक Lok प्रवाह