My YouTube Channel

Click here to visit My YouTube Channel

Saturday, 22 April 2023

नवशिक्या, वाट हरवलेल्या पिलांची... आईशी पुनर्भेट

 

नवशिक्या, वाट हरवलेल्या पिलांची... आईशी पुनर्भेट.

चोपडा - परवा येथील जीवन ज्योती नर्सिंग होम मध्ये
उत्कृष्ट व वाजवी सेवा देणारे अस्थिरोग तज्ञ डॉ .नरेंद्र दादा शिरसाट व भुलतज्ञ डॉ.नरेंद्र पाटील यांना OT तून बाहेर आल्यावर पक्ष्यांची 3 पिले इमारतीतील ओपन व्हेंटिलेशन कडे भरकटलेल्या , भयभीत अवस्थेत आढळून आले.

स्थानिक पक्षी व वन्यजीव अभ्यासक हेमराज पाटील यांना त्यांनी रेस्क्यू कॉल केला. कार्यालयीन कामकाज वेळेत असल्याने मी स्वतः न जाता टीम सदस्य धनंजय यास संपर्क करून माहिती दिली.

लागलीच त्या ठिकाणी पोहोचून पक्षीचे पिल्ले त्याने सुरक्षितपणे ताब्यात घेतली. दिलेल्या सूचनेप्रमाणे
दुपारपर्यंत योग्य पद्धतीने फीडिंग व सांभाळ केला.

दुपारी त्याने ते पिल्लू माझ्या कडे आणून देण्यासाठी फोन केला. मी त्याला सांगितले की पिलांना ,
आपण जोखीम घेऊन सांभाळण्यापेक्षा त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करू.ते अधिक सुरक्षित व सोयीची असेल.

धनंजय , देवेंद्र आणि मी रुग्णालय परिसरात जाऊन
येथील कर्मचाऱ्याकडून ते पिल्लू आढळून आल्याचे लोकेशन घेतले. इमारतीच्या ओपन प्लेस मधून खाली पडलेली पिले घरट्यात रिलोकेट करण्यासाठी , इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर जाऊन आजूबाजूला घरट्याचा शोध घेतला. घरटे कोठेच आढळून आले नाही.

पण पाच - दहा मिनिटात ब्राऊन रॉक चॅट पक्षीच्या दोन मादी आमच्या जवळ येऊन मोठमोठ्याने हाका मारू लागल्या. कदाचित त्यांनी उघड्या खोक्यातील पिलांना बघितले होते.

तिसऱ्या मजल्याच्या मागच्या बाजूला व शेजारील
शाळेच्या बाजूला असलेल्या पत्री शेडच्या गोडावूनवर
दोघं आई जाऊन बसल्या.

तेथे पिलांना पोहोचवणे जरा अवघड होते. काहीतरी जुगाड करणे आवश्यक होते. बंद इमारतीच्या वरच्या मजल्यावर लांब दोरी घर्षण करून कापली.दोरीचे एक टोक खोक्याला बांधले. हळुवार अलगदपणे खोका पत्री शेडवर पोहोचवला. खोक्यातून पिल्ले बाहेर 
पडणार नाही याची यशस्वी काळजी घेतली.

सुरुवातीला दोन पिल्लू बाहेर आले. दोघे सारखे वयाचे व वाढ झालेले. तिसरे वाढ व वयाने लहान होते. खोक्यातून ते बाहेर येत नव्हते. शेवटी त्याला बाहेर काढून आईपर्यंत पोहोचवण्यासाठी , देवेंद्र भिंत उतरून तेथे यशस्वी सुखरूप पोहोचला.

मोठ्या दोन्ही पिल्ला जवळ एक आई व तिसऱ्या लहान पिलाजवळ दुसरी आई घिरट्या घालून आल्या.
हाका मारत , उड्या घेत त्यांच्यातील भीती दूर केली.
एक जायची दुसरी यायची , असे चार पाच वेळा झाले.
त्यांनी त्यांच्या चोचित आणलेले अन्न भराभर पिलांच्या चोचीत कोंबले.

पिलांना पत्री शेडच्या एका टोकापर्यंत हाका मारत , उड्या मारत नेले. दोन्ही इमारतींच्या मध्ये फूट दीड फूट
अंतराच्या मधल्या अरुंद पॅसेज मध्ये कुठेतरी घरटे होते.
जे आम्हाला शेवटपर्यंत दिसले नाही.

दोघं माता पक्षी ने भिंतीवर उड्या घेत , पिलांचा
आत्मविश्वास वाढवत आतल्या घरट्याकडे यशस्वी जबाबदार पालकाप्रमाणे नेले. सोबत असलेले दोघ
टीम मित्र व मी खूप खुश झालो.

इमारतीच्या खाली आल्यावर , तेथील कर्मचाऱ्यांने केलेल्या सहकार्याबद्दल , डॉक्टर साहेबांनी केलेल्या रेस्क्यू कॉल बद्दल आभार मानलेत.

दिवसभर उन्हाच्या तडाख्याने कासावीस व घशाला पडलेल्या कोरड पेक्षा जास्त कासावीस , पिले हरवल्याबद्दल , कुठेतरी निघून गेल्याबद्दल निश्चितच 
त्या आई झाल्या असतील. इकडे तिन्ही पिल्ले 
भीती च्या साम्राज्यात दाखल झाले होते.

विचार करा , आपल पाच-सहा वर्षांच मूल तास - दोन तास हरवले तर आपल्याला कसे वाटते. डोक्यात काय काय विचार येतात. घटनाक्रम फोटोत बघता येईल.

त्या सायंकाळी दोन्ही आई व पिलांची झालेली पुनर्भेट
फक्त ईश्वरीय ईच्छा...

सातपुडा निसर्ग संवर्धन संस्था फक्त निमित्त मात्र.

निसर्गातील प्रत्येक सजीव... गवतापासून वटवृक्षापर्यंत ,
चिमुकल्या फुलपाखरा पासून , जंगलाचा राजा वाघ व महाकाय देवमाशा पर्यंत , सर्वांचे अस्तित्व पर्यावरणात आगळे वेगळे व तितकेच महत्त्वाचे आहेत.

निसर्ग वाचवा...वसुंधरा वाचवा...

जागतिक वसुंधरा दिनाच्या शुभेच्छा..!!

पक्षीमित्र-हेमराज पाटील