Monday, 20 February 2023

स्व.केंगे सर,...

स्व.केंगे सर,

सस्नेह सा.नमस्कार 

संवादात नेहमी 'शिक्षण,' शिक्षणातील बदल हा विषय, तुमची दिनचर्या कशी असते? आई-बाबा,ताई, मुले कशी आहेत? समाजात काय चाललंय, काय नवीन विशेष? "ॠतु बदलतात. ऋतु बदलण्यावर माणसाचा विश्वास असायला हवा." असं तुम्ही नेहमी म्हणायचे. आस्थेनं होणारी विचारपूस  याची उत्तरं कुणाला द्यावीत हा 'प्रश्न' तुम्ही मागे सोडून गेलात सर. काल तुमचा फोन आला व हाॅस्पिटलला भेट घेतली त्यावेळीही हीच चर्चा- तुमचं काय सुरुय सर? परीक्षा कधी आहेत?आमच्या नीलने आज पोवाडा छान गायला का?  तसंच TET परीक्षा, बदलत्या शिक्षण प्रक्रियेबद्दल चिंता व्यक्त केलीत. जगतांना आणि शेवटच्या श्वासापर्यंत आपण शिक्षण, वाचन व त्यावरील चिंतन हा ध्यास सदैव जपलात.  आयुष्यात तुमच्यासोबत केलेल्या चर्चेत काही क्षण घालविलेला प्रत्येक व्यक्ती तुमच्या विचारांचा पाईक आहे. त्यामुळे शैक्षणिक, सांस्कृतिक,सामाजिक आणि राजकीय या क्षेत्रात होणाऱ्या  बदलांना सामोरे जाण्याची शक्ती,  सकारात्मक दृष्टी आणि दृष्टिकोन आपण देऊन गेला आहात. तुम्ही निर्माण केलेल्या पाऊलवाटेवरुन मार्गक्रमण करण्याचा व समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण पोचवण्याचा आम्हां सर्वांचा प्रामाणिक प्रयत्न राहील. त्याबद्दल तुम्ही निश्चिंत रहावं. भगवंतांने आपल्या पवित्र आत्म्यास शांती प्रदान करावी हीच प्रार्थना.

ॐ शांति शांति शांति 🌸🌺🌸

~प्रसाद वैद्य व परिवार

No comments:

Post a Comment