पुस्तक-लढवय्या विंग कमांडर: अभिनंदन
लेखिका- डाॅ. ललिता गुप्ते
प्रकाशक- सौ.मनीषा मंगेश गुप्ते
पुस्तक परिचय द्वारा -प्रसाद वैद्य
“चांगल्या पुस्तकाचं मूल्य हे त्याच्या छापील किमतीपेक्षा अनंत पटीने जास्त असतं. खरं म्हणजे पुस्तक हेच एक मूल्य असतं. ते एक विचार असतं. एक आचार असतं. एक सुप्त संभाषण असतं. त्यात परिवर्तनाचं छुपं वादळ असतं.” असं डॉ. सहदेव चौगुले आपल्या 'छंद अक्षरांचा' या पुस्तकात लिहितात. याचीच प्रचिती 'लढवय्या विंग कमांडर: अभिनंदन' हे डॉ. ललिता गुप्ते यांचं पुस्तक वाचताना आली. मराठी, हिंदी व इंग्रजी या तीनही भाषांचा दुर्मिळ त्रिवेणी संगम या एकाच पुस्तकात त्यांनी साधला याबद्दल सर्वप्रथम त्यांचं 'अभिनंदन' करतो. कारण वयाची 83 वर्ष पार केल्यानंतरसुद्धा तरुणांनाही लाजवेल अशा प्रकारचं कार्य या वृद्ध-तरुण व्यक्तिमत्त्वाचं आज देखील 'आपुलकीनं' सुरू आहे याचा अतिशय आनंद वाटतो.
पुस्तकाच्या मुखपृष्ठावरील भारताचा नकाशा, त्यात 'सार्वभौमत्व रक्षणाला प्राधान्य' या मथळ्याखालील संरक्षण मंत्री मा.राजनाथ सिंह यांचा संदेश, लढवय्या अभिनंदनची राष्ट्रभक्तीने ओतप्रोत भरलेली प्रसन्न भावमुद्रा वाचकाच्या मनाचा ठाव घेऊन पुस्तकाच्या आत डोकावायला भाग पाडते.
स्व.बा.भ. बोरकर यांच्या काव्यपंक्ती- “देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके ” जीवनाच्या सार्थकतेची अनुभूती देतात. डॉ ललिता गुप्ते या हाडाच्या शिक्षिका, सिद्धहस्त लेखिका आहेत याचा अनुभव पुस्तकातील प्रत्येक ओळ वाचताना येतो.
भारतमाता आपल्या अभिनंदन या सुपुत्रावर स्तुतीसुमने, शब्द सुमने म्हणा हवंतर, ज्या पद्धतीने उधळते आहे त्यावेळी या काव्यातून अंगावर रोमांच उभे राहतात. ललिता ताई लिहितात-
चि. अभिनंदन,
वीर धुरंधर, लढवय्या तू|
मस्त कलंदर, जिगरबाज तू||
झुंजार सिकंदर, धैर्यवान तू|
नशीबवान अन भाग्यवान तू|
सोशिकतेचा मेरूमणी तू|
विंग कमांडर अभिनंदन तू||
संस्कृत मध्ये एक वचन आहे.
सुपुत्रो मातृ पुण्येन
पितृ पुण्येन चातुर:|
उदारत्व वंश पुण्येन
आत्मपुण्येन स्व भाग्यतः||
या वचनाचा संदर्भ पुस्तकातील सद्भाव पत्रिका या शीर्षकाखाली लेखिकेनं अभिनंदनची आई सौ. शोभा वर्धमान यांना लिहिलेलं पत्र. लेखिकेची यांच्याशी प्रत्यक्ष ओळख व भेट नसताना सद्भाव पत्रिकेद्वारा जोडलेला स्नेह 'आपुलकी' निर्माण करतो.
आपला अभिनंदन तामिळनाडू राज्याचा, चेन्नईचा रहिवासी. हे नमूद करताना डॉ. अब्दुल कलाम, भारतीय अवकाश संस्थेचे (इस्रो) सध्याचे प्रमुख डॉ. सिवन, अर्थमंत्री मा.निर्मला सीतारामन यांचे संदर्भ वाचकाची उत्सुकता वाढवतात.
विश्वकवी रवींद्रनाथ टागोर यांची साहित्याची व्याख्या-
“भाव को अपना बनाकर सबका बना देना यही कविता है| साहित्य है|” हे वाक्य हृदयाला स्पर्श करते.
अभिनंदन वर्धमानचा शांत, धीरगंभीर, डोळ्यावर सूज असलेला चेहरा त्याची सोशिकता संयमी वृत्ती, चालण्यातला रुबाब हे सारं वाचकाला खूप काही सांगून जातं.
1 मार्च 2019 रोजी वाघा बॉर्डरला रात्री नऊ वाजून एकवीस मिनिटांनी मातृभुमीत पाऊल टाकलेला 'अभिनंदन' तुम्ही-आम्ही सर्वांनी टीव्हीवर पाहिला अन् सर्वांनाच विलक्षण भावला आणि प्रत्येकाच्या मनात शिरला. अभिनंदनचे आजोबा सिम्हाकुट्टी, वडील एअर मार्शल एस. वर्धमान (निवृत्त) व अभिनंदन या तीन पिढ्या देश सेवेत हवाई कार्यरत आहेत. 'अभिनंदन' 'वर्धमान' घराण्याचा 'भाग्यशाली' वारसदार आहे. म्हणूनच म्हणावेसे वाटते 'भाग्यशाली' तू घे 'अभिवादन'.
'भावशब्द मंगल आरती' या शीर्षकाखाली लेखिका अवघ्या वर्धमान कुटुंबियांना अभिवादन करतात. राष्ट्रनिष्ठा जपलेल्या परिवाराची अशी आरती जी आपण सर्वांनी गायली पाहिजे.
पुलवामा येथील सीआरपीएफ च्या तांड्यावर 14 फेब्रुवारी 2019ला या हल्ल्यात आपले 40 जवान हुतात्मा झाले. या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर म्हणून भारताच्या हवाई दलाने आपली विमाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाठवणं, वैमानिकांनी धाडसाने प्रशिक्षण शिबिरे नष्ट करणं, पुन्हा पाकिस्तानने 27 फेब्रुवारीला सर्वात प्राणघातक F16 हे विमान भारताच्या हद्दीत घुसवणं आणि आपल्या अभिनंदनने मिग 21च्या मदतीने कमालीची वीरता दाखवत पाकिस्तानचे F16 हे प्राणघातक विमान पाडणं हा सारा घटनाक्रम ज्या पद्धतीने ललिता ताईनी शब्दबद्ध केलाय तो वाचकाच्या हृदयाचा ठोका चुकवतो.
तरुणाईची क्रेज बनलेला विषय म्हणजे अभिनंदनच्या मिशा. याविषयी देखील लेखिकेने वेगवेगळे संदर्भ देत मजेशीर लिहिलंय.
सुवर्णयुग मित्र मंडळाच्या माध्यमातून ऋतुराज दीक्षित यांच्या संकल्पनेतून मयूर, निलेश व सचिन तसेच मंडळातील उत्साही कार्यकर्त्यांनी परिश्रमाने साकारलेला अभिनंदनच्या शौर्याचा गणेशोत्सवातील देखावा, प्राध्यापक दिनेश डांगे यांचे शब्दांकन असलेला संदेश, दृष्टिक्षेपात अभिनंदन यांचा जीवन आलेख, मणिकांचन योग 1 मार्च 2019 - भारत माता की जय घोषात अभिनंदन यांचं स्वागत, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची (NDA) महत्त्वपूर्ण संक्षिप्त माहिती, स्व.अटलजी वाजपेयी यांच्या “भारत जमीन का तुकडा नही जीता जागता राष्ट्रपुरुष है...” या काव्यपंक्तीचा उल्लेख, डॉ. अब्दुल कलाम व डॉ. राधाकृष्णन यांचे देशभक्ती विषयीचे विचार या सर्व गोष्टींचा लेखिकेने केलेला समर्पक वापर वाचकाला चिंतन करायला भाग पाडतो.
राष्ट्र के प्रति हमेशा के लिए सजग, सतर्क होकर कर्तव्य निभाना, जान हथेली पर लेकर जूझना यही अभिनंदनका वायुदल और पूरे देश के प्रति महान योगदान है| वक्तृत्व कला में निपुण और किताबें पढ़ना उसका शौक है यह बात हम सभी के लिए अनुकरणीय है| ऐसा लेखिका हमें सुझाव देती है|
ललिता ताईंनी कवी प्रदीप यांची क्षमा मागून 'ए मेरे वतन के लोगो...' छोटेखानी बदल करून केलेली काव्यरचना अप्रतिम आहे.
इयत्ता आठवीच्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकात Acrostic (नावाच्या आद्याक्षरांपासून तयार केलेली शब्दरचना किंवा काव्यरचना) हा एक घटक आहे. अभिनंदनच्या नावाचे Acrostic तयार करून विद्यार्थ्यांनी कोणते गुण आत्मसात केले पाहिजेत याचं छान मार्गदर्शन लेखिका A Tremendous Ovation या सदराखाली नमूद करतात. A Tremendous Ovation To Aviation असंच मी म्हणेन.
ABHINANDAN
A- Alert,Able
B- Brave, Bold, Balanced
H- Hero, Humble, Honourable
I- Intelligent, Imitable,Industrious
N- National Hero
A- Attentive,Amiable
N- Noble
D- Determined, Disciplined,
A- Admirable,Adorable
N- Noteworthy, Number One
"A picture is worth a thousand words." असं म्हटलं जातं. या पुस्तकाचा सार ज्याला म्हणता येईल असं सुंदर चित्र पारनेर येथील हरहुन्नरी चित्रकार काळे शिक्षक श्री रामदास नरसाळे सर यांनी रेखाटलंय - “भारतमातेच्या चरणी अभिनंदन.” चित्रकाराने रेखाटलेलं हे पान आणि या पुस्तकातील प्रत्येक पान हे सहयोगाचे द्योतक असल्याने तेदेखील 'अभिनंदन' करण्याजोगं आहे कारण ते वर्धमान - वर्धिष्णू - वाढणारं आहे. त्याचबरोबर ते तुमच्या माझ्या जीवनात रंग भरणारं आहे. हे नमूद करताना मला विशेष आनंद वाटतो.
स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातील युवक असा असावा व शेवटचे पान या शीर्षकाच्या माध्यमातून ललिता ताईंनी संवेदनशील वृत्तीने आत्मभान व समाजभान जपण्याची जाणीव आपल्याला करून दिलीय. मोजक्या शब्दात सांगायचं झालं तर मी म्हणेन -
उस बस्तीमें लूटनेवालो,
इस बस्तीमें जुल्म ना ढाओ |
किसी का बदला किसी से लेने
हम नही आते तुम भी ना आओ|
मजहब नही सिखाता आपस में बैैैर रखना |
कारण युद्ध आणि वाद सर्वार्थानं वाईटच असतात त्यातून कुणाचंही भलं होत नाही. ते आपण टाळुया. आपुलकीनं एकमेकांशी संवाद साधुयात आणि शांतीनं, आनंदानं व एकदिलानं राहुयात. संत तुकडोजी महाराज यांच्या शब्दांत सांगायचं झालं तर-
या भारतात बंधू भाव नित्य वसू दे|
दे वरचि असा दे|
हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे |
मतभेद नसू दे||
अभिनंदन वर्धमान हा भारतमातेचा सुपुत्र यापूर्वी महाराष्ट्राच्या भेटीला येऊन गेलाय की नाही याची मला कल्पना नाही. परंतु डॉ. ललिताताई गुप्ते यांनी पुस्तकाच्या रूपाने त्याला आपल्या भेटीला आणलंय म्हणूनच प्रत्येकानं त्याला आवर्जून भेटावं, त्याला वाचावं आणि त्याच्या विवेकी, संयमी, धीरोदात्त, धैर्यशील वृत्तीला आपल्यात रूजवावं हीच अपेक्षा.
लढवय्या विंग कमांडर: अभिनंदन हे मूल्य रुजवणारं अनुभवसंपन्न विश्व असलेल्या डॉ. ललिता गुप्ते यांचं पुस्तक वाचूया. जगूया.
तुझीच पूजा तुझी आरती तुझीच आराधना|
भारत माते तुझ्याच चरणी नमवू हा माथा|
स्नेह हमेशा बना रहे. शुभेच्छा.भेटुया.
पुस्तक परिचय द्वारा
~प्रसाद सुरेश वैद्य
विवेकानंद विद्यालय,
चोपडा जि. जळगाव
भ्रमणध्वनी-9420112215
No comments:
Post a Comment