Monday, 28 August 2023

मुलीचा शाळेत पहिला नंबर आला म्हणून बापाने मुलीला हॉटेलमध्ये घेऊन आला आणि वाचा तिथे काय घडले....

मुलीचा शाळेत पहिला नंबर आला म्हणून बापाने मुलीला हॉटेलमध्ये घेऊन आला आणि वाचा तिथे काय घडले....


मी ऑफिस मधून घरी जाता जाता एका हॉटेलमध्ये गेलो, वेळ संध्याकाळची, तरी 7 वाजलेले, तेच हॉटेल तोच कोपरा तोच चहा आणि मित्राची वाट पाहत बसलो होतो. चहाचा एक झुरका घेतला तेव्हा, माझ्या टेबलासमोरील दुसऱ्या टेबलवर एक माणूस आणि 8 ते 10 वर्षाची त्याची मुलगी येऊन बसली. शर्ट ही फाटका अगदी त्याच्यासारखाच, वरची दोन बटने गायब, मळकी पॅन्ट थोडी फाटकी, मजुरी करणारा मजूर असावा तो माणूस, मुलीने छान दोन वेण्या घातलेल्या, साधारण फ्रॉक पण स्वच्छ धुतलेला होता, तिच्या चेहऱ्यावर अतिशय आनंद आणि छान कुतूहल दिसत होते, ती हॉटेलमध्ये सगळीकडे डोळे मोठे करून पाहत होती. डोक्यावर थंडगार हवा सोडणारा पंखा, खाली बसायला गुबगुबीत सोफा, ती अगदी सुखावली होती, वेटरने दोन स्वच्छ ग्लास थंडगार पाणी त्यांच्यासमोर ठेवलं, पोरी करता एक डोसा आणा कि !!. त्या मुलीच्या बापाने वेटरला सांगितलं, मुलीचा चेहरा अजून फुलला, तुम्हाला नाय सांगितले !, असे मुलीनं बाबा ना विचारले, त्यावर बापाने मला काही नको, तो बाप वेटरची नजर चुकवत म्हणाला,

थोड्या वेळात वेटर डोसा, चटणी, सांबार वेगळं घेऊन आला. गरमागरम मोठा फुललेला डोसा खाण्यात ती मुलगी गुंग झाली, तो तिच्याकडे कौतुकाने पाहत पाणी पीत होता.. तेवढ्यात त्याचा मोबाईल वाजला, आजकालच्या भाषेत डब्बा फोन.. तो मित्राला सांगत होता, आज पोरीचा वाढदिवस आहे तिला घेऊन हाटेलात आलो आहे, मी बोललो होतो शाळेत पहिला नंबर आला तर तुझ्या वाढदिवसाला मी हाटेलात मसाला डोसा खायला घालीन म्हणालो होतो. ती खाते डोसा.. श्वास घेऊन नाही र…. दोघांना कुठलं परवडतं, घरी पिठलं भाकर हाय मला गरमागरम!


 चहाच्या चटक्याने मी भानावर आलो, कसाही असुदे श्रीमंत, किंवा गरीब बाप हा नेहमीच लेकीच्या चेहऱ्यावर हसू बघण्यासाठी काहीही करेल, मी काउंटरवर चहाचे आणि त्या 2 मसाला डोसा चे पैसे भरले, आणि सांगितलं अजून 1 डोसा आणि चहा तिथे पाठवा! पैसे का नाही असं विचारलं तर सांगा! आज तुमच्या मुलीचा वाढदिवस आहे ना! तुमची मुलगी शाळेत पहिली आली ना! आम्ही ऐकलं तुमचं बोलणं!!म्हणून आमच्या हॉटेल तर्फे खास तुमच्यासाठी, असाच अभ्यास कर म्हणावं याचं बिल नाही, पण फुकट हा शब्द वापरू नका, त्या वडिलांचा स्वाभिमान मला दुखवायचा नव्हता, आणि अजून एक डोसा त्या टेबलवर गेला, मी बाहेरून पाहत होतो, तो म्हणाला कावरा बावरा झाला, पुन्हा म्हणाला मी एकच म्हणालो होतो,तेव्हा मॅनेजर म्हणाले अहो तुमची मुलगी शाळेत पहिली आली! आम्ही ऐकलं ते म्हणून हॉटेल तर्फे आज दोघांनाही फ्री!!!!

त्या माणसाच्या डोळ्यात पाणी आलं. तो लेकीला म्हणाला बघ असाच अभ्यास केलास तर काय काय मिळतेया बाप वेटरला म्हणाला हा डोसा बांधून द्याल का मी आणि माझी बायको दोघेभी अर्धा अर्धा खाऊ, घरी तिला कुठं असं खायला मिळत,..!

आता माझ्याही डोळ्यात खळकन पाणी आलं, अतिशय गरिबीतही माणुसकी जपणारी माणसं आहेत अजून या जगात, तुम्हाला असं कोणी आढळलं, तर एखादा मसाला डोसा अवश्य खायला घाला.. 

🙏🏻

एक लेखक @evryone

Monday, 21 August 2023

श्री. वसंतभाई मयूर यांच्या सुरांना समर्पित आयुष्याचा अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयातर्फे पं. विष्णू दिगंबर पलुस्कर संगीत कला गौरव पुरस्कार देऊन सन्मान...

श्री. वसंतभाई मयूर यांना अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयातर्फे पं. विष्णू दिगंबर पलुस्कर संगीत कला गौरव पुरस्कार प्रदान 

आमचे सगळ्यांचे गुरु संगीताचार्य श्री. वसंत भाई मयूर यांना अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयातर्फे पंडीत. विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्या 150 व्या जयंती निमित्त "पं. विष्णू दिगंबर पलुस्कर संगीत कला गौरव पुरस्कार" नवी मुंबईत एका दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला.

        जळगाव जिल्ह्यातील चोपड्या सारख्या, त्या मानाने मोठ्या शहरांपासून दूर, कोपऱ्यात असलेल्या गावात 50-60 वर्षांपूर्वी शास्त्रीय संगीत शिकणे म्हणजे किती कठीण काम होतं ते आजच्या ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कदाचित कळणार नाही. चांगल्या गुरू चा शोध घेणे, खडतर परिस्थितीतही नवीन ज्ञान पदरात पाडून घेण्यासाठी अमळनेर, जळगाव, धुळे, मुंबई इथे जाऊन तबल्याच्या गुरूंचे मार्गदर्शन घेणे, उत्तम संगीत ऐकण्यासाठी धडपड.. सारं काही अवघड. काही वेळा तबला वादक फक्त वाजविण्याचे काम करत, त्यांना एखादा कायदा कसा लिहावा, लिपी, थेअरी वगैरे काहीच भानगड माहीत नसे. तिथे तो बोल किंवा कायदा शिकून, समजून  व्यवस्थीत लिपीबध्द करून जतन करून ठेवणे हेही एक जिकिरीचं पण महत्त्वाचं काम त्यांनी केलं. मयूर सरांच्या सुंदर हस्ताक्षरातल्या लिखाणाच्या वह्या, नोट्स हा तर एका पुस्तकाचा चा विषय होईल इतका सुंदर आहे. लाल, हिरव्या, निळ्या रंगात शाईच्या पेनाने लिहिलेल्या वह्या फक्त बघणे हा सुद्धा एक वेगळा आनंद. वर्षानुवर्षे संगीत शास्त्र शिकून, संकलन करून, जतन करून ते पुढच्या पिढीपर्यंत पोचवण्याचं अत्यन्त महत्त्वाचं काम मयूर सरांनी अव्याहत चालू ठेवलं आहे. जितक्या जिद्दीने, पॅशन ने संगीत शिकण्याचा ध्यास मयूर सरांनी घेतला तितक्याच आत्मीयतेने तो सांगीतिक वसा शिष्यांना ते देण्यासाठीची धडपड असते. गेली 50 वर्ष अव्याहतपणे ही परंपरा कायम राहिली आहे. सकाळी 5 वाजेपासून ते रात्री पर्यंत या मंदिरातली पूजा चालूच असते. शाळेतल्या संगीत शिक्षक या पदाची सार्थ सेवा मयूर सरांनी अगदी मनापासून केली. चोपडा परिसरात संगीत शिक्षक म्हणजे मयूर सर हा एक प्रकारचा मानक होऊन गेलाय. संगीतात विद्यार्थ्यांना घडविणे म्हणजे सोपं काम नाही. लहान लहान वयातल्या पोरांना तबला पेटीवर हात कसा ठेवायचा याच्यापासून पासून ते त्यांच्याकडून रियाझ करवून घेणे, पाठांतर, परीक्षेची तयारी या सर्व गोष्टी म्हणजे अत्यन्त अवघड प्रकार. काहींची आर्थिक परिस्थिती नाजूक तर काहींची शैक्षणिक, सगळ्यांना सांभाळून घेणे, जागोजागी मदत करणे हेही त्यांचं एक महत्त्वाचं काम. संगीतात दगड असलेल्या बऱ्याच विद्यार्थ्यांना मयूर सरांनी घडवून त्यांच्या सुंदर मुर्त्या बनवल्या आहेत. तबला, पेटी, गायन यात सरांच्या शेकडो विद्यार्थ्यांनी प्रावीण्य मिळवलंय, मोठमोठ्या संमेलनात वाजवलंय, पुरस्कार प्राप्त केलेत.

    काळाच्या ओघात खूप सारी लेबल आपल्याला चिटकतात, पण 'मयूर सरांचे विद्यार्थी' ही ओळख अजूनही मनाच्या खूप जवळची आहे.

आज गांधर्व महाविद्यालया सारख्या भारतीय संगीतातल्या अग्रगण्य संस्थेने दिलेला पं. पलुस्करांच्या 150 व्या जयंतीच्या वर्षीचा  पुरस्कार, सरांच्या संगीत क्षेत्रातील सेवेची घेतलेली दखल,  केलेला सत्कार ही आम्हा सगळ्या शिष्यांसाठी आनंदाची पर्वणी आहे. 

शारदा देवीचा आशीर्वाद गुरू- शिष्यांवर असाच कायम राहो अशी प्रार्थना !!

संगीत महर्षी, गुरुवर्य वसंतभाई मयूर यांना खूप खूप शुभेच्छा !! 

--स्वप्नील पोतदार आणि सर्व विद्यार्थीगण

Click Here ➤ Zee 24 तास वरील बातमीची लिंक

संकलन~प्रसाद वैद्य

Thursday, 10 August 2023

मिट्टी को नमन वीरों का वंदन म्हणत विवेकानंद विद्यालय,चोपडा तर्फे क्रांति दिन साजरा

मिट्टी को नमन वीरों का वंदन म्हणत विवेकानंद विद्यालय,चोपडा तर्फे क्रांति दिन साजरा

दि. ९ ऑगस्ट २०२३                                        प्रतिनिधी, चोपडा                                        स्वातंत्र्यासाठी बलिदान करणाऱ्या क्रांतिवीरांचं स्मरण करण्याचा दिवस व जागतिक आदिवासी दिन विवेकानंद विद्यालयात वक्तृत्व स्पर्धा, उत्स्फूर्त वक्तृत्व,भित्तिपत्रिका सादरीकरण,गीतगायन व क्रांतिकारकांची वेशभूषा साकारुन साजरा करण्यात आला.  कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतमाता,आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, स्वा.वीर सावरकर,चंद्रशेखर आझाद व भगतसिंग या क्रांतिकारकांच्या प्रतिमेचे पूजन व सर्व ज्ञात-अज्ञात क्रांतिकारकांचे स्मरण करण्यात आले. विद्यालयातील इयत्ता सहावीची  विद्यार्थिनी कु.प्रियंका भोई  हिने ऐ मेरे वतन के लोगों... हे गीत तर कु.कल्याणी पाटील  व कु. गौरवी पाटील या दोघींनी हा देश माझा...हे गीतगायन सादर केले. पुढील विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात क्रांतिदिनावर आधारित अतिशय सुंदर वेशभूषा व संवाद सादर केले.

वेशभूषा सादर करणारे इयत्ता सहावीचे विद्यार्थी व विद्यार्थिनी

१)अथर्व बोरसे २)गिरीराज पाटील३)यश शिंपी ४)सिद्धांत चौधरी ५)रोहित पाटील ६)निपुण पाटील 

७)मो.लबीब शेख इम्रान  ८) वेदांत चौधरी  ९)ईशान चौधरी १०)सौम्या पाटील 

क्रांतिदिनाची माहितीपूर्ण भित्तिपत्रिका बनवणारे इयत्ता आठवी व नववीचे विद्यार्थी व विद्यार्थिनी 

१) आर्यन पाटील २) वेदांत चौधरी ३) श्रीकांत चौधरी. ४) प्रथमेश परदेशी५) स्वरा हरताळकर.६) निशिता चौधरी७) पूजा पाटील.८) ऋतुजा पाटील.९) स्वरा शुक्ल,१०) कोमल पाटील. ११) किमया बडगुजर, १२) रजत पाटील  १३) लोकेंद्र येसे  १४) यश पाटील.१५) वैष्णवी येसे १६)भूमिका पाटील.                                                                                                                                     

कु. जैनब जावेद तडवी (इ.९वी) हिने आदिवासी स्वातंत्र्यसैनिक बिरसा मुंडा यांच्याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले.  उपशिक्षक जावेद तडवी यांनी मोजक्या शब्दात क्रांति दिन व जागतिक आदिवासी दिन याबद्दल विद्यार्थ्यांना महत्वपूर्ण माहिती सांगितली. त्यानंतर क्रांति दिनानिमित्त आयोजित वक्तृत्व व उत्स्फूर्त वक्तृत्व या स्पर्धांचा निकाल जाहीर करण्यात आला. उपशिक्षक प्रसाद वैद्य व सौ.स्मृति माळी यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले.  स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणे- 

प्रथम-चि.सत्यम संजय सोनवणे (इ.१०वी)

द्वितीय-कु.आरुषी प्रदीप पाटील (इ.९वी)

तृतीय-चि. तनीष पवन लाठी (इ.१०वी) 

उपशिक्षिका सौ. माधुरी हळपे, सौ.स्मृति माळी श्री.राधेश्याम पाटील व श्रीमती शितल पाटील  यांनी या स्पर्धेचे नियोजन केले.

कार्यक्रमाच्या समारोपापूर्वी देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांना समर्पित मेरी माटी मेरा देश- मिट्टी को नमन वीरों का वंदन या अभियानाअंतर्गत पंचप्राण प्रतिज्ञा उपशिक्षक श्री. पवन लाठी यांनी सर्व विद्यार्थी व सर्व शिक्षकवृंद यांचेकडून म्हणवून घेतली. 

कार्यक्रमाचे सुंदर नियोजन व सादरीकरण यामुळे विद्यार्थ्यांनी देशभक्तीचे वातावरण अनुभवले व त्याला दाद दिली.

कलाशिक्षक श्री. राकेश विसपुते यांनी सुंदर फलक लेखन व मेरी मिट्टी मेरा देश या आशयाची सुंदर रांगोळी काढून वातावरण निर्मिती केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती शितल पाटील यांनी केले. 

श्री.पवन लाठी, सर्व शिक्षकवृंद व कर्मचारीवृंद याप्रसंगी उपस्थित होते. 

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.विकास हरताळकर,अध्यक्ष डॉ.विजय पोतदार,उपाध्यक्ष श्री. घनश्यामभाई अग्रवाल,  सचिव ॲड.रवींद्र जैन, सहसचिव डॉ.विनीत हरताळकर, सर्व विश्वस्त, मुख्याध्यापक श्री.नरेंद्र भावे व पालकवृंद यांनी या वक्तृत्व स्पर्धेतील यशस्वी व सहभागी  विद्यार्थी, वेशभूषा सादर करणारे तसेच माहितीपूर्ण भित्तिपत्रिका बनवणारे  विद्यार्थी व सर्व मार्गदर्शक शिक्षकवृंद यांचे कौतुक व अभिनंदन केले. 

विवेकानंद विद्यालय,चोपडा तर्फे आभाळाचं दान कार्यक्रमातून कवी ना. धों.महानोरांना श्रद्धांजली

 विवेकानंद विद्यालय,चोपडा तर्फे आभाळाचं दान कार्यक्रमातून  कवी ना. धों.महानोरांना श्रद्धांजली . .

प्रतिनिधी, चोपडा

दिवंगत कविवर्य ना. धों.महानोर यांना श्रद्धांजलीपर ‘आभाळाचं दान अर्थात पाऊसगान' या पावसाच्या संकलित कवितांचा

कार्यक्रम विवेकानंद विद्यालयात आयोजित करण्यात आला. विलास पंढरीनाथ पाटील खेडीभोकरीकर (सेवानिवृत्त मुख्याध्यापक जय श्री दादाजी हायस्कुल,तांदळवाडी) हे याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला कवी महानोरांच्या रेखाचित्राचे पूजन करण्यात येऊन त्यांचा जीवनपरिचय  उपशिक्षिका माधुरी हळपे यांनी विद्यार्थ्यांना  करुन दिला व रानकवी स्व.ना. धों.महानोर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर विद्यालयातील खालील विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात पावसाच्या संकलित कविता व काही विद्यार्थ्यांनी स्वरचित कवितांचे अतिशय सुंदर गायन व अभिवाचन सादर केले.

कविता सादर करणारे विद्यार्थी 

१)प्रांजल सानप (इ.५वी)-रिमझिम  रिमझिम पाऊस बरसे...

२)नक्षत्रा सोनवणे (इ.५वी)-बूंदे...

३)आर्यदीप पाटील (इ.५वी)-स्व.ना.धो. महानोर यांची कविता

४)मनाली पाटील व जान्हवी चौधरी(इ.५वी) -अग्गोबाई ढग्गोबाई...

५)प्रियंका भोई (इ.६वी)-धोय धोय पाऊस...

६ ) आरोही पाटील ( इ . ५ वी ) ए आई, मला पावसात जाऊ दे

७)अनुष्का शिंदे (इ.६वी)-पाऊस आला...

८)कल्याणी पाटील व प्रांजल पाटील (इ.६वी) पावसाचे गाणे...

९ ))मुक्ता पाटील (इ.७वी)-पाऊस...

१०)रोहन पाटील (इ.७वी)-पाऊसधारा

११)वैष्णवी पाटील (इ.७वी)-पाऊस मस्तीतला..

१२)दीक्षा देशमुख (इ.७वी)-इंद्रधनुष्य

१३)स्वरा हरताळकर (इ.८वी)-पावसाची कविता

१४)साक्षी रायसिंग (इ.८वी)-पावसाची परी

१५)आर्या जोशी (इ.९वी)-हसरा नाचरा...

१६)सात्विक माळी (इ.९वी)-पाऊस आला...

१७)जैनब तडवी(इ.१०वी)-पाऊस म्हणजे नेमकं असतं तरी काय.?

१८)श्रुती देशमुख (इ.१०वी)-पाऊस  

१९)प्रेरणा महाले(इ.१०वी)-पावसात भिजतांना...

तसेच प्रसाद वैद्य यांनी पाऊस ही स्वरचित कविता सादर केली.  कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विलास पाटील यांनी आपल्या संकलित आणि दिलखुलास पाऊस कविता सादरीकरणातून विद्यार्थ्यांना चिंब भिजवलं. दिवंगत कविवर्य ना. धों. महानोर यांच्या 'चिंब पावसानं रानं झालं आबादानी....'चा अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला. या सादरीकरणाच्या दरम्यान विद्यालयातील निवडक विद्यार्थ्यांनी कलाशिक्षक राकेश विसपुते यांच्या मार्गदर्शनाने पावसावर आधारित चित्र रेखाटले व रंगवले.

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी मुख्याध्यापक श्री. नरेंद्र भावे यांनी विलास पाटील यांचे आभार मानले व सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.स्मृती माळी व श्री. जितेंद्र देवरे यांनी तर श्री.विलास पाटील यांचा परिचय श्री. राधेश्याम पाटील यांनी करुन दिला.  मुख्या . श्री. नरेंद्र भावे, श्री. पवन लाठी व सर्व शिक्षकवृंद याप्रसंगी उपस्थित होते. 

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.विकास हरताळकर,अध्यक्ष डॉ.विजय पोतदार,उपाध्यक्ष घनश्यामभाई अग्रवाल,  सचिव ॲड.रवींद्र जैन, सहसचिव डॉ.विनीत हरताळकर, सर्व विश्वस्त व  पालकवृंद यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे.