ओळखपत्र ...मातीआड झालेल्या एका हसऱ्या, समंजस दुःखाचं!
"काय देती वो तुमची शाळा?तुमाला तुमच्या शाळेचंच पडलंय...
इतं भुकेनं आss वासलेली पाच तोंडं हायेत पदरात माझ्या.
वरून नवरा तसला पिदाडा.
पोटापाण्याचं आदी बागावं का तुमची शाळाच बगावी?
नुसती शाळा शिकून पोट भरत नसतंय मॅडम!
आन पयलीचं वर्ष एवढं काय मह्त्वाचं नसतंय..
कायी फरक पडत न्हाई थोडे दिवस शाळा बुडली तर...
मुकादमाकडून 20,000/- रुपय उचल घेतलीय मी घराचे गळके पत्रे दुरुस्त करायला...ती फेडावी लागल का न्हाई?"
आईच्या पदराआड तोंड लपवत, किलकिल्या डोळ्यांनी हे सारं ऐकत होता माऊली!
संध्या मॅडम आपल्या आईला समजावण्यात अयशस्वी झाल्यात,आता सगळं आपल्या मनाविरुद्ध होणार, हे एव्हाना लक्षात आलं होतं त्या चिमुकल्या जिवाच्या!
मॅडम म्हणत होत्या," शाळेच्या होस्टलवर सोय होईल त्याची राहण्याची. मी विचारते संस्थेला. हुशार आहे हो माऊली,असं मध्येच नेऊन त्याचं
नुकसान नका करू!"
"नगं.... पाचीच्या पाची लेकरं घेऊन चाललेय मी.चार पोरीच्या पाठीवर झालंय हे पोरगं मला, त्याला इथं ठेऊन तिथं जीव कसा लागल माजा?"
तब्बल आठवडाभराच्या चर्चेअंती संध्या मॅडमला माऊलीच्या आईकडून मिळालेलं हे निराशाजनक अन् काहीसं कटू उत्तर होतं.
पण त्याक्षणी त्या हेही जाणून होत्या की, त्यांना केवळ एक शिक्षणाबद्दल अनास्था असलेला,अशिक्षित पालक बोलत नसून, नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून गेलेली, पाच लेकरांच्या पोटापाण्याचा प्रश्न भेडसावत असलेली हतबल आई बोलत होती.
अखेर परिस्थितीसमोर नाईलाज झाला अन् उद्या प्रथम सत्राचा शेवटचा पेपर देऊन माऊली काही महिन्यांसाठी शाळा सोडून आईसोबत ऊसतोडीसाठी भटकंती करत गावोगाव फिरणार,यावर शिक्कामोर्तब झालं!
गरिबीचे निकष अन् व्याख्या तिला सोसणाराच सांगू शकतो, इतरांनी त्यावर सांगितलेल्या उपाययोजना केवळ पुळचट असतात!
दुसरा दिवस...
माऊली मन लावून पेपर सोडवत होता, मॅडम त्याच्याकडे बघत विचार करत होत्या..
'काय भविष्य असेल अशा लेकरांचं? पोटाला दोनवेळचं अन्न मिळवणं हे आणि हेच अंतिम ध्येय असलेल्या अशा कैक लोकांचं?'
मॅडम विचारात असतानाच माऊली त्यांच्यासमोर सोडवलेला पेपर घेऊन उभा राहिला. मॅडम भानावर आल्या.
पेपरसोबत त्याने एक छोटीशी कोरी चिठ्ठी मॅडमकडे सरकवली...
"मॅडम, आमच्यासोबत मावशी पण येणार आहे. मला तुमचा नंबर द्या, मावशीच्या फोनवरून मी कधी मिसकॉल केला तर कराल का मला फोन?
त्या चिमुकल्या जीवाची ती साधीच मागणी किती आर्त वाटली त्याक्षणी!
पेपरवर नजर फिरवली. किती सुवाच्य अक्षर, अचूकता...!
त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे टक लावून बघीतलं मॅडमने.
घंटा वाजली, शाळा सुटली, अन् एक चिमुकला जीव आपल्या मनाविरुद्ध जगण्यासाठी चकारही न काढता निघून गेला.
लखलखता दिवाळसण...
झगमगाट, रोषणाई, नवनवीन खरेदी, उत्साह, गुलाबी थंडी...
एकुणात सुखवस्तू सण..!
पण जगाच्या एका कोपऱ्यात एक कोवळा जीव कुठेतरी हाच सण ऊसाच्या घनदाट
रानात, किर्रर्र अंधाराच्या साक्षीनं केवळ कल्पनेत साजरा करत होता.
त्या किर्रर्रर, कर्कश्श रानात,दिवसभर काम करून दमून निजलेल्या माणसांच्या घामाच्या दुर्गंधात, किरकिऱ्यांच्या आवाजात,अठराविश्व दारिद्र्याच्या ओटीत, शिक्षणाची चटक लागलेला पण परिस्थितीपुढे हतबल झालेला एक जीव त्या भयाण शांततेत मनातल्या मनात किंचाळायचा.
गावाबाहेर दूर कुठेतरी उसाच्या फडात तंबू ठोकून राहिलेल्या त्याच्या टोळीत त्याला दुरून एखाद्या फटाक्याचा बारीकसा आवाज, लुकलूकणारा एखादा आकाशकंदील दिसायचा अन् त्या कडाक्याच्या थंडीत अंगावरच्या फाटक्या कपड्यानिशी बाहेर येऊन तो हा सण अधाशागत कानाडोळ्यांनी प्यायचा!...
घाटाघटा....!!
दिवसा ऊसाच्या चरबट पानांच्या सळसळीत त्याच्या पुस्तकाच्या पानांचा आवाज विरून जायचा.
भाऊबीजेदिवशी दुपारी मॅडमचा फोन अचानक किंचित चमकला, थरथरला...लगेच बंद झाला..
एखादी किंकाळी दाबावी तसा!
Unknown number..
मॅडमने त्यावर फोन लावला. रिंग जाते न जाते, तोच फोन उचलला गेला.
एक मृदू, कोवळा,नाजूक, सच्चा पण दबका आवाज...
गुपचूप केला असावा ...
"मॅडम, मी माऊली!"
"बोल बाळा, कसा आहेस? कुठे आहेस? दिवाळीत आलास का इकडे?"
"मॅडम, आम्ही इकडं खूप लांब आलोत,मला ह्या गावाचं नाव माहीत नाही.सारखंच गाव बदलत जातोत आम्ही ऊसतोडीला!
मुकादम खूप कडक आहे."
"बरं..!
अरे, दिवाळी कशी झाली मग तुझी ?
नवा ड्रेस घेतलास ना? आईनं काय काय केलंय फराळाला?"
"न्हाई मॅडम,
मायजवळ पैशे न्हाईत भाजीचं समान आणायला.
चार दिवस झाले,आम्ही रानातली कच्ची पात खायलोत भाकरीसोबत.
कोरडा घास गिळतच न्हाई, पाणी पेत पेत जेवावं लागतंय.
इथं मित्र पण नाहीत खेळायला.
नयन, अर्णव, रुपेशची खूप आठवण येते."
ओह! पराकोटीचं दारिद्र्य,दुःख बोलत होतं केविलवाण्या स्वरात!
"मॅडम, मला गणितातली वजाबाकी समजत नाहीय, सांगतात का समजून?"
"अरे, तिथं पण अभ्यास करतोयस की काय?"
"हो मॅडम, मी सगळी पुस्तकं आणलीत इथं.
बहिणी, माय कामावर गेल्या की मी अभ्यास करतो.वहीवरच्या तुमच्या सह्या बघून
खूप आठवण येते तुमची. शाळा किती तारखेला भरणारये मॅडम?
आईला विचारलं तर लई खेकसती माझ्यावर!....
शाळेचं नुसतं नाव जरी काढलं तरी.
सारखं म्हणती..
'काय दिती रं तुझी ती शाळा?'"
आयुष्याचे कैक उत्सव, इच्छा वेळोवेळी वजा केलेल्या त्या शिष्याला गुरूने गणितातली वजाबाकी समजावून सांगितली.
त्याक्षणी ते ज्ञानही आधाशागत प्राशन करत होते त्याचे कान.
संवाद संपला...
डोळे मिटून मॅडम विचार करू लागल्या...
'जगण्यासाठी आयुष्याच्या काही अलिखित अटी गुपचूप मान्य केलेल्या असतात प्रत्येकानेच.
अश्वत्थाम्यासारख्या असंख्य जखमा आजन्म मिरवत असतात काही जीव!
पोटातली भुसभुशीत दलदल भुकेच्याही बाहेर एक जग असतं हे विसरून जायला भाग पाडते.
सादळलेल्या परिस्थितीचे ओले पापुद्रे सोलण्यात उभा जन्म जातो...अस्तित्वावर बुरशी चढवत!
अस्तित्वहीन जन्माची ठणकही जाणवू देत नाही ती भूक.
प्रगतीच्या गुरुत्वाकर्षणकक्षेच्या कोसो दूर हुंदडत उभं आयुष्य जातं अन् एक दिवस अवेळी अंधार पांघरून निपचित निजतं.
खरंच... वास्तवाइतकं परखड, पारदर्शी काहीच नसतं... काहीच!
दीर्घ सुट्टीनंतर ,शाळा भरल्या.
वर्गावर्गात हजेरी सुरू झाली..
१.यश बनसोडे....यस मॅडम...!
२.अथर्व आवड...यस मॅडम...!
.
.
.
.
.
.
९.माऊली बडे ........शांतता...!
त्याक्षणी त्याच्या डेस्कवरची ती रिकामी जागा खूप काही बोलत होती..!
त्याचा मंजुळ आवाज, उत्तर देण्यासाठीची धडपड..!
शाळा सुटली..
मुले लगबगीनं वर्गाबाहेर पडली..
मॅडम सामानाची आवराआवर करू लागल्या..
पर्स, टाचणवाही, हजेरी,पुस्तके, बॉटल....सगळं दोन हातांत घेणं....केवळ अशक्य!
तिथेही 'त्याची' आठवण आली..
तो नित्याने थांबायचा..
मॅडमला हे सगळं घेऊ लागायचा.
पाण्याची बॉटल हातात घेऊन सर्वांत शेवटी मॅडमसोबत वर्गाबाहेर पडायचा.
पराकोटीची समज अन् माया असते एखाद्या माणसात!
शाळा सुटल्यावर मॅडम गाडीवर घरी निघाल्या.
तोच मागून कुणीतरी
"मॅडम sss .."
हाक मारली.
गाडी थांबवून मागे पाहिलं तर एक छोटी मुलगी पळत आली अन् म्हणाली,"तुम्हाला माऊली च्या आईनं बोलावलंय."
"त्या इथं कसं काय?
कधी आले ते सगळे इकडे?"
म्हणेपर्यंत तर ती मुलगी पळूनही गेली...
आश्चर्य अन् आनंदही वाटला.
मनोमन सुखावल्या मॅडम.
तशीच गाडी माऊलीच्या घराकडे वळवली.
रस्त्यावर मुलं खेळत होती..
"मॅडम,मॅडम"..
हाका मारत होती.
पण ह्या सगळ्यांत माऊली कुठेच दिसला नाही.
घरासमोर आल्या.
कुडाचं, पत्र्याचं घर ते!
दुरावस्था झालेलं..
सगळं भकास..ओसाड...
दाराआत डोकावलं तर..
भयाण शांतता....
त्या शांततेत घोंगावणाऱ्या माशांचा आवाज,
जवळच्या नाल्याची दुर्गंधी,
पावसाळ्यात गळणाऱ्या पत्र्यांच्या छिद्रांतून डोकावलेले, जागोजागी दारिद्र्याची लक्षणे दाखवणारे कवडसे..
मागच्या दाराबाहेर खाटेवर दारू पिऊन बेधुंदावस्थेत पसरलेला माऊलीचा बाप..
अन् कुठल्याशा कोपऱ्यात गुडघ्यांत तोंड खुपसून बसलेली माऊलीची आई!
आत जाताच.."माऊली" हाक मारली.
तोच त्या आईने छताकडे बघत मोठ्याने हंबरडा फोडला....."माऊली, तुझ्या मॅडम आल्यात रे! ये की लवकर!"
काळजात चर्रर्र झालं!
शंकेची पाल चुकचुकली,
पण नेमका अंदाज येईना!
तोच मागून आवाज आला,
"काय सांगावं मॅडम, माऊलीचा घात केला हीनं! मारून टाकलं ह्या बाईनं त्याला!"
भोवताली अगणित किंचाळ्या टाहो फोडत घिरट्या घालत असल्यागत झालं एकदम.
घरमालकीण मॅडमजवळ येत म्हणाली," मीच निरोप धाडला होता तुमाला बोलवायला.मॅडम,ही बया एकट्या माऊलीला घरी सोडून, पोरींला घेऊन कामावर गेली, जेवणाच्या सुट्टीत आली तर लेकराच्या तोंडाला फेस,अन् हातपाय खोडत होतं ते!
माऊलीला सर्प डसला वो,
लेकरू तडपडुन मेलं!
त्याला नगं न्हेऊ म्हणलं होतं मी हिला..मी संबाळते म्हणलं होतं त्याला चार महिने!
पण हिला ईश्वास न्हाई! चार पोरीच्या पाठीवर झाल्यालं नवसाचं पोरगं म्हणून सोबत न्हेलं हीनं, आन काटा निगाला लेकराचा!
लई भांडून गेली होती ना ही तुमाला? मंग नीट संबाळायचं होतं की त्याला! "
तिचे शब्द मॅडमच्या कानात लाव्हा ओतल्यागत शिरत होते.पण मेंदू मात्र थंड पडत होता.
कोरड्या ठक्क डोळ्यांतून रक्ताचे अश्रू तेवढे बाहेर पडायचे बाकी होते!
तरीही अवंढा गिळून जमिनीकडे खिळलेली नजर विचलित न होऊ देता मॅडमने विचारलं,
"दवाखान्यात नेलं नाही का लवकर?"
"इकडं यायला निगाली होती, पण मुकादमानं येऊ दिलं न्हाई म्हणं.आधी घेतलेली 20,000 उचल दे म्हणला म्हणं !
तितंच कुण्या जाणत्याला दाखवलं म्हणं.
दोन दिवस तडपडत होतं म्हणं लेकरू.दवाखान्यात दाखवलं असतं तर हाती लागला असता मावल्या !
त्याला सदा एकच म्हणायची...
'काय देती रं मावल्या तुझी शाळा??'
त्याच्या वह्या पुस्तकावर राग राग करायची,म्हणून त्यानं जाताना कपड्याच्या घड्यात घालून न्हेली पुस्तकं!
अन् आता रडत बसलीय!"
म्हातारी घरमालकीण पोटतिडकीने बोलत होती.
छताकडं शून्यात नजर लावून ती आई बघत होती!
स्वतःच्या लेकराला वाचवू न शकल्याचा आरोप होत होता तिच्यावर!
त्याच्या शेवट
च्या पेपरमधील त्याचं देखणं अक्षर, आईच्या आडून बघत त्याने डोळ्यांनी केलेली आर्जवे, गुपचूप केलेल्या फोनमधील त्याचा दबका, पण सच्चा आवाज,सारं सारं चित्रफितीसारखं डोळ्यासमोरून जात होतं मॅडमच्या!
त्या माऊलीचं सांत्वन न करताच मॅडम उठून दाराकडे चालू लागल्या.
पाषाण हृदयाने, निःशब्द...!
तोच मागून आवाज आला,
"मॅडम......
पाच भुकेली तोंडं पोसण्यापलीकडं काहीच करू शकले नाही मी उभ्या जन्मात!
मावल्या असा सोडून जाईल,असं स्वप्नात देखील वाटलं नव्हतं!
लेकरानं तडपडत माझ्या डोळ्यात बघत,माझ्या मांडीवर जीव सोडला.
त्याची आठवण आली तर माझ्याकडं त्याचा साधा एक फोटो पण नाही, ह्याचं लै वाईट वाटायचं!
आज त्याचं सामान बघताना एक गोष्ट सापडली...
तुम्हाला मी म्हणलं होतं ना..
'तुमची शाळा काय देती म्हणून?'
माझ्या जन्माला पुरंल आशी, त्याची सगळ्यात मोठी आठवण दिलीय मला तुमच्या शाळेनं!"
असं म्हणत तिनं छातीशी कवटाळलेल्या हाताच्या मुठीतला ऐवज उघडून मॅडमसमोर धरला...
शाळेनं दिलेलं
ओळखपत्र होतं ते.....!
तिच्या काळजाचं!
मातीआड झालेल्या एका हसऱ्या, समंजस दुःखाचं!
(शिक्षक म्हणून भोगलेला अनुभव आहे हा!
...दुर्दैवाने...😢
पात्रांची नावं बदलली आहेत.🙏
आजही तितक्याच तीव्रतेने आठवण येते त्याची..!🙏)
~©संध्या सोळंके-शिंदे,
अंबाजोगाई
~संकलन