Monday, 19 July 2021

सर्वात मोठा सत्कार.....

मुख्याध्यापक म्हणुन माझ्या हातुन झालेला सर्वश्रेष्ठ सत्कार

सर्वात मोठा सत्कार.....
आपल्या कै.आप्पासाहेब दौलत धना माळी माध्यमिक  विद्यालयातील भिल्ल   देविदास अंकुश हा विद्यार्थी अतिशय स्वभावाने गरीब, सोज्वळ, सामंजस्याने वागणारा,घरातील गरीबी पण शिक्षणाबद्दलची प्रचंड ओढ,स्वतः खडतर कष्ट करून शिक्षण घेण्याची तयारी ठेवणारा....आजचा प्रसंग असाच काहीसा...मी माझ्या विचारांत कामानिमित्त चाळीसगाव शहरात रस्त्याने जात असताना अचानक आवाज आला ...सर ..सर...मी वळुन बघितले तर ..लक्षात आले..अरे हा तर आपल्या विद्यालयातील विद्यार्थी ... देविदास भिल्ल ...घामाने चिंब झालेला....जणु काही पावसात उभा आहे... संपुर्ण शरीर कपड्यांसहीत घामाने  ओलेचिंब भिजलेले.....बाजुला  घर बांधणीचे साहित्य पडलेले....स्लॅब टाकण्यासाठी असलेले मशिन धाडधाड आवाजाने सुरू आहे....मी गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली...विचारले...
काय रे इकडं कुठे...मी थांबुन त्याची विचारपूस करु लागलो....मी भेटल्यावर त्याला प्रचंड आनंद झाला ...भराभरा माझ्याशी बोलायला लागला(कदाचित त्याचे ठेकेदार मालक समोर असल्याने त्याला काम जास्त वेळ थांबवायच नसावं)...सर एक प्राब्लेम आहे....मी म्हटलं बोल काय झालं....तो म्हणाला...सर कालपासून प्रयत्न करतोय माझा दहावीचा रिझल्ट दिसत नाहीए सर...काय झालं असेल सर ....काहीतरी करा. सर ...निकाल नाही सर ..... खुप चिंतेत होता....दोन दिवसांपासून देविदास निकाल पाहण्यासाठी तळमळ करीत होता....मला फार वाईट वाटले ..कष्ट करून शिक्षणाची जिद्द असणारा मुलगा माझ्या समोर उभा होता.....मी म्हटलं काळजी करू नकोस....मी पाहतो....रस्त्याने जातांना विचारांचे काहूर डोक्यात सुरू होते....शहरात सर्व सोयी सुविधा उपलब्ध असणारे विद्यार्थी आणि आमच्या ग्रामीण भागातील स्वतः काबाडकष्ट करून शिक्षणाची जिद्द असणारा आमचा विद्यार्थी....तुलना  सुरू झाली होती..... इंटरनेट कॅफे वर गेलो...मलाही आता उत्सुकता लागली होती..... निकाल चेक केला ....आणि.....
सुटकेचा निःश्वास टाकला..... देविदास ७५.४० टक्के घेऊन चांगल्या मार्कांनी पास झाला होता.... खुप आनंद झाला... कधी  जातो आणि देविदास चे अभिनंदन करतो असं झालं....निकालाची प्रिंट घेतली.....सोबत पेढे घेतले....आणि....
गाडी देविदास काम करत होता तिकडे वळली...... देविदास सिमेंट,वाळु,रेती यांच्याशी मस्ती करून नशिब अजमावत होता... सुरेख भविष्याची स्वप्ने पाहत होता..... मी गेलो होतो त्या रस्त्याकडे काम  करता करता अधुन मधुन पाहत होता... देविदास च्या मनात होणारी घालमेल स्पष्ट जाणवत होती....मला त्याच्याकडे येताना बघुन देविदास आनंदी झाला.... माझ्याकडे न पाहता देविदास ची नजर माझ्या हातात असणा-या कागदाकडे जास्त होती.... चेहऱ्यावर अनेक भाव स्पष्ट उमटत होते....गाडी लावतो न लावतो तोच आवाज आला.....सर काय झाले....सांगा ना..निकाल...सांगा ना....
मी म्हटलं अरे देविदास तु चांगल्या मार्कांनी  पास झाला....... क्षणात देविदास च्या चेह-यावरील भाव बदलले.... प्रचंड आनंद ..एखादे मोठं यश मिळवल्याचा आनंद  त्याच्या चेहऱ्यावर जाणवत होता.... मी हे सर्व अनुभवत होतो.....माझ्या पंधरा वर्षांच्या नोकरीत असा प्रसंग माझ्या समोर पहिल्यांदाच आला होता....मी पिशवीतून पेढे चा बाॅक्स काढला ....देविदास ला पेढा भरविला..... देविदास च्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या.....
म्हणाला...सर आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात संस्मरणीय दिवस राहील.....नकळत देविदास चे शब्द काळजाला चिरत हृदयाच्या कप्प्यात बंद झाले.....देविदास चा निरोप घेतला...पुढील जिवनातील येणाऱ्या परिक्षांसाठी शुभेच्छा दिल्या.... 
विचारचक्र सुरू झाले... एखाद्या विद्यार्थी ला शिक्षण घेण्यासाठी इतके कष्ट करावे लागतात....माझ्या आतापर्यंतच्या  आयुष्यातील, नोकरीतील मुख्याध्यापक म्हणुन आज देविदास चा मी केलेला सत्कार हा  सर्वात मोठा सत्कार होता.....
देविदास ला परमेश्वर पांडुरंग प्रचंड बळ देवो...त्याच्या मेहनतीला...कष्टाला नक्कीच फळ मिळो हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना....🌹🌹

सुरेश सु.देवरे
मुख्याध्यापक
कै आप्पासाहेब दौलत धना माळी माध्यमिक विद्यालय पिंपळवाड म्हाळसा ता.चाळीसगाव
जि.जळगाव

~संकलन

Thursday, 1 July 2021

डॉक्टर्स डे ... एका डॉक्टरचा!

 डॉक्टर्स डे ... एका डॉक्टरचा!

माझं लहानपण वैद्यकीय क्षेत्राच्या गप्पा ऐकत गेलं. वडील प्रथितयश डॉक्टर, त्यामुळे लहानपणापासूनच वैद्यकीय क्षेत्राची ओळख झाली. आणि ह्या क्षेत्राचं आकर्षण कधी जाणवू लागलं ते कळलं सुद्धा नाही. त्या काळात डॉक्टर होणं म्हणजे माझं एक अल्लड स्वप्न होतं. शालेय जीवन संपलं आणि करियर निवडण्याची वेळ आली, ह्या काळात मेडिकल ची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करणं म्हणजे माझ्यासाठी डॉक्टर होणं झालं. प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झालो आणि खऱ्या अर्थाने डॉक्टर होण्याची वाटचाल सुरु झाली. MBBS चा अवाढव्य अभ्यास! महाविद्यालयीन आयुष्याची मजा लुटत जाडजूड पुस्तकांची कायमची मैत्री जडली. वैद्यकीय शास्त्रातले प्राथमिक विषय एक एक करत अभ्यासून संपवले जात होते आणि मजल दरमजल करत MBBS चा अभ्यासक्रम पूर्ण करणं म्हणजेच त्या काळात माझासाठी डॉक्टर होणं होतं. MBBS पूर्ण होऊन पद्व्युत्तर शिक्षण सुरु झालं. दिवसरात्र काम! सोबत प्रचंड कठीण अभ्यासक्रमाचा डोंगर! डॉक्टर व्हायचं म्हणजे हा मेरू पर्वत उचलायचा अशी झिंगच असते त्या काळात डोक्यात! हे दिव्य
पार पडलं आणि माझं लहानपणीचं अल्लड स्वप्न खरं झालं. असं वाटलं की ती प्रवेश परीक्षा, तो MBBS चा अभ्यास, ती पद्व्युत्तर शिक्षणासाठी केलेली जीवघेणी मेहेनत ... हेच सगळं म्हणजे डॉक्टर होणं!

शिक्षण संपलं आणि वैद्यकीय ‘व्यवसाय’ सुरु झाला. आज जरी याला ‘व्यवसाय’ म्हणावं लागत असलं तरी खरं तर रोज कोणाशी तरी वेदनेचं नातं जुळवत होतो. बाह्यरुग्ण कक्षात जमलेले रुग्ण तपासणं, मधेच येणारा एखादा अत्यवस्थ रुग्ण हाताळणं, निदान करायला कठीण असणारे रुग्ण ऍडमिट करणं आणि त्यांचा इलाज व तपासण्या सुरु करणं असं आयुष्य सुरु झालं आणि हेच सगळं म्हणजे डॉक्टर होणं असं वाटू लागलं.

आणि मग लाट आली... करोना विषाणूची लाट! प्रचंड प्रमाणात रुग्ण! ICU, आंतररुग्ण विभाग कुठेच रुग्ण ठेवायला जागा नाही! सगळीकडे नुसता हाहाकार! अनेक जवळचे लोक, ज्यांच्यासमोर मी लहानाचा मोठा झालो, माझे शालेय शिक्षक, लहानपणीचे सवंगडी, असे सगळेच करोना बाधित म्हणून उपचारासाठी दाखल झालेले. सुरवातीच्या काही दिवसातच लक्षात आलं की ह्यावेळी लाट थोडी वेगळी आहे. करोना विषाणूवर अजूनही रामबाण औषध नाही. आणि जो काही उपचार उपलब्ध आहे त्याला म्हणावा तास प्रतिसाद नाही अशी सगळी परिस्थिती. या सगळ्या लोकांना मी बरा नाही करू शकलो तर? राऊंड सुरु केला की पोटात गोळा येई. भावनिक जवळीक असल्याने जास्तीचाच तणाव. मनातलं वादळ लपवून प्रत्येक रुग्णाला धीर देत, त्याच्या तब्येतीचा आढावा घेत निर्णय घेणं सुरु झालं. परीक्षेत पूर्णपणे अभ्यासक्रमाबाहेरचे प्रश्न यावेत तशी आमची अवस्था. ह्या आजाराची खूप कमी माहिती उपलब्ध. कुठलाच प्रोटोकॉल नाही. मग आज पर्यंत केलेला अभ्यास, मिळवलेला अनुभव पणाला लावणं सुरु झालं. डॉक्टर होणं म्हणजे आपल्या रुग्णांसाठी चाकोरीबाहेर जाणं आणि त्यासाठी आपल्या ज्ञानाची पराकाष्टा गाठणं ह्याची जाणीव व्हायला लागली. सगळं काही करूनही काही रुग्णांकडून जराही प्रतिसाद मिळत नसे. मग अश्या रुग्णांसाठी वरिष्ठांना फोन करणं, सहकाऱ्यांशी चर्चा करणं हे रोजचंच होतं. मग जाणीव झाली की डॉक्टर होणं म्हणजे सर्वच रुग्णांसाठी कुठलाही आपभाव न ठेवता आपलं ज्ञान सर्वांसोबत वाटणं आणि एकत्रित प्रयत्न करणं! बऱ्याचदा अशीही वेळ आली की सगळेच उपाय थकले व रुग्ण गमवावा लागला. १०-१५ दिवस ह्या रुग्णांशी व त्यांच्या नातेवाईकांशी जुळलेली नाती! त्यांच्या त्या अश्रुधारा, दुःख बघवत नसे. अंत्यसंस्कार त्यांच्या मनाप्रमाणे करू देण्याची सुद्धा परवानगी नाकारताना मन पाणीपाणी होऊन जाई. बऱ्याचवेळा केबिन आतून लावून घेऊन मी पण माझ्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली आहे. मग जाणीव झाली की डॉक्टर होणं म्हणजे ह्या भावनांना खंबीरपणे आवर घालून पुढच्या रुग्णांसाठी आपलं सर्वस्व पणाला लावणं. असे एक नव्हे तर हजारो अनुभव! ह्या करोनाच्या महामारीने डॉक्टर होणं म्हणजे काय याचा एक वेगळा आयाम अनुभवायला मिळाला.

आज जगातले सगळेच डॉक्टर आपलं  सर्वस्व पणाला लावून आहेत. प्रचंड प्रमाणात काम, तेवढाच तणाव, कुटुंबापासूनची दूरी ...अशा अनेक वैयक्तिक समस्या बाजूला ठेवून लढणारे हे सैनिकच! इटली स्पेन सारख्या देशात अगदी सुरुवातीला लढलेले डॉक्टर्स, ज्यांच्या प्रयत्नाने व अनुभवाने ह्या आजाराची थोडी तरी माहिती उपलब्ध होऊ शकली त्या आमच्या सहकाऱ्यांना सलाम! कोव्हीड सेंटर मध्ये PPE कीट घालून दिवस रात्र झपाटून जाऊन गेली एक वर्ष तेवढ्याच उमेदीनं काम करणाऱ्या सहकाऱ्यांना सलाम! ह्या विषाणूवर कुठलं औषध लागू होईल ह्याचं वेगवान संशोधन करणाऱ्या सहकाऱ्यांना सलाम! इतिहासात पहिल्यांदाच एक वर्षापेक्षा कमी कालावधीत प्रभावी व सुरक्षित अशी लस उपलब्ध करून देणाऱ्या या अभूतपूर्व सहकाऱ्यांना सलाम! आणि सगळ्यात शेवटी सलाम आपण सर्वांना ...आम्ही प्रयत्न करत होतो पण बऱ्याचदा ते  कमी पडत होते, आमच्या सुविधा कमी पडत होत्या, काही लोकांसाठी आम्ही उपलब्ध होऊ शकत नव्हतो... हे सगळं नाईलाजास्तव होतं! हे समजून घेऊन आमच्यावर ठेवलेल्या विश्वासासाठी, आमच्यामागे खंबीरपणे उभं  राहण्यासाठी आपल्याला सलाम!

पुढची लाट नकोच. आम्हाला कळतंय की वारंवार आपण आयुष्य थांबवणं शक्य नाही. पण काळजी घेत जगणं शक्य आहे. वेळेवर लसीकरण घेणं, मास्क वापरणं, social distancing पाळणं हाच यावरचा उपाय. आणि एवढ्यानंतरही संसर्ग झालाच तर पुन्हा आम्ही मागे हटणार नाही. तुमच्या शुभेच्छांची ऊर्जा आमच्या पाठीशी आहेच!

Happy Doctors’ Day!


• डॉ अमित हरताळकर.

~संकलन