Wednesday, 13 May 2020


                  । श्री।               

"आशावाद..!! दुर्दम्य आशावाद..!"


सोशल मीडियावर हा फोटो आज  व्हायरल झाला आहे. फोटो पाहताक्षणी काळजाला खोलवर स्पर्श करून गेला...!
          आणि मग वाटलं..
  'खरंच माणसाला जगण्यासाठी 
काय हवं..?'
अशी कुठली गोष्ट आहे जी कुठल्याही परिस्थितीत जीवन जगण्यासाठी प्रेरणा देत असेल..?
अन्न, वस्त्र, निवारा.. होय लौकिक अर्थाने हेच आहे या प्रश्नाचं उत्तर..
पण फक्त एवढंच असेल काय..?
तर नाही..
"आशावाद.." Optimism..  हेच  खरं तर याच उत्तर आहे..!
"माणसाची जगण्याची चिवट इच्छाशक्ती दिपवून टाकणारा आशावाद !" याला तुम्ही जिद्द म्हणा.. positivity म्हणा की आणखी काही..पण जोपर्यंत आपल्यात 'हा' जिवंत आहे तोपर्यंत सारं काही आलबेल आहे..!
           खरं तर आपणच जगू की नाही ह्याचीच खात्री नसलेला हा मजूर, कामगार किंवा स्थलांतर करून पोट भरणारा माणूस..!
अशीच हजारो-लाखो माणसं आता घरी निघाली आहेत..! आणि अशा परिस्थितीत ४०-५० दिवसांनी वैगरे घरी जात असताना त्याने घेऊन काय जावं ? तर 'एक रोपटं'.. !!..
       किती प्रचंड 'आशावाद' हा आणि त्याहून मोठं आभाळा एवढं मन..! स्वतःच्या जगण्याची ददात असताना जवळील रोपट्याला वाचवण्याचा हा खटाटोप म्हणजे फेसबुक आणि सोशल मेडियावर दिवसरात्र बसून 'ग्लोबल वाॅर्मिंगच्या' गप्पा हाणणाऱ्या, 'सो कॉल्ड बुद्धिजीव्यांना' मारलेली एक सणसणीत चपराक आहे..!
       "स्वतः जगू, इतरांनाही जगवू" एवढं वैश्विक तत्वज्ञान सांगायला कुठल्याही युनिव्हर्सिटीमधला कोर्स करावा लागत नाही.. की कुठल्या अवजड पदव्या संपादन कराव्या लागत नाहीत.
        लॉकडाऊनच्या या काळोख्या पोतडीत उद्या कोणा साठी काय आहे सांगता येत नाही..! पण जगणं-मरणं यापैकी काहीही समोर उभं राहिलं तरीही हा माणूस ते रोप वाचवेल.. वाढवेल असं वाटून गेलं...!!
म्हटलं तर अतिशय साधा फोटो.. म्हटलं तर प्रचंड काही सांगून जाणारा ! माणसाने सृष्टी वर आपला मालकी हक्क स्थापीत करून सृष्टीचा सर्वार्थाने नाश केला आहे..! सृष्टी केंद्रस्थानी फक्त माणूस आहे हा अहंकार माणसाला नडतो आहे. आणि त्याच काळात इवल्याश्या रोपाला घेऊन जाणं 'थोर' आहे. तसं बघितलं तर प्रवासात हे नारळाचं झाड ओझं आहे. सहज फेकून देऊ शकला असता; पण ते सोबत नेतोय..! माणसाने सृष्टी चा 'मालक' नाही तर 'पालक' म्हणून जगायला हवं.. हा संदेश देऊन जातं हे चित्र..!
हे चित्र माणुसपणावरचा विश्वास बळकट करणारं आहे..!
      ह्या माणसाचा चेहरा दिसत नाहीये कारण तो तुमच्या- माझ्यात दडलेला कुणीही असू शकतो. हातात कुठलाही झेंडा धरण्यापेक्षा एक रोपटं धरून जाणं.. ह्या वाईट काळात ही एक अद्भूत कृती आहे...!"
संत ज्ञानेश्वर, गौतम बुद्ध,स्वामी विवेकानंद या सगळ्यांचे विचार.. शिकवण आपल्यांत किती खोलवर रुजले आहेत याची खात्री देणारं हे चित्र..!!
       । ॐ सर्वे भवन्तु सुखिनः
           सर्वे सन्तु निरामयाः ।
           सर्वे भद्राणि पश्यन्तु मा         
           कश्चिद्दुःखभाग्भवेत् ।
       । ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः।
        या मंत्राची प्रचिती देणारं हे चित्र..! त्या अनामिका ला मनापासून सलाम !!
प्रत्येकाच्या मनातली ही 'हिरवळ' आणि त्यासाठी लागणारी 'ओल' अशीच कायम राहू देत हीच प्रार्थना !🙏
©अॅड.शीतल पाटील.
१३/०५/२०२०
चोपडा.